RSS

उकिरडा (एक लघुकथा)

प्लास्टीक चेंडू – ३.५० रुपये,
रबरी चेंडू – ८ रुपये,
टेनिस चेंडू – २० रुपये …..
एक अद्रुष्य बोर्ड, माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवत तरळत होता. खिशात चाचपून पाहिले एक फुटी कौडी नव्हती. कंपासपेटीत नाही म्हणायला दोन-अडीज रुपयांची चिल्लर असावी. ती ज्या कामासाठी राखून ठेवली होती ते तर आता राहिलेच, त्यात वरतून दिड-दोन रुपये टाकून कसेबसे साडेतीन बनवले तरी प्लास्टीक चेंडूसाठी पोरे ऐकणार नव्हती. टेनिसचा चेंडू फोडला होता, तर किमान रबराचा तरी भरून द्यावा लागणार होता. तसेही आधीच मला कोणी खेळायला घ्यायचे नाही. टेनिसचा चेंडू म्हटले तर नाहीच नाही. सर्वांनी आपापल्या खिश्याला एक-दोन रुपयांची चाट मारून पैसे उभारले होते, दिवाळीच्या सुट्टीचे सात-आठ दिवस मैदानात नुसता कल्ला करायला… आणि मी पैल्याच दिवशी चेंडू फोडला होता!

आमच्या गल्ली क्रिकेटचे नियम देखील चक्रम होते. ज्या फटक्यावर चेंडू फुटायचा तो डेड बॉल न ठरवता फटका मारणार्‍याला बाद ठरवले जायचे. बहुतेक याला कारण मीच होतो. बारीक असलो तरी काटक होतो. मनगटी ताकदीच्या जिवावर असले काही खणखणीत फटके मारायचो की बस्स रे बस! १० तील ८ चेंडू माझ्याच फटक्यांवर फुटायचे. आणि उरलेले २ खिळखिळे करण्यातही ९० टक्के वाटा माझाच असायचा. सगळे मला थंड घेत जा म्हणून नेहमीच समजवायचे. मी देखील स्वत:ला बरेचदा समजवून पाहिले होते. पण एकदा का चेंडूवर नजर खिळली आणि फटके व्यवस्थित बसू लागले की नकळत माझ्या अंगात संचारू लागायचे.. मग बस्स रे बस! चेंडू फुटण्यापेक्षा स्वता फुटू नये म्हणून पोरं मला घाबरायची. म्हणून माझा राग राग करायची. माझ्या बॅटींगला फिल्डींग सोडून लांब लांब पळायची. माझे फटकेही असेच लांब लांब जायचे. समोरच्या छपर्‍यावर चेंडू आदळला की ६ धावा मिळायच्या. त्या पलीकडे या खेळात धावा मिळत नाहीत. आणि तरीही मी चेंडू छपराच्या पार पलीकडे भिरकाऊन द्यायचो. छपरापलीकडे एक अर्धवट बंद पडलेली कंपनी होती. चेंडू घरंगळत तिच्या गटारात जाऊन पडायचा. गटार म्हणजे दोन चौकोनी खोल्यांच्या आकाराचा पसरट नालाच. तिथे बॉल गेला कि मग तो गेलाच! म्हणून ज्या छपर्‍याला चेंडू लागल्यावर षटकार मिळायचा, त्यापेक्षा जास्त जोराने फटका मारून छपरा पार केला तरी फलंदाज बाद ठरवला जायचा… अन हे सहज जमवू शकणारा सर्व पोरांमध्ये मी एकलाच होतो!

एखाद्या चांगल्या फटक्यावरही बाद व्हावे लागल्याने बरेचदा विचार मनात यायचा, आम्हा गरीबांच्या पोरांसाठी सरकारने दहावीस रुपयांच्या बजेट मध्ये न फुटणारे चेंडू बनवायला हवेत. किंवा जे आहेत तेच दोन-पाच रुपयांना विकायला हवेत. खरे तर मैदानाची सोय झाल्यास बरेच प्रश्न सुटतील. ना बॉल छपर्‍याचा पल्याड जाणार, ना दोन्ही बाजूने पसरलेल्या चाळीच्या भिंतीना आपटत लवकर फुटणार. पण नवीन काहीतरी घडायला हे आधीचे सरकार बदलायला हवे. म्हणूनच कित्येकदा “हा आवाज कोणाचा ..” ओरडत उन्हातान्हात फिरलोय. पण ते लोक सुद्धा गरजू विद्यार्थ्यांनाच वही वाटप करायचे. माझी गरज चेंडू होती.. जणू गरीबांसाठी खेळ म्हटले की मूलभूत गरजांच्या तक्यात पार तळाचा रकाना!

ते राहिलं, पण आता काय. पोरांची समजूत कशी काढू. त्यांना कसं पटवू. आता चिडले अन मला बॉयकॉट केला तर…… पुन्हा खेळणे मुश्किल! स्साली आपली क्रिकेटची कारकिर्द इथेच संपायची. ते काय नाय, आता एकच उपाय. विशल्या म्हणतो तसे नाल्यात उतरायला हवे. कालचा रबरी बॉल अडकलाय तिथे. काढला तर आजच. उद्याला कंपनी सुरु झाली की त्यांचा सफाई कामगार येऊन हडपणार. पण नाल्यात उतरणे सोपे नव्हते. या बाजूने छपर्‍यावर चढून त्या बाजुने पाईपाला लोंबकळत उतरावे लागणार. पोरांची मदत घेत इथून चढलोही असतो. पण तिथून, त्या गंजलेल्या घाणीच्या पाईपाला लटकायचे म्हणजे………… पण माझी खरी भिती वेगळीच होती!

घरी कळता कामा नये. आज्जीला आधीच माझे शेजारच्या वस्तीमधल्या पोरांबरोबर खेळणे आवडायचे नाही. कधी पडलो तिच्या नजरेला तर वरतून करट्या फेकून मारायची. नेहमी तिचा नेम मलाच लागेल असे नाही… हे एक आणखी कारण होते, त्या पोरांना मी खेळायला नको असायचे!

…….

मोठ्या नाराजीनेच पोरे राजी झाली, त्या गटारातील चेंडूवर मांडवली करायला. पण त्यांना माहीत होते, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पैश्याचे सोंग घेता येत नाही हे वयाच्या बाराव्या वर्षी समजलेली पोरे. त्यांच्याकडेही दुसरा पर्याय नव्हता. विशल्यानेच मग घोडा आणून दिला. त्यानेच खालच्या बाजूने पकडला. मी वर चढलो तिथे त्याचे काम संपले. पलीकडल्या बाजूने मलाच पाईपावरून उतरायचे होते. जवळून तो आणखी घाण दिसत होता. आणखी खडबडीत. पण त्या आधी छपर्‍यावर अडकलेल्या दोन पतंगी काढून दिल्या. त्या नादात थोडासा तळहात चिरला. पाईपाचा खरखरीतपणा त्याला आणखी चिरत जाणार याची भिती वाटली. पण सुदैवाने तसे झाले नाही. झाले ते उलटेच. त्या बुळबुळीत झालेल्या पाईपावरून मी घसरतच खाली उतरलो. शर्टाचा वास आता जाणार नव्हता. पण आधी अधाश्यासारखा चेंडू शोधायला लागलो. चारही दिशांना सभोवताल एक नजर फिरवून झाली. एक ओकारी काढून हलके व्हावेसे वाटले. पण ज्या कामासाठी उतरलो होतो त्याला बाजूला सारून काही करायचे नव्हते. एकदा चेंडू मिळाल्यावर बिनदिक्कत चार ओकार्‍या काढल्या असत्या.. पण आधी चेंडू! मूळचा लाल रंग बाटल्याने शोधायला वेळच लागला. पण जेव्हा सापडला तेव्हा मोठ्याने आरोळी ठोकत त्याचा मुका घ्यावासा वाटला!

परतीचा रस्ता बिकट होता. जेमतेम दहा-बारा फुटांचा खडा पाईप. पण जो बुळबुळीतपणा उतरायला मदत करून गेला तोच चढायला त्रास देत होता. पाठीमागे वळून पाहायच्या विचारानेही शिसारी येत होती. सभोवताली बघता चारही भिंती अंगावर आल्यासारख्या वाटत होत्या. मुळातच अंधारी जागा हळूहळू आणखी मावळत होती. इतक्यात चकाक चक् चकाक, आवाज करत एक घूस मला घाबरवत पळाली, तसा उभ्या अंगावर एक काटा सर्रसरला.. खरचटेल, शर्ट मळेल, फाटेल, आज्जीला समजेल, मार पडेल.. विचारांचा गुंता सुटायच्या आधीच मी पाईपाला घसपटत अर्ध्यावर पोहोचलो होतो. चेंडू अगोदरच पलीकडे भिरकावला होता, पाठोपाठ अंगही भिरकावत बाहेर पडलो. विशल्याने पुन्हा छपराला घोडा लावला. उतरताना अंगाचे दुखरेपण जाणवत होते. पण त्यापेक्षा जास्त किळसवाणा होता तो हातापायांचा वास!

शर्टाला शरीरापासून दूर धरत नळाकडे धाव घेतली. पाठीमागे पोरांचा गलका चालूच होता.. भंग्याचे पोर भंग्याचे पोर.. जे आपण नाहीच आहोत त्याची लाज कसली. अंगाची साफसफाई झाल्याशिवाय ते चिडवायचे थांबणारही नव्हतेच.. पण इतक्यात ज्याची भिती होती तेच झाले.. ताड ताड तडाक्.. आकाशातून करट्यांचा वर्षाव होऊ लागला. आज्जीला खबर लागली होती. बघता बघता सारी पोरे पांगली. करट्यांचा नेम चुकवत मी देखील नळाचा आडोसा धरला.

स्वच्छ झालो तसे प्रसन्न वाटू लागले. आता मी आज्जीचा मार खायला सज्ज होतो. आज आज्जी जरा जास्तच भरात होती. बदड बदड बदडला. हातापायांवर नुसते लाललाल वळ. पण मगाशी ज्या अनुभवातून गेलो होतो त्यापुढे हे काहीच नव्हते. आई मात्र उगाचचं आसवे गाळत बसली होती. तिच्याकडे तेवढे बघवत नव्हते. आज्जीला तिची पण दया आली नाही. झोपण्यापूर्वी तिला आईवर डाफरताना पाहिले .. वांझ मेली, कुठला उकिरडा घरात आणलाय देव जाणे.. हे परमेश्वरा.. … … पुढे काय पुटपुटली ऐकू आले नाही. आईने बस्स एक हुंदका देत दिवा मालवला.. मी गटारीत उतरलो म्हणून आज्जी रागाने मला उकिरडा म्हणाली हे समजले.. पण वांझचा अर्थ काय हे आता उद्या आईलाच विचारायला हवे म्हणत मी सुद्धा झोपी गेलो!

– तुमचा अभिषेक

 

किस्सा – ए – गुलबकावली

तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे.

तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच. तरीही ते समोरच्या पार्टीला देताना लागणार्‍या गटसमध्ये मात्र जमीन-अस्मानाचा फरक असल्याने पिवळ्या फुलांचा खप नेहमीच जास्त व्हायचा.

पण यावर्षी मात्र चक्रं पलटली होती. लाल गुलाबांना किंचित जास्त डिमांड आला होता. कारणीभूत होता आमचाच टारगट मुलांचा ग्रूप. एका कमालीच्या सुंदर पण (साहजिकच) तितक्याच घमेंडखोर मुलीला यावर्षी टारगेट करायचे होते. आमच्यातले काळे-सावळे, जाडे-भरडे, लुक्के-सुक्खे, कधी मुलींशी स्वप्नातही गप्पा न मारलेले, एक्कूण एक जण तिला गुलाब भेट करणार होते. ते देखील मैत्रीचे पिवळट नाही, तर देठाला “आय लव्ह यू” ची चिठ्ठी डकवलेले लाल टपोरे काटेदार गुलाब. हेतू एकच, “कोणीही यावे आणि मला प्रपोज करून जावे” असे तिला वाटून तिच्यातल्या अहंकाराची जागा न्यूनगंडाने वा गेला बाजार भयगंडाने तरी घ्यावी.

तर, असे काय झाले होते?
तर, काही खास नाही. आमच्यातल्या एका लोक-अ-प्रिय विद्यार्थ्याला तिने पहिल्याच फटक्यात नकार दिला होता. बरे नकार देताना एखादे मिळमिळीतच कारण दिले असते. “माझ्या घरी असे चालत नाही” पासून “मला माझी करीअर करायची आहे” पर्यंत काहीही खपवून घेतले गेले असते. किमान “आपण चांगले मित्र बनू शकतो” म्हणत मांडवलीच केली असती. पण नाही, “आरश्यात कधी आपले तोंड बघितले आहेस का?” म्हणत पठ्ठ्याचा पार तोंडावरच कचरा केला होता. या उपर तिच्याबद्दल माझे स्वताचेही मत फारसे अनूकूल नव्हते. जेव्हा ती आमच्या वर्गासमोरून जायची तेव्हा व्हरांड्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हातातले सबमिशन बाजूला ठेउन मी नजरेनेच तिला सोबत करायचो. पण त्या मोबदल्यात ती एकदा ढुंकून बघेल तर शप्पथ. आम्ही आसपास घुटमळताना कधी तिच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नव्हती. बस्स आज ती माशी हलताना बघायची होती.

तब्बल १७ स्वयंसेवकांनी या उपक्रमात आपली नावे नोंदवल्यानंतर आता या भाऊगर्दीत हरवून जाता येईल म्हणत अठरावे नाव मी सुद्धा नोंदवले. आम्हा अठरा प्रेमवीरांची नावे ती प्रत्येक चिठ्ठी वाचत पाठ करणार नाही याची खात्री असल्याने या ऐतिहासिक किडेगिरीचा एक भाग होण्याची संधी मी सोडली नाही. आणि तसेही हे फूल स्वताहून नेऊन द्यायचे नव्हतेच. आमच्या कॉलेजमधील हौशी विद्यार्थ्यांची संघटना, जे हे डे’ज वगैरे प्रकार साजरे करतात, तेच याबाबत पुढाकार घेऊन लोकांचे प्रेमसंदेश गुलाबासह इच्छित स्थळी पोहोचवायचे काम करतात, ज्यामागे मुखदुर्बळ आणि लाजर्‍याबुजर्‍या व्यक्तीमत्वांनाही त्यांचे प्रेम मिळावे हा सदहेतू. त्यामुळे या मिशन गुलबकावलीमध्ये आपले नाव नोंदवून आता फक्त गंमत बघायची होती.

सकाळचे लेक्चर आटोपल्यानंतर दुपारची जेवणे उरकून सारे प्रयोगशाळेच्या आवारात जमले. आज त्यांचे कुठले प्रॅक्टीकल आहे आणि योग्य संधी आणि पुरेसा वेळ केव्हा मिळणार याचा अभ्यास आम्ही अगोदरच केला होता. ठिक दिड वाजता त्या गुलबकावलीला पहिले फूल मिळाले. तिने पाहिले, नाव वाचले, प्रमोद आत्माराम माटे ! सोबतीला आम्ही आमच्या पजामा छाप क्लासरूमचे नावही टाकले होते. अर्थातच हा कालपर्यंत अज्ञात असलेला प्रेमवीर आज कोण कुठून उगवला ते तिला समजले नसणारच. मात्र आत्माराम माट्यांची सून होण्यात तिला जराही रस नसल्याने तितक्याच सहजपणे तिने ते फूल बाजूला सारून ठेवले. दोनच मिनिटात दुसरे फूल हजर. तर चौथ्या मिनिटाला तिसरे. पुन्हा तीच तशीच प्रतिक्रिया. फक्त चेहर्‍यावर एखादी आठी जास्त उमटल्याचा भास तेवढा झाला. पुढच्या दहाबारा मिनिटांत एकेक करून सहा-सात फुले तिच्याकडे जमली. आता हळूहळू तिच्या वर्गातल्या आणि आजूबाजुच्या इतर मुलामुलींचे लक्ष या प्रकाराकडे वेधू लागले. सुरुवातीला काही जणांना वाटणार्‍या कौतुकाची जागा, नंतर हेव्याने घेत, आता चेष्टा मस्करीने घेतली होती. आठ-दहा फुलांनतर तर अशी वेळ आली की तिला येणार्‍या प्रत्येक फुलागणिक तिच्याच वर्गमित्रांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. सोबतीला चार शिट्ट्या आम्हा गावगुंडांकडूनही येऊ लागल्या. बघता बघता चिडवाचिडवीचा असा काही माहौल बनला की एका चुकीच्या पद्धतीने आपण सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनलो आहोत याचा संताप तिच्या चेहर्‍यावर झळकू लागला.

आमचा कोटा अठरा फुलांचा होता, मात्र चार-पाच फुले शिल्लक असतानाच तिचा संयम सुटला आणि ती आतापावेतो मिळालेली सर्व फुले एकत्र गोळा करत ती मोकळ्या जागेत आली. इथून दोन बाजूंना इमारती होत्या, तर एका बाजूला उपहारगृह. आधी जी गोष्ट चार-चौदा लोकांसमोर घडत होती ती आता चारशे डोळ्यांना दिसणार होती. प्रकरण आतल्या बाजूला जात दडपायच्या ऐवजी ती चव्हाट्यावर घेऊन आली होती, याचा अर्थ आता काहीतरी गोंधळ घालायचा विचार तिच्याही मनात होता. अरे देवा, प्रिन्सिपॉल वगैरे कडे तक्रार गेली तर मेलो असा विचार पहिल्यांदाच मनात आला. पण सुदैवाने माझे नाव असलेले गुलाब अजून तिच्यापर्यंत पोहोचले नव्हते, रांगेतच होते. पण तिचा असा काही विचार नव्हता. तिने ती सारी फुले खाली मातीत टाकली आणि आम्हा सर्वांकडे बघून तशीच सॅंडल घातलेल्या पायाने कुस्करू लागली. जणू या सॅंडलने तुमचे गालच रंगवतेय बघा असा आवेश तिच्या चेहर्‍यावर होता. सोबतीला म्हणून लगोलग तिच्या दोन जिवलग मैत्रीणी आल्या आणि कश्यात काय नाय तरीही आपला पाय, त्या फुलांवर साफ करून गेल्या.

तिच्या या अघोरी कृत्याने आता पुन्हा एकदा वातावरण पलटले होते. जणू वादळानंतरची शांतता !
पण इथेच अजून एक ट्विस्ट बाकी होता..

एवढा वेळ गर्दीच्या पार मागे गंमत बघत उभा असलेलो मी सावकाशपणे पुढे आलो. त्या कुस्करलेल्या फुलांना हळूवारपणे उचलले आणि त्यावरची माती झटकत त्यांना साफ करू लागलो. डोळ्याच्या कडेने एक तिरपी नजर तिच्या हालचालींवर होतीच. हा त्यांच्यातलाच एक म्हणत माझे नावगावही माहीत नसताना ती माझ्याशी तावातावाने भांडायला आली आणि आईशप्पथ … त्या दिवशी मी राजेंदरकुमारची अ‍ॅक्टींग तोडली! तिचा आवेश पाहता ती माझ्या कानाखाली गणपती नाचवणार इतक्यात मी उत्तरलो, “माफच कर मैत्रीणी, मी तुला ओळखतही नाही मग तुला प्रेमाचे फूल देणे तर दूरची गोष्ट. मी एक वृक्षप्रेमी आहे. तुम्हा लोकांच्या भांडणात हि फुले बिचारी धारातीर्थी पडली ते मला बघवले नाही म्हणून उचलायला आलो.” एवढे बोलून मी ती फुले छातीशी कवटाळली. खरे तर माझे बोलणे तिला बकवास वाटले तर होणारे दुष्परीणाम टाळण्यासाठी घेतलेला तो बचावात्मक पवित्रा होता. पण उलट तिचा मवाळ झालेला चेहरा पाहता मी ऐनवेळी सुचलेला आणखी एक डायलॉग चिपकवला जो ऐकून तिचा चेहरा पार पोपटासारखा पडला. म्हणालो, “मैत्रीणी, माझ्यासाठी प्रेम हा शब्द उच्चारताना बाह्य सौंदर्य काऽही मायने ठेवत नाही. पण जी मुलगी रागाच्या भरात का होईना एखादी निष्पाप कळी निर्दयीपणे पायाखाली कुस्करते, त्या मुलीला मी तरी कधी चुकूनही गुलाबाचे फूल दिले नसते…”

अन या संवादफेकीनंतर पुनश्च जोरदार टाळ्यांचा कडकडाट होईल असे मला वाटलेले खरे. पण कसले काय, सारेच ढिम्म. पहिल्यांदा साहित्याची जाण नसलेले मित्र पाळल्याचा पश्चाताप मला झाला. ईतकेच नाही तर मला हिरो बनायचा मौका आला अन काय है दुर्दैव. अचानक पांगापांग सुरू झाली. त्यांचे प्रॅक्टीकल सुरू झाल्याने त्यांची गर्दी ओसरली, लगोलग झाले तेवढे पुरे म्हणत तिनेही काढता पाय घेतला, तर माझे अगोदरच गळपटलेले मित्र एव्हाना दृष्टीच्या पार पलीकडे पोहोचले होते. गुलाबही गेले होते, गुलबकावलीही गेली होती, तर हाती राहिलेल्या पाकळ्यांचे गुलकंदही बनणार नव्हते. इति किस्सा-ए-गुलबकावली संपुर्ण असफल !

– तुमचा अभिषेक

 

 

मुंबई गर्ल !

परवाचीच गोष्ट.
तब्येत बरी नसल्याने ऑफिसला अर्ध्या दिवसाने जात होतो. दुपारची वेळ, प्लॅटफॉर्म क्रमांक ‘१’ वर बेलापूर ट्रेनची वाट बघत उभा होतो. इतक्यात पलीकडल्या रुळावर बोरीबंदरला (आताच्या सीएसटीला) जाणारी ट्रेन लागली. आपल्याला जायचे नाही त्या दिशेची ट्रेन आधी येणे हे नेहमीचेच. मलाही तशी काही घाई नव्हती पण उकाड्याने जीव हैराण झाल्याने फलाटावर फार वेळ ताटकळत उभे राहण्यात रस नव्हता. पण या तप्त वातावरणातही समोरच्या ट्रेनला काही वीर दाराला लटकलेले दिसत होते. रोजचेच असल्याप्रमाणे त्यांच्या आपापसात कुचाळक्या चालू होत्या. आत बसायला जागा असूनही उन्हे झेलत बाहेर दाराला लटकण्याचे ते एक कारण असावे. मी सवयीनेच तिथे दुर्लक्ष केले. ट्रेनने भोंगा दिला आणि त्यांची ट्रेन सुटली. तसे अचानक त्या पोरांचा गलका वाढला. पाहिले तर आमच्या फलाटावर उभ्या काही महिला प्रवाश्यांना शुक शुक करत आणि त्याउपरही बरेच काही ओरडत, हातवारे करत चिडवणे चालू होते. त्यांचे ते तसे चित्कारणे संतापजनक होते खरे, पण फलाटावर उभ्या महिला देखील त्याला सवयीचाच एक भाग म्हणून स्विकारल्यागत, विशेष काही घडत नाहीये अश्याच आविर्भावात उभ्या होत्या. जवळपास उभे असलेले पुरुष, हो ज्यात एका कोपर्‍यात मी देखील उभा, यावर दुर्लक्ष करण्याव्यतिरीक्त फारसे काही करू शकत नव्हतो. फक्त चार ते पाच सेकंद आणि समोरची ट्रेन नजरेआड. या चार सेकंदात त्यांना प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करणे म्हणजे उलट आणखीन गलिच्छ प्रकारांना आमंत्रण देणे. किंबहुना म्हणूनच अश्यांना ऊत येतो. जेव्हा ट्रेनने वेग पकडलेला असतो वा जेव्हा ट्रेन समोरच्या ट्रॅकवर असल्याने जमावापासून सुरक्षित अंतरावर असते, तसेच दुपारची कमी गर्दीची वेळ असते तेव्हाच अश्यांची हिंमत वाढते.

असो,
ट्रेन गेल्यावर मात्र महिलांचे आपापसात यावर बोलणे सुरू झाले. अर्थात शक्य तितके सभ्य भाषेत अपशब्द वापरून मनातली भडास काढून हलके होणे हाच या मागचा हेतू असावा. कितीही सवयीचाच भाग म्हटले तरी अश्या प्रकारांचा त्रास होणे हे साहजिकच होते. यावेळी त्या जवळपास उपस्थित पुरुषांना देखील तुम्ही सुद्धा त्यातलेच एक आहात, पुरुष आहात, याच भावनेने बघत होत्या हे जाणवत होते. पण बोचत नव्हते. कारण ती भावना क्षणिकच आहे याची कल्पना होती. तरीही त्या क्षणिक विखाराला नजर देण्याची हिंमत नसल्याने मी खिशातून मोबाईल काढून त्यात डोके खुपसले. हा मगाशीच हातात असता तर कदाचित एखादा फोटोच टिपता आला असता असा विचार क्षणभर मनात आला. येऊन विरला आणि किस्सा इथेच संपला !

आता कालची गोष्ट.
शनिवारची सुट्टी असूनही ऑफिसला कामानिमित्त जायचे असल्याने आरामात झोप वगैरे पुर्ण करून सकाळी थोडे उशीराच उठून सावकाश घराबाहेर पडलो. साधारण साडेअकराची वेळ. आदल्या दिवशीचा किस्सा ताजा असूनही त्याला विस्मरणात टाकले होते. थोड्याफार फरकाने कालच्याच जागी मध्येच एखादी थंड झळ सोडणार्‍या पंख्याखाली हवा खात उभा होतो. माझी बेलापूर ट्रेन यायला अवकाश होता, त्या आधी अंधेरी ट्रेन होती. अर्थात ही आमच्याच फलाटाला लागते. ट्रेनला तुरळक गर्दी आणि दारांवर उभे प्रवासी. मात्र कालच्यासारखे घडण्याची शक्यता कमीच कारण तशीच आदर्श स्थिती नव्हती. ट्रेनने भोंगा दिला आणि सुटली, तसे अचानक एक लहानगी, वय वर्षे फार तर फार दहा-बारा, कळकट मळकट पेहराव, खांद्यावर येऊन विस्कटलेले आणि कित्येक दिवस पाणी न लागल्याने कुरळे वाटणारे केस, अश्या रस्त्याकडेच्या झोपडपट्ट्यांमध्ये आढळणारी टिपिकल अवतारातील मुलगी कुठूनशी आली आणि त्या नुकत्याच सुटलेल्या ट्रेनच्या अगदी जवळून तिच्या गतीच्या विरुद्ध दिशेने चालू लागली.

मुंबईत शक्यतो असे करणे सारे टाळतातच, कारण पुन्हा कधी कोण आपल्याला चालत्या ट्रेनमधून टपली मारून जाईल सांगता येत नाही. त्यामुळे साहजिक माझी नजर तिच्यावरच खिळली. पण या चिमुरडीचा हेतू काहीतरी वेगळाच दिसत होता. तिने स्वत:च ट्रेनच्या दारावर उभे असलेल्या प्रवाश्यांना हूल द्यायला सुरुवात केली. बरे हूलही अगदी ट्रेनच्या दिशेने झुकून, कंबरेत किंचितसे वाकून, मारण्याच्या आविर्भावात हात अगदी डोक्याच्या वर उगारून, असे की समोरची व्यक्ती दचकून मागे सरकायलाच हवी. माझ्यापासून ती दूर पाठमोरी जात असल्याने तिचा चेहरा वा चेहर्‍यावरचे भाव मला टिपता येत नव्हते, पण नक्कीच वेडगळ असावेत हा पहिला अंदाज. पहिल्या दरवाज्याला तिने हे केले तेव्हा तिथले प्रवासी या अनपेक्षित प्रकाराने भांबावून गेले, अन भानावर आले तसे मागे वळून तिला चार शिव्या हासडाव्यात असा विचार करेस्तोवर ती आपल्याच नादात पुढच्या डब्यापर्यंत पोहोचली देखील होती. तिथेही तिने हाच प्रकार केला आणि मी समजलो हे प्रकरण काहीतरी वेगळे दिसतेय.

पुन्हा एकदा दारावरची मुले बेसावध असल्याने त्यांचीही तशीच तारांबळ उडाली. मात्र झालेल्या फजितीचे उत्तर द्यायला म्हणून आपण त्या मुलीचे काहीच करू शकत नाही हे भाव त्यांच्याही चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. आता मी हे सारे एखादा फनी विडिओ बघावे तसे एंजॉय करू लागलो. कारण सुरुवातीला मला वेडसर, आणि मग आचरट वाटणारी मुलगी अचानक धाडसी आणि निडर वाटू लागली होती. काल जो प्रकार अनुभवला त्याच्याशी मी हे सारे नकळत रिलेट करू लागलो आणि जणू काही त्याचीच फिट्टंफाट करायला म्हणून नियतीने हिला धाडले असे वाटू लागले. भले आताचे हे दारावर उभे असलेले प्रवासी कालच्यांसारखे मवाली गटात मोडणारे नसावेतही, तरीही ती मुलगी एका अर्थी प्रस्थापितांना काटशहच देत होती. हळूहळू ट्रेन वेग पकडत होती. आणि मागाहून येणार्‍या डब्यातील प्रवाश्यांना एव्हाना या मुलीच्या पराक्रमाचा अंदाज आला होता. आता त्यातील एखादा हिच्यावर पलटवार करणार का या विचाराने माझेही श्वास रोखले गेले. आणि ईतक्यात पुढचा डब्बा आला तसे दारावरचे सारेच प्रवासी स्वताला सावरून आत सरकले. उलटून प्रतिकार करणे तर दूरची गोष्ट उलट बचावात्मक पवित्रा घेऊन त्यांनी तिचे उपद्रवमूल्य मान्य केले. त्या मुलीचे वर्तन भले चुकीचे का असेना, त्या मागे सरकलेल्या माणसांनाही ती तशीच हूल देऊन पुढे सरकली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर कदाचित विजयश्री मिळवल्याचे भाव नसतीलही, पण माझ्या चेहर्‍यावर मात्र हास्याची लकेर उमटली. या जगात प्रत्येकाला बाप मिळतोच तसे एखादी तुमची आई ही निघू शकते हे त्या मुंबई गर्लने दाखवून दिले होते.

– तुमचा अभिषेक

 

 

चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !

आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्‍या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे… का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही…

तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,.. चला राहूद्या थेट प्रसंगावरच नेतो

**********************************************************
**********************************************************

वालचंद कॉलेज ऑफ ईंजिनीअरींग, सांगली !

वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली.
पुर्ण कॉलजभरात हं.
त्यातही आम्हा मुंबईकरांना आपल्या स्टाईलच्या वाटतील अश्या शोधायला गेले की त्यातल्याही निम्म्या गळाल्या.
‘बेगर्स डोण्ट हॅव चॉईस’ असे म्हटले तरी आम्ही ‘लोफर्स हॅव चॉईस’ कॅटेगरीतले होतो.
असो, तर त्यात ज्या होत्या त्यांची मग खूप चलती असायची. खास करून वॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, चॉकलेट डे, रोज डे, अश्या स्पेशल दिवशी गुलाब असो वा चॉकलेट, त्यांचा पदर फाटेस्तोवर भरून जायचा.
म्हणून मी त्या गर्दीतला एक होणे टाळायचोच.
निदान तसा आव तरी आणायचो.
तरीही एकदा एका मुलीला चॉकलेट देण्याचा योग आला. तिचाच हा चार ओळींचा किस्सा.

तर मी इतर मुलींसारखे या मुलीकडेही बघायचो, गंमत म्हणजे तिला सुद्धा माझे बघणे आवडायचे.
तर अश्याच एका चॉकलेट डे च्या दिवशी अचानक सामोरी आली.

संध्याकाळची वेळ, कॉलेजचाच एक पॅसेज, मी एकटाच कुठेतरी जात होतो तर ती देखील दिवसभराची धमालमस्ती आटोपून एकटीच कुठूनतरी येत होती.
माझी नजर नेहमीसारखी तिच्या चेहर्‍यावर खिळली अन तिची नजर नेहमीसारखीच माझ्या नजरेत अडकली.
जसे त्या चिंचोळ्या पॅसेजमधून जाताना आम्ही एकमेकांच्या जवळ आणि अगदी सामोरे आलो तेव्हा तिला हॅपी चॉकलेट डे म्हणून विश करणे मला भागच होते.
नव्हे तसे मी करावे अशी इच्छा तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहता समजून येत होती.
पोकळ विश कसे करायचे म्हणून मी खिसे चाचपले तर एक छोटेसे इकलेअर चॉकलेट निघाले.
सकाळी रूममेटने फ्रेंडशिप डे विश करत दिलेले एक’च एक रुपयाचे एक्लेअर. अर्थात यारदोस्तांमध्ये हेच बजेट असते. डेरीमिल्क आणि फाईव्हस्टार कॅडबर्‍यांचे बजेट केवळ मुलींसाठीच राखून ठेवलेले असते. पण देण्यामागची भावना महत्वाची नाही का, आणि आता तेच ईक्लेअर वेळेला केळं म्हणत कामाला येत होते.
ते तिच्या समोर धरून हॅपी चॉकलेट डे विश केले.
तसे हसली, आणि म्हणाली, “कसे घेऊ? हात तर फुल पॅक आहेत.”
अरेच्च्चा खरेच की, आता कुठे माझी नजर तिच्या हातांवर गेली. दोन्ही हातांची ओंजळ करून उभी होती आणि ती ओंजळ फुल्ल ऑफ चॉकलेट्स होती.
अर्थात त्या ढिगार्‍यावर माझे छोटेसे इक्लेअर बॅलेंस करत ठेवणे काही अवघड नव्हते, पण माझेही या बाबतीतले प्रसंगावधान आणि हुशारी बघा,
मी उत्तरलो, “तू फक्त आ कर, मी टाकतो तोंडात”

गंमत केली हं…. असे मी पुढे बोलणार इ त क्या त तिने ऑं वा स ला सुद्धा..
मी थरथरतच एक्लेअर कसे बसे सोडले आणि टाकले तिच्या तोंडात. तिच्या ओठांना माझ्या बोटांचा स्पर्श होऊ नये ईतपत काळजी घेत बास्केटबॉल सारखेच टाकले, ते थेट तिच्या घशात जाऊन ठसका लागला नाही हेच माझे नशीब !

बस्स मग काय, ती आपल्या रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला. जाताना पलटून मात्र चुकूनही पाहिले नाही. हि आपली स्टाईलच म्हणा ना. अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी.
असो, तर या चॉकलेट डे चा हा किस्सा इथेच संपला………………………
नाही !
इथेच संपायचा असता तर नक्कीच हा लिखाण प्रपंच नसता.

**********************************************************
**********************************************************

दुसर्‍या दिवशी होता रोज’ डे. आता रोज रोज काय नशीब उघडत नाही म्हणतात, तरीही चुकूनमाकून उघडलेच तर कालच्यासारखे पुन्हा खिसे चाचपडून फूल न फुलाची पाकळी शोधावी लागू नये म्हणून मी सकाळीच मालकांच्या बागेतली गुलाबाची कळी खुडून घेतली. कोणाला द्यावे लागेल की नाही याची खात्री नसताना फुललेल्या टवटवीत गुलाबाला ५ रुपये खर्च करण्याऐवजी हे फुकटात पदरी पाडून घेतलेले सोयीचे समजले.
तशीच वेळ आली तर, “सखे, नुकत्याच उमलणार्‍या गुलाबाच्या कळीप्रमाणे आपल्यातील मैत्रीचे नातेही असेच उमलू दे” हि पंचलाईन सोबतीला तयार होतीच. समोरची पार्टी आपल्या फेवरमध्ये असेल तर कितीही पाणचट विनोद का असेना त्यावर हसले जाते वा कितीही दवणीय चारोळी का असेना हाऊ रोमॅंटीक म्हटले जाते हा अनुभव.. स्वत: अनुभवलेला नाही तर इतरांचा पाहिलेला.

दुपारपर्यंत तरी ते कळीचे फूल कोणाला द्यायचा योग आला नाही. हा योग संध्याकाळपर्यंत आला नाही तरी काही बिघडत नाही अशी एक पराभूत मानसिकता वयात आल्यापासूनच अंगी बाणवली होती. दुपारी त्या फूलावरच्या दोनचार सुकलेल्या पाकळ्यांचे आवरण बाजूला सारून आतला टवटवीतपणा शाबूत आहे याची खात्री तेवढी करून घेतली.
कालची माझी चॉकलेट क्वीन आज कुठे दिसली नव्हती. खरे तर हुरहुर याचीच होती की ‘ती’ माझे फूल स्विकारेल का. किंबहुना ते तिला देण्यायोग्य स्थिती वा संधी मला आजच्या दिवसभरात उपलब्ध होईल का आणि झालीच तरी मला ते धाडस जमेल का?

कालचा किस्सा अजून रूममेटला किंवा ईतर कोणा मित्रांना सांगितला नव्हता. मुद्दामहूनच लपवला होता. कारण काही अतिउत्साही मित्र अंड्यातून जीव उमलायच्या आधीच त्याचे पार आमलेट करून टाकतात, म्हणून हि खबरदारी. आज तिने माझे फूल चारचौघांसमोर स्विकारलेच तर मात्र काही लपून राहणार नव्हते ना लपवण्याची गरज असणार होती.

अखेर ती वेळ आली.
विद्यार्थ्यांमध्ये लाडके आणि लोकप्रिय बनायला सारेच शिक्षक अश्या खास दिवशी लवकर सोडतात. खास करून दुपारच्या सत्रात कोणी फारसे ताणून धरत नाही. ज्यांच्यात काहीतरी घडवायची धमक असते अश्या निवडक प्रेमवीरांचे सकाळीच काय ते घडून झालेले असते. पण मुंबई असो वा सांगली, जिथे तिथे आमच्यासारख्या ताटकळलेल्यांचेच प्रमाण जास्त असल्याने दिवसअखेरीस सुद्धा बर्‍याच घडामोडी घडणे बाकी असतात. एकाचे बघून दुसर्‍याची हिंमत वाढते आणि दुसर्‍याचे बघून तिसर्‍याची. या साखळीत आपणही कुठे फिट होतो का हे सारेच चेक करत असतात. मी देखील आपले नशीब आजमवायला म्हणून कॉलेजच्या प्रांगणात जमलेल्या घोळक्याचा एक भाग झालो.

जिथे मी उभा होतो तिथून ती मला दिसत होती, पण जिथे मी उभा होतो तिथून मी तिलाच काय कोणालाही दिसलो नसतो. पण सुरुवातीला हेच योग्य होते. लांबूनच तिचे निरीक्षण चालू होते. मूड तिचा हसरा खेळकर होता. ते पाहून माझा आत्मविश्वास वाढत होता. जणू काही माझ्याच विचारांत हसत होती. हळूहळू दिवस मावळू लागला, उन्हे उतरू लागली, गर्दी पांगू लागली. आता मला लपायला फारशी जागा नव्हती, तशी त्याची गरजही नव्हती. दोनचार मित्रांचे टोळके सोबतीला घेऊन मी तिच्या नजरेस पडेल अश्या जागी येऊन स्थिरावलो. काल तिचे हात चॉकलेटने भरले होते पण आज मात्र तिच्या हातात एकही फूल नव्हते. अर्थात हे चांगलेच होते. अन्यथा आजही ती मला “तुझे फूल कसे स्विकारू राजा, माळ की तूच आपल्या हाताने माझ्या केसांत” असे खचितच बोलणार नव्हती. उलट अजूनपर्यंत तिने कोणाचे फूल स्विकारले नाही याचा अर्थ नक्कीच मला वाव होता. अन ईतक्यात तिची नजर माझ्यावर पडली…

मी तिला पाहिल्यानंतर तब्बल पाऊणएक तासाने ती मला बघत होती, आमची नजरानजर होत होती, अन होताच काय ते ओळखीचे भाव. पहिल्यापेक्षाही दाट आणि गहिरे. माझ्याकडे पाहतच तिने आपल्या मैत्रीणीला खुणवले आणि दोघी जणी माझ्या दिशेने चाल करून येऊ लागल्या. माझी नजर पहिल्यापासूनच तिथे खिळलेली असल्याने माझ्या मित्रांच्याही ते लक्षात आले होते. आणि आता तिचे असे स्वताहूनच माझ्या दिशेने चालत येणे. फूल नक्की मी तिला देणार होतो की तिच्या मनातच मला द्यायचा विचार होता. छे, काहीतरीच काय, कसे शक्य होते. हे असे काही अदभूत घडणे शक्य मानले तरी तिचे हात तर रिकामेच होते. ना तिच्या मैत्रीणीच्या हातात काही होते. सर्व शक्यतांचा विचार करेपर्यंत ती माझ्या समोर येऊन उभी राहिली सुद्धा आणि माझ्या आ वासलेल्या तोंडानेच मी कसेनुसे हसलो. बस्स क्षणभरापुरतेच. कारण दुसर्‍याच क्षणी माझ्या काहीही ध्यानीमनी नसताना एक खाडकन मुस्काटात पडली. हो, तेच कोमल हात ज्यात मी काही काळापूर्वी फूल टेकवायचा विचार करत होतो, ते माझ्या गालफडावर अस्ताव्यस्त पसरले. नाही म्हणायला प्रतिक्षिप्त क्रियेनुसार मी चेहरा थोडा मागे सरकावला, पण परीणामी ती चापट डाव्या डोळ्याच्या कडेला चाटून गेल्याने त्यातून नकळत पाण्याची धार लागली. काही दिर्घ श्वास घेत मी नाकाडोळ्यातून येणारे पाणी थांबवायचा निष्फळ प्रयत्न करू लागलो कारण हाताने पुसायचा पर्याय खचितच नव्हता. तिच्यावर रागवावे, चिडावे, शांत शब्दात तिला याचे कारण विचारावे वा उलटून तिच्याही एक ठेऊन द्यावी. या पैकी काहीही ठरवायच्या आधीच ती माझ्या हातात कसलासा बोळा कोंबून आल्यापावली नाहीशीही झाली.

पुढचा किती तरी वेळ मी त्या हातातल्या चॉकलेट कव्हर कडे बघत होतो. बहुधा मी काल तिला दिलेल्या इक्लेअरचेच असावे. ते तिने असे परतवून जावे. नक्की काय तिला आवडले नव्हते. माझे तिला चॉकलेट भरवणे. तिनेच तर ‘ऑ’ केले होते. कि ती निव्वळ जांभई होती, जी योगायोगाने त्याच वेळी आली होती आणि मी त्याचा चुकीचा अर्थ काढला होता. जेवढी शोभा झाली तेवढी पुरेशी होती. ना मी तिला याबाबत काही विचारायला गेलो, ना ती मला कधी सांगायला आली. पुढे सेमीस्टर गेले, वर्ष सरले, पण त्या थप्पड की गूंज कायम मनात घर करून राहिली. त्यापेक्षाही त्यामागचे कधीच न उलगडलेले कारण.

या प्रकरणानंतर मला त्या वर्षभराच्या वालचंदमधील वास्तव्यात कधीच कुठल्याच मुलीने चारा टाकला नाही. ना कोणत्या मुलीने मी टाकलेले दाणे टिपले. त्याच्या पुढच्याच वर्षाला आम्हा मुंबईकरांना ट्रान्सफर मिळून सारे मुंबईच्या वीजेटीआय आणि सरदार पटेलला परतलो आणि हा वालचंद अध्याय तिथेच संपला. जे एका अर्थी बरेच झाले.

परंतु,
पिक्चर अभीभी खतम नही हुआ मेरे दोस्त ….

**********************************************************
**********************************************************

दोनेक वर्षांत कॉलेज संपले. नोकरीला लागलो. सेटल झालो. नवीन गर्लफ्रेंड मिळाली. मला नव्हे तर प्रत्येकालाच. काही मित्रांची लग्नही झाली. तर कोणाची ठरली. अश्याच एका मित्राचे लग्न ठरल्याची पार्टी करायला म्हणून मग आम्ही बसलो होतो. ईथेही बारचे नाव मुलीच्या नावाप्रमाणेच गुप्त राखतो. लग्नाची पार्टी म्हणून साहजिकच लग्नाचे विषय, पोरींचे विषय, आजवर केलेल्या भानगडींचे विषय. कॉलेजच्या आठवणी उगाळल्या जात होत्या आणि त्या आठवणींचा काटा सरकत सरकत पुन्हा एकदा माझ्या थपडेवर स्थिरावला. मी सोडून सारेच फुटेस्तोवर हसायला लागले. त्या हसण्याहसण्यातच माझ्या तेव्हाच्या रूमपार्टनरला चढलेली दारू बोलायला लागली….

आठवतेय ते चॉकलेट … जे मी तिला दिलेले … जे सकाळी माझ्या रूमपार्टनर ने फ्रेंडशिप डे विश करत माझ्या हातात ठेवले होते … जे मी तेव्हा न खाता खिशात कोंबले होते .. आणि तेच ते चॉकलेट पुढचा मागचा कसलाही विचार न करता तिच्या तोंडात टाकले होते……………………. ते नकली होते !
इक्लेअरच्या वेष्टणात गुंडाळलेले, बाहेरून चॉकलेटसारखेच दिसणारे, आतून चवीला मात्र अत्यंत कडवट आणि तोंडात घेताच थुंकून टाकण्याच्या लायकीचे होते. त्याची चव काय असावी याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचा परिणाम मी पुरेपूर भोगला होता.

खाडकन मुस्काटात मारायची पाळी आता माझी होती. तेव्हा माझ्या हातातले गुलाब हलले होते आज मी त्याच्या म्हणजे माझ्या मित्राच्या हातातील नारंगी हलवली होती. काही प्रमाणात उतरवलीही होती.
कित्येक वर्षानी त्या घटनेचा बदला म्हणून मित्राला मारलेली एक पुरेशी सणसणीत चपराक नशेत असल्याने त्याला फारशी जाणवलीही नसावी, पण मला मात्र त्यातून कसलेसे समाधान मिळाले होते. ‘उस’ थप्पड की गूंज आता केवळ माझ्या एकट्याच्याच कानात वाजणार नव्हती. त्यात मी मित्रालाही त्याचा वाटा व्यवस्थित पोहोचवला होता.
पण तरीही ते समाधान अपुर्णच होते………

आज दोनचार संकेतस्थळांवर मी लिहितो. चारचौदा लेख झालेत माझे. तीसचाळीस लोक ते वाचतात. आणखी शेदोनशे लोकांपर्यत ते लिखाण पोहोचवतात. असेच हा लेखही कधीतरी इच्छित स्थळी पोहोचेल, बस्स याच आशेवर हा लिखाण प्रपंच.
कुठेतरी, कुणालातरी, अरेरे… असे जेव्हा आतून, अगदी मनापासून वाटेल, तेव्हाच मिळेल मला माझे पुर्ण समाधान ..!

– तुमचा अभिषेक

 

पाककृती – रावडाचिवडा (पाककौशल्यात “ढ” असलेल्यांसाठी)

शीर्षकावरून समजले असेलच की हि पाकृ केवळ आणि केवळ जेवण बनवण्याच्या कौशल्यात निपुण नसलेल्यांसाठी आणि काहीही पचवण्याच्या कौशल्यात पारंगत असलेल्यांसाठीच आहे.

एकेकाळी, म्हणजे बारावी नापास होत असताना घरी होतो तेव्हा बरेचदा हा प्रकार करून झाला आहे. मात्र कैक वर्षांनी आज लग्नानंतर, जेव्हा बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला, तेव्हा पुन्हा एकदा किचन ओट्यावर हात साफ करायची संधी मिळाली. तिचा पुरेपूर वापर करत आज हि डिश तुमच्यासमोर पेश करत आहे. ज्यांना जेवण फक्त गरमच काय ते करता येते आणि तरीही बाहेरचे न खाता घरचेच आवडते अश्यांना फायद्याचे ठरू शकेल हि यामागची सद्भावना आणि जाणकारांकडून चार टिपा मलाही मिळतील हा यामागचा सदहेतू.

तर,
एका माणसासाठी रावडाचिवडा बनवायला लागणारे साहित्य आहे,
खालीलप्रमाणे :-

तयार भात – प्रमाण आपल्या पोटाच्या अंदाजाने

कोणत्याही प्रकारची तयार डाळ, आमटी, कालवण वगैरे – प्रमाण भात कोलसवण्याइतपत (गोडे वा आंबट वरणापेक्षा तिखट डाळ वा आमटीला जास्त पसंती.)

तयार भाज्या – घरात, फ्रिजमध्ये, आजच्या, कालच्या, परवाच्या, असतील नसतील तेवढ्या सर्व! शेजार्‍यांकडे फक्त तेवढे मागायला जाऊ नका.

अंडे – ज्यांना चालते त्यांच्यासाठी तर मस्ट’च. (अंड्याला या प्रकारात सोन्याची किंमत. कारण सोन्याचे जसे ठोकून पत्रा करणे, खेचून तार करणे, (ज्याला सायंटिफिक भाषेत तन्यता-वर्धनीयता असेही म्हणतात) तसे काहीही करता येते, त्याचप्रमाणे इथेही अंड्याचे आपल्या आवडी आणि मर्जीनुसार भुर्जी ऑमलेट बॉईल’एग वगैरे काहीही करता येते.)

शेव, फरसाण, चिवडा, बाकरवडी – उपलब्धतेनुसार

मीठ – चवीनुसार

सॉस, ठेचा, लालतिखट चटण्या – आवडीनुसार

लोणचे – हे मात्र हवेच ! प्रकार कुठलाही चालेल.

पापड, रायता, पकोडे ईत्यादी ईत्यादी – मूळ पदार्थाला असल्या कुबड्यांची गरज लागत नाही.

शीतपेय – थंडगार ताक किंवा लिंबू-कोकम सरबत.

———————————————————————————

तर,
आता काय करायचे हे दरवेळी बदलत असल्याने आज मी काय केले हेच सांगतो.

कृती :-

१) सर्वप्रथम एक पसरट भांडे घेतले. (पसरट टोप वा कढई काहीही चालते, फक्त जे काही आई-बायकोने स्वच्छ धुतलेले असेल आणि आपल्याला धुवायची गरज लागणार नाही असे एखादे घ्यावे. कारण असल्या धुण्यापुसण्यातच अर्धी शक्ती खल्लास झाली तर पुढचा पदार्थ बनवायचा उत्साह मावळायची भिती असते.)

२) त्यानंतर एका अंड्याला जेवढे तेल लागते त्याच्या दुप्पट तेल त्या टोपात ओतून घेतले. चमच्याने छानपैकी टोपभर पसरवले. गॅस चालू करून तापायला ठेवले. पहिला तडतड आवाज येताच लागलीच घाबरून गॅस बंद केला. स्वयंपाक करणे आपल्या रोजच्या सवयीचे नसल्यास उकळत्या तेलाशी जास्त खेळू नये.

३) आता फ्रिजमधले थंडगार अंडे एका चमच्याने टकटकवून त्या तेलात सावकाश सोडले आणि टरफले बोटाने साफ पुसून फेकून दिल्यावर गॅस पुन्हा चालू केला. (सेफ गेम, याचे दोन फायदे – एक तर तडतडत्या तेलात अंडे सोडायची रिस्क नाही. दुसरे म्हणजे टरफले पुसून, फेकून, हात धुवुन, होईपर्यंत तेलातले अंडे करपायची भिती नाही.)

४) आता त्याच चमच्याने टोपातले अंडे परतायला घेतले. त्याआधी त्यात मीठ टाकायला मात्र विसरलो नाही. मसाला टाकायचे टाळले कारण त्याने अंड्याची मूळ चव लोप पावते जे या डिशमध्ये मला नको होते.

५) अंड्याचा कच्चेपणा जाऊ लागला तसे ते लालसर व्हायच्या आधीच गॅस पुन्हा एकदा बंद केला. पनीर असो वा अंडे, जास्त तळले गेले की रबरासारखे चिवट होते आणि त्याच्यातील फ्रेशनेसपणा जातो. (वैयक्तिक मत)

६) आता मूळ डिशला थोडावेळ विश्राम देत शीतपेय बनवायला घेतले. ताकाचा बेत होता. आपली नेहमीचीच पद्धत. तांब्यात दही, मीठ, थंड पाणी आणि रवीने घुसळणे. मॅगी नूडल्सनंतर मला परफेक्ट जमणारा हा दुसरा पदार्थ. तसे यात काही कठीण नसते, पण माझ्या रवी घुसळायच्या हाताला गुण आहे असे घरचे म्हणतात. (माझ्या मॅगीबद्दलही असेच म्हणतात, कदाचित मला जे जमतेय ते काम तरी माझ्याकडून काढून घ्यावे या हेतूनेही चढवत असतील.)

७) आता वेळ होती कूकरमधील भात काढून (जो आईने सकाळीच केला होता) त्या टोपातल्या तळलेल्या अंड्याबरोबर मिसळून घ्यायची. मगाशी वर अंड्यास तळताना गरजेपेक्षा जास्त तेल घ्या असे सांगितले होते ते याचसाठी जेणेकरून आताचा भातही त्या तेलात थोडाफार तळला जाईल. सोबतीला आवडीनुसार कोणताही लालतिखट मसाला टाकू शकतो. माझा पावभाजीचा मसालाही वापरून झालाय. पण आज मात्र घरात शोध घेता ‘लाल ठेचा’ गवसला. ज्यात लाल मिरची आणि सुके खोबरे असल्याने एकंदरीत भाताला फ्लेवर छानच येणार होता. छानपैकी अर्धी मूठ भुरभुरला आणि चमच्याने पुन्हा परतायला घेतले.

…………बस्स हाच तो क्षण जेव्हा भाताचे बदलणारे रंग पाहता मला आठवले की या डिशचे फोटो काढून काय कसे बनवले हे व्हॉट्सपवर बायकोशी शेअर करावे. मला मॅगी बनवणे आणि जेवण गरम करणे याव्यतिरीक्त आणखीही बरेच(?) काही करता येते यावर ती दाखवत असलेला अविश्वास मला आज तोडायचा होता.
इथे एक नम्रपणे नमूद करू इच्छितो – फोटो मोबाईलने काढल्याने आणि मोबाईलची सेटींग गंडल्याने फार काही सुरेख आले नाहीत, म्हणून फोटोंची क्वालिटी बघून पदार्थांची चव ठरवू नका. फिशटॅंक मधील मासे कितीही रंगीबेरंगी आणि छानछान दिसत असले तरी ते खायला तितकेच चवदार लागतील असे नसते, तिथे चारचौघांसारखा दिसणारा बांगडाच हवा.
तर हा पहिला फोटो टोपात परतलेल्या भाताचा ज्याला ‘एग फ्राईड राईस विथ महाराष्ट्रीयन तडका’ असेही बोलू शकतो.

 

1
८) टोपातला भात काढून ताटात घेतला आणि त्यावर घरात सापडलेली बारीक तिखट शेव पसरवली. सोबतीला चितळे बंधू बाकरवडी देखील होती, तर ती सुद्धा दाताने कचाकचा कुरतडून त्यावर सोडली. इथे हा भात मी स्वताच आणि एकटाच खात असल्याने बाकरवडी दाताने तोडली कारण मला स्वताच्या उष्ट्याचे चालते.

हा दुसरा फोटो त्या भाताला ताटात घेतल्यावरचा प्लस तिखट शेव आणि बाकरवडीचा.
(जाणकार व्यक्ती फोटो झूम करून चेक करू शकता की खरोखर चितळेंचीच बाकरवडी होती, टीआरपीसाठी त्यांचे नाव घेतलेले नाहीये)

2

 
लगे हात मगाशी घुसळून ठेवलेल्या ताकाचाही एक फोटो काढून घेतला.

4

९) ग्रेवी बनवण्यासाठी आता त्याच रिकाम्या टोपात डाळ घेतली आणि भाजीचा शोध घेता फ्रीजमध्ये कालची शेंगाबटाट्याची एकच काय ती माझ्या आवडीची भाजी सापडली. काही हरकत नाही, भारंभार सतरा पदार्थ असण्यापेक्षा मोजकेच पण आवडीचे पदार्थ या प्रकारासाठी केव्हाही चांगलेच. आता इथे काही विशेष करायचे नव्हते. डाळ आणि भाजी एकत्र करून छानपैकी एक कढ घ्यायचा होता. पण तरीही थोडीफार वेगळी चव म्हणून अर्धा चमचा दही त्यात टाकले. (कधी मूड आला तर टोमेटो सॉसही टाकायचो) अर्थात आमची डाळ आणि भाजी तिखट असल्याने त्यात दही टाकले पण कोणाकडे तिखट डाळ-भाजी नसल्यास प्लीजच हं मग नको त्यात दही.

हा पुढचा फोटो त्या तयार ग्रेवीचा – दोन बटाटे आणि तीन शेंगा एवढे मोजकेच माझ्यापुरतेच घेतले. या प्रकारात पोटाचा अंदाज घेऊन अन्नाची नाशाडी होऊ नये हे बघणे खूप महत्वाचे असते.

3

 

हा फोटो आता पर्यंत तयार झालेल्या एकंदरीत सर्वच जेवणाचा.
यात ताटात अ‍ॅड झालेली लोणच्याची फोड विशेष महत्व राखते. इतरवेळी मला लोणचे हवेच असा आग्रह नसला, अगदी हॉटेलमध्ये मिळणारे फुकटचेही खात नसलो, तरी या डिशबरोबर ते आवर्जून लागतेच.

 

5

 

१०) फोटोग्राफीच्या नादात ग्रेवी थंड झाली असे जाणवल्याने पुन्हा एकदा गॅसवर ठेऊन एक कढ काढून घेतला.

पण फोटो काढायची एव्हाना चटक लागल्याने खायला सुरुवात करायच्या अगदी आधी हा खालचा फोटो काढायचा मोह काही बाई आवरला नाही.

 

6

 
एक सांगावेसे वाटणारे – अंडे फोडण्यापासून, भात परतवायला, डाळ-भाजी घेऊन ती ढवळायला वापरला जाणारा तो एकच एक चमचा जेवायच्या वेळी मात्र ताटातून अल्लद बाहेर काढून बोटांना गरम चटके देत खायची मजा काही औरच !

तळटीप – सारे फोटो मुद्दामहूनच खालच्या फरशीवर काढले आहेत. किचनमधील पसारा एकाही फोटोत दिसून बायकोच्या शिव्या खायला लागू नये यासाठी घेतलेली हि काळजी. तरी यावरून हे मीच कश्यावरून बनवले असा अविश्वास कोणी माझ्यावर दाखवू नये. खुद्द माझ्या बायकोने यावर विश्वास ठेऊन मला ‘मिस्टरशेफ’चे प्रशस्तीपत्रक दिले आहे 🙂

– तुमचा अभिषेक

 

ए टी एम मशीन !

माणसाची किंमत जिथे पैश्यात मोजली जाते तो हा जमाना. तिथे एटीएम मशीन म्हणजे वजन काटा. त्यातून खडखड आवाज करत बाहेर पडणार्‍या कोर्‍या करकरीत नोटा तुमचे आजचे वजन. पाठोपाठ तुमची समाजातील पत लिहून येणारी बॅंकबॅलन्स स्लीप. आठ हजार रुपये मी काढले होते आणि शिल्लक जमा तिच्यावर दाखवत होती तब्बल चार लाख, चौसष्ट हजार, आठशे सतरा रुपये. आजची तारीख तेवीस. पगाराला आठवडा बाकी. तो झाला की हा आकडा सव्वापाचच्या घरात. महिन्याभरात मोठा खर्च न आल्यास पुढच्या महिन्याअखेरीस मी पाच लाखाच्या क्लबमध्ये हक्काने विराजमान होणार होतो. हा हिशोब लावतच मी बाहेर पडलो तर समोर तोच तो मगासचा रखवालदार.

“क्या टाईम हुआ साहबजी?” …… मी एटीएममध्ये प्रवेश करत असतानाचा त्याने घोगर्‍या आवाजात विचारलेला प्रश्न!
स्साला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता हा आवाज. बहुतेक कॉलेजच्या वॉचमनचा. पण त्याचा बांधा याच्यापेक्षा दणकट होता. हा त्यामानाने किरकोळ दिसतोय. रंगही तुलनेत उजळ. छ्या, काय करायचे आहे अंदाज लाऊन. तसेही रात्रपाळीचे सारे वॉचमन सारखेच. थंडीपासून बचाव करायला तोंडाला मफलर गुंडाळला की त्या आडून सार्‍यांचाच आवाज तोच तसाच घोगरा. मफरलचा रंगही काळानिळा नाहीतर करडा. छ्या नको बोलूनही डोक्यात वॉचमनचाच विचार. यावेळी दुसरा विचार तरी कोणाचा येणार होता डोक्यात…

रात्री साडेअकराची वेळ. ऑफिसच्या कामानिमित्त चेंबूरला पहिल्यांदाच जाणे झाले होते. कुठल्याश्या गल्लीबोळातून रिक्षावाल्याने स्टेशनला आणून आदळले आणि त्याच्या डुर्र डुर्र करत पुन्हा स्टार्ट केलेल्या रिक्षाचा आवाज पार होईपर्यंत ध्यानात आले की आजूबाजूला एखाद दुसरी पानपट्टी, त्यावर लागलेले उत्तर भारतीय लोकसंगीत आणि त्या तालाला काटशह देत रस्त्यापलीकडे भुंकणारी कुत्री. एवढाच काय तो आवाज. बाकी भयाण शांतता. माणसाला माणसाचीच जाग लागते. नाहीतर ती स्मशानशांतता.

समोर स्टेशनचा ब्रिज होता, पायथ्याशी तिकीटघर. माझा मध्य रेल्वेचा पास या हार्बर लाईनला कामाचा नव्हता. किमान कुर्ल्यापर्यंत तरी तिकीट काढावे लागणार होते. सुटे पैसे आहेत की नाही हे चेक करताना आठवले पाकिटात पैसे जेमतेमच उरले आहेत. शंभराच्या दोन नोटा आणि काही चिल्लर. आपल्या इकडचे एकमेव एटीएम मशीन सकाळी नादुरुस्त होते. आतापर्यंत कोणी हालचाल केली नसल्यास आताही जैसे थे च असणार होते. खरे तर याचीच संभावना जास्त होती. पण मग इथे रात्रीच्या वेळी एटीएम शोधणे तसे धोक्याचेच. पानपट्टीवर एटीएमची चौकशी म्हणजे दरोड्याला आमंत्रण. पण काय ते नशीब. पानपट्टीकडे नजर टाकतानाच त्याच रस्त्याला पुढे बॅंक ऑफ बरोदाचा प्रकाशफलक झगमगताना दिसला. यावेळेस लाईट म्हणजे नक्कीच एटीएम असणार.

पानपट्टीवरून पुढे पास होताना आता गुलझारसाहेबांची गझल ऐकू आली. वाह! क्षणात पानवाल्याची आवड बदलली होती. काय तो अंदाज. होठो से छू लो तुम.. हे गुलझार की जावेद. काय फरक पडतो. पुढे या बाजूला जरा जाग दिसत होती. स्टेशनबाहेर पडणारा एक रस्ता पुढच्या अंगाला होता, जो लोकांच्या सवयीचा असावा. पूलावरून येण्यापेक्षा फाटकाचा वापर सोयीचा असावा. इथे थोडीफार वर्दळ होती. एटीएमच्या आत देखील होती. मी रिकामेच समजून आत शिरायला दरवाजा ढकलणार तोच तो आतूनच उघडला गेला. लडखडतच एक स्वारी बाहेर पडली. आत शिरल्यावर त्या लडखडण्याचे कारण सांगणारा उग्र दर्प नाकात थोडावेळ दम करून गेला. बाहेर वॉचमनशी थोडीफार हुज्जत घातल्याचा आवाज. कदाचित उगाचच. तो आवाज शांत झाला तसे मी कार्ड काढून मशीनमध्ये सरकावले. बटणे दाबत असतानाच किती पैसे काढायचे याचा हिशोब डोक्यात. सहा हजारांची गरज आणि वर दोनेक हजार खर्चाला. म्हणजे टोटल आठ हजार!

पैसे पडतानाच मोजत होतो.. एक दोन तीन चार, पाच सहा सात आठ .. सवयीनेच ! मान्य एटीएम कधी चुकत नसावे. पण जिथे पैश्याचा संबंध येतो तिथे बापावर विश्वास ठेऊ नये. हे तरीही एक मशीनच .. दहा अकरा बारा तेरा, चौदा पंधरा आणि सोळा ! पाचशेच्या सोळा कडक नोटा, मात्र शंभरचे सुट्टे न आल्याने चरफडलोच जरा.

पैसे व्यवस्थितपणे पाकिटात कोंबत वेळ न दवडता बाहेर पडलो तर तिथे नेक्स्ट कस्टमर लाईनीत हजर होताच. मुंबई शहर, लाखो करोडोंची उलाढाल. पैसा इथून तिथे नुसता खेळत राहतो तिथे या पैश्याच्या यंत्राला कशी उसंत मिळणार. त्याची घरघर सदैव चालूच. बाहेरचा वॉचमन मात्र आता खुर्चीत बसल्याबसल्या थोडा पेंगू लागला होता. मगाशी वेळ त्याने यासाठीच विचारली असावी. त्याची डुलकी काढायची वेळ झाली असावी. हातात घड्याळ न घालता, घडोघडी वेळ चेक न करता, रात्र कशी निघत असेल त्याची. त्याचे तोच जाणे. आजूबाजुची सारी दुकाने एकदा बंद झाली की रात्रीचे बारा काय आणि दोन काय. शेवटची ट्रेन तेवढी जाताना टाईम सांगून जात असेल, आणि त्यानंतर सकाळी मॉर्निंग अलार्म द्याला तीच पुन्हा येत असेल. पण सुरक्षिततेच्या कारणास्तव ठेवलेला वॉचमन, त्याच्याकडे साधा मोबाईल नसावा. त्यात असते की घड्याळ. कि उगाचच विचारायची म्हणून विचारली वेळ, रात्रीचे कोणी बोलायला मिळत नाही म्हणून, काहीतरी विषय काढायचा म्हणून… ” ओये भाईसाब ….” ईतक्यात पाठीमागून एक चौकडीचा शर्ट घातलेला, दाढीवाला माणूस हाका मारत, कदाचित मलाच पुकारत, माझ्या अंगावर धाऊन येताना दिसला आणि मी एक हात पॅंटच्या मागच्या खिशात ठेवलेल्या पाकिटावर घट्ट ठेऊन सावध पावित्रा घेतला.

तो काय बोलत होता हे त्याच्या गावंढळ हिंदीच्या उच्चारांवरून समजत नव्हते. पण तो मला एटीएम जवळ पुन्हा यायला सांगत होता. काहीतरी गोंधळ झाला असावा तिथे. वोह पैसा आपका है क्या? हा एवढा एकच प्रश्न माझ्या डोक्यात शिरला. प्रश्न पैश्याचा असेल तर ते कसेही डोक्यात शिरतेच.

गडबड होऊ शकत होती. यामागे डावही असू शकत होता. रात्री बाराचा सुमार, अनोळखी जागा, एटीएम मशीनच्या जवळ, फक्त ’तो’ ‘मी’ आणि तिसरा तो रखवालदार. त्यातही त्या दोघांच्या आपापसातील संबंधाबद्दल मी अनभिज्ञ. दूर नजर टाकली तर मगाशी दिसणारी वर्दळ पार मावळली होती. कदाचित ट्रेनच्या येण्यानेच त्या भागाला थोडीफार जाग येत असावी. ट्रेन गेली आणि पुन्हा सामसूम. पण स्टॅडला लागलेल्या रिक्षांमध्ये अंधार असला तरी बहुतेक त्यात चालक झोपून असावेत. हाकेच्या अंतरावरच होते, जर तशीच गरज लागली तर…

मला बोलावणारा माणूस एव्हाना एटीएम जवळ परतला होता. तिथे त्याचे वॉचमनशी बोलणे चालू होते. वॉचमनच्या हातात होती एक कोरी करकरीत पाचशेची नोट. एक बेवारस नोट जिच्यावर कदाचित माझा मालकीहक्क असावा अशी त्यांना शंका होती. आणि इथे मलाही त्यांच्या हेतू वर शंका घेण्यास पुरेसा वाव होता.

ईतक्यात स्टेशनमधून ट्रेनच्या भोंग्याचा आवाज ऐकू आला म्हणजे पुढचा काही वेळ तरी या परिसराला पुन्हा जाग येणार होती. काय प्रकरण आहे हे आता बघायला हरकत नव्हती. पाचशेची नोट अशी स्वस्थ बसू देणार नव्हती. जवळ पोहोचलो तर अजूनही त्याचे वॉचमनशी हुज्जत घालणे चालूच होते. म्हणजे कदाचित ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते. निदान तसे दाखवत तरी होते. खरे खोटे देवास ठाऊक, पण अजूनपर्यंत सारे काही ठिक होते. सारे काही सुरक्षित होते. आलबेल !

त्या दाढीवाल्याने वॉचमनच्या हातातून पाचशेची नोट खेचून माझ्यापुढे सरकावली जी त्याला एटीएम जवळ सापडली होती. त्याच्या आधी पैसे काढणारा मीच होतो, तर ती नोट माझीच असावी या सरळ हिशोबाने तो ती नोट माझ्या हवाली करत होता. मात्र वॉचमनची याला आडकाठी होती. कारण हा काही नोट माझीच असल्याचा सबळ पुरावा नव्हता. सारा प्रकार माझ्या लक्षात आला होता. तरीही यामागे काहीतरी वेगळाच डाव असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आजच्या तारखेला एवढा प्रामाणिकपणा. पचायला जरा जडच. पण विचार करायला वेळ कोणाला होता. त्या नोटेने एक भुरळशी घातली होती. मगाशी खडखडत एटीएममधून बाहेर पडणार्‍या नोटा माझ्या स्वताच्या होत्या. निघणार्‍या प्रत्येक नोटेगणिक माझे बॅंकबॅल्न्स घटत होते. पण हि मात्र फुकट होती. विनासायास मिळणारा पैसा. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मिळणारा फ्री हिट. कसाही उडवा कसाही टोलवा. कोणाला नको असणार होता असा पैसा.

मगाशी आलेल्या ट्रेनमधील लोकांचा एक गुच्छा एव्हाना स्टेशनाबाहेर पडला होता. तर तितकेही भितीचे कारण नव्हते. आतापर्यंत सारे काही ठिक होते. सारे काही सुरळीत होते. आलबेल !

………. पण आता ती नोट मिळवायची कशी याबाबत माझे विचारचक्र सुरू झाले. ती नोट माझी नव्हती हे मला ठाऊक होते. समोरचा माणूस कसलीही चौकशी न करता मला देण्यास तयार होता. मात्र वॉचमनने घेतलेल्या आक्षेपानंतर त्याने मला माझ्याजवळचे पैसे मोजून खात्री करून घेण्यास सांगितले. मी पाकिटातून पैसे काढून त्यांच्यासमोर मोजणार, मग ते आठ हजार भरणार, मी चुरगाळून फेकलेली पावती त्या एटीएमच्या जवळच पडली असणार आणि ती पडताळून बघायची बुद्धी दोघांपैकी कोणाला झाल्यास मी आठच हजार काढले होते हे त्यांना कळणार. बस्स, इथे काहीतरी चकमा देणे गरजेचे होते.

पाकिटातून पैसे मोजायला म्हणून बाहेर काढताना मोठ्या चलाखीने मी त्या बंडलातील एक नोट खाली सरकवून ते उचलले. आता माझ्या हातात पंधरा नोटा होत्या. आठ हजार मी एटीएममधून काढले हे मी स्वताहून डिक्लेअर करून झाले होते. कोणी त्यावर आक्षेप घेतला असता मगाशी चुरगाळलेली पावती मी स्वता शोधून त्यातला आठ हजारांचा आकडा दाखवू शकलो असतो. आता फक्त पंधरा नोटा मोजून दाखवायची औपचारीकता पुर्ण करायची होती.

एक दोन तीन चार .. पाच सहा सात आठ … नोटा मोजताना हात थंड पडल्याचे जाणवत होते. कसली ती हुरहुर. कसला तो आनंद. पाच सहा सात आठ .. नऊ दहा अकरा बारा… कोणी हातातून खेचून सहज पळून गेले असते एवढ्या अलगद आणि बेसावधपणे मी त्या नोटा मोजत होतो. नऊ दहा अकरा बारा .. तेरा चौदा… चौदावी नोट मोजताच माझा चेहरा खर्रकन उतरला. त्या खाली नोटच नव्हती. पाकिटात होती ती पंधरावी नोट आणि सोळावी समोरच्याच्या हातात. ती बेवारस नोट माझी स्वताचीच आहे हे समजले तसे पाचशे रुपयांचे नुकसान झाल्याची भावना मनात दाटून आली. एवढे वाईट तर कदाचित माझे पाचशे रुपये हरवल्यावर देखील वाटले नसते जेवढे ते परत मिळताना वाटत होते. खिन्नपणेच मी ती नोट माझी आहे म्हणत त्याच्याकडून स्विकारली.

पाठीमागे मात्र वॉचमनची अखंड बडबड अजूनही चालूच होती. किती बोलतो हा माणूस. त्याने कदाचित माझ्या बरोबरीनेच नोटा मोजल्या होत्या. त्याला काय कसला हिशोब अजून लागला नव्हता देव जाणे. माझ्याकडे ग्यारंटी म्हणून माझा फोन नंबर मागत होता. मागाहून कोणी या नोटेवर आपला मालकी हक्क सांगायला आला तर कसलाही लफडा व्हायला नको हा यामागचा हेतू. मी ना हुज्जत घालण्याच्या मनस्थितीत होतो ना संवाद वाढवण्याच्या. त्याने माझा नंबर टिपायला मोबाईला काढला तसे मी माझा रटलेला नंबर बोलायला सुरूवात केली.. एट टू फोर फाईव्ह .. डबल एट .. सेव्हन एट .. स्साला कोण हा ? .. याला का देऊ मी माझा नंबर.. ? शेवटचे दोन आकडे मी मुद्दामच चुकीचे दिले.

पलटून पाहिले तर एव्हाना तो दाढीवाला माणूस निघून गेला होता. त्याने त्याचे पैसे काढले होते, त्याचे काम झाले होते आणि माझे कवडीमोलाचे धन्यवाद स्विकारण्याचीही तसदी न घेता तो आपल्या मार्गाला पसार झाला होता. आता मला स्वताचीच लाज वाटू लागली होती. त्याचा प्रामाणिकपणा डोळ्यात खुपू लागला होता. जगाला प्रामाणिक माणसे का नको असतात याचे कारण समजत होते.

एकच काय ते चांगले होते, अजूनपर्यंत सारे काही ठिक होते. सारे काही सुरक्षित होते. आलबेल !

फक्त मला माझी किंमत समजली होती … जास्तीत जास्त पाचशे रुपये !!

……………………………………………………………………
………………………………………..
……………………..

दुसर्‍या दिवशी जाग आली तोच मावशीच्या हाकेचा आवाज. सोन्या काल रात्री तू चेंबूरवरूनच आलास ना?

का? काय झाले?

हि बातमी बघ ….

न्यूज चॅनेलवर खालच्या बाजूला एक पट्टी सरकत होती ..
क्षुल्लक कारणासाठी डोक्यात दांडा घालून बळी — फक्त पाचशे रुपयांसाठी रखवालदाराने गमावला जीव — एटीएम मशीनच्या बाहेरच आढळला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह — आरोपीच्या शोधासाठी पोलिस तपासणार एटीएम मशीनचे रेकॉर्ड …….. एटीएम मशीनचे रेकॉर्ड …… पोलिस तपासणार …

बस्स पुढचे काही वाचवले नाही…

मी धावतपळतच बेडरूममध्ये आलो. दार लाऊन घेतले. कडी घट्ट लागलीय याची खात्री केली आणि थरथरत्या हातांनीच पाकीट काढून सार्‍या नोटा पुन्हा एकदा मोजायला घेतल्या. एक दोन तीन चार .. पाच सहा सात आठ… मनात विचारांचे नुसते काहूर माजले होते. हात कालच्यापेक्षा जास्त थंड पडले होते. नऊ दहा अकरा बारा .. तेरा चौदा पंधरा सोळा… आता फक्त हात गळून पडायचे बाकी होते. कारण अजूनही एक नोट हातात शिल्लक होती. ती सतरावी होती.. सतरा म्हणजे खतरा.. तब्बल साडेआठ हजार रुपये. म्हणजे काल हिशोबात मी कुठेतरी चुकलो होतो. म्हणजे ती नोट माझी नव्हतीच. याचा अर्थ………..

आता काहीच ठिक नव्हते. काहीच आलबेल नव्हते. आता माझी किंमत …. काहीच उरली नव्हती !

– तुमचा अभिषेक

 

 
१ प्रतिक्रिया

Posted by on एप्रिल 24, 2014 in लघुकथा

 

सुखाची चाहूल… आगमन … अवर्णनीय !

शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती.

तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे. बायोलॉजीचा ‘ब’ सुद्धा माहीत नसलेलो मी, बाप होत असलो तरी याबद्दल जेमतेमच जाणकारी राखून होतो. बायकोने फोनवर ‘जेवलास का आणि भाजी कशी झाली होती’ असे विचारावे त्या थाटात ही बातमी दिली आणि मी कामाच्या वेळी कमीच बोलतो हे माहीत असल्याच्या सवयीने फोन कटही केला. तिच्या आवाजातून चिंतेचे कारण काय अन किती हे देखील समजले नाही. माझे दिवसभराच्याच नाही तर पुढच्या आठवडाभराच्या कामाची प्लॅनिंग मी एक एप्रिल या तारखेच्या हिशोबाने केली होती. त्यातही आजच्या दिवसाचे काम रात्री नऊ पर्यंत चालणार होते. पण आता काय किती बोंबलले याचा हिशोब करायचा प्रश्नच नव्हता. लागलीच लाईन मॅनेजरला कल्पना दिली. त्यालाही अगोदरच याबाबत माहीत असल्याने फारसा काही गोंधळ न घालता त्याने माझ्या हातात असलेले काम दुसर्‍या कोणाला तरी हॅण्डओवर करून मला निघायला सांगितले. पुन्हा बायकोला फोन लाऊन परिस्थितीची कल्पना घेतली, तर संध्याकाळी सावकाश अ‍ॅडमिट झाले तरी हरकत नाही असे समजले. त्यानंतर उद्या वा परवा, किती लवकर पुन्हा ऑफिसचे तोंड बघायला मिळेल याची कल्पना नसल्याने संध्याकाळपर्यंत वेळ घेऊन निदान माझ्यावाचून अडणारी कामे तरी आटोपून घेऊया असे ठरवले. पण बस्स ठरवलेच.! फोन ठेवताक्षणीच जाणवले की आपली छाती तूफान वेगाने धडधडू लागलीय अन श्वास थंड. इथून पुढे कामात लक्ष लागणे कठीणच होते. कामावरची निष्ठा दाखवायची हिच ती वेळ असे मनाला बजावत संध्याकाळपर्यंत जमेल तसे आटोपले आणि निघालो.

तिथे तिची एव्हाना अजून एक डॉक्टरवारी करून झाली होती ज्यात संध्याकाळ ऐवजी दुसर्‍या दिवशी सकाळी अ‍ॅडमिट व्हायचे ठरले होते. डॉक्टरकडून येताना ती मला परस्पर बाहेरच भेटली तेव्हा तिने मला या बदललेल्या वेळापत्रकाबद्दल सांगितले. मात्र उद्या अ‍ॅडमिट झाल्यावर तिथून पुढे काय करणार आणि फायनल रिझल्ट कधीपर्यंत हाती येणार याची मला तोपर्यंत काहीही कल्पना नव्हती. पण त्या आदल्या संध्याकाळी पाणीपुरी खायचा तिचा शेवटचा डोहाळा पुरवताना मला दुपारपासून मनावर आलेले दडपण तेवढे निवळताना जाणवले.

ती रात्र ती तिच्या घरी होती आणि मी इथे माझ्या. रात्री झोपताना आई म्हणाली, उद्या होवो किंवा परवा, दोन्ही चांगले दिवस आहेत. उद्या शिवजयंती तर परवा संकष्टी…
आणि पुन्हा एक अनामिक हुरहूर मनी दाटून आली. म्हणजे उद्या किंवा परवाच,, होणारही होते तर..

सुखाची चाहूल अनुभवण्यातही एक सुख असते हे त्या रात्री जाणवत होते. धडधडत्या छातीने आणि थंड पडत चाललेल्या श्वासांनी, येणार्‍या सुखाच्या वाटेवर डोळे लाऊन बसणे.. कमिंग सून कमिंग सून असे स्वताच स्वताच्या मनाला बजावणे.. ती रात्र माझी तशीच गेली. शिवजयंती की संकष्टी,, मुलगा की मुलगी.. नॉर्मल की सिझेरीअन,, तिच्यासारखे की माझ्यासारखे.. आपल्या मनात काय आहे.. आपल्या मनासारखे होईल का.. जर मुहुर्तच साधायचा असेल तर शिवजयंतीचाच साधू दे, मुलगा वा मुलगी काहीही माझेच असले तरी माझ्या मनासारखी मुलगीच होऊ दे.. याच विचारांत गेली..

परीणामी सकाळी उशीराच उठलो. पाहतो तर वाजलेला अलार्म चुकून झोपेतच बंद केला होता. अरे देवा, आता पुन्हा शिव्या पडणार तर. गेल्या सोनोग्राफीच्या वेळी तिच्याबरोबर जायला न जमल्याच्या शिव्या ताज्या होत्या आणि आज महत्वाच्या दिवशी सुद्धा … सुदैवाने तिलाही घरून निघायला थोडाफार उशीरच झाला होता. तरीही माझ्याआधीच घरच्यांना बरोबर घेऊन ती अ‍ॅडमिट झाली होती. पण आजचा तिचा मूड वेगळाच होता. माझ्या उशीरा येण्यापेक्षा माझ्या येण्याला तिच्याठायी जास्त महत्व होते. मी पोहोचलो तेव्हाच बाईसाहेब मस्त हाताला सलाईन लाऊन बेडवर पहुडल्या होत्या. आता पुढे चार-पाच तासांतच कळा सुरू होऊन पुढे आणखी तासभरातच… ईति तिच्या बहीणींनी पुरवलेली वैद्यकीय माहिती आणि मी एक नजर घड्याळावर टाकली. याचा अर्थ फार तर फार दुपारी दोन वाजेपर्यंत मी बाप होणार होतो. हि वेळ इतक्या समीप आलीय यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. माझ्या डोक्यातून अजूनही ती एक एप्रिलची तारीख बाहेर पडली नव्हती. गेले नऊ महिने एकेक करत मोजत असलेले दिवस आठवू लागले. महिन्याभरापूर्वी ती माहेरी गेल्यापासून या दिवसाच्या प्रतीक्षेत होणारे आमचे रोजचे फोनवरचे बोलणे आठवू लागले. किंबहुना लग्नानंतरचा तो प्रत्येक एक क्षण आठवू लागला ज्यात दडलेल्या भावना कळतनकळत आजच्याच दिवसाची वाट बघत होत्या. येत्या काही तासांतच आमच्या नात्याला आणखी घट्ट करणारी एक कायमस्वरूपी गाठ बांधली जाणार होती.

मी माझ्या घरी फोन करून दुपारी दोनची वेळ कळवून घरच्यांना त्याआधी यायला सांगितले, तिचे घर जवळच असल्याने तिच्या घरचे सारे हजेरी लाऊन गेलेलेच वा गरज पडेल तसे कधीही हजर होतील अश्या हाकेच्या अंतरावरच होते. जवळपास सर्वांनीच रजा टाकल्या होत्या. आपापले सारे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामागे कारणही तसेच होते. दोन्ही घरांमध्ये कित्येक वर्षांनी, तब्बल एका पिढीनंतर आज पहिल्यांदाच बाळाचा रडण्याचा आवाज घुमणार होता, म्हणून हा दिवस सर्वांसाठीच स्पेशल होता. आणि आता सुरू झाले होते ते काऊंटडाऊन .. टिक टिक वन.. टिक टिक दोन…. दोन वाजताची प्रतीक्षा !
रूमवर टाईमपास करायला टिव्ही होता. पण त्याचा रिमोटही हातात घ्यायला कोणाला सुचत नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकताना बघणे हाच सर्वात मोठा विरंगुळा होता. मात्र तो काटा बाराला पार करून दिवसाच्या दुसर्‍या सत्रात पोहोचला तरी अजून काहीतरी घडतेय अशी चिन्हे दिसायला मागत नव्हती. मी पुन्हा माझ्या घरी फोन करून अजून थोडे उशीरा आलात तरी चालेल असे कळवले पण होणार्‍या बाळाच्या आजीआजोबांचा पाय आता घरी टिकणे शक्य नव्हते. रूमवर फारच गर्दी होत असेल तर तिथेच आजूबाजुला भटकू पण आम्ही येतो असे म्हणत ते घरून निघाले. पण ते पोहोचले तरी अजून कश्याचा काही पत्ता नव्हता. दुपारी दोन वाजता तिला चेकींगसाठी मात्र तेवढे नेले. त्यात फारशी प्रगती न दिसल्याने आता संध्याकाळच उजाडेल एवढेच काय ते समजले. मिनिटे मोजायचा उत्साह अजूनही मावळला नव्हता मात्र मनावर आलेले दडपण कमी व्हावे म्हणून आता होईल तेव्हा होईल म्हणत वेळ बघणे थांबवले. दुपारी बाहेर जाऊन जेवण करून आलो, बसल्याबसल्या जागेवरच तासभर पेंगून घेतले, थोडाश्या इकडतिकडच्या गप्पा यांत संध्याकाळ उजाडली देखील. एव्हाना पोटात दुखायला सुरुवात झाली होती मात्र ते दुखणे केवळ छळण्यापुरतेच होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास केलेल्या चेकींगच्या वेळीही पुढच्या चेकींगची वेळ रात्री आठ-साडेआठ वाजताची एवढाच निष्कर्ष निघाला. एखादा क्रिकेटचा सामना पावसामुळे थांबावा, अधूनमधून पंचांनी खेळपट्टीची पहाणी करावी आणि सामना सुरू कधी होईल हे सांगण्याऐवजी पुढची पहाणी अमुकतमुक वाजता होईल असा क्रिकेटरसिकांना टांगणीवर लावणारा निर्णय द्यावा अश्या धाटणीचा खेळ चालू होता. हाडाचा क्रिकेटप्रेमी असल्याने मी आजवर हे बरेचदा अनुभवलेय पण आजच्या अनुभवाची त्या कशाशीही तुलना नव्हती.

आता कदाचित रात्रीच्या मुक्कामाचीही तयारी ठेवावी लागेल म्हणत दिवसभराची मरगळ झटकून ताजेतवाने होण्यासाठी एकेक करून ब्रेक घेण्याचे ठरवले. संध्याकाळच्या सुमारास चहापाण्याच्या निमित्ताने जवळच असलेल्या सासुरवाडीला माझी देखील एक फेरी झाली. पण चहा आणि पाण्याव्यतिरीक्त आणखी काही घ्यायची इच्छा झाली नाही. धावत गेलो आणि पळत आलो असे केले. मधल्या काळात हिच्या पोटातल्या दुखण्याने बर्‍यापैकी जोर पकडला होता. मी परतलो तेव्हा बाईसाहेब पुन्हा चेकींगसाठी गेल्या होत्या. यावेळची स्थिती तुलनेत आशादायी असली तरी एव्हाना ती पार कंटाळली होती. एकीकडे दुखणे वेगाने वाढत होते मात्र सकाळपासूनची प्रगती पाहता आणखी तास दोन तास थांबून काही चमत्कार घडेल अशी आशा तिला स्वताला तरी वाटत नव्हती. सिझेरीयन झाले तरी चालेल पण यातून मला एकदाचे सोडवा या मनस्थितीला ती पोहोचली होती. पण डॉक्टरच म्हणाले, थांबा, शक्य आहे तोपर्यंत नॉर्मलच करूया, जरा कळ काढा..

जरा कळ काढ, या वाक्यप्रचाराचा उगम मी आज माझ्या डोळ्यासमोर अनुभवत होतो. तिची अवस्था आता मलाही बघवत नव्हती. तिच्यासाठी मी काय करू शकत होतो तर ते फक्त तिचा हात हातात पकडून बसू शकत होतो. जितके असह्य व्हायचे तितक्या जोरात ती माझा हात घट्ट आवळायची, याने मी तिच्या वेदना मापू शकत होतो पण त्यांना कमी करू शकत नव्हतो. त्या कमी व्हायचे इंजेक्शन दिले होते मात्र ते निकामी ठरत होते. विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती. होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता.

आता दर दुसर्‍या मिनिटाला कळ निघत होती. माझ्याही हातावरचा दाब वाढत होता. डॉक्टरने पुढच्या आणि कदाचित शेवटच्या चेकींगची दिलेली वेळ अजून तासाभराने होती, तेव्हाही नक्की काय होणार होते, काय डिसीजन घेतला जाणार होते हे ठाऊक नव्हते. जर तोपर्यंत थांबूनही सिझेरीयनच करावे लागणार होते तर का उगाचच थांबायचे हा प्रश्न छळत होता. पुर्ण दिवस निघाला असला तरी हा तास निघणे फार कठीण होते. होणारा त्रास पाहता फक्त आणखी अर्धा एक तासच सहन करायचे हा खरा खोटा दिलासा तरी तिला कसा द्यावा हा प्रश्न होता. त्यामुळे सारेच शांत होते, ज्या धीराची तिला गरज होती तो शब्दांतून नाही तर फक्त स्पर्शातून दिला जात होता.

आजवर सिनेमांमध्ये बघितलेले बाळंतपणाचे सारे प्रसंग डोळ्यासमोर येत होते. दिवसभर एकच प्रार्थना करत होतो की ते सारे तितकेसे खरे नसून अतिरंजीत असावेत, ती केवळ नाटक सिनेमांमधील ओवरअ‍ॅक्टींग असावी, पण आता मात्र हे सारे हळूहळू नजरेसमोर अनुभवायला सुरुवात झाली होती. आता मी देखील घड्याळाकडे पाठ करून बसलो होतो, मागे काटे वेगाने पळत असतील अशी स्वताच्या मनाची समजूत काढत. खरेच तसे होत होते का याची कल्पना नाही पण वेळ मात्र सरकत होती. साडेदहाची वेळ दिली होती, पावणेअकरा वाजता पुन्हा डॉक्टरांचे आगमन झाले. चेकींगसाठी म्हणून तिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. आम्ही सारे बाहेरच जमलो होतो, कारण याच चेकींग नंतर ऑपरेशन करायचे का नाही याचा निर्णय घेऊन त्याची लागलीच अंमलबजावणी होणार होती.

इतक्यात आतून तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. चेकींग हा प्रकार देखील खूप त्रासदायक आहे असे ती संध्याकाळी म्हणाल्याचे आठवले. थोड्याच वेळात एक मदतनीस आतून वेगाने बाहेर आली शेजारच्या रूममधून काही औजारे घेऊन पुन्हा आतल्या दिशेने गायबली. तिच्यापाठोपाठ आणखी एक जण आत गेली. हा प्रकार एक-दोन वेळा घडला आणि कल्पना येऊ लागली की आत काही तरी घडायला सुरुवात झाली आहे. दोनचार वेळा उघडणार्‍या दरवाज्यामधून मी दबकत आत डोकावून बघायची हिंमत दाखवली खरी पण तिथून काहीच दिसत नव्हते याचा खरे तर दिलासाच वाटला. सुरुवातीलाच आलेला तिचा ओरडायचा आवाज त्यानंतर पुन्हा आला नव्हता. आता हे चांगले की वाईट हे मात्र समजत नव्हते ना कसलेही वेडेवाकडे अर्थ लावायच्या मनस्थितीत मी होतो. जेमतेम सात आठ मिनिटे झाली असावीत, तोच लहानग्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि बाहेरच्या तंग झालेल्या वातावरणात कुजबूज सुरू झाली. काही चेष्टा पण किती क्रूर असतात, हा आवाज अगदी विरुद्ध दिशेला असलेल्या एका रूममधून येत होता मात्र तरीही बेसावध मनाने त्याचा पटकन आपल्या सोयीने अर्थ काढला होता. इतकेच नव्हे तर हट्टाने हा आवाज आपलाच आहे हे पटवून द्यायची चढाओढ लागली होती. तो आवाज विरला आणि पुन्हा मिनिटभराची शांतता. वातावरणातील ताण निवळावा म्हणून काही जणांचे तेच पुराने घीसेपीटे विनोद मारणे सुरू झाले, की काही चांगलेही होते, कोणास ठाऊक, पण त्यावेळी मला हसवण्याचा प्रयत्न करणे हेच मुळात माझ्या दृष्टीने हास्यास्पद होते. पण लोकांच्या भावनांची कदर करत ना कोणाला काही बोलता येत होते ना कोणावर काही चिडता येत होते. अन्यथा मला ताटकळत उभा राहण्याऐवजी बसून घे जरा असा सल्ला देणार्‍यांनाही ओरडून शांत राहा सांगावेसे वाटत होते. बाप होतोयस तर आता बापाची जबाबदारी घ्यायला शिक हे वाक्य गेल्या काही महिन्यात कित्येकदा ऐकले होते आणि हसून टाळले होते, पण आता ऑपरेशन थिएटरच्या आत असलेल्या माझ्या बायकोची आणि होणार्‍या मुलाची त्याच्या जन्माआधीपासूनच लागलेली चिंता, हे दडपण, बापाची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे हे स्वताच स्वताला पटवून देत होते.

ईतक्यात पुन्हा एक बारीकसा रडण्याचा आवाज आला. हा आवाज कदाचित अपेक्षित दिशेने आला होता म्हणून पुन्हा सर्वांनी कान टवकारले. नजरेनेच एकमेकांना शांत राहण्याच्या खाणाखुणा झाल्या. दुसर्‍याच क्षणाला तेच ते रडणे, यावेळी मात्र आधीपेक्षा कैक मोठ्या आवाजात, न थांबता येऊ लागले, आणि बाहेर एकमेकांना अभिनंदन करणे सुरू झाले. काही हात माझ्याही दिशेने सरसावले मात्र माझ्या चेहर्‍यावरची चिंतेची रेष अजूनही काही हलायला मागत नव्हती. रडण्याच्या आवाजाने बाळ कदाचित सुखरूप आहे हे नक्की झाले होते पण त्याच्या आईची खुशाली समजणे बाकी होते. ईतर अनुभवी लोकांना कदाचित ते काळजीचे कारण वाटत नसावेही पण….. मी अजूनही वाट बघत तसाच त्या ऑपरेशन थिएटरच्या दारावर उभा होतो. दार उघडले आणि एक नर्स माझ्या मुलीला घेऊन बाहेर आली. मगासच्या रडण्याच्या खणखणीत आवाजावरून कोणीतरी मुलगा आहे असा अंदाज बांधला होता, तेव्हा होणार्‍या बाळात मुलगा मुलगी असेही असते ही बाब डोक्यातच आली नव्हती. पण आता मुलगी आहे असा गलका होताच आठवले की येस्स, मला मुलगीच तर हवी होती. गर्दीच्या सर्वात पाठीमागे उभा राहून मी माझ्या मुलीला कोणाच्या तरी खांद्यावरून डोकावून पाहिले आणि आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीच्या बघताक्षणीच प्रेमात पडलो असे झाले. आजवर मी पाहिलेली सारीच नवजात पिल्ले मला एकसारखीच वाटायची. पण हे वेगळे होते. हे माझे होते. माय लिटील प्रिन्सेस. अभि’ज लिटील गर्लफ्रेंड. तिला पाहताना मला दडपणाच्या उंच कड्यावरून अलगपदणे तरंगत खाली येत असल्याचा भास होत होता. शिवजयंतीच्या मुहुर्ताला राणी लक्ष्मीबाई आली असे कोणीतरी म्हणताच घड्याळावर नजर गेली तर जेमतेम अकरा वाजून गेले होते. बाळ ज्या मुहुर्ताला सुखरुप येते तोच खरा शुभ मुहुर्त याची जाणीव झाली. मुलीचे केवळ क्षणभर दर्शन करवून, तिचे वजन मोजून, तिला पुन्हा आत घेऊन गेले. माझी नजर अजूनही त्या दरवाज्यावरच होती, माझ्यासाठी तो अजून एकदा उघडायचा होता. उघडला, आणि स्ट्रेचरवर झोपूनच माझी बायको हसतमुखाने बाहेर आली. कोण विश्वास ठेवेल की थोड्यावेळापूर्वी हिच बाई वेदनेने नुसते व्हिवळत होती, पण आता मात्र तिच्या चेहर्‍यावर एक तृप्तीचे समाधान दिसत होते. की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना. ते जे काही होते ते हळूहळू माझ्याही चेहर्‍यावर पसरत असल्याचे मला जाणवत होते. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो …

न्यू बॉर्न फादर
तुमचा अभिषेक

 
 

ए फ्यांड्री SSSS ईई ..

अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली..

“ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या..” तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली.

यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.

फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा.

दुसर्‍याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, “काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?”

तर म्हणला कसा, “अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे ….. ”

थोडावेळ मला काय बोलावे आणि कोणत्या टोनमध्ये बोलावे समजेणासे झाले..
तरी उत्तरलो,
“म्हणजे तू सुद्धा एखाद्या जातीला आपल्यापेक्षा खालची मानतोस तर….. मग काय फरक राहिला??

आता निरुत्तर व्हायची पाळी त्याची होती.

– o0Oअण्ड्या

 

अंड्याचे फंडे ८ – हरवलेले आवाज

बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते. दोन वर्षे अभ्यासाच्या नावावर तिथेच झोपण्यात गेली आमची.. अच्छा चला, पत्ते कुटण्यात गेली हे देखील कबूल करतो. तर ते बाकडे आजही ओळखीच वाटले. त्यावरच आडवेतिडवे पसरून गप्पा कुटायला सुरुवात केली. कारण यावेळी पत्ते बरोबर नव्हते, गरजही नव्हती म्हणा.

कॉलेजच्या आठवणी कॉलेजच्या मित्रांबरोबर कॉलेजमधील आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर, ज्यांनी हा अनुभव घेतला तेच काय ते जाणोत की आमची रात्र कशी रंगली असावी. मध्येच एक सिक्युरीटी मामा डोकाऊन गेले. कोणी ओळखीचे भेटो न भेटो हे ओळखीचे असणे फार गरजेचे होते. शैलूने हात दाखवला आणि काम झाले. पहाटेपर्यंतची रात्र अशीच जागून काढायचा विचार होता. पण सर्वांच्याच डोळ्यांवर आलेल्या झापडीने अंदाज चुकवला. कॉलेजात असताना असे कधी व्हायचे नाही. कदाचित बदललेली जीवनशैली कारणीभूत असावी. सध्या सर्वांची लाईफ फुल्ल ऑफ वर्किंग स्ट्रेस झाल्याने सुट्टीचे दिवस म्हणजे झोपा काढायचे हे ठरलेलेच असते. चलता है, मला मात्र त्या लाकडी बाकड्यांवर कधीच झोप आली नव्हती म्हणून मी माझ्या फेव्हरेट व्हरांड्यात पसरलो. डोक्याखाली एखादे पुस्तक नाहीतर अंगातलेच काढून त्याची छानशी घडी करून बनवलेली उशी. म्हणजे उशीची उशी झाली अन अंगदेखील फुल्ल एअर कंडीशन. ते ही काय कमी म्हणून वर चमचमणारे तारे. सकाळी उठायचे म्हणून सवयीने अलार्म लावायला मोबाईल काढला अन स्वताशीच हसायला आले. त्याची तेव्हाही कधी गरज पडली नव्हती, तर आज उठायची अशी काय घाई होती. मुळात तेव्हा मोबाईल नावाचा प्रकारच बाळगायचो नाही. सकाळी त्या व्हरांड्यात जाग यायची ती पाखरांच्या मंजुळ किलबिलीनेच. वाटले आज इथून रेकॉर्डच करून जावे अन रोज अलार्म म्हणून मग तेच वापरावे. आईच्या लाडिक हाकेनंतर साखरझोपेतूनही प्रसन्नतेने डोळे उघडावेसे वाटावेत असा तो दुसरा आवाज.

पण का कोणास ठाऊक, नव्हता नशिबी तो आवाज यावेळी. सकाळी जाग आली ती अभ्यासाच्या निमित्ताने कॉलेजला लवकर येणार्‍या मुलांच्या गोंगाटानेच. घरी परतताना मित्रांमध्ये विषय निघाला आणि काय आश्चर्य, त्यांच्याही ते लक्षात आले होते. पक्ष्यांची किलबिल त्या दिवशी झालीच नाही म्हणे. किंबहुना हल्ली ती होतच नाही म्हणे. कॉलेजच्या परिसरातील झाडे किंचित कमी झाली होती हे खरे, मात्र हे कारण काही मनाला पटत नव्हते. कोण म्हणाले प्रदूषण वाढलेय, तर कोणी वाढत्या लोकसंख्येला आणि ट्राफिकला जबाबदार धरले. कोणी मोबाईल टॉवरमधून निघणार्‍या अदभुत लहरींवर खापर फोडले तर कोणी थेट ग्लोबल वार्मिंगलाच हात घातला. पाखरे हरवली होती एवढे मात्र नक्की, अन त्यांच्याबरोबर हरवला होता तो त्यांचा आवाज… बस इथेच अंड्याचे विचारचक्र सुरू झाले. आधुनिक राहणीमान, सतत बदलणारी जीवनशैलीमुळे आणि झपाट्याने प्रगत होणार्‍या तंत्रज्ञानामुळे आज कित्येक आवाज आपल्यातून हरवले आहेत, कित्येक दुरावले आहेत. अश्याच काही विसर पडलेल्या आवाजांचा अंड्याच्या मनाने सहज आढावा घेण्यास सुरुवात केली.

भायखळ्याला माझी मावशी राहायची. या अंड्यावर लहानपणापासूनच फार जीव तिचा. दिवाळी अन उन्हाळी सुट्ट्या पडल्या कि माझा मुक्काम तिथेच. आईशिवाय अंड्या राहू शकेल असे पृथ्वीतलावरील एकमेव घर. ‘माय मरो अन मावशी जगो’ अशी अचरट म्हण बनवणार्‍याच्या बोलण्यातही काही तथ्य होते हे तिथे जाणवायचे. मामे-मावस-आत्येभावांची टोळी जमली की रात्री लवकर झोपणे काही व्हायचे नाही. मग मध्यरात्रीच्या निरव शांततेत दोन हमखास ऐकू येणारे आवाज टिपायचा खेळ सुरू व्हायचा. त्यातील पहिला आवाज म्हणजे जवळच असलेल्या राणीबागेतील वाघ-सिंहाची डरकाळी. तो नक्की वाघ डरकाळायचा, सिंह गर्जना करायचा की अस्वलाची गुर्रगुर्र असायची हे तेव्हा समजायचे नाही. पण निदान कुत्रे भुंकल्यासारखा आवाज नसल्याने आणि आवाज राणीबागेतूनच येत असल्याने आम्ही त्या आवाजाचे बिल नेहमी वाघसिंहांवरच फाडायचो. दुसरा आवाज म्हणजे बाहेरगावी जाणार्‍या ट्रेनचा आवाज. हा आवाज भायखळा स्टेशनवरून न येता थेट मुंबई सेंट्रल स्थानकाहून येतो असे मावशी सांगायची. खरेही असेल, तेव्हा मोठे सांगतील तेच प्रमाण मानायचे वय. पण जसे वयात आलो तसे मावशीच घर सुटले अन ते आवाजही. मध्यंतरी कित्येक वर्षांनी मावशीकडे जाणे झाले होते तेव्हा ना सिंह गरजला ना ट्रेनने भोंगा दिला. कदाचित राणीबागेत आता दोनचार घुबडं अन माकडं सोडून फारसे वन्यजीव उरले नसावेत, आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने वाढत्या ट्राफिकच्या कर्णकर्कश्य हॉर्नमुळे लांबवरून येणारे ट्रेनच्या भोंग्यांचे आवाज दबले जात असावेत. त्या रात्री गप्पांमध्ये त्या दोन्ही आवाजांची आठवण मात्र काढली गेली ज्यांच्याशी आम्हा भावंडांच्या बालपणीच्या आठवणी देखील निगडीत होत्या.

त्या ट्रेनच्या भोंग्यासारखाच आठवणीतील एक आवाज गिरणीच्या भोंग्याचा. हा आवाज देखील फार जुना. सकाळी नऊ वाजता न चुकता कानावर पडणारा. आमचे घड्याळ किती पुढे आहे की मागे पडले आहे हे या भोंग्याच्या वाजण्यावरून ठरायचे. आईसाठी तर ती नऊची वेळ एक बेंचमार्क होती. तो भोंगा कानावर पडला की नऊ वाजले हे तिला समजायचे आणि तसे ती सकाळची तयारी शेड्युलनुसार चालू आहे की नाही हे ठरवायची. जर तयारी वेळेत नसेल तर, “अरे देवा नऊ वाजले. अजून कपडे धुवायचे बाकी आहेत. आज पाणी देखील मेले हळूहळू येतेय. ए चल आनंदा, तू चहा घे तोपर्यंत आपल्या हाताने, मला वेळ नाही आता…” हे तिचे ठरलेले पुटपुटने. तो भोंगा ही कुठे हवेत विरला देव जाणे. कोणत्या गिरणीचा वाजायचा ते ना आजवर मला कळले ना तेव्हा माझ्या आईला माहित होते. तरीही तो आमच्या दैनंदिनीचा एक भाग बनून होता.

असाच तेव्हा घराघरातून येणारा एक आवाज म्हणजे कूकरच्या शिट्ट्यांचा. सकाळची किंवा संध्याकाळची एक ठराविक वेळ झाली की थोड्याफार फरकाने वाडीतील प्रत्येक घरातून हा आवाज यायचा. सोबतीला असायचा तो एक मंदसा दरवळणारा वास. रविवारी हा वास तसा खासच असायचा आणि हे आवाजही त्या दिवशी आपली वेळ चुकवून किंचित उशीराच ऐकू यायचे. कपडे धुताना धोक्याने बडवताना होताना आवाजही याच कॅटेगरीतील, अन याच्या सोबतीलाही एक सुकत घातलेल्या कपड्यांचा वास असायचा. पण आज मात्र फ्लॅटच्या बंद दरवाजापाठी हे आवाज देखील अडकून राहिलेत.

हा संस्कृतीबदल केवळ चाळसंस्कृती अन फ्लॅटसंस्कृती पुरता मर्यादीत नसून सर्वच क्षेत्रात घुसला आहे. पैकी एक म्हणजे मंगलकार्ये. एकेकाळी लग्नसराईत हमखास ऐकू येणारा सनई चौघड्यांचा आवाजही लोप पावलाय. तेव्हा मात्र तेच तेच पॅंपॅपॅ काय सार्‍या लग्नात म्हणून अंड्या चिडायचाच, पण हल्ली काही लग्न समारंभ पाहता ते नुसते रिसेप्शन अन जेवणाच्या पार्टीपुरता असतात की काय असे वाटते तेव्हा त्या पारंपारीक सनई चौघड्याची कमतरता जाणवतेच.

या पिढीत हरवल्यासारखा वाटणारा अजून एक आवाज म्हणजे मुलांचा कल्ला. एक जमाना होता जेव्हा सुट्ट्या पडल्या की क्रिकेट फूटबॉल अन पतंगबाजी, खोखो कबड्डी अन भोवरापाणी, सकाळी उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत या मैदानी खेळांच्या नावावर वाडीभर नुसता कल्ला कल्ला अन कल्ला कान किटवायचा. आज मात्र मोबाईल विडीओगेम अन ईंटरनेट यांचाच बोलबाला. मुलांचा आवाज चिडीचूप अन या उपकरणांतून बाहेर पडणारे चित्रविचित्र बींप बींप पीब पीब चे आवाज. या आवाजावरून आठवले हल्लीच्या सिनेमांनी ध्वनीमुद्रणात अशी मजल मारली आहे की जुन्या सिनेमातील हाणामारीच्या प्रसंगांमध्ये येणारा ढिशुम ढिशुमचा आवाज आणि ठो करून सुटणारा बंदूकीचा बार देखील इतिहासजमा झालाय. त्या आवाजाने आम्हा बच्चे कंपनीला हिंदी सिनेमाशी एवढे एकरूप करून ठेवले होते की मारामारी म्हटले की आम्ही ढिशुम ढिशूम असेच बोलायचो.

कुल्फीवाल्याचा आवाजही हल्ली मिस करतो हा अंड्या.. कुल्फिय्ये SSS…. करत त्याने दिलेली बांग.. अन मग उगाच आईच्या आसपास घुटमळणे जे तिने माझे मन ओळखून दोन रुपये काढून द्यावेत.. अगदी यासारखीच आणखी एक बांग.. भांडीय्ये SSS…. ही ऐकल्यावर मात्र आजीच्या पदरामागे लपणे.. कारण ही भांडीवाली मस्ती करणार्‍या लहान मुलांना उचलून नेते अशी घातलेली भिती.. कुठे गेले हे सारे आवाज म्हणून शोधायचे म्हटल्यास आधी ते परत हवे आहेत का हा प्रश्न अंड्याला स्वत:च्या मनाला विचारावा लागला. अन याचे उत्तर त्यावाचून काही अडले नाही असेच मिळाले. काही गोष्टी आठवणी सजवायलाच चांगल्या वाटतात. पण एक आवाज मात्र या अंड्याला परत आणायला आवडेल, अन तो म्हणजे त्याचा स्वत:चा आवाज. मोठा होता होता तो देखील कुठेतरी दबला आहे. समाजाने प्रौढांसाठी बनवलेले शिष्टाचार पाळायच्या नादात या अंड्याने शेवटची दिलखुलास आरोळी केव्हा ठोकली होती हे आता तोच विसरला आहे. भारतीय संघ क्रिकेटचा सामना हरताना बघून टीव्ही समोर उभे राहून आपल्याच खेळाडूंना हलक्याश्या आवाजात घातलेली एक कचकचीत शिवी, तोच सामना जिंकल्यावर फटाक्यांनाही लाजवेल असा केलेला जल्लोष, तसाच काहीसा किंवा त्यापेक्षाही भारी असा जल्लोष जो शेजारच्या वाडीतील पतंग गुल केल्यावर व्हायचा, त्याच पतंग उडवायच्या गच्चीतून खालच्या हॉटेलवाल्या सदूशेठला दोन कटींग वरती पाठवायचा दिलेला आवाज, सबंध वाडीतील बत्ती गुल झाल्यावर उत्स्फुर्तपणे होणारा मुलांचा एकच कल्ला ज्यात अंड्याचाही एकेकाळी सिंहगर्जनेचा वाटा होता. हे सारे आवाज एकदा गवसले की मग कानांवर पडणारे इतर नवेजुने आवाज पुन्हा तसेच उपभोगता येतील, अन त्यापैकी कुठलाही हरवलेला आवाज चुटपुट लाऊन जाणार नाही याची अंड्याला खात्री आहे. तुम्हीही बघा तुमच्या आयुष्यातून स्वत:चा असा एखादा आवाज हरवला आहे का, अन असल्यास त्याला परत आणने शक्य आहे का..!

– आनंद उर्फ अंड्या

 

मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले. वाटेत सव्वाचार मिनिटांनी भमरसिंग मिठाई अन फरसाणवाला लागतो, येताना त्याच्याकडे खादाडी करून घरच्यांसाठी पण गरमागरम सामोसे घ्यायचा प्लान होता. मात्र प्लॅन थोडा चेंज करत पोटात किलबिलणार्‍या कावळ्यांना शांत करायला मी आधीच खादाडी करायचा निर्णय घेतला. तसेही कुठे मला डोंगरावर सूर्य नमस्कार मारायचे होते. जी काही भटकंती वा निसर्गाशी प्रणयाराधना करायची होती ती भरल्यापोटी करणे केव्हाही चांगलेच..

काल अवचितपणे पडलेल्या पावसामुळे वातावरण भन्नाटच होते. किंबहुना सकाळी उठल्यावर खिडकीतून पुर्ण मुंबईवर एक नजर फिरवून हे वातावरण बघूनच मी हा मॉर्निंग वॉल्कचा निर्णय घेतला. जेवढे उल्हासित खिडकीतून बाहेर नजर फिरवताना वाटले होते त्यापेक्षा जास्त बाहेर पडल्यावर वाटू लागले. वाटेत विचार आला की च्यायला सकाळी साडेसहा-पावणेसातला भमरसिंगकडे काय खायला मिळणार आहे. मात्र माझा अंदाज साफ चुकलाय हे मी समजून चुकलो जेव्हा तिथे जमलेली गर्दी मला लांबूनच दिसली. एवढ्या सकाळी खाण्याचे प्रकार मात्र मोजकेच होते, पण आवडीचे असेच होते. मी एक गरमागरम सिंगल समोसा आणि एक प्लेट फाफडा-जिलेबी मिक्स घेतली. याआधी कधी हे खाल्ले नव्हते असे नाही पण असे भल्या पहाटे खाण्यातील मजा काही औरच. ईसके उपर चाय तो बनती हि है म्हणून लागलीच भटाच्या टपरीकडे मोर्चा वळवला. हा खाण्यापिण्याचा प्रोग्राम उरकून मी डोंगराच्या मेनगेट पाशी येऊन मोबाईल चेक केला तर सात वाजून बारा मिनिटे झाली होती.

सव्वासात वाजले तरी वातावरण असे होते की सव्वाआठपर्यंत तरी सुर्याची कोवळी किरणे भूतलावर पोहोचणार नव्हती. मी कानातली गाणी चालू करून डोंगर चढायला घेतला. संगीताच्या तालावर श्रम फारसे जाणवत नाही हा स्वानुभव. तसेही डोंगर चढणे म्हणजे काही फार गड सर करणे नव्हते. मुळात जिथून चढायला सुरूवात करतो तो डोंगराचा पायथाच समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर असल्याने पुढे पाचेक मिनिटेच रमतगमत चालायचे असते. टेकडीच्या एका टोकावर असलेल्या देवीच्या मंदिराकडे न जाता मी जोसेफ बापटिस्टा गार्डनच्या दिशेने पावले वळवली. रस्त्यात अध्येमध्ये दिसत होती ती कुठल्या झाडाखाली, कुठल्या बेंचवर, कुठल्या कठड्यावर, तर कुठे पायरीवरच पेपर अंथरून.. अंह, प्रेमी युगुले नाही, तर शाळाकॉलेजातील मुले अभ्यास करत बसली होती. त्यांना पाहून माझे दहावी-बारावीचे दिवस आठवले. अश्या अभ्यासूंसाठी डोंगराच्या एका शांत भागात पण निसर्गाच्याच सानिध्यात सिमेंट कॉंक्रीटचे तंबू टाईप स्टडीकॅंप उभारले आहेत, मात्र त्या ठराविक जागेतच अभ्यास करण्यापेक्षा एवढ्या भल्यामोठ्या डोंगरावर वेगवेगळ्या जागा शोधत अभ्यास करण्यातच आम्हीही धन्यता मानायचो. वाटेतल्या झाडांवर कावळ्यांची कावकाव सुरू झाली होती, मात्र वर गार्डनमध्ये विविध पक्षी आजही गलका करत असतील अशी आशा होती. चला बघूया पुढे ते खरेच मला भेटले का ते..

तर, माझगाव परिसराला पाण्याचा पुरवठा करणार्‍या, डोंगरमाथ्यावर वसलेल्या टाकीच्या तळाशी, उजव्या हाताच्या गेटने मी गार्डनमध्ये प्रवेश केला. नेहमीची संध्याकाळची गर्दी नसल्याने पार दूरवर नजर जात होती. एक गार्डन, त्या पलीकडे दुसरे, त्या पलीकडे तिसरे … प्रत्येकाचा आपलाच एक आकार आणि आपलेच एक वैशिष्ट्य. कमीअधिक प्रमाणात कापले जाणारे गवत तर कुठे त्या गवताच्या रंगाची भिन्नता. प्रत्येक गार्डनची सीमारेषा आखणार्‍या फूलझाडांचेही सतरा प्रकार. प्रत्येकात असलेली बसायची सोय देखील वेगवेगळ्या आकार उकाराची. या सर्वांना सामाऊन घेणार्‍या परीघावरून फिरणारा जॉगिंग ट्रॅक, ज्यावर आपण काय किती धावलो हे कडेने लिहिलेल्या मार्किंग्सवर मोजत काही फिटनेस कॉशिअस स्त्री-पुरुषांचे धावणे सुरू होते. मी मात्र त्यांच्या वेगाला डिस्टर्ब न करता त्याच परीघावरून चालतच एक राऊंड मारून पुर्ण डोंगराला एकदा नजरेखालून घालायचे ठरवले. आरामात रमतगमत चालायचे ठरवले तरी सकाळचा फ्रेश मूड, आजूबाजुला धावणार्‍यांमुळे तयार झालेले उत्साही वातावरण आणि पायात असलेले स्पोर्ट्स शूज यांमुळे माझीही पावले झपाझप पडत होती.

अर्धी फेरी मारून झाल्यावर एक पाणवठा लागला, तिथेच नळाला तोंड लाऊन थंडगार पाणी आत टाकले. थोडे सवयीनेच तोंडावर शिंपडले आणि तोच ओला हात केंसांतून आरपार फिरवला तसे थंडी जाणवून गारठून निघालो. मात्र गालाला सुया टोचल्यासारखे वाटू लागल्याने मूड डबल फ्रेश झाला. पुढे दोन पर्याय होते, एक पुढे त्याच जॉगिंग ट्रॅकवर जावे किंवा चार पायर्‍या उतरून गार्डनच्या खालच्या अंगाला यावे. डोंगराचा एक कडाच तो ज्याला पुर्णपणे सुरक्षिततेचे कुंपण घातले आहे. त्या आत बसण्यासाठी म्हणून तसाच पुर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत कठडा फिरवला आहे. अर्थात मी तिथेच गेलो हे वेगळे सांगायची गरज नाही. तिथून खाली डॉकयार्ड स्टेशन दिसते तर समोर पसरलेला अथांग समुद्र, एक बंदर, जे भाऊचा धक्का म्हणून ओळखले जाते. रेल्वेच्या पुलावर, पर्यायाने उंचावर असणारे डॉकयार्ड स्टेशन देखील तिथून खूप खाली आहे असे भासते. खाली स्टेशनला लागणारी ट्रेन भातुकलीच्या खेळातली वा एखाद्या प्रोजेक्टच्या मॉडेलमधली आहे असे वाटावे. भाऊच्या धक्क्याच्या आसपास कुठलीही गगनचुंबी इमारत नसल्याने समुद्र अगदी काठापासून क्षितिजापर्यंत एकाच नजरेत बघता येतो. बंदराला लागलेल्या बोटी अन डॉकमधील मोठाली यंत्रे आणि क्रेन्स हा समुद्र इतर समुद्रांपेक्षा वेगळा आहे हे दर्शवत होते. जवळपास पाऊण एक तास मी तिथेच गाणी ऐकत बसून होतो, हळूहळू दक्षिण मुंबई शहराला जागे होताना बघत.

कोलाहल वाढू लागला, पक्ष्यांच्या किलबिलीची जागा फलाटावरच्या वाढत्या गर्दीचा गोंधळ घेऊ लागला, तसे मी उठायचे ठरवले. दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे अजूनही सुर्याची किरणे माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती. पण जसे पुन्हा मोकळ्या बगीच्यांमध्ये आलो तसे कोवळे उन जाणवू लागले. तो उबदारपणा हवाहवासा वाटू लागला. म्हणून आता तो उपभोगायसाठी डोंगरावरचा मुक्काम आणखी थोडा वाढवायचे ठरवले. एक बाकडा पकडून, अंह, त्यावर बसलो नाही तर त्याच्या कडेला माझे शूज काढून ठेवले आणि माझ्या आवडत्या प्रकारासाठी सज्ज झालो. दव पडलेल्या गवतावरून अनवाणी पायांनी चालणे. खाली तळपावलांना जाणवणारा थंडगार ओलावा, सोबत गुदगुल्या करत टोचणारी गवताची पाती आणि वर अंगाखांद्यावर खेळणारी सोनेरी किरणे. अंगावरची सारी वस्त्रे भिरकाऊन तिथेच लोळत पडावे असा मोह पाडणारा अनुभव घेत मी पुढची पंधरा-वीस मिनिटे फेर्‍या घालत होतो. या प्रकाराची संध्याकाळीही आपलीच एक मजा असते, खास करून डोंगराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कारंज्याच्या जवळचे एखादे गार्डन पकडावे, ते ही वार्‍याची दिशा अशी बघावी की कारंज्याचे तुषार त्या सुसाट वार्‍याबरोबर उडत येऊन आपल्याला पार न्हाऊन टाकतील. आयुष्यातल्या सार्‍या चिंता या प्रकारात विसरायला होतात. माझे अभ्यासाचे टेंशन तरी वेळोवेळी विसरायला मी हाच फंडा वापरायचो.

असो, तर त्याचवेळी घड्याळात वेळ चेक करून आता माहेरी गेलेली बायको उठली असेल या हिशोबाने तिला फोन लाऊन त्या गवतावर चालता चालताच तिच्याशीही दहा-पंधरा मिनिटे बोलून घेतले. आज आपला नवरा चक्क स्वताहून फोन करून चक्क दहा ते पंधरा मिनिटे बोलतोय आणि ते ही चक्क हळूवार आणि रोमॅंटीक.. एकंदरीत चक्क्राऊनच गेली ती बिच्चारी.

बस मग पुढे काय परतीचा रस्ता. उतरणीचा असल्याने तरंगतच उतरलो. तसेही दमण्यासारखे श्रमदान झाले नव्हतेच, किंबहुना दिवसभर, अंह आठवडाभर पुरणारा उत्साह घेऊन परतत होतो. वाटेत घरच्यांसाठी सामोसे पार्सल घ्यायला विसरलो नाही, आणि एकदाची स्वारी नऊच्या सुमारास घरी परतली !

——————————

सदर अनुभव आमच्या माझगावच्या डोंगराची जाहीरात करण्यासाठी लिहिला आहे. तर कधी आलात त्या भागात जरूर भेट द्याल. अन मलाही आवाज द्यायला विसरू नका. मी तिथून हाकेच्या अंतरावर राहत असलो तरी हाक न मारता फोन वा मेसेज करू शकता 🙂

– तुमचा अभिषेक