RSS

Category Archives: व्यक्तीचित्रण

आदूमामा

तुला म्हणून सांगतो बे आभ्याs, या दारूच्या व्यसनात दोनच स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण दारू पितो, तर दुसर्‍या स्टेजमध्ये दारू आपल्याला. या आदूची पहिली स्टेज तर केव्हाच पार झालीये. आता हि दुसरी कुठवर नेते हे बघायचय.” .. कालपरवाच बोलल्यासारखे आदूचे हे शब्द कानात घोळत होते, अन इतक्यात दादरावरचा कोलाहल अचानक शांत झाला. कल्पना असूनही काळजात धस्स झाले. पाहिले तर चार टाळकी आदूच्या घराबाहेर जमताना दिसली. मी काय ते समजून चुकलो. आदू दुसरी स्टेज ओलांडून तिसर्‍या स्टेजला गेला होता. कधीही न परतण्यासाठी, कायमचाच!

*****

आदूस ! एकेकाळचा आमचा आदू मामा ..

स्वताच्या आयुष्याची चिंता चार घटका दूर सारत दुसर्‍याच्या घरात डोकावण्याची वृत्ती, दुसर्‍याच्या घरातच नाही तर आयुष्यातही अधिकार असल्यागत हस्तक्षेप करण्याची सवय, काही भानगड सापडलीच तर ती पार गावभर करण्याची खोड, पण कोणी संकटात दिसताच कर्तव्य समजत हातचे न राखता मदत करण्याचा स्वभाव., दक्षिणमध्य मुंबईतील चाळसंस्कृतीची देणगी म्हणून अंगी भिनलेल्या या गुणदोषांना आदूही अपवाद नव्हता. पण त्याही पलीकडे जाऊन तो आणखी बरेच काही होता.

तुला म्हणून सांगतो बे आभ्याs.. हे शब्द कानावर पडले की समजायचे, आता जगातले एखादे भारी आणि अनोखे तत्वज्ञान आपल्यासमोर उलगडले जाणार आहे, किंवा चाळीतील एखादी आतल्या गोटातील बातमी त्यामागच्या विश्लेषणासह ऐकायला मिळणार आहे. हा तत्ववेत्ता म्हणजेच आमचा आदूमामा. आमचा म्हणजे अगदी सर्वांचाच नाही. कोणासाठी आदूशेठ तर कोणासाठी नुसताच आदू. काही जण त्याला “ए चिवट्या” या त्याच्या टोपणनावाने आवाज द्यायचे, तर काही असेही होते जे निव्वळ फुल्याफुल्यांनीच त्याचा उद्धार करायचे. तरीही आम्हा पोराटोरांसाठी एकेकाळचा आदूमामाच. काळ सरला तशी पोरे मोठी झाली, अक्कल आली, या बेवड्याला काय मामा म्हणून हाक मारायची असा शहानपणा अंगी आला. पण माझ्यासाठी मात्र बालपणीच्या आठवणींचा एक कप्पा या आदूमामाने व्यापला होता. अगदी आजही जेव्हा तो बोलायचा, तुला म्हणून सांगतो बे आभ्या, तेव्हा ते खास या आभ्यासाठीच आहे असे वाटायचे.
एकोणीसशे नव्वद साल, जेव्हा आदू मला पहिल्यांदा भेटला, चाळ समितीच्या कार्यालयाबाहेर. मी तेव्हा चौथी-पाचवीत असेन. त्याच्या व्यसनांचा अड्डा आणि आमचा खेळायचा कट्टा जवळपास एकच. कार्यालयाचे दार संध्याकाळी ‘सहा ते नऊ’ या वेळेत खुलायचे. दिवसभर त्या बंद दाराचा आसरा घेत, तिथेच एका कोपर्‍यात तो आपले बस्तान मांडायचा. सोबतीला एक गडी शेजारच्या वाडीतून यायचा. सारे म्हणायचे त्यानेच आदूला कसल्याश्या नशेला लावले होते. ड्रग्स, चरस, गांजा, ब्राऊनशुगर., त्या वयात असलेल्या अकलेनुसार आम्ही त्या नशेला नाव द्यायचो. दुरून पाहता सिगारेटच्या पाकीटातील चंदेरी कागद तेवढा जळताना दिसायचा, पण घरून ओरडा पडेल या भितीने जवळ जाऊन ते कुतुहल शमवायची हिम्मत कधी झाली नाही.

त्यावेळी आदूचे वय तीस-पस्तिशीच्या घरात असावे. नशेची सवय असूनही तरुणपणातील व्यायामाने कमावलेल्या शरीराच्या खुणा त्याच्या गोळीबार झालेल्या गंजीतून डोकावत राहायच्या. त्या वयात सिनेमांतील अ‍ॅक्शन हिरोंमुळे पीळदार शरीराचे आकर्षण वाटत असल्याने, नशेच्या नादी लागलेल्या आदूबद्दल एक सहानुभुतीच वाटायची.

सुदैवाने त्या चंदेरी कागदाच्या व्यसनात आदू जास्त गुरफटला नाही. साथसंगत सुटली, चार लोकांनी फटकारले तसे भानावर आला. बाटलीची साथ मात्र आयुष्यभराची होती, म्हटलं तर बिडीकाडीचेही व्यसन. या त्याच्या आयुष्याला उर्जा देणार्‍या गोष्टी असल्याने त्यांची साथसोबत कधी सुटणार नव्हती.

अश्या या, आणि एवढीच माहीती असलेल्या आदूला मी जवळून ओळखू लागलो ते ईयत्ता आठवीनंतरच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये.

चाळीच्या पहिल्या मजल्यावर म्युनसिपालटीची शाळा भरायची. मे महिन्याची सुट्टी तिलाही पडायची. शाळेच्या बंद वर्गांचा फायदा उचलत चाळीतल्या सार्‍या रिकामटेकड्या भुतांचा अड्डा तिथेच जमायचा. चार जण कॅरमवर लागले असायचे, तर इतर पत्ते कुटत पडायचे. काही नाही तर गप्पांचाच फड रंगायचा. आम्हा सर्वांमध्ये वयाने मोठी असलेली एकच व्यक्ती होती, ती म्हणजे आदूमामा. सुरुवातीला माझ्या नजरेत त्याची प्रतिमा तशीच होती जसे मी त्याला पहिल्यांदा पाहिले होते. त्यामुळे थोडासा दबकूनच राहायचो त्याला. पण फार काळ नाही ..

तो कॅरम खेळायला म्हणून आम्हाला पावडर पुरवायचा. त्यांच्या जमान्यातील अडगळीत पडलेला कॅरमचा स्टॅंड त्यानेच कुठूनसा आम्हाला शोधून दिला होता. तापलेला कॅरम बोर्ड चांगला चालतो हे ज्ञान देत बल्ब आणि फोकसची जुळवणीही त्यानेच करून दिली होती. आपुलकीचे थोडेसे शेअर त्याच्या नावे गुंतवण्यासाठी हे एवढे भांडवल, त्या वयात माझ्यासारख्या कॅरमप्रेमीसाठी पुरेसे होते.

त्याचा स्वताचा खेळही चांगला होता, मात्र आमच्याबरोबर महिन्यातून एखादाच डाव खेळायचा. हेच पत्त्यांच्या बाबतीत, ते स्वत: हातात न धरता एखाद्या कच्च्या लिंबूच्या पाठीमागे बसून त्याला पाने सुचवायचा. कधीतरीच हाऊजीचा डाव रंगायचा, त्यातही तो केवळ नंबर पुकारायला म्हणून भाग घ्यायचा. त्याला आमच्यात खेळायला संकोच वाटायाचा की लहानग्यांशी हरण्याची भिती, हे त्यालाच ठाऊक. मात्र आपल्याला खेळण्यात नाही तर बघण्यातच रस आहे याचा अभिनय तो छान वठवायचा.

दुपारचे जेवण आटोपून वामकुक्षी घ्यायला म्हणून त्याचा बिछाना दादरावर लागायचा. झोप येईपर्यंत आमच्याशी गप्पा मारत बसून राहायचा. हळूहळू आम्हीही हक्काने त्याच्या बिछान्यावर पसरू लागलो होतो. अनुभवत होतो तसे समजत होते, दारूचा वास ना त्याच्या तोंडाला यायचा ना त्याच्या बिछान्याला यायचा.

आदू मिथुनचा फार मोठा चाहता होता. मिथुनला तो मिथुनदा म्हणायचा. खरे तर बरेच जण म्हणत असावेत, पण आमच्यासाठी ते नवीन होते. त्या काळात मिथुनचा दर आठवड्याला एखादा तरी बी ग्रेड सिनेमा यायचा. आदू न चुकता जवळच्या स्टार टॉकीजमध्ये बघायला जायचा. आम्हालाही आमंत्रण असायचे, पण मिथुनचा सिनेमा काय बघायचा म्हणत त्याच्याबरोबर जाणे सारेच टाळायचे. अर्थात, अमिताभचा सिनेमा असता तरी खचितच कोणी गेले असते. शेवटी घरच्या संस्कारांमुळे एखाद्याला मामा बोलणे वेगळे आणि खरोखरचे मामा समजणे वेगळे ..

पण आदू सिनेमा बघून आल्यावर त्याच्या कडून स्टोरी ऐकणे हा एक मनोरंजक कार्यक्रम असायचा. मिथुनचे सिनेमातील संवाद आणि अचाट पराक्रम मोठ्या अप्रूपाने तो रंगवून सांगायचा. त्या सिनेमांमध्ये त्याला काय आवडायचे हे नक्की सांगता येणार नाही, पण कदाचित आपल्या आयुष्याची पटकथाही देवाने एखाद्या बी ग्रेड सिनेमापेक्षा वेगळी लिहिली नाहीये, हा एक समान धागा गवसत असावा.

त्याचा असून नसल्यासारखा बाप कधी निर्वतला याची कल्पना नाही, पण आई मात्र लहानपणीच पोरके करून गेली. परीणामी सावत्र आईचा छळ नशीबात होता, पण संसाराचे सुख देखील फार काही लाभले नाही. गर्दुल्ला हा शब्द जसा पहिल्यांदा मला आदूबाबत समजला, तसेच रंडवा या शब्दाचीही भर माझ्या शब्दकोषात आदूमुळेच पडली. आदू विधुर होता. जिला कधी मी पाहिले नाही पण जिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून होतो ती आमची मामी, स्टोव्हचा भडका उडाल्याचे निमित्त झाले आणि त्यातच गेली. कोण म्हणायचे तिच्या सावत्र सासूनेच तिला जाळले, तर काहींच्या मते त्यात आदूचाही हात होता. खरे खोटे देवास ठाऊक. पण त्या वेळचे भाजल्याचे डाग आदूच्या हातावर आजही होते, ज्याचे चटके त्याला आयुष्यभर झेलायचे होते.

त्यानंतर सावत्र आईचे छत्र म्हणा किंवा छळसत्र म्हणा, फार काळ टिकले नाही. सध्या त्याच्या घरात राहणारी आणि त्याला नावाने हाक मारणारी त्याची दोन लहान भावंडे सावत्रच होती. नाही म्हटले तरी त्यांच्या संसारात हा उपराच होता. स्वताच्याच घरात त्याचे जगणे आश्रितासारखे होते. जेवण्यापुरतेच काय ते आतल्या दिशेने उंबरठा ओलांडणे व्हायचे.

आदू पोटापाण्यासाठी म्हणून माझगाव डॉकमधल्या कुठल्याश्या तांत्रिक विभागात कसलीशी जोडणी का बांधणी करायचा. आपल्या कामाचा त्याला एखाद्या अभियंत्यापेक्षा जास्त अभिमान होता. कॉलेजातील चार बूकं शिकलेल्यांपेक्षा आपल्याला जास्त समजते असा दावा बिनदिक्कतपणे करायचा. वडीलांच्या जागेवर आयतीच मिळणारी सरकारी नोकरी नाकारून स्वताच्या हिमतीवर आणि कौशल्यावर मिळवलेल्या नोकरीचा अभिमान असणेही रास्त होतेच.

कधी, कुठे, अन कसा झिंगलेल्या अवस्थेत सापडेल याचा नेम नसलेला आदू शनिवारी मात्र वेगळाच भासायचा. जेव्हा चाळीतील सारी तरुणाई नव्याने बांधलेल्या गणपतीच्या मंदिरात जायची तेव्हा हा हनुमंताचा भक्त, मारुतीच्या जुन्या मंदिरात तेल ओतताना आढळायचा. त्या दिवशी मग दारूला स्पर्श केवळ नजरेनेच करायचा. एवढेच नव्हे तर बोलतानाही त्याची जीभ मग सैल नाही सुटायची. जणू विचारांचीही शुद्धता पाळायचा. शेंदूराचा भलामोठा टिळा फासलेला आदू, व्यसनांपासून दूर राहत श्रद्धेतूनही उर्जा मिळते हे एका दिवसासाठी का होईना दाखवून द्यायचा.

ईतर दिवशी मात्र त्याच्या तडाख्यातून कोणी वाचलेय असे द्रुश्य विरळेच. खास करून सार्वजनिक नळावरची त्याची भांडणे ठरलेलीच असायची. स्वतापेक्षा जास्त तो दुसर्‍यांसाठी भांडायचा. घाईगडबडीत असलेल्या एखाद्याला दुनियादारी दाखवत मध्येच रांगेत घुसवायचा. पण सर्वांनाच आपली गरज श्रेष्ठ वाटत असल्याने या परोपकारी विचारांना तिथे थारा नसायचा. आदूचे मात्र वेगळेच होते. कोणाचे काही तरी चांगले करण्यासाठी कोणाचे काही तरी वाईट करावेच लागते – अ‍ॅकोर्डींग टू आदू’स लॉ ऑफ चांगुलपणा.. पण ते चांगले कधी दिसण्यात येत नाही अन वाईटाचीच तेवढी चर्चा होते हा व्यावहारीक द्रुष्टीकोण मात्र त्याला अजून समजायचा होता.

पण तरीही आदूची सर्व चाळकर्‍यांना गरज होतीच. चाळीतला कोणताही सण असो वा कार्यक्रम, तो आदूच्या सहभागाशिवाय अशक्यच. अगदी दुकान लाईनीतून वर्गणी जमा करण्यापासून मंडप सजवण्यापर्यंत असो, वा हातात झाडू घेऊन साफसफाई करायची असो, त्याच्या सारखा हौशी स्वयंसेवक दुसरा नव्हता. फक्त त्याच्या हौसेला रिकामटेकडेपणाचे नाव दिले जायचे. गणपतीच्या अकरा दिवसांत घसा फाडून कोकलणारे आरतीसम्राट कैक होते मात्र ढोलकीसम्राट आदू एकच होता. त्याचा झिंगलेला हात ज्या तालात ढोलकी वर पडायचा तसाच खडू हाती येताच बोर्डावरही सर्रसर चालायचा. सार्वजनिक पॅसेजमध्यल्या फळ्यावर गणपतीचे चित्र कोणी काढावे तर ते आदूनेच, शिवजयंती येता शिवाजी महाराजांना रंगवावे तर त्याच्यासारखे त्यानेच. निवडणूकींच्या काळातही प्रचाराचे फलक रंगवायला म्हणून आदूला आमंत्रण असायचे. मोबदला म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर बारमध्ये बसवले जायचे. मोबदल्याची पुरेपूर वसूली व्हायची पण कला मात्र झाकोळली जायची. खरे तर या फुटकळ फलकांव्यतिरीक्तही तो बरेच काही रंगवू शकला असता, पण त्याला स्वताचेच आयुष्य रंगवायचे नव्हते. पडद्यामागचे कलाकार बरेचदा पडद्यामागेच राहतात. आदूसारखे मात्र प्रत्यक्ष रंगमंचावर वावरूनही पडद्यामागे ढकलले जातात.

आयुष्यात काय किती कमावले यावर नाहीतर काय किती गमावले यावर तो आयुष्याचे मोजमाप करायचा. पण आदूचे हे तत्वज्ञान या व्यवहारी जगात कवडीमोल होते, त्याला कोणी गंभीरपणे घेणारे नव्हते कारण तो स्वत: अपयशी होता. पण आदू खरेच अपयशी होता का. हे आयुष्य जगण्यात तो कमी पडला होता का. काही उद्देश नसताना तो जगायचा. बायको नाही, ना मूलबाळं. ना पुढे कधी लग्नाचा विचार त्याच्या मनात आला असेल. आलाच तरी बेवड्याला कोण कुठली मुलगी देणार होते. पण तरीही आजवर त्याला कसली खंत नव्हती, ना नशीबाला दोष देणे होते. स्वताच आखलेल्या चौकटीत सुखाने का नसेना, पण कसल्याश्या समाधानाने तो जगत होता.

आणि एके दिवशी ती खबर आली. चाळीला बिल्डर लागला. पुनर्बांधणी योजनेअंतर्गत चाळीच्या जागी टॉवर उभारला जाणार होता. चाळीतल्या मध्यमवर्गीय लोकांना मोठ्या फ्लॅटची स्वप्ने पडू लागली. प्रॉपर्टीवरून भावाभावांमध्ये वाद होऊ लागले. सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्‍या घरांमध्ये वेगळे चित्र नव्हते, तिथे आदूच्या घरची परिस्थिती विचारायलाच नको. काही म्हणत होते बेवड्याला लॉटरी लागली, तर काही जण तो पॉपर्टी चार वर्षात फुकून टाकेल अशी भाकीते वर्तवत होते. खुद्द त्याच्या भावांना पोटशूळ उठू लागला होता. घरामध्ये एक वाटा आदूचाही होता. मुंबईतील मोक्याची जागा, सोन्याचा भाव, ईंचाईंचाला मिळणारी किंमत. तिथे काही लाखांचा घास आदूच्या घशात जाताना त्यांना बघवत नव्हते. आदूला काही रक्कम देऊन ते घर आपल्या नावावर करायचे बेत आखत होते. पण आदू ईतकाही बावळट नव्हता. परीणामी घरात रोजचेच खटके उडू लागले. घरातून अन्नपाणी मिळायचे बंद झाले. तहानभूक आणि मनाची अशांती आता सारे दारूच भागवू लागली होती.
आदूच्या मते जगातल्या प्रत्येक गोष्टीला नेहमी तीन बाजू असतात. एक बरोबर तर दुसरी चुकीची, आणि तिसरी आपल्या फायद्याची. आजकाल सारे तीच बघत होते. घरे मोठी होत होती अन माणसे छोटीच राहिली होती.

आदूमामा आदूमामा करत अर्ध्या चड्डीत फिरणारी मुले आता नोकरी धंद्याला लागली होती. एकीकडे काळ बदलत होता दुसरीकडे आदूत झपाट्याने बदल होत होता. जेव्हा इतर सारे चाळकरी यंदाचे शेवटचे वर्ष म्हणत सारे सणसमारंभ झोकात साजरे करायचे बेत आखत होते तिथे आदूने चारचौंघांमध्ये मिसळणे बंद केले होते. चाळीच्या कार्यक्रमांत हा स्टेजच्या जवळ नाही तर पार लांब दिसू लागला होता. चेहरा त्याचा उतरू लागला होता, तब्येत पार खालावली होती. इथून पुन्हा सुधारेल अशीही आशा त्याच्याकडे बघून वाटत नव्हती. पन्नाशीचा आदू सत्तरीचा वाटू लागला होता. कधीतरी माझ्या बाजूला येऊन उभा राहायचा, “काय आभ्या” अशी हलकेच हाक मारायचा. उत्तरदाखल त्याला माझे हसणेच अपेक्षित असायचे. पण त्याची स्थिती पाहता ते ही हल्ली आतून येणे बंद झाले होते. “कसा आहेस रे आता?” एवढी काळजीपोटी चौकशी व्हायची. पण त्यानंतर तो जे काही भाव चेहर्‍यावर आणत हसायचा, जे आता फक्त मरणाचीच वाट बघत असल्यासारखे दाखवायचा, ते असह्य करून जायचे.

आदूची पहिली स्टेज पार होऊन तो दुसर्‍या स्टेजला पोहोचल्याची ती लक्षणे होती. दारूचे कित्येक ग्लास त्याने एकाच घोटात रिचवले असतील पण ती मात्र त्याला हळूहळू आपल्या पोटात घेत होती. मध्यंतरी डॉक्टरने शेवटचे फर्मान दिल्याचे आठवतेय. डॉक्टरही वैतागूनच म्हणाले असतील, कारण त्यांना क्लिनिक सोडून नाईलाजाने चाळीचे तीन मजले चढावे लागायचे, पण पैश्याची फीज मिळेलच कि नाही याची खात्री नसायची.

अखेर बोर्ड रंगवणार्‍या आदूचे स्वत:चे नाव बोर्डावर झळकले ते मेल्यावरच.. कै. आदिनाथ शंकर साताडकर.
त्या दिवशी कित्येकांना त्याचे पुर्ण नाव समजले असेल. तरीही त्यांच्यासाठी एक बेवडाच मेला होता. एक कलावंत, एक विचारवंत आपली कला पेश न करताच या जगातून निघून गेला आहे, हे मात्र कोणाच्याही ध्यानी नव्हते.

आदूसारखे लोक हे आपल्याच चांगुलपणाचा आरसा असतात. जर आपण चांगले असू तर आपल्याला त्यांच्यातील चांगले गुण भावतात, नाहीतर आठवणीत केवळ त्यांचे दोषच राहतात.

आदू म्हणायचा, कोणाच्या आठवणीत रडायचे नाय बे आभ्या. आठवणी त्रास देऊ लागल्या की त्या आठवाव्याश्या नाही वाटत. मी रडत नाही म्हणून मला माझी आई रोज आठवते. तू एकदा रडला की या आदूला विसरून जाणार बघ. पण खरे होते, आदूला ‘आदूस’ अशी हाक मारणारी त्याची आई त्याला अजूनही आठवायची. ती आई, जी त्याच्या वयाच्या पंधरासोळाव्या वर्षी त्याला सोडून गेली, पण आज पन्नासाव्या वर्षीही त्याच्या तितकीच स्मरणात होती. बहुधा उभ्या आयुष्यात त्याला तितकाच मायेचा माणूस दुसरा कोणी भेटला नसावा ..

आज आदूच्या आठवणी सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येत नसेलही, ना ऐकताना कोणाला गलबलून आले असेल. मात्र आदू गेला तेव्हा त्याच्या मैताला चिक्कार गर्दी होती. कोण कुठल्या चार बायका जेव्हा आदूसाठी रडल्या तेव्हा थोडेसे माझ्याही काळजात तुटले होते. या प्रत्येकाशी त्याचे काही ना काही तरी ऋणानुबंध जुळल्याशिवाय हे शक्य होणार नव्हते. वाईट फक्त एकाच गोष्टीचे वाटते, हे जर त्याला आधीच समजले असते, तर कदाचित त्याच्या जगण्याला एक कारण मिळाले असते.

– आभ्या