RSS

Monthly Archives: ऑगस्ट 2014

किस्सा – ए – गुलबकावली

तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे.

तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच. तरीही ते समोरच्या पार्टीला देताना लागणार्‍या गटसमध्ये मात्र जमीन-अस्मानाचा फरक असल्याने पिवळ्या फुलांचा खप नेहमीच जास्त व्हायचा.

पण यावर्षी मात्र चक्रं पलटली होती. लाल गुलाबांना किंचित जास्त डिमांड आला होता. कारणीभूत होता आमचाच टारगट मुलांचा ग्रूप. एका कमालीच्या सुंदर पण (साहजिकच) तितक्याच घमेंडखोर मुलीला यावर्षी टारगेट करायचे होते. आमच्यातले काळे-सावळे, जाडे-भरडे, लुक्के-सुक्खे, कधी मुलींशी स्वप्नातही गप्पा न मारलेले, एक्कूण एक जण तिला गुलाब भेट करणार होते. ते देखील मैत्रीचे पिवळट नाही, तर देठाला “आय लव्ह यू” ची चिठ्ठी डकवलेले लाल टपोरे काटेदार गुलाब. हेतू एकच, “कोणीही यावे आणि मला प्रपोज करून जावे” असे तिला वाटून तिच्यातल्या अहंकाराची जागा न्यूनगंडाने वा गेला बाजार भयगंडाने तरी घ्यावी.

तर, असे काय झाले होते?
तर, काही खास नाही. आमच्यातल्या एका लोक-अ-प्रिय विद्यार्थ्याला तिने पहिल्याच फटक्यात नकार दिला होता. बरे नकार देताना एखादे मिळमिळीतच कारण दिले असते. “माझ्या घरी असे चालत नाही” पासून “मला माझी करीअर करायची आहे” पर्यंत काहीही खपवून घेतले गेले असते. किमान “आपण चांगले मित्र बनू शकतो” म्हणत मांडवलीच केली असती. पण नाही, “आरश्यात कधी आपले तोंड बघितले आहेस का?” म्हणत पठ्ठ्याचा पार तोंडावरच कचरा केला होता. या उपर तिच्याबद्दल माझे स्वताचेही मत फारसे अनूकूल नव्हते. जेव्हा ती आमच्या वर्गासमोरून जायची तेव्हा व्हरांड्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हातातले सबमिशन बाजूला ठेउन मी नजरेनेच तिला सोबत करायचो. पण त्या मोबदल्यात ती एकदा ढुंकून बघेल तर शप्पथ. आम्ही आसपास घुटमळताना कधी तिच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नव्हती. बस्स आज ती माशी हलताना बघायची होती.

तब्बल १७ स्वयंसेवकांनी या उपक्रमात आपली नावे नोंदवल्यानंतर आता या भाऊगर्दीत हरवून जाता येईल म्हणत अठरावे नाव मी सुद्धा नोंदवले. आम्हा अठरा प्रेमवीरांची नावे ती प्रत्येक चिठ्ठी वाचत पाठ करणार नाही याची खात्री असल्याने या ऐतिहासिक किडेगिरीचा एक भाग होण्याची संधी मी सोडली नाही. आणि तसेही हे फूल स्वताहून नेऊन द्यायचे नव्हतेच. आमच्या कॉलेजमधील हौशी विद्यार्थ्यांची संघटना, जे हे डे’ज वगैरे प्रकार साजरे करतात, तेच याबाबत पुढाकार घेऊन लोकांचे प्रेमसंदेश गुलाबासह इच्छित स्थळी पोहोचवायचे काम करतात, ज्यामागे मुखदुर्बळ आणि लाजर्‍याबुजर्‍या व्यक्तीमत्वांनाही त्यांचे प्रेम मिळावे हा सदहेतू. त्यामुळे या मिशन गुलबकावलीमध्ये आपले नाव नोंदवून आता फक्त गंमत बघायची होती.

सकाळचे लेक्चर आटोपल्यानंतर दुपारची जेवणे उरकून सारे प्रयोगशाळेच्या आवारात जमले. आज त्यांचे कुठले प्रॅक्टीकल आहे आणि योग्य संधी आणि पुरेसा वेळ केव्हा मिळणार याचा अभ्यास आम्ही अगोदरच केला होता. ठिक दिड वाजता त्या गुलबकावलीला पहिले फूल मिळाले. तिने पाहिले, नाव वाचले, प्रमोद आत्माराम माटे ! सोबतीला आम्ही आमच्या पजामा छाप क्लासरूमचे नावही टाकले होते. अर्थातच हा कालपर्यंत अज्ञात असलेला प्रेमवीर आज कोण कुठून उगवला ते तिला समजले नसणारच. मात्र आत्माराम माट्यांची सून होण्यात तिला जराही रस नसल्याने तितक्याच सहजपणे तिने ते फूल बाजूला सारून ठेवले. दोनच मिनिटात दुसरे फूल हजर. तर चौथ्या मिनिटाला तिसरे. पुन्हा तीच तशीच प्रतिक्रिया. फक्त चेहर्‍यावर एखादी आठी जास्त उमटल्याचा भास तेवढा झाला. पुढच्या दहाबारा मिनिटांत एकेक करून सहा-सात फुले तिच्याकडे जमली. आता हळूहळू तिच्या वर्गातल्या आणि आजूबाजुच्या इतर मुलामुलींचे लक्ष या प्रकाराकडे वेधू लागले. सुरुवातीला काही जणांना वाटणार्‍या कौतुकाची जागा, नंतर हेव्याने घेत, आता चेष्टा मस्करीने घेतली होती. आठ-दहा फुलांनतर तर अशी वेळ आली की तिला येणार्‍या प्रत्येक फुलागणिक तिच्याच वर्गमित्रांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. सोबतीला चार शिट्ट्या आम्हा गावगुंडांकडूनही येऊ लागल्या. बघता बघता चिडवाचिडवीचा असा काही माहौल बनला की एका चुकीच्या पद्धतीने आपण सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनलो आहोत याचा संताप तिच्या चेहर्‍यावर झळकू लागला.

आमचा कोटा अठरा फुलांचा होता, मात्र चार-पाच फुले शिल्लक असतानाच तिचा संयम सुटला आणि ती आतापावेतो मिळालेली सर्व फुले एकत्र गोळा करत ती मोकळ्या जागेत आली. इथून दोन बाजूंना इमारती होत्या, तर एका बाजूला उपहारगृह. आधी जी गोष्ट चार-चौदा लोकांसमोर घडत होती ती आता चारशे डोळ्यांना दिसणार होती. प्रकरण आतल्या बाजूला जात दडपायच्या ऐवजी ती चव्हाट्यावर घेऊन आली होती, याचा अर्थ आता काहीतरी गोंधळ घालायचा विचार तिच्याही मनात होता. अरे देवा, प्रिन्सिपॉल वगैरे कडे तक्रार गेली तर मेलो असा विचार पहिल्यांदाच मनात आला. पण सुदैवाने माझे नाव असलेले गुलाब अजून तिच्यापर्यंत पोहोचले नव्हते, रांगेतच होते. पण तिचा असा काही विचार नव्हता. तिने ती सारी फुले खाली मातीत टाकली आणि आम्हा सर्वांकडे बघून तशीच सॅंडल घातलेल्या पायाने कुस्करू लागली. जणू या सॅंडलने तुमचे गालच रंगवतेय बघा असा आवेश तिच्या चेहर्‍यावर होता. सोबतीला म्हणून लगोलग तिच्या दोन जिवलग मैत्रीणी आल्या आणि कश्यात काय नाय तरीही आपला पाय, त्या फुलांवर साफ करून गेल्या.

तिच्या या अघोरी कृत्याने आता पुन्हा एकदा वातावरण पलटले होते. जणू वादळानंतरची शांतता !
पण इथेच अजून एक ट्विस्ट बाकी होता..

एवढा वेळ गर्दीच्या पार मागे गंमत बघत उभा असलेलो मी सावकाशपणे पुढे आलो. त्या कुस्करलेल्या फुलांना हळूवारपणे उचलले आणि त्यावरची माती झटकत त्यांना साफ करू लागलो. डोळ्याच्या कडेने एक तिरपी नजर तिच्या हालचालींवर होतीच. हा त्यांच्यातलाच एक म्हणत माझे नावगावही माहीत नसताना ती माझ्याशी तावातावाने भांडायला आली आणि आईशप्पथ … त्या दिवशी मी राजेंदरकुमारची अ‍ॅक्टींग तोडली! तिचा आवेश पाहता ती माझ्या कानाखाली गणपती नाचवणार इतक्यात मी उत्तरलो, “माफच कर मैत्रीणी, मी तुला ओळखतही नाही मग तुला प्रेमाचे फूल देणे तर दूरची गोष्ट. मी एक वृक्षप्रेमी आहे. तुम्हा लोकांच्या भांडणात हि फुले बिचारी धारातीर्थी पडली ते मला बघवले नाही म्हणून उचलायला आलो.” एवढे बोलून मी ती फुले छातीशी कवटाळली. खरे तर माझे बोलणे तिला बकवास वाटले तर होणारे दुष्परीणाम टाळण्यासाठी घेतलेला तो बचावात्मक पवित्रा होता. पण उलट तिचा मवाळ झालेला चेहरा पाहता मी ऐनवेळी सुचलेला आणखी एक डायलॉग चिपकवला जो ऐकून तिचा चेहरा पार पोपटासारखा पडला. म्हणालो, “मैत्रीणी, माझ्यासाठी प्रेम हा शब्द उच्चारताना बाह्य सौंदर्य काऽही मायने ठेवत नाही. पण जी मुलगी रागाच्या भरात का होईना एखादी निष्पाप कळी निर्दयीपणे पायाखाली कुस्करते, त्या मुलीला मी तरी कधी चुकूनही गुलाबाचे फूल दिले नसते…”

अन या संवादफेकीनंतर पुनश्च जोरदार टाळ्यांचा कडकडाट होईल असे मला वाटलेले खरे. पण कसले काय, सारेच ढिम्म. पहिल्यांदा साहित्याची जाण नसलेले मित्र पाळल्याचा पश्चाताप मला झाला. ईतकेच नाही तर मला हिरो बनायचा मौका आला अन काय है दुर्दैव. अचानक पांगापांग सुरू झाली. त्यांचे प्रॅक्टीकल सुरू झाल्याने त्यांची गर्दी ओसरली, लगोलग झाले तेवढे पुरे म्हणत तिनेही काढता पाय घेतला, तर माझे अगोदरच गळपटलेले मित्र एव्हाना दृष्टीच्या पार पलीकडे पोहोचले होते. गुलाबही गेले होते, गुलबकावलीही गेली होती, तर हाती राहिलेल्या पाकळ्यांचे गुलकंदही बनणार नव्हते. इति किस्सा-ए-गुलबकावली संपुर्ण असफल !

– तुमचा अभिषेक

 

 

मुंबई गर्ल !

परवाचीच गोष्ट.
तब्येत बरी नसल्याने ऑफिसला अर्ध्या दिवसाने जात होतो. दुपारची वेळ, प्लॅटफॉर्म क्रमांक ‘१’ वर बेलापूर ट्रेनची वाट बघत उभा होतो. इतक्यात पलीकडल्या रुळावर बोरीबंदरला (आताच्या सीएसटीला) जाणारी ट्रेन लागली. आपल्याला जायचे नाही त्या दिशेची ट्रेन आधी येणे हे नेहमीचेच. मलाही तशी काही घाई नव्हती पण उकाड्याने जीव हैराण झाल्याने फलाटावर फार वेळ ताटकळत उभे राहण्यात रस नव्हता. पण या तप्त वातावरणातही समोरच्या ट्रेनला काही वीर दाराला लटकलेले दिसत होते. रोजचेच असल्याप्रमाणे त्यांच्या आपापसात कुचाळक्या चालू होत्या. आत बसायला जागा असूनही उन्हे झेलत बाहेर दाराला लटकण्याचे ते एक कारण असावे. मी सवयीनेच तिथे दुर्लक्ष केले. ट्रेनने भोंगा दिला आणि त्यांची ट्रेन सुटली. तसे अचानक त्या पोरांचा गलका वाढला. पाहिले तर आमच्या फलाटावर उभ्या काही महिला प्रवाश्यांना शुक शुक करत आणि त्याउपरही बरेच काही ओरडत, हातवारे करत चिडवणे चालू होते. त्यांचे ते तसे चित्कारणे संतापजनक होते खरे, पण फलाटावर उभ्या महिला देखील त्याला सवयीचाच एक भाग म्हणून स्विकारल्यागत, विशेष काही घडत नाहीये अश्याच आविर्भावात उभ्या होत्या. जवळपास उभे असलेले पुरुष, हो ज्यात एका कोपर्‍यात मी देखील उभा, यावर दुर्लक्ष करण्याव्यतिरीक्त फारसे काही करू शकत नव्हतो. फक्त चार ते पाच सेकंद आणि समोरची ट्रेन नजरेआड. या चार सेकंदात त्यांना प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करणे म्हणजे उलट आणखीन गलिच्छ प्रकारांना आमंत्रण देणे. किंबहुना म्हणूनच अश्यांना ऊत येतो. जेव्हा ट्रेनने वेग पकडलेला असतो वा जेव्हा ट्रेन समोरच्या ट्रॅकवर असल्याने जमावापासून सुरक्षित अंतरावर असते, तसेच दुपारची कमी गर्दीची वेळ असते तेव्हाच अश्यांची हिंमत वाढते.

असो,
ट्रेन गेल्यावर मात्र महिलांचे आपापसात यावर बोलणे सुरू झाले. अर्थात शक्य तितके सभ्य भाषेत अपशब्द वापरून मनातली भडास काढून हलके होणे हाच या मागचा हेतू असावा. कितीही सवयीचाच भाग म्हटले तरी अश्या प्रकारांचा त्रास होणे हे साहजिकच होते. यावेळी त्या जवळपास उपस्थित पुरुषांना देखील तुम्ही सुद्धा त्यातलेच एक आहात, पुरुष आहात, याच भावनेने बघत होत्या हे जाणवत होते. पण बोचत नव्हते. कारण ती भावना क्षणिकच आहे याची कल्पना होती. तरीही त्या क्षणिक विखाराला नजर देण्याची हिंमत नसल्याने मी खिशातून मोबाईल काढून त्यात डोके खुपसले. हा मगाशीच हातात असता तर कदाचित एखादा फोटोच टिपता आला असता असा विचार क्षणभर मनात आला. येऊन विरला आणि किस्सा इथेच संपला !

आता कालची गोष्ट.
शनिवारची सुट्टी असूनही ऑफिसला कामानिमित्त जायचे असल्याने आरामात झोप वगैरे पुर्ण करून सकाळी थोडे उशीराच उठून सावकाश घराबाहेर पडलो. साधारण साडेअकराची वेळ. आदल्या दिवशीचा किस्सा ताजा असूनही त्याला विस्मरणात टाकले होते. थोड्याफार फरकाने कालच्याच जागी मध्येच एखादी थंड झळ सोडणार्‍या पंख्याखाली हवा खात उभा होतो. माझी बेलापूर ट्रेन यायला अवकाश होता, त्या आधी अंधेरी ट्रेन होती. अर्थात ही आमच्याच फलाटाला लागते. ट्रेनला तुरळक गर्दी आणि दारांवर उभे प्रवासी. मात्र कालच्यासारखे घडण्याची शक्यता कमीच कारण तशीच आदर्श स्थिती नव्हती. ट्रेनने भोंगा दिला आणि सुटली, तसे अचानक एक लहानगी, वय वर्षे फार तर फार दहा-बारा, कळकट मळकट पेहराव, खांद्यावर येऊन विस्कटलेले आणि कित्येक दिवस पाणी न लागल्याने कुरळे वाटणारे केस, अश्या रस्त्याकडेच्या झोपडपट्ट्यांमध्ये आढळणारी टिपिकल अवतारातील मुलगी कुठूनशी आली आणि त्या नुकत्याच सुटलेल्या ट्रेनच्या अगदी जवळून तिच्या गतीच्या विरुद्ध दिशेने चालू लागली.

मुंबईत शक्यतो असे करणे सारे टाळतातच, कारण पुन्हा कधी कोण आपल्याला चालत्या ट्रेनमधून टपली मारून जाईल सांगता येत नाही. त्यामुळे साहजिक माझी नजर तिच्यावरच खिळली. पण या चिमुरडीचा हेतू काहीतरी वेगळाच दिसत होता. तिने स्वत:च ट्रेनच्या दारावर उभे असलेल्या प्रवाश्यांना हूल द्यायला सुरुवात केली. बरे हूलही अगदी ट्रेनच्या दिशेने झुकून, कंबरेत किंचितसे वाकून, मारण्याच्या आविर्भावात हात अगदी डोक्याच्या वर उगारून, असे की समोरची व्यक्ती दचकून मागे सरकायलाच हवी. माझ्यापासून ती दूर पाठमोरी जात असल्याने तिचा चेहरा वा चेहर्‍यावरचे भाव मला टिपता येत नव्हते, पण नक्कीच वेडगळ असावेत हा पहिला अंदाज. पहिल्या दरवाज्याला तिने हे केले तेव्हा तिथले प्रवासी या अनपेक्षित प्रकाराने भांबावून गेले, अन भानावर आले तसे मागे वळून तिला चार शिव्या हासडाव्यात असा विचार करेस्तोवर ती आपल्याच नादात पुढच्या डब्यापर्यंत पोहोचली देखील होती. तिथेही तिने हाच प्रकार केला आणि मी समजलो हे प्रकरण काहीतरी वेगळे दिसतेय.

पुन्हा एकदा दारावरची मुले बेसावध असल्याने त्यांचीही तशीच तारांबळ उडाली. मात्र झालेल्या फजितीचे उत्तर द्यायला म्हणून आपण त्या मुलीचे काहीच करू शकत नाही हे भाव त्यांच्याही चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. आता मी हे सारे एखादा फनी विडिओ बघावे तसे एंजॉय करू लागलो. कारण सुरुवातीला मला वेडसर, आणि मग आचरट वाटणारी मुलगी अचानक धाडसी आणि निडर वाटू लागली होती. काल जो प्रकार अनुभवला त्याच्याशी मी हे सारे नकळत रिलेट करू लागलो आणि जणू काही त्याचीच फिट्टंफाट करायला म्हणून नियतीने हिला धाडले असे वाटू लागले. भले आताचे हे दारावर उभे असलेले प्रवासी कालच्यांसारखे मवाली गटात मोडणारे नसावेतही, तरीही ती मुलगी एका अर्थी प्रस्थापितांना काटशहच देत होती. हळूहळू ट्रेन वेग पकडत होती. आणि मागाहून येणार्‍या डब्यातील प्रवाश्यांना एव्हाना या मुलीच्या पराक्रमाचा अंदाज आला होता. आता त्यातील एखादा हिच्यावर पलटवार करणार का या विचाराने माझेही श्वास रोखले गेले. आणि ईतक्यात पुढचा डब्बा आला तसे दारावरचे सारेच प्रवासी स्वताला सावरून आत सरकले. उलटून प्रतिकार करणे तर दूरची गोष्ट उलट बचावात्मक पवित्रा घेऊन त्यांनी तिचे उपद्रवमूल्य मान्य केले. त्या मुलीचे वर्तन भले चुकीचे का असेना, त्या मागे सरकलेल्या माणसांनाही ती तशीच हूल देऊन पुढे सरकली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर कदाचित विजयश्री मिळवल्याचे भाव नसतीलही, पण माझ्या चेहर्‍यावर मात्र हास्याची लकेर उमटली. या जगात प्रत्येकाला बाप मिळतोच तसे एखादी तुमची आई ही निघू शकते हे त्या मुंबई गर्लने दाखवून दिले होते.

– तुमचा अभिषेक