RSS

Monthly Archives: जानेवारी 2014

अंड्याचे फंडे २ – फर्स्ट क्लास

आपली मुंबई लोकल आणि भरगर्दीची वेळ. अंड्याने स्कूलबसच्या पलीकडे कधी लांबचा लोकल प्रवास केला नसल्याने अश्या गर्दीला नेहमी प्लॅटफॉर्मवरूनच रामराम करतो. तीन-चार ट्रेना सोडूनही लटकलेली माणसे दिसायची बंद काही होईनात हे पाहून सरळ उजव्या खिशातले तिकिट बाहेर काढून, चुरगाळून, डाव्या खिशात टाकले आणि फर्स्टक्लासचे तिकिट काढायला गेलो. पण बसायला इथेही मिळाले नाही राव. त्यातल्या त्यात कोणाशीही शारीरीक लगट प्रस्थापित न करता उभा होतो यातच काय ते समाधान. पुढचे चार-पाच स्टेशन तसेच डोक्यावरचे हलेडुले हॅंडल पकडून, ते पकडायचे सुख किती रुपयांना पडले याचाच हिशोब करत होतो. सवयीने आजूबाजूला निरीक्षण चालूच होते. एका वयात मुलींचे निरीक्षण करण्यात धन्यता मानायचा हा अंड्या, पण हल्ली मात्र एखाद्या नवीन जागी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे बघायला मिळेल आणि त्यावर आपल्यातर्फे थोडीशी शेव भुरभुरून एखादा हटके लेख पाडता येईल हेच विचार डोक्यात जास्त चालू असतात. म्हणून पलीकडच्या कंपार्टमेंट मध्ये दिसून राहिलेल्यां “त्या” त्यांना तिथेच राहू दिले आणि सभोवताली एक नजर फिरवली.

‘वड्डे लोक वड्डी वड्डी बाते’ या उक्तीला अनुसरून एक जण दारापाशी उभा राहून फोनवर स्टायलिश ईंग्लिश झाडत होता. तर त्याच्या जवळच आणखी दोघे आपसात त्याच टोन आणि त्याच भाषेत बोलत होते. एक नजर बसलेल्यांवर टाकली. एक महाविद्यालयीन युवकांचा ग्रूप ईंग्रजी भाषेतच हसत खिदळत होता तर इतर सहप्रवाश्यांपैकी बर्‍याच जणांचे निवांत वृत्तपत्र वाचन चालू होते. इथेही, झाडून सारेच न्यूज पेपर आंग्ल भाषेतील. काही जण ईंग्रजी शब्दकोड्यांमधील गुंतागुंत सोडवत होते तर काही ‘ईकॉनॉमिक टाईम्स’ हे एखादे कॉमिक वाचल्यासारखे एंजॉय करत पैश्यांची गुंतवणूक उलगडवत होते. काही रंगीले पेज थ्री मधील फोटो झरझर चाळत होते. पण अधूनमधून एखादी बातमी मन:पूर्वक वाचत आणि बरोबरच्याला ती दाखवत आपण निव्वळ फोटो बघत नसून आपल्याला ही ईंग्रजी वाचता येते हे सिद्ध करत होते. एकंदरीत वातावरणावरून अंड्याने अनुमान काढले की फर्स्टक्लासची ऑफिशिअल लॅंगवेज ही ईंग्लिशच असावी. हे पाहून एक बाजू पकडून काही न बोलता मुकाट उभा राहिलो. उगाच काही मराठीत बोलायचो आणि सारे जण कुठे हा सेकंडक्लासचे तिकिट काढून फर्स्टक्लासमध्ये तर नाही ना चढला अश्या नजरेने आपल्याकडे बघायचे. त्यापेक्षा नकोच ते. आधीच अंड्याचे ईंग्रजी दिव्य. “व्हॉट इज युअर बोली??” तर, “मायबोली इज मराठी..” – एवढेच काय ते जेमतेम. म्हणून एका बाजूला आणखी थोडे सरकून आपले निरीक्षणकाम चालू ठेवले.

काही जण त्या जेमतेम जागेतही मांडीवर छोटामोठासा लॅपटॉप उघडून बसले होते. त्यातील काही निव्वळ फेसबूकगिरी करत होते तर काही ऑफिसचे उरलेले(?) कामकाज आटोपत होते. दिवसभर कॉप्म्युटरच्या स्क्रीनवर डोळे खपवूनही काही लोकांची कामाची हौस कशी फिटत नाही हा खरा अंड्याला पडलेला प्रश्न. ज्यांना बसायला जागा मिळाली नव्हती ते उभ्या उभ्याच सहा ईंची स्क्रीनच्या मोबाईल मध्ये लागले होते. प्रत्येक जण आपापल्या स्क्रीनवर टिचक्या मारण्यात मग्न होता. जवळच्याच एका स्क्रीनवर मी डोकावलो तर काहीसा विडिओगेम चालू होता. स्क्रीनवर टिचक्या मारत मारतच एका राजकुमाराला पळवले जात होते. ना घोडा ना गाडी, राजकुमार जीव तोडून धावत सुटलाय. जणू काही पाठीमागे वाघ लागलाय की काय असा विचार मी करतच होतो इतक्यात खरेच एक भलामोठा गोरील्ला त्या राजकुमाराच्या मागे लागलेला दिसला. दोघांच्या आकारात इतका फरक की त्याचा एक पाय पडताच राजकुमाराचा चेंदामेंदा निश्चित होता. कधी एखाद्या अडथळ्यावरून उडी मारत, तर कधी एखाद्या पुलाच्या खालून सरपटत, राजकुमार त्याला चकमा देत पळत होता. प्रत्येक वेळी तो गोरील्ला जवळ येतोय हे बघितले की माझ्या हृदयाची धडधड वाढायची. मात्र आता खेळ खल्लास असे वाटू लागताच ऐनवेळी राजकुमार निसटण्यात यशस्वी व्हायचा. पण असे किती वेळ चालणार होते. तो गेम आहे हे विसरून मला खरोखरच त्या राजकुमाराची चिंता वाटू लागली. एका क्षणाला, नाही, आता तर नाहीच वाचत, असे वाटले आणि दुसर्‍याच क्षणी समोरच्या कड्यावरून राजकुमाराने झेप घेतली ती थेट खोल दरीत. “गेम ओवर” ची पाटी स्क्रीनवर झळकायच्या आधीच त्या मुलाने ईंग्रजी आद्याक्षर “एफ” वरून आपली निराशा व्यक्त केली. हा राग स्वतावर होता की त्या गोरील्लावर हे समजले नाही, पण मी मात्र जे एवढा वेळ ‘ना घेणे न देणे’ त्या गेममध्ये गुंतलो होतो त्यातून बाहेर आलो.

एव्हाना अंधेरी आली होती. माझ्या डोळ्यासमोर नाही तर अंधेरी स्टेशन आले होते. गर्दी बर्‍यापैकी ओसरली. पुढे त्याने आणखी एक गेम खेळावा असे राहून राहून वाटत होते, पण तो माझ्या विचारांना धुडकाऊन लावत म्युजिक प्लेअर उघडून गाणी धुंडाळायला लागला. आता तो कानात स्पीकर लाऊन कोणते गाणे ऐकतोय हे ना मला समजत होते ना जाणून घेण्यात रस होता. संगीताच्या तालावर हलणार्‍या त्याच्या टाळक्याला टाटा बाय बाय करत मी रिकाम्या झालेल्या एका सीटवर स्थानापन्न झालो.

माझ्या भोवताली कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रूप बसला होता. एके काळी मी असे मुलामुलींचे एकत्र टोळके दिसले की निरीक्षणाने त्यांच्यातील जोड्या ओळखायचा प्रयत्न करायचो. या मागे एक सुप्त हेतू देखील असा असायचा, तो म्हणजे जी मुलगी सिंगल दिसेल तिच्यावर जास्त लक्ष केंद्रीत करा. पण हल्ली मुलामुलींचे आपसातील वागणे बोलणे एवढे खुले झाले आहे की काही अंदाजच येत नाही. मग कधीकधी उगाचच आपण सात-आठ वर्षे लवकर जन्म घेतल्याचे वाईट तेवढे वाटते.

त्या तिथे पुरुषांच्या डब्यात त्यांच्यासमोर हा अंड्याच संकोचून बसला होता. नजर लाजून इथे तिथे भिरभिरत, पण कान मात्र त्यांच्या गप्पांकडे टवकारलेले. प्रथम भाषा अर्थातच ईंग्रजी, पण तिच्या अधेमधे हिंदी शब्दप्रयोग चपलखपणे पेरले जात होते. फर्स्टक्लासची सेकंड लॅंगवेज हिंदी असते हा निष्कर्ष देखील मी लागलीच काढून टाकला. बोलण्याच्या विषयांवरून ईंजिनीअरींग कॉलजची मुले वाटत होती. आतल्या शाखा अंड्याला काही समजत नाहीत. पण जीआरई, कॅट अश्या परीक्षांची नावे घेत उच्च शिक्षणासाठी परदेशी शिकायला जायचा बेत आखला जात होता. माझ्या मावशीचा मुलगाही अशीच एखादी परीक्षा देऊन जर्मनीला गेला होता म्हणून मला ही नावे ऐकून माहीत. मात्र त्याच्यावेळी कुठले शिक्षण घ्यायला कुठल्या युनिवर्सिटीत जात आहे यापेक्षा कुठल्या देशात जात आहे आणि खर्च किती येणार याचीच चर्चा जोरदार व्हायची. या माझ्या समोर बसलेल्या मुलांना मात्र परदेशाचे तितकेसे अप्रूप वाटत नव्हते. जवळपास सार्‍यांचेच उड्डाण निश्चित झाले असावे. शहरातील लोकसंख्या वाढली तरी फर्स्टक्लासमधील गर्दी का वाढत नाही याचा उलगडा मला तेव्हा झाला.

थोड्यावेळाने त्यांचे खाण्याचे डब्बे उघडले गेले. ब्रेडबटर, पोटॅटो चिप्स अन फ्रूट सलाड असले हलकेफुलके आहार बाहेर निघाले. त्यातील दोन मुलींनी आज आमचा फास्ट आहे असे कारण देत आम्ही फक्त सफरचंदाचे दोनचार तुकडे खाणार असे घोषित केले. “जर तुमचा फास्ट आहे तर तुम्ही स्लो ट्रेनमध्ये काय करत आहात?” असा एक छानसा पीजे अंड्याच्या मनात आला. पण श्या, बरोबरचे ओळखीचे नसल्याने तो मारता आला नाही याचेच किंचित वैषम्य वाटले. बाकी उपवास नसताना ही यापेक्षा फारसे काही त्या खात असाव्यात असे त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून वाटत नव्हते. खाण्याआधी त्यांनी कसलेसे हॅंड सॅनिटायजर काढून हाताला चोळले. याने हाताला लागलेले विषाणू मरतात म्हणे. पण त्यांची डेडबॉडी हातावरच राहते त्याचे काय. उपवासाच्या दिवशी हा असा मांसाहार नको म्हणून हा अंड्या त्यांना अडवणार इतक्यात त्यांनी सपासप दोन फोडी तोंडात टाकून, डबा बंद होउन, पुन्हा बॅगेतही गेला होता.

पुढच्या दोनतीन स्टेशनांवर एकेक करत बरेच जण उतरले. आता त्या ग्रूपमध्ये फक्त दोघेच उरले होते. मुली निघून गेल्याने माझाही आता त्या दोघांच्या गप्पा ऐकण्यातील रस निघून गेला होता. पण काय आश्चर्य, त्यांनी तोंड उघडले आणि चमत्कारच झाला. दोघे ही अस्खलित मराठीत बोलत होते. थोड्यावेळापूर्वी हेच दोघे फुल्ल ऑफ अ‍ॅक्सेंट ईंग्लिश झाडत होते यावर विश्वास बसणे कठीण व्हावे इतके शुद्ध मराठी. अंड्याला एकदम त्यांच्या मराठी असण्याचा अभिमान वाटू लागला. त्यांच्याकडे मी अंमळ कौतुकानेच बघू लागलो. त्यांनाही हे समजले असावे. थोडेसे हसले ते माझ्याकडे बघून. तसेही मागे कोणी तरी मला म्हणाले होतेच, ‘अंड्या तू तर चेहर्‍यावरूनच मराठी वाटतोस बे..’ याची सहज आठवण झाली.

दोघांतच काय गप्पा मारणार असा विचार करत त्यांनी आपापली हत्यारे, म्हणजेच आपापले स्मार्टफोन बाहेर काढले. एक मुलगा माझ्या बाजूला बसला होता तर एक समोर. समोरच्याच्या चष्म्यामध्ये मला त्याच्या मोबाईलची भलीमोठी स्क्रीन दिसत होती. काही ओळखीचे रंग चकाकले म्हणून पाहतो तर मगासचाच राजकुमार आणि गोरील्या माकडाचा जीवघेणा खेळ. आता परत नको त्यात गुंतायला म्हणून शेजारच्या मुलाच्या फोनवर नजर टाकली तर अरे देवा, तिथेही तेच सुरू. फरक इतकाच की इथे गोरील्याच्या जागी काही मोठाले कावळे त्या राजकुमाराच्या पाठी लागले होते. पुन्हा तो राजकुमार तसाच जीव तोडून धावत होता. नदीनाले, डोंगरदर्‍या पार करत त्या राक्षसी कावळ्यांपासून आपला जीव वाचवत. पण पुन्हा एकदा त्याच मनहूस कड्याच्या टोकावर येऊन घाईघाईत पलीकडे झेप घेणे न जमल्याने राजकुमार पुन्हा एकदा गतप्राण, पुन्हा एकदा गेम ओवर. पण या मुलाने मात्र कोणताही अपशब्द न वापरता पुन्हा नवीन गेम सुरु केला. मराठी संस्कार. मन पुन्हा भरून आले. पुन्हा अंमळ कौतुक वाटले.

पुढचे तीन चार डाव फिरून फिरून तेच होत होते. त्या कड्याच्या कडेला येईपर्यंत कावळे अगदी जवळ आल्याने घाईघाईत मारलेली उडी फसणे आणि राजकुमाराचा गेम ओवर. मला आता त्या पुढे काय गेम आहे, कसा रस्ता आहे, काय घडत असेल याची फार उत्सुकता लागून राहिली होती. समोरच्या मुलाने हार मानून गेमच बदलला होता. मात्र त्याच्या राजकुमाराच्या मागे निदान गोरील्ला तरी लागला होता, पण माझ्या शेजारच्याचा राजकुमार कावळ्यांना कशाला घाबरत आहे हे काही अंड्याला समजत नव्हते.

पाचव्यांदा जेव्हा तो त्या कड्यापाशी येऊन पुन्हा तसाच खाली दरीत कोसळला तेव्हा मी न राहवून त्याला म्हणालो,
“अरे मार ना त्यांना मागे पलटून…”

समोरचा मुलगा देखील माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागला.

बाजूचा गोंधळून जाऊन म्हणाला,
“ऐसे नही मार सकते यार..”

“फिर..??”

“………”

“…..”

त्या क्षणाला आम्हा दोघांच्या नजरेत एकच भाव होते. तो माझी कीव करत होता आणि मी त्याची…

– अंड्या उर्फ आनंद

 

अंड्याचे फंडे १ – रायटर अंड्या

रविवारची रटरटीत दुपार. कोण निघणार बाहेर त्या उन्हात. एकीकडे सारी दुनिया मस्त आरामात. आमचेच दुकान तेवढे खुले. म्हणून हा अंड्या तेवढा व्यस्त आपल्या कामात. अर्थात, दुकानात दुपारच्या वेळेला फारसे कोणी येण्याची शक्यता नसल्याने आराम हेच एक काम. पण भिंतीला तुंबड्या लाऊन बसेल तर तो अंड्या कसला. हल्ली फावल्या वेळेत माझे काही ना काही खरडवणे चालूच असते. दुकानाच्या दारात काऊंटरवर बसल्या बसल्या कधी मी आकाशातल्या पाखरांकडे बघून एखादी चारोळी रचतो, तर कधी समोरच्या चाळीतले एखादे पाखरू नजरेस पडल्यास त्याच कागदावर शेरोशायरी उतरते. पान भरभरून निबंध मी कधी शाळेतही लिहिला नव्हता. किमान १५० शब्दांची डिमांड असल्यास फार फार तर १५२ शब्दांचा सप्लाय करायचो. दोन जास्तीच्या मार्कांसाठी म्हणून चार अतिरीक्त ओळी खरडणे कधीही अंड्याच्या तत्वात बसले नव्हते. पण आजकाल आंतरजालावर लिहायची सवय लागल्यापासून अंड्याचे लिखाण फुल्ल फॉर्मात आले आहे. कारण कितीही फुटकळ लिखाण का असेना स्वताहूनच प्रकाशित करायची सोय असल्याने आणि काहीही खरडले तरी पाचपन्नास वाचक आणि दोनचार प्रतिक्रिया कुठे जात नसल्याने दिसला कागद-पेन कि बोटे नुसती शिवशिवायला लागतात.

तर सांगायचा मुद्दा हा की आजही असाच हा अंड्या दुरेघी ओळींच्या वहीत डोक्यात आलेला नवीन विषय शब्दांकित करत होता. आता हा नवीन विषय काय ते एवढ्यात विचारू नका, ते समजेलच पुढच्या लेखात, आणि दुरेघी बिरेघी वही नि काय असा प्रश्न मनात आला असेल तर तो देखील विचारायच्या आधीच सांगतो की त्याने अक्षर सुधारते असे म्हणतात. पण अक्षर सुधारणे म्हणजे कॉम्प्युटरची एक कळ दाबून फॉंट चेंज करण्याएवढे साधेसोपे नसल्याने ते गेले पंधरावीस वर्षे सुधारतेयच.

तर सांगायचा मुद्दा हा की हा अंड्या कानामात्रा एक करून पुर्ण एकाग्रतेने आपले लिखाण करत असताना तिथे एक गिर्हाईक आले. म्हटलं तर गिर्हाईक अन म्हटले तर वाडीतलेच काका जे बघावे तेव्हा या अंड्यालाच गिर्हाईक करत असतात. अमावस पुनवेसारखे महिन्याला दोनदा काय ते भेटतात पण बघावे तेव्हा एकच प्रश्न – काय अंडेराव, काय चालू आहे मग सध्या?

याच्या आधी माझे शिक्षण सोडून चार वर्षे झाली हे त्यांना चाळीस वेळा सांगून झाले तरी लहान मुलांना विचारल्यासारखे “कितवीला आहेस?” हा त्यांचा प्रश्न माझा पिच्छा काही सोडत नव्हता. पण सध्या माझ्या वाढत्या अंगाकडे पाहता अन हल्ली मी वाडीत फुल्लपॅंट घालून फिरायला लागल्यापासून त्यांनी प्रश्न तेवढा बदलला आहे, मात्र तो विचारायची तर्‍हा नाही.

“कसले काय, तुम्हीच बघा त्या वहीत मारलेल्या रेघोट्या”, दुकानातले मामा माझ्या डोक्यात टपली मारून अन काकांना चावी देऊन जेवायला बाहेर पडले. इथे चावी म्हणजे दुकानाची चावी नाही तर अंड्याच्या डोक्याची भुरजी करायला काकांना एक मुद्दा देऊन गेले.

“कसले रे हे अक्षर आनंदा, कोंबडीचे पाय जणू”,

अंड्याने देखील आजवर कधी दावा केला नव्हता की त्याचे अक्षर म्हणजे मोतियांचे फुललेले ताटवे आहेत, पण कोंबडीचे पाय हि उपमा म्हणजे कायच्या काय राव. एखाद्या चिकन तंदूरी खाणार्‍यालाच ठाऊक कोंबडीच्या पायांतील सौंदर्य म्हणजे काय ते.

चालायचंच, तर सांगायचा मुद्दा हा की आता त्यांची गाडी माझ्या अक्षरावर घसरण्याआधी मीच स्वताहून माझी बाजू मांडत विषय रुळावर आणने गरजेचे होते आणि स्वताची इज्जत राखणेही. कम्पुटर जवळ असता तर सरळ एखादे मराठी संकेतस्थळ उघडून तिथे माझ्या नावासकट छापलेला लेखच दाखवला असता. सोबतीला ‘वाह बे अंड्या, छानच लिव्हलेस की’ छाप प्रतिसाद देखील न चुकता त्यांच्या डोळ्याखालून जातील याची काळजी घेतली असती. पण ते या घडीला शक्य नाही तर आता तोंडी परीक्षाच देउया म्हणून म्हणालो, “लिहितो आजकाल मी काका” (हा डायलॉग मारताना उगाचच शत्रुघ्न सिन्हासारखे उजव्या हाताने डाव्या छातीला बाम चोळल्यासारखे केले.)

“हो का.. दिसतेयच ते.. पण वाचता स्वत:ला तरी येतेय का?” काकांची नजर अजूनही माझ्या कोंबडीच्या पायांवरच अडकली होती तर..

आईशप्पथ या काकांच्या (हे मनातल्या मनात) आणि पुढे शत्रूच्या स्टाईलमध्येच खामोश बोलावे असे ही क्षणभर वाटून गेले,
“अहो काका, मी कॉम्प्युटरवर ईंटरनेट वापरून “मायमराठीबोलीभाषाडॉटकॉम” नावाच्या एका मराठी संकेतस्थळावर लिहितो.”

“काय आहे हे ‘मामबोभा’ अन किती जण तिथे वाचतात?”

हायला हे सहिये राव, काकांना लगेच शॉर्टफॉर्म देखील जमला, असे मनातल्या मनात मी आश्चर्य व्यक्त केले आणि चेहर्‍यावर मोठेपणाचा आव आणत उत्तरलो, “तरी लाखभर वाचक वाचतात.”

“हॅ हॅ हॅ…” इति काका.

नक्की ‘ह’ च्या बाराखडीतले कोणते मूळाक्षर मांडावे याबाबत अंड्या किंचित द्विधा मनस्थितीत पण ते असेच काहीसे नाटकीय हसले.

मनातल्या मनात “ओ काका, कशाला उगाच चावतायत” अन प्रत्यक्षात “अहो काका, खरेच एवढे जण वाचतात” इति अंड्या.

“छ्या, काहीही बोलू नका अंड्याशेठ. भारताची लोकसंख्या काय, त्यात मराठी माणसाचा टक्का तो केवढा, त्यातही वाचनाची आवड हल्ली कोणाला, वेळात वेळ काढून ती जपणारे कितीसे, वृत्तपत्र वगळता इतर सटरफटर कथा कादंबर्‍या वाचणारे किती, अन भेटलेही असे काही तरी त्यापैकी कॉम्प्युटर आणि ईंटरनेट किती जणांकडे असेल नसेल, जे काही असेल त्यांची संख्या हजारात तरी जाईल का? अन गेली तरी त्यांना जगातले सारे विषय वाचायचे संपले म्हणून ते तू लिहिलेले वाचायला येतील का? म्हणे लाखभर वाचक….. हॅ हॅ हॅ…”

“अहो काका… ओ काका… ओ ऐका ना.. अहो जगभरातून, ईंग्लंड अमेरिका चीन जपान अन कुठून कुठून मराठी लोक वाचायला जमतात. एकदा तुम्हीही या, वाचून तर बघा.. ओ काका…” माझ्या लिखाणाच्या उत्साहावर चूळ मारून जाणार्‍या काकांच्या पाठमोर्‍या मुर्तीला मी काकुळतीला येऊन हाका मारत होतो.. पण ऐकतील ते काका कसले. “काका मला वाचवा” बोलणार्‍याचे ऐकले नाही तर “काका माझे वाचा” बोलणार्‍याला ते दाद देणार आहेत होय. अजून दोनचारदा “काका काका” अश्या हाका मारल्या तर “काक: काक:” असे ऐकून उगाच कावळे जमा व्हायचे या भितीने मग मीच आवरते घेतले.

काका गेले आणि पाठोपाठ माझ्या लिखाणाचा या भूतलावरील पहिला अन आतापर्यंत तरी एकलाच असलेला पंखा दिगंबर धायगुडे दुकानात आला. याच्या ओल्ड फॅशन नावावर जाऊ नका. ते याला आजोबांकडून वारसा हक्काने मिळाले आहे. पोरगा मात्र अगदी फिल्मी किडा. सिनेमाची याला इतकी आवड इतकी आवड म्हणू सांगू की हिमेश मियांची सारी गाणी तोंडपाठ याची यावरूनच काय तो अंदाज बांधा. स्वतादेखील अभिनय, गाणी, संवादबाजी, नृत्य अश्या नाना आवडी पदरी बाळगून आणि म्हणूनच, एक कलाकारच एका कलाकाराला ओळखू शकतो या उक्तीला अनूसरून आम्ही दोघे एकमेकांचे चाहते.

दुकानात त्याची एंट्री नेहमीसारखी डायलॉग मारतच झाली,

जो आगे देख के चलता है,
लोग उसे पीछे से मारते है..

(त्यानंतर एक भला मोठा पॉज, समोरच्याला पहिल्या दोन ओळींचा अर्थ समजण्यासाठी दिलेला हा वेळ, आणि पुन्हा एकदा त्याच ओळी)

जो आगे देख के चलता है,
लोग उसे पीछे से मारते है..

और

जैसेही वो उन्हे जवाब देने पीछे पलट जाता है,
वही लोग उसके आगे निकल जाते है…

(अन लगोलग टाळी द्यायला वर केलेला हात)

“काय खरं नाही दिग्याशेट, आज सकाळी सकाळीच इम्रान हाशमी”, मी त्याच्या टाळीसाठी वर केलेल्या हाताखाली माझा हात अलगद आणत म्हणालो.

“सकाळी नाही रे काल रातच्याला, डर्टी पिच्चर तिसर्‍याला, पण हा भाई आपला वर्जिनल डायलॉग बरं का..
तुला म्हणून सांगतो बे अंड्या, पिच्चर फक्त तीन गोष्टींमुळे चालतंया बघ – कथा, पटकथा आणि च्यामारी संवाद. याच्यातच जर लोच्या असेल तर हिंदीतली ‘विद्या मालन’ असो वा आपली “ताई सामानकर”.. कोणी वाचवू शकत नाही. पिच्चर कितीभी डर्टी असला तरी तो चारच दिवसांत धुतला जातो बघ..”

इथून सुरु झालेल्या दिग्याने मला पुढच्या अर्ध्या तासात तीन तासांचा हिट सिनेमा सुपरहिट कसा बनवायचा याचे असे काही धडे दिले की आमचे फुल्ल अ‍ॅंड फायनल ठरलेच. हिरो आमचा “कुमार, कपूर नाहीतर खख.. खख.. खान” असणार. हिरोईनच्या जागी “कतरीना किंवा करीना” ला उचलणार. दिग्दर्शक म्हणून जोहरांच्या “करण” ला चान्स देणार. तर सांगायचा मुद्दा हा की प्रमुख कलाकारांच्या “क” च्या बाराखडीला कुठेही तडा जाऊ न देता कथा-पटकथा-संवाद अशी तिहेरी भुमिका निभावत लवकरच हा “अंड्या कपूर” मोठ्या पडद्याच्या मागे पदार्पण करणार आहे.

तळटीप – गीतकार म्हणून आपला अंड्या का नाही असा प्रश्न ज्या माझ्या होणार्‍या चाहत्यांना पडला असेल त्यांना एवढेच सांगू इच्छितो की खुद्द अंड्यानेच फुल्ल विनम्रतेने यांस नकार दिला, कारण आजकालच्या गाण्यांमध्ये असते काय तर, ढिंकचिका ढिंकचिका, चित्ता ता चिता चिता, चित्ता ता, ता रे….

– आनंद उर्फ अंड्या

 

वाफाळलेला कटींग चहा .. !!

शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन रिकामी, की ट्रेन रिकामी असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्‍याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते. खरे तर एखादी शाल ओढून आपले स्टेशन येईपर्यंत मस्तपैकी ताणून द्यावी अशी ती थंडी, पण तीच शाल नसली की झोपही लागू नये अशी ती थंडी. एका शालेची कमतरता गुलाबी आणि बोचरी थंडीतील फरक उघड करून जात होती. पण तसाही माझ्याकडे झोपण्याचा पर्याय नव्हताच. मध्ये काही कामासाठी पाचच मिनिटांसाठी का होईना वाशी स्टेशनला उतरायचे होते.

वाशी स्टेशन ! शनिवार असो वा रविवार, गरमी असो वा थंडी, एक गजबजलेला परीसर ! पण स्टेशनबाहेरचा भलामोठा पटांगणासारखा आवार त्याच वेळी तितकाच मोकळा वाटणारा. स्टेशनबाहेर पडल्यावर समोरच्या रिक्षा वा बस स्टॅंड पर्यंत जाईस्तोवर याच मोकळ्या पटांगणातून थंडीशी लढत जायचे होते. पण जायचेच होते. माझे काम तिथेच होते. पाचच मिनिटांचे काम, पाचच मिनिटांत उरकले. आता पुन्हा त्या पटांगणातूनच परतायचे होते. पण त्याआधी शरीराला काहीतरी रसद पुरवणे गरजेचे समजले.

हि तेथील आणखी एक तुफान गर्दीची जागा. रिक्षास्टॅडला लागूनच. कित्येक चहा वडा सामोश्याच्या टपर्‍या. झालेच तर ऑमलेट अन भुर्जीपाव. चायनीज वा मसाला डोसे खायचे असल्यास त्याचीही सोय. उभे राहणे जीवावर आले असल्यास बसण्याजोगे ओपन रेस्टॉरंटस. जे सभोवतालच्या मॉल्सच्या फूडकोर्टमध्ये मिळते ते थोड्याफार फरकाने इथेही उपलब्ध. एक गर्दीची टपरी मी देखील पकडली. भूक अशी नव्हतीच, किंबहुना काहीतरी गरमागरम तोंडात पडावे एवढीच इच्छा. इथे चहाला पर्याय नसतो. वाफाळलेला गरमागरम कटींग चहा. सोबत वडापाव नुसता तोंडी लावण्यापुरता. पण मला त्याचीही गरज नव्हती. तरीही सवयीने सर्वांच्या किंमतीवर नजर टाकली. अन अखेर बोर्डाच्या तळाशी ठळक खडूने लिहिलेल्या चहापाशी येऊन स्थिरावली. ठळक खडू, म्हणजे किंमत नुकतीच वाढवलेली दिसत होती.. कटींग चहा – ६ रुपये.. फुल्ल चहा – १० रुपये..

आजूबाजुला दिसणार्‍या चहाच्या गिलासांवर नजर टाकली तर कटींग चहाला छोटा ग्लास तर फुल्ल चहाला मोठा. छोट्या ग्लासाचा आकार दोन बोटांच्या चिमटीत लपून जावा इतपत. कधी दोन घोटांत संपून जावी समजू नये. घरी असताना बरेचदा यापेक्षा जास्त चहा मी आज मूड नाही, जात नाही, म्हणत मोरीत ओततो. तेवढा चहा आज बाहेर सहा रुपये झालीय हे समजले. नाहीतर मी अजूनही कॉलेजला मिळणार्‍या दोन रुपये कटींगच्याच विश्वात होतो.

फुल्ल चहा घ्यायचे ठरवून पाकीटातले दहा रुपये काढायला हात बाहेर काढले, जे एवढावेळ जीन्सच्या पुढच्या खिशात खोचले होते. अन पुन्हा त्यांना गार वारा झोंबला तसे कधी एकदा पटकन पैसे ढिले करून चहा घेतोय असे झाले. पण चहा होता खरा दहा रुपये वसूल करणारा, हे त्याला हातांत घेताच समजले. दोन्ही हातांना एक छानसा चटका बसला. काठोकाठ भरलेला तो गरम काचेचा ग्लास माझ्या थंड हातांना जास्त वेळ धरवणे कठीण व्हायच्या आत खिशातून रुमाल काढून त्यात तो धरला. त्याच्या बाहेरच्या बाजूने काही चहाचे ओघळलेले डाग तर नाहीत ना याचा विचार न करता. त्या वाफाळणार्‍या चहाचा आस्वाद घ्यायला आता मी तयार होतो. ओठाला लावायच्या आधी मी तोंडाजवळ आणून त्यातून निघणारी वाफ नाकांत भरून घेतली. एवढावेळ प्रत्येक श्वासागणिक थंड वाराच आत शिरत होता. श्वास घेणे गरजेचेच असल्याने त्याला रोखायचीही सोय नव्हती. पण आता मात्र श्वासांमार्फत त्या चहावर दरवळणारी वाफ जितकी प्राशन करता येईल तितकी करून घेतली. पण पिण्यास एकदा सुरुवात करताच झरझर संपू लागला. शेवटचा घोट किंचित कोमटच भासला, अन अजून एक चहा प्यायची इच्छा झाली. चहापेक्षाही त्या वातावरणात अजून थोडावेळ वावरायची इच्छा होती. तेथील सिगारेटचा धूरही आज फारसा त्रासदायक न वाटता वातावरण गरमच करत होता. मूड बदलला तसे भोवतालचे जग अनुभवायची नजर बदलली. नेहमीच्या तरुणाईच्या हिरवळीला आज मफलरीचा साज चढल्याने ती वेगळ्याच रुपात खुलून आली होती. आता मी स्वताही तिचाच एक हिस्सा झालो होतो. पुनश्च लागलेल्या चहाच्या हुक्कीला न्याय द्यायला दहा रुपये जड नव्हतेच.

दुसरी चहा संपताच मात्र मी तडक तिथून निघालो. चहाने अंगात आलेल्या उबेचा इफेक्ट ओसरायच्या आधी पाऊले झपाझप उचलत. दोन्ही हात खिशांत टाकून, अंगाचे मुटकुळे करून. अन आजूबाजुला माझ्यासारख्याच अवस्थेत दिसणार्‍या जीवांना न्याहाळत. ईतक्यात एक नजर एका वृद्ध जोडप्यावर पडली. सदरा लेंगा अन लुगडे असा मराठमोळा पोशाख म्हणून साहजिकच वाटणारा एक आपलेपणा. एका मळलेल्या गाठोड्यात संसार बांधून एक आडोसा पकडून बसले होते. मात्र दुसर्‍या बाजूने येणारी वार्‍याची लाट थोपवायला उपाय नव्हता. याआधी कधी असे कोणाला रस्त्याच्या कडेला पाहिले नव्हते असे नाही, पण या वातावरणात.. अन या वयात.. कसे सहन करत असतील हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. लांबून पाहता कुडकुडताना दिसले नाहीत, कदाचित त्यांच्या वेदना मेल्या असाव्यात वा माझी नजर. माझा स्टेशनवर जायचा रस्ता थोडाफार त्या कडेनेच जात होता. त्यांच्यावर पडलेली नजर आता त्यांना पार केल्याशिवाय फिरवणे शक्य नव्हते. आणि म्हणूनच मी माझी पावले जरा जास्तच झपझप उचलू लागलो. त्यांना मदत न करता पुढे जातोय हि टोचणी जास्त वेळा सहन करावी लागू नये हा एकच हेतू. मदत करायची म्हटली तरी त्यांना द्यायला एखादी शाल वा चादर बरोबर नाही असे स्वताच्या सोयीने अर्थ काढत मी माझी वाट धरली. पण अखेरच्या क्षणाला, मनात काही आले आणि थोडीशी वाट वाकडी करून त्यांच्यासमोर दहा रुपयांची नोट सरकवून पुढे गेलो..

ते तिथे भीक मागायला बसले होते की नाही हे माहीत नव्हते. त्यांना मदतीची गरज होती की नव्हती हे ही माहीत नव्हते. अन असली तरी काय येणार होते त्या दहा रुपयांत.. दोघांत एक फुल्ल चहा.. की वाफाळलेली एकेक कटींग. पोटाची आग त्यापेक्षा जास्त असल्यास कदाचित त्या दहा रुपयांत एखादा वडापावच घेतला गेला असता. अन तो ही कदाचित थंडगार.. पण मला मात्र एवढा विचार करायची गरज नव्हती. माझे काम झाले होते, मला समाधान मिळाले होते. आता मनाला कोणतीही टाचणी लागणार नव्हती. पण जर तेच दहा रुपये सरकवले नसले तर कदाचित रात्री झोपताना मला चादरीतून ऊब मिळाली नसती. स्साला कुणाला मदत करतानाही आपण आपलाच स्वार्थ बघतो. स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदत करतो. स्वताला थंडी वाजली तरच दुसर्‍याच्या थंडीची जाणीव होते, स्वताला भूक लागली तरच दुसर्‍याच्या पोटाची आग कळते. ती सरकवलेली दहा रुपयांची नोट म्हणजे माझी स्वतासाठीच एक वाफाळलेला गरमागरम कटींग चहा होता, जी मला स्वतालाच उब मिळावी म्हणून खर्च केली होती. बाकी मुंबई म्हटले की बस्स चार दिवसांची थंडी.. त्यानंतर ना मला थंडी वाजणार होती ना कोणाला वाजतेय याची मी पर्वा करणार होतो..

– तुमचा अभिषेक

 

चायवाला -!_/~

काल आमच्या ऑफिसच्या चायवाल्याने गोंधळ घातला. घाबरला बावरला, डोळ्यात पाणीही आले बिचार्‍याच्या. २२-२४ वर्षांचा मुलगा म्हणजे अगदीच काही लहान नाही, आपला तर खास फंटर ! कधी आपण जागेवर नसलो तरी आठवणीने चहा ठेवतो.. बघावे तर तसे हे एकच कारण, खास असण्याचे. पण ज्या आपुलकीने चहा पाजतो त्याने स्वताला खास झाल्यासारखे वाटते. म्हटलं तर कुठलीही देवाणघेवाण हा एक धंदाच, पण त्यात थोडा भावनांचा ओलावा आला की त्याचे आपलेच एक नाते बनते. काल कदाचित त्याच नात्याने त्याला तारले.

वॉशरूममधून जागेवर आलो तेव्हा त्याचे एकेकाच्या जागेवर जात चहा वाटपाचे काम चालू होते. पुढच्या दोनेक मिनिटात माझ्या जागेवर येईल त्या आधी पाण्याचे दोन घोट घेऊया म्हणून मागच्या टेबलवर ठेवलेली माझी पाण्याची बाटली घ्यायला म्हणून खुर्चीवर न बसता तिथेच गेलो. मात्र पाण्याचा एक’च घोट घ्यायचा नशीबात होते. पाठीमागून चारचौघांचा गोंगाट कानावर पडला तसे वळून पाहिले तर माझ्या टेबलाचा रंग पार पालटला होता. आधी पांढरा असायचा म्हणे, पण आता पुरता रंगला होता. माझ्या वाटणीची चहा कॉम्प्युटरचा किबोर्ड पित होते, तर मॉनिटरच्या स्क्रीनवर नवीन वॉलपेपर छापला गेला होता. डायरीने वर्ष सरायला दहा दिवस शिल्लक असतानाच माझा निरोप घेतला होता. काही शिंतोडे खुर्चीवर उडाले होते तर कसलाही आवाज न करता चहाचा एक ओघोळ टेबलावरून खाली येत फ्लोरींगवर आपले साम्राज्य स्थापत होता.

माझाच टेबल का??? हा मनात आलेला पहिला विचार. पाठोपाठ किबोर्ड आणि कॉम्प्युटर हि ऑफिसची मालमत्ता असते हे त्यातल्या त्यात चांगलेय हा दुसरा विचार. इतक्यात नजर अचानक एका ओळखीच्या वस्तूवर पडली. माझा कॅल्क्युलेटर होता तो.. हो, माझा स्वताचाच. त्याची पुर्ण आंघोळच झाली असल्याने एवढा वेळ त्याचे अस्तित्व जाणवले नव्हते. घाईघाईत त्याला उचलून हाताच्या चिमटीत उभा धरला. समोर पाहिले तर चहावाला देखील तसाच उभा भासला. माझ्या कॅल्क्युलेटरसारखा. जी अवस्था याची चहाने केली होती तीच त्याची भितीने. जेवढी चहा झटकता येईल तेवढी झटकून मी आजूबाजुचे रफ पेपर घेऊन त्याला पुसायला घेतला. इतर मालमत्तेशी माझे काही घेणेदेणे नसल्यासारखे. आणि हो, त्याचबरोबर त्या चहावाल्याच्या बडबडीकडेही दुर्लक्ष करत. काय झाले, कसे झाले, याची तोडकीमोडकी कारणे तो देत होता, मात्र माझा कॅल्क्युलेटर बिघडलाच तर तो काही भरून देऊ शकत नाही हि मनाची समजूत काढून मी त्याला ठिक करायच्या मागे लागलो होतो.

पुढची दहा-पंधरा मिनिटे मी बोटांनी बटणे दाबून दाबून आत गेलेली चहा बाहेर काढायच्या प्रयत्नात होतो. थोडावेळ एसीसमोर धरला तर मध्ये त्या चहावाल्यानेच आणून दिलेले टिश्यू पेपर घेऊन आत गेलेली चहा शोषायचा प्रयत्न केला. एवढ्या काळात त्या चहावाल्याने पाणी आणि फडक्याने माझी जागा आणि इतर औजारे पुसुन पुर्ण साफ केली होती. इतरांनीही हलक्याफुलक्या कॉमेंटस मारत त्याच्यावरचा ताण थोडाफार हलका केला. हातात बंद पडलेला कॅल्सी होता तरीही साफसुधरी जागा आणि निवळलेले वातावरण पाहून माझेही वैतागलेले मन पुरेसे स्थिर झाले. मात्र अजूनही त्याचे कारणे द्या चालूच होते ज्याचे मी काहीच करू शकत नव्हतो. चल छोड यार, जो हुआ सो हुआ असे मनात आले तरी पटकन बोलून दाखवणे माझा स्वभाव नाही कि मला ते जमत नाही. पण खरेच जे झाले ते झालेच. कदाचित त्याची तितकीशी चुकही नसावी, कारण नुकतीच माझ्या जागेवर एक छोटीशी कामकाजाची मिटींग कम गप्पांची मेहफिल आटोपल्याने खुर्च्या तश्याच आपली मूळ जागा सोडून वेड्यावाकड्या पसरल्या होत्या. त्यांनाच तो अडखळला असावा या संशयाचा फायदा त्याला देण्यास हरकत नव्हती.

तर, माझ्या हातात एक फ्रेश अन गरमागरम चहाचा प्याला ठेऊन अखेर तो निघून गेला. पण नुकत्याच त्या चहाने घडवलेला उत्पात जवळून आणि स्वतावर अनुभवलेला असताना कसाबसा अनिच्छेनेच तो घश्याखाली ढकलला. याहीपेक्षा काय वाईट घडले असते याचा विचार करता आठवले कि आज आपण कधी नव्हे ते पांढरेशुभ्र शर्ट घालून आलो होतो. जर आपण जागेवर बसलेलो असतो तर… काही शिंतोडेदेखील पुरेसे होते त्याची चमक घालवायला.. तसेच आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे चहाच्या एका प्याल्याने केलेल्या नासधुशीनंतर ऑफिसवाले केवढीशी ती चहा पाजतात हि उगाचची कुरबुर यापुढे मी तरी कधी करणार नव्हतो.

कॅलक्युलेटर मिटून बॅगेत टाकला, चिकट झालेला कीबोर्ड बदलला, खुर्चीवर बसायच्या आधी ती पुन्हा एकदा साफ पुसली गेलीय याची खात्री केली आणि नेहमीच्या कामाला लागलो. ते थेट रात्री बायकोला दिवसभराच्या घडामोडी सांगतानाच पुन्हा याची आठवण झाली. मात्र पुन्हा कॅल्क्युलेटर चालू झालाय कि बंद पडलाय हे बघायची तसदी नाही घेतली.

किस्सा बायकोला सांगून झाला तरी मनात मात्र घोळत राहिला. आजच्या प्रकाराचा त्रागा न करता तो हलकाच घेतला हे एकंदरीत दिवसाच्या शेवटाला स्वतालाच बरे वाटले. पण या चहावाल्यावरून आणखी एक चहावाला, खरे तर चहा कम पोहेवाला आठवला. ईंजिनीअरींगच्या पहिल्या वर्षाला सांगलीच्या वालचंद कॉलेजला असताना भेटलेला. दोन वेळच्या जेवणाची मेस लावली असली तरी सकाळचा चहानाश्ता रोजच्या भुक आणि इच्छेनुसार बाहेरच करावा लागायचा. आम्हा सार्‍यांचाच पॉकेटमनी जेमतेम, त्यामुळे ठरवून आणि पुरवूनच व्हायचा. कुठे ४ रुपयांच्या जागी ३ रुपयांना पोहे मिळतात असे समजले तर थोड्या तंगड्या तुडवत तिथली चव चाखून यायची. जमली नाही तर पुन्हा नेहमीच्याच जागी. अश्यातच एके दिवशी विश्रामबागेत एके ठिकाणी खूप चांगले पोहे मिळतात असे समजले. फारसे लांबही नव्हते, थोडी वाट वाकडी करावी लागणार होती इतकेच. पण खरेच, खबर पक्की होती, खाल्ले ते पोहे लक्षात राहण्यासारखेच होते. इथे आल्यापासून गेले तीन महिने एवढे चांगले पोहे इतर कुठे खाल्ले नव्हते. पहिला चमचा तोंडात घेताच मी आणि माझ्या मित्राने ठरवले की आता रोज इथेच. पण तेच तोंड पैसे देताना मात्र थोडेसे हिरमुसल्यासारखे झाले, जेव्हा समजले की इथे पोहे ४ च्या जागी ५ रुपयांना आहेत. माझ्या मित्राने पटकन तसे बोलूनही दाखवले. तर समोरून उत्तर आले की भाऊ पोहे खाऊन तर बघा, इतर कुठे असे मिळणार नाहीत. काय चुकीचे बोलत होता तो, खरे तर होते. पटतही होते. पण रोजचा एक रुपया जास्त म्हणजे आमचा महिन्याचा हिशोब ३० रुपयांनी बोंबलला होता !

दुसर्‍या दिवशी काय करावे या द्विधा मनस्थितीत, आपसूकच वळणावर आम्हा दोघांचीही पावले त्याच्याच दिशेने वळली. कालच्या पोह्याची चव जीभेवर रेंगाळत होतीच, अन महत्वाचे म्हणजे आता यापुढे आमच्या नेहमीच्या गाडीवरचे पोहे फिके लागले असते. पोहे खाऊन आम्ही दोघांनी आपापले पाच पाच रुपये त्याच्यासमोर धरले तसे त्याने नेमके चार चार रुपयेच उचलले आणि म्हणाला, स्टुडंट कन्सेशन.. तुमच्यासाठी चार रुपये फक्त !

अर्थात, हे कन्सेशन आजपासूनच त्याने सुरू केले होते, तसेच ते इतरांनाही लागू होते की नाही माहित नव्हते. पण त्यानंतर मग आमचे रोजचे नाश्त्याचे ठिकाण तेच झाले. काही इतर मित्रांनाही आम्ही वाट वाकडी करायला लावली. आम्हा सर्वांसाठी पोहे चार रुपये पर प्लेटच होते. पुढे जाऊन त्याचेही उधारखाते सुरू झाले. तसा वयाने आमच्यापेक्षा तो सात-आठ वर्षे मोठाच, पण आमच्या गप्पांच्या ग्रूपमध्ये तो देखील सामील होऊ लागला. इतर स्थानिक गिर्हाईकांच्या तुलनेत आमचा कटींगचा ग्लास किंचित जास्त भरला जाऊ लागला. एके दिवशी संध्याकाळी भूक लागलेली असताना तिथे गेलो तेव्हा पोह्याच्या जागी मिसळ कट्टा रंगलेला दिसला. पोह्याची चव तोंडावर बनवून आल्याने परत फिरणार इतक्यात तोच म्हणाला, एकदा मिसळ खाऊन तर बघा भाऊ… नकार द्यायचा प्रश्नच नव्हता !

ती मिसळ एवढी आवडली की पुन्हा आता या मिसळीसाठी रोज संध्याकाळी इथे यायची चटक तर लागणार नाही ना अशी भिती वाटली, कारण ती चटक खिश्याला नक्कीच परवडणारी नव्हती. मुळात थोड्याच वेळात मेसचा टाईम होत असल्याने तेवढी भूकेची कळ सोसल्यास संध्याकाळच्या भरपेट नाश्त्याची खास गरजही नव्हती. त्याचबरोबर ती मिसळ अशी काही तिखट झणझणीत होती की रोज रोज ती खाणे तब्येतीलाही झेपणारे नव्हते. अन तरीही शेवटाचा शेव-दाणा पुसून वाटी चकाचक साफ करून त्याला पैसे द्यायला गेलो तेव्हा त्याने ते घेण्यास नकार दिला, असे बोलत की आवडली आणि पुन्हा आलात तरच पैसे घेईन. आजच्या तारखेला खिश्यात चार दमड्या खुळखुळत असताना बळेच एखाद्याच्या हातात पैसे कोंबले असते, पण तेव्हा कोण आनंद झाला. स्वाभिमानाची व्याख्या त्या दिवसांत वेगळीच असते नाही..

पुढच्या मिसळकट्ट्याची संध्याकाळ दोन-चार दिवसांतच आली अन अधनामधना येतच राहिली. मात्र त्याने पहिल्या मिसळीचे पैसे काही शेवटपर्यंत घेतले नाही. बस्स आठवणीतच राहिले.

आज पुन्हा नेहमीसारखेच ऑफिस होते. नेहमीच्याच वेळी तो चायवाला आला. चहा देतेवेळी आज त्याच्या हसण्यात आपलेपणा किंचित जास्त भासला. चहाचा चटकाही जिभेला किंचित जास्त लागला. कोणालातरी कालच्या प्रसंगाची आणि माझ्या कॅलक्युलेटरची आठवण झाली. मी अजूनही तो चालू झालाय का बंदच पडला हे चेक केले नव्हते. विषय हसूनच टाळून नेला. आपसात काही संबंध नसताना मला त्या कधीकाळच्या चहापोहे मिसळीचे कर्ज थोडेफार फिटल्यासारखे वाटले. चहा पिता पिता पुन्हा एकदा ते जुने दिवस आठवू लागले. मला त्या आठवणींबरोबर सोडून चायवाला मात्र केव्हाच पुढे निघून गेला होता.

– तुमचा अभिषेक

 

ड्रिमगर्ल !

गेले तीन दिवस ती ऑफिसला आली नाही. अन आज चौथ्या दिवशी जाणवू लागले की काहीतरी चुकतेयं. पाणवठ्यावर बाटली भरायला जाताना वाटेतले एक प्रेक्षणीय स्थळ नाहिसे झालेय. त्यामुळे बाटली पाण्याने पुर्ण भरली तरी तहान भागेनाशी झालीय. आज मला समजले की तिला तिथे बसलेले बघण्याची मला सवयच लागली होती. वाढलेली तहान आणि बाटलीचा छोटा होत जाणारा आकार याला तीच जबाबदार होती. जरी तिने ती घेतली नाही तरी तीच होती. तिने मात्र कधीही मान वर करून समोरून कोण जातेय ते पाहिले नसावे. मग आमच्याकडे बघण्याचा योग तरी कुठून यावा. कदाचित येणारा जाणारा प्रत्येक जण आपल्याकडेच नजर टाकत जातो याची तिला जाणीव असावी. त्यावर तसेच दुर्लक्ष करण्याची तिची सवय असावी. पण यामुळेच माझ्यासारख्यांचा एक फायदा मात्र व्हायचा. तिला बिनधास्तपणे बघता यायचे. अन्यथा तिच्या पहिल्या कटाक्षानंतरच कधी मान वाकडी करायची हिंमत झाली नसती.

तिच्याशी पहिली नजरानजर होण्याचा योग आला तो अपघातानेच. मी ट्रेनने प्रवास करायचो तर ती ऑफिसच्या बसने. ती वेळेवरच निघायची तर मी बरेचदा उशीरा. त्या संध्याकाळी मात्र तिलाही उशीर झाला असावा. ऑफिसची बस सुटल्याने ती देखील ट्रेनसाठी स्टेशनला आली होती. तिथेच प्लॅटफॉर्मवर मोजून पंधरा फूटांच्या अंतरावर गाठ पडली. नजर पडताच तिने त्वरीत फिरवली. मात्र नजर फिरवतानाही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीपासूनच फिरवतोय असेच भाव त्यात होते. इथेच मला आकाश ठेंगणे झाले. गेले तीन महिन्यांची आमची ओळख, एकतर्फी बघण्याचीच आहे की काय असे जे वाटत होते, ते तसे नव्हते तर. तिच्या ठायी माझे काहीतरी अस्तित्व होते. भले एका य:कश्चित सहकर्मचार्‍याचे का असेना… अस्तित्व होते तर !

हातातली भेळ खाऊ की नको, की कुठे लपवू असे झाले होते. मात्र ते वाटणे उगाचच होते. तिने काही शेवटपर्यंत पलटून पाहिले नाही. पाचच मिनिटांत ट्रेन आली आणि ती निघून गेली. समोरच्या प्लॅटफॉर्मवरून ऑफिसमधल्या एकाने हात दाखवला तेव्हाही उगाचच, अगदी उगाचच मनात आलेली पकडले गेल्याची भावना लपवताना तारांबळ उडाली होती. पुढे त्या तश्याच संध्याकाळची वाट पाहण्यात आणिक पुढचे तीन महिने गेले पण ती काही आली नाही…

…………..पण त्या वाट पाहण्यातही ती संध्याकाळ छान कटायची. ती होतीच तशी. वर्णन तरी काय करू तिचे, शब्दांत तिचे सौंदर्य बांधायचा प्रयत्न करणे म्हणजे माझ्यासाठीचे तिचे अस्तित्व भूतलावर आणने. कोणी तिला ऑफिसची हिरोईन म्हणायचे तर कोणी माधुरी दिक्षित. प्रत्येकाचे आपापले कोडवर्ड होते. कित्येकांचे तेच पासवर्ड होते. काही नावे चारचौघांत सांगण्यासारखीही नव्हती. पण प्रत्येकाला ती आपल्या टाईपची वाटायची, आणि हेच तिचे वैशिष्ट्य होते. माझ्यासाठी मात्र ती ऑफिसातली स्वप्नसुंदरी होती. हो, ऑफिसातलीच. ऑफिसला पोहोचताच, ती नजरेला पडताच, तिचा विषय निघताच, तिच्याबद्दलचे स्वप्नरंजन सुरू व्हायचे. मात्र ऑफिस सुटल्यावर तिचे आणि आपले विश्व दोन असमांतर दिशांना. भले ती माझे ऑफिसला जाण्याचे कारण नव्हती, मात्र ऑफिसच्या कामातून मिळणारा फार मोठा विरंगुळा होती. किंबहुना त्यापेक्षाही जास्त, जे आज ती नसताना जाणवत होते.

आमच्या नजरांची दुसरी भेट घडायला अजून एक मोठा कालखंड जावा लागला. पण यावेळची भेट मात्र ठसठशीत घडली. ऑफिसतर्फे छोटीशी पार्टी होती. दुपारच्या जेवणाची, ऑफिसच्याच वेळेत आणि ऑफिसच्याच आवारात. पुन्हा एकदा उशीरच मदतीला धाऊन आला. एकावेळेस चाळीस लोकांची बसायची सोय, मात्र मोजून आम्ही चार जणं तिथे होतो. दोन तिच्याच मैत्रिणी. आणि मी इथे एकटाच. यापेक्षा आदर्श स्थिती दुसरी नसावी.. तिला संकोच वाटू नये अशी.. मला लाज वाटू नये अशी..

ताट घ्यायला मुद्दामच विलंब केला जेणे करून सोयीची जागा पकडता येईल. अन तशीच पकडली. अगदी तिच्या सामोरी. आज जी नजरांची शाळा भरणार होती त्यातला अभ्यास मला पुर्ण सेमीस्टर पुरणार होता.

घास अगदीच नाकात जाणार नाही इतकेच लक्ष माझे जेवणावर होते. तिच्या नैसर्गिक हालचाली इतक्या जवळून अन निरखून टिपण्याची हि पहिलीच संधी होती. खास दिवसाचा खास पोशाख, प्रत्येक घासागणिक होणारा अलंकारांचा किलकिलाट, त्यात मिसळलेले तिचे मंजूळ शब्द, अधूनमधून टिश्यू पेपरने सावरले जाणारे ओठ, डोळ्यांवर आलेली केसांची बट सावरायचे मात्र नसलेले भान.. पुढची पंधरावीस मिनिटे एखाद्या चित्रफितीप्रमाणे मनावर कोरूनच मी उठलो.

या भेटीने मला स्वत:ला तिच्या आणखी जवळ नेऊन ठेवले. यापुढे स्टेशनवर कधी भेटल्यास ती पलटून बघेल याची खात्री नव्हतीच. पण तरीही, पुन्हा कोणी समोरच्या प्लॅटफॉर्मवरून हात दाखवल्यास मी बावरून जाणार नव्हतो. तिलाच बघत होतो हे कबूल करायचा आत्मविश्वास आता माझ्या ठायी नक्कीच जमा झाला होता.

आमच्या तिसर्‍या भेटीचा क्षण मात्र कोणताही अपघात नव्हता. ना अचानक घडले होते. त्या भेटीची कल्पना मला आदल्या दिवशीच आली होती. पहिल्यांदा तिला कामानिमित्त थेट भेटायचे होते. तिच्या डिपार्टमेंटमध्ये तिच्या हाती एक कागद सुपुर्त करून एका प्रतीवर तिचे हस्ताक्षर मिळवायचे होते. खास दिवसाचा खास पोशाख, करायची पाळी आता माझी होती. ते देखील कोणाच्या नजरेत न भरेल असेच.

प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मात्र छातीतील धडधड असह्य होऊ लागली. एक बरे होते जे हस्ताक्षर करायचे काम तिचे होते. थंड पडलेल्या माझ्या हातांनी पेन तेवढेही चालले नसते. कागद परतवताना ती मला थॅंक्यू म्हणाली. प्रत्युत्तरादाखल मी देखील थॅंक्यू’ च म्हणालो. तसे ती हसली.

औपचारीकपणेच हसली, मात्र आपण औपचारीकपणेच हसतोय हे समोरच्याला समजण्याची पुरेपूर काळजी घेणारा तिचा स्वभाव आवडून गेला. कुठलेही गैरसमज न सोडणारा..

नाही म्हणायला आमच्या भेटी अजूनही कैक घडल्या. संवाद अजूनही कैक रंगले. काहीच प्रत्यक्षात उतरलेले तर कित्येक कल्पनाविलास. सारेच लिहायचे म्हटल्यास सुरेखशी कादंबरी चितारली जाईल, अन तरीही काहीतरी शिल्लक आहे हिच भावना राहील.

पण आज चार ओळी खरडवाव्याश्या वाटल्या. तिच्या आठवणी जागवाव्याश्या वाटल्या. तिचे म्हणे लग्न झाले होते, गळ्यात मंगळसूत्र घालायची. कसे कळणार, कधी नजर तिथे गेलीच नाही. कश्याला जावी, इथे तरी कोण तिच्याशी लग्न व्हावे या अपेक्षा ठेऊन होते, इथे तरी कोण स्वत: अविवाहीत होते. आज तीन महिने झालेत तिला शेवटचे बघून. अमेरिका खंडातल्या कुठल्याश्या शहरात स्थायिक झालीय असे कानावर आहे. तिथेही तिचे इतकेच चाहते असतील? माहीत नाही.. पण इथे मात्र तिची जागा अजूनही खालीच आहे.. ऑफिसातली आणि आमच्या हृदयातलीही…

– तुमचा अभिषेक