RSS

Monthly Archives: जानेवारी 2015

दोन गिलास पाणी !

हताश, निराश आणि भकास नजरेने मी माठाच्या नळाकडे बघत होतो. त्या वयात या शब्दांचा आणि त्यामागच्या भावनांचा अर्थही मला समजत नसावा. समजत होती ती फक्त तहान. तिच गळ्यातून उचकटून त्या माठावर मारावी आणि फोडून टाकावा माठ असा विचार मनात तरळून गेला. पण तसे केले असते तर आईने खूप मारले असते..

दोन दिवसापासून अख्या मोहल्ल्यात पाणी आले नव्हते. काल सुरुवातीला चांगले वाटले होते. सकाळी सकाळी भांड्यांच्या आवाजाने झोपमोड झाली नव्हती. आईने आंघोळ चार तांब्यातच उरकायला लावली होती. तोंड धुताना दोनच चूळा मारल्या तरी बाबा रागावला नव्हता. उलट त्याने सुद्धा माझेच उरलेले अर्धे गिलास पाणी वापरले होते. पण संध्याकाळी मात्र आईने नाक्याच्या बावडीवर पाणी आणायला धाडले. आठ हंडे आठ फेर्‍या. हात अजूनही ठणकत होता. आज आंघोळ नाही आणि शाळा पण नाही. गगनबावड्याला पाईपलाईनचे काम चालू होते. संध्याकाळपर्यंत पाणी येईल असे शेजारच्या मौसी बोलत होत्या. दोन दिवस थोडे गढूळ येईल पण येईल. पण तोपर्यंत काय!

सकाळी माठाने पाऊण गिलास पाणी दिले तेवढेच. आता त्याच्या नळातून एक टिप्पूस सुद्धा बाहेर निघत नव्हता. पिंपाच्या तळाला पाणी होते, पण आई ते भांडी घासायला वापरायची. तळाशी राख जमलेली दिसत होती. सोबंत गंज चढलेला पत्रा चमकत होता. ते पाणी प्यायलो असतो आणि काही झाले असते तर आईने नक्कीच खूप मारले असते.

आई तत्वांची खूप पक्की होती. कोणाकडे हात पसरलेले तिला आवडायचे नाही. कोणाकडे साधे प्रसादीचे जेवायला जाऊ द्यायची नाही. मौसीकडे पाणी मागितले असते, पण तिने हे आईला सांगितले असते तर… त्यापेक्षा नकोच ते!

पाण्याच्या शोधात घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. उन्हं अजूनही कडक होते. तहान वाढवत होते. गल्लीबोळ दुकानलाईन, नक्की कुठे जायचे काही कल्पना नव्हती. अख्या मोहल्ल्यामध्ये पाणी आले नव्हते. बस्स एका बाजूचा फूटपाथ पकडून सावलीच्या हिशोबाने चालत होतो. ईतक्यात एका कडेला सुलभ शौचालय नजरेस पडले. बाहेरच्या बाजूने तेथील बेसिन आणि पाण्याचा ओलसरपणा दिसत होता. बेसिनच्या नळाचे पाणी प्यायला काय हरकत आहे अशी मनाची समजूत काढली. ते हात धुवायचे पाणी असते, भांडी घासायचे नसते म्हणत आत शिरलो. चिंध्या बांधलेल्या नळातून पाण्याची पिचकारी उडत होती. ते बघूनच मन तयार होत नव्हते. इतक्यात तिथून एक पाखरू फडफडत उडाले. झुरळच ते! थू थू थू! आईला जर का समजले मी इथे पाणी प्यायला आलेलो तर.. बस्स हा विचार मनात येताच मी आवंढा गिळत तिथून पळत सुटलो.

पळत पळत रेल्वे स्टेशनजवळ पोहोचलो. एका स्टॉलवर प्लास्टीकच्या पाण्याच्या बाटल्या सजवून ठेवल्या होत्या. पण त्याला पैसे पडतात हे माहीत होते. हिंमत करून विचारले तर दहाच्या खाली कुठलीच बाटली मिळत नव्हती. पॉकेटमनीचा दिड रुपया होता माझ्या खिश्यात. दिड दोन घोट पाणीही चालले असते. पण ते सुट्टे पाणी विकायला तयार नव्हते. इतक्यात काहीसे आठवले. मोठ्या हॉटेलात गेलो की पहिल्यांदा पाण्याचे दोन ग्लास आणून ठेवतात. मागे एकदा आईबरोबर गेलेलो तेव्हाचे आठवले. काचेच्या ग्लासात कितीतरी वेळ स्वत:चेच प्रतिबिंब न्याहाळत बसलेलो. आज मात्र ग्लास समोर आले की पहिल्यांदा त्यातील पाणी पिऊन टाकायचे म्हणत एका हॉटेलात शिरलो. पाणी पिऊन मग काहीही ऑर्डर न करता निघून जायचे असा प्लॅन होता. दोन ग्लास पाण्यासाठी कोणी माझा जीव घेणार नव्हता!

पण घेतला तर …

नाही आत शिरलो तर तहानेनेच जायचा होता..!

“अकेला है क्या?” वेटरने दरडावतच विचारले.
अर्धी चड्डी बघून कोणी सलाम ठोकेल अशी अपेक्षाही नव्हती. तिथूनच आल्यापावली परत फिरावेसे वाटले. पण एव्हाना टेबलांवरून नजर भिरभिरू लागली होती. वडासांबार, पुरीभाजी, मसालाडोसा.. पावभाजी, मोसंबी ज्यूस, मॅंगोला.. पण माझी तहान पाण्याची होती. जाड काचेच्या त्या ग्लासांवर नजर पडताच पावलेही थबकली. “हा अकेला है” सुकलेल्या ओठातून कसेबसे शब्दही उमटले. त्याच दरडावणार्‍या नजरांनी मग एका कोपर्‍यातील शिडीखालची जागा दाखवली. माझ्यासाठीही तिच योग्य होती. ना कोणाच्या अध्यात, ना कोणाच्या मध्यात. त्या अडचणीच्या कोपर्‍यातही मी आणखी अंग चोरून विसावलो. लगोलग एक जाडजूड मेनूकार्ड येऊन माझ्या समोर आदळले. मी उजवा अंगठा तोंडाजवळ नेत पाण्याची खूण केली. जवळून जाणारा एक पाण्याचा ग्लास उचलून माझ्या टेबलावर टेकवत तो निघून गेला. मी घटाघट घटाघट एकाच श्वासात पुर्ण ग्लास रिता केला. तहान अजून बाकी होती, पण मगासचा पाणीवाला एव्हाना दूर निघून गेला होता. इतक्यात त्या वेटरकडे माझी नजर गेली. तो फिरून मागे येऊ नये म्हणून मी उगाचच डोके मेनूकार्डमध्ये खुपसले.

त्यात वाचायचे असे काहीच नव्हते. हलकेच टेबलाचे निरीक्षण करू लागलो. स्वच्छ आणि सुंदर. एवढा छान आमचा देव्हारा सुद्धा नव्हता. मी अजून काही मागवले नव्हते तरी त्यावर आधीच बडीशेप आणि चटण्यांच्या छोट्या छोट्या बाटल्या रचून ठेवल्या होत्या. टिपकागदांचा एक स्टॅंड सुद्धा होता. त्याला पाहून आठवले, घाईघाईत पाणी पिताना बरेचसे पाणी ओघळून माझी मान आणि शर्ट ओले करून गेले होते. सावचितपणे प्यायलो असतो तर ते फुकट गेले नसते असे उगाचच वाटून गेले. माझ्या वरच्या खिशात एक रुमाल सवयीनेच असायचा. त्याने तोंड पुसून घेतले आणि तो तसाच टेबलावर ठेवून दुसर्‍या पाण्याच्या ग्लासासाठी पोर्‍याला आवाज दिला. एक गिल्लास पाणी आपली जादू करून गेला होता. मला बरेपैकी कंठ फुटला होता!

पाण्याचा दुसरा ग्लास मात्र आरामात चवीने रिचवला. शेवटचा घोट गरज नसूनही आत ढकलला. पुन्हा कधी पाणी मिळेल न मिळेल याची शाश्वती नव्हती. आता तिथून सुमडीत सटकायचे होते. ईतक्यात जवळच उभ्या त्या पाणीवाल्या पोर्‍याने वेटरला आवाज दिला. माझी ऑर्डर घ्यायची आठवण करून द्यायला..

अचानकच घडल्याने मला काही सुचेनासे झाले. अख्खे मेनूकार्ड नजरेसमोर भिरभिरून गेले. खिश्यातल्या दिड रुपयात तिथला वडाही मिळणार नव्हता. समोरचा गेट रिकामा दिसत होता. वेटर जवळ यायच्या आधीच संधी साधायला हवी म्हणत मी पटकन टेबलावरचा रुमाल उचलला आणि शर्टाच्या खिशात कोंबून गेटच्या दिशेने धाव घेतली. त्या नादात हात टेबलावरच्या बरण्यांवर आदळून आवाज झाला आणि तिथेच घात झाला.

चोर चोर चोर .. गेटबाहेर पडून डावीकडच्या फूटपाथवर वळलो तरी पाठीमागून ओरडा ऐकू येत होता.. दोन ग्लास पाण्याची चोरी.. घरी समजले असते मी चोरी केली तर आईने खरेच खूप मारले असते.

मी अक्षरशा वाट मिळेल तिथे पळत होतो. लिंबूवाल्या म्हातारीच्या गोणपाटावर पाय पडला तश्या तिने शिव्या घालायला सुरुवात केली. मी त्या कानाआड करत पुढे उडी मारली. पुढे रचलेल्या कपड्यांवर पाय पडला असता तर खूप मार पडणार होता. तो चुकवायला म्हणून मी तिरकी उडी मारली. पण पाय न पडताही तिथून सट्टाक् करत एक काठी पायावर पडली. आईग्गं, पोटरीपासून खालचा पाय सुन्न झाला. पुढची चार पावले मी एकाच पायावर धावलो की काय असे क्षणभर वाटले, आणि मग अचानक दुखर्‍या पायातून कळा येऊ लागल्या. तरी मागाहून कोणीतरी आहे म्हणून नेटाने धावायचेच होते. पण वेग मंदावला होता. घश्यापर्यंत प्यालेले पाणी डुचमळून उलटी काढावीशी वाटत होती, पण त्याच पाण्यासाठी सारे केले असल्याने आतच थांबावी असे वाटत होते. पुढे कुठे जायचे या विचारात सिग्नलजवळ पोहोचलो. इतक्यात कोणाचातरी पाठीवर जोरकस फटका पडला. मी लंगडणार्‍या पायासह कोलमडलो. डोके रस्त्याकडेच्या एका लाल खांबावर आदळले आणि त्या खांबाला आणखी लाल करत, शुद्ध हरपत मी जमिनीवर पालथा झालो. छातीतून एक जीवघेणी कळ गेली. काहीतरी छातीला चिरडत जात होते..

बहुधा मगाशी घाईघाईत रुमालासोबत बडीशेपचा डब्बाही खिशात कोंबला गेला होता!

“……. चांगल्या घरचा मुलगा दिसतोय रे”, कोणीतरी शेवटचे म्हटल्याचे कानावर पडले. शुद्धीवर आलो तेव्हा आई उशाशी बसलेली. डोक्यावरून हात फिरवत होती. म्हणत होती, माठ आडवा केला असतास, तर दोन गिलास पाणी आरामात आले असते. मला बहुतेक ते सुचले होते. पण का माहीत नाही भिती वाटलेली. माठ फुटला असता पटकन तर आईने खूप मारले असते.

– तुमचा अभिषेक

 

रन राहुल रन…!!

धापा टाकतच राहुल उठला. त्याच्या सर्वांगाला पाणी सुटले होते. छातीतील धडधड थांबायचे नाव घेत नव्हती. एका हाताने ती धडधड रोखायचा प्रयत्न करत दुसर्‍या हाताने बिछान्याचा आधार घेत तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. आपण आपल्या घरातच, स्वत:च्याच बेडवर आहोत याची खात्री पटू लागली तसे हळूहळू नॉर्मल होऊ लागला. पण मन अजूनही साशंक होते. छतावर फिरणार्‍या पंख्याचा वेग दर दुसर्‍या क्षणाला कमीजास्त होत असल्याचे जाणवत होते. पंख्याच्या वाढत्या वेगाबरोबर छातीतील धडधड वाढताना भासत होती, तर कमी होणार्‍या वेगाबरोबर कमी होत कायमची थांबतेय की काय असे वाटत होते. नजर स्थिरावू लागली तसे खोलीभर पसरलेला अंधार मावळू लागला. पण उजाडायला अजून अवकाश आहे हे खिडकीबाहेर दाटलेला मिट्ट काळोख सांगत होता. उशाजवळ ठेवलेला आपला मोबाईल उचलून त्याने वेळ चेक केली. तीन वाजून सत्तावीस मिनिटे. इतरदिवशी हि वेळ बघत अजून उजाडायला अवकाश आहे म्हणत मोठ्या आनंदाने तो पुन्हा पांघरूणात शिरला असता. पण आता मात्र त्याला लवकर उजाडावेसे वाटत होते. कसल्याश्या घाणेरडया स्वप्नातून दचकून उठला होता. आठवायचा प्रयत्न केल्या आठवत नव्हते. आठवायचेही नव्हतेच. पण ते स्वप्नच होते हि मनाला खात्री पटवून दिल्याशिवाय पुन्हा झोप येणे शक्य नव्हतेच. थोडावेळ तो तसाच छतावर गरगरणार्‍या पंख्याकडे बघत बेडवर पडून राहिला. आणि अचानक काहीसे सुचले तसा ताडकन उडी मारत उठला आणि ड्रेसिंग टेबलकडे झेपावत ड्रॉवर उघडून आतील लिफाफा बाहेर काढला. उतावीळपणेच आतील कागद बाहेर काढून सारे काहे जागच्या जागी आहे याची खात्री केली आणि परत जागेवर येऊन लवंडला. स्वप्न अजूनही आठवले नव्हतेच, पण भरलेली धडकी आता शांत झाली होती. सारे काही आलबेल होते, याच विश्वासात पहाटे कधीतरी डोळा लागला असावा.

……….. पण फार काळासाठी नाही !

थड थड, थड थड थड … थड थड, थड थड थड …
दरवाजा ठोठावण्याच्या आवाजाने पुन्हा झोपमोड झाली.

राहुलने बेडवरूनच आवाज दिला, “कोण आहे?”

“अरे सोनू, बाहेर ये लवकर.. पोलिस आलेत आपल्याकडे..” आईचा किंचित घाबरा आवाज राहुलची झोप उडवून गेला. प्रतिक्षिप्त क्रिया घडल्याप्रमाणे तो ताडकन बिछान्यातच उठून उभा राहिला. पंख्याची गरगर आता डोक्याच्या अगदी वर चार बोटांवर जाणवत होती. छातीतील धडधड पुन्हा एकदा त्या आवाजाशी स्पर्धा करू लागली. त्याच्या डोक्यातील विचारचक्रे जोरात फिरू लागली. स्वप्नातली भिती प्रत्यक्षात उतरली होती. पण अजूनही स्वप्नातच तर नाही ना म्हणत त्याने स्वताला एक चिमटा काढून बघितला. ते ही कमी म्हणून स्वताच्या दोन थोबाडीत मारून झाल्या. पण काही फायदा नाही. स्वप्न नव्हतेच ते!

पुन्हा एकदा दारावर थडथड आणि पाठोपाठ आईचा आवाज, “सोनू बेटा, उठ लवकर, इथे काय प्रॉब्लेम झालाय बघ… हे बघ पोलिस काय म्हणत आहेत..”

आता मात्र पुढचा मागचा विचार न करता सोनू बेटाने बेडवरून उडी मारली. ड्रॉवरमधील लिफाफा बाहेर काढला. आतला दस्तावेज पुनश्च चेक करण्याचा मोह झाला पण हाताशी तेवढा वेळ नव्हता. दारावरची थडथड वाढतच होती. सैरभैर होऊन तो आसपास लिफाफा लपवण्यासाठी जागा शोधू लागला. खरे तर त्याला स्वत:लाच कुठेतरी दडी मारून लपावेसे वाटत होते. पण ते शक्य नव्हते. दहा बाय बाराची जेमतेम खोली. स्टडी कम बेडरूम म्हणून राहुलने वापरायला घेतली होती. एक बेड आणि टेबल सोडला तर फर्निचर म्हणून काही नव्हते. इथे कुठेही लिफाफा लपवला तरी पोलिसांना तो शोधणे फार काही कठीण जाणार नाही हे तो थोड्याच वेळात समजून चुकला. खिडकीतून बाहेर फेकून द्यावा असा विचार केला खरे, पण कितीही लांब फेकला तरी खालच्या गार्डन पलीकडे जाणार नव्हता. आता सुटकेचा एकच मार्ग त्याला दिसू लागला. तो म्हणजे लिफाफ्यासकट पळ काढायचा. खरे तर असे केल्याने त्याच्यावर असलेला संशय आणखीन बळकट होण्याची शक्यता होती. पण तरीही, कोणताही आरोप सिद्ध करायला पुरावा लागतोच. किमान तो तरी त्याला नष्ट करणे शक्य होते. अर्थात हा सारासार विचार करायच्या मनस्थितीत तो होता कुठे. विचार मनात आल्याक्षणीच अंमलबजावणीला सुरूवातही झाली होती. आता ना त्याला आईची हाक ऐकू येत होती ना दारावरची थाप. बस्स कानावर एक आवाज पडत होता.. रन राहुल रन.. रन राहुल रन.. कदाचित हा आवाज त्याच्याच अंतर्मनातून असावा. आणि अश्यावेळी नेहमी तोच ऐकला जातो.

खिडकीला लागून असलेल्या पाईपाच्या आधारे चढण्या-उतरण्याचा प्रकार या आधीही राहुलने ३-४ वेळा केला होता. त्यामुळे उतरताना आधारासाठी नेमके कुठे पकडायचे याचा जास्त विचार त्याला करावा लागला नाही. हा मुलगा पहिल्या माळ्यावरून असा खिडकीमार्गे पळून जाऊ शकतो हे दाराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या डोक्यात येईपर्यंत तो कुठेतरी लांब पोहोचणार होता. पण नक्की कुठे..? कुठवर..?? त्याचे त्यालाही ठाऊक नव्हते.

गार्डनच्या कंपाऊंडवॉल वरून उडी मारून राहुल मागच्या रस्त्याला तर आला होता, पण पुढे कुठे जायचे याचा काहीच विचार डोक्यात नव्हता. नुकतेच उजाडले होते. नक्की किती वाजले होते याची कल्पना नव्हती. पण पानाची टपरी उघडलेली दिसत होती. रात्रभर गस्त घालणारे दोन हवालदार सवयीने तिथे उभे असलेले दिसले आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कश्यावरून हे देखील आपल्याच पाठीमागे नसावेत..? असा विचार डोक्यात येण्याचा अवकाश तसे राहुल त्यांची नजर चुकवून पुन्हा पळत सुटला.

हायवे ओलांडून समोरच्या नेहरूनगर वस्तीत शिरेस्तोवर त्याला बरीच धाप लागली होती. एवढा वेळ आपल्याच धुंदकीत मारेकरी पाठीमागे लागल्यासारखा जिवाच्या आकांताने तो पळत होता. एखादा आडोसा मिळाला तसा जरासा विसावला. श्वास समेवर आले आणि पुढचे विचार चालू झाले. शक्य तितक्या लवकर कोणालातरी फोन करणे गरजेचे होते. ज्याच्यामुळे या सर्व प्रकरणात अडकला होता निदान त्याला तरी. पण हाय रे कर्मा, सारे खिसे तिसर्‍यांदा चाचपून झाल्यावर त्याच्या लक्षात आले की घाईघाईत आपण ना मोबाईल बरोबर घेतला आहे ना पैश्याचे पाकीट. वरच्या खिशात ठेवलेली पंधरा-वीस रुपयांची चिल्लर ती काय एवढ्या शोधाशोधीतून त्याच्या हाती लागली. पब्लिक बूथवरून एक रुपया खर्च करत फोन करणे शक्य होते, पण नंबर कोणाचाही पाठ नव्हता. कसेही करून गण्याशी संपर्क साधणे गरजेचे होते आणि आता तो कॉलेजलाच भेटला असता. साहजिकच पुढचे लक्ष्य कॉलेज गाठणे होते. रिक्षा करून कॉलेजला जावे. तर सारे पैसे त्यातच खल्लास झाले असते. येणारा दिवस काय दाखवणार होता याची कल्पना नव्हती. पैश्याची पुढे कितपत गरज पडेल याची शाश्वती नव्हती. पण हा विचार याक्षणी क्षुद्र होता. जर पोलिस घरापर्यंत पोहोचले होते तर कॉलेजमध्येही कोणत्याही क्षणी पोहोचू शकत होते. गण्याला कदाचित याची काहीच कल्पना नसावी आणि पोलिस त्याच्याही मागावर असणारच. जर पोलिस एव्हाना कॉलेजला पोहोचले असतील तर तो पकडला गेला असेल का? की फरार झाला असेल? मग माझे कॉलेजला जाणे कितपत सेफ आहे? पण या सार्‍या प्रश्नांची उत्तरेही आता कॉलेजमध्ये गेल्यावरच मिळणार होती. फारसा विचार न करता पुढच्याच क्षणी राहुलने रिक्षाला हात दाखवला.

मुख्य प्रवेशद्वारापाशी रिक्षा नेणे मुर्खपणाचे होते. तसेही त्यांचा अड्डा कॉलेजच्या मागेच जमायचा. गण्या नाहीतर निदान त्याची बातमी तरी तिथेच मिळणार होती. पण सुदैवाने फारशी शोधाशोध करायची गरज न पडता गण्याच नजरेस पडला. बरोबर ग्रूपचे आणखी दोघे जण होते. त्यांच्या चेहर्‍यावरचे टेंशन बघून राहुल काय ते समजून गेला. त्याही परिस्थितीत त्या सर्वांच्या भकाभक सिगारेटी ओढणे चालूच होते. किंबहुना नेहमीपेक्षा किंचित जास्तच. राहुलला मात्र या सिगारेटचा वास कधीच जमला नव्हता. पण तरीही मैत्रीखात्यात कधीकधी तो स्वत: देखील या पोरांना सिगारेट प्यायला पैसे द्यायचा. ईंजिनीअरींगच्या पहिल्याच वर्षापासूनचे सारे मित्र. काही त्याच्याच वर्गातील, तर काही दुसर्‍या डिपार्टमेंटमधील. तर काही गेले तीन-तीन, चार-चार वर्षे ड्रॉप लागलेली मुले. सगळ्यांचे एकत्र येण्याचे सारखे दुवे म्हणजे सिगारेट ओढणे आणि कॉलेजच्या मागे भरघाव बाईक फिरवणे. पण एवढ्या वर्षात पोरगी मात्र एकाच्याही पाठीमागे बसलेली कधी दिसली नव्हती. कशी दिसणार, कॉलेजमधील नावाजलेल्या टारगट मुलांचा म्हणून ओळखला जाणारा ग्रूप. पण तरीही, राहुल यांच्यात असूनही या सार्‍यांपेक्षा वेगळा. अपघातानेच यांच्यापैकी एकाशी ओळख झाली आणि ट्यूनिंग जमली म्हणून हळूहळू या सार्‍यांमध्ये सामील झाला. कसेही असले तरी ही मुले मैत्रीखातर जिवाला जीव देणारी आहेत या एकाच विश्वासावर त्याचे नाते या सर्वांशी घट्ट बांधले गेले होते. तो स्वत: अभ्यासात प्रचंड हुशार. पण ईंजिनीअरींगमध्ये हुशार विद्यार्थी तोच, जो आदल्या रात्री अभ्यास करूनही पास होतो, या चुकीच्या समजुतीत अडकलेला. तरीही एक चांगली गोष्ट म्हणजे यांच्यात चोवीस तास राहूनही तो कधी त्यांच्यासारखा बनला नव्हता. पण ना कधी त्यांना आपल्यासारखे बनवायचा प्रयत्न केला होता. ते जसे होते, तसे होते, पण राहुलचे मित्र होते आणि त्याला त्यांच्या ग्रूपमधील एक हुशार मुलगा म्हणून योग्य तो मान होताच. आणि का नसावा, कारण ते सारे पास व्हावे म्हणून त्यांचा कोणी अभ्यास घ्यायचा, त्यांना शिकवायचा तर तो राहुलच होता. खास करून गण्याभाईला…

इतरांसाठी गणेशभाई, जवळच्यांसाठी गण्याभाई, पण राहुलसाठी मात्र बघताबघता गणेशभाईचा गण्याभाई, आणि गण्याभाईचा गण्या झाला होता. तसे मारामारी किंवा भाईगिरी करणे हा राहुलचा पिंड नव्हता, पण गण्याभाईचा हात डोक्यावर आहे म्हटल्यावर चार पोरे राहुललाही वचकून राहायची. आणि राहुलला देखील हे आवडायचे. गण्या गेली चार वर्षे या कॉलेजमध्ये होता पण अजूनही दुसर्‍या ईयत्तेला पार करू शकला नव्हता. आणि त्यात काही नवल नव्हते म्हणा, कारण पास होण्यासाठी मुळात अभ्यासाची आवड तरी असावी लागते वा तशी गरज तरी. ज्याचा दिवस चहाच्या टपरीवर सुरू होऊन कॉलेजच्या जिममध्ये संपायचा अश्या गण्यासाठी ईंजिनीअरींगचा अभ्यासक्रम बनलेलाच नव्हता. पण या गण्याला डीग्रीसह कॉलेजच्या बाहेर काढायची जबाबदारी राहुलने आपल्या खांद्यावर घेतली होती आणि त्यासाठी तो जे काही करत होता ते चुकीचे आहे हे माहीत असूनही तो याला मित्रकर्तव्याचे नाव देत होता.

राहुलने जेव्हा गण्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचलेल्या पोलिसांबद्दल सांगितले तेव्हा गण्याच्या चेहर्‍यावरच्या आठ्या आणखी पसरल्या. कुठल्याही संकटातून जर कोणी मार्ग काढू शकत असेल तर तो एक गण्याच हा राहुलचा विश्वास होता. पण आज गण्यालाही चिंताग्रस्त बघून राहुलचेही टेंशन आणखी वाढले. गण्याच्या माहितीनुसार एक्झाम डीपार्टमेंटमध्ये असलेल्या C.C.T.V. कॅमेर्‍यांमुळे त्यांची चोरी पकडली गेली होती. थोडाबहुत ऑफिस स्टाफ गण्याचा खास होता ज्यांच्याकडून त्याला ही खबर मिळाली होती. हे कॅमेरे हल्लीच बसवले असल्याने सारे अनभिज्ञ होते. पण कॉलेज एवढ्या लवकर पोलिसांपर्यंत जायची अ‍ॅक्शन घेईल असे गण्यालाही वाटले नव्हते. कोणालातरी पटवून, कोणाचे तरी पाय धरून, वेळ पडल्यास आपले आतापर्यंत कमावलेले वजन वापरून यातून बाहेर पडू अश्याच समजुतीत तो होता. फार तर फार एखाद दोन वर्षाचे निलंबन, ईतपत मानसिक तयारी त्याने करून ठेवली होती. पण पोलिस केस म्हणजे थेट जेल आणि सारी शैक्षणिक करीअर उध्वस्त, नव्हे सार्‍या आयुष्याचे मातेरं.

जर गण्यासारख्या मुलाची ही हालत होती तर राहुलची कल्पनाही न केलेली बरे. अजूनही त्यांच्याकडे शेवटचा मार्ग हाच होता की जाऊन प्रिन्सिपल सरांचे पाय पकडणे. परीक्षा विद्यापीठाची नसून कॉलेजची अंतर्गत असल्याने अंतिम निर्णय काय घ्यायचा हे ठरवणे कॉलेज प्रशासनाच्याच अखत्यारीत येत होते. पोलिस तक्रार मागे घेतली गेली तर कदाचित यातूनही सुटकेची संधी होती. निघण्यापूर्वी गण्याने बॅगेतून एक धारदार चाकू काढून खिशात ठेवला. “कशासाठी? कोणासाठी?”, राहुलच्या नजरेतील प्रश्नांना गण्याने आपल्या नजरेनेच गप्प केले. तसेही त्याच्याशी वाद घालण्यात आता अर्थ नाही हे तो समजून होता. गण्या नेहमी आपल्याच मनाचे ऐकायचा. त्याच्यामते, जर आयुष्य एकदाच मिळते तर विचार दोनदा का करायचा, निर्णय हा नेहमी पहिल्याच फटक्यात घ्यायचा असतो.. आणि आताही गण्याने तो घेतला होता.. दोघांसाठीही!

……. अजुनही राहुलचा गण्यावर विश्वास होता.

प्रिन्सिपल सरांच्या केबिनकडे जाताना रस्त्यात त्यांना बर्‍याच जणांनी पाहिले. पण कोणाच्याही नजरेत काही वेगळे जाणवले नाही. म्हणजे अजून या प्रकरणाचा बोभाटा झाला नव्हता. जर प्रिन्सिपल सरांनी त्यांची बाजू समजून घेतली तर अजूनही सुटकेची आशा होती. पण कोणती बाजू ते मांडणार होते हा प्रश्नच होता. परवा होणार्‍या प्रश्नपत्रिकेची चोरी केली होती त्यांनी. काय सांगणार होते ते सरांना? सर, आमचा अभ्यास झाला नव्हता, नापास होऊ, वर्ष फुकट जाईल या भितीने असे केले हे सांगणार होते? की पैश्यांची गरज होती, प्रश्नपत्रिका विकून चार पैसे मिळतील या लालसेपोटी केले हे कारण देणार होते? पण जेव्हा प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचा संतप्त अवतार बघून त्यांच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. राहुलने त्यांचे हे रूप आजवर कधी पाहिले नव्हते. राहुल अगदीच त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यांपैकी एक नसला तरी या मुलात एक चुणूक आहे हे ते जाणून होते. वेळोवेळी हे त्यांनी दर्शवलेही होते. त्यामुळे त्यांच्या मनात राहुलबद्दल नक्कीच एक सॉफ्ट कॉर्नर होता. पण कालच्या कृत्याने त्याने तो ही गमावला होता. आज त्याची जागा रागाने घेतली होती. सरांचा शाब्दिक मार सुरू होता आणि राहुल जागीच थिजल्यासारखा उभा होता. आजपर्यंत बर्‍याचदा ब्लॅकलिस्ट मध्ये नाव लागले म्हणून असे प्राध्यापकांच्या केबिनमध्ये जाण्याचे प्रसंग त्याने अनुभवले होते. पण प्रत्येकवेळी एक प्रकारची बेफिकीरी असायची की काही झाले तरी हे आपले कॉलेज आहे, समोर ओरडणारे आपलेच सर आहेत. हे काही आपल्याला जीवे मारायची शिक्षा देणार नाहीत. जे काही बोलतील ते खाली मान घालून निमुटपणे ऐकायचे की झाले, सुटलो. पण आज तशी परिस्थिती नव्हती. आज त्याला निर्लज्जासारखे उभे राहणे जमत नव्हते. आणि रडायलाही येत नव्हते. मन एवढेही कोडगे झाले नव्हते, पण रडून आपली चूक धुतली जाणार नाही याची त्याला जाणीव होती. अजूनही सर यातून काहीतरी मार्ग काढतील, आपल्या आयुष्याची, आपल्या शैक्षणिक करीअरची अशी वाट लागू देणार नाहीत हा विश्वास अजूनही कुठेतरी त्याच्या मनात होताच. आणि त्याचा हा विश्वास अगदीच काही चुकीचा नव्हता. आपण मुलांचे भविष्य घडवण्यासाठी या जागी आहोत, ना की त्यांची स्वप्ने उध्वस्त करण्यासाठी याची थोडीबहुत जाण सरांनाही होती. संतापाचा जोर ओसरला तसा त्यांचा बोलायचा रोख बदलू लागला. राहुलकडे त्यांनी आतापर्यंत केलेल्या त्याच्या सार्‍या चुकांचा कबुलीजबाब मागितला.

दोन वर्षांपूर्वी राहुलने पहिल्यांदा गैरमार्गाचा वापर करून गण्याची मदत केली होती. परीक्षेच्या आदल्या रात्री स्वत:चा अभ्यास बाजूला ठेऊन गण्याला शिकवायचा निष्फळ प्रयत्न करून झाल्यावर तो समजून चुकला की उद्याच्या पेपरात गण्याची दांडी पुन्हा एकदा गुल होणार आहे. म्हणून गण्याच्याच सांगण्यानुसार राहुलने त्याच्या जागी डमी बसायचा निर्णय घेतला. पकडला गेला असता तर दोघांवरही एकदोन वर्षांची बंदी आली असती. पण पकडले जाण्याची शक्यता कमी होती. परीक्षागृहात हजर असणारे सारे निरीक्षक बाहेरचे असायचे. कॉलेजचे काही वॉचमन आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा वावर तिथे असायचा पण त्यांच्यावर मुलांकडे लक्ष द्यायची विशेष अशी जबाबदारी नव्हती. आणि लक्ष गेले तरी ते काणाडोळा करणार होते, कारण ते सारे गण्याच्या ओळखीचे होते. पहिला पेपर निर्विघ्नपणे पार पडला तसा राहुलचा हुरूप वाढला. अजून तीन-चार अवघड विषय त्याने गण्याला डमी बसून सोडवून दिले.

त्याच्या पुढचे वर्षही असेच सुटले. पण या वर्षी मात्र प्रत्येक वर्गात एक तरी निरीक्षक कॉलेजचा हवा असा विद्यापीठाने नियम केल्याने त्यांची बोंब झाली. अभ्यास करून पास होणे हा प्रकार आता गण्या विसरून गेला होता. आणि राहुलच्या मतेही गण्याचा अभ्यास घेण्यात काही अर्थ नव्हता. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. फसवणूकीचा एक नवीन मार्ग शोधला गेला. गण्याने एका वॉचमनला हाताशी धरून कोर्‍या उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा चोरला होता. परीक्षेच्या दिवशी पेपर चालू झाल्यावर दहा ते पंधरा मिनिटांतच गण्या बाथरूमचे कारण देऊन बाहेर पडायचा. बरोबर एक प्रश्नपत्रिका असायची जी तो पर्यवेक्षकांच्या नकळत एक्स्ट्रा घ्यायचा. बाथरूममध्ये आधीच त्याची वाट बघत असलेल्या साथीदाराला ती सुपुर्त केली जायची. मग तो साथीदार ती प्रश्नपत्रिका घेऊन तडक हॉस्टेलच्या रूमवर यायचा. तिथे त्या चोरलेल्या उत्तरपत्रिकांवर पेपर सोडवायचे काम राहुल करायचा. अर्थात, पहिले पर्यवेक्षकांच्या हस्ताक्षराचे पान रिकामे सोडले जायचे. सोबतीला आणखी दोनचार साथीदार पुस्तके घेऊन बसलेली असायची जी फटाफट उत्तरे शोधून द्यायचे काम करायची. अश्या तर्हेने वेळेच्या पंधरा-वीस मिनिटे आधीच जमेल तितके लिहून ती उत्तरपत्रिका पुन्हा बाथरूमच्या मार्गेच गण्याच्या हवाली केली जायची. त्यानंतर गण्या त्याच्याजवळच्या उत्तरपत्रिकेचे पहिले पान ज्यावर परीक्षागृहात हजर पर्यवेक्षकांनी हस्ताक्षर केलेले असायचे ते काढून या उत्तरपत्रिकेला जोडायचा की झाली नवी उत्तरपत्रिका तयार.

बर्‍यापैकी फूलप्रूफ प्लॅन होता. दररोज पर्यवेक्षक बदलत असल्याने या मुलाला रोजच का बाथरूमला जावे लागते असा संशय येण्यासही फारसा वाव नव्हता. सारे काही सुरळीत चालू होते. पण मागच्या पेपराला गण्याच्या एका मित्रानेही यांच्या नकळत हीच पद्धत वापरायचा प्रयत्न केला जो योग्य नियोजनाअभावी फसला आणि तो पकडला गेला. परीणामी उर्वरीत सत्रासाठी पेपरची वेळ सुरू झाल्यावर कोणालाही परीक्षागृहाच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली.

आता गण्याची खरी पंचाईत झाली होती. विद्यापीठाच्या नियमानुसार अंतिम वर्षात प्रवेश करण्यासाठी आदल्या वर्षीचे जास्तीत जास्त दोन विषय राहिले तरच हे शक्य होते. आणि अजून तीन पेपर बाकी होते. गण्याने स्वताच्या हिंमतीवर तोडकामोडका अभ्यास करून दोन पेपर देऊन पाहिले. पण केवळ औपचारिकता म्हणून तीन तास वर्गात बसून आला होता. शेवटचा पेपर, स्ट्रक्चरल अ‍ॅनालिसिस, ज्यात भल्याभल्यांची भंबेरी उडते. खुद्द राहुल गेल्या वर्षी त्यात कसाबसा पास झाला होता. तिथे गण्यासारख्याचा टिकाव लागणे अशक्यच. गण्या यातही नापास झाल्यास त्याचे अख्खे वर्ष फुकट जाणार होते. गण्याचा मते आता एकच मार्ग उरला होता. त्याचा निर्णय घेऊन झाला होता. राहुल असाही काही त्याच्या शब्दाबाहेर नव्हता. गण्याचे हे वर्ष सुटावे म्हणून त्याने स्वत:ही आतापावेतो इतका आटापिटा केला होता की तो व्यर्थ जाऊ नये म्हणून तो ही या कृत्यात त्याला साथ द्यायला तयार झाला. आधी डमी बसलो, मग एक वेगळीच क्लृप्ती लढवून सार्‍या परीक्षामंडळाला फसवून कॉपी केली आणि आता थेट प्रश्नपत्रिकेचीच चोरी! राहुलला हे सारे थ्रिलिंग वाटले होते. पण आता मात्र मागे वळून पाहताना आपण यात कसे अडकत गेलो हेच त्याला जाणवत होते. बोलताबोलता त्याचा बांध फुटला आणि तो अक्षरश: शाळकरी मुलासारखा रडू लागला. त्याला स्वत:चे हे रूप काही नवीन नव्हते. लहाणपणापासून मस्तीखोर स्वभावामुळे ही वेळ त्याच्यावर बर्‍याचदा आली होती. त्याचे ते वागणे निरागस असायचे. ते रडणे प्रामाणिक असायचे. अगदी आजही तसेच होते.

प्रिन्सिपल सरांचा राग आता बरेपैकी निवळला होता. आवाजाची धार सौम्य झाली होती. मगासपासून जे ताशेरे ओढले जात होते त्याची जागा आता उपदेशपर आणि समजुतीच्या शब्दांनी घेतली होती. पण हा बदललेला नूर फक्त राहुलपुरताच होता. सर गण्यालाही चांगलेच ओळखून होते. हा नासका आंबा पेटीतूनच काय बागेतूनही काढायच्या निर्णयाप्रत ते आले होते. राहुल आता माफीचा साक्षीदार झाला होता आणि आरोपीच्या पिंजर्‍यात गण्या फक्त एकटाच उरला होता.

सरांचे बोलून झाल्यावर राहुलने गण्याकडे किंचित अपराधीपणाच्या नजरेने पाहिले. पण क्षणभरच. दुसर्‍याच क्षणी गण्याचा हातातील लखलखते पाते पाहून त्याचे डोळे विस्फारले. काय घडतेय हे कोणाला समजण्याआधीच गण्या सरांवर झेपावून सपासप वार करू लागला. राहुलने काही हालचाल करेपर्यंत फार उशीर झाला होता. सर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. राहुलला सरांच्या अंगावर ढकलून गण्याने पळ काढला. पण जाता जाता त्याने काढलेले उद्गार राहुलच्या कानात बराच वेळ घुमत राहिले.. “जर मी लटकलो राहुल्या, तर मी तुला पण बरोबर घेऊन लटकणार… तुला पण बरोबर घेऊन लटकणार..”

राहुल आता खरोखरच लटकला होता. सर्वांनी गण्या आणि राहुलला सरांच्या केबिनमध्ये एकत्र जाताना पाहिले होते. ज्या कारणासाठी जात होते त्या प्रकरणात दोघेही गुंतले होते. जर सरांवर हल्ला करायची कल्पना एकट्या गण्याचीच होती हे कोणाला माहित होते तर ते फक्त प्रिन्सिपल सरांना, जे राहुलच्या समोर जमिनीवर निपचित पडून होते. जिवंत होते की मृत हे कळायला मार्ग नव्हता. त्यांना आता असेच सोडून आपणही पळ काढावा की बाहेर जाऊन कोणाकडे तरी मदत मागावी, राहुलला काहीच सुचेनासे झाले. पुन्हा एकदा त्याने स्वत:च्या दोन थोबाडीत मारून पाहिल्या, कदाचित आपण या दु:स्वप्नातून बाहेर पडू या आशेने.. पण असे काही होणार नव्हते हे त्यालाही माहीत होते. जे घडतेय ते सत्य आहे आणि हि आपल्या कर्माचीच फळे आहेत, जी कधी ना कधी आपल्याला भोगावीच लागणार होती हे तो समजून चुकला होता. बाहेरील लोकांचा आवाज कानावर पडत होता. वर्दळ वाढत होती. दुसर्‍याच क्षणी कोणीही इथे येण्याची शक्यता होती. बंद दरवाज्याच्या पलीकडून एक आवाज आणखी आणखी जवळ येतोय असे जाणवले तसे राहुलच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. पाठोपाठ तोच आवाज.. रन राहुल रन… रन राहुल रन… पण यावेळी मात्र हा आवाज आपल्या अंतर्मनातून न येता कोणीतरी परकीच व्यक्ती आपल्या कानात पुकारतेय असे वाटत होते. हा आवाज, हा सल्ला आपल्या भल्यासाठी आहे की आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे हे त्याला समजेनासे झाले. पण आता त्याचा विचार करायची वेळ टळून गेली होती. पर्याय एकच होता.. रन राहुल रन..

जसे दरवाजा लोटून कोणीतरी आत आले तसे राहुलने सरळ त्याला धडक देत बाहेरच्या बाजूला धाव घेतली. पाठीमागून येणारा धडपडल्याचा आवाज.. शिवीगाळ.. गोंधळ.. सारे आवाज आता चोहीकडून येत आहेत असे त्याला वाटू लागले. धावता धावता राहुल कॉलेजच्या गेटबाहेर पडला. कदाचित कायमचाच! मागे वळून एकदा कॉलेजला बघून घ्यावे अशी इच्छा तर होत होती पण हिंमत होत नव्हती. कॉलेजशी असलेले सारे बंध केव्हाच तुटले होते.

तो मॅकेनिकल ईंजिनीअरींगचा क्लासरूम, शेवटचा बाक, बाकावर बसून म्हटलेली गाणी. कधी याची खेच, तर कधी त्याला उकसव. कधी अचानक एखाद्या कठीण प्रश्नाचे उत्तर देऊन सरांना चकीत करणे आणि दाखवून देणे की बॅकबेंचर्सही काही कमी नसतात. अगदीच बोअर लेक्चर असेल तर मागच्या मागेच पळ काढणे. एखाद्या मित्राला आपली हजेरी लावायला सांगणे आणि स्वत: मात्र जिममध्ये जाऊन कॅरम खेळणे. यात कधी पकडले जाणे आणि मग शिक्षा म्हणून एखादी असाईनमेंट लिहिणे. ती लिहिण्यासाठी होस्टेलवर मित्रांसोबत नाईट मारणे. तिथेच पत्त्यांचा डाव रंगणे आणि रात्रभर जागूनही पुर्ण झाली नाही म्हणून तीच असाईनमेंट दुसर्‍या दिवशी सकाळी कॅंटीनमध्ये लिहित बसणे. लिहितानाही अर्धीअधिक नजर जवळपासच्या मुलींवर असणे आणि तरीही त्यांच्यावर ईंप्रेशन मारण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष न देता अभ्यास करतोय असे दाखवणे. सरते शेवटी असाईनमेंट पुर्ण केल्याचा आनंद आणि तो साजरा करण्यासाठी मागवलेली कटींग चहा… सार्‍या सार्‍या आठवणी कडवट झाल्यासारख्या वाटत होत्या.

बसस्टॉपवर बसून राहुल स्वताशीच विचार करत होता. या सार्‍याच्या पार्श्वभूमीवर त्याला गण्याचे शेवटचे शब्द आठवत होते. आजपर्यंत राहुलने जे केले होते ते केवळ गण्याच्या मैत्रीखातर, गण्याच्या भल्यासाठी. पण काम निघून गेल्यावर तो मात्र पलटला होता. आणि यात काही नवल नव्हते. तो गण्याचा स्वभावच होता. जो राहुलला माहित असूनही तो त्याच्याबरोबर राहायचा कारण यात त्याचा स्वत:चाही स्वार्थ लपला होता. कॉलेजमधील चार मुले त्याला गण्याचा खास माणूस म्हणून जी इज्जत द्यायची ती त्याला गमवायची नव्हती. पण आज जे घडले होते त्याने मैत्री आणि संगत यातील फरक त्याला स्पष्ट झाला होता!

अजूनही त्याच्या कानावर कुठून तरी तेच शब्द ऐकू येत होते, रन राहुल रन.. रन राहुल रन.. सकाळपासून तो धावतच तर होता. थकला होता तो आता. पळून पळून कुठे जाणार होता. एका मुलाच्या हक्काच्या अश्या दोनच जागा असतात. एक घर आणि दुसरे कॉलेज. त्यातील दुसरी तर त्याने गमावली होती. आता जे काही होईल त्याला सामोरे जायचे असे ठरवून राहुलने घरी परतायचा निर्णय घेतला.

घरासमोर थांबलेली पोलिस वॅन बघून तो काय ते समजला. अश्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही. असेही त्याचे नाव संशयितांच्या यादीत सर्वात वरचे होते. सरांवर झालेल्या हल्ल्यात त्याचा हात नव्हता हे केवळ त्यालाच ठाऊक होते. तरी काही ना काही करून आपण ते पोलिसांना पटवून देऊ अशी पुसटशी आशा होती. पण घरच्यांचा गमावलेला विश्वास तो कसा परत मिळवणार होता. वडीलांची भेदक नजर आज त्याला लाचार वाटत होती. काही झाले तरी त्यांचा मुलगा आजवर त्यांचा अभिमान होता. ‘पापा कहते है बडा नाम करेगा..’ कसले नाम आणि कसले काय! आज त्यांच्या मुलाने त्यांना बदनाम केले होते. दादा देखील वडीलांप्रमाणेच मान खाली घालून उभा होता. मोठ्या भावाच्या नात्याने राहुलच्या प्रती असलेली आपली जबाबदारी घेण्यात आपणही कुठेतरी कमी पडलो ही अपराधीपणाची भावना त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकत होती. आजी आजोबांची आपलीच काहीतरी बडबड चालू होती. आपला नातू चुकीचे काम करूच शकत नाही हा त्यांचा विश्वासच नाही तर श्रद्धा होती. या सर्वात आई मात्र कुठेच नव्हती!

राहुलची नजर घरभर आईला शोधू लागली. आज त्याला सर्वात जास्त गरज तिच्या कुशीची होती. पण तीच कुठेतरी हरवली होती. सकाळपासून त्याची पाठ सोडत नसलेला तो चितपरीचित आवाज, “रन राहुल रन..” तो तेवढा आता पुर्णपणे थांबला होता. कितीही पळालो तरी परत फिरून आपल्याला आपल्या माणसांतच यायचे असते हे कदाचित त्याच्या अंतर्मनाला उमगले होते. इतक्यात एक दणकट बांध्याचा पोलिसवाला त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आणि राहुलला अचानक परिस्थितीचे भान आले. आता त्याला फक्त खरे आणि खरेच बोलायचे होते. पण आता त्याच्या खरेपणावरही कोणाला विश्वास बसत नव्हता. जिथे जन्मदात्या आईवडीलांचा विश्वास गमावला होता तिथे परके त्याच्या शब्दांवर कसे विश्वास ठेवणार होते. ते ही पोलिसवाले, ज्यांना फक्त पुराव्याचीच भाषा समजते. राहुल परत परत तेच सांगत होता जे खरे होते, पण पोलिस काहीएक ऐकून घ्यायला तयार नव्हते. राहुल अगदी रडकुंडीला आला, पण त्यांना राहुलच्या तोंडून तेच ऐकायचे होते जे त्यांना स्वत:ला अपेक्षित होते. राहुलकडे सांगण्यासारखे आणखी वेगळे असे काहीच नव्हते, ना गण्या या वेळी कुठे आहे हे त्याला माहीत होते. सरते शेवटी त्या पोलिसमामांचा संयम तुटला आणि त्यांनी राहुलच्या एक खाडकन कानाखाली वाजवली.

…… तसा राहुल ताडकन उठून बसला. पुढचे काही वेळ तो तसाच गालावर हात ठेऊन बिछान्यात बसला होता. त्याचा विश्वास बसायला किंचित वेळच लागला की हे सारे स्वप्न होते.

डोक्यावर गरगर फिरणारा पंखा आता बरेपैकी निवळला होता. तसा तो ऊठला आणि पुन्हा एकदा ड्रॉवर उघडला. पुन्हा एकदा त्यातील लिफाफा बाहेर काढून आतील पेपर चेक केले. सारे काही जागच्या जागी होते. खिडकीतून सुर्याच्या कोवळ्या किरणांनी आत प्रवेश केला होता. त्या प्रकाशात घर बर्‍यापैकी उजळून निघाले होते. केलेल्या चुकीचे प्रायश्चित कबुलीजबाब देऊन करायची हिंमत आपल्यात नाही हे त्याने स्वत:शी कबूल केले होते. पण आपल्याला या लिफाफ्याची विल्हेवाट लावायची आहे एवढे त्याने नक्की केले. गण्याला कदाचित हे कधीच मान्य होणार नव्हते. कदाचित त्यांच्या मैत्रीचाही हा शेवट असणार होता. पण राहुलला मात्र आज मैत्रीची खरी परिभाषा समजली होती. त्याचा हा निर्णय गण्याचेही हितच बघणार होते. भले आज गण्याला हे पटले नाही तरी एक दिवस आपल्यासारखी त्यालाही जाग येईल हा विश्वास होता. एक शेवटचा द्रुढनिश्यय केल्याच्या आविर्भावात राहुलने दीर्घ श्वास घेतला. तो लिफाफा बॅगेत भरला आणि ती खांद्यावर लटकवून घराबाहेर पडला…!

–x— समाप्त –x–

दोन शब्द – आयुष्य म्हटले की त्यात एखादे दु:स्वप्न हे आलेच. आपलेच आपण स्वत:ला कितीही चापट्या मारल्यासारखे केले तरी जाग मात्र तेव्हाच येते जेव्हा समोरून कोणीतरी येऊन आपल्या कानाखाली जाळ काढतो. पण ती वेळ का येऊ द्यावी? कथेतल्या राहुलला तर जाग आली. आता आपली वेळ आहे. तुमच्या घरातही असा एखादा राहुल असेल. तुम्ही स्वत: असाल, तुमचा भाऊ असेल किंवा तुमचा मुलगा असेल. तर त्याला वेळीच जागे करा. नाहीतर एक दिवस त्याच्यावरही अशीच वेळ येईल…. रन राहुल रन… रन राहुल रन…!!

– तुमचा अभिषेक

 

ऐश्वर्या राय @ मोहोब्बते – मलाही कोणाशी तरी बोलायचेय..

हेल्लो माबोकर्स.. मी राजची हेलोवीन .. ऊप्स, शॉली शॉली, राजची हिलोईन..

नाही हं, तो बडे बडे देशो मे छोटी छोटी बाते होती रेहती है शेनोलिटा, वाला राज नाही काही.. अहो तो नाही का, जो चष्मा घालून खुर्चीवर बसून गिटार वाजवतो. तो हो, जो येडा बनून तमिताभने दिलेला प्रसादाचा पेढा खात नाही.. हा तोच तो, राज आल्यन मल्होत्रा.. नाम तो सुना ही होगा ! बेंबेंबे हेहेहे खीखीखी.. तोच तो !

काय बोलता, कोण तमिताभ ?? शॉली शॉली, माय मिस्टेक अगेन. ते मी कधी कधी थोडे बोबले बोलते ना. त्याचे झाले काय, सुसाईडच्या चक्करमध्ये दोन माळ्याच्या बिल्डींगवरून उडी घेतली खरी, पण पुढचे चार दात तोडून घेतले, तोंडाचा बोळका झाला, और फिर मै कभी किसी को मुंह दिखाने के काबिल नही रही. म्हणून मग पांढरी साडी नेसली आणि भूत बनून अद्रुष्य झाले. आता दुधाचे दात बनवायला टाकलेयत, ते मिळेपर्यंत पुढचा जन्म काही घेऊ शकत नाही. बाईचा जन्म कठीणच बाई..

हं तर मी काय सांगत होते, तमिताभ म्हणजे अमिताभ हो, माझा सासरा.. उप्स शॉली शॉली, पुन्हा गडबडले. पिक्चरमधलेच बोलायचेय ना.. तर माझा नाही हो त्या राजचा, होऊ घातलेला पण होऊ न शकलेला सासरा. अहो तो नाही का, पहाटे साडेपाच वाजता, अर्ली ईन द मॉर्निंग, स्वताही उठतो, सुर्यालाही उठवतो, आणि त्याला घूर घूर के बघून, शायनिंग मारतो. नाही ओळखले अजून .. चला तीन हिंट देते.., एक) परंपरा दोन) प्रतिष्ठा तीन) अनु… हो हो, शासन शासन, तोच तोच, श्री नारायण शंकर… महादेवन.. पुरा नाम .. हाईंग !

पटली ओळख ! आता माझे नाव सांगा?? नाही आठवत, चला मीच सांगते. माझे नाव मेघा ……… हो, बस्स एवढेच ! या दोन सुप्पर्रस्टारच्या जुगलबंदीमध्ये मला फूटेज पण कमी आणि माझे नाव पण कमीच. त्यात एक माझे वडील.. तेच ते, परंपरा प्रतिष्ठा, बोल दिया ना, बस्स बोल दिया .. स्वता आयुष्यभर निरुपा रॉयच्या पोटी जन्म घेतला, पण आता स्वताच्या पोटी ऐश्वर्या राय जन्माला आलीय तर तिचे एकतरी प्रेमप्रकरण असणार हे समजायला हवे ना. पण नाही, आमच्या डॅडी कूलना गुरू कुलची प्रतिष्ठा जास्त महत्वाची. अरे डॅडू पण मग निदान बॉईज स्कूल तरी उघडायचे नव्हते ना. आता लोण्याजवळ विस्तव पेटवला तर एक तरी शोला भडकणारच ना.. एक तरी निखारा तडतडणारच ना.. तो नेमका क्कककक्कक् ‘कोयला’ कडकडला !

अच्छा मुलांची शाळा उघडली तर उघडली, पण मग त्यात त्या राहुलराजला कशाला अ‍ॅडमिशन दिलेत. आधीच त्याला जोशमध्ये माझ्याशी रक्षांबधन करावे लागले होते आणि देवदासमध्ये पारोच्या जागी दारोला कवटाळावे लागले होते, तर यात तो हमखास चान्स मारणारच होता… त्याने तो मारला आणि फुकट मी मेले!

पण माझा प्रॉब्लेम इथेच संपत नाही. मी मेले, संपले, भूत बनून अदृष्य झाले, पण तो राज काही भूतयोनीतही मला सुखाने मरू देत नाहीये. त्याला माझा पासवर्ड माहीत आहे ना, त्यामुळे बघावे तेव्हा पुंगी वाजवून नागाला बोलावतात तसे अधूनमधून खुर्चीवर बसून वाजवायची गिटार बडवतो आणि मला बोलावत राहतो. गायचा मूड त्याला होतो आणि नाचायला मला बोलावतो. ईडियट बोलावतो सुद्धा अचानकमध्ये. अरे मला मेकअप शेकअप करायला तरी वेळ दे. आफ्टर ऑल मी जगातली सर्वात सुंदर भूत आहे यार !

बरे याला मी लांबूनच दर्शन दिलेले ही चालत नाही, याचा चष्मा पण जवळचाच ना. म्हणून मग याच्या जवळ येऊन याला फेरी मारून जा. काय तर म्हणे मोहोब्बते, आता त्या येड्याला समजलेय ना की भूतं खरोखरची असतात ते, तर मग माझ्यावर खरे प्रेम असेल तर मर ना बाबा एकदाचा तू सुद्धा आणि भेट मला कायमचा, कश्याला उगाच त्या रिकी टिकी मिकिच्या लव्हस्टोरीमध्ये दुनियादारी करत बसलायंस..

बरं त्या पोरांना इन्स्पिरेशनच द्यायचे होते तर लैला-मजनू, हीर-रांझा किंवा गेला बाजार वीर-झाराचीच लव्हस्टोरी सांगितली असतीस. पण नाही, आपलीच प्रेमकहाणी सांगायची होती. बरे सांगितलीस ती सांगितलीस, पण मला साधा सुईत धागा ओवता येत नाही हे सुद्धा सांगायची काही गरज ??? … पण नाही !

हुश्श, मला वाटलेले पिक्चरच्या शेवटी तरी त्यांचे मिशन मोहोब्बते सक्सेसफुल झाल्यावर माझी यातून सुटका होईल. पण नाही, वेड्याने मला बोलवायचा पासवर्ड माझ्या बापाला पण देऊन ठेवला, आणि लावली माझी डबल ड्यूटी !

कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है, या दोन सुप्पर्रस्टारच्या लफड्यात या गरीब बिचार्‍या पारोचाच पार देवदास झालाय. भूतयोनीत रात्री कंपलसरी जागावेच लागते आणि पहाटे साडेपाचला हे हजर.. वरना अब से पहले, पीपल पे लटक रही थी मै कही …

चला येते मी, माझे सातशे शब्द संपत आलेत. ईथे कोणी मनसोक्त त्रागा ही करू देत नाही यार. त्याला पण शब्दमर्यादा. एनीवेज, तसेही राज डार्लिंगचे तुणतुणे आणि शंकर पप्पांचे सुर्यनमस्कार कानावर पडू लागलेत, तर निघावे लागेलच.

पण थॅंक्स हं, तुमच्याशी बोलून हलके झाले बाई. जर कोणी माझी हल्लीची साईज पाहिली असेल तर समजले असेलच, या रायचा कसा पर्वत झालाय आणि हलके होण्याची मला किती गरज होती ते 😉

….. तुमचीच
बरसो रे मेघा मेघा ..

…………………………………………

– तुमचा अभिषेक

 

आदूमामा

तुला म्हणून सांगतो बे आभ्याs, या दारूच्या व्यसनात दोनच स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण दारू पितो, तर दुसर्‍या स्टेजमध्ये दारू आपल्याला. या आदूची पहिली स्टेज तर केव्हाच पार झालीये. आता हि दुसरी कुठवर नेते हे बघायचय.” .. कालपरवाच बोलल्यासारखे आदूचे हे शब्द कानात घोळत होते, अन इतक्यात दादरावरचा कोलाहल अचानक शांत झाला. कल्पना असूनही काळजात धस्स झाले. पाहिले तर चार टाळकी आदूच्या घराबाहेर जमताना दिसली. मी काय ते समजून चुकलो. आदू दुसरी स्टेज ओलांडून तिसर्‍या स्टेजला गेला होता. कधीही न परतण्यासाठी, कायमचाच!

*****

आदूस ! एकेकाळचा आमचा आदू मामा ..

स्वताच्या आयुष्याची चिंता चार घटका दूर सारत दुसर्‍याच्या घरात डोकावण्याची वृत्ती, दुसर्‍याच्या घरातच नाही तर आयुष्यातही अधिकार असल्यागत हस्तक्षेप करण्याची सवय, काही भानगड सापडलीच तर ती पार गावभर करण्याची खोड, पण कोणी संकटात दिसताच कर्तव्य समजत हातचे न राखता मदत करण्याचा स्वभाव., दक्षिणमध्य मुंबईतील चाळसंस्कृतीची देणगी म्हणून अंगी भिनलेल्या या गुणदोषांना आदूही अपवाद नव्हता. पण त्याही पलीकडे जाऊन तो आणखी बरेच काही होता.

तुला म्हणून सांगतो बे आभ्याs.. हे शब्द कानावर पडले की समजायचे, आता जगातले एखादे भारी आणि अनोखे तत्वज्ञान आपल्यासमोर उलगडले जाणार आहे, किंवा चाळीतील एखादी आतल्या गोटातील बातमी त्यामागच्या विश्लेषणासह ऐकायला मिळणार आहे. हा तत्ववेत्ता म्हणजेच आमचा आदूमामा. आमचा म्हणजे अगदी सर्वांचाच नाही. कोणासाठी आदूशेठ तर कोणासाठी नुसताच आदू. काही जण त्याला “ए चिवट्या” या त्याच्या टोपणनावाने आवाज द्यायचे, तर काही असेही होते जे निव्वळ फुल्याफुल्यांनीच त्याचा उद्धार करायचे. तरीही आम्हा पोराटोरांसाठी एकेकाळचा आदूमामाच. काळ सरला तशी पोरे मोठी झाली, अक्कल आली, या बेवड्याला काय मामा म्हणून हाक मारायची असा शहानपणा अंगी आला. पण माझ्यासाठी मात्र बालपणीच्या आठवणींचा एक कप्पा या आदूमामाने व्यापला होता. अगदी आजही जेव्हा तो बोलायचा, तुला म्हणून सांगतो बे आभ्या, तेव्हा ते खास या आभ्यासाठीच आहे असे वाटायचे.
एकोणीसशे नव्वद साल, जेव्हा आदू मला पहिल्यांदा भेटला, चाळ समितीच्या कार्यालयाबाहेर. मी तेव्हा चौथी-पाचवीत असेन. त्याच्या व्यसनांचा अड्डा आणि आमचा खेळायचा कट्टा जवळपास एकच. कार्यालयाचे दार संध्याकाळी ‘सहा ते नऊ’ या वेळेत खुलायचे. दिवसभर त्या बंद दाराचा आसरा घेत, तिथेच एका कोपर्‍यात तो आपले बस्तान मांडायचा. सोबतीला एक गडी शेजारच्या वाडीतून यायचा. सारे म्हणायचे त्यानेच आदूला कसल्याश्या नशेला लावले होते. ड्रग्स, चरस, गांजा, ब्राऊनशुगर., त्या वयात असलेल्या अकलेनुसार आम्ही त्या नशेला नाव द्यायचो. दुरून पाहता सिगारेटच्या पाकीटातील चंदेरी कागद तेवढा जळताना दिसायचा, पण घरून ओरडा पडेल या भितीने जवळ जाऊन ते कुतुहल शमवायची हिम्मत कधी झाली नाही.

त्यावेळी आदूचे वय तीस-पस्तिशीच्या घरात असावे. नशेची सवय असूनही तरुणपणातील व्यायामाने कमावलेल्या शरीराच्या खुणा त्याच्या गोळीबार झालेल्या गंजीतून डोकावत राहायच्या. त्या वयात सिनेमांतील अ‍ॅक्शन हिरोंमुळे पीळदार शरीराचे आकर्षण वाटत असल्याने, नशेच्या नादी लागलेल्या आदूबद्दल एक सहानुभुतीच वाटायची.

सुदैवाने त्या चंदेरी कागदाच्या व्यसनात आदू जास्त गुरफटला नाही. साथसंगत सुटली, चार लोकांनी फटकारले तसे भानावर आला. बाटलीची साथ मात्र आयुष्यभराची होती, म्हटलं तर बिडीकाडीचेही व्यसन. या त्याच्या आयुष्याला उर्जा देणार्‍या गोष्टी असल्याने त्यांची साथसोबत कधी सुटणार नव्हती.

अश्या या, आणि एवढीच माहीती असलेल्या आदूला मी जवळून ओळखू लागलो ते ईयत्ता आठवीनंतरच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये.

चाळीच्या पहिल्या मजल्यावर म्युनसिपालटीची शाळा भरायची. मे महिन्याची सुट्टी तिलाही पडायची. शाळेच्या बंद वर्गांचा फायदा उचलत चाळीतल्या सार्‍या रिकामटेकड्या भुतांचा अड्डा तिथेच जमायचा. चार जण कॅरमवर लागले असायचे, तर इतर पत्ते कुटत पडायचे. काही नाही तर गप्पांचाच फड रंगायचा. आम्हा सर्वांमध्ये वयाने मोठी असलेली एकच व्यक्ती होती, ती म्हणजे आदूमामा. सुरुवातीला माझ्या नजरेत त्याची प्रतिमा तशीच होती जसे मी त्याला पहिल्यांदा पाहिले होते. त्यामुळे थोडासा दबकूनच राहायचो त्याला. पण फार काळ नाही ..

तो कॅरम खेळायला म्हणून आम्हाला पावडर पुरवायचा. त्यांच्या जमान्यातील अडगळीत पडलेला कॅरमचा स्टॅंड त्यानेच कुठूनसा आम्हाला शोधून दिला होता. तापलेला कॅरम बोर्ड चांगला चालतो हे ज्ञान देत बल्ब आणि फोकसची जुळवणीही त्यानेच करून दिली होती. आपुलकीचे थोडेसे शेअर त्याच्या नावे गुंतवण्यासाठी हे एवढे भांडवल, त्या वयात माझ्यासारख्या कॅरमप्रेमीसाठी पुरेसे होते.

त्याचा स्वताचा खेळही चांगला होता, मात्र आमच्याबरोबर महिन्यातून एखादाच डाव खेळायचा. हेच पत्त्यांच्या बाबतीत, ते स्वत: हातात न धरता एखाद्या कच्च्या लिंबूच्या पाठीमागे बसून त्याला पाने सुचवायचा. कधीतरीच हाऊजीचा डाव रंगायचा, त्यातही तो केवळ नंबर पुकारायला म्हणून भाग घ्यायचा. त्याला आमच्यात खेळायला संकोच वाटायाचा की लहानग्यांशी हरण्याची भिती, हे त्यालाच ठाऊक. मात्र आपल्याला खेळण्यात नाही तर बघण्यातच रस आहे याचा अभिनय तो छान वठवायचा.

दुपारचे जेवण आटोपून वामकुक्षी घ्यायला म्हणून त्याचा बिछाना दादरावर लागायचा. झोप येईपर्यंत आमच्याशी गप्पा मारत बसून राहायचा. हळूहळू आम्हीही हक्काने त्याच्या बिछान्यावर पसरू लागलो होतो. अनुभवत होतो तसे समजत होते, दारूचा वास ना त्याच्या तोंडाला यायचा ना त्याच्या बिछान्याला यायचा.

आदू मिथुनचा फार मोठा चाहता होता. मिथुनला तो मिथुनदा म्हणायचा. खरे तर बरेच जण म्हणत असावेत, पण आमच्यासाठी ते नवीन होते. त्या काळात मिथुनचा दर आठवड्याला एखादा तरी बी ग्रेड सिनेमा यायचा. आदू न चुकता जवळच्या स्टार टॉकीजमध्ये बघायला जायचा. आम्हालाही आमंत्रण असायचे, पण मिथुनचा सिनेमा काय बघायचा म्हणत त्याच्याबरोबर जाणे सारेच टाळायचे. अर्थात, अमिताभचा सिनेमा असता तरी खचितच कोणी गेले असते. शेवटी घरच्या संस्कारांमुळे एखाद्याला मामा बोलणे वेगळे आणि खरोखरचे मामा समजणे वेगळे ..

पण आदू सिनेमा बघून आल्यावर त्याच्या कडून स्टोरी ऐकणे हा एक मनोरंजक कार्यक्रम असायचा. मिथुनचे सिनेमातील संवाद आणि अचाट पराक्रम मोठ्या अप्रूपाने तो रंगवून सांगायचा. त्या सिनेमांमध्ये त्याला काय आवडायचे हे नक्की सांगता येणार नाही, पण कदाचित आपल्या आयुष्याची पटकथाही देवाने एखाद्या बी ग्रेड सिनेमापेक्षा वेगळी लिहिली नाहीये, हा एक समान धागा गवसत असावा.

त्याचा असून नसल्यासारखा बाप कधी निर्वतला याची कल्पना नाही, पण आई मात्र लहानपणीच पोरके करून गेली. परीणामी सावत्र आईचा छळ नशीबात होता, पण संसाराचे सुख देखील फार काही लाभले नाही. गर्दुल्ला हा शब्द जसा पहिल्यांदा मला आदूबाबत समजला, तसेच रंडवा या शब्दाचीही भर माझ्या शब्दकोषात आदूमुळेच पडली. आदू विधुर होता. जिला कधी मी पाहिले नाही पण जिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून होतो ती आमची मामी, स्टोव्हचा भडका उडाल्याचे निमित्त झाले आणि त्यातच गेली. कोण म्हणायचे तिच्या सावत्र सासूनेच तिला जाळले, तर काहींच्या मते त्यात आदूचाही हात होता. खरे खोटे देवास ठाऊक. पण त्या वेळचे भाजल्याचे डाग आदूच्या हातावर आजही होते, ज्याचे चटके त्याला आयुष्यभर झेलायचे होते.

त्यानंतर सावत्र आईचे छत्र म्हणा किंवा छळसत्र म्हणा, फार काळ टिकले नाही. सध्या त्याच्या घरात राहणारी आणि त्याला नावाने हाक मारणारी त्याची दोन लहान भावंडे सावत्रच होती. नाही म्हटले तरी त्यांच्या संसारात हा उपराच होता. स्वताच्याच घरात त्याचे जगणे आश्रितासारखे होते. जेवण्यापुरतेच काय ते आतल्या दिशेने उंबरठा ओलांडणे व्हायचे.

आदू पोटापाण्यासाठी म्हणून माझगाव डॉकमधल्या कुठल्याश्या तांत्रिक विभागात कसलीशी जोडणी का बांधणी करायचा. आपल्या कामाचा त्याला एखाद्या अभियंत्यापेक्षा जास्त अभिमान होता. कॉलेजातील चार बूकं शिकलेल्यांपेक्षा आपल्याला जास्त समजते असा दावा बिनदिक्कतपणे करायचा. वडीलांच्या जागेवर आयतीच मिळणारी सरकारी नोकरी नाकारून स्वताच्या हिमतीवर आणि कौशल्यावर मिळवलेल्या नोकरीचा अभिमान असणेही रास्त होतेच.

कधी, कुठे, अन कसा झिंगलेल्या अवस्थेत सापडेल याचा नेम नसलेला आदू शनिवारी मात्र वेगळाच भासायचा. जेव्हा चाळीतील सारी तरुणाई नव्याने बांधलेल्या गणपतीच्या मंदिरात जायची तेव्हा हा हनुमंताचा भक्त, मारुतीच्या जुन्या मंदिरात तेल ओतताना आढळायचा. त्या दिवशी मग दारूला स्पर्श केवळ नजरेनेच करायचा. एवढेच नव्हे तर बोलतानाही त्याची जीभ मग सैल नाही सुटायची. जणू विचारांचीही शुद्धता पाळायचा. शेंदूराचा भलामोठा टिळा फासलेला आदू, व्यसनांपासून दूर राहत श्रद्धेतूनही उर्जा मिळते हे एका दिवसासाठी का होईना दाखवून द्यायचा.

ईतर दिवशी मात्र त्याच्या तडाख्यातून कोणी वाचलेय असे द्रुश्य विरळेच. खास करून सार्वजनिक नळावरची त्याची भांडणे ठरलेलीच असायची. स्वतापेक्षा जास्त तो दुसर्‍यांसाठी भांडायचा. घाईगडबडीत असलेल्या एखाद्याला दुनियादारी दाखवत मध्येच रांगेत घुसवायचा. पण सर्वांनाच आपली गरज श्रेष्ठ वाटत असल्याने या परोपकारी विचारांना तिथे थारा नसायचा. आदूचे मात्र वेगळेच होते. कोणाचे काही तरी चांगले करण्यासाठी कोणाचे काही तरी वाईट करावेच लागते – अ‍ॅकोर्डींग टू आदू’स लॉ ऑफ चांगुलपणा.. पण ते चांगले कधी दिसण्यात येत नाही अन वाईटाचीच तेवढी चर्चा होते हा व्यावहारीक द्रुष्टीकोण मात्र त्याला अजून समजायचा होता.

पण तरीही आदूची सर्व चाळकर्‍यांना गरज होतीच. चाळीतला कोणताही सण असो वा कार्यक्रम, तो आदूच्या सहभागाशिवाय अशक्यच. अगदी दुकान लाईनीतून वर्गणी जमा करण्यापासून मंडप सजवण्यापर्यंत असो, वा हातात झाडू घेऊन साफसफाई करायची असो, त्याच्या सारखा हौशी स्वयंसेवक दुसरा नव्हता. फक्त त्याच्या हौसेला रिकामटेकडेपणाचे नाव दिले जायचे. गणपतीच्या अकरा दिवसांत घसा फाडून कोकलणारे आरतीसम्राट कैक होते मात्र ढोलकीसम्राट आदू एकच होता. त्याचा झिंगलेला हात ज्या तालात ढोलकी वर पडायचा तसाच खडू हाती येताच बोर्डावरही सर्रसर चालायचा. सार्वजनिक पॅसेजमध्यल्या फळ्यावर गणपतीचे चित्र कोणी काढावे तर ते आदूनेच, शिवजयंती येता शिवाजी महाराजांना रंगवावे तर त्याच्यासारखे त्यानेच. निवडणूकींच्या काळातही प्रचाराचे फलक रंगवायला म्हणून आदूला आमंत्रण असायचे. मोबदला म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर बारमध्ये बसवले जायचे. मोबदल्याची पुरेपूर वसूली व्हायची पण कला मात्र झाकोळली जायची. खरे तर या फुटकळ फलकांव्यतिरीक्तही तो बरेच काही रंगवू शकला असता, पण त्याला स्वताचेच आयुष्य रंगवायचे नव्हते. पडद्यामागचे कलाकार बरेचदा पडद्यामागेच राहतात. आदूसारखे मात्र प्रत्यक्ष रंगमंचावर वावरूनही पडद्यामागे ढकलले जातात.

आयुष्यात काय किती कमावले यावर नाहीतर काय किती गमावले यावर तो आयुष्याचे मोजमाप करायचा. पण आदूचे हे तत्वज्ञान या व्यवहारी जगात कवडीमोल होते, त्याला कोणी गंभीरपणे घेणारे नव्हते कारण तो स्वत: अपयशी होता. पण आदू खरेच अपयशी होता का. हे आयुष्य जगण्यात तो कमी पडला होता का. काही उद्देश नसताना तो जगायचा. बायको नाही, ना मूलबाळं. ना पुढे कधी लग्नाचा विचार त्याच्या मनात आला असेल. आलाच तरी बेवड्याला कोण कुठली मुलगी देणार होते. पण तरीही आजवर त्याला कसली खंत नव्हती, ना नशीबाला दोष देणे होते. स्वताच आखलेल्या चौकटीत सुखाने का नसेना, पण कसल्याश्या समाधानाने तो जगत होता.

आणि एके दिवशी ती खबर आली. चाळीला बिल्डर लागला. पुनर्बांधणी योजनेअंतर्गत चाळीच्या जागी टॉवर उभारला जाणार होता. चाळीतल्या मध्यमवर्गीय लोकांना मोठ्या फ्लॅटची स्वप्ने पडू लागली. प्रॉपर्टीवरून भावाभावांमध्ये वाद होऊ लागले. सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्‍या घरांमध्ये वेगळे चित्र नव्हते, तिथे आदूच्या घरची परिस्थिती विचारायलाच नको. काही म्हणत होते बेवड्याला लॉटरी लागली, तर काही जण तो पॉपर्टी चार वर्षात फुकून टाकेल अशी भाकीते वर्तवत होते. खुद्द त्याच्या भावांना पोटशूळ उठू लागला होता. घरामध्ये एक वाटा आदूचाही होता. मुंबईतील मोक्याची जागा, सोन्याचा भाव, ईंचाईंचाला मिळणारी किंमत. तिथे काही लाखांचा घास आदूच्या घशात जाताना त्यांना बघवत नव्हते. आदूला काही रक्कम देऊन ते घर आपल्या नावावर करायचे बेत आखत होते. पण आदू ईतकाही बावळट नव्हता. परीणामी घरात रोजचेच खटके उडू लागले. घरातून अन्नपाणी मिळायचे बंद झाले. तहानभूक आणि मनाची अशांती आता सारे दारूच भागवू लागली होती.
आदूच्या मते जगातल्या प्रत्येक गोष्टीला नेहमी तीन बाजू असतात. एक बरोबर तर दुसरी चुकीची, आणि तिसरी आपल्या फायद्याची. आजकाल सारे तीच बघत होते. घरे मोठी होत होती अन माणसे छोटीच राहिली होती.

आदूमामा आदूमामा करत अर्ध्या चड्डीत फिरणारी मुले आता नोकरी धंद्याला लागली होती. एकीकडे काळ बदलत होता दुसरीकडे आदूत झपाट्याने बदल होत होता. जेव्हा इतर सारे चाळकरी यंदाचे शेवटचे वर्ष म्हणत सारे सणसमारंभ झोकात साजरे करायचे बेत आखत होते तिथे आदूने चारचौंघांमध्ये मिसळणे बंद केले होते. चाळीच्या कार्यक्रमांत हा स्टेजच्या जवळ नाही तर पार लांब दिसू लागला होता. चेहरा त्याचा उतरू लागला होता, तब्येत पार खालावली होती. इथून पुन्हा सुधारेल अशीही आशा त्याच्याकडे बघून वाटत नव्हती. पन्नाशीचा आदू सत्तरीचा वाटू लागला होता. कधीतरी माझ्या बाजूला येऊन उभा राहायचा, “काय आभ्या” अशी हलकेच हाक मारायचा. उत्तरदाखल त्याला माझे हसणेच अपेक्षित असायचे. पण त्याची स्थिती पाहता ते ही हल्ली आतून येणे बंद झाले होते. “कसा आहेस रे आता?” एवढी काळजीपोटी चौकशी व्हायची. पण त्यानंतर तो जे काही भाव चेहर्‍यावर आणत हसायचा, जे आता फक्त मरणाचीच वाट बघत असल्यासारखे दाखवायचा, ते असह्य करून जायचे.

आदूची पहिली स्टेज पार होऊन तो दुसर्‍या स्टेजला पोहोचल्याची ती लक्षणे होती. दारूचे कित्येक ग्लास त्याने एकाच घोटात रिचवले असतील पण ती मात्र त्याला हळूहळू आपल्या पोटात घेत होती. मध्यंतरी डॉक्टरने शेवटचे फर्मान दिल्याचे आठवतेय. डॉक्टरही वैतागूनच म्हणाले असतील, कारण त्यांना क्लिनिक सोडून नाईलाजाने चाळीचे तीन मजले चढावे लागायचे, पण पैश्याची फीज मिळेलच कि नाही याची खात्री नसायची.

अखेर बोर्ड रंगवणार्‍या आदूचे स्वत:चे नाव बोर्डावर झळकले ते मेल्यावरच.. कै. आदिनाथ शंकर साताडकर.
त्या दिवशी कित्येकांना त्याचे पुर्ण नाव समजले असेल. तरीही त्यांच्यासाठी एक बेवडाच मेला होता. एक कलावंत, एक विचारवंत आपली कला पेश न करताच या जगातून निघून गेला आहे, हे मात्र कोणाच्याही ध्यानी नव्हते.

आदूसारखे लोक हे आपल्याच चांगुलपणाचा आरसा असतात. जर आपण चांगले असू तर आपल्याला त्यांच्यातील चांगले गुण भावतात, नाहीतर आठवणीत केवळ त्यांचे दोषच राहतात.

आदू म्हणायचा, कोणाच्या आठवणीत रडायचे नाय बे आभ्या. आठवणी त्रास देऊ लागल्या की त्या आठवाव्याश्या नाही वाटत. मी रडत नाही म्हणून मला माझी आई रोज आठवते. तू एकदा रडला की या आदूला विसरून जाणार बघ. पण खरे होते, आदूला ‘आदूस’ अशी हाक मारणारी त्याची आई त्याला अजूनही आठवायची. ती आई, जी त्याच्या वयाच्या पंधरासोळाव्या वर्षी त्याला सोडून गेली, पण आज पन्नासाव्या वर्षीही त्याच्या तितकीच स्मरणात होती. बहुधा उभ्या आयुष्यात त्याला तितकाच मायेचा माणूस दुसरा कोणी भेटला नसावा ..

आज आदूच्या आठवणी सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येत नसेलही, ना ऐकताना कोणाला गलबलून आले असेल. मात्र आदू गेला तेव्हा त्याच्या मैताला चिक्कार गर्दी होती. कोण कुठल्या चार बायका जेव्हा आदूसाठी रडल्या तेव्हा थोडेसे माझ्याही काळजात तुटले होते. या प्रत्येकाशी त्याचे काही ना काही तरी ऋणानुबंध जुळल्याशिवाय हे शक्य होणार नव्हते. वाईट फक्त एकाच गोष्टीचे वाटते, हे जर त्याला आधीच समजले असते, तर कदाचित त्याच्या जगण्याला एक कारण मिळाले असते.

– आभ्या