RSS

Monthly Archives: डिसेंबर 2013

ती आणि मी – सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

२ ऑक्टोबर २०१३
.
तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला…. म्हण मुद्दामच उलटी म्हटली कारण दूधापेक्षा ताकच जास्त आवडते मला..

रात्रीचे दोन घास कमीच खायचे असतात, हे मानून आणि पाळूनही आज चार घास जास्तच गेले. तळलेली मच्छीची तुकडी आणि सारभात असले की हे माझे नेहमीचेच आहे, पण आजवर ना कधी मळमळले ना कधी अजीर्ण झाले. आज तेवढे जेवण जरा अंगावर आले.. घरच्या घरी केलेली शतपावली यावर उतारा म्हणून पुरेशी असते, पण आज चार पावले जरा जास्तच चालावीशी वाटली.. आधी आमच्या जुन्या घरी चाळीचा कॉमन पॅसेज मुबलक उपलब्ध व्हायचा, पण आता थेट रस्त्यावर उतरावे लागले. अर्थात तू तिथं मी या उक्तीला अनुसरून जोडीनेच उतरलो.. खरे तर लग्न झाल्यावर नवे जोडपं म्हणून रोजच रात्री जेवल्यावर बाहेर फेरफटका मारायचा शिरस्ता होता आमचा.. नाक्यापलीकडच्या चौकापर्यंत चालत जायचे अन तिथेच एखादा बसस्टॉप गाठून त्यावर बैठक जमवायची.. मग दिवसभरातील गप्पा, उद्याचे प्लॅन, उगाळलेला भूतकाळ अन रंगवलेली भविष्यातील स्वप्ने… संसारात गुरफटलो तसे रोजच्या रूटीनमध्ये हे सारे मागे पडले.. पण त्याची खंत अशी कधी वाटली नाही, ना आवर्जून पुन्हा तसे करावेसे वाटले.. आज मात्र पुन्हा तसाच फेरफटका मारायच्या विचाराने तिचेही मन उल्हासित झाले एवढे मात्र खरे.. विचारणा करताच तिचे लगबगीने तयार होणे यातच ते सारे आले.. रात्रीची वेळ असूनही तिचे नेहमीचेच, मी काय घालू अन मला काय चांगले दिसेल, हे प्रश्न विचारणे चालूच होते.. सवयीनेच मी विचार न करता एखादा निर्णय देऊन टाकला.. अन तिनेही अखेर नेहमीप्रमाणेच जे तिच्या मनात होते तेच परिधान केले..

बिल्डींग खाली उतरलो अन समोर रस्त्यावर नजर टाकली, तर माझगावच्या महालक्ष्मीचे वाजतगाजत आगमन होत होते. अपशकुन मी मानत नाही मात्र शुभशकुनांवर विश्वास ठेवतो. देवीला आडवे जाण्यापेक्षा सामोरी जाऊन तिचे दर्शन घेतले. मिरवणूकीची गर्दी असल्याने बायको लांबवरच थांबली, मात्र मी थेट देवीच्या चरणापर्यंत पोहोचलो.. नुकतेच गणपती येऊन गेलेले, तेव्हा त्या गणरायाच्या मुर्त्या पाहताना जगात यापेक्षा सुंदर अन देखणे शिल्प असूच शकत नाही असा जो विश्वास वाटायचा त्यावर मात्र या देवीच्या चेहर्‍यावरील सात्विक भावांनी मात केली. कदाचित देवी हि एक स्त्री असल्याने तिच्यात मातेचे रूप दिसत असावे अन हि सात्विकता त्यातूनच आली असावी.. काही का लॉजिक असेना, जय माता दी म्हणत नकळत मजसारख्या नास्तिकाचेही हात जोडले गेले. दुरून पाहणार्‍या एखाद्याला यात भक्तीभावच दिसला असता पण माझ्यासाठी मात्र हा संस्कारांचा भाग होता.. गर्दीतून वाट काढत अन उधळल्या जाणार्‍या गुलालाला चुकवत, मी मागे फिरलो तर खरे, पण थोडे चालून गेल्यावर लक्षात आले की देवीचा फोटो काढायची छानशी संधी हुकवली.. मागे सोडून आलेल्या गर्दीमध्ये आता पुन्हा मिसळायची इच्छा होत नव्हती, मात्र हे वेळीच का सुचले नाही याची चुटपुट मात्र लागून राहिली.. अन याच चुटपुटीत मागे वळून वळून पाहत पुढे पुढे चालत राहिलो ते अगदी वळण येईपर्यंत..

मिरवणूकीच्या आवाजाला सोडून दूर निघून आलो तसे वातावरणात एक शांतता जाणवू लागली.. पण त्याच बरोबर एक गारवादेखील.. अचानक एखादी दुचाकी वेगाने सुसाट निघून जायची तर एखादी चारचाकी स्पर्शून जातेय की काय असे वाटायचे.. काळजीपोटी मग तेवढ्यापुरते फूटपाथवरून चालणे व्हायचे पण मोकळ्या ठाक पडलेल्या रस्त्यावरून चालायचा मोह किती काळ आवरणार.. तिचा हात हातात घेऊन आणि तिला उजव्या हाताला सुरक्षित ठेऊन त्या नीरव शांततेचा आस्वाद घेत जमेल तितके रस्त्याच्या कडेकडेने चालू लागलो..

आमच्या नेहमीच्या.., म्हणजे एकेकाळच्या नेहमीच्या बसस्टॉपवर काही मुलांचा ग्रूप बसलेला दिसला.. तसे त्याला टाळून पुढच्या बसस्टॉपच्या शोधात निघालो.. गेल्या काही वर्षांत बसने प्रवास करण्याचा योग आला नसल्याने आपल्याच विभागात कुठेकुठे बसस्टॉप आहेत याचीही आपल्याला माहीती नसल्याची जाणीव झाली.. अन मग ते शोधायच्या नादात काही अश्या गल्ल्या फिरू लागलो ज्यांना मी स्वता कित्येक वर्षे मागे सोडून आलो होतो.. त्या गल्यातच मग मला एकेक करत काहीबाही गवसू लागले.. काही जुन्या चाळी जाऊन टॉवर उभे राहिलेले तर काही चाळी आणखी विदीर्ण अवस्थेत पोहोचल्या होत्या.. ओळखीच्या वडापाव-पावभाजीच्या गाड्या उठल्या होत्या तर एका चिंचोळ्या गल्लीतही नवे चायनीज रेस्टॉरंट उघडलेय याचा शोध लागला.. मध्येच एखाद्या वाडीकडे बोट दाखवून मी हिला सांगू लागलो की इथला गोविंदापथक एकेकाळी खूप फेमस होता, ज्याबरोबर हंड्या फोडायला एके वर्षी मी देखील गेलो होतो.. तर पुढे एक मैदान लागले जिथे क्रिकेट खेळण्यात माझे अर्धे बालपण गेलेले.. बघता बघता जुन्या आठवणी गप्पांचे विषय बनू लागले, जे बोलताना ना मला थकायला होत होते, ना ऐकताना तिला पकायला होत होते.. मात्र या नादात ज्या गोष्टीच्या शोधात आम्ही फिरत होतो त्या बसस्टॉपलाच विसरून गेलो.. पाय थकले तेव्हा जाणवले आता कुठेतरी बूड टेकायलाच हवे कारण घरापासून खूप लांबवर निघून आलो होतो..

एकट्याने नॉस्टेल्जिक होण्यापेक्षा कधीतरी कोणाच्या साथीने नॉस्टेल्जिक होण्यात एक वेगळीच मजा असते.. अर्थात ती साथही तशीच खास असावी लागते जिला आपल्या गत आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस असेल.. अन या जागी आयुष्याच्या जोडीदाराची जागा दुसरा कोण घेऊ शकेल.. बालपणीचे किस्से एकमेकांना सांगत स्वताला दुसर्‍यासमोर आणखी आणखी उलगडवत नेणे या आमच्या आवडीच्या गप्पा.. ज्या आज रात्रीच्या शांततेत बसस्टॉपच्या खांबावर अगदी चंद्रतार्‍यांच्या साक्षीने खुलून आल्या होत्या.. काही वेळापूर्वी रस्त्याकडेने चालताना भेसूर अन भयाण वाटणार्‍या मगासच्या त्या झाडांच्या सावल्या.. आता मात्र मोजकाच तो चंद्रप्रकाश आमच्यावर सोडून मंदधुंद वातावरणनिर्मिती करत होत्या.. मध्येच एखाद्या कुत्र्याने घेतलेला आलाप आता बेसूर वाटत नव्हता.. त्यापैकीच एक श्वान बसस्टॉपच्या त्या टोकाला जणू आमची प्रायव्हसी जपण्याची काळजी घेतच लवंडला होता.. पण आमच्या गप्पा काही संपणार्‍यातल्या नव्हत्या ना डोळे पेंगुळणार होते.. मात्र वेळाकाळाचे भान आले तसे पुढचा किस्सा घरी सांगतो असे तिला म्हणतच आम्ही उठलो..

परतीच्या वाटेवर घरापासून चार पावले शिल्लक असताना, आमची हि नाईट सफारी संपत आली असे वाटत असतानाच, समोर पाहिले तर काय…. मगासची देवीची मिरवणूक या एवढ्या वेळात जेमतेम शंभर पावले पुढे सरकली होती.. आमच्या ‘डी’ विंगचा निरोप घेऊन निघालेली ती आता ‘ए’ विंग वाल्यांना दर्शन देत होती.. चमत्कारांवर माझा विश्वास नाही मात्र नशीबावर आहे.. नुसतेच दर्शन नाही तर दर्शनाची स्मृती फोटोरुपात जपण्याची संधी मला देणे हे तिच्याच मनात असावे.. अन इथे बायकोनेही माझ्या मनातले भाव ओळखून मला फोटो काढायला पिटाळले.. आता मात्र झोपताना कसलीही चुटपुट मनाशी राहणार नव्हती.. सुख सुख जे म्हणतात त्याची व्याख्या आजच्या रात्री तरी माझ्यासाठी हिच होती..

– तुमचा अभिषेक

 

ती आणि मी – सुख म्हणजे आणखी काय असते.. (७)

दर दुसर्‍या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्‍याच्या फोनवरून कितीसे बोलणार.. पण आता बहुधा ती तिथे निवांत बसली असावी, आणि इथे माझी फोनाफोनी सुरू झाली होती.. सुरुवातीला रिंग जाऊनही न उचलला जाणारा तिचा हरवलेला फोन.. थोड्याच वेळात संपर्कक्षेत्राच्या बाहेर दाखवू लागला आणि काही काळाने बंद.. तेव्हाच लक्षात आले की फोन चुकीच्या हातात गेला आहे, ज्याची परत आपल्या हाती लागायची शक्यता आता नसल्यातच जमा.. त्वरीत सिमकार्ड बंद करणे हा प्रथमोपचार करायला म्हणून कस्टमर केअरला फोन लावला आणि लक्षात आले तिचाच नाही तर माझाही फोन तिच्याच नावावर होता.. त्याने ओळख पटवण्यासाठी विचारलेले सतरा प्रश्न.. मी माझ्या’च बायकोचा नवरा आहे हे आता मला त्याच्या रेकॉर्डला असलेल्या माहितीला अनुसरून त्याला पटवायचे होते.. ना मला तिच्या माहेरचा पत्ता सांगता येत होता ना इतर अकाऊंट डिटेल्स.. सुदैवाने एक क्ल्यू लागला, आणि बायकोची जन्मतारीख लक्षात ठेवण्याचा मला अजून एक फायदा समजला.. समोरची व्यक्ती फोनवर दिसत नसली तरीही बायकोची जन्मतारीख लक्षात ठेवणारा नवरा बघून नक्कीच त्याच्या चेहर्‍यावर कौतुकाचे भाव पसरले असणार.. अन त्याच खुशीत का असेना त्याने एकदाची माझी तक्रार नोंदवून घेतली..

कार्ड तर बंद झाले…. पण पुढे काय??

जेमतेम दिड महिन्यापूर्वी घेतलेला मोबाईल.. पुरेसा महागडा.. गेल्याचे दुख तर होतेच पण त्यापेक्षा मोठी चिंता, तातडीने नवा घेणे गरजेचे होते.. नव्हे पर्यायच नव्हता.. मोबाईल हि आपण एक अतिआवश्यक मूलभूत गरज बनवून ठेवली आहे, अन्यथा एकेकाळी संपर्काचे कोणतेही साधन नसताना सारे मित्र कसे न ठरवता भेटायचो, वगैरे वगैरे तत्वज्ञानाने भारलेल्या भावनेच्या सागरात पोहून आल्यानंतरही पुढे काय हा प्रश्न कायम होताच.. नुसते बोलण्यापुरतेच नाही तर कॅमेरा, ईंटरनेट, म्युजिक प्लेअर, विडिओगेम्स, काय काय आणि कश्या कश्यासाठी वापरला जाणारा मोबाईल.. नवीन घेईपर्यंत हे सारेच थंडावणार असल्याने पुढील पगारापर्यंत थांबणे शक्य नव्हते.. एकदा का सर्वसोयीसुविधांनी युक्त मोबाईल वापरायची सवय लागल्यावर परत फिरून साधा मोबाईल वापरायला तिला आवडणार नव्हते.. तर मोबाईलच्या बाबतीत आजवरचा तिचा धांदरटपणा पाहता पुन्हा तिला महागडा मोबाईल घेऊन देणे मला परवडणार नव्हते..

कधी नव्हे ते माझ्या बायकोचा थोडक्यात आटोपलेला फोन आणि त्यानंतर बदललेला माझा चेहरा, अन उडालेली धावपळ.. काहीतरी विपरीत घडलेय हे चाणाक्ष सहकार्‍यांच्या लक्षात यायला जास्त वेळ लागला नाही.. काय झाले ते सांगितले तसे सल्ले यायला सुरुवात झाली….. अर्थातच, अगदी मोफत !

“मागे पण एकदा हरवलेला ना तिने फोन, कशी वेंधळी आहे रे तुझी बायको…….. (अग्ग ए बाई, माझ्या बायकोने हे ऐकले ना, तर जीव घेईन… तुझाही आणि माझाही!)

“या बायकांना फोन वापरायची अक्कलच नसते…….. (अरे बाबा, इथे मी माझ्या टेंशनमध्ये आहे आणि तू तेवढ्यात ऑफिसमधल्या बायकांना टोमणा मारायचा चान्स काय घेतोयस..)

“तिलाही आता तुझ्यासारखाच दगडी मोबाईल घेऊन दे…….. (अच्छा ! आता हा टोमणा मला का… पण नकोच ते, एकाकडे तरी चांगल्यातला मोबाईल असलेला बरा रे..)

“आता एखादा चांगला फोन तू स्वताला घे आणि स्वताचा साधा फोन तिला वापरायला दे…….. (अर्रे पण अश्यानेही नवीन आणि महागडा फोन हा घ्यावा लागणारच ना..)

“तिला मोबाईलबरोबर एक चैन विकत घेऊन दे आणि मोबाईल त्या चैनेला अडकवून गळ्यात लटकवायला सांग, म्हणजे कुठे हरवणार नाही…….. (सादर प्रणाम __/\__ राजा तुला, हेच करू शकतो मी आता, तुर्तास या आयडिया आपल्याजवळच ठेव..)

……

अर्थातच, माझ्या सर्व प्रतिक्रिया मनातल्या मनातच होत्या.. अन त्या व्यक्त करताना चेहरा शक्य तितका शांत अन निश्चल.. नाही म्हणायला थोडेसे हसायला मात्र आले, जेव्हा शेजारच्या मुलीने न सांगता स्वताहूनच “चीपेस्ट मोबाईल इन ईंडिया” टाईप करत गूगलवर शोधायला घेतले.. खर्रंच, कोणाचे काय तर कोणाचे काय, म्हणतात ते उगीच नाही.. काही का असेना, एकंदरीत या हसतखेळत शेवट झालेल्या चर्चासत्रानंतर थोडेफार हलके मात्र वाटायला लागले.. त्यानंतर पुन्हा दोनचार वेळा तिच्या हरवलेल्या फोनवर रिंग मारून आता तो कायमचा आपल्यातून निघून गेला आहे याची खात्री केली आणि विचार मनातून झटकून टाकला.. आज्जीच्या एका सुरेख अन तितक्याच टिपिकल वाक्याची आठवण यावेळी झाली.. ती आज असती तर नक्कीच म्हणाली असती.. फोनच गेलाय ना.. कोणी नशीब तर नाही ना नेलेय तुझे.. त्याच धर्तीवर मनात आले.. कोणीतरी फोनच चोरला आहे ना, सुख तर नाही ना हिरावलेय माझे….. पण हे असे समजून आपल्याच मनाची समजूत काढणे तितकेच कठीण असते हे देखील जाणवले.

दिवसभरात सतर्‍यांदा येणारा तिचा फोन अन प्रत्येकवेळी वैतागतच उचलणारा मी… आज चक्क ती पुढचा फोन कधी कुठून करते याची वाट बघत होतो.. आज ना तिचा जेवलास का विचारायला फोन येणार होता ना गोळ्या घ्यायच्या आठवणीचा.. आला तो अगदी संध्याकाळीच जेव्हा मी निघायच्या तयारीत होतो.. नेहमीच्या जागेवर अन नेहमीच्या वेळेवर, ती माझी वाट बघत उभी राहणार होती जिथून आम्ही एकत्र घरी जातो..

…… “ओरडणार का रे आता बायकोला?” … ऑफिसातून निघताना एका मैत्रीणीने सहजच विचारले..

“हि माझ्या बायकोची काळजी आहे, की तिला ओरडायची आठवण??” …….. अन माझ्या या प्रत्युत्तरावर आम्ही दोघेही खळखळून हसायला लागलो..

या हसण्याने तयार झालेला मूड शक्य तितका तसाच कायम राहील आणि ते तसेच चेहर्‍यावर दिसेल याची काळजी घेतच मी आमच्या नेहमीच्या जागी बायकोला भेटलो.. एकंदरीत काय घडले याची थोडीफार चर्चा झाली.. ज्यातून मला समजले की तिचा फोन हरवला नसून चोरीला गेला होता..

आता चोरी आली तिथे पोलिस तक्रारही आलीच.. पण त्याने मोबाईल काही परत मिळत नाही हे देखील ठाऊक होतेच.. त्यामुळे ती पायरी चढण्याचा प्रश्नच नव्हता.. तरी तिला कोणीतरी कल्पना दिली होती की मोबाईलचा कसलासा आयएमईआय नंबर असतो ज्यावरून फोन कायमचा बंद करू शकतो.. चारपाच हेलपाटे मारावे लागतील पण ज्याने तो चोरला आहे त्याच्यासाठी तो मोबाईल फक्त गेम्स खेळण्यापुरता आणि गाणी ऐकण्यापुरता शिल्लक राहील.. मोबाईल म्हणून त्याचा वापर शून्य ! आपल्या कामात नाही ना, तर ज्याने तो चोरला आहे त्यालाही तो पचू द्यायचा नाही.. हि त्यामागची धारणा !!

पण याची खरेच गरज होती का? तिच्या मैत्रीणीच्या नवर्‍याने असे केले त्याला समाधान मिळाले.. तो त्याचा स्वभाव अन तो आपल्या जागी बरोबर होता.. पण यातून आपल्यालाही समाधान मिळणार होते का.. नाही तर मग का उगाच ते चारपाच हेलपाटे घालायचे कष्ट घ्या, ज्यातून आपल्या हाती मनस्तापाशिवाय काही लागणार नाही.. पटलं तिला.. धुमसणेही शांत झाले.. समोर ट्रेन लागली होतीच.. मी म्हणालो, चल मग आता, जाऊया घरी……..

“म्हणजे?? … आपण शॉपिंग नाही करायची??” … अगदी निरागस भावात अन भाबड्या स्वरात, अनपेक्षितपणे आलेला तिचा प्रश्न.. ऐकताक्षणीच आठवले.. अरे खर्रेच की, मॉलमध्ये सेल लागला आहे म्हणून परवाच आपण दोघांनी हा शॉपिंगचा प्लॅन बनवला होता.. अगदी कोणाला काय घ्यायचेय या मंथनात कालची रात्र जागवली होती.. अन आज दिवसभराच्या धांदलीत डोक्यातून निघूनच गेले होते..

बस्स मग काय… जेवढ्या किंमतीचा मोबाईल, जवळपास तेवढ्याच किंमतीची खरेदी झाली.. किंबहुना एखादा मोबाईल गेल्याने आपल्यावर आभाळ कोसळत नाही हे स्वतालाच दाखवून द्यायला जास्तच झाली.. जे जायचे होते ते केव्हाच गेले होते.. आता नवीन मोबाईल कोणत्या कंपनीचा आणि मॉडेलचा घ्यायचा याचे आमच्यात डिस्कशन सुरू झाले होते.. सोबतीला एकमेकांना आपापल्या ऑफिसमधील गंमतीशीर प्रतिक्रिया सांगत होतो.. कधीतरीच बायकोच्या धांदरटपणावर तोंडसुख घ्यायची संधी मिळते जी मी हक्काने बजावत होतो.. आजच नाही तर पुढचे काही दिवस आता हेच करणार होतो.. हे सुख नाहीतर आणखी काय होते..

– तुमचा अभिषेक

 

ती आणि मी – सुख म्हणजे आणखी काय असते.. (६)

२६ ऑगस्ट २०१३

माझा चार दिवसांचा आजार आणि तिचा चार दिवसांचा आळस… पाचव्या दिवसाला झटकून, श्रावणी सोमवारचा मुहुर्त साधून आमचे देवदर्शनाला जायचे ठरले.. अर्थातच.. तिनेच ठरवले.. कारण ती जेवढी आस्तिक तेवढाच मी नास्तिक.. त्यामुळे नेहमीसारखेच, ‘जाणे गरजेचे आहेच का??’ इथपासून वादाला सुरूवात.. घरापासून चालतच पंधरा-वीस मिनिटांवर महादेवाचे मंदीर असल्याने माझी नकारघंटा वाजवायला जास्त वाव नव्हताच.. आजारपणाचा फायदा उचलून सकाळपासून टाळलेली आंघोळ.. नाईलाजाने जेव्हा संध्याकाळी उरकावीच लागली, तेव्हा आता अखेर जाणे निश्चितच हे समजून चुकलो.. तरीही तिचे हे देवदर्शन सुकर घडू देणार्‍यातला मी अजिबात नव्हतो.. अन पहिली चकमक उडाली, जेव्हा मी स्वच्छ आंघोळ करून माझ्या निर्मळ झालेल्या शरीरावर जुनीपुराणी कळकट मळकट जीन्स चढवली..

“जीन्स आणि तंबाखू.., मळल्याशिवाय मजा येत नाही” …. या माझ्या युक्तीवादाचे तिच्या भक्तीवादापुढे काही एक चालले नाही आणि ती मला बदलावी लागलीच.. पण लागलीच.. मी दुसरा मुद्दा उपस्थित केला की छत्रीचे ओझे मी बरोबर घेणार नाही आणि पाऊस आला तर तिथूनच टॅक्सीने परत येणार.. तिने हसतच याला मान्यता दिली आणि गेले चार दिवस पावसाची रिपरिप फारशी नव्हतीच हे आठवल्यावर मला तिच्या या हसण्यामागचे रहस्य उलगडले.. तसे चालत जायचा ना तिला फारसा उत्साह ना मला फारसा आळस, त्यामुळे जाताना चालत जायचे आणि येताना टॅक्सीने यायचे याला दोघांनीही मान्यता दिली.. देवदर्शनाला चालत गेल्याचे तिला समाधान आणि एकवेळचे टॅक्सीचे भाडे वाचवल्याचे मला.. चालताना तिचा वेग असा होता, की जणू ‘चलो बुलावा आया है..’, त्यामुळे निरुत्साहाने रेंगाळत चालणार्‍या माझी फरफटच होत होती.. पण मला खरी चिंता होती ती देवदर्शनासाठी लागलेल्या रांगेची.. आपली कसलीही श्रद्धा नसताना वा कुठलाही स्वार्थ साधला जाणार नसताना त्या रांगेत उभे राहणे म्हणजे आयुष्यातील वेळ फुकट गेल्यासारखेच मला वाटते.. त्यातही एक नास्तिक म्हणून सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो रांगेतील आजूबाजुच्या लोकांनी मलाही आस्तिक समजण्याचा.. पण सुदैवाने रांग नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता.. मात्र पुरेशी वर्दळ होती.. इतर कुठल्याही सोमवारापेक्षा श्रावणी सोमवार जास्त स्पेशल असल्याने हाराफुलांची दोनचार दुकाने जरा जास्तच उठून दिसत होती.. त्यात रचून ठेवलेली ताटेही तशीच भरगच्च भासत होती.. आजूबाजूला कोणाला ऐकू न जाईल अश्या आवाजातच बायकोच्या कानात कुजबुजलो, छोटेवालेच घे हं .. पण ते काही होणे नव्हते हे अनुभवानेच ठाऊक होते.. नेहमीचे नारळ-फूल-फुटाणे-अगरबत्ती व्यतिरीक्त दुध की दहयाची थैली आणि उमलायच्या आतच खुडलेले कमळाचे एक फूल पाहून समजलो कि हे नेहमीच्या बजेटमधील प्रकरण नाही.. मागाहून किंमत समजली तेव्हा अंदाजलेले बजेटही गोंधळले होते.. त्यातल्या त्यात एकच दिलासा वाटला कि कमळाचे फूल पुर्ण उमललेले नव्हते अन्यथा पैशाचे पाकीट खालीच होते.. हो खरेच खाली होते, कारण एटीएम कार्डच्या भरवश्यावर राहायची सवय लागल्याने आता केवळ टॅक्सीच्या भाड्यापुरतेच पैसे उरले होते..

मंदीराच्या दारात चपला काढून पायर्‍या तर चढलो, पण नेहमीसारखे नजरेआड होईपर्यंत मागे वळून वळून बघत माझी नजर चपलांवरच अडकली होती.. बूट असते तर हारवाल्याकडेच ठेवले असते पण फ्लोटर्स असल्याने पुढेच काढूया असा विचार केलेला.. मात्र जवळपासच्या चपला पाहता तुलनेने माझ्याच नवीन वाटत असल्याने चूक केली की काय असे आता वाटू लागले होते.. तिला यातले काही सांगायची सोय नव्हतीच अन तशीही ती गाभार्‍याच्या जवळ पोहोचली देखील होती.. आता मागे रेंगाळत बसून शिव्या खाण्यापेक्षा पटकन देवदर्शन उरकून आपल्या चपलांकडे परत येऊया असा विचार करत त्वरेने निघालो.. इथून माझी भुमिका न सांगता सांगकाम्यासारखी..! ज्या देव्हार्‍यावर ती डोके टेकवेल त्या देवाचे चरणस्पर्श आपणही करायचे.. जिथे ती स्तोत्र म्हणने सुरू करेल तिथे क्षणभरासाठी हात आपणही जोडायचे.. मात्र क्षणभरासाठीही गर्दीत तिच्यापासून वेगळे व्हायचे नाही.. कधी कुठचे फूल उचलून माझ्या डोक्याला लावायला म्हणून मला शोधेल हे सांगता येत नाही आणि तेव्हा आपण चुकूनही तिच्यापासून लांब असता कामा नये, नाहीतर……..

तर हो नाही करता एकंदरीत हे सारे सोपस्कार पार पडले आणि आम्ही गाभार्‍याबाहेर पडणार इतक्यात तिला अग्ग बाई नंदीचे पाया पडायचे राहिलेच की हे आठवले.. मी शांतपणे माझ्याही वाटणीचे आता तूच पडून ये असे सांगून बाहेर पडलो आणि तुलनेने एका मोकळ्या जागेत येऊन थांबलो. थोड्याच वेळात गर्दीतना वाट सारत पाठोपाठ ती देखील आली. आजूबाजुच्या कोलाहलाकडे दुर्लक्ष करत निवांत बसलेल्या आसपासच्या भाविकांकडे बघून तिलाही दोन घटका बसायचा मोह झाला.. ज्याची विचारणा होताच मी तात्काळ परवानगी दिली.. एवढी पायपीट करून आल्यावर याची गरज खरे तर दोघांनाही होतीच.. जिथे उभे होतो, तिथेच फतकल मांडली.. तिने तेवढे आपले तोंड देवाच्या दिशेने राहील याची काळजी घेतली.. आम्ही दोघे एकत्र असूनही आमच्यात जेमतेम बोलणे होते असा हा एक दुर्मिळ योग.. ती आपल्या देवभक्तीत चूर तर मी आजूबाजुच्या भाविक जोडप्यांचे निरीक्षण करण्यात मग्न.. काही विवाहित तर काही अविवाहित प्रेमी युगुलं.. पण वरकरणी पाहता त्यातील एकही आस्तिक-नास्तिकाची जोडी वाटत नव्हती.. प्रत्येक जोडीतील दोहोंच्या चेहर्‍यावर सात्विकच भाव दिसत होते.. त्यातील मुलगा वा पुरुष अगदी डोक्याला रूमाल गुंडाळून वा किमान कपाळाला लालसर टिका लाऊन तरी दिसत होता.. ते पाहता हि माझ्यासारख्या दाढीची खुंटे वाढवून अन जीन्स टी-शर्ट मध्ये खोचून फिरणार्‍या मुलाबरोबर देवळात यायला चिडते यात काही वावगे वाटण्यासारखे नव्हते.. किंबहुना तश्याही अवस्थेत का होईना न संकोचता मला बरोबर घेऊन येते याचे मला कौतुकच वाटायला लागले.. अन आज माझी फरफट करत, माझ्यावर दमदाटी करत, मला मंदीरात घेऊन यायचे कारण म्हणजे माझाच लांबलेला आजार होता हे न समजण्याएवढा मी बावळट नव्हतो..

तिची देवावर श्रद्धा आहे जी देवावरच्या विश्वासातून आली आहे आणि माझी तिच्या विश्वासावर श्रद्धा आहे जी माझ्या तिच्यावर असलेल्या प्रेमातून आली आहे.. कितीही गुंतागुंतीचे वाटले तरी हेच एक कारण आहे जे मी कितीही लंगड्या सबबी बनवल्या तरी आजवर तिच्या देवदर्शनाच्या आड आलो नाही… परतताना तिने समोर धरलेला प्रसाद त्याच विश्वासाने आणि त्याच श्रद्धेने प्राशन करत, ठरल्याप्रमाणे टॅक्सीला हात दाखवला..

गाडीभाडे, हारफुले, अन इकडतिकडचे खाणे.. नेहमीसारखेच आज तू मला कितीला कापलेस याचा हिशोब मी तिला मांडून दाखवत असतानाच कुशीत शिरून ती मला ‘थॅंक्स’ म्हणाली.. जे कधी तिला पाचशे रुपयांचे जेवण खाऊ घातले तरी म्हणत नाही, वा कधी पाच हजारांची शॉपिंग करवून दिली तरी म्हणेलच याची खात्री नसते… ते असे थोडक्यात आले.. ते ही अगदी मनापासून.. खर्रंच, स्सालं सुख सुख म्हणजे आणखी काय असते..

– तुमचा अभिषेक

 

ती आणि मी – सुख म्हणजे आणखी काय असते.. (५)

दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे..

मांडीवर ठेवलेल्या पेपर वरून नजर भिरभिरवत सहज सवयीनेच एक नजर उजवीकडे तर एक नजर डावीकडे.. तर फिरून पुन्हा आणखी एक नजर उजवीकडे फिरवली.. अंह, ट्रेनमध्ये रस्ता वगैरे क्रॉस करत नव्हतो.. तर, त्यानंतर मी माझ्या दोन्ही हातांची बोटे दुमडली.. सहजच.. सवयीनेच.. जसे एखादी मुलगी आपले नेलपॉलिश चेक करते, अगदी तसेच.. एक एक बोट निरखून पाहता अचानक एका बोटावर नजर पडली तसा माझा चेहरा उजळला. मला माझे खाद्य मिळाले होते. त्या बोटाचे वाढलेले नख खायला म्हणून मी ते तोंडाजवळ नेणार, तो इतक्यातच…….

फाssट्ट करून एक फटका त्या हातावर पडला.. चारशे चाळीसचा झटकाच जणू, हात पुन्हा खाली गेला.. ओशाळून बाजुला पाहिले, तर जिथून तो फटका आला होता ती पुन्हा आपल्या गेममध्ये मग्न, जणू वेगळे असे काही घडलेच नव्हते.

काही सवयींचे कालांतराने स्वभावात रुपांतर होते. अन माझा हा स्वभाव ती पुरता ओळखून होती. जेव्हा मी बोटांचे निरीक्षण करायला सुरूवात केली, तेव्हाच तिने पुढे काय होणार हे ताडले होते, अन ते होऊ नये म्हणून वेळीच पावले.. अंह.. हात उचलला होता.. असाच हात ती घरीही उचलते जेव्हा मी चकचक चकचक, आवाज करत कानात बोटे घालतो.. असाच हात ती बाहेरही उचलते, जेव्हा मी सवयीनेच नाक खाजवायला घेतो.. असाच हात ती हॉटेलमध्येही उचलते, जेव्हा मी जेवणाची ऑर्डर करायच्या आधी, केल्यानंतर, आणि ती ऑर्डर येईपर्यंत, याच्या त्याच्या टेबलावर नजर टाकत बसतो..

ठरवलं तर या छोट्यामोठ्या चुकीच्या सवयी बदलण्यासारख्या असतात.. थोडासा प्रयत्न करावा लागतो इतकेच.. पण सवयींची दखल घेणारे कोणी असेल तर त्या जोपासण्यातही एक सुखच असते.. जसं ते दाग अच्छे होते है म्हणतात नं.. अगदी तस्संच ! नेहमीच तिचा न चुकता फटका खाणं, हे ही एक अस्संच !

पण आजचे हे सुख एवढ्यावरच संपले नाही हं..!

माझी चुळबुळ अजूनही चालूच होती. अतृप्त आत्मा अजूनही आतल्याआत तळमळत होता. थोड्यावेळाने काही सुचल्यासारखे झाले.. खिशातला फोन काढून कानाला लावला अन तिला आलोच जरा म्हणत जागेवरून उठलो.. तिथे तिच्या नजरेच्या पार पलीकडे, ट्रेनच्या दारावर थंडगार वारा खात उभा राहिलो.. कानाला लावलेला फोन केव्हाच परत खिशात गेला होता, आणि खिशात घातलेला हात मात्र तोंडात आला होता.. एका हाताने ट्रेनचा दांडा पकडून दुसर्‍या हाताची नखे खायची इच्छा मी अखेर पुर्ण करत होतो.. ही सवय नव्हती, हे व्यसन नव्हते, आवडीच्या ही पलीकडे असलेला, हा खरा छंद होता.. खर्रच, स्सालं सुख म्हणजे आणखी काय असते !!

.
.
.

२६ जुन २०१३

काल ऑफिसमधून किंचित उशीरा घरी परतत होतो. बरोबर नेहमीसारखी बायको नव्हती. सानपाड्याला ट्रेन पकडली जी पनवेलहून येत होती, त्यामुळे पुरेशी भरलेली होती. बसायला काही आता मिळत नाही या विचारात नजर फिरवली असता एका बेचक्यात कॉलेजच्या मुलांचा ग्रूप बसलेला दिसला. एका सीटवर तीन तर त्याच्या समोरच्या सीटवर दोन. त्या दोन्ही मुली असल्याने काही प्रवासी जवळच उभे होते पण संकोचाने त्यांच्या सीटवर बसायला मागत नव्हते. परिणामी त्या मुलीही मस्तपैकी त्या सीटवर बॅग वगैरे शेजारी ठेऊन, ऐसपैस बसल्या होत्या. मी मनातल्या मनातच, “जरा जागा देता का?”, “बॅग मांडीवर घेता का?”, इथपासून ते “चल ग्ग सरक..” पर्यंत शब्दांची जुळवाजुळव करत तिथवर पोहोचलो तसे त्यांनीच माझ्या मनीचे भाव ओळखून स्वत:हून जागा करून दिली.

सुरक्षित अंतर राखून मी बसलो तर खरा, पण आत्ता खरा खेळ सुरू झाला. इतरवेळी असल्या कॉलेज ग्रूपचे निरीक्षण करणे हा माझ्या आवडीचा छंद., जो त्या ग्रूप मध्ये मुलींची संख्या लक्षणीय असेल तर जरा जास्तच आवडीने जोपासला जातो. पण आज मात्र झोप अनावर होत होती.. कारण होते ऑफिसमधील संध्याकाळची बोअर मीटींग.. मी बसल्या जागीच पेंगू लागलो. मला कल्पना होती की बाजूला मुलगी बसली आहे त्यामुळे कितीही पेंगलो तरी तिच्या खांद्यावर लुडकायचे नाहिये. हेच डोक्यात पक्के बसवून मी डोळे मिटले.. हळूहळू झोपेच्या स्वाधीन झालो.. पण डोक्यात तेव्हाही घोळत होते की नाही अभिषेक, तुला डाव्या बाजूला लुडकायचे नाहिये, तिथे मुलगी बसलेली आहे.. अगदी झोपेतल्या स्वप्नात वगैरे शिरलो तरी कोणीतरी माझ्या निद्रिस्त मनाला बजावत होते, की नाही अभिषेक नाही.. तोल जाऊ द्यायचा नाहिये.. आणि इतक्यात, अचानक.. कानावर एक आवाज खनखनला, “स्क्यूSSज मीS…” ..

ऐकताच क्षणी मी खाडकन जागा झालो. डोळे उघडतानाच मला अंदाज आला होता की हा आवाज कुठून आला असावा. डावीकडे झुकलेली मान सरळ करत तिथे न पाहताच मी कसेबसे सॉरी पुटपुटलो. चेहर्‍यावर ओशाळलेले भाव नैसर्गिकरीत्या आल्याने फारसा अभिनय करावा लागला नाही. ट्रेनमधील इतर प्रवांश्यांच्या माझ्याकडेच रोखलेल्या नजरेला नजर न देता जवळपास कुठे रिकामी जागा दिसते का हे पाहिले. दुर्दैवाने कुठेच नव्हती. मी डोळे मिटायचे नाटक करून तिथेच बसून राहिलो, कारण झाल्या प्रकारानंतर डोळे उघडून इथे तिथे पहायची सोय उरली नव्हती. अजूनही डोळ्यांवर झापड होतीच, त्यामुळे नाटक करता करता पुन्हा खरोखरची झोप लागू नये याची कसरत करावी लागत होती.

पुढे कुर्ला आले, तिथे अर्धीअधिक ट्रेन खाली झाली. मी लागलीच बाजूच्या सीटवर शिफ्ट झालो, अगदी सहजच.. अजूनही मी त्या मुलीकडे वा तिच्या ग्रूपकडे पाहिले नव्हते, बघायची हिंमत होत नव्हती. कान टवकारून त्यांचे बोलणे मात्र ऐकत होतो, सतत असेच वाटत होते की माझ्याबद्दलच कुजबूजत असणार, पण तसे नव्हते.. नसावे..

वडाळा आले, ते उतरले.. बरोबर ती सुद्धा..! अगदीच राहावले नाही तसे शेवटचे म्हणून, थोडी मान तर थोडी नजर, तिरपी करून, तिच्यावर एक कटाक्ष टाकला… आणि काय आश्चर्य.. उतरता उतरता ती माझ्याकडे बघून चक्क हसली.. अपनी तो निकल पडी.. चुकीचा का असेना, तिच्या हसण्याचा मी सोयीस्कर अर्थ काढला.. आता उद्यापासून तीच ट्रेन आणि तोच डब्बा.. स्साला सुख म्हणजे.. अर्रररररर…. घरी वाट बघत असलेल्या बायकोची आठवण झाली आणि सार्‍या स्वप्नरंजनाला तिथेच ब्रेक लागला !

.
.
.

संध्याकाळच्या चहाबरोबर घडलेला किस्सा बायकोला चवीचवीने सांगायला घेतला. मुलगी दिसायला जितकी छान होती त्यापेक्षा जास्त रसभरीत वर्णन रंगवले. माझी झालेली फजिती सांगायला लाजलो नाहीच, तर शेवटाचे तिचे हसणे, शक्य तितका मुद्राभिनय करून दाखवले.. त्या हसण्यात बायकोनेही आपले हसणे मिसळले, आणि म्हणाली…, “आता काय बाबा, रोज रोज तीच ट्रेन, तोच डब्बा…” .. आणि आम्ही दोघेही खळखळून हसायला लागलो.. हेच तिचे मला आवडते.. माझ्यावर डोळे झाकून, विश्वास टाकून माझा विश्वास जिंकते.. माझ्या विचारांची साखळी पकडून माझ्या डोक्यात शिरते अन बघता बघता थेट मनात घर करते.. आयुष्यात घडणारे आंबटगोड किस्से, तिच्या जोडीने चघळणे.. स्सालं सुख म्हणजे आणखी काय असते..

– तुमचा अभिषेक

 

ती आणि मी – सुख म्हणजे आणखी काय असते.. (४)

२० जुन २०१३

आजकाल आमच्या घडाळ्यात साडेदहा वाजले की माझ्या डोक्याचे सव्वाबारा वाजतात.. त्यावेळी आमच्या टीवीवर एक सिरीअल लागते जी मला “बडी बोअर लगती है” .. न बघणे हा पर्याय संपुष्टात येतो कारण माझी आई आणि बायको.. दोघींनाही ती “बडी अच्छी लगती है” .. जेवायची आमची वेळही साधारण हिच असल्याने आणि जेवायची जागाही अर्थातच टिव्हीसमोर असल्याने इच्छा नसूनही बघावीच लागते. सासूसुनेच्या भांडणात पुरुष बिचारा मधल्यामध्ये मरतो असे म्हणतात खरे, पण जेव्हा याच सासूसुनेची युती होते तेव्हा जगणेही मुश्किल होते हा अनुभव मी गेले काही दिवस या मालिकांमुळे घेतोय. त्या सार्‍यांवर भाष्य न केलेलेच बरे पण आज मात्र माझा संयम सुटला !

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला., माझ्यासारख्या हाडाच्या क्रिकेटप्रेमीसाठी किती आनंदाचा हा क्षण.. मला फायनल स्कोअरबोर्ड बघायचा होता, झटपट हायलाईटस बघायची होती, बक्षीस समारंभाचा कौतुकसोहळा याची देही याची डोळा बघून, त्यानंतर एक्स्ट्रा इनिंगमध्ये अभिमानाने ऊर भरून येईस्तोवर कान तृप्त होईस्तोवर एक्सपर्ट कॉमेंट ऐकायच्या होत्या, पण….. विजयी चौकार लगावताच दुसर्‍याच क्षणाला… अरे अरे तो बॉल सीमापार तर जाऊदे म्हणेस्तोवर.. चॅनेल बदलला गेला होता !

संताप, चीडचीड, राग… अन सरतेशेवटी नेहमीचीच हतबलता..! येण्याच्या आधीच मी माझा निर्णय जाहीर केला, “मी हि सिरीअल चालू असताना जेवणार नाही, संपल्यावरच जेवेन” .. आणि आई पाटपाणी घेईस्तोवर बेडरूममध्ये निघून आलो, पण मागे वळून पाहता.. बेडरूमच्या दारात पाठोपाठ बायको हजर.. अन कंबरेवर हात ठेऊन उभी असल्यासारखी तिची मुद्रा..!

माझ्या बायकोचा राग म्हणजे राणीबागेतला वाघ..!
पिंजर्‍याबाहेर अचानक आला तर जशी तंतरेल तसेच काहीसे माझे झाले, मुकाटपणे मागे फिरलो.. पण डोके अजूनही गरम आणि पोटात भुकेने आग.. दोहोंना थंड करायचा एकच उपाय म्हणून अंड्याचे ऑमलेट आणि चार चपात्या घेऊन माझे ताट उचलले अन पुन्हा बेडरूमचा रस्ता धरला. तुम्ही खुशाल बाहेर बसून तुमची सिरीअल बघा, मी माझा आत कसा ते जेवतो !

खिडकीत उभा राहिलो की माझा नेहमीच छान मूड बनतो, म्हटलं आज तिथे जेऊनही बघूया.. दहाव्या मजल्यावरच्या ग्रिल नसलेल्या खिडकीत जेवायला बसणे तसे रिस्कीच, म्हणून एक पाय आत तर एक खिडकीच्या कठड्यावर पसरला, मांडीवरच ताट घेतले आणि सुरू झालो.. पाऊस नव्हता, पण गार वातावरण आणि थंड वारा.. पहिल्याच घासाला जाणवले की ही बैठक खासच आहे, एवढे कम्फर्टेबल एखाद्या वातानुकुलित उपहारगृहामध्ये वाटू नये. एखाद्या हिलस्टेशनवरील अगदी दरीच्या टोकाला वसलेल्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये जेवतोय असे वाटत होते. एखाद्या बिल्डर किंवा आर्किटेकला अशी खिडकी कम डायनिंगची अभिनव कल्पना द्यायला हवी या विचारात, चार चपात्या चौदा घासांत कधी संपल्या समजलेही नाही. पण आज अन्नपुर्णा देवी माझ्यावर प्रसन्न होती. लागलीच बायको स्वताहून भात घेऊन हजर झाली. मला माकडासारखे खिडकीत बसलेले पाहून खळखळून हसली. त्याच खिडकीत मग थोडीशी जागा तिच्यासाठीही बनवली, ती देखील गप्पा मारत तिथेच रमली. ईतकेच नव्हे तर जाहिरातींचा ब्रेक संपून पुन्हा तिची सिरीअल सुरु झालीय हे देखील विसरली.. परीणामी नेहमीपेक्षा चार घास जास्तच जेवलो.. कधी नव्हे तो ढेकर आला.. कधी नव्हे ते खरकटे हात घेऊन बराच वेळ त्याच खिडकीत तिच्याशी गप्पा मारत तसाच बसून होतो.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.
.

१६ जुन २०१३

दहाव्या मजल्यावरील आमच्या घरकुलाचा मला भारीच अभिमान, पण गेले दोन दिवस त्या घरकुलाचा किल्ला झाला होता, ज्यात आम्ही अडकलो होतो. अर्थात सहपरीवार.. अन पुरेशी रसद होती सोबतीला, पण मन मात्र राहून राहून भरारी घेत होते अन न भिजताच परतत होते. पाऊस नुसताच आभाळ फाटल्यागत कोसळत होता. पावसाची एखादी सर यावी अन जावी.. पटकन तेवढ्यात जमेल तसे भिजून घ्यावे.. धो धो सुरुवात झाली अन सतत तेच ते बघत राहावे लागले तर नजर मरते तिथे भिजण्याची इच्छा कशी तगणार.. नेमके तेच होत होते, शनिवार घरात बसून काढला, रविवारची संध्याकाळही मावळत आली.. सोमवारी ऑफिसला जायची इच्छा खिडकीबाहेर नजर जाताच मरत होती.. सुटी म्हणजे रिफ्रेशमेंट, सुटी म्हणजे तेच ते पेक्षा काहीतरी वेगळे , पण गेले दोन दिवस अश्यातले काही घडले नव्हते.. पावसाने एखादा क्रिकेटचा सामना थांबवावा आणि खेळाडूंनी जिथे मैदानावर असायला हवे तिथे तंबूत बसून समोर मैदानाचे तळे झालेले बघत बसावे, अशीच काहीशी तगमग अनुभवत होतो..

पावसाचे एक रूप ओंगळवाणेही असते, पावसाचा एक मूड उदासीनही असतो.. अश्यावेळी ओढ लागते ती सुर्यप्रकाशाची.. ज्याला पश्चिमेने केव्हाच गिळंकृत केले होते.. ढगांची दाटी ही अशी होती, की आकाशाचा तळ दिसू नये.. पण सुदैवाने पावसाची रिपरिप थांबली, तसे याची वाटच बघत असलेलो आम्ही नाक्यावर सहज चक्कर टाकायला म्हणून बाहेर पडलो.

रस्ते अजूनही ओलेचिंब भिजलेले, अन आम्ही कोरडे ठाक.. म्हणूनच की काय चालताना बंध जुळत नव्हते, काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते.. चिखलपाणी, छोटेमोठे डबके चुकवत.. ताडपत्री लाऊन उभारलेल्या वडापाव अन कांदाभजीच्या गाड्या, भूक चाळवत असूनही पावसापाण्याचे बाहेरचे नको म्हणून नजरेआड करत.. मात्र तीच नजर गरमागरम भाजलेली मक्याची कणसे हुडकत, भिरभिरवत, आम्ही नेहमीपेक्षा वेगळा रस्ता पकडला.. आता उतरलोच आहोत खाली तर काहीतरी खरेदी करून जावी, असे वाटेतले सहकारी भंडार बघून वाटून तर गेले, मात्र तेथील गर्दी पाहता ते वाटणे तेवढ्यापुरतेच उरले.. पावसाने उसंत घेतली तसे सारा गाव तिथे लोटला होता.. पण अजूनही आम्ही मात्र या पाऊसपाण्यात खाली उतरून योग्य निर्णय घेतला असे कोणी भासवत नव्हते..

लांबसडक एकाच रेषेत जाणार्‍या त्या रस्त्याच्या साधारण मध्यावर पोहोचल्यावर आम्ही परतायचा निर्णय घेतला. पाऊस कोणत्याही क्षणी परत चाल करून येईल अशी परिस्थिती होती आणि ढाल म्हणून आम्ही दोघांत केवळ एक छत्री घेतली होती. परतताना मात्र तोच तो रस्ता पुन्हा पायाखाली नको म्हणून समोरच्या फूटपाथवरून चालायचे ठरवले.. चालता चालता अचानक तिची पावले मंदावली.. अश्यावेळी तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांचा मागोवा घ्यायचा असतो हे मी जाणून होतो.. आवडीचे काही दिसले कि नेहमी तिच्यातील लहान मूल बाहेर येते, अन बालहट्टापुढे राजाचेही काही चालत नाही.. पण समोरील बेकरीच्या भट्टीतून ताजे ताजे बाहेर पडणारे पॅटीस पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटले. आई कधीतरी इथले पॅटीस घेऊन यायची म्हणून चवही तोंडपाठ होती. एकेक आम्ही खाल्ले तर दोन घरच्यांसाठी म्हणून बांधून घेतले, अन पाण्याची तहान आईसक्रीमवर भागवायचे ठरवले.. खरे तर आईसक्रीम हा माझ्या खास आवडीचा असा प्रकार नाही पण तिचे एकेक चमचा भरवत राहाने.., आता बस झाले, असं बोलावसं कधी वाटत नाही.

तिथून परतताना मात्र एक सर आली.. जेव्हा घरकुल शंभर पावलांवर आले होते, हलकीशी बुंदाबांदी सुरू झाली.. गवतावर जसे दवकण तसे चमचमणारे थेंब हळूहळू तिच्या केसांवर जमू लागले.. ते पुरेसे टपोरे होईपर्यंत छत्री उघडायचा प्रश्नच उदभवत नव्हता.. जितकी भिजायची इच्छा, तितकाच बरसणारा पाऊस.. एका हातात तिचा हात आणि दुसर्‍यात मिटलेली छत्री.. थंड होत जाणार्‍या वातावरणात गारेगार आईसक्रीम.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते..

– तुमचा अभिषेक

 

ती आणि मी – सुख म्हणजे आणखी काय असते.. (३)

१० जुन २०१३

ती नेहमी मला बोलते, जेव्हा तू मला भेटतोस, हसत नाहीस.. जसा लग्नाआधी हसायचास.. जेव्हा लांबूनच बघायचास.. नजर पडताच खुलायचास.. आता तिला कसे समजवू, उगाच हसता येत नाही मला, आणि कृत्रिम हसायला तर मुळीच जमत नाही.. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती.. आता तुला भेटणे आणि तुझ्याबरोबर घरी जाणे रोजचेच आहे.. रोज तशीच तूच दिसणार हे ठाऊक आहे.. मग का उगाचच ते औपचारीक हसणे.. पण.., गेले दोनचार दिवस मात्र हे रुटीन बदलले होते.. तिच्या कॉलेजला सुट्ट्या, तर घर ते ऑफिस माझ्या एकट्याच्या वार्‍या.. आजही एकटाच होतो.. आणि ती कसल्याश्या कामासाठी बोरीबंदरला गेली होती.

ऑफिसातून निघता निघता आठवले, श्या..! दुपारच्या गोळ्यांचा डोस घ्यायचाच विसरलो.! तिचा आठवणीचा फोन जो नव्हता आला. आता ट्रेनमध्येच घेऊया म्हणत पटपट आवरून बाहेर तर पडलो, पण पुन्हा एकदा.. श्या..! वरतून पाऊस कोसळत होता आणि बॅगेतली छत्री काही सापडत नव्हती. ऑफिसमध्ये सुकायला टाकलेली.. तिथेच राहिली.. तिचा फोन आला असता, तर नक्कीच छत्रीचीही आठवण केली असती.. चरफडतच मागे फिरलो, छत्री घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी, बस्स पाऊस तेवढा थांबला होता.. अश्यावेळी हे चांगले झाले की वाईट, कळत नाही.. पण फायदाच झाला, पावले झपझप टाकत स्टेशनला पोहोचलो.. ट्रेन माझीच वाट बघत ताटकळत उभी होती.. मलाही तिच्यासोबत उभेच राहावे लागले.. कधीतरीच घडते असे, पण तेव्हाच बसायची जास्त गरज भासते.. नाहीतर कधीकधी अख्खी ट्रेन रिकामी, आणि मी दाराला लोंबकळत असतो..

तासाभराचा प्रवास, वीसएक मिनिटात बसायला मिळेल याची खात्री.. तोपर्यंत हिला फोन लावला, तिचा आवाज तर नाही पण गाण्याचा आनंद घेतला.. पुन्हा पुन्हा तेच गाणे, पुन्हा पुन्हा तेच कडवे.. कितींदा ऐकायचे.. श्या..! नाद सोडून दिला शेवटी, कामासाठीच गेली होती, बिझी असेल.. पण नेमके तेव्हाच तिच्याशी बोलायची जास्त गरज भासते, गर्दीतही एकटे एकटे वाटते..

पाऊस थांबून बराच वेळ झाला होता, उकाड्याने घामाच्या धारा अंगातून बरसत होत्या. सरीवर सरी, कानशिलापासून मानेपर्यंत.. श्या..! वातावरणही किती पटकन पलटते.. पुन्हा पलटले.. वाशीला बसायला जागा मिळाली, खिडकीपासून दुसरी.. थोडाफार थंड वारा माझ्याशीही खेळू लागला, अन तिचा फोन.. काम आटोपून सीएसटी स्टेशनला उभी होती.. ती डॉकयार्ड स्टेशनला पुढील दहापंधरा मिनिटांत पोहोचणार होती, तर मला तब्बल चाळीस मिनिटे लागणार होती.. तू हो पुढे बोलत मी फोन ठेवला, आता झोपणे हा एकच टाईमपास माझ्याकडे उरला होता.. एकटे असताना डोळे मिटून स्वप्नरंजन करणे.., माझ्या आवडीचा टाईमपास.. अश्यातच कधीतरी डोळा लागतो अन वेळ भर्रकन जाते.. पण श्या..! आज येणार्‍या प्रत्येक स्टेशनला डोळा उघडत होता.. वडाळ्याला पुन्हा तिचा विचार मनात आला.. एव्हाना घरी पोहोचली देखील असेल.. मग पुन्हा झोपच नाही..

डॉकयार्ड आले.. आळसावलेल्या अवस्थेतच, यांत्रिकपणे उतरलो. पुढची दहा-बारा मिनिटे आता ती जड झालेली पावले उचलत घर गाठायचेय, या विचारानेच डोकेही जड झाले.. आणि पुन्हा एकदा.. श्या..! समोरच्याच बाकड्यावर बसलेली ती मला दिसत होती, वेडी घरीच गेली नव्हती.. जवळपास अर्धा तास तिथेच माझी वाट बघत होती.. वैतागायचे नाटक मी पुरेपूर वठवले, शक्य तितके तोंडसुख घेतले.. पण ती मात्र हसतच होती.. ती नजरेस पडताच माझा खुललेला चेहरा, दुरूनच तिने पाहिला होता.. अगदी उत्स्फुर्तपणे आणि अगदी आतून आलेल्या त्या फिलींग्स.. नेमक्या तिला जाणवल्या होत्या.. आपल्यासाठी कोणी थांबलेय याचा आनंद, कोणासाठी आपण स्पेशल आहोत असा फील देणारा हा आनंद, कॅश करायला म्हणून अन तिचे थांबने वसूल करायला म्हणून.. मुद्दामच लांबच्या रस्त्याने फिरून जाणे, अन वाटेत तिच्या आवडीची पाणीपुरी खाणे.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते !

.
.
.

१४ जुन २०१३

संध्याकाळच्या चहात एक जादू असते. दिवसभराच्या कामाचा अन ऑफिस ते घर प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे पळवणारी. तरतरी तर येतेच, पण मूडही बदलवून जाते. आजही बदलला.. नेहमीसारखाच.. त्यालाच साजेसा सूर पकडला अन शब्द शोधायला सुरुवात केली..
“क्यूs.. ना रुठे मुझसे मोहन क्यूs.. है झुठे मुठे मोहन क्यूss.. कैsसे बताऊs, हाईsय कैसे बताऊs….”
मूळ गाण्यातला मूड जरी उदासीनता दर्शवणारा असला तरी मी मात्र माझ्या मूडनुसारच गात होतो.. आपल्याच नादात.. आपल्याच तालात.. अन इतक्यात..
“माकडा, वाट लावलीस त्या गाण्याची, सगळे तोडमरोडून टाकलेस.. ‘ना रुठे मुझसे मोहन क्यू’ कधी कोणी बोलेल का..?” .. बायको गरजली.
“त्यात काय झाले.. असेल एखादा मोहन सतत बडबड बडबड करणारा.. त्यावर त्याची राधा की मीरा वैतागून बोलतही असेल, रुठ बाबा एकदाचा, तेवढाच तुझ्या तोंडाचा पट्टा तरी थांबेल.” .. मी माझ्या अकलेचे तारे तोडले.
“मार खाशील हा अबड्या” .. हा आजवर कधी पडला नाही, पण इथे नमते घ्यायचे हे सवयीने समजलेलो मी, “ठिक आहे, मग तूच सांग काय ते खरे गाणे..”
आता ती सुरू झाली..
“क्यूs.. ना बोले मोसे मोहन क्यूs.. है रुठे रुठे मोहन यूss.. कैsसे बताऊs, हाईsय कैसे बताऊs…”
अचूक शब्दांत अन सुरेल चालीत.. तिच्याच नादात, तिच्याच तालात.. पहिली ओळ संपून दुसरी सुरू झाली..
“बहे नैना, भरे मोरे नैनाs, झरे मोरे नैनाss…”
पहिले कडवे आटोपून दुसरे गायला लागली, अन मी समजून चुकलो की माझ्या चुकलेल्या गाण्याचा निशाणा अचूक लागला आहे.
ते गाणे संपताच त्याला दाद न देता… तिचे गाणे मी ऐकतोय याची तिला दाद लागू न देता… स्वताशीच आणखी एक गुणगुणायला सुरूवात केली..
ओs साथी रेs.. दिनs डुबे नाs… विशाल भारद्वाज यांचे हे गाणे तिच्या खास आवडीचे., हे माहीत होते मला.. ती गातेही छान., हे ही ठाऊक होते मला.. तर, हा ही निशाणा अचूक लागला. त्या गाण्याने बनवलेला मूड हलकेच बदलत “रात का नशा अभी, आंख से गया नही..” मी तिला सुरू करून दिले.., तर ते संपताच “गुंजासा है कोई, इकतारा इकतारा” तिने स्वत:च सुरू केले.. हि संधी साधून मी बेडवर तसेच टाकलेले शर्ट, जे गाण्याच्या नादात अजून तिच्या लक्षात आले नव्हते, गपचूप उचलून हॅंगरला लावत.. अगदी सहजच .. ‘पाणी दा रंग वेख के’ घेतले.. त्यातील मुद्दामच हावभाव करत गायलेल्या ‘तेरे उत्ते मरता, प्यार तेनू करता, मिलेगा तुझे ना कोई और’ … या कडव्याला ती हसत हसतच लाजली.. अन सुरु झाले.. नैनो की मत मानियो रे, नैनो कि मत सुनियो.. नैनो कि मत सुनियो रे, नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे.. पण नेमके तेच घडत होते.. हळूहळू रंगत जाणारी एक सुरमयी संध्याकाळ.. त्या सूरांच्या नजरकैदेत बांधले गेलेलो मी आणि ती.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.

– तुमचा अभिषेक

 

ती आणि मी – सुख म्हणजे आणखी काय असते.. (२)

८ जुन २०१३

पहिल्या पावसाची चाहूल लागल्यापासून बायकोचे कुठेतरी लांबवर फिरायला घेऊन चल चालूय.. तिचेही खरेच आहे.. पावसाळा हा काही खिडकीतून बघायचा उत्सव नाही.. कडाडणारी वीज अन गडगडणारे ढग.. घरबसल्याच धडकी भरवतात.. जणू काही शत्रू अंगावर चाल करून येतोय.. पण मैदानात उतरायचे ठरवल्यास तेच जोडीदार बनून राहतात.. तरीही लांबवर कुठे जायचे म्हणजे वेळ हवा, सुट्टी हवी.. पैशाचेही सोंग काही घेता येत नाही.. जमेल तेव्हा जाऊच, पण आजची संध्याकाळ भाऊच्या धक्क्यावर घालवूया म्हणालो.. हो ना करता झाली तयार..

भाऊचा धक्का..! टॅक्सी पकडली की मीटर पडायच्या आधी येते.. तरीही चार सहा महिने वर्षातूनच जाणे होते.. ते ही एखाद्याला कौतुकाने दाखवताना, म्हणे बंदर आमच्या इथून हाकेच्या अंतरावर आहे. आज त्या हाकेला ‘ओ’ द्यायला निघालो.. समुद्राच्या खार्‍या वार्‍याशी स्पर्धा करणारा सुक्या मच्छीचा वास.. नाकाभोवताली दरवळू लागला आणि घरापासून दूरवर, वेगळ्याच प्रांतात प्रवेश केलेसे वाटू लागले.. शाकाहाराचे व्रत घेतलेल्या माझ्या बायकोलाही त्या गंधाने तरतरी आली., हि देखील त्या वातावरणाचीच एक जादू.. धक्क्याला लागलेल्या प्रवासी बोटी, मच्छीमारी होड्या अन दूरवर क्षितिजाला दिसणारी मालवाहू जहाजांची रांग.. बघत बघतच आम्ही एक सोयीचा बाकडा पकडला, बंदराच्या त्या एका टोकाला जिथे तिन्ही बाजूंनी वारा मुद्दामच आमच्या अंगावर म्हणून कोणीतरी फेकतोय असे वाटावे.. समोरच दिसणार्‍या बोटीवर धावत जाऊन उडी मारावी अन या बोटीवरून त्या बोटीवर, जणू काही टारझन नाही तर स्पायडरमॅन अंगात संचारल्यासारखे कित्येकदा मनात येऊन गेले.. पण पुढच्याच क्षणाला त्या पलीकडे पसरलेल्या विशाल समुद्रावर नजर जाता, बसल्याजागीच सार्‍या कल्पना थिजत होत्या.. पण तिथे तसेच बसण्यातही एक मजा होती. अंगाला झोंबणारी थंड वार्‍याची लाट नकळत दोघांमधील अंतर मिटवत होती.. तळहातांची पकड सैल होता होता परत घट्ट होत होती.. संध्याकाळी जसे एकेक करत पक्ष्यांनी आपापल्या घरट्याकडे परतावे तसे एकेक बोट धक्क्याला येऊन लागत होती. एक., एकामागून दुसरी., मागाहून तिसरी.. पाण्यावर हिंदकळणार्‍या बोटींना पाहता, वर खाली, वर खाली.. श्वासही नकळत त्याच तालावर घेतला जात होता, ईतकी एकरुपता त्या सभोवतालच्या वातावरणाशी झाली होती.. हळूहळू बंदरावर पेट घेणार्‍या पिवळ्या दिव्यांचा प्रकाश संधीप्रकाशावर भारी पडू लागला, तेव्हा कुठे वेळेचे भान आले. घरी जायची नाही, तर भेळ खायचे विसरलोय याची आठवण झाली.. दोघांत एक शेवपुरी अन दोघांत एक भेळ.. हे समुद्राच्या साथीनेच खाण्यात मजा का येते हे गणित तिथे गेल्यावरच सुटावे.. बसल्या बसल्या मोबाईलच्या कॅमेर्‍याने क्लिकलेल्या फोटोंना बघतच आम्ही तिथून उठलो, पण डोळ्यांनी टिपलेल्या दृष्यांची प्रिंट मात्र मनातच जपायची होती.. अनुभवलेले क्षण मात्र जमतील तसे कागदावर उतरवायचे ठरून निघालो तर खरे, पण अजूनही काहीतरी राहिल्यासारखे वाटत होते..

दोनचार बस आमची वाट बघत बंदराच्याच आगारात उभ्या होत्या, ओळखीचा नंबर बघूनच एकीत चढलो.. पुर्ण बस रिकामी अन आत अंधाराचे साम्राज्य, एक सिंहासन पकडून आम्ही विराजमान झालो.. बसच्या टायरच्या अगदी वर असणारी सीट इतरांपेक्षा जरा उंचावर असते., माझ्या आवडीची, खरोखरच सिंहासनावर बसल्याचा अन सर्व प्रवाश्यांचा लीडर असल्याचा फील देणारी.. आज अनायासेच मिळाली, अन सोबतीला एकांत.. त्या अंधारात आपण दोघेच आहोत हे स्वत:लाही समजू नये म्हणूनच की काय आम्ही अबोलच बसलो होतो.. त्या शांततेचा भंग समुद्रालाही करायचा नसावा, वार्‍याच्या घोंगावण्याने निर्माण होणारे संगीत तेवढे कानावर पडत होते, पण अजूनही काहीतरी राहिल्यासारखे वाटत होते.. अन इतक्यात.. अचानक.. टप टप टप करत बसच्या टपावर आवाज येऊ लागला.. वाढता वाढता वाढतच गेला.. समुद्र वारा पावसाच्या धारा.. ती आणी मी फक्त, बसच्या अंधारात.. आकाशात तेवढी एक वीज चमकून आली.. मावळता मावळता एक संध्याकाळ उजळून निघाली.. स्साला सुख सुख म्हणजे आणखी काय असते..

– तुमचा अभिषेक

 

ती आणि मी – सुख म्हणजे आणखी काय असते.. (१)

२९ मे २०१३

आज ऑफिसमधून घरी आलो, बॅग फेकली, कपडे भिरकावले, बाथरूममध्ये जाऊन झटपट शॉवर घेतला, तोपर्यंत माझा चहा रेडी होता. बस तो हातात घेऊन माझ्या नेहमीच्या जागेवर म्हणजे हॉलमधील भल्यामोठ्या खिडकीसमोर आरामखुर्ची टाकून बसलो, पाय पुढे पसरवून त्या खिडकीच्या कठड्यावर टेकवले अन लांबवर दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेल्या मुंबईकडे पहात, जिच्यासमोर एअर कंडीशन सुद्धा झक मारेल अश्या दहाव्या मजल्यावरील आमच्या खिडकीतून आत शिरणार्‍या वार्‍याच्या थंडगार झुळकीचा आनंद घेत हातातल्या कॉफी मगातील गरमागरम चहाचे घोट मारत…. बस्स ती पंधरा-वीस मिनिटे.. बायकोही खिडकीला रेलून उभी, सोबतीला, तिच्या बरोबर मारल्या जाणार्‍या इकडच्या तिकडच्या गप्पा अन हलकेफुलके विषय.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते.

.
.
.

३१ मे २०१३

काल महिन्याभराने गालावरचे केस साफ केले आणि माणसात आलो. आरशात स्वतःचे रुपडे पाहिले अन तेव्हाच समजले, आजचा दिवस खासच जाणार. बायकोला मी कसा दिसतो हे विचारणे आणि तिने छान दिसतोयस हे सांगणे, रोजचेच आहे. खरी मजा आहे तिने स्वताहून सांगण्यात. आज नेमकं तेच झाले. नेहमी मी तिच्यामागे माझा एखादा फोटो काढ म्हणून लागत असतो पण आज सकाळी तिनेच आणखी एक आणखी एक करत उशीर करवला. तिच्या नवीन घेतलेल्या मोबाईलचा हाई मेगापिक्सेल कॅमेरा हे केवळ एक निमित्त होते. ऑफिसमध्येही कौतुकाच्या नजरा झेलतच दिवस गेला. एक दोन नजरा लाजल्याही. त्या तेवढ्या वगळता घरी गेल्यावर बायकोला सारा वृतांत दिला, की आज ऑफिसला सारे कसे तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ चालू होते. तिनेच मग सकाळच्या फोटोचा विषय काढला. म्हणाली, छानच आलाय, उगाच ती दाढी वाढवतोस, कॉलेजगोईंग स्टुंडट वाटतोयस फोटोत. माझी सर्वात आवडती कॉम्प्लीमेंट, न मागता समोरून आली. छाती दोन इंच पुढे अन पाय चार ईंच हवेत. पुढचे चारचौघांत सांगण्यासारखे नसते, पण स्साले सुख म्हणजे आणखी काय असते..

बस्स आता इथे एखाद्याने विचारावे, अभ्या तो फोटो तर दाखव, म्हणजे सुखाचे एक वर्तुळ पुर्ण होईल !

.
.
.

१ जुन २०१३

पाच दिवस ऑफिसमध्ये, बसून बसून राबल्यावर, येणारा सुट्टीचा शनिवार हल्ली बेडरूममध्ये झोपण्यातच जातो. आज मात्र आम्ही दिवाणखान्यावर कब्जा केला.. आईवडील कोण्या नातेवाईकांच्या लग्नाला गेले असल्याने संध्याकाळपर्यंत घरावर आम्हा दोघांचेच राज्य होते.. मिळून बनवलेले ब्रेडबटर, कडक चहाच्या साथीने अन टीव्हीवर बारा वाजताचा मॅटीनी शो – दिल तो पागल है. कित्येक वर्षांनी, कितव्यांदा ते आता आठवत नाही.. तसा वरचेवर लागत असतोच, पण आज चॅनेल बदलून पुढे जावेसे वाटले नाही. ना बायकोने तो हट्ट धरला.. काही सिनेमे काही ठराविक वेळीच बघण्यात मजा असते. हा त्यापैकीच एक, अन आज तश्यातलीच वेळ.. पुन्हा एकदा शाहरुखच्या प्रेमात पडलो. माधुरीच्या तर सदैव होतोच.. कोई लडकी है, जब वो हसती है.. गाणे सुरू झाले अन पायाने सहज ठेका धरला. तसा तो नेहमीच धरतो, पण आज अख्खा हॉल मोकळा मिळाला होता.. अचानक अंगातला शाहरुख बाहेर आला अन बघता बघता सहज ठेक्याचे रुपांतर नाचात झाले.. हे ही वरचेवर होतेच, पण आज सोने पे सुहागा म्हणजे बायकोनेही साथ दिली.. गाणे संपले अन जाहीरात लागली, पण मूड बदलू द्यायचा नव्हता. चॅनेल चेंज केला तर एक लडकी भिगी भागीसी.. शाहरुखचा किशोर कुमार व्हायला कितीसा वेळ लागणार होता. पुढच्या पाचदहा मिनिटांत रणबीर कपूरही येऊन गेला.. त्याच तालावर खुंटीवरचे टॉवेल खेचून बायकोने बाथरूममध्ये पिटाळले.. नच बलिये संपले अन सारेगामापा सुरू झाले.. फुल जोश अन फुल्ल फॉर्मात.. स्साले सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.
.

३ जुन २०१३

आज संध्याकाळी नेहमीसारखे वाशी स्टेशनवर बायकोला पिकअप केले अन ट्रेन पकडली.. ठरलेली ट्रेन अन ठरलेली जागा.. रिकामे कंपार्टमेट अन खिडकीतला वारा.. पण आज वार्‍याबरोबर पावसाचे तुषारही चेहर्‍यावर थुडथुडत होते.. खिडकीसाठी आपसात भांडून झाल्यावर.. अन भांडणात नेहमीसारखेच हरल्यावर, मी मुकाट दारावर उभा राहायला गेलो.. वाशी खाडीच्या पूलावरून धडधडत जाणारी ट्रेन, अन दोन्ही बाजूला पसरलेला गोलाकार समुद्र.. नेहमीची निश्चलता विसरून पार खवळून उठला होता.. खिडकीतून त्याचे रौद्र रुप डोळ्यात सामावणे अशक्यच, म्हणून बायकोही उठून दारावर आली अन मला हरलेल्या भांडणातही जिंकल्यासारखे झाले.. वार्‍यावर भुरभुरणारे तिचे कुरळे केस, त्यांना सांभाळू की स्वताला सांभाळू.. एस्सेलवर्ल्डची राईडही झक मारेल, अशी ही आमची मुंबई लोकल ट्रेन.. आता तीनचार महिने रोजच नशिबी असणार आहे.. स्साले सुख म्हणजे आणखी असते काय..

.
.
.

५ जुन २०१३

काल संध्याकाळी पुन्हा पावसाने गाठले.. या मोसमातील हा तिसरा पाऊस.. की चौथा.. काय फरक पडतो.. पहिल्या दुसर्‍यातील नवलाई तशीही ओसरली होतीच.. ट्रेनमध्ये होतो तोपर्यंत काही वाटले नाही, पण स्टेशन जवळ येऊ लागले तसे कपाळावर चिंतेची एक लकेर उमटली.. तेच कपाळ जाळीच्या खिडकीला टेकवून वर आकाशावर नजर टाकली.. काळवंडलेल्या प्रतलाकडे पाहून काही समजत नसले तरी तोंडावर झालेल्या टपोर्‍या थेंबांचा मारा हवे ते सांगून गेला.. डॉकयार्ड आले तरी पावसाचा जोर काही ओसरला नव्हता.. पहिल्या पावसात भिजण्याच्या आनंदात छत्री शोधायचे नेहमीच राहून जाते.. अन मग दुसरा पाऊस असा खिंडीत पकडतो.. एका हाताने पॅंट आणि एका हाताने बायकोला सांभाळत, उतरणीच्या जिन्याने स्टेशनबाहेर पडलो खरे, पण इथून खरा प्रश्न सुरु होत होता ते चिखलपाण्याचा रस्ता तुडवत घरी जायचे कसे. टॅक्सीचे डबल भाडे देण्याची तयारी असूनही ती मिळणार नव्हतीच, नशीब तेवढे चांगले की मुसळधार पावसाची जागा रिमझिम बुंदाबांदीने घेतली होती. मनाचा ठिय्या करून चालायला सुरुवात केली, तो इतक्यात फोन खणखणला.. ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग.. अभि’ज मॉम कॉलिंग.. येताना दूध आणि हार घेऊन यायचा आदेश.. आता बाहेरून फिरून जावे लागणार म्हणून बायकोची चिडचिड.. पण माझे विचार मात्र आता बदलले होते, असेही कमीजास्त भिजणारच आहोत तर का नाही पुर्णच भिजण्याचा आनंद घेत जावे.. तोच रस्ता अन तोच पाऊस, बघण्याची नजर बदलली अन वेगळाच भासू लागला.. दोनचार पावले चपचप करून पाय आपटत काय चाललो., मुद्दामच., अन चिखलाचेही अप्रूप वाटेनासे झाले.. बायको मात्र अजूनही वेगळ्याच ट्रॅकवर चालत होती.. समांतर असूनही न मिळणारा.. खेचूनच तिला भटाच्या टपरीवर नेले.. उकाळ्याचा तो वास, अन सैरावैरा सुटलेली वाफ., भिजलेल्या गर्दीतही उत्साह पेरायची किमया करून जात होती.. हिचाही मूड बदलला नसता तर नवलच.. दोन हातात दोन कटींग, गर्दीतून वाट काढत मी.. फूटपाथकडेच्या झाडाचा आडोसा पकडला. पावसाची रिपझिप थांबली होती मात्र हवेने गारवा पकडला होता.. अगदी रोमँटिक की काय म्हणतात तसले वातावरण., बस ती आणि मी.. सोबतीला होते ते झाडावरून ओघळणारे अन चहाच्या पेल्यात विरघळणारे, पावसाचे टपोरे थेंब.. पाण्यात विरघळणारी ती आणि तिच्यात विरघळणारा मी.. स्साले सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.
– तुमचा अभिषेक

 

साधीशीच माणसं ..

सकाळी नेहमीपेक्षा वीसेक मिनिटे उशीराच घराबाहेर पडलो. ऑफिसला जायचे नसून ऑफिसच्याच कामासाठी इतरत्र जायचे होते. पुढची ट्रेन पकडायला हरकत नव्हती म्हणून बिछान्यातच पंधरा-वीस मिनिटे जास्तीचा मुक्काम ठोकला. तयारी मात्र नेहमीच्याच वेगाने झरझर आटोपून, मोबाईलमध्ये ट्रेनचा टाईम आणि आता झालेली वेळ, दोन्ही चेक करून रमतगमत चाललो तरी वेळेच्या आधी स्टेशनवर पोहोचेन अश्या हिशोबाने निघालो. पावले मात्र सवयीनेच झपझप पडू लागली, नव्हे किंचित जास्तच उत्साहाने. याचे एक कारण म्हणजे नेहमीच्याच त्याच त्या रूटीनमधल्या ऑफिसला जायचे नव्हते, आणि दुसरे म्हणजे पंधरा मिनिटांची एक्स्ट्रा झोप घेता आली या समाधानानेच एक छानशी तरतरी आली होती. भमरसिंग मिठाईवाल्याच्या गरमागरम समोश्यांचा वास छान पैकी नाकात भरून घेत, पुढील टपरीवरून सुटणार्‍या चहाच्या वाफा अंगावर झेलत पुढे पास झालो इतक्यात मागून सहजच एक आवाज आला, “अरे आपल्याइथे कुरीअरवाला कुठेय माहीतीये का रे?”

आपल्याच नादात रस्त्याने जात असताना अचानक समोरून कोण्या अनोळखी माणसाने पत्ता विचारला की माझा नेहमीच गोंधळ उडतो. मला शाळाकॉलेजमध्ये तोंडी परीक्षांची कधी भिती वाटली नव्हती एवढी या चौकश्यांची वाटते. त्या शाळेतल्या तोंडी परीक्षेला निदान मी घरून अभ्यास तरी करून गेलेलो असायचो, पण इथे मात्र कोणीतरी अचानक आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न विचारला आहे असे वाटते. तसे पाहता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे, किंबहुना ते आलेच पाहिजे अशी काही गरज नसते, तरीही “माहीत नाही” किंवा समोरून प्रश्न इंग्रजीत आला असेल तर “आय हॅव नो आयडीया” म्हणतानाही एक अपराधीपणाची भावना उगाचच माझ्या मनात दाटून येते. एवढेच नाही तर ती मला चेहर्‍यावर केविलवाणे भाव आणून मुद्राभिनयाद्वारे दाखवावीशीही वाटते. अश्यावेळी जेव्हा मी माझ्या एरीयात नसतो तेव्हा पटकन, “अ‍ॅक्च्युअली, मै यहा का नही हू” असे बोलून वेळ मारून नेतो. पण आपल्याच विभागात ते देखील करता येत नाही. आज मी माझ्या घरापासून पाचच मिनिटांवर असताना हा प्रश्न बेसावधपणे मागून आला होता. सुदैव एवढेच की बायको बरोबर नव्हती. अन्यथा समोरच्याने प्रश्न विचारताच तिने आम्हा दोघांकडे अश्या काही नजरेने बघितले असते की याने पण कोणत्या गाढवाला विचारलेय. आणि मग ती नजर बघून माझी आणखी धांदल उडाली असती.

असो…
कुरीअरवाला नक्की कुठे आहे आपल्या इथे याचा विचार मी ‘अं अं’ करत चालतच करू लागलो आणि प्रश्नकर्ता देखील माझ्या जोडीनेच चालू लागला. ईतक्या वेळात मी त्याला थोडेसे निरखून घेतले. वयाने माझ्यापेक्षा लहान आणि पोरसवदाच दिसत होता. माझ्याप्रमाणेच दोन्ही खांद्यावर सॅक टाकून तो देखील नोकरीधंद्यासाठी म्हणून स्टेशनच्या दिशेनेच जात होता. साधासाच पेहराव, चालणे बोलणे अन वागण्यातही पहिल्या नजरेत साधेपणाच भरला. त्याने मला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मला पुर्ण वेळ देऊन, माझ्या चालण्याच्या वेगाशी आपला वेग जुळवून चालू लागला. काही लोकांना हे सहज कसे जमते याचे मला नेहमीच कौतुक वाटते. माझे बोलायचे झाल्यास, एखाद्या अनोळखी माणसाकडे चौकशी करायची असल्यास, मी आधी शब्दांची मनातल्या मनात जुळवाजुळव करून त्याची मनातल्या मनातच एक रंगीत तालीम करतो. त्यानंतर प्रश्न सोडवायला कोणती व्यक्ती पकडावी हे शोधायला घेतो. प्रश्न विचारायच्या आधीच त्याचे उत्तर याला माहीत तर असेल ना, माहित असल्यास नम्रपणे देईल का, माहीत नसल्यास उगाचच चिडचीड करत कुठून येतात हि असली लोकं अश्या नजरेने आपल्याकडे बघणार तर नाही ना, एखादी मॉडर्न पेहरावातली व्यक्ती दिसली की तिला ईंग्लिशमध्येच प्रश्न विचारावा लागेल का, असे एक ना सत्तर, सतराशेसाठ फाटे फोडतो. त्याहूनही मग एखाद्याला हेरून जेव्हा फायनल करतो तेव्हा त्याला दादा, मामा, काका, भाईसाब, एs बॉssस नक्की काय हाक मारायची याचा परत मनातल्या मनात गोंधळ, अन या गोंधळात मगाशी रटलेले चौकशीचे वाक्य एव्हाना बोंबललेले असते की झालीच म्हणून समजा आयत्या वेळेला ततपप..

असो…
साधीशीच चौकशी हा बरोबरचा साधासुधा मुलगा अगदी सहजपणे करून गेला. त्याने मला ना दादा म्हटले ना मित्रा म्हटले. एक्सक्यूजमी तर दूरच राहिले. तसेच आता माझ्या बरोबर देखील असा चालत होता की जणू फार आधीपासूनचीच ओळख आमची. आता याला “माहीत नाही रे” असे तोडके मोडके उत्तर देऊन कटवता येणार नाही हे लक्षात आल्यावर मी उगाचच, आपल्याकडे कुरीअरवाला एक इथे, एक तिथे, पण तो आता तिथे असतो की नाही माहीत नाही रे, असे काहीतरी असंबद्ध पुटपुटायला लागलो. मी थोडासा बावचलोय हे त्याला समजले की काय कोणास ठाऊक पण त्याने स्वताच पुढे बोलायला सुरुवात केली, “ब्ल्यूडार्ट आणि डिएचएल दोघेही नाही बोलले रे, आणखी कोणी माहीत आहे का?”

घ्या…
उत्तर द्यायला उशीर केल्याने त्याने स्वताच नेमकी अशी नावे घेतली की मी उडालेल्या धांदलीतून सावरून सावचितपणे आठवायला घेतले असते तर कदाचित हिच दोन नावे पहिला आठवली असती. आता तिसरे कुठून आठवू.. पण इतक्यात मला पळवाट म्हणून एक छानसे उत्तर सुचले, “नाही रे, खरे म्हणजे मला कुरीअर करायचे झाल्यास ऑफिसमधूनच करतो ना, त्यामुळे काही कल्पना नाही इथली.”

“ऑफिसवाले कोणती कुरीयर सर्विस वापरतात?” त्याचा पुढचा प्रश्न.

‘अरे देवा असेही असते का?’ मी मनातल्या मनात.
पण लगेच सावरून म्हणालो, “ते बदलत राहतात रे, आणि माझे ऑफिस बेलापूरला आहे..”

“पण तुला ब्ल्यूडार्ट आणि डिएचएलवाले का नाही म्हणाले?” माझा हा प्रश्न विषय बदलायला होता की त्यात अजून अडकायला हे विचारताना मलाच समजत नव्हते.

“कॅमेरा पाठवायचा होता बहिणीला. ती बेंगलोरला असते. डिएचएलवाले नाही म्हणाले, आणि मगाशी ब्ल्यूडार्टवाल्यांचा देखील फोन आला, परत पाठवतोय म्हणून.”

“ओह्ह, कॅमेरा तुटायफुटायची भिती वाटत असेल. दिवाळी फराळाच्या लाडू चकल्या कुस्करल्याचे बरेच जणांने अनुभव ऐकलेत” मी माझ्या जेमतेम ज्ञानाच्या भरवश्यावर तारे तोडले.

“तसे नाही रे, चांगली पॅकींग केली आहे, दहा हजारांचा कॅमेरा आहे. बहिणीला तिच्या लग्नाच्या पहिल्या अ‍ॅनिवर्सरीला भेट द्यायची आहे. आम्ही तिघा भावांनी मिळून घेतलाय. ताईने बरेच केलेय रे आमच्यासाठी. आता आमचे पण कर्तव्य बनते ना. तिला कॅमेर्‍याची आवड आहे म्हणून देतोय, पण हे कुरीअरवाले उगाच वेळ काढत आहेत….”

“हम्म..” गडी बोलताना थोडासा भावूक झाल्याने मला पुढे काही बोलायचे सुचले नाही. दहा हजारांचा कॅमेरा तिघांमध्ये मिळून म्हणजे काही फार मोठे गिफ्ट वाटत नसले तरी त्याच्या हातातला दिड-दोन हजारांचा मोबाईल पाहता त्याच्यासाठी त्या कॅमेर्‍याची पैश्यातली किंमत तितकीही कमी नसावी.

“ऑनलाईन शॉपिंगने घेतला असतास तर तिथलाच अ‍ॅड्रेस देता आला असता, त्यात काही फसायला होत नाही, कॅमेर्‍यांचे तर ठरलेलेच मॉडेल असतात ना..” मी स्वता फारसा ऑनलाईन शॉपिंगचा चाहता नसलो तरी दुसर्‍याला सल्ले द्यायला आपले काय जाते.

“बरोबर आहे रे तुझे, पण स्वताहून घेऊन देण्यात एक मजा असते ना..”

ह्म्म.. गडी पुन्हा भावूक झाला आणि मी देखील तो मुद्दा तिथेच सोडला. पण त्याच्या या भावनात्मक उत्तराने माझे समाधान झाले नाही हे माझ्या चेहर्‍यावर दिसले की काय कोणास ठाऊक, पुढे तो स्वताहूनच त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी, त्याच्या भावांसाठी, त्यांचे शिक्षण आणि नोकरीसाठी काय काय केले हे सांगू लागला. मी स्वता चाळीत वाढल्याने सर्व प्रकारची आणि सर्व परिस्थितीतील माणसे पाहिली आहेत. याची कथा काहीशी अशी होती, डोक्यावरचा वडिलांचा आधार कोवळ्या वयातच गेला, तर त्यांची जागा मोठ्या भावंडाने पर्यायाने इथे त्याच्या बहिणीने घेतली. नोकरीव्यतिरीक्त ट्यूशन घेऊन घरखर्चाचा भार उचलला. आता तिच्या लग्नाचा हा पहिलाच वाढदिवस म्हणजे या सर्वांची घडी बसवूनच तिने स्वताचा विचार केला असावा. काही त्याने सांगितले काही अंदाज मी बांधले. इतर काही खरे असो वा खोटे, पण झालेले संस्कार तरी नक्कीच दिसत होते. आपल्या बहिणीने आपल्यासाठी खस्ता खाल्याचे कौतुक एखाद्या अनोळखी माणसाला कौतुकाने सांगणे हि माझ्यामते तरी फार कौतुकास्पद बाब आहे. सार्‍याच गोष्टींची परतफेड करता येत नाही, पण जाण ठेवणे जमल्यास कर्तव्य आपसूक निभावले जाते. छे, मलाही भावूक केले गड्याने..

इतक्यात त्याला कोणाचातरी फोन आला, बहुतेक एखाद्या भावाचाच असावा. अजून एका कुरीअरवाल्यांनी कॅमेरा पाठवायला नकार दिला या विषयावरच त्यांचे बोलणे चालू झाले. बोलताना त्याचा चेहरा असा चिंतातूर झाला होता जसे ऐन परीक्षेच्या दिवशी एखाद्याला हॉल तिकीट सापडू नये. त्या भावाच्या बोलण्यावरूनच तो जवळच्या एका पानटपरीवर चौकशी करायला शिरला तसे मला माझ्या ट्रेनचा टाईम होत आल्याची आठवण झाली. थांबणे शक्य नव्हते, कारण हि ट्रेन चुकवणे मला परवडणारे नव्हते, माझीही कुठेतरी वाट बघितली जात होती. तसे मी त्याच्याजवळ जात त्याला, “आता मी निघतो” असे म्हणालो.

“अरे हो, सॉरी.. तू हो पुढे.. तुझी ट्रेन असेल.. थॅंक्यू..” माझे दोन पैश्याचेही नुकसान केले नसताना तो मला सॉरी म्हणाला आणि मी न केलेल्या मदतीसाठी थॅंक्यू..

निघतानाही तो मला ‘मित्रा’ नाही म्हणाला की फॉर्मेलिटी म्हणून हस्तालोंदन नाही केले. मोजून सहा ते आठ मिनिटांचे आमचे एकत्र चालणे अन एकमेकांशी बोलणे झाले, पण तेवढ्या वेळेतही तो मला बराच उलगडला.. पुन्हा कधी तो मला भेटेल ना भेटेल, दोनचार दिवस त्याला कुरीअरवाला भेटला की नाही हि रुखरुख मनात राहील, चार-आठ दिवसांत कदाचित विस्मरणातही जाईल, पण अशी साधीशीच माणसे अधनामधना भेटत राहणे खूप गरजेचे असते.. खरंच, मदत होते अश्यांची, आपला स्वताचा चांगुलपणा टिकून राहण्यासाठी ..

– तुमचा अभिषेक

 
2 प्रतिक्रिया

Posted by on डिसेंबर 7, 2013 in ललितलेख

 

समुद्र समुद्र !!!!

बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्‍या मतलई सुरमई वार्‍यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो. कधी मूड बदलायचा झालाच, तर गेटवे ऑफ ईंडियापासून मरीनलाईन्स, तर वरळी सीफेस पासून बॅंडस्टॅंड तर कधी दादर, गिरगाव अन जुहू चौपाट्या, सार्‍या जणू आपल्याच बापाच्या. रोजच्या प्रवासात वाशीच्या खाडीवरील एक पुर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या पूलावरून सकाळ-संध्याकाळ जाणे म्हणजे निसर्गासोबत केलेली एक राइडच असते. जेमतेम दोन ट्रॅकचा ब्रिज आणि त्या भोवताली दोन्ही बाजूने गोलाकार पसरलेला अथांग समुद्र अन थैमान वारा. भरीस भर म्हणून माझ्या वेळी ट्रेनही अशी रिकामी असते की दारात उभे राहून बाह्या फडफडवून त्या निसर्गाच्या रौद्र पण तितकेच आपलेसे वाटणार्‍या रुपात मिसळून जावे आणि त्यालाही आपल्यात सामाऊन घ्यावे, म्हटलं तर स्सालं सुख सुख म्हणजे आणखी काय असते !

पण समुद्र म्हटले की पहिला आठवते ते लहानपणी आईबरोबर दादर चौपाटीला खाल्लेली ओली भेळ. देवाचे हार विसर्जित करायला म्हणून दोनतीन महिन्यातून एकदा जाणे व्हायचे. पुढची भेळ पुन्हा दोनतीन महिन्यांनीच नशिबी आहे हे माहीत असल्याने कागदाला चिकटलेले शेव कुरमुरेही नाही सुटायचे. पुढे भाऊच्या धक्क्यालाच हार विसर्जित करायला सुरुवात केली आणि सुटली ती भेळ. पण विस्मरणात नाही गेली. तीच भेळ पुढे एकदा त्याच चौपाटीवर अन त्याच समुद्राच्या साक्षीने प्रेयसीबरोबर खाउन पाहिली. पण लहानपणीची मजा नाही आली. कदाचित ठरवून केल्याने तसे झाले असावे, वा त्याक्षणी माझ्या मजेची परिमाणे वेगळी असावीत. आता त्या प्रेयसीची बायको झाली आहे, पण त्या भेळेची मजा अजूनही येत नाहीच. आता वाट पाहतोय ती मला मुले झाल्यावर त्यांना कधीतरी घेऊन जावे आणि बापाच्या भुमिकेतून ती मजा अनुभवून बघावी.

समुद्र आला की किनारा आला आणि किनारा आला की वाळू आलीच. पण मला त्या वाळूचे किल्ले करणे कधीच आवडायचे नाही, कदाचित काही बांधणे वगैरे मला जमत नाही, हे देखील कारण असावे. पण मी त्या वाळूत खड्डा करायचो. करताना नखांच्या फटी वाळूने बुजायच्या मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करून अगदी चार वीत खोल आणि दोन पाय जवळ घेऊन उभा राहू शकेन किमान इतक्या क्षेत्रफळाची वाळू उकरून काढायचो. किनार्‍याच्या शक्य तितक्या जवळच. अन मग एका मोठ्या लाटेची वाट बघत बसायचो. ती आपल्या मर्जीने यायची आणि परत जायची. मात्र माझा खड्डा पाण्याने भरून जायची. त्या खड्ड्यावर फेस जमा व्हायचा, जो विरायच्या आधी मी धावत जाऊन त्यात उभा राहायचो. विठ्ठलासारखा कंबरेवर हात ठेऊन, एका छोटेखानी समुद्राचा मालक असल्याच्या थाटात. पुढे आणखी दोनचार लाटा आल्या की त्या आपल्याबरोबर वाळू घेऊन यायच्या आणि खड्डा भरून टाकायच्या. मग पुन्हा ती वाळू उपसण्याचा खेळ सुरू व्हायचा, पुढची लाट यायच्या आधी वाळू जास्तीत जास्त उपसायची असायची. काही काळाने लाटा तिथवर येऊन भिडण्याची वारंवारता वाढायची आणि बघताबघता माझ्या खड्ड्याला समुद्र आपल्या पोटात सामावून घ्यायचा.

अकरावी-बारावीला किर्ती कॉलेजला होतो, दोन वर्षे. खरे तर एक फुकट गेल्याने दोनाची तीन वर्षे झाली. फुकट जाणारे वर्ष शैक्षणिक कारकिर्दीतले असावे, आयुष्यातले गेले असे कधीच वाटले नाही. किर्ती कॉलेज म्हणजे दादर चौपाटीला अगदी लागूनच. दिवसभर समुद्राचा वारा कानात घोंघावत असला तरीही रोज संध्याकाळी तो मला भुरळ घालायाचा. घरी पाय लवकर उचलला जायचा नाही. माझेच नाही तर असे कित्येकांचे व्हायचे. लहर आली की कंपांऊंडवरून मारलेली उडी थेट वाळूत पडायची. पण मला मात्र बाहेरून वळसा घालून जायला आवडायचे. समुद्राला शॉर्टकटने जाऊन भेटण्यापेक्षा दुरहून त्याच्या जवळ जाताना त्याचे हळूहळू वाढणारे विशाल रूप पाहण्यात मजा वाटायची. समुद्राकडे जाणार्‍या रस्त्यावर पसरलेले वाळूचे कण हळूहळू आपली घनता वाढवत रस्ता कसे व्यापत जातात, वार्‍याचा वाढता वेग आणि तो आपल्या सोबतीला घेऊन येणारा खारा गंध कसा दाट होत जातो, हे अनुभवणे म्हणजे समुद्राला जाऊन भेटणे. मग पाण्यात उतरले नाही तरी चालायचे. लाटांशी नजरेनेच खेळून झालेले असायचे. वाळूने माखलेले सुके पाय घरी घेऊन जातानाही मन चिंब भिजल्यासारखे वाटायचे. पण हे नेहमीच व्हायचे असे नाही. कधीतरी तो बोलवायचा, साद घालायचा. तेव्हा कपडे काढण्याची वेळही जीवावर यायची. हे असे व्हायचे जेव्हा आम्ही मित्र सहलीला जायचो..

कधी अलिबाग तर कधी केळवा. मुद्दाम आठवड्याचा असा वार पकडून जायचो जेव्हा गर्दी कमी असेल, त्यातही असाच एखादा किनारा पकडायचो जिथे कोणीच नसेल. सुरुवात क्रिकेट वा फूटबॉलने व्हायची. अगदी शिस्तीत. जोपर्यंत एखादा चेंडू लाटांवर तटवला जात नाही तोपर्यंत. पण एकदा का तसे झाले आणि पाण्याचा स्पर्श पायाला झाला की लागलीच सारे तूफान वेगाने समुद्राच्या ओढीने पळत सुटायचे. गल्ली क्रिकेटमध्ये ज्याची बॅटींग चालू असते त्याची अश्यावेळेस दिसणारी ओरड इथे कधीच नसायची, कारण त्यालाही समुद्राचे वेध लागलेले असायचे. बरेचदा मग पाण्यातच खेळ चालायचे, पण त्यात खेळाचे स्थान दुय्यमच असायचे.

पावसावर कित्येक कविता बनतात, कारण पावसाकडे पाहून त्या सुचतात. पण समुद्र हा बरेचदा तत्वज्ञान शिकवून जातो. एक असेच कायमचे मनावर कोरले गेलेले तत्वज्ञान म्हणजे निसर्ग हा आपला मित्र असतो, पण जोपर्यंत आपण त्याचा मान ठेऊ तोपर्यंतच. पट्टीचे पोहणारेच कित्येकदा बुडतात, कारण ते पोहायला एखादया तलावात शिकतात आणि नाद समुद्राशी करायला जातात. एक जवळचा मित्र असाच गेला. जेवढे मी त्याच्या पोहण्याबद्दल जाणून होतो, माझा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. एका सहलीचेच निमित्त झाले, पण तो समुद्र आमच्या ओळखीचा नव्हता. मागाहून कळले चूक त्याचीच होती, तेव्हा समुद्रावर धरलेला राग सोडला. मी त्यावेळी तिथे नसणे हे चांगले झाले कि वाईट आजवर समजू शकलो नाही. तिथे असूनही त्याला वाचवता आले नसते तर ती खंत मनावर जास्त आघात करून गेली असती. पण आजही खवळलेला समुद्र पाहताना कित्येकदा त्याची आठवण दाटून येते. अश्यावेळी दूर किनार्‍यावरच उभे राहणे पसंद करतो. आपला किनारा काय असावा हे देखील त्या समुद्रालाच ठरवू देतो. यातच जास्त सुरक्षित वाटते. पण म्हणून कायम तिथेच उभा राहत नाही. जेव्हा तो समुद्र शांत होऊन मला साद घालतो तेव्हा मात्र त्याच्याकडे जातो. त्याच्या हाकेला ओ द्यायला.. त्याच्या अस्तित्वाला मान द्यायला.. !

– तुमचा अभिषेक