RSS

Monthly Archives: मार्च 2014

सुखाची चाहूल… आगमन … अवर्णनीय !

शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती.

तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे. बायोलॉजीचा ‘ब’ सुद्धा माहीत नसलेलो मी, बाप होत असलो तरी याबद्दल जेमतेमच जाणकारी राखून होतो. बायकोने फोनवर ‘जेवलास का आणि भाजी कशी झाली होती’ असे विचारावे त्या थाटात ही बातमी दिली आणि मी कामाच्या वेळी कमीच बोलतो हे माहीत असल्याच्या सवयीने फोन कटही केला. तिच्या आवाजातून चिंतेचे कारण काय अन किती हे देखील समजले नाही. माझे दिवसभराच्याच नाही तर पुढच्या आठवडाभराच्या कामाची प्लॅनिंग मी एक एप्रिल या तारखेच्या हिशोबाने केली होती. त्यातही आजच्या दिवसाचे काम रात्री नऊ पर्यंत चालणार होते. पण आता काय किती बोंबलले याचा हिशोब करायचा प्रश्नच नव्हता. लागलीच लाईन मॅनेजरला कल्पना दिली. त्यालाही अगोदरच याबाबत माहीत असल्याने फारसा काही गोंधळ न घालता त्याने माझ्या हातात असलेले काम दुसर्‍या कोणाला तरी हॅण्डओवर करून मला निघायला सांगितले. पुन्हा बायकोला फोन लाऊन परिस्थितीची कल्पना घेतली, तर संध्याकाळी सावकाश अ‍ॅडमिट झाले तरी हरकत नाही असे समजले. त्यानंतर उद्या वा परवा, किती लवकर पुन्हा ऑफिसचे तोंड बघायला मिळेल याची कल्पना नसल्याने संध्याकाळपर्यंत वेळ घेऊन निदान माझ्यावाचून अडणारी कामे तरी आटोपून घेऊया असे ठरवले. पण बस्स ठरवलेच.! फोन ठेवताक्षणीच जाणवले की आपली छाती तूफान वेगाने धडधडू लागलीय अन श्वास थंड. इथून पुढे कामात लक्ष लागणे कठीणच होते. कामावरची निष्ठा दाखवायची हिच ती वेळ असे मनाला बजावत संध्याकाळपर्यंत जमेल तसे आटोपले आणि निघालो.

तिथे तिची एव्हाना अजून एक डॉक्टरवारी करून झाली होती ज्यात संध्याकाळ ऐवजी दुसर्‍या दिवशी सकाळी अ‍ॅडमिट व्हायचे ठरले होते. डॉक्टरकडून येताना ती मला परस्पर बाहेरच भेटली तेव्हा तिने मला या बदललेल्या वेळापत्रकाबद्दल सांगितले. मात्र उद्या अ‍ॅडमिट झाल्यावर तिथून पुढे काय करणार आणि फायनल रिझल्ट कधीपर्यंत हाती येणार याची मला तोपर्यंत काहीही कल्पना नव्हती. पण त्या आदल्या संध्याकाळी पाणीपुरी खायचा तिचा शेवटचा डोहाळा पुरवताना मला दुपारपासून मनावर आलेले दडपण तेवढे निवळताना जाणवले.

ती रात्र ती तिच्या घरी होती आणि मी इथे माझ्या. रात्री झोपताना आई म्हणाली, उद्या होवो किंवा परवा, दोन्ही चांगले दिवस आहेत. उद्या शिवजयंती तर परवा संकष्टी…
आणि पुन्हा एक अनामिक हुरहूर मनी दाटून आली. म्हणजे उद्या किंवा परवाच,, होणारही होते तर..

सुखाची चाहूल अनुभवण्यातही एक सुख असते हे त्या रात्री जाणवत होते. धडधडत्या छातीने आणि थंड पडत चाललेल्या श्वासांनी, येणार्‍या सुखाच्या वाटेवर डोळे लाऊन बसणे.. कमिंग सून कमिंग सून असे स्वताच स्वताच्या मनाला बजावणे.. ती रात्र माझी तशीच गेली. शिवजयंती की संकष्टी,, मुलगा की मुलगी.. नॉर्मल की सिझेरीअन,, तिच्यासारखे की माझ्यासारखे.. आपल्या मनात काय आहे.. आपल्या मनासारखे होईल का.. जर मुहुर्तच साधायचा असेल तर शिवजयंतीचाच साधू दे, मुलगा वा मुलगी काहीही माझेच असले तरी माझ्या मनासारखी मुलगीच होऊ दे.. याच विचारांत गेली..

परीणामी सकाळी उशीराच उठलो. पाहतो तर वाजलेला अलार्म चुकून झोपेतच बंद केला होता. अरे देवा, आता पुन्हा शिव्या पडणार तर. गेल्या सोनोग्राफीच्या वेळी तिच्याबरोबर जायला न जमल्याच्या शिव्या ताज्या होत्या आणि आज महत्वाच्या दिवशी सुद्धा … सुदैवाने तिलाही घरून निघायला थोडाफार उशीरच झाला होता. तरीही माझ्याआधीच घरच्यांना बरोबर घेऊन ती अ‍ॅडमिट झाली होती. पण आजचा तिचा मूड वेगळाच होता. माझ्या उशीरा येण्यापेक्षा माझ्या येण्याला तिच्याठायी जास्त महत्व होते. मी पोहोचलो तेव्हाच बाईसाहेब मस्त हाताला सलाईन लाऊन बेडवर पहुडल्या होत्या. आता पुढे चार-पाच तासांतच कळा सुरू होऊन पुढे आणखी तासभरातच… ईति तिच्या बहीणींनी पुरवलेली वैद्यकीय माहिती आणि मी एक नजर घड्याळावर टाकली. याचा अर्थ फार तर फार दुपारी दोन वाजेपर्यंत मी बाप होणार होतो. हि वेळ इतक्या समीप आलीय यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. माझ्या डोक्यातून अजूनही ती एक एप्रिलची तारीख बाहेर पडली नव्हती. गेले नऊ महिने एकेक करत मोजत असलेले दिवस आठवू लागले. महिन्याभरापूर्वी ती माहेरी गेल्यापासून या दिवसाच्या प्रतीक्षेत होणारे आमचे रोजचे फोनवरचे बोलणे आठवू लागले. किंबहुना लग्नानंतरचा तो प्रत्येक एक क्षण आठवू लागला ज्यात दडलेल्या भावना कळतनकळत आजच्याच दिवसाची वाट बघत होत्या. येत्या काही तासांतच आमच्या नात्याला आणखी घट्ट करणारी एक कायमस्वरूपी गाठ बांधली जाणार होती.

मी माझ्या घरी फोन करून दुपारी दोनची वेळ कळवून घरच्यांना त्याआधी यायला सांगितले, तिचे घर जवळच असल्याने तिच्या घरचे सारे हजेरी लाऊन गेलेलेच वा गरज पडेल तसे कधीही हजर होतील अश्या हाकेच्या अंतरावरच होते. जवळपास सर्वांनीच रजा टाकल्या होत्या. आपापले सारे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामागे कारणही तसेच होते. दोन्ही घरांमध्ये कित्येक वर्षांनी, तब्बल एका पिढीनंतर आज पहिल्यांदाच बाळाचा रडण्याचा आवाज घुमणार होता, म्हणून हा दिवस सर्वांसाठीच स्पेशल होता. आणि आता सुरू झाले होते ते काऊंटडाऊन .. टिक टिक वन.. टिक टिक दोन…. दोन वाजताची प्रतीक्षा !
रूमवर टाईमपास करायला टिव्ही होता. पण त्याचा रिमोटही हातात घ्यायला कोणाला सुचत नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकताना बघणे हाच सर्वात मोठा विरंगुळा होता. मात्र तो काटा बाराला पार करून दिवसाच्या दुसर्‍या सत्रात पोहोचला तरी अजून काहीतरी घडतेय अशी चिन्हे दिसायला मागत नव्हती. मी पुन्हा माझ्या घरी फोन करून अजून थोडे उशीरा आलात तरी चालेल असे कळवले पण होणार्‍या बाळाच्या आजीआजोबांचा पाय आता घरी टिकणे शक्य नव्हते. रूमवर फारच गर्दी होत असेल तर तिथेच आजूबाजुला भटकू पण आम्ही येतो असे म्हणत ते घरून निघाले. पण ते पोहोचले तरी अजून कश्याचा काही पत्ता नव्हता. दुपारी दोन वाजता तिला चेकींगसाठी मात्र तेवढे नेले. त्यात फारशी प्रगती न दिसल्याने आता संध्याकाळच उजाडेल एवढेच काय ते समजले. मिनिटे मोजायचा उत्साह अजूनही मावळला नव्हता मात्र मनावर आलेले दडपण कमी व्हावे म्हणून आता होईल तेव्हा होईल म्हणत वेळ बघणे थांबवले. दुपारी बाहेर जाऊन जेवण करून आलो, बसल्याबसल्या जागेवरच तासभर पेंगून घेतले, थोडाश्या इकडतिकडच्या गप्पा यांत संध्याकाळ उजाडली देखील. एव्हाना पोटात दुखायला सुरुवात झाली होती मात्र ते दुखणे केवळ छळण्यापुरतेच होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास केलेल्या चेकींगच्या वेळीही पुढच्या चेकींगची वेळ रात्री आठ-साडेआठ वाजताची एवढाच निष्कर्ष निघाला. एखादा क्रिकेटचा सामना पावसामुळे थांबावा, अधूनमधून पंचांनी खेळपट्टीची पहाणी करावी आणि सामना सुरू कधी होईल हे सांगण्याऐवजी पुढची पहाणी अमुकतमुक वाजता होईल असा क्रिकेटरसिकांना टांगणीवर लावणारा निर्णय द्यावा अश्या धाटणीचा खेळ चालू होता. हाडाचा क्रिकेटप्रेमी असल्याने मी आजवर हे बरेचदा अनुभवलेय पण आजच्या अनुभवाची त्या कशाशीही तुलना नव्हती.

आता कदाचित रात्रीच्या मुक्कामाचीही तयारी ठेवावी लागेल म्हणत दिवसभराची मरगळ झटकून ताजेतवाने होण्यासाठी एकेक करून ब्रेक घेण्याचे ठरवले. संध्याकाळच्या सुमारास चहापाण्याच्या निमित्ताने जवळच असलेल्या सासुरवाडीला माझी देखील एक फेरी झाली. पण चहा आणि पाण्याव्यतिरीक्त आणखी काही घ्यायची इच्छा झाली नाही. धावत गेलो आणि पळत आलो असे केले. मधल्या काळात हिच्या पोटातल्या दुखण्याने बर्‍यापैकी जोर पकडला होता. मी परतलो तेव्हा बाईसाहेब पुन्हा चेकींगसाठी गेल्या होत्या. यावेळची स्थिती तुलनेत आशादायी असली तरी एव्हाना ती पार कंटाळली होती. एकीकडे दुखणे वेगाने वाढत होते मात्र सकाळपासूनची प्रगती पाहता आणखी तास दोन तास थांबून काही चमत्कार घडेल अशी आशा तिला स्वताला तरी वाटत नव्हती. सिझेरीयन झाले तरी चालेल पण यातून मला एकदाचे सोडवा या मनस्थितीला ती पोहोचली होती. पण डॉक्टरच म्हणाले, थांबा, शक्य आहे तोपर्यंत नॉर्मलच करूया, जरा कळ काढा..

जरा कळ काढ, या वाक्यप्रचाराचा उगम मी आज माझ्या डोळ्यासमोर अनुभवत होतो. तिची अवस्था आता मलाही बघवत नव्हती. तिच्यासाठी मी काय करू शकत होतो तर ते फक्त तिचा हात हातात पकडून बसू शकत होतो. जितके असह्य व्हायचे तितक्या जोरात ती माझा हात घट्ट आवळायची, याने मी तिच्या वेदना मापू शकत होतो पण त्यांना कमी करू शकत नव्हतो. त्या कमी व्हायचे इंजेक्शन दिले होते मात्र ते निकामी ठरत होते. विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती. होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता.

आता दर दुसर्‍या मिनिटाला कळ निघत होती. माझ्याही हातावरचा दाब वाढत होता. डॉक्टरने पुढच्या आणि कदाचित शेवटच्या चेकींगची दिलेली वेळ अजून तासाभराने होती, तेव्हाही नक्की काय होणार होते, काय डिसीजन घेतला जाणार होते हे ठाऊक नव्हते. जर तोपर्यंत थांबूनही सिझेरीयनच करावे लागणार होते तर का उगाचच थांबायचे हा प्रश्न छळत होता. पुर्ण दिवस निघाला असला तरी हा तास निघणे फार कठीण होते. होणारा त्रास पाहता फक्त आणखी अर्धा एक तासच सहन करायचे हा खरा खोटा दिलासा तरी तिला कसा द्यावा हा प्रश्न होता. त्यामुळे सारेच शांत होते, ज्या धीराची तिला गरज होती तो शब्दांतून नाही तर फक्त स्पर्शातून दिला जात होता.

आजवर सिनेमांमध्ये बघितलेले बाळंतपणाचे सारे प्रसंग डोळ्यासमोर येत होते. दिवसभर एकच प्रार्थना करत होतो की ते सारे तितकेसे खरे नसून अतिरंजीत असावेत, ती केवळ नाटक सिनेमांमधील ओवरअ‍ॅक्टींग असावी, पण आता मात्र हे सारे हळूहळू नजरेसमोर अनुभवायला सुरुवात झाली होती. आता मी देखील घड्याळाकडे पाठ करून बसलो होतो, मागे काटे वेगाने पळत असतील अशी स्वताच्या मनाची समजूत काढत. खरेच तसे होत होते का याची कल्पना नाही पण वेळ मात्र सरकत होती. साडेदहाची वेळ दिली होती, पावणेअकरा वाजता पुन्हा डॉक्टरांचे आगमन झाले. चेकींगसाठी म्हणून तिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. आम्ही सारे बाहेरच जमलो होतो, कारण याच चेकींग नंतर ऑपरेशन करायचे का नाही याचा निर्णय घेऊन त्याची लागलीच अंमलबजावणी होणार होती.

इतक्यात आतून तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. चेकींग हा प्रकार देखील खूप त्रासदायक आहे असे ती संध्याकाळी म्हणाल्याचे आठवले. थोड्याच वेळात एक मदतनीस आतून वेगाने बाहेर आली शेजारच्या रूममधून काही औजारे घेऊन पुन्हा आतल्या दिशेने गायबली. तिच्यापाठोपाठ आणखी एक जण आत गेली. हा प्रकार एक-दोन वेळा घडला आणि कल्पना येऊ लागली की आत काही तरी घडायला सुरुवात झाली आहे. दोनचार वेळा उघडणार्‍या दरवाज्यामधून मी दबकत आत डोकावून बघायची हिंमत दाखवली खरी पण तिथून काहीच दिसत नव्हते याचा खरे तर दिलासाच वाटला. सुरुवातीलाच आलेला तिचा ओरडायचा आवाज त्यानंतर पुन्हा आला नव्हता. आता हे चांगले की वाईट हे मात्र समजत नव्हते ना कसलेही वेडेवाकडे अर्थ लावायच्या मनस्थितीत मी होतो. जेमतेम सात आठ मिनिटे झाली असावीत, तोच लहानग्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि बाहेरच्या तंग झालेल्या वातावरणात कुजबूज सुरू झाली. काही चेष्टा पण किती क्रूर असतात, हा आवाज अगदी विरुद्ध दिशेला असलेल्या एका रूममधून येत होता मात्र तरीही बेसावध मनाने त्याचा पटकन आपल्या सोयीने अर्थ काढला होता. इतकेच नव्हे तर हट्टाने हा आवाज आपलाच आहे हे पटवून द्यायची चढाओढ लागली होती. तो आवाज विरला आणि पुन्हा मिनिटभराची शांतता. वातावरणातील ताण निवळावा म्हणून काही जणांचे तेच पुराने घीसेपीटे विनोद मारणे सुरू झाले, की काही चांगलेही होते, कोणास ठाऊक, पण त्यावेळी मला हसवण्याचा प्रयत्न करणे हेच मुळात माझ्या दृष्टीने हास्यास्पद होते. पण लोकांच्या भावनांची कदर करत ना कोणाला काही बोलता येत होते ना कोणावर काही चिडता येत होते. अन्यथा मला ताटकळत उभा राहण्याऐवजी बसून घे जरा असा सल्ला देणार्‍यांनाही ओरडून शांत राहा सांगावेसे वाटत होते. बाप होतोयस तर आता बापाची जबाबदारी घ्यायला शिक हे वाक्य गेल्या काही महिन्यात कित्येकदा ऐकले होते आणि हसून टाळले होते, पण आता ऑपरेशन थिएटरच्या आत असलेल्या माझ्या बायकोची आणि होणार्‍या मुलाची त्याच्या जन्माआधीपासूनच लागलेली चिंता, हे दडपण, बापाची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे हे स्वताच स्वताला पटवून देत होते.

ईतक्यात पुन्हा एक बारीकसा रडण्याचा आवाज आला. हा आवाज कदाचित अपेक्षित दिशेने आला होता म्हणून पुन्हा सर्वांनी कान टवकारले. नजरेनेच एकमेकांना शांत राहण्याच्या खाणाखुणा झाल्या. दुसर्‍याच क्षणाला तेच ते रडणे, यावेळी मात्र आधीपेक्षा कैक मोठ्या आवाजात, न थांबता येऊ लागले, आणि बाहेर एकमेकांना अभिनंदन करणे सुरू झाले. काही हात माझ्याही दिशेने सरसावले मात्र माझ्या चेहर्‍यावरची चिंतेची रेष अजूनही काही हलायला मागत नव्हती. रडण्याच्या आवाजाने बाळ कदाचित सुखरूप आहे हे नक्की झाले होते पण त्याच्या आईची खुशाली समजणे बाकी होते. ईतर अनुभवी लोकांना कदाचित ते काळजीचे कारण वाटत नसावेही पण….. मी अजूनही वाट बघत तसाच त्या ऑपरेशन थिएटरच्या दारावर उभा होतो. दार उघडले आणि एक नर्स माझ्या मुलीला घेऊन बाहेर आली. मगासच्या रडण्याच्या खणखणीत आवाजावरून कोणीतरी मुलगा आहे असा अंदाज बांधला होता, तेव्हा होणार्‍या बाळात मुलगा मुलगी असेही असते ही बाब डोक्यातच आली नव्हती. पण आता मुलगी आहे असा गलका होताच आठवले की येस्स, मला मुलगीच तर हवी होती. गर्दीच्या सर्वात पाठीमागे उभा राहून मी माझ्या मुलीला कोणाच्या तरी खांद्यावरून डोकावून पाहिले आणि आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीच्या बघताक्षणीच प्रेमात पडलो असे झाले. आजवर मी पाहिलेली सारीच नवजात पिल्ले मला एकसारखीच वाटायची. पण हे वेगळे होते. हे माझे होते. माय लिटील प्रिन्सेस. अभि’ज लिटील गर्लफ्रेंड. तिला पाहताना मला दडपणाच्या उंच कड्यावरून अलगपदणे तरंगत खाली येत असल्याचा भास होत होता. शिवजयंतीच्या मुहुर्ताला राणी लक्ष्मीबाई आली असे कोणीतरी म्हणताच घड्याळावर नजर गेली तर जेमतेम अकरा वाजून गेले होते. बाळ ज्या मुहुर्ताला सुखरुप येते तोच खरा शुभ मुहुर्त याची जाणीव झाली. मुलीचे केवळ क्षणभर दर्शन करवून, तिचे वजन मोजून, तिला पुन्हा आत घेऊन गेले. माझी नजर अजूनही त्या दरवाज्यावरच होती, माझ्यासाठी तो अजून एकदा उघडायचा होता. उघडला, आणि स्ट्रेचरवर झोपूनच माझी बायको हसतमुखाने बाहेर आली. कोण विश्वास ठेवेल की थोड्यावेळापूर्वी हिच बाई वेदनेने नुसते व्हिवळत होती, पण आता मात्र तिच्या चेहर्‍यावर एक तृप्तीचे समाधान दिसत होते. की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना. ते जे काही होते ते हळूहळू माझ्याही चेहर्‍यावर पसरत असल्याचे मला जाणवत होते. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो …

न्यू बॉर्न फादर
तुमचा अभिषेक

 
 

ए फ्यांड्री SSSS ईई ..

अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली..

“ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या..” तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली.

यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.

फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा.

दुसर्‍याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, “काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?”

तर म्हणला कसा, “अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे ….. ”

थोडावेळ मला काय बोलावे आणि कोणत्या टोनमध्ये बोलावे समजेणासे झाले..
तरी उत्तरलो,
“म्हणजे तू सुद्धा एखाद्या जातीला आपल्यापेक्षा खालची मानतोस तर….. मग काय फरक राहिला??

आता निरुत्तर व्हायची पाळी त्याची होती.

– o0Oअण्ड्या

 

अंड्याचे फंडे ८ – हरवलेले आवाज

बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते. दोन वर्षे अभ्यासाच्या नावावर तिथेच झोपण्यात गेली आमची.. अच्छा चला, पत्ते कुटण्यात गेली हे देखील कबूल करतो. तर ते बाकडे आजही ओळखीच वाटले. त्यावरच आडवेतिडवे पसरून गप्पा कुटायला सुरुवात केली. कारण यावेळी पत्ते बरोबर नव्हते, गरजही नव्हती म्हणा.

कॉलेजच्या आठवणी कॉलेजच्या मित्रांबरोबर कॉलेजमधील आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर, ज्यांनी हा अनुभव घेतला तेच काय ते जाणोत की आमची रात्र कशी रंगली असावी. मध्येच एक सिक्युरीटी मामा डोकाऊन गेले. कोणी ओळखीचे भेटो न भेटो हे ओळखीचे असणे फार गरजेचे होते. शैलूने हात दाखवला आणि काम झाले. पहाटेपर्यंतची रात्र अशीच जागून काढायचा विचार होता. पण सर्वांच्याच डोळ्यांवर आलेल्या झापडीने अंदाज चुकवला. कॉलेजात असताना असे कधी व्हायचे नाही. कदाचित बदललेली जीवनशैली कारणीभूत असावी. सध्या सर्वांची लाईफ फुल्ल ऑफ वर्किंग स्ट्रेस झाल्याने सुट्टीचे दिवस म्हणजे झोपा काढायचे हे ठरलेलेच असते. चलता है, मला मात्र त्या लाकडी बाकड्यांवर कधीच झोप आली नव्हती म्हणून मी माझ्या फेव्हरेट व्हरांड्यात पसरलो. डोक्याखाली एखादे पुस्तक नाहीतर अंगातलेच काढून त्याची छानशी घडी करून बनवलेली उशी. म्हणजे उशीची उशी झाली अन अंगदेखील फुल्ल एअर कंडीशन. ते ही काय कमी म्हणून वर चमचमणारे तारे. सकाळी उठायचे म्हणून सवयीने अलार्म लावायला मोबाईल काढला अन स्वताशीच हसायला आले. त्याची तेव्हाही कधी गरज पडली नव्हती, तर आज उठायची अशी काय घाई होती. मुळात तेव्हा मोबाईल नावाचा प्रकारच बाळगायचो नाही. सकाळी त्या व्हरांड्यात जाग यायची ती पाखरांच्या मंजुळ किलबिलीनेच. वाटले आज इथून रेकॉर्डच करून जावे अन रोज अलार्म म्हणून मग तेच वापरावे. आईच्या लाडिक हाकेनंतर साखरझोपेतूनही प्रसन्नतेने डोळे उघडावेसे वाटावेत असा तो दुसरा आवाज.

पण का कोणास ठाऊक, नव्हता नशिबी तो आवाज यावेळी. सकाळी जाग आली ती अभ्यासाच्या निमित्ताने कॉलेजला लवकर येणार्‍या मुलांच्या गोंगाटानेच. घरी परतताना मित्रांमध्ये विषय निघाला आणि काय आश्चर्य, त्यांच्याही ते लक्षात आले होते. पक्ष्यांची किलबिल त्या दिवशी झालीच नाही म्हणे. किंबहुना हल्ली ती होतच नाही म्हणे. कॉलेजच्या परिसरातील झाडे किंचित कमी झाली होती हे खरे, मात्र हे कारण काही मनाला पटत नव्हते. कोण म्हणाले प्रदूषण वाढलेय, तर कोणी वाढत्या लोकसंख्येला आणि ट्राफिकला जबाबदार धरले. कोणी मोबाईल टॉवरमधून निघणार्‍या अदभुत लहरींवर खापर फोडले तर कोणी थेट ग्लोबल वार्मिंगलाच हात घातला. पाखरे हरवली होती एवढे मात्र नक्की, अन त्यांच्याबरोबर हरवला होता तो त्यांचा आवाज… बस इथेच अंड्याचे विचारचक्र सुरू झाले. आधुनिक राहणीमान, सतत बदलणारी जीवनशैलीमुळे आणि झपाट्याने प्रगत होणार्‍या तंत्रज्ञानामुळे आज कित्येक आवाज आपल्यातून हरवले आहेत, कित्येक दुरावले आहेत. अश्याच काही विसर पडलेल्या आवाजांचा अंड्याच्या मनाने सहज आढावा घेण्यास सुरुवात केली.

भायखळ्याला माझी मावशी राहायची. या अंड्यावर लहानपणापासूनच फार जीव तिचा. दिवाळी अन उन्हाळी सुट्ट्या पडल्या कि माझा मुक्काम तिथेच. आईशिवाय अंड्या राहू शकेल असे पृथ्वीतलावरील एकमेव घर. ‘माय मरो अन मावशी जगो’ अशी अचरट म्हण बनवणार्‍याच्या बोलण्यातही काही तथ्य होते हे तिथे जाणवायचे. मामे-मावस-आत्येभावांची टोळी जमली की रात्री लवकर झोपणे काही व्हायचे नाही. मग मध्यरात्रीच्या निरव शांततेत दोन हमखास ऐकू येणारे आवाज टिपायचा खेळ सुरू व्हायचा. त्यातील पहिला आवाज म्हणजे जवळच असलेल्या राणीबागेतील वाघ-सिंहाची डरकाळी. तो नक्की वाघ डरकाळायचा, सिंह गर्जना करायचा की अस्वलाची गुर्रगुर्र असायची हे तेव्हा समजायचे नाही. पण निदान कुत्रे भुंकल्यासारखा आवाज नसल्याने आणि आवाज राणीबागेतूनच येत असल्याने आम्ही त्या आवाजाचे बिल नेहमी वाघसिंहांवरच फाडायचो. दुसरा आवाज म्हणजे बाहेरगावी जाणार्‍या ट्रेनचा आवाज. हा आवाज भायखळा स्टेशनवरून न येता थेट मुंबई सेंट्रल स्थानकाहून येतो असे मावशी सांगायची. खरेही असेल, तेव्हा मोठे सांगतील तेच प्रमाण मानायचे वय. पण जसे वयात आलो तसे मावशीच घर सुटले अन ते आवाजही. मध्यंतरी कित्येक वर्षांनी मावशीकडे जाणे झाले होते तेव्हा ना सिंह गरजला ना ट्रेनने भोंगा दिला. कदाचित राणीबागेत आता दोनचार घुबडं अन माकडं सोडून फारसे वन्यजीव उरले नसावेत, आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने वाढत्या ट्राफिकच्या कर्णकर्कश्य हॉर्नमुळे लांबवरून येणारे ट्रेनच्या भोंग्यांचे आवाज दबले जात असावेत. त्या रात्री गप्पांमध्ये त्या दोन्ही आवाजांची आठवण मात्र काढली गेली ज्यांच्याशी आम्हा भावंडांच्या बालपणीच्या आठवणी देखील निगडीत होत्या.

त्या ट्रेनच्या भोंग्यासारखाच आठवणीतील एक आवाज गिरणीच्या भोंग्याचा. हा आवाज देखील फार जुना. सकाळी नऊ वाजता न चुकता कानावर पडणारा. आमचे घड्याळ किती पुढे आहे की मागे पडले आहे हे या भोंग्याच्या वाजण्यावरून ठरायचे. आईसाठी तर ती नऊची वेळ एक बेंचमार्क होती. तो भोंगा कानावर पडला की नऊ वाजले हे तिला समजायचे आणि तसे ती सकाळची तयारी शेड्युलनुसार चालू आहे की नाही हे ठरवायची. जर तयारी वेळेत नसेल तर, “अरे देवा नऊ वाजले. अजून कपडे धुवायचे बाकी आहेत. आज पाणी देखील मेले हळूहळू येतेय. ए चल आनंदा, तू चहा घे तोपर्यंत आपल्या हाताने, मला वेळ नाही आता…” हे तिचे ठरलेले पुटपुटने. तो भोंगा ही कुठे हवेत विरला देव जाणे. कोणत्या गिरणीचा वाजायचा ते ना आजवर मला कळले ना तेव्हा माझ्या आईला माहित होते. तरीही तो आमच्या दैनंदिनीचा एक भाग बनून होता.

असाच तेव्हा घराघरातून येणारा एक आवाज म्हणजे कूकरच्या शिट्ट्यांचा. सकाळची किंवा संध्याकाळची एक ठराविक वेळ झाली की थोड्याफार फरकाने वाडीतील प्रत्येक घरातून हा आवाज यायचा. सोबतीला असायचा तो एक मंदसा दरवळणारा वास. रविवारी हा वास तसा खासच असायचा आणि हे आवाजही त्या दिवशी आपली वेळ चुकवून किंचित उशीराच ऐकू यायचे. कपडे धुताना धोक्याने बडवताना होताना आवाजही याच कॅटेगरीतील, अन याच्या सोबतीलाही एक सुकत घातलेल्या कपड्यांचा वास असायचा. पण आज मात्र फ्लॅटच्या बंद दरवाजापाठी हे आवाज देखील अडकून राहिलेत.

हा संस्कृतीबदल केवळ चाळसंस्कृती अन फ्लॅटसंस्कृती पुरता मर्यादीत नसून सर्वच क्षेत्रात घुसला आहे. पैकी एक म्हणजे मंगलकार्ये. एकेकाळी लग्नसराईत हमखास ऐकू येणारा सनई चौघड्यांचा आवाजही लोप पावलाय. तेव्हा मात्र तेच तेच पॅंपॅपॅ काय सार्‍या लग्नात म्हणून अंड्या चिडायचाच, पण हल्ली काही लग्न समारंभ पाहता ते नुसते रिसेप्शन अन जेवणाच्या पार्टीपुरता असतात की काय असे वाटते तेव्हा त्या पारंपारीक सनई चौघड्याची कमतरता जाणवतेच.

या पिढीत हरवल्यासारखा वाटणारा अजून एक आवाज म्हणजे मुलांचा कल्ला. एक जमाना होता जेव्हा सुट्ट्या पडल्या की क्रिकेट फूटबॉल अन पतंगबाजी, खोखो कबड्डी अन भोवरापाणी, सकाळी उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत या मैदानी खेळांच्या नावावर वाडीभर नुसता कल्ला कल्ला अन कल्ला कान किटवायचा. आज मात्र मोबाईल विडीओगेम अन ईंटरनेट यांचाच बोलबाला. मुलांचा आवाज चिडीचूप अन या उपकरणांतून बाहेर पडणारे चित्रविचित्र बींप बींप पीब पीब चे आवाज. या आवाजावरून आठवले हल्लीच्या सिनेमांनी ध्वनीमुद्रणात अशी मजल मारली आहे की जुन्या सिनेमातील हाणामारीच्या प्रसंगांमध्ये येणारा ढिशुम ढिशुमचा आवाज आणि ठो करून सुटणारा बंदूकीचा बार देखील इतिहासजमा झालाय. त्या आवाजाने आम्हा बच्चे कंपनीला हिंदी सिनेमाशी एवढे एकरूप करून ठेवले होते की मारामारी म्हटले की आम्ही ढिशुम ढिशूम असेच बोलायचो.

कुल्फीवाल्याचा आवाजही हल्ली मिस करतो हा अंड्या.. कुल्फिय्ये SSS…. करत त्याने दिलेली बांग.. अन मग उगाच आईच्या आसपास घुटमळणे जे तिने माझे मन ओळखून दोन रुपये काढून द्यावेत.. अगदी यासारखीच आणखी एक बांग.. भांडीय्ये SSS…. ही ऐकल्यावर मात्र आजीच्या पदरामागे लपणे.. कारण ही भांडीवाली मस्ती करणार्‍या लहान मुलांना उचलून नेते अशी घातलेली भिती.. कुठे गेले हे सारे आवाज म्हणून शोधायचे म्हटल्यास आधी ते परत हवे आहेत का हा प्रश्न अंड्याला स्वत:च्या मनाला विचारावा लागला. अन याचे उत्तर त्यावाचून काही अडले नाही असेच मिळाले. काही गोष्टी आठवणी सजवायलाच चांगल्या वाटतात. पण एक आवाज मात्र या अंड्याला परत आणायला आवडेल, अन तो म्हणजे त्याचा स्वत:चा आवाज. मोठा होता होता तो देखील कुठेतरी दबला आहे. समाजाने प्रौढांसाठी बनवलेले शिष्टाचार पाळायच्या नादात या अंड्याने शेवटची दिलखुलास आरोळी केव्हा ठोकली होती हे आता तोच विसरला आहे. भारतीय संघ क्रिकेटचा सामना हरताना बघून टीव्ही समोर उभे राहून आपल्याच खेळाडूंना हलक्याश्या आवाजात घातलेली एक कचकचीत शिवी, तोच सामना जिंकल्यावर फटाक्यांनाही लाजवेल असा केलेला जल्लोष, तसाच काहीसा किंवा त्यापेक्षाही भारी असा जल्लोष जो शेजारच्या वाडीतील पतंग गुल केल्यावर व्हायचा, त्याच पतंग उडवायच्या गच्चीतून खालच्या हॉटेलवाल्या सदूशेठला दोन कटींग वरती पाठवायचा दिलेला आवाज, सबंध वाडीतील बत्ती गुल झाल्यावर उत्स्फुर्तपणे होणारा मुलांचा एकच कल्ला ज्यात अंड्याचाही एकेकाळी सिंहगर्जनेचा वाटा होता. हे सारे आवाज एकदा गवसले की मग कानांवर पडणारे इतर नवेजुने आवाज पुन्हा तसेच उपभोगता येतील, अन त्यापैकी कुठलाही हरवलेला आवाज चुटपुट लाऊन जाणार नाही याची अंड्याला खात्री आहे. तुम्हीही बघा तुमच्या आयुष्यातून स्वत:चा असा एखादा आवाज हरवला आहे का, अन असल्यास त्याला परत आणने शक्य आहे का..!

– आनंद उर्फ अंड्या

 

मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले. वाटेत सव्वाचार मिनिटांनी भमरसिंग मिठाई अन फरसाणवाला लागतो, येताना त्याच्याकडे खादाडी करून घरच्यांसाठी पण गरमागरम सामोसे घ्यायचा प्लान होता. मात्र प्लॅन थोडा चेंज करत पोटात किलबिलणार्‍या कावळ्यांना शांत करायला मी आधीच खादाडी करायचा निर्णय घेतला. तसेही कुठे मला डोंगरावर सूर्य नमस्कार मारायचे होते. जी काही भटकंती वा निसर्गाशी प्रणयाराधना करायची होती ती भरल्यापोटी करणे केव्हाही चांगलेच..

काल अवचितपणे पडलेल्या पावसामुळे वातावरण भन्नाटच होते. किंबहुना सकाळी उठल्यावर खिडकीतून पुर्ण मुंबईवर एक नजर फिरवून हे वातावरण बघूनच मी हा मॉर्निंग वॉल्कचा निर्णय घेतला. जेवढे उल्हासित खिडकीतून बाहेर नजर फिरवताना वाटले होते त्यापेक्षा जास्त बाहेर पडल्यावर वाटू लागले. वाटेत विचार आला की च्यायला सकाळी साडेसहा-पावणेसातला भमरसिंगकडे काय खायला मिळणार आहे. मात्र माझा अंदाज साफ चुकलाय हे मी समजून चुकलो जेव्हा तिथे जमलेली गर्दी मला लांबूनच दिसली. एवढ्या सकाळी खाण्याचे प्रकार मात्र मोजकेच होते, पण आवडीचे असेच होते. मी एक गरमागरम सिंगल समोसा आणि एक प्लेट फाफडा-जिलेबी मिक्स घेतली. याआधी कधी हे खाल्ले नव्हते असे नाही पण असे भल्या पहाटे खाण्यातील मजा काही औरच. ईसके उपर चाय तो बनती हि है म्हणून लागलीच भटाच्या टपरीकडे मोर्चा वळवला. हा खाण्यापिण्याचा प्रोग्राम उरकून मी डोंगराच्या मेनगेट पाशी येऊन मोबाईल चेक केला तर सात वाजून बारा मिनिटे झाली होती.

सव्वासात वाजले तरी वातावरण असे होते की सव्वाआठपर्यंत तरी सुर्याची कोवळी किरणे भूतलावर पोहोचणार नव्हती. मी कानातली गाणी चालू करून डोंगर चढायला घेतला. संगीताच्या तालावर श्रम फारसे जाणवत नाही हा स्वानुभव. तसेही डोंगर चढणे म्हणजे काही फार गड सर करणे नव्हते. मुळात जिथून चढायला सुरूवात करतो तो डोंगराचा पायथाच समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर असल्याने पुढे पाचेक मिनिटेच रमतगमत चालायचे असते. टेकडीच्या एका टोकावर असलेल्या देवीच्या मंदिराकडे न जाता मी जोसेफ बापटिस्टा गार्डनच्या दिशेने पावले वळवली. रस्त्यात अध्येमध्ये दिसत होती ती कुठल्या झाडाखाली, कुठल्या बेंचवर, कुठल्या कठड्यावर, तर कुठे पायरीवरच पेपर अंथरून.. अंह, प्रेमी युगुले नाही, तर शाळाकॉलेजातील मुले अभ्यास करत बसली होती. त्यांना पाहून माझे दहावी-बारावीचे दिवस आठवले. अश्या अभ्यासूंसाठी डोंगराच्या एका शांत भागात पण निसर्गाच्याच सानिध्यात सिमेंट कॉंक्रीटचे तंबू टाईप स्टडीकॅंप उभारले आहेत, मात्र त्या ठराविक जागेतच अभ्यास करण्यापेक्षा एवढ्या भल्यामोठ्या डोंगरावर वेगवेगळ्या जागा शोधत अभ्यास करण्यातच आम्हीही धन्यता मानायचो. वाटेतल्या झाडांवर कावळ्यांची कावकाव सुरू झाली होती, मात्र वर गार्डनमध्ये विविध पक्षी आजही गलका करत असतील अशी आशा होती. चला बघूया पुढे ते खरेच मला भेटले का ते..

तर, माझगाव परिसराला पाण्याचा पुरवठा करणार्‍या, डोंगरमाथ्यावर वसलेल्या टाकीच्या तळाशी, उजव्या हाताच्या गेटने मी गार्डनमध्ये प्रवेश केला. नेहमीची संध्याकाळची गर्दी नसल्याने पार दूरवर नजर जात होती. एक गार्डन, त्या पलीकडे दुसरे, त्या पलीकडे तिसरे … प्रत्येकाचा आपलाच एक आकार आणि आपलेच एक वैशिष्ट्य. कमीअधिक प्रमाणात कापले जाणारे गवत तर कुठे त्या गवताच्या रंगाची भिन्नता. प्रत्येक गार्डनची सीमारेषा आखणार्‍या फूलझाडांचेही सतरा प्रकार. प्रत्येकात असलेली बसायची सोय देखील वेगवेगळ्या आकार उकाराची. या सर्वांना सामाऊन घेणार्‍या परीघावरून फिरणारा जॉगिंग ट्रॅक, ज्यावर आपण काय किती धावलो हे कडेने लिहिलेल्या मार्किंग्सवर मोजत काही फिटनेस कॉशिअस स्त्री-पुरुषांचे धावणे सुरू होते. मी मात्र त्यांच्या वेगाला डिस्टर्ब न करता त्याच परीघावरून चालतच एक राऊंड मारून पुर्ण डोंगराला एकदा नजरेखालून घालायचे ठरवले. आरामात रमतगमत चालायचे ठरवले तरी सकाळचा फ्रेश मूड, आजूबाजुला धावणार्‍यांमुळे तयार झालेले उत्साही वातावरण आणि पायात असलेले स्पोर्ट्स शूज यांमुळे माझीही पावले झपाझप पडत होती.

अर्धी फेरी मारून झाल्यावर एक पाणवठा लागला, तिथेच नळाला तोंड लाऊन थंडगार पाणी आत टाकले. थोडे सवयीनेच तोंडावर शिंपडले आणि तोच ओला हात केंसांतून आरपार फिरवला तसे थंडी जाणवून गारठून निघालो. मात्र गालाला सुया टोचल्यासारखे वाटू लागल्याने मूड डबल फ्रेश झाला. पुढे दोन पर्याय होते, एक पुढे त्याच जॉगिंग ट्रॅकवर जावे किंवा चार पायर्‍या उतरून गार्डनच्या खालच्या अंगाला यावे. डोंगराचा एक कडाच तो ज्याला पुर्णपणे सुरक्षिततेचे कुंपण घातले आहे. त्या आत बसण्यासाठी म्हणून तसाच पुर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत कठडा फिरवला आहे. अर्थात मी तिथेच गेलो हे वेगळे सांगायची गरज नाही. तिथून खाली डॉकयार्ड स्टेशन दिसते तर समोर पसरलेला अथांग समुद्र, एक बंदर, जे भाऊचा धक्का म्हणून ओळखले जाते. रेल्वेच्या पुलावर, पर्यायाने उंचावर असणारे डॉकयार्ड स्टेशन देखील तिथून खूप खाली आहे असे भासते. खाली स्टेशनला लागणारी ट्रेन भातुकलीच्या खेळातली वा एखाद्या प्रोजेक्टच्या मॉडेलमधली आहे असे वाटावे. भाऊच्या धक्क्याच्या आसपास कुठलीही गगनचुंबी इमारत नसल्याने समुद्र अगदी काठापासून क्षितिजापर्यंत एकाच नजरेत बघता येतो. बंदराला लागलेल्या बोटी अन डॉकमधील मोठाली यंत्रे आणि क्रेन्स हा समुद्र इतर समुद्रांपेक्षा वेगळा आहे हे दर्शवत होते. जवळपास पाऊण एक तास मी तिथेच गाणी ऐकत बसून होतो, हळूहळू दक्षिण मुंबई शहराला जागे होताना बघत.

कोलाहल वाढू लागला, पक्ष्यांच्या किलबिलीची जागा फलाटावरच्या वाढत्या गर्दीचा गोंधळ घेऊ लागला, तसे मी उठायचे ठरवले. दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे अजूनही सुर्याची किरणे माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती. पण जसे पुन्हा मोकळ्या बगीच्यांमध्ये आलो तसे कोवळे उन जाणवू लागले. तो उबदारपणा हवाहवासा वाटू लागला. म्हणून आता तो उपभोगायसाठी डोंगरावरचा मुक्काम आणखी थोडा वाढवायचे ठरवले. एक बाकडा पकडून, अंह, त्यावर बसलो नाही तर त्याच्या कडेला माझे शूज काढून ठेवले आणि माझ्या आवडत्या प्रकारासाठी सज्ज झालो. दव पडलेल्या गवतावरून अनवाणी पायांनी चालणे. खाली तळपावलांना जाणवणारा थंडगार ओलावा, सोबत गुदगुल्या करत टोचणारी गवताची पाती आणि वर अंगाखांद्यावर खेळणारी सोनेरी किरणे. अंगावरची सारी वस्त्रे भिरकाऊन तिथेच लोळत पडावे असा मोह पाडणारा अनुभव घेत मी पुढची पंधरा-वीस मिनिटे फेर्‍या घालत होतो. या प्रकाराची संध्याकाळीही आपलीच एक मजा असते, खास करून डोंगराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कारंज्याच्या जवळचे एखादे गार्डन पकडावे, ते ही वार्‍याची दिशा अशी बघावी की कारंज्याचे तुषार त्या सुसाट वार्‍याबरोबर उडत येऊन आपल्याला पार न्हाऊन टाकतील. आयुष्यातल्या सार्‍या चिंता या प्रकारात विसरायला होतात. माझे अभ्यासाचे टेंशन तरी वेळोवेळी विसरायला मी हाच फंडा वापरायचो.

असो, तर त्याचवेळी घड्याळात वेळ चेक करून आता माहेरी गेलेली बायको उठली असेल या हिशोबाने तिला फोन लाऊन त्या गवतावर चालता चालताच तिच्याशीही दहा-पंधरा मिनिटे बोलून घेतले. आज आपला नवरा चक्क स्वताहून फोन करून चक्क दहा ते पंधरा मिनिटे बोलतोय आणि ते ही चक्क हळूवार आणि रोमॅंटीक.. एकंदरीत चक्क्राऊनच गेली ती बिच्चारी.

बस मग पुढे काय परतीचा रस्ता. उतरणीचा असल्याने तरंगतच उतरलो. तसेही दमण्यासारखे श्रमदान झाले नव्हतेच, किंबहुना दिवसभर, अंह आठवडाभर पुरणारा उत्साह घेऊन परतत होतो. वाटेत घरच्यांसाठी सामोसे पार्सल घ्यायला विसरलो नाही, आणि एकदाची स्वारी नऊच्या सुमारास घरी परतली !

——————————

सदर अनुभव आमच्या माझगावच्या डोंगराची जाहीरात करण्यासाठी लिहिला आहे. तर कधी आलात त्या भागात जरूर भेट द्याल. अन मलाही आवाज द्यायला विसरू नका. मी तिथून हाकेच्या अंतरावर राहत असलो तरी हाक न मारता फोन वा मेसेज करू शकता 🙂

– तुमचा अभिषेक

 

है दर्द दिल मे तो कागज पे उतार…

है दर्द दिल मे तो कागज पे उतार,
गीला होके कभी तो सूख जायेगा..

________________________________________
________________________________________

वोह खंजर दिल मे छुपाये रखे
कत्ल का बहाना ढूंढते रहे,
पर कंम्बख्त हमने एक ना दिया
वोह बस्स पीछे पीछे आते रहे..

________________________________________
________________________________________

आईने उतार दिये, हमने घर के सारे
के अब खुदका दिदार तक हमे, मंजूर नही..

________________________________________
________________________________________

वो कहते है हमे बेवफा हम नही,
और हमे तो बस उनपे यकीन करना आता है..

________________________________________
________________________________________

अपनो ने मुंह फेरा, तो गैरो को सुनाते है
कुछ लोग यूं ही, शायर कहलाते है..

अकेले रोया ना जाये, तो औरोंको रुलाते है
कुछ लोग तो यूं ही, शायर कहलाते है..

एक हद तक सेह लेते है, फिर कागज पे उतार देते है
कुछ लोग तो बस्स यूं ही, शायर कहलाते है..

मोहोब्बत को पाने से ज्यादा, खोने मे भरोसा रखते है
बस कुछ ऐसे ही लोग, शायर कहलाते है..

________________________________________
________________________________________

जो शराब पिते थे तो शराबी कहलाते थे,
जो आंसू पिने लगे, तो शायर कहलाने लगे..

________________________________________
________________________________________

जो प्यार से मांगो तो जान हाजीर है
वर्ना नफरत करने वालों की, बडी लंबी कतार है ..

________________________________________
________________________________________

तू क्या बरबाद करेगा, मुझे ए जमाने
तेरी खुद की तकदीर कोई और लिखता है..

________________________________________
________________________________________

ए गालिब तेरे चाहनेवाले, नफरत करने लगे है हमसे
वोह हुनर जिस मे तू माहीर था, कहते है हमने चुरा लिया..

– तुमचा अभिषेक

 

बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्‍याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते. म्हणजे ते स्वप्नातले दुरून आल्यासारखे वाटणारे सारे कर्णकर्कश्श स्वर अगदी सामोरूनच येत होते तर. अचानक मला बाईकवर फिरताना वा रस्त्याने चालतानाही कानात हेडफोन लावणारी आजची युवा पिढी गुणी बाळ वाटू लागली. आधीच या अंड्याला ईंग्रजी संगीतातला ओ कि ठो कळत नाही, आणि इथे तर ठो ठो करत वाजवली जाणारी वाद्ये कानठळ्या बसवत होती. रेहमानसाहेबांच्या अपवादात्मकच अश्या न आवडलेल्या ‘रॉकस्टार’ या रणबीरपटाची आठवण झाली. त्या संगीतातले शब्द तरी किमान ओळखीचे असल्याने त्यातच काही तरल भावना शोधायचा प्रयत्न केला होता पण इथे मात्र ते ही शक्य नव्हते.

काय करावे, काय करावे, या फर्स्टक्लासमधल्या माणसांना पटकन हटकताही येत नाही. सेकंडक्लासच्या डब्यात परप्रांतीयांचे ‘तुम तो ठहरे परदेशी’ ऐकण्यापासून वाचावे म्हणून फर्स्टक्लासच्या तिकिटावर खर्चा करावा तर इथेही परदेशी संगीत पिच्छा सोडत नाही. संगीत असावे तर आपल्या भाषेतले, आपल्या मातीतले.. ओढ लावतीss अशी जीवाला, गावाकडची माती.. साद घालतीss पुन्हा नव्याने, ती रक्तांची नाती.. मल्हारवारी आठवले तसे मी देखील स्वताचा मोबाईल काढून ते गाणे शोधायला घेतले. पण चाळताना लक्षात आले की ते घरच्या कॉम्प्युटरवरच पडून आहे. मोबाईलमध्ये कधी असे ऐकायला घेतलेच नाही. पण चाळता चाळता आणखी एका मराठी गाण्यावर नजर पडली आणि कामावर जाईलाss, उशीर व्हाईलाss, बघतोय रिक्षावाला ग्ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला.. स्सॉल्लिड, हे पण आपले एक फेवरीट ! कानावर पडले की बस उठून नाचावेसे वाटावं. पण आता सकाळच्या टाईमाला हे ऐकावे की न ऐकावे याचा विचार करता करताच एक क्लृप्ती सुचली अन चेहराच खुलला. आता काट्याने काटा निघणार होता. लावलेच ते गाणे फुल्ल वोल्युम करून. पाठोपाठ कोंबडी पळाली तयार होतेच, पण त्याची वेळ आलीच नाही. तिथवर पोहोचायच्या आधीच समोरून येणारे आवाज लोप पावले. तसे मी बॅगेतला हेडफोन काढून कानाला लावला आणि आतल्या आत गपचूप गाणे बंद करून शांत झोपी गेलो.

– o0Oअंड्या

 

अंड्याचे फंडे ७ – खादाडी

नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर “विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही” असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना.. तर हा भैय्या तिची फर्माईश ऐकून किंचित हडबडून गेला, मात्र ग्राहक हईच हमार भगवान बोलत जवळच पडलेल्या एका खरकट्या प्लेटमधील चमचा बादलीभर पाण्यात बुचकळून तत्परतेने तिच्या हातात ठेवला.

आता ही बया त्या चमच्याचा अगदी नजाकतदारपणे वापर करून एकेक करत ताटलीतील पाणीपुरी उचलून उचलून खाऊ लागली आणि इथेच अंड्या विचारात पडला…
काय राव, अशी चमच्याने पाणीपुरी खाण्यात कसली मजा आलीय, अंड्याला नाही झेपले हे काही. जोपर्यंत ती पाणीपुरी न फुटता, त्यातील पाणी न सांडवता, कसरत करत तोंडापर्यंत नेत नाही आणि नेमके तोंडाजवळ आल्यावर त्यातील पाणी गळायला सुरुवात होऊन ओठांच्या किनार्‍याने ओघळत हनुवटीवर येत नाही अन त्यापासून शरीराच्या इतर भागाला वाचवण्यासाठी आपण तोंड पुढे झुकवत नाही तोपर्यंत पाणीपुरी हा प्रकार खाल्यासारखा वाटूच शकत नाही.

म्हणजे बघा हा, उद्या कोणी तुम्हाला वडापाव काटाचमच्याने किंवा नूडल्स हाताने खायला लावले तर मजा येईल का? वेज-पनीर-शेजवान रोल म्हणजे आजकाल फ्रॅंकी की काय बोलतात ते उलगडून चपातीभाजी सारखे खाऊ घातले तर….. तर कदाचित मूळ पदार्थाची चव तशीच राहील. मान्य. मात्र ते खाण्यातील लज्जत तशीच जाणवेल का? पण असतात एकेकाच्या खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी. हे असले प्रकार करताना एकेक नग आजूबाजुला बरेच दिसतील. अहो सॅंडवीचमधील एकेक काकडी टमाटर वेचून खाणारे लोक पाहिलेत या अंड्याने. जाब विचारला तर म्हणतात की आमच्या जबड्यात अख्खे सॅंडवीच नाही घुसत. वा रे वा. मग घेता कशाला तसे बनवून. बिचार्‍या त्या सॅंडवीचवाल्याची ही मेहनतही वाया घालवता. त्यापेक्षा हारवाल्याकडून जसे देवाच्या हाराबरोबर सुट्टी फुले मागून घेतात तसे चटणीपावाबरोबर सुट्टे कांदा टमाटर अन काकडीचे तुकडे शेपरेट घ्या की राव..!!

बाकी काही जणांचे कॉंबिनेशनही हटके असतात राव. त्यातले काही प्रकार अंड्याच्या आकलनापलीकडलेच. अश्यापैकीच एक म्हणजे कोलसवलेला भात अन चपातीचा घास…
च्यामारी..!! अंड्याच्या आवडीची भाजी नसली तर अंड्या एकवेळ लोणचे चपाती खाईल पण डाळभाताबरोबर चपातीचा घास घेणे म्हणजे. काय राव, काय चव लागत असेल याची कल्पनाही नाही करवत. एका अश्याच महाभागाला मी विचारले तर तो उलट मलाच म्हणाला, “शेवटी सगळे पोटातच जाणार ना…”
घ्या.. आता काय बोलणार.. राजा मग पाणी ही ओत की त्यात आणि सारेच एकत्र कोलसवून खा. ते तरी कशाला वेगळे पितोस..

आता आमच्या घरातही असे काही महाभाग भरले आहेत. माझा दूरचा भाऊ आहे एक, जो चहात फरसाण किंवा खारी कुस्करून टाकतो आणि हातात फावडे धरल्यासारखे चमचा घेऊन त्याचा फडशा पाडतो. एवढेच नव्हे तर केकसुद्धा बिस्किटसारखा चहात बुडवून खातो. नशीब यासाठी तो क्रीमचा नाही तर माव्याचा केक वापरतो. पण यासाठी त्याला अंड्याचा केकही चालतो. त्याचेच पाहून मी देखील एकदा ट्राय केले आणि………………………………… बॉक बॉक बॉक..!!
डॉक्टर म्हणाला, बे अंड्या, अंड्याचा केक चहात बुडवून खाल्लास त्यानेच मळमळले की.. बस्स तोच पहिला आणि शेवटला प्रयोग. अंड्याने त्या दिवशीच अंड्याशी कोणताही खेळ न करायचे ठरवले. अन या सार्‍यातून एकच चांगले झाले की माझे बघून आणि डॉक्टरचा सल्ला ऐकून त्या धास्तीने माझ्या भावानेही अंड्याचा केकच खाणे सोडले.

………….मात्र फरसाण तो अजूनही चहात टाकून खातोच. खास करून तिखट शेव. जाब विचारला तर कारण बघा अन काय देतो, “असे फरसाण चहात टाकून खायला भारी मजा येते ती येतेच, मात्र त्यातील मसाला चहात मिसळल्याने चहाचीही मस्त तिखट झणझणीत मसाला चाय बनते.”
…………अरे राजा, मसालादूध, मसाला चाय म्हणून वेगळा असा खास प्रकार मिळतो रे जगात, त्यासाठी असला काही प्रयोग करायची गरज नाही, हे त्याला आता कोण समजवणार. उद्या फिल्टर कॉफीला बरर्रफ मार के कोल्ड कॉफी बनवशील तर कसे चालेल.

चहा वरूनच आठवले, की एकवेळ हे परवडले पण काही जणांना ग्लुकोजच्या बिस्किटांचाही चहात लिबलिबित लगदा करून खायची सवय असते. आता दात नसलेल्या आजोबांचा नाईलाज असतो म्हणून त्यांनी शोधलेला हा खाद्यप्रकार. पण त्यांच्या दात आलेल्या नातवंडांना कसा गिळवतो हे एक अंड्याला न उलगडलेले कोडे.

पण काही जणांना असे वेगवेगळे प्रयोग करायची सवयही असते बरं का. फार लांब कशाला जा, आमच्या घरचे काकाच आहेत असे. पावामध्ये फरसाण घालून खातात आणि त्याला सुका मिसळपाव बोलतात. भातामध्ये तर काय काय घालतील याचा नेम नाही. फोडणीच्या भातात द्राक्षे अन डाळिंबाचे दाणे घालणे म्हणजे कहर बोलू शकतो. नशीब आता त्याला दाबेलीभात नाही बोलत.

कधी कधी अश्यांचे प्रयोग आवडून ही जातात हे ही खरेय. याच काकांमुळे मी पावभाजीची भाजी आणि पावाच्या जागी साधा डोसा हे हटके कॉम्बिनेशन खायला शिकलो. हॉटेलमधील वेटरही अश्यावेळी कौतुकाने बघतात हा माझा यावरचा अनुभव. मी तेवढ्यावरच थांबलो मात्र काकांचे आजही हक्का नूडल्स, वेज मंच्युरीअन, अमेरीकन चॉप्सी असे नाना प्रकार डोश्यामध्ये लपेटून खायचे प्रयोग चालूच आहेत. आनंदा, कधीतरी हे अमुकतमुक नक्की ट्राय करून बघ असे अधूनमधून सुचवतही असतात.

चायनीज फूडबद्दल तर बोलायलाच नको, मुळात तो आपला भारतीय खाद्यप्रकार नसल्याने प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने खातो. लहान असताना चायनीजच्या गाड्या रस्तोरस्ती दिसायच्या, तेव्हा ते नवीनच फॅड होते. आमच्या पॉकेटमनीमध्ये तेव्हा फक्त सूपच परवडायचे म्हणून तेच खाल्ले जायचे. कधीतरी पार्टी असल्यास वाढीव बजेट नुसार फ्राइड राइस घेतला जायचा. तेव्हाही आमच्यात सूप हे राईसच्या आधी घ्यायचे की नंतर यावरून नेहमी वाद व्हायचा. अर्धे जण त्याला स्टार्टर मानून आधी प्यायचे तर अर्धे जण डेझर्ट मानून नंतर. मी मात्र नेहमी आधीच घ्यायचो आणि याचे कारण म्हणजे त्यातील अर्धे सूप पिऊन अर्धे मी फ्राइड राईसमध्ये टाकायचो अन्यथा तो सुकासुका तळलेला तेलकट भात माझ्या घशाखाली नाही उतरायचा. आता हे कधी कोणाला विचित्र वाटले नाही आणि वाटले असते तरी अंड्या काही सोडणार नव्हता, ना आजवर ही सवय सोडलीय.

काही प्रकार एखाद्या ठिकाणची खासियत असते, मात्र इतरांना नाही झेपत ते. अश्यापैकीच एक म्हणजे मिसळीच्या जोडीला स्लाईस पाव. मध्यंतरी बाहेरगावी एके ठिकाणी जाणे झाले होते तेव्हा या प्रकारच्या मिसळपावचा अनुभव आला. साधारण गोडूस चवीचे असणारे हे स्लाईस ब्रेड कसे लोक मिसळीबरोबर खाऊ शकतात देव जाणे. कदाचित जवळपास चांगले पाव मिळत नसतील किंवा चांगले बनवता येत नसतील, कदाचित मिसळच काही खास नसावी ज्याबरोबर मग पाव खा किंवा ब्रेड खा एकच, अथवा मुद्दाम वेगळेपणा दाखवायचा अट्टाहास असावा वा तेथील ग्राहकांचीच अशी आवड असावी, जे काही कारण असेल ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. अंड्याला मात्र मिसळ किंवा पावभाजीसारखा तिखट झणझणीत प्रकार असो वा चिकन-मटण वा अंड्याची भुरजी, त्याबरोबर भट्टीचे पावच लागतात. शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर हा चवीचा मामला आहे, आपल्या आपल्या चॉईसचा मामला आहे..!!

– आनंद उर्फ अंड्या

 

अंड्याचे फंडे ६ – शॉपिंग मॉल

अंड्याने तिसर्‍यांदा पलटून पाहिले. अन खात्री केली की ती पुतळाबाईच आहे. फसलोच जरा, पण अंड्याची फसायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बरेचदा असे होते ना, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरताना, कृत्रिम चेहर्‍यांच्या गर्दीमध्ये, एखादा टवटवीत चेहरा उठून दिसावा. आपला चेहरा हरखून यावा, पण निरखून पाहता तो कपड्यांचे प्रदर्शन मांडण्याकरता उभारलेला मानवी पुतळा निघावा. एखाद्या मेनकेचा असल्यास एवढा कमनीय बांधा निर्जीव असल्याची हळहळ वाटावी अन मदनाचा निघाल्यास पुतळादेखील आपल्यापेक्षा रुबाबदार दिसतो कसा याची जळजळ वाटावी.

थोड्यावेळासाठी का होईना त्या अत्याधुनिक अन फॅशनेबल वस्त्रांनी सजलेल्या मॉडर्न मेनकेला जिंवत कल्पले आणि तिथून निघणार इतक्यात दादाची हाक ऐकू आली. अरे हो, दादा इथे कसा काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही.. तर दादाच नाही वहिनी देखील सोबतीला होत्या. अंड्याच्या दादा वहिनींची दर दुसर्‍या महिन्याला ‘अन्न-वस्त्र-निवारा’ पैकी ‘वस्त्र’ या गरजेची पुर्तता करण्यासाठी जोडीने अश्या मॉल्सची भटकंती चालूच असते. हा अंड्या त्यांना, खरे तर दादालाच सोबत करायला म्हणून त्यांच्याबरोबर फिरतो, पण स्वतासाठी म्हणून काही घेत नाही. कारण अंड्याचा सरळ हिशोब आहे, कपडेखरेदी नेहमी फुरसतीने वेळ काढूनच करावी, घाईगडबडीचा हा खेळ नाही. जसे एखादी कार घेताना, घर घेताना आपण सावधगिरी बाळगतो तेवढाच चोखंदळपणा कपडे घेताना दाखवा. भले तुमच्याकडे कितीही पैसा उतू का जात असेना, वा पैश्याची तंगी का असेना, निव्वळ लज्जानिवारणाला काहीतरी घ्यायचेय म्हणून घेऊ नका राव. तुमचे कपडे हेच तुमच्या व्यक्तीमत्वाचे फर्स्ट इम्प्रेशन असते आणि या धावपळीच्या युगात जिथे पहिल्या नजरेतच लोकांना शॉर्टलिस्ट केले जाते तिथे समोरच्याने तुम्हाला दुसरा चान्स दिलाच नाही तर तेच लास्ट इंप्रेशन होऊ शकते.

…..तर दादाची हाक म्हणजे नक्कीच वहिनींचे काही सिलेक्टेड कपडे घेऊन ट्रायल रूमच्या दिशेने प्रस्थान झाले असणार. अन दादा आता सुटलो एकदाचे म्हणत मला बोलावत असणार. बिचारा तो तरी काय करणार, बायकोच्या बरोबरीने खरेदीला जावे तरी त्रास अन न जावे तर खिश्याला धोका. शेवटी आपण उच्च मध्यमवर्गीयांना आर्थिक फटका पडण्यापेक्षा दगदगीचा फेरफटका केव्हाही परवडला. वहिनी जेव्हा ट्रायल घेण्यासाठी म्हणून पाचपन्नास कपडे निवडतात, तेव्हा कुठे दादाची या वहिनी कपडेवाहिनी’च्या माध्यमातून सुटका होते. अर्थात, हे ही नसे थोडके, कारण अश्या बरेच जोड्या आजूबाजुला दिसतात ज्यात “ती” ट्रायल घ्यायला आत गेली असताना “त्या”ला बाहेर उभे राहावे लागते. मग ती एकेक कपडे बदलून बाहेर येत त्याला दाखवणार अन तिचा तो लांबूनच कसे दिसते हे सांगणार. वरवर पाहता हे सोपे वाटले तरी फार जोखमीचे काम असते राव. तिचे ते दहाबारा कपड्यांमध्ये दिसणारे वेगवेगळे रूपडे लक्षात ठेवून नंतर मग कश्यात ती छान दिसते अन कश्यात ध्यान दिसते हे त्याला सांगायचे असते. त्यातही त्याची आणि तिची मतं जुळली तर ठिक, अन्यथा परत वादाला आमंत्रण आहेच.

हे सारे पाहता, या लेडीज ट्रायलरूममध्ये आरसे नसतात का राव, असा प्रश्न अंड्याला नेहमीच पडतो. खरे तर कित्येकदा तिला समजलेच नसते की तिला आपल्या आवडीचे कपडे घ्यायचे आहेत का त्याच्या.. कि या आधी आपल्या आवडीचे कपडे घालणार्‍या तिला आता त्याला आवडतील असे कपडे घालायचे असतात, तिचे तीच जाणे..

मागे अंड्याने अशीच एक जोडी पाहिली होती, ज्यात तिचा तो चक्क दोन्ही हातांची बोटे वापरून प्रत्येक ड्रेसला दहापैकी गुण देत होता. कोणाचे काय तर कोणाचे काय, पण आमच्या दादाने यातून सुटका मिळवली ती अशी, की वहिनी ट्रायल रूमच्या बाहेर यायची पण या महाशयांचे ध्यान कुठेतरी भलतीकडेच. तिथे त्या सर्वांसमोर शुकशुक करण्याचीही सोय नसल्याने शेवटी वहिनीनेच त्याला आपल्याबरोबर ट्रायलरूमकडे न्यायचा नाद सोडला.

……बाकी कोणी काही म्हणा, मुलींची हि ट्रायल घ्यायची सवय केव्हाही चांगलीच, जी मुलांमध्ये तुलनेने कमीच आढळते. अंड्या मात्र कोणताही कपडा ट्राय केल्याशिवाय घेत नाही. भले एखादे शर्ट हॅंगरवर चांगले का दिसत असेना, ते घातल्यावर तुम्ही स्वत: हॅंगर दिसू शकता. पॅंट बाबत म्हणाल तर तिच्या लांबी रुंदी अन फिटींगला अनन्यसाधारण महत्व आहे. एखादे पादत्राण खरेदीच्या वेळी निव्वळ चालून बघणे पुरेसे असते पण पॅंट घेताना मात्र चालून बसून उठून, वेगवेगळ्या पोजिशन अन वेगवेगळ्या अ‍ॅंगलने न्याहाळल्याशिवाय ती कधीच घेऊ नये. अंड्या तर साधा रुमाल घेतानाही त्याच्या चार प्रकारे घड्या घालून बघतो आणि मगच काय ते ठरवतो.

आता विषय निघालाच आहे, तर खरेदीसाठी आणखी ही काही टिप्स देईन म्हणतो हा अंड्या तुम्हाला.
पहिली म्हणजे दादावहिनीच्याच अनुभवावरून, जेव्हा स्वत:साठी म्हणून कपडेखरेदी करायची असेल तेव्हा चुकूनही बायको, प्रेयसी किंवा खास मैत्रीण असे नाजूक नातेसंबंध राखून असणारी कोणतीही स्त्री बरोबर नेऊ नका. बहीण असल्यास हरकत नाही, कारण ती कधीही आपल्या वैयक्तिक आवडीत ढवळाढवळ न करता जमल्यास प्रामाणिक मतच देते.
दुसरे म्हणजे अमुक तमुक रंगाचाच कपडा घ्यायचा आहे असे कधीही ठरवून जाऊ नका, एकवेळ अमुकतमुक रंगाचा कपडा घ्यायचाच नाही असे ठरवून गेल्यास हरकत नाही.
एखाद्या दुकानात जाऊन तिथे टेबलवर ढिगारा करून बघण्यापेक्षा दूरवरून फिरता फिरता सहज शोकेस किंवा हॅंगरला लटकवलेल्या कपड्यांवर नजर टाका, जे त्या कपड्यांच्या भाऊगर्दीतही पटकन नजरेत भरेल तेच आपल्या आवडीचे.
दुकानदाराला त्याचे मत स्वत:हून कधीही विचारू नका. तो स्वताहून जी बडबड करतोय त्यावर तर कधीच डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. बरेचदा त्यांना न खपणारा माल कोणाच्या तरी गळ्यात मारायचा असतो म्हणून ते चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले बोलतात. बरेचदा असे दुकानदार आपला विश्वास जिंकण्यासाठी म्हणून मुद्दामहून स्वत:च आपल्याकडचे एखादे कापड खराब प्रतीचे आहे असे सांगतात. अश्यावेळी गहिवरून न जाता शांत डोक्याने त्यामागचा त्यांचा डाव लक्षात घ्या.

या दुकानदारांच्या बडबडीवरून आठवले, यांना टाळण्यासाठीच म्हणून हल्ली मॉलमध्ये शांतपणे कपडे न्याहाळत फिरणे बरे वाटते. खरे तर यातूनच विंडो शॉपिंगची कल्पना पुढे आली असावी. शिरलोयच दुकानात तर घेतलेच पाहिजे असे काही दडपण नसले की कसे जरा खुलून खरेदीचा आनंद लुटता येतो नाही. पण कधी कधी हे सुख हिराऊन घ्यायला ही कोणीतरी कडमडतोच. आजचेच घ्या ना. दादावहिनीला एकटे सोडून अंड्या स्वत:च्याच धुंदीत रॅकवर ठेवलेले कपडे वरखाली करत, पाश्चात्य संगीताच्या मंद तालावर सहज ठेका धरलेली आपली पावले नाचवत असताना अचानक पाठीमागून आवाज आला, “मे आय हेल्प यू सर?”. वळून पाहिले तर टापटीप गणवेषातील एक सेल्समन हुकुम मेरे आकाच्या आविर्भावात उभा. पटकन काय बोलून त्याला कटवावे हे थोडावेळ न समजल्याने भांबवायलाच झाले. माझ्या याच अवस्थेचा फायदा घेऊन मग त्याने मोठमोठ्या ब्रॅंडची नावे घेत आणखी एक-दोन ईंग्लिश वाक्ये झाडली. उत्तरादाखल अंड्याने ईंग्लिशमध्ये एखादे वाक्य उच्चारले अन जे नेहमी होते तेच झाले. त्याने स्वत: मराठी सुरू केले. कोण म्हणते की मराठी मुलांना नोकर्‍या नाहीत, समोरची नोकरदार मुले मराठी आहेत हे आपल्यालाच ओळखता येत नाही एवढेच. बरे तो होताही इतका स्मार्ट की त्याच्यासमोर अंड्यालाच दबल्यासारखे वाटले. थोडावेळ मग आपण काय बघायला आलोय हेच न सुचल्यासारखे झाले. बरे आता त्याच्याच मॉलमध्ये येऊन त्यालाच “जा बाबा आता” कसे बोलायचे हे देखील अंड्याला समजत नव्हते. खरी पंचाईत अशी झाली होती की अंड्याला सवय आहे, प्रत्येक आवडलेल्या कपड्याची किंमत लागलीच चेक करायची, अन नेमके हेच त्याच्यासमोर करायला संकोच वाटत होता. या प्राईज टॅगवरून आठवले जेव्हा एखाद्या आवडलेल्या पण महागड्या वाटणार्‍या कपड्याच्या किंमतीचा लेबल पटकन सापडत नाही तेव्हा या अंड्याची जरा धांदलच उडते. मग जवळच्या एखाद्या तश्याच कपड्याची किंमत बघून अंदाज लावायचा प्रयत्न केला जातो पण जवळपास दिसणार्‍या एखाद्या फिरत्या विक्रेत्याला विचारायला किंचित संकोचच वाटतो. अश्यावेळी होते काय तर एखादी वस्तू आपल्याला आवडली आहे हे आपल्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत असते मात्र तोच चेहरा किंमत खिश्याला परवडत नसल्याचे आपल्याही नकळत कबूल करत असतो. चेहर्‍यावरचे हे भाव लपवणे देखील एक कलाच असते राव.

कलेवरून आठवले, शॉपिंग हे एक शास्त्र असेल तर बार्गेनिंग एक कलाच म्हणायला हवी, जी मला जराही अवगत नाही. त्यामुळेच मला मॉलमध्ये शंभरेक रुपये जादा खर्च करून का होईना, फिक्सड रेट मध्ये खरेदी करणेच परवडते. किमान फिक्सड लिमिटमध्येच फसवलो गेलोय याचे समाधान मिळते. अन्यथा पाचशे रुपयांचा पट्टा समोरच्याला चारशेला मागावा आणि त्याने काहीही घासाघीस न करता हसत हसत देऊन टाकावा, की मग आपल्याला नक्की किती रुपयांचा गंडा पडलाय याच हुरहुरीत रात्र निघावी अन प्रत्येकवेळी तो पट्टा घालताना, तू नक्की कितीचा आहेस रे? हे त्यालाच विचारत राहावेसे वाटावे.

बाकी या फिक्सड रेटमध्येही मग कधीतरी सेल लागतो आणि एकावर एक किंवा दोनावर तीन फ्री देणे या लोकांना कसे परवडते हे अंड्याला आजवर न उलगडलेले कोडे.

खरे तर या कमीपणा वाटणे वगैरे भावना आपल्याच मनात निपजत असतात, पण या मोठमोठ्या शॉपिंग मॉल्समधील काही चाणाक्ष सेल्समन मात्र आपले गिर्‍हाईक अचूक ओळखण्यात तरबेज असतात. समोरचा माणूस फाटका असला तरी त्याला हे त्याची जाणीव करून देत नाहीत. महागड्यातील महागड्या वस्तू देखील असे काही बिनदिक्कतपणे दाखवतात की त्यांच्या या अश्या वागण्याने आपल्यालाच आतून कुठेतरी सुखावल्यासारखे होते, की राव याने आपल्याला एवढ्या महागड्या वस्तू वापरणारा हाय प्रोफाईल माणूस समजले. असेही काही लोक असतात ज्यांना कमीपणा वाटतो की महाग आहे वा परवडत नाही, असले कारण सांगून नकार देणे. तर असे मिशिला तूप लावत फिरणार्‍यांना देखील हे विक्रेते पटकन हेरतात. यांची काही ठरलेली शब्दफेक म्हणजे, ये कपडा पहनोगे ना साहब तो एकदम रिच (श्रीमंत) लगोगे, चार लोग पूछेंगे कहासे लिया.. हा बघा भाऊ एकदम ईंग्लिश कलर (हा नक्की कुठून आला देव जाणे), भले कापड देशी खादीचे का असेना, कलर ईंग्लिश आहे ना, तर मग झालं.. ईंग्लिश अन इंपोर्टेड म्हटलं की सारेच भारी.. ५० रुपयांची कॉफीही मग स्वस्तच वाटते.

तर कधी या उलट ही अनुभव येतात. मागे अश्याच एका कपड्यांच्या दुकानात हा अंड्या गेला होता. तिथे रॅकवरचे एक शर्ट आवडले. ते दाखवा म्हणून विनंती केली, तर ते महाग आहे, अमुक तमुक किंमतीचे आहे, थोडक्यात तुम्हाला परवडणारे नाहिये अशी थोबाडीत मारल्यासारखी समोरून प्रतिक्रिया आली. खरे तर त्याने जी किंमत सांगितले होती ती तशी थोडीफार माझ्या बजेटच्या वरच होती, नाही असे नाही. पण मी दुखावलोच जरा. बरोबरचा माझा मित्र तर हि गोष्ट दुकानमालकाच्या कानावर घालणार होता हे, पण मीच त्याला थांबवले. तरी पुर्ण विनम्रतेने त्या विक्रेत्याला सांगावेसे वाटले, की बाबा रे, तू आहे तिथेच राहणार, यापेक्षा जास्त प्रगती नाही करू शकणार.

असो, का कुणाचे वाईट चिंता. पण आता त्या पाठीमागे उभ्या असलेल्या सेल्समनला कटवण्यापेक्षा अंड्याने स्वताच तिथून काढता पाय घेणे उचित समजले. शर्ट-पॅंट पुन्हा कधी तरी बघू म्हणत टीशर्ट कुठे मिळतील हे त्यालाच विचारून तिथून निघालो. हो हो, हे त्यांनाच विचारणे गरजेचे असते हां. एखादा पत्ता शोधताना आपण रस्त्यावरच्या कोणालाही विचारतो तसे इथे चालत नाही. इथे मॉलमध्ये तुम्ही असे कोणालाही विचारल्यास त्या समोरच्या व्यक्तीला आपण सेल्समन आहोत की काय या विचाराने अपमानित झाल्यासारखे वाटते, कित्येक लोकं चिडतातही. भले मग एखाद्याची मिळकत त्या सेल्समनपेक्षा कमी का असेना, भले मग ते सेल्समन त्या लोकांपेक्षा कैकपटीने स्मार्ट का असेनात. कोणत्या कामाला छोटे समजू नका असे वरवर जरी आपण बोलत असलो तरी कोणी आपल्याला गैरसमजाने का होईना सेल्समन समजले तर कित्येकांना याचा रागच येतो. बाकी हॉटेलमध्ये एखाद्याला चुकून वेटर समजणे हा तर त्यापेक्षा डेंजर प्रकार राव. पण त्यावर पुन्हा कधीतरी..

तर, टी-शर्ट विभाग हा मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर आहे असे समजताच जवळच पार्क केलेली कांदाबटाट्याच्या झोळीसारखी बास्केटबॅग उचलून अंड्याने त्या दिशेने कूच केली. अरे देवा, पण जसे त्या मजल्यावर प्रवेश केला तसे दोनचार सेंट विकणारे बाटल्या फुसफुसवतच अंगावर आले. त्यांना कसेबसे टाळले तसे घड्याळ, गॉगल विकणारे सामोरे आले. त्यांना पटकन टाळणे जमले नाही म्हणून किंमतींवर सहज नजर टाकली अन अंड्या चक्रावूनच गेला. वाटले त्या विक्रेत्याला हातातले घड्याळ दाखवावे आणि स्पष्टच सांगावे, बाबा हे बघ, मी या बजेटमध्ये घालतो. यातच असेल तर दाखव किंवा ते ही नको दाखवूस, अजून दोन वर्षे मी हेच चालवणार आहे. आमच्यात कपड्यांसारखे चार-चार घड्याळ बाळगायची पद्धत (खरे तर ऐपत) नाही आहे रे.

अर्थातच, त्यालाही पाठीमागे सोडून अंड्याने आता इथे तिथे लक्ष न देता जे घ्यायची शक्यता आहे अश्या टी-शर्टवरच लक्ष केंद्रीत केले. वर्तुळाकार स्टॅंडला लटकावलेल्या एकेका टी-शर्टला हातानेच स्पर्शून स्टॅंड बाय स्टॅंड पुढे जात असता मी कधी लेडीज सेक्शनमध्ये शिरलो हे माझे मलाच समजले नाही. तिथलेही टी-शर्ट की टॉप काय ते आम्हा मुलांच्या कपड्यांपेक्षा दिसायला फारसे वेगळे असे नसल्याने अंड्या ते चाळून बघत असतानाच तेथील एक सेल्सगर्ल पटकन पुढे येऊन म्हणाली, “सर, ये लेडीज के लिये है” … “ऑं” … “सर ये लेडीज सेक्शन है, जेन्टस के लिये उस तरफ….” अंड्याला एकदम खजील झाल्यासारखं वाटले. आजूबाजुला नजर भिरभिरवली तर खरंच की, इतर स्टॅंडसना मुलींचेच ड्रेसेस लटकवले होते. समोर अजूनही ती मुलगी माझ्याकडे बघत, स्मितहास्य करत उभी होती. जवळपासच्या चार प्रश्नार्थक नजराही, “कुठून कुठून येतात ही असली लोक?” अश्या मुद्रेने माझ्याकडे लागल्या होत्या. प्रसंगावधान राखून मी उत्तरलो, “हो हो तर, पता है मुझे. मै अपने गर्लफ्रेंड के लिये ही देख रहा था…” बस्स एवढे बोलून अंड्या तिथून सटकला ते पुन्हा मागे वळून काही पाहिले नाही. कारण अंड्या कुठल्याही अ‍ॅंगलने गर्लफ्रेंडधारी वाटत नसल्याने थाप पचणे जरा अवघडच होते. तसेच तेथील टी-शर्ट अंगाला लाऊन समोरच्या आरश्यात न्याहाळताना देखील त्यांनी मला पाहिले असावे. परीणामी पाठून दोन चार फिदीफिदी हसल्याचे आवाज ऐकू येत होते, पण अंड्या मात्र त्याकडे लक्ष न देता फिरत्या जिन्यावरून पटपट पाऊले टाकत उतरत होता…

– अंड्या उर्फ आनंद

 

अंड्याचे फंडे ५ – शर्यत

मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्‍यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती. संध्याकाळी साडेपाच सहाची वेळ. उतरणार्‍यांना घरी जायची जेवढी घाई होती त्यापेक्षा जास्त चढणार्‍यांना जागा पटकवायची. त्यामुळे ज्या बाजूचा लोंढा जास्त त्यांची सरशी असा हा खेळ. समोरच्या गर्दीला हरवण्याच्या नादात प्रत्येक जण स्वत:च त्या गर्दीत हरवत होता. भारताने कधीकाळी ऑलिंपिकमध्ये रग्बी खेळात संघ उतरवला तर त्यात आठ-दहा जे काही खेळाडू असतात त्यापैकी निम्मे लढवय्ये तर याच लोकल ट्रेनच्या गर्दीतून मिळावेत.

अंड्या मात्र निवांत होता. आजच्या दिवसाचे काम उरकले होते. आता घरी पाचदहा मिनिटे लवकर पोहोचून काही विशेष घडणार नव्हते. आजूबाजूचे सारे मात्र उगाच इथे तिथे पळत असल्यासारखे वाटत होते. जे एकाच दिशेने पळत होते त्यांना बरोबरीचे सारेच पळत असल्याने आपल्या पळण्याचा वेग जाणवत नव्हता. अन जे विरुद्ध दिशेने पळताना दिसत होते त्यांचा वेग दुप्पट भासत असल्याने नकळत स्वताच:च वेग वाढवत होते. जणू एक शर्यतच लागली होती. स्वत:शी, इतरांशी की घड्याळ्याच्या काट्यांशी हे कोडे मात्र अंड्याला उलगडत नव्हते. सकाळी ऑफिसला वेळेत पोहोचायची घाई समजू शकते, मात्र कामावरून घरी परतायची घाई कसली याचा विचार करत अंड्या त्या गर्दीला वाट करून देत एका बाजूला उभा राहिला.

जवळपास तरुणाई टोळक्याटोळक्यांनी उभी होती. सारेच ग्रूप खांद्याला बॅग लटकवलेले अन आधुनिक वेषभुशेतील असले तरी त्यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ग्रूप कोणता आणि ऑफिसहून परतणारे कोण हे त्यांच्या देहबोलीवरून लक्षात येत होते. दिवसभर दंगा करूनही तोच उत्साह महाविद्यालयीन युवकांमध्ये सायंकाळीही झळकत होता तर दिवसभर ड्यूटी करून थकलेल्या चाकरमान्यांना मात्र घराची ओढ लागली होती.

भेsssल करत, भेळवाल्याचा आवाज कानावर पडला अन अंड्याला भूक लागल्याचे जाणवले. आवाजाचा कानोसा घेईपर्यंत तो देखील पळणार्‍या माणसांमागे दूर पळताना दिसला. ‘फास्ट’ फूड यालाच म्हणत असावे. अंड्या मात्र निवांत असल्याने या फास्ट फूड जनरेशनचे निरीक्षण करत तिथेच उभा राहिला. थोड्यावेळाने फलाटाच्या त्या टोकाला पोहोचून तोच भेळवाला परतून आला. शेवटचे हात मी कधी धुतले होते आणि त्यानंतर ते कुठे कसे वापरले होते याचे भान न राखता सवयीनेच त्याच्या टोपलीत हात घालून कुरमुर्‍यांचा कुरकुरीतपणा चेक केला. पिचकलेच दोन बोटांच्या चिमटीत पण दुसरा पर्याय नसल्याने वेळेला केळं म्हणत एका भेळेची ऑर्डर दिली.

भेळ हातात घेऊनच ट्रेनमध्ये चढलो. नवीनच दिसत होती राव. सेकंडक्लासचाच डब्बा, पण आधीच्या लाकडी बाकड्यांच्या जागी सोफा सीट बसवल्या होत्या. अगदी फर्स्टक्लास इतक्या मऊशार नव्हत्या पण सरकारला गरीबांचीही काळजी आहे हे दर्शवण्यास पुरेश्या होत्या. माझ्या पाठोपाठ चढलेले आणखी दोघेजण फर्स्टक्लास समजूनच गंडले. त्यांना मुळात फर्स्टक्लासमध्येच चढायचे होते. पण जेव्हा त्यांना समजले की हा सेकंडक्लास आहे आणि इथेही फर्स्टक्लाससारख्या सोफा सीट लागल्या आहेत तेव्हा बडबडतच उतरले. कसलासा असंतुष्टपणा त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. सेकंडक्लासलाही सवलती दिल्या तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय उरला अशी त्यामागे भावना असावी. अंड्याला मात्र याच्याशी काही घेणेदेणे नव्हते. तो आपला भेळेचा आस्वाद घेत बसला होता. हो, बसलोच होतो कारण ट्रेन इथूनच सुटणार असल्याने बर्‍यापैकी रिकामी होती. पण अजूनही काही जणांची चूळबूळ चालूच होती. काही जण जाळीच्या खिडकीला डोके लाऊन दूरवर काही दिसते का बघत होते, तर काही सीटवर बॅग ठेऊन पुन्हा पुन्हा दारात जाऊन परतत होते. अधूनमधून सर्वांचीच एक नजर प्लॅटफॉर्मवरच्या ईंडिकेटर वर तर एक नजर घड्याळावर. थोड्यावेळाने अंड्याची ट्यूब पेटली. आमची ट्रेन सुटायला उशीर होत होता म्हणून समोरच्या ट्रॅकवर मागाहून पनवेलवरून सुटणारी ट्रेन येतेय का यावर लोकांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांचा अंदाज खरा ठरला. समोरच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येऊन लागली. केवळ दहा सेकंदातच ती सुटणार असल्याने सारे जण तिथे पळत सुटले. पुरुष तर पुरुष, महिलाही पळत सुटल्या. सार्‍या आधुनिक हिरकण्याच जणू. अंड्याने पाहिले तर त्या ट्रेनला हिच्या तुलनेत बर्‍यापैकी गर्दी होती. तरी देखील सर्वांना त्या ट्रेनचेच वेध लागले होते कारण काय तर ती पाचेक मिनिटे त्यांना लवकर घरी पोहोचवणार होती. अंड्या मात्र अगदी निवांत आणि फिकिर नॉट कॅटेगरीतला मुलगा. बसूनच राहिलो आपल्या सीटवर. इकडचे तिकडे गेल्याने आणखी ऐसपैस जागा तयार झाली होती. त्याबद्दल त्यांचे आभार मानून अंड्या त्यांना अलविदा करणार इतक्यात अचानक काहीतरी सुरस अन चमत्कारीक घडावे तसे आमचीच ट्रेन हलली. इतका वेळ आमची ट्रेन सुटत नव्हती पण आता तिचा ड्रायव्हर थोडा उशीरा का होईना आपल्या ड्यूटीवर आला होता आणि वेळापत्रकनुसार त्या ट्रेनला लाल सिग्नल दाखवून आमची ट्रेन आधी काढली होती. पुन्हा एकदा तिकडचे काही जण इथे उलट पावली धावत आले. पण यावेळी जरा जास्तच जीव तोडून कारण आमची ट्रेन हळूहळू वेग पकडत होती. या वेगाशी शर्यत जे जिंकले ते चढले.. अन हरले ते राहिले..

बसायला अमाप जागा होती, पण आता बसावेसे वाटत नव्हते म्हणून मी दारात येऊन उभा राहिलो. वाशी खाडीवरच्या पूलावरून ट्रेन जाऊ लागली अन माझा दारावर उभे राहायचा निर्णय सार्थ ठरला असे वाटू लागले. दोन्ही बाजूला पसरलेला निश्चल समुद्र आणि थैमान वारा. आपल्या घरी परतायची जराही घाई नसलेला, हळूहळू पाण्यात विरघळणारा तांबडा सूर्य. कविता अंड्याला जमत नाही पण एखादे गाणेच गुणगुणावेसे वाटले. थोड्या वेळासाठी ट्रेनला सिग्नल लागून ती तिथेच पूलावर काही काळ थांबावी अशी इच्छा मनात उत्पन्न झाली खरी, मात्र सहप्रवाश्यांना ते परवडण्यासारखे नव्हते म्हणून कोण्या देवाने तथास्तु म्हणायच्या आतच अंड्याने ती इच्छा माघारी घेतली.

समुद्रौल्लंघन करून ट्रेन मानखुर्द स्टेशनला पोहोचली. इथे मात्र उतरणार्‍यांपेक्षा चढणार्‍यांची संख्या जास्त असल्याने एकतर्फीच सामना होता. हे जाणून असलेल्या आणि उतरायची इच्छा बाळगून असलेल्या शिलेदारांनी धावत्या ट्रेनमधूनच फलाटावर उड्या फेकल्या. चढणारे धाडधाड करत आत चढले अन ट्रेन जराही वेळ न दवडता पुन्हा सुटली. फलाटावरील प्रवाशी, बाकडे, खाद्यपदार्थांचे स्टॉल एकेक करून मागे पडत होते आणि इतक्यात अचानक समोरच्या खांबामागून एक कुत्रा उठला आणि आमच्या ट्रेनच्या पाठी पळत सुटला. ट्रेनला अगदी लागूनच समांतर धावत होता जिथे त्याच्या मार्गात येणारेही कोणी नव्हते. ट्रेनच्या वाढत्या वेगाबरोबर त्याचाही वेग वाढत होता, मात्र त्याचे हरणे निश्चित होते. कुठल्याही क्षणी तो ट्रेनमध्ये झेप घेईल या आवेशात त्याने धाव घेतली होती खरे पण शेवटपर्यंत हा मुर्खपणा काही त्याने केला नाही. फलाटाचे टोक संपेपर्यंत त्याने ट्रेनचा पाठलाग की ट्रेनला सोबत केली पण त्यानंतर पुढे काय झाले हे समजायला मात्र वाव नव्हता. ट्रेनने वळण घेतले आणि तो नजरेआड झाला. पण अंड्याच्या विचारातून तो गेला नाही. तो कुत्रा नक्की कोणाशी शर्यत करत होता, कोणाच्या मागे लागला होता, जर त्याला ट्रेन पकडायचीच नव्हती तर का उगाच तो आपली शक्ती आणि वेळ वाया घालवत होता. हा त्याचा खेळ होता की निव्वळ मुर्खपणा. तो प्रत्येक ट्रेनच्या मागे असाच पळत असावा की आमच्याच ट्रेनमध्ये त्याला काही विशेष दिसले. आता तो थकून बसला असेल की या खेळात त्याचा कोणी जोडीदारही असेल. एक ना दोन, अनेक प्रश्न अंड्याच्या डोक्यात आले ज्याचा छडा लावायला मी पुढच्या स्टेशनवर उतरून पुन्हा मागे जायचे ठरवले. आता तुम्ही म्हणाल की एवढ्यासाठी पुन्हा मागे. त्याचे काय आहे, झाडावरून पडलेले सफरचंद सारेच खातात, पण त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा एखादा न्यूटनच असतो. अंड्याचेही काहीसे असेच आहे.

पुढच्या स्टेशनला उतरून अंडया परत फिरला आणि स्वत:शीच स्वत:चा एक किस्सा आठवू लागला. कॉलेजचा काळ, परीक्षेचे दिवस, दुसर्‍या दिवशी कठीण समजला जाणारा असा एक विषय. वर्षभर फारसा काही अभ्यास न करता परीक्षेच्या आदल्या काही दिवसांमध्ये करूया असा हिशोब. पण काही कारणांमुळे त्या आणीबाणीच्या दिवसांतही पुरेसा अभ्यास झाला नव्हता. जवळपास निम्मा अभ्यासक्रम ऑप्शनला टाकावा लागतो की काय अशी परिस्थिती उदभवली होती. तरी रात्रभर जागून जेवढे जमेल तितके पठण चालू होते. पण कितीही हातपाय झाडले तरी अभ्यास काही संपत नाही हे समजून चुकल्याने त्या टेंशनमुळे आणखीनच काही सुचत नव्हते. दुसर्‍या दिवशी तसेच जागरण करून ओडसलेले डोळे, प्रश्नपत्रिका हातात पडताच खाडकन उघडले. अधाश्यासारखी चाळली तर बरेचसे प्रश्न ओळखीचे. उत्साहाने लिहायला सुरुवात केली. माझ्याप्रमाणे सारेच त्या प्रश्नपत्रिकेवर तुटून पडले होते. वर्षभर तुम्ही काय अभ्यास केला, तुम्हाला किती येते आणि तुमच्यात किती अक्कलहुशारी आहे हे येत्या तीन तासांत दाखवायचे होते. अंड्याची लेखणी देखील झरझर चालू लागली. सारे काही येत असूनही केवळ संथ लिखाणामुळे स्पर्धेत मागे पडून चालणार नव्हते. पहिले पाच प्रश्न, प्रश्नातील उपप्रश्नांसह लिहून झाले. वेळ संपत आली तरीही अजून बरीच प्रश्नपत्रिका शिल्लक कशी म्हणून सुरुवातीच्या सूचना पुन्हा सावचितपणे वाचल्या आणि हातातले पेनच गळून पडावे असा धक्का बसला. पहिल्या पाच प्रश्नांपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे होते. याचा अर्थ मी आतापर्यंत सोडवलेल्या पाच प्रश्नांपैकी केवळ दोनच प्रश्न ग्राह्य धरले जाणार होते. वेळ संपल्यातच जमा होती आणि आता माझे नापास होणे निश्चित होते. शेवटची दहा-पंधरा मिनिटे, हाताला कितीही ताण दिला तरी ओरबाडून ओरबाडून आणखी किती गुण मिळवणार होतो. ताण हातापेक्षा भणभणून उठलेल्या डोक्यावर येत होता. जेव्हा तो असह्य झाला तेव्हा खाडकन डोळे उघडले आणि अंड्या झोपेतून जागा झाला. कॉलेज संपून आज पाच-सहा वर्षे उलटली आहेत हे स्वत:ला पटवायला किंचित वेळच गेला, मात्र असे स्वप्न पडायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. अजूनही त्या स्पर्धापरीक्षांचा घेतलेला धसका कधीकधी असा स्वप्नांच्या रुपात बाहेर पडतो आणि जाग आल्यावर त्यांना मी आता फार मागे सोडून आलो आहे ही जाणीव सुखावते. माझ्या आसपास दिसणार्‍या या लोकांनाही अशीच ट्रेन सुटत असल्याची स्वप्ने पडत असावीत का..

याच विचारात अंड्या पुन्हा आधीच्या स्टेशनला परतला. पण तो कुत्रा कुठे दिसत नव्हता. कदाचित त्याच्या खेळाची वेळ संपली असावी अन अभ्यासाला गेला असावा, की हाच त्याचा अभ्यास होता. इतक्यात मागाहून अजून एक ट्रेन आली. नेहमी सारखी स्वयंचलित सामानाची चढउतार झाली आणि पुन्हा सुटली. त्याच ट्रेनमध्ये अंड्याही चढला. आता तरी कुठूनसा तो येईल म्हणून फलाटावर नजर फिरवली तर स्टेशनच्या प्रवेशद्वारातून दोन माणसे जीव तोडून आमच्या ट्रेनमागे धावत येताना दिसले. यांना मात्र ही ट्रेन पकडायचीच होती. नाहीतर पुन्हा पाच मिनिटे मागच्या ट्रेनची वाट बघत थांबा. ट्रेनच्या वाढत्या वेगाबरोबर शर्यत जिंकण्यात जो एक जण यशस्वी ठरला त्याने ती ट्रेन पकडली, तर दुसरा ज्याचा वेग मंदावला तो खालीच राहिला. दोघेही धापा टाकत होते. फरक इतकाच एक जण फलाटावर धापा टाकत होता तर एक इथे ट्रेनमध्ये. एकाच्या चेहर्‍यावर ओशाळलेले पराभूत भाव तर एकाच्या चेहर्‍यावर विजयश्री झळकत होती. अंड्याला मात्र मगासच्या त्या कुत्र्यापेक्षा आताची हि माणसेच जास्त केविलवाणी वाटत होती.

– अंड्या उर्फ आनंद

 

अंड्याचे फंडे ४ – फेक आनंद

जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे “मीच तुझी रे चारोळी” नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. “तुला रं गण्या कधीपासून हा छंद?” या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, “अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं..

ऐन दुपारी.. नदी किनारी..
फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी..
तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने..
घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे..

“चांगली भरारी आहे राव, भिडली अगदी मनाला. पण यमकात जरा गंडलीय असे नाही का वाटत?” खरे तर नदीकिनारी फेसाळलेल्या लाटा कश्या आल्या हा प्रश्न दुसर्‍याच ओळीला माझ्या मनात आलेला, पण त्यावर गण्याचे स्पष्टीकरण ऐकायची ताकद माझ्यात नसल्याने मी हे विचारले.

“आजकाल असंच चालतं.. तू राहू दे रे अंड्या, हिशोबाचं बघ आपलं..” म्हणत गण्याने माझ्यावर ‘अरसिक’ अन त्यापेक्षाही जीवघेणा ‘आऊटडेटेड’ असा शिक्का मारून मला बाजूला सारले.

“चल आता चारोळीला शेर करतो” इति गण्या.

“चारोळीचा शेर?? म्हणजे आता तिचे हिंदीत भाषांतर करणार का राव तू? … ऐन दुपार को, नदी के नार को…”
त्याला ती फेसबूकवर शेअर करतो असे म्हणायचे होते हे समजले असूनही मी असेच गंमतीने म्हणालो.

तर गेल्या पंधरा मिनिटांत गण्याने पाचपन्नास कविता वाचून एक तोडकीमोडकी चारोळी फेसबूकवर शेअर करायला शोधली होती. आपल्या मित्रांना ती आवडणार याची खात्री आणि तीस-चाळीस लाईक तरी कुठे गेले नाहीत याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. या आधी मी कधी गण्याला कविता वाचनात आनंद घेताना पाहिले नव्हते. हा आनंद नक्कीच आपण काहीतरी लोकांसाठी शेअर करतोय याचा होता. शेवटी आनंद हा आनंदच असतो, आणि स्वतापेक्षा दुसर्‍याला आनंददायक असे आपण काही करत असू तर त्यातून मिळणार्‍या आनंदाला कशाचीच सर नाही. पण जे तीस-चाळीस जण त्याची नेटवरून शोधलेली कविता लाईक करणार होते त्यांना तरी खरेच ती कविता आनंद देणार होती का? त्यांनाही खरेच कवितेची आवड असणार होती का? का ते देखील केवळ गण्याला आनंद मिळावा म्हणून त्याने शेअर केलेली कविता लाईक करणार होते. अन इथेच अंड्याचे विचारचक्र सुरू झाले.

दुकानाचा माल आणण्यासाठी बरेचदा अंड्याचे दादरला जाणे होते. परवा देखील गेलो होतो. दादर स्टेशनजवळ काही मुलींचा ग्रूप दिसला. कुठल्यातरी सांस्कृतिक दिवसाच्या निमित्ताने हिरव्या रंगाच्या साड्यांमध्ये नटलेला, अन हिरवळ हिरवळ म्हणतात ती हिच हे अप्रत्यक्षपणे सांगून जाणारा. जवळपासच्याच एखाद्या कॉलेजच्या मुली असाव्यात. शाळेची मुले असली की कसे चटकन गणवेषावरून ओळखता येतात. नाहीच तर ‘कोणत्या शाळेचे रे तुम्ही?’ करत पटकन विचारता तरी येते. या बहुधा ईंजीनीअरींग कॉलेजच्या मुली असाव्यात. काही जणींकडे असलेल्या आयुधांवरून असा अंदाज बांधता येत होता. फोटोसेशन चालू होते. अर्थात, नटलेल्या अवस्थेत आजकाल हेच जास्त चालते. संध्याकाळी हेच फोटो ऑर्कुट-फेसबूक अश्या सोशल साईट्स वर अपलोड करून इतरांची वाहवा जी मिळवायची असते. वरवर पाहता धमाल चालू आहे असे वाटत असले तरीही प्रत्येकीचे लक्ष मौजमजा करण्यापेक्षा फोटो कसा चांगला येईल याकडे लागले होते आणि या नादात उगाचच त्या फोटो फ्रेममधील कृत्रिमता वाढल्यासारखी वाटत होती. चलता है, मुली म्हटल्या की नटण्याची आवड, नटूनथटून झाल्यावर हौसेने आरश्यात स्वताला न्याहाळणे आणि जमलंय असे वाटले की एखादी छानशी पोज देऊन छायाचित्र काढून घेणे हे आलेच.

पण मागे देखील एकदा रंगपंचमीच्या आदल्या दिवशी मला असेच दृश्य पाहायला मिळाले होते. यावेळी काही युवकांचा ग्रूप कॉलेज सुटल्यावर रंगपंचमी साजरी करत होता. आता हे साजरी करणे म्हणजे काय तर एकमेकांना रंग लावायच्या पोजमध्ये फोटो काढणे चालू होते. रंग लावायचा, लाऊन घ्यायचा आनंद लुटण्यापेक्षा त्यांना आपण एंजॉय किती आणि कसे करतोय हे फोटो पाहणार्‍याला दिसले पाहिजे याचीच काळजी जास्त होती. जेणेकरून जेव्हा ते फोटो त्यांचे इतर मित्र बघतील तेव्हा बोलतील, “वाह यार, क्या मजा किया तुम लोगोंने….”

आजकाल कुठे पिकनिकला गेलो तरी हेच होते. निसर्गाला डोळ्यात नाही तर कॅमेर्‍यात कैद केले जाते. निसर्गसौंदर्याला स्वत:च्या फोटोंच्या बॅकग्राऊंडवर सजवून आपण त्या ठिकाणी जाऊन आलो हेच लोकांना दाखवायचे कौतुक भारी. काही जण तर त्या बॅकग्राऊंडचे देखील भान ठेवत नाहीत. आमच्या मॅडीचेच घ्या ना. गड्याला फिरायची भारी आवड. दर दुसर्‍या महिन्याला त्याच्या फेसबूक प्रोफाईलवर एका नवीन स्थळाचा फोटो अल्बम अपलोड झालेला दिसतो. मात्र प्रत्येक फोटोत तो एखाद्या कड्याच्या काठावर बसलेला, नाहीतर एखाद्या झाडाला लटकलेला. एखादा किल्लाच असेल तर त्याच्या दगडी प्रवेशद्वारापुढे भालदार चोपदारागत गडी छाती पुढे काढून उभा राहिलेला. पण प्रत्येक फोटोच्या केंद्रस्थानी तो स्वता आणि आजूबाजुचे सारे आऊट ऑफ फोकस. एक नाही, दोन नाही, तर ढिगाने फोटो तेच तेच आणि तसेच तेच. डिजिटल कॅमेराच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि अमर्यादीत मेमरीच्या स्वस्ताईमुळे हजारो फोटो काढले जातात आणि त्यातील निवडक(?) शेकडोंचे प्रदर्शन मांडले जाते. पण एवढे फोटो बघूनही शेवटी त्याला विचारावे लागतेच, की नक्की कुठे गेला होतास रे मॅड्या..

बाकी किल्ल्यांवरून आठवले, आजकाल तिथे असणारे मार्गदर्शक गाईड देखील चांगले की वाईट हे किल्ल्याची माहिती किती योग्य देतात यावर नाही तर फोटोसाठी चांगले स्पॉट सुचवतो की नाही यावर ठरवले जातात असे ऐकलंय.

या फोटो पुराणावरून आठवले, विवाहाचे फोटो तर असावेतच. शेवटी आयुष्यभराची आठवण आहे ती, एखाद्या अल्बममध्ये तिची साठवण करण्यात काही वावगं नाही. परवडत असेल तर विडीओ शूटही असावा. पण फोटो काय, कसे, अन किती काढायचे, तसेच नेमके काय टिपायचे हे फोटोग्राफरवरच सोडून देणे उत्तम ना. जर नवरा नवरी फेरे घेताना, हार घालताना, पाया पडताना, जेवताखाता फोटोसाठी पोज द्यायला लागले किंवा फोटो व्यवस्थित अँगलने खेचला जातोय की नाही याकडेच लक्ष द्यायला लागले तर आयुष्यातील सर्वोत्तम दिवस किती ठोकळेबाज पद्धतीने साजरा होईल ना त्यांचा…

आता इथे लग्न हा आयुष्यातील सर्वोत्तम दिवस या उल्लेखावर काही भुवया उंचावल्या असतील तर काही नजरा तिरप्या झाल्या असतील पण त्यावर पुढच्या एखाद्या लेखात..

अरे हो, लग्नावरून आठवले. आमच्या दादाचे लग्न घराजवळच्याच हॉलमध्ये होते. चालत निघालो तर जेमतेम दहा मिनिटांचे अंतर. नवरदेवाला घोड्यावर वा फुलाफुलांच्या गाडीत न बसवता एखाद्या टॅक्सीत कोंबले तरी मीटर पडायच्या आत दारात हजर व्हावे. पण अंड्याने मात्र वरातीसाठी हट्ट धरला. अंगात नृत्यकला असो वा नसो, त्याची तमा न बाळगता पुर्ण जोमात नाचायचे क्षण आपल्या आयुष्यात तुरळकच येतात. लग्नप्रसंगी तरी ही संधी सोडू नये या मताचा अंड्या. त्या दिवशी अंड्याच्या अंगात काय संचारले होते देव जाणे, मात्र आजही त्या नृत्यविष्काराची छायाचित्रे एखाद्याला दाखवली तर मी मद्यप्राशन करत नाही हे पटवणे अवघड होऊन जावे अश्या एकेक डान्सिंग पोज त्यात उमटल्या आहेत. असो, तर सांगायचा मुद्दा हा की, त्याच हॉलमधून निघालेल्या कित्येक वराती आमच्या वाडीच्या प्रवेशद्वारावरून जातात. दुकानातून डोके बाहेर काढले की नाका सहज नजरेस पडतो. त्या दिवशी देखील तेच चित्र. घोड्यावर बसून नवरदेव निघालेत. तरुणवर्ग आजूबाजुने चकाट्या पिटत चाललाय. त्यांनाच लाजवायला म्हणून खास काही काकूंनी फेर धरलाय. दोनचार पोरंटोरं (कदाचित त्यांचीच असावीत) सभोवताली लुडबुडताहेत. नाक्यावरून वळण घ्यायच्या आधी फोटोग्राफरने चौकातल्या उंचवट्यावरची जागा पकडून नेहमीप्रमाणे आवाज दिला आणि दुसर्‍याच क्षणाला इथून तिथून दहाबारा टाळकी हात उंचावत आणि गोंगाट करत त्याच्यासमोर जमली. नाचाच्या हावभावात किंचाळत असलेल्या त्या मुलांवर क्लिकक्लिकाट झाला आणि पुढच्याच वळणाला पुन्हा पांगापांग झाली. फोटोमध्ये आवाज रेकॉर्ड होत नसल्याने खरे तर त्यांना किंचाळायची गरज नव्हती, पण ते तसे का किंचाळावे लागते किंवा का सहजपणे किंचाळले जाते याचा विचार केल्यास बरीच उत्तरे सापडतील असे अंड्याला वाटले.

चलता है, बाकी जे या छायाचित्रणाचे झालेय तेच इतर आवडींचेही. गाणी ऐकण्याची आवड घ्या. कधीतरी शांत मूडमध्ये निवांत पडून गाण्यांचा लुत्फ घेण्यापेक्षा ट्रेन-बसच्या खडखडाटात शोऑफ म्हणून महागातले आयपॉड आणि हेडफोन लाऊन गाणी ऐकली जातात, सोबतीला गप्पा चालू असतात, तेरे पास कौनसा गाणा है याचे डिस्कशन. तर कधी गृहपाठाचा अभ्यास लिहिता लिहिता कानावर ती गाणी आदळत असतात. अंड्यानेही एक दोनदा अश्या प्रकारे गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला. ट्रेनच्या आवाजाशी स्पर्धा करत आयपॉडचा वोल्युम वाढवला खरे, पण अचानक एका सिग्नलला ट्रेन थांबली आणि कानात जोरदार घुमणारा संगीताचा आवाज, आपण नकळत कानांवर किती अत्याचार करत आहोत याची जाण करून गेला. खट करून ऑफ’चे बटण दाबले आणि त्या क्षणी निर्माण झालेली शांतता मनाला एक आगळाच आनंद देऊन गेली.

मोबाईलगेम सारखा कृत्रिम आनंद जगात दुसरा नसावा. त्यावर अंड्याने न बोललेलेच बरे. फार तर फार चार बाय सहा ईंचाच्या स्क्रीनवर बसल्याबसल्या डोळे फाडत स्वत:चेच रेकॉर्ड मोडत बसायचे. हल्ली तर ग्राफिक्स तंत्रज्ञानाने एवढी सुधारणा केली आहे की रेसिंग आणि फायटींगचे गेम मैदानी खेळांचा आनंद देऊन जातात म्हणे.

चलता है, या आणि अश्या बर्‍याच गोष्टी आहेत, जी आसपास दिसणारी मुले आजकाल सर्रास करताना दिसतात. करताना त्यांच्या चेहर्‍यावर एक आनंद दिसतो, नक्कीच दिसतो. पण का माहीत नाही या अंड्याला तो कृत्रिम भासतो. याला खरेच निर्मळ आनंद म्हणावे का, की फेक आनंद म्हणावे, की जमाना बदल गया है माँ जी बोलून चालवून घ्यावे.

– अंड्या उर्फ आनंद