RSS

Monthly Archives: ऑक्टोबर 2014

उकिरडा (एक लघुकथा)

प्लास्टीक चेंडू – ३.५० रुपये,
रबरी चेंडू – ८ रुपये,
टेनिस चेंडू – २० रुपये …..
एक अद्रुष्य बोर्ड, माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवत तरळत होता. खिशात चाचपून पाहिले एक फुटी कौडी नव्हती. कंपासपेटीत नाही म्हणायला दोन-अडीज रुपयांची चिल्लर असावी. ती ज्या कामासाठी राखून ठेवली होती ते तर आता राहिलेच, त्यात वरतून दिड-दोन रुपये टाकून कसेबसे साडेतीन बनवले तरी प्लास्टीक चेंडूसाठी पोरे ऐकणार नव्हती. टेनिसचा चेंडू फोडला होता, तर किमान रबराचा तरी भरून द्यावा लागणार होता. तसेही आधीच मला कोणी खेळायला घ्यायचे नाही. टेनिसचा चेंडू म्हटले तर नाहीच नाही. सर्वांनी आपापल्या खिश्याला एक-दोन रुपयांची चाट मारून पैसे उभारले होते, दिवाळीच्या सुट्टीचे सात-आठ दिवस मैदानात नुसता कल्ला करायला… आणि मी पैल्याच दिवशी चेंडू फोडला होता!

आमच्या गल्ली क्रिकेटचे नियम देखील चक्रम होते. ज्या फटक्यावर चेंडू फुटायचा तो डेड बॉल न ठरवता फटका मारणार्‍याला बाद ठरवले जायचे. बहुतेक याला कारण मीच होतो. बारीक असलो तरी काटक होतो. मनगटी ताकदीच्या जिवावर असले काही खणखणीत फटके मारायचो की बस्स रे बस! १० तील ८ चेंडू माझ्याच फटक्यांवर फुटायचे. आणि उरलेले २ खिळखिळे करण्यातही ९० टक्के वाटा माझाच असायचा. सगळे मला थंड घेत जा म्हणून नेहमीच समजवायचे. मी देखील स्वत:ला बरेचदा समजवून पाहिले होते. पण एकदा का चेंडूवर नजर खिळली आणि फटके व्यवस्थित बसू लागले की नकळत माझ्या अंगात संचारू लागायचे.. मग बस्स रे बस! चेंडू फुटण्यापेक्षा स्वता फुटू नये म्हणून पोरं मला घाबरायची. म्हणून माझा राग राग करायची. माझ्या बॅटींगला फिल्डींग सोडून लांब लांब पळायची. माझे फटकेही असेच लांब लांब जायचे. समोरच्या छपर्‍यावर चेंडू आदळला की ६ धावा मिळायच्या. त्या पलीकडे या खेळात धावा मिळत नाहीत. आणि तरीही मी चेंडू छपराच्या पार पलीकडे भिरकाऊन द्यायचो. छपरापलीकडे एक अर्धवट बंद पडलेली कंपनी होती. चेंडू घरंगळत तिच्या गटारात जाऊन पडायचा. गटार म्हणजे दोन चौकोनी खोल्यांच्या आकाराचा पसरट नालाच. तिथे बॉल गेला कि मग तो गेलाच! म्हणून ज्या छपर्‍याला चेंडू लागल्यावर षटकार मिळायचा, त्यापेक्षा जास्त जोराने फटका मारून छपरा पार केला तरी फलंदाज बाद ठरवला जायचा… अन हे सहज जमवू शकणारा सर्व पोरांमध्ये मी एकलाच होतो!

एखाद्या चांगल्या फटक्यावरही बाद व्हावे लागल्याने बरेचदा विचार मनात यायचा, आम्हा गरीबांच्या पोरांसाठी सरकारने दहावीस रुपयांच्या बजेट मध्ये न फुटणारे चेंडू बनवायला हवेत. किंवा जे आहेत तेच दोन-पाच रुपयांना विकायला हवेत. खरे तर मैदानाची सोय झाल्यास बरेच प्रश्न सुटतील. ना बॉल छपर्‍याचा पल्याड जाणार, ना दोन्ही बाजूने पसरलेल्या चाळीच्या भिंतीना आपटत लवकर फुटणार. पण नवीन काहीतरी घडायला हे आधीचे सरकार बदलायला हवे. म्हणूनच कित्येकदा “हा आवाज कोणाचा ..” ओरडत उन्हातान्हात फिरलोय. पण ते लोक सुद्धा गरजू विद्यार्थ्यांनाच वही वाटप करायचे. माझी गरज चेंडू होती.. जणू गरीबांसाठी खेळ म्हटले की मूलभूत गरजांच्या तक्यात पार तळाचा रकाना!

ते राहिलं, पण आता काय. पोरांची समजूत कशी काढू. त्यांना कसं पटवू. आता चिडले अन मला बॉयकॉट केला तर…… पुन्हा खेळणे मुश्किल! स्साली आपली क्रिकेटची कारकिर्द इथेच संपायची. ते काय नाय, आता एकच उपाय. विशल्या म्हणतो तसे नाल्यात उतरायला हवे. कालचा रबरी बॉल अडकलाय तिथे. काढला तर आजच. उद्याला कंपनी सुरु झाली की त्यांचा सफाई कामगार येऊन हडपणार. पण नाल्यात उतरणे सोपे नव्हते. या बाजूने छपर्‍यावर चढून त्या बाजुने पाईपाला लोंबकळत उतरावे लागणार. पोरांची मदत घेत इथून चढलोही असतो. पण तिथून, त्या गंजलेल्या घाणीच्या पाईपाला लटकायचे म्हणजे………… पण माझी खरी भिती वेगळीच होती!

घरी कळता कामा नये. आज्जीला आधीच माझे शेजारच्या वस्तीमधल्या पोरांबरोबर खेळणे आवडायचे नाही. कधी पडलो तिच्या नजरेला तर वरतून करट्या फेकून मारायची. नेहमी तिचा नेम मलाच लागेल असे नाही… हे एक आणखी कारण होते, त्या पोरांना मी खेळायला नको असायचे!

…….

मोठ्या नाराजीनेच पोरे राजी झाली, त्या गटारातील चेंडूवर मांडवली करायला. पण त्यांना माहीत होते, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पैश्याचे सोंग घेता येत नाही हे वयाच्या बाराव्या वर्षी समजलेली पोरे. त्यांच्याकडेही दुसरा पर्याय नव्हता. विशल्यानेच मग घोडा आणून दिला. त्यानेच खालच्या बाजूने पकडला. मी वर चढलो तिथे त्याचे काम संपले. पलीकडल्या बाजूने मलाच पाईपावरून उतरायचे होते. जवळून तो आणखी घाण दिसत होता. आणखी खडबडीत. पण त्या आधी छपर्‍यावर अडकलेल्या दोन पतंगी काढून दिल्या. त्या नादात थोडासा तळहात चिरला. पाईपाचा खरखरीतपणा त्याला आणखी चिरत जाणार याची भिती वाटली. पण सुदैवाने तसे झाले नाही. झाले ते उलटेच. त्या बुळबुळीत झालेल्या पाईपावरून मी घसरतच खाली उतरलो. शर्टाचा वास आता जाणार नव्हता. पण आधी अधाश्यासारखा चेंडू शोधायला लागलो. चारही दिशांना सभोवताल एक नजर फिरवून झाली. एक ओकारी काढून हलके व्हावेसे वाटले. पण ज्या कामासाठी उतरलो होतो त्याला बाजूला सारून काही करायचे नव्हते. एकदा चेंडू मिळाल्यावर बिनदिक्कत चार ओकार्‍या काढल्या असत्या.. पण आधी चेंडू! मूळचा लाल रंग बाटल्याने शोधायला वेळच लागला. पण जेव्हा सापडला तेव्हा मोठ्याने आरोळी ठोकत त्याचा मुका घ्यावासा वाटला!

परतीचा रस्ता बिकट होता. जेमतेम दहा-बारा फुटांचा खडा पाईप. पण जो बुळबुळीतपणा उतरायला मदत करून गेला तोच चढायला त्रास देत होता. पाठीमागे वळून पाहायच्या विचारानेही शिसारी येत होती. सभोवताली बघता चारही भिंती अंगावर आल्यासारख्या वाटत होत्या. मुळातच अंधारी जागा हळूहळू आणखी मावळत होती. इतक्यात चकाक चक् चकाक, आवाज करत एक घूस मला घाबरवत पळाली, तसा उभ्या अंगावर एक काटा सर्रसरला.. खरचटेल, शर्ट मळेल, फाटेल, आज्जीला समजेल, मार पडेल.. विचारांचा गुंता सुटायच्या आधीच मी पाईपाला घसपटत अर्ध्यावर पोहोचलो होतो. चेंडू अगोदरच पलीकडे भिरकावला होता, पाठोपाठ अंगही भिरकावत बाहेर पडलो. विशल्याने पुन्हा छपराला घोडा लावला. उतरताना अंगाचे दुखरेपण जाणवत होते. पण त्यापेक्षा जास्त किळसवाणा होता तो हातापायांचा वास!

शर्टाला शरीरापासून दूर धरत नळाकडे धाव घेतली. पाठीमागे पोरांचा गलका चालूच होता.. भंग्याचे पोर भंग्याचे पोर.. जे आपण नाहीच आहोत त्याची लाज कसली. अंगाची साफसफाई झाल्याशिवाय ते चिडवायचे थांबणारही नव्हतेच.. पण इतक्यात ज्याची भिती होती तेच झाले.. ताड ताड तडाक्.. आकाशातून करट्यांचा वर्षाव होऊ लागला. आज्जीला खबर लागली होती. बघता बघता सारी पोरे पांगली. करट्यांचा नेम चुकवत मी देखील नळाचा आडोसा धरला.

स्वच्छ झालो तसे प्रसन्न वाटू लागले. आता मी आज्जीचा मार खायला सज्ज होतो. आज आज्जी जरा जास्तच भरात होती. बदड बदड बदडला. हातापायांवर नुसते लाललाल वळ. पण मगाशी ज्या अनुभवातून गेलो होतो त्यापुढे हे काहीच नव्हते. आई मात्र उगाचचं आसवे गाळत बसली होती. तिच्याकडे तेवढे बघवत नव्हते. आज्जीला तिची पण दया आली नाही. झोपण्यापूर्वी तिला आईवर डाफरताना पाहिले .. वांझ मेली, कुठला उकिरडा घरात आणलाय देव जाणे.. हे परमेश्वरा.. … … पुढे काय पुटपुटली ऐकू आले नाही. आईने बस्स एक हुंदका देत दिवा मालवला.. मी गटारीत उतरलो म्हणून आज्जी रागाने मला उकिरडा म्हणाली हे समजले.. पण वांझचा अर्थ काय हे आता उद्या आईलाच विचारायला हवे म्हणत मी सुद्धा झोपी गेलो!

– तुमचा अभिषेक