RSS

Category Archives: विनोदी लिखाण

ऐश्वर्या राय @ मोहोब्बते – मलाही कोणाशी तरी बोलायचेय..

हेल्लो माबोकर्स.. मी राजची हेलोवीन .. ऊप्स, शॉली शॉली, राजची हिलोईन..

नाही हं, तो बडे बडे देशो मे छोटी छोटी बाते होती रेहती है शेनोलिटा, वाला राज नाही काही.. अहो तो नाही का, जो चष्मा घालून खुर्चीवर बसून गिटार वाजवतो. तो हो, जो येडा बनून तमिताभने दिलेला प्रसादाचा पेढा खात नाही.. हा तोच तो, राज आल्यन मल्होत्रा.. नाम तो सुना ही होगा ! बेंबेंबे हेहेहे खीखीखी.. तोच तो !

काय बोलता, कोण तमिताभ ?? शॉली शॉली, माय मिस्टेक अगेन. ते मी कधी कधी थोडे बोबले बोलते ना. त्याचे झाले काय, सुसाईडच्या चक्करमध्ये दोन माळ्याच्या बिल्डींगवरून उडी घेतली खरी, पण पुढचे चार दात तोडून घेतले, तोंडाचा बोळका झाला, और फिर मै कभी किसी को मुंह दिखाने के काबिल नही रही. म्हणून मग पांढरी साडी नेसली आणि भूत बनून अद्रुष्य झाले. आता दुधाचे दात बनवायला टाकलेयत, ते मिळेपर्यंत पुढचा जन्म काही घेऊ शकत नाही. बाईचा जन्म कठीणच बाई..

हं तर मी काय सांगत होते, तमिताभ म्हणजे अमिताभ हो, माझा सासरा.. उप्स शॉली शॉली, पुन्हा गडबडले. पिक्चरमधलेच बोलायचेय ना.. तर माझा नाही हो त्या राजचा, होऊ घातलेला पण होऊ न शकलेला सासरा. अहो तो नाही का, पहाटे साडेपाच वाजता, अर्ली ईन द मॉर्निंग, स्वताही उठतो, सुर्यालाही उठवतो, आणि त्याला घूर घूर के बघून, शायनिंग मारतो. नाही ओळखले अजून .. चला तीन हिंट देते.., एक) परंपरा दोन) प्रतिष्ठा तीन) अनु… हो हो, शासन शासन, तोच तोच, श्री नारायण शंकर… महादेवन.. पुरा नाम .. हाईंग !

पटली ओळख ! आता माझे नाव सांगा?? नाही आठवत, चला मीच सांगते. माझे नाव मेघा ……… हो, बस्स एवढेच ! या दोन सुप्पर्रस्टारच्या जुगलबंदीमध्ये मला फूटेज पण कमी आणि माझे नाव पण कमीच. त्यात एक माझे वडील.. तेच ते, परंपरा प्रतिष्ठा, बोल दिया ना, बस्स बोल दिया .. स्वता आयुष्यभर निरुपा रॉयच्या पोटी जन्म घेतला, पण आता स्वताच्या पोटी ऐश्वर्या राय जन्माला आलीय तर तिचे एकतरी प्रेमप्रकरण असणार हे समजायला हवे ना. पण नाही, आमच्या डॅडी कूलना गुरू कुलची प्रतिष्ठा जास्त महत्वाची. अरे डॅडू पण मग निदान बॉईज स्कूल तरी उघडायचे नव्हते ना. आता लोण्याजवळ विस्तव पेटवला तर एक तरी शोला भडकणारच ना.. एक तरी निखारा तडतडणारच ना.. तो नेमका क्कककक्कक् ‘कोयला’ कडकडला !

अच्छा मुलांची शाळा उघडली तर उघडली, पण मग त्यात त्या राहुलराजला कशाला अ‍ॅडमिशन दिलेत. आधीच त्याला जोशमध्ये माझ्याशी रक्षांबधन करावे लागले होते आणि देवदासमध्ये पारोच्या जागी दारोला कवटाळावे लागले होते, तर यात तो हमखास चान्स मारणारच होता… त्याने तो मारला आणि फुकट मी मेले!

पण माझा प्रॉब्लेम इथेच संपत नाही. मी मेले, संपले, भूत बनून अदृष्य झाले, पण तो राज काही भूतयोनीतही मला सुखाने मरू देत नाहीये. त्याला माझा पासवर्ड माहीत आहे ना, त्यामुळे बघावे तेव्हा पुंगी वाजवून नागाला बोलावतात तसे अधूनमधून खुर्चीवर बसून वाजवायची गिटार बडवतो आणि मला बोलावत राहतो. गायचा मूड त्याला होतो आणि नाचायला मला बोलावतो. ईडियट बोलावतो सुद्धा अचानकमध्ये. अरे मला मेकअप शेकअप करायला तरी वेळ दे. आफ्टर ऑल मी जगातली सर्वात सुंदर भूत आहे यार !

बरे याला मी लांबूनच दर्शन दिलेले ही चालत नाही, याचा चष्मा पण जवळचाच ना. म्हणून मग याच्या जवळ येऊन याला फेरी मारून जा. काय तर म्हणे मोहोब्बते, आता त्या येड्याला समजलेय ना की भूतं खरोखरची असतात ते, तर मग माझ्यावर खरे प्रेम असेल तर मर ना बाबा एकदाचा तू सुद्धा आणि भेट मला कायमचा, कश्याला उगाच त्या रिकी टिकी मिकिच्या लव्हस्टोरीमध्ये दुनियादारी करत बसलायंस..

बरं त्या पोरांना इन्स्पिरेशनच द्यायचे होते तर लैला-मजनू, हीर-रांझा किंवा गेला बाजार वीर-झाराचीच लव्हस्टोरी सांगितली असतीस. पण नाही, आपलीच प्रेमकहाणी सांगायची होती. बरे सांगितलीस ती सांगितलीस, पण मला साधा सुईत धागा ओवता येत नाही हे सुद्धा सांगायची काही गरज ??? … पण नाही !

हुश्श, मला वाटलेले पिक्चरच्या शेवटी तरी त्यांचे मिशन मोहोब्बते सक्सेसफुल झाल्यावर माझी यातून सुटका होईल. पण नाही, वेड्याने मला बोलवायचा पासवर्ड माझ्या बापाला पण देऊन ठेवला, आणि लावली माझी डबल ड्यूटी !

कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है, या दोन सुप्पर्रस्टारच्या लफड्यात या गरीब बिचार्‍या पारोचाच पार देवदास झालाय. भूतयोनीत रात्री कंपलसरी जागावेच लागते आणि पहाटे साडेपाचला हे हजर.. वरना अब से पहले, पीपल पे लटक रही थी मै कही …

चला येते मी, माझे सातशे शब्द संपत आलेत. ईथे कोणी मनसोक्त त्रागा ही करू देत नाही यार. त्याला पण शब्दमर्यादा. एनीवेज, तसेही राज डार्लिंगचे तुणतुणे आणि शंकर पप्पांचे सुर्यनमस्कार कानावर पडू लागलेत, तर निघावे लागेलच.

पण थॅंक्स हं, तुमच्याशी बोलून हलके झाले बाई. जर कोणी माझी हल्लीची साईज पाहिली असेल तर समजले असेलच, या रायचा कसा पर्वत झालाय आणि हलके होण्याची मला किती गरज होती ते 😉

….. तुमचीच
बरसो रे मेघा मेघा ..

…………………………………………

– तुमचा अभिषेक

 

चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !

आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्‍या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे… का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही…

तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,.. चला राहूद्या थेट प्रसंगावरच नेतो

**********************************************************
**********************************************************

वालचंद कॉलेज ऑफ ईंजिनीअरींग, सांगली !

वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली.
पुर्ण कॉलजभरात हं.
त्यातही आम्हा मुंबईकरांना आपल्या स्टाईलच्या वाटतील अश्या शोधायला गेले की त्यातल्याही निम्म्या गळाल्या.
‘बेगर्स डोण्ट हॅव चॉईस’ असे म्हटले तरी आम्ही ‘लोफर्स हॅव चॉईस’ कॅटेगरीतले होतो.
असो, तर त्यात ज्या होत्या त्यांची मग खूप चलती असायची. खास करून वॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, चॉकलेट डे, रोज डे, अश्या स्पेशल दिवशी गुलाब असो वा चॉकलेट, त्यांचा पदर फाटेस्तोवर भरून जायचा.
म्हणून मी त्या गर्दीतला एक होणे टाळायचोच.
निदान तसा आव तरी आणायचो.
तरीही एकदा एका मुलीला चॉकलेट देण्याचा योग आला. तिचाच हा चार ओळींचा किस्सा.

तर मी इतर मुलींसारखे या मुलीकडेही बघायचो, गंमत म्हणजे तिला सुद्धा माझे बघणे आवडायचे.
तर अश्याच एका चॉकलेट डे च्या दिवशी अचानक सामोरी आली.

संध्याकाळची वेळ, कॉलेजचाच एक पॅसेज, मी एकटाच कुठेतरी जात होतो तर ती देखील दिवसभराची धमालमस्ती आटोपून एकटीच कुठूनतरी येत होती.
माझी नजर नेहमीसारखी तिच्या चेहर्‍यावर खिळली अन तिची नजर नेहमीसारखीच माझ्या नजरेत अडकली.
जसे त्या चिंचोळ्या पॅसेजमधून जाताना आम्ही एकमेकांच्या जवळ आणि अगदी सामोरे आलो तेव्हा तिला हॅपी चॉकलेट डे म्हणून विश करणे मला भागच होते.
नव्हे तसे मी करावे अशी इच्छा तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहता समजून येत होती.
पोकळ विश कसे करायचे म्हणून मी खिसे चाचपले तर एक छोटेसे इकलेअर चॉकलेट निघाले.
सकाळी रूममेटने फ्रेंडशिप डे विश करत दिलेले एक’च एक रुपयाचे एक्लेअर. अर्थात यारदोस्तांमध्ये हेच बजेट असते. डेरीमिल्क आणि फाईव्हस्टार कॅडबर्‍यांचे बजेट केवळ मुलींसाठीच राखून ठेवलेले असते. पण देण्यामागची भावना महत्वाची नाही का, आणि आता तेच ईक्लेअर वेळेला केळं म्हणत कामाला येत होते.
ते तिच्या समोर धरून हॅपी चॉकलेट डे विश केले.
तसे हसली, आणि म्हणाली, “कसे घेऊ? हात तर फुल पॅक आहेत.”
अरेच्च्चा खरेच की, आता कुठे माझी नजर तिच्या हातांवर गेली. दोन्ही हातांची ओंजळ करून उभी होती आणि ती ओंजळ फुल्ल ऑफ चॉकलेट्स होती.
अर्थात त्या ढिगार्‍यावर माझे छोटेसे इक्लेअर बॅलेंस करत ठेवणे काही अवघड नव्हते, पण माझेही या बाबतीतले प्रसंगावधान आणि हुशारी बघा,
मी उत्तरलो, “तू फक्त आ कर, मी टाकतो तोंडात”

गंमत केली हं…. असे मी पुढे बोलणार इ त क्या त तिने ऑं वा स ला सुद्धा..
मी थरथरतच एक्लेअर कसे बसे सोडले आणि टाकले तिच्या तोंडात. तिच्या ओठांना माझ्या बोटांचा स्पर्श होऊ नये ईतपत काळजी घेत बास्केटबॉल सारखेच टाकले, ते थेट तिच्या घशात जाऊन ठसका लागला नाही हेच माझे नशीब !

बस्स मग काय, ती आपल्या रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला. जाताना पलटून मात्र चुकूनही पाहिले नाही. हि आपली स्टाईलच म्हणा ना. अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी.
असो, तर या चॉकलेट डे चा हा किस्सा इथेच संपला………………………
नाही !
इथेच संपायचा असता तर नक्कीच हा लिखाण प्रपंच नसता.

**********************************************************
**********************************************************

दुसर्‍या दिवशी होता रोज’ डे. आता रोज रोज काय नशीब उघडत नाही म्हणतात, तरीही चुकूनमाकून उघडलेच तर कालच्यासारखे पुन्हा खिसे चाचपडून फूल न फुलाची पाकळी शोधावी लागू नये म्हणून मी सकाळीच मालकांच्या बागेतली गुलाबाची कळी खुडून घेतली. कोणाला द्यावे लागेल की नाही याची खात्री नसताना फुललेल्या टवटवीत गुलाबाला ५ रुपये खर्च करण्याऐवजी हे फुकटात पदरी पाडून घेतलेले सोयीचे समजले.
तशीच वेळ आली तर, “सखे, नुकत्याच उमलणार्‍या गुलाबाच्या कळीप्रमाणे आपल्यातील मैत्रीचे नातेही असेच उमलू दे” हि पंचलाईन सोबतीला तयार होतीच. समोरची पार्टी आपल्या फेवरमध्ये असेल तर कितीही पाणचट विनोद का असेना त्यावर हसले जाते वा कितीही दवणीय चारोळी का असेना हाऊ रोमॅंटीक म्हटले जाते हा अनुभव.. स्वत: अनुभवलेला नाही तर इतरांचा पाहिलेला.

दुपारपर्यंत तरी ते कळीचे फूल कोणाला द्यायचा योग आला नाही. हा योग संध्याकाळपर्यंत आला नाही तरी काही बिघडत नाही अशी एक पराभूत मानसिकता वयात आल्यापासूनच अंगी बाणवली होती. दुपारी त्या फूलावरच्या दोनचार सुकलेल्या पाकळ्यांचे आवरण बाजूला सारून आतला टवटवीतपणा शाबूत आहे याची खात्री तेवढी करून घेतली.
कालची माझी चॉकलेट क्वीन आज कुठे दिसली नव्हती. खरे तर हुरहुर याचीच होती की ‘ती’ माझे फूल स्विकारेल का. किंबहुना ते तिला देण्यायोग्य स्थिती वा संधी मला आजच्या दिवसभरात उपलब्ध होईल का आणि झालीच तरी मला ते धाडस जमेल का?

कालचा किस्सा अजून रूममेटला किंवा ईतर कोणा मित्रांना सांगितला नव्हता. मुद्दामहूनच लपवला होता. कारण काही अतिउत्साही मित्र अंड्यातून जीव उमलायच्या आधीच त्याचे पार आमलेट करून टाकतात, म्हणून हि खबरदारी. आज तिने माझे फूल चारचौघांसमोर स्विकारलेच तर मात्र काही लपून राहणार नव्हते ना लपवण्याची गरज असणार होती.

अखेर ती वेळ आली.
विद्यार्थ्यांमध्ये लाडके आणि लोकप्रिय बनायला सारेच शिक्षक अश्या खास दिवशी लवकर सोडतात. खास करून दुपारच्या सत्रात कोणी फारसे ताणून धरत नाही. ज्यांच्यात काहीतरी घडवायची धमक असते अश्या निवडक प्रेमवीरांचे सकाळीच काय ते घडून झालेले असते. पण मुंबई असो वा सांगली, जिथे तिथे आमच्यासारख्या ताटकळलेल्यांचेच प्रमाण जास्त असल्याने दिवसअखेरीस सुद्धा बर्‍याच घडामोडी घडणे बाकी असतात. एकाचे बघून दुसर्‍याची हिंमत वाढते आणि दुसर्‍याचे बघून तिसर्‍याची. या साखळीत आपणही कुठे फिट होतो का हे सारेच चेक करत असतात. मी देखील आपले नशीब आजमवायला म्हणून कॉलेजच्या प्रांगणात जमलेल्या घोळक्याचा एक भाग झालो.

जिथे मी उभा होतो तिथून ती मला दिसत होती, पण जिथे मी उभा होतो तिथून मी तिलाच काय कोणालाही दिसलो नसतो. पण सुरुवातीला हेच योग्य होते. लांबूनच तिचे निरीक्षण चालू होते. मूड तिचा हसरा खेळकर होता. ते पाहून माझा आत्मविश्वास वाढत होता. जणू काही माझ्याच विचारांत हसत होती. हळूहळू दिवस मावळू लागला, उन्हे उतरू लागली, गर्दी पांगू लागली. आता मला लपायला फारशी जागा नव्हती, तशी त्याची गरजही नव्हती. दोनचार मित्रांचे टोळके सोबतीला घेऊन मी तिच्या नजरेस पडेल अश्या जागी येऊन स्थिरावलो. काल तिचे हात चॉकलेटने भरले होते पण आज मात्र तिच्या हातात एकही फूल नव्हते. अर्थात हे चांगलेच होते. अन्यथा आजही ती मला “तुझे फूल कसे स्विकारू राजा, माळ की तूच आपल्या हाताने माझ्या केसांत” असे खचितच बोलणार नव्हती. उलट अजूनपर्यंत तिने कोणाचे फूल स्विकारले नाही याचा अर्थ नक्कीच मला वाव होता. अन ईतक्यात तिची नजर माझ्यावर पडली…

मी तिला पाहिल्यानंतर तब्बल पाऊणएक तासाने ती मला बघत होती, आमची नजरानजर होत होती, अन होताच काय ते ओळखीचे भाव. पहिल्यापेक्षाही दाट आणि गहिरे. माझ्याकडे पाहतच तिने आपल्या मैत्रीणीला खुणवले आणि दोघी जणी माझ्या दिशेने चाल करून येऊ लागल्या. माझी नजर पहिल्यापासूनच तिथे खिळलेली असल्याने माझ्या मित्रांच्याही ते लक्षात आले होते. आणि आता तिचे असे स्वताहूनच माझ्या दिशेने चालत येणे. फूल नक्की मी तिला देणार होतो की तिच्या मनातच मला द्यायचा विचार होता. छे, काहीतरीच काय, कसे शक्य होते. हे असे काही अदभूत घडणे शक्य मानले तरी तिचे हात तर रिकामेच होते. ना तिच्या मैत्रीणीच्या हातात काही होते. सर्व शक्यतांचा विचार करेपर्यंत ती माझ्या समोर येऊन उभी राहिली सुद्धा आणि माझ्या आ वासलेल्या तोंडानेच मी कसेनुसे हसलो. बस्स क्षणभरापुरतेच. कारण दुसर्‍याच क्षणी माझ्या काहीही ध्यानीमनी नसताना एक खाडकन मुस्काटात पडली. हो, तेच कोमल हात ज्यात मी काही काळापूर्वी फूल टेकवायचा विचार करत होतो, ते माझ्या गालफडावर अस्ताव्यस्त पसरले. नाही म्हणायला प्रतिक्षिप्त क्रियेनुसार मी चेहरा थोडा मागे सरकावला, पण परीणामी ती चापट डाव्या डोळ्याच्या कडेला चाटून गेल्याने त्यातून नकळत पाण्याची धार लागली. काही दिर्घ श्वास घेत मी नाकाडोळ्यातून येणारे पाणी थांबवायचा निष्फळ प्रयत्न करू लागलो कारण हाताने पुसायचा पर्याय खचितच नव्हता. तिच्यावर रागवावे, चिडावे, शांत शब्दात तिला याचे कारण विचारावे वा उलटून तिच्याही एक ठेऊन द्यावी. या पैकी काहीही ठरवायच्या आधीच ती माझ्या हातात कसलासा बोळा कोंबून आल्यापावली नाहीशीही झाली.

पुढचा किती तरी वेळ मी त्या हातातल्या चॉकलेट कव्हर कडे बघत होतो. बहुधा मी काल तिला दिलेल्या इक्लेअरचेच असावे. ते तिने असे परतवून जावे. नक्की काय तिला आवडले नव्हते. माझे तिला चॉकलेट भरवणे. तिनेच तर ‘ऑ’ केले होते. कि ती निव्वळ जांभई होती, जी योगायोगाने त्याच वेळी आली होती आणि मी त्याचा चुकीचा अर्थ काढला होता. जेवढी शोभा झाली तेवढी पुरेशी होती. ना मी तिला याबाबत काही विचारायला गेलो, ना ती मला कधी सांगायला आली. पुढे सेमीस्टर गेले, वर्ष सरले, पण त्या थप्पड की गूंज कायम मनात घर करून राहिली. त्यापेक्षाही त्यामागचे कधीच न उलगडलेले कारण.

या प्रकरणानंतर मला त्या वर्षभराच्या वालचंदमधील वास्तव्यात कधीच कुठल्याच मुलीने चारा टाकला नाही. ना कोणत्या मुलीने मी टाकलेले दाणे टिपले. त्याच्या पुढच्याच वर्षाला आम्हा मुंबईकरांना ट्रान्सफर मिळून सारे मुंबईच्या वीजेटीआय आणि सरदार पटेलला परतलो आणि हा वालचंद अध्याय तिथेच संपला. जे एका अर्थी बरेच झाले.

परंतु,
पिक्चर अभीभी खतम नही हुआ मेरे दोस्त ….

**********************************************************
**********************************************************

दोनेक वर्षांत कॉलेज संपले. नोकरीला लागलो. सेटल झालो. नवीन गर्लफ्रेंड मिळाली. मला नव्हे तर प्रत्येकालाच. काही मित्रांची लग्नही झाली. तर कोणाची ठरली. अश्याच एका मित्राचे लग्न ठरल्याची पार्टी करायला म्हणून मग आम्ही बसलो होतो. ईथेही बारचे नाव मुलीच्या नावाप्रमाणेच गुप्त राखतो. लग्नाची पार्टी म्हणून साहजिकच लग्नाचे विषय, पोरींचे विषय, आजवर केलेल्या भानगडींचे विषय. कॉलेजच्या आठवणी उगाळल्या जात होत्या आणि त्या आठवणींचा काटा सरकत सरकत पुन्हा एकदा माझ्या थपडेवर स्थिरावला. मी सोडून सारेच फुटेस्तोवर हसायला लागले. त्या हसण्याहसण्यातच माझ्या तेव्हाच्या रूमपार्टनरला चढलेली दारू बोलायला लागली….

आठवतेय ते चॉकलेट … जे मी तिला दिलेले … जे सकाळी माझ्या रूमपार्टनर ने फ्रेंडशिप डे विश करत माझ्या हातात ठेवले होते … जे मी तेव्हा न खाता खिशात कोंबले होते .. आणि तेच ते चॉकलेट पुढचा मागचा कसलाही विचार न करता तिच्या तोंडात टाकले होते……………………. ते नकली होते !
इक्लेअरच्या वेष्टणात गुंडाळलेले, बाहेरून चॉकलेटसारखेच दिसणारे, आतून चवीला मात्र अत्यंत कडवट आणि तोंडात घेताच थुंकून टाकण्याच्या लायकीचे होते. त्याची चव काय असावी याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचा परिणाम मी पुरेपूर भोगला होता.

खाडकन मुस्काटात मारायची पाळी आता माझी होती. तेव्हा माझ्या हातातले गुलाब हलले होते आज मी त्याच्या म्हणजे माझ्या मित्राच्या हातातील नारंगी हलवली होती. काही प्रमाणात उतरवलीही होती.
कित्येक वर्षानी त्या घटनेचा बदला म्हणून मित्राला मारलेली एक पुरेशी सणसणीत चपराक नशेत असल्याने त्याला फारशी जाणवलीही नसावी, पण मला मात्र त्यातून कसलेसे समाधान मिळाले होते. ‘उस’ थप्पड की गूंज आता केवळ माझ्या एकट्याच्याच कानात वाजणार नव्हती. त्यात मी मित्रालाही त्याचा वाटा व्यवस्थित पोहोचवला होता.
पण तरीही ते समाधान अपुर्णच होते………

आज दोनचार संकेतस्थळांवर मी लिहितो. चारचौदा लेख झालेत माझे. तीसचाळीस लोक ते वाचतात. आणखी शेदोनशे लोकांपर्यत ते लिखाण पोहोचवतात. असेच हा लेखही कधीतरी इच्छित स्थळी पोहोचेल, बस्स याच आशेवर हा लिखाण प्रपंच.
कुठेतरी, कुणालातरी, अरेरे… असे जेव्हा आतून, अगदी मनापासून वाटेल, तेव्हाच मिळेल मला माझे पुर्ण समाधान ..!

– तुमचा अभिषेक

 

बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्‍याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते. म्हणजे ते स्वप्नातले दुरून आल्यासारखे वाटणारे सारे कर्णकर्कश्श स्वर अगदी सामोरूनच येत होते तर. अचानक मला बाईकवर फिरताना वा रस्त्याने चालतानाही कानात हेडफोन लावणारी आजची युवा पिढी गुणी बाळ वाटू लागली. आधीच या अंड्याला ईंग्रजी संगीतातला ओ कि ठो कळत नाही, आणि इथे तर ठो ठो करत वाजवली जाणारी वाद्ये कानठळ्या बसवत होती. रेहमानसाहेबांच्या अपवादात्मकच अश्या न आवडलेल्या ‘रॉकस्टार’ या रणबीरपटाची आठवण झाली. त्या संगीतातले शब्द तरी किमान ओळखीचे असल्याने त्यातच काही तरल भावना शोधायचा प्रयत्न केला होता पण इथे मात्र ते ही शक्य नव्हते.

काय करावे, काय करावे, या फर्स्टक्लासमधल्या माणसांना पटकन हटकताही येत नाही. सेकंडक्लासच्या डब्यात परप्रांतीयांचे ‘तुम तो ठहरे परदेशी’ ऐकण्यापासून वाचावे म्हणून फर्स्टक्लासच्या तिकिटावर खर्चा करावा तर इथेही परदेशी संगीत पिच्छा सोडत नाही. संगीत असावे तर आपल्या भाषेतले, आपल्या मातीतले.. ओढ लावतीss अशी जीवाला, गावाकडची माती.. साद घालतीss पुन्हा नव्याने, ती रक्तांची नाती.. मल्हारवारी आठवले तसे मी देखील स्वताचा मोबाईल काढून ते गाणे शोधायला घेतले. पण चाळताना लक्षात आले की ते घरच्या कॉम्प्युटरवरच पडून आहे. मोबाईलमध्ये कधी असे ऐकायला घेतलेच नाही. पण चाळता चाळता आणखी एका मराठी गाण्यावर नजर पडली आणि कामावर जाईलाss, उशीर व्हाईलाss, बघतोय रिक्षावाला ग्ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला.. स्सॉल्लिड, हे पण आपले एक फेवरीट ! कानावर पडले की बस उठून नाचावेसे वाटावं. पण आता सकाळच्या टाईमाला हे ऐकावे की न ऐकावे याचा विचार करता करताच एक क्लृप्ती सुचली अन चेहराच खुलला. आता काट्याने काटा निघणार होता. लावलेच ते गाणे फुल्ल वोल्युम करून. पाठोपाठ कोंबडी पळाली तयार होतेच, पण त्याची वेळ आलीच नाही. तिथवर पोहोचायच्या आधीच समोरून येणारे आवाज लोप पावले. तसे मी बॅगेतला हेडफोन काढून कानाला लावला आणि आतल्या आत गपचूप गाणे बंद करून शांत झोपी गेलो.

– o0Oअंड्या

 

७२ मिनिटांचा हिशोब – पुरुष जन’हित मे जारी.

रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी “दैनिक फेकानंद” मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते. मी त्या वर्तमानपत्रातील तेवढे कात्रण नेमके कापून उरलेल्याची व्यवस्थित सुरंगळी करून रद्दीच्या पिशवीत भिरकावून दिेली आणि विचारमग्न अवस्थेतच अंत:पुराकडे प्रस्थान केले. कुठेतरी खोलवर आतवर अंतकरणात दडलेला पुरुषी अहंकार दुखावला गेला होता.

तर मित्रांनो काय होती ती बातमी जी आपल्या पुरुषांच्या प्रधानगिरीला आव्हान देणार होती हे ऐकायची तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागून राहिली असणार.

तर ऐका,

आपले वाचा,

” भारतीय महिला ७२ मिनिटे जास्त काम करतात. ”

बसला ना झटका…!!
असेच आणखी दोनचार झेलायची तयारी करून खाली सविस्तर वाचा.

———————————————————————————————
आधुनिक भारताच्या अत्यानुधिक महिलांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारे वृत्त –
वृत्तसंस्था, झुमरीतलैया

भारतीय महिला दिवसभरात भारतीय पुरुषांच्या तुलनेत सरासरी ७२ मिनिटे अधिक कार्यालयीन काम उपसत असल्याचे एका गुप्त सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात प्रत्येक शहरात हीच बाब कमी-अधिक फरकाने अधोरेखित झाली आहे. “नारी शक्ती तिथे युक्ती अन पुरुषांपासून मुक्ती” हे ब्रीदवाक्य असलेल्या “सखी तू होऊ नकोस दुखी” या संघटनेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात भारतभर महिला मनुष्यबळाचे प्रमाण क्षणोक्षणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

(बातमी इथेच थांबली असती तर काही प्रश्न नव्हता, पण तिच्या उत्तरार्धात पत्रकारसखीने खास बायकांच्याच शैलीत मारलेला तिरकस टोमणा मात्र संभाव्य धोक्याची चाहूल देणारा होता… तर ऐका… आपले वाचा…)

कामाच्या बाबतीत भारतीय पुरुष भारतीय महिलांपेक्षा पिछाडीवर असले, तरी भारतीय पुरुषांनी वेतनाच्या बाबतीत ही कसर भरून काढली आहे. निर्धारित वेळ काम करूनही पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांच्या तुलनेत १७ टक्के अधिक वेतन मिळत असल्याचे देखील या सर्वेक्षणात सामोरे आले आहे.
———————————————————————————————

वाक्यावाक्याला भारतीय पुरुष असा उल्लेख वाचून आजवर स्वत:ला जेवढा “भारतीय” असल्याचा अभिमान वाटत होता तेवढीच आता “भारतीय पुरुष” असल्याची लाज वाटू लागली होती. काही नाही, मी ठरवले, या बातमीला उत्तर द्यायचेच. खून का बदला खून, आंख का बदला आंख, तसेच सर्वेक्षण का बदला सर्वेक्षण…. मात्र मला एकट्याला सर्वेक्षण करणे शक्य नसल्याने मी केवळ निरीक्षण करून एक अहवाल बनवायचे ठरवले अन लागलीच कामाला लागलो. महिन्याभरात स्वताच्याच ऑफिसमधील महिला कर्मचार्‍यांच्या निरीक्षणावरून भारतीय बायकांचे ऑफिसकाम प्रत्यक्षात कसे चालते यावर मी एक दसकलमी अहवाल बनवला. बस तोच पुरुष जनहित मे जारी तुमच्या समोर सादर करत आहे.

७२ मिनिटांचा हिशोब – पुरुष जन’हित मे जारी.

१) सकाळी कार्यालयात शिरल्या शिरल्या या कामाच्या जागेवर न जाता सरळ प्रसाधनगृहाकडे कूच करतात आणि मेकअप शेकअप करत बसतात. कारण घरून आंघोळ अन नीटनेटकी तयारी करून निघाल्या असल्या तरी प्रवासामुळे (भले तो दहा मिनिटांचा अन वातानुकुलीत बसने का असेना) विस्कटलेले केस, ड्रेस, मेकअप वगैरे ठिकठाक करूनच यांना ऑफिसमधील आपल्या इतर सहकार्‍यांना दर्शन द्यायचे असते.

२) जागेवर आल्यानंतरही कॉम्प्युटरची कळ न दाबता या आधी इतर महिला सहकार्‍यांवर एक नजर मारतात. आज कोणी काय नवीन विशेष घातले आहे का याचा आढावा घेतला जातो. असल्यास खोट्या खोट्या स्तुतीसुमनांचा मारा होतो. कारण पुढच्यावेळी आपण जेव्हा काहीतरी नवीन घालून येऊ तेव्हा आपलीही अशीच दखल सर्वांनी घ्यावी हा सुप्त हेतू.. गिव एंड टेक.. तू मला लाईक कर मी तुला लाईक करते..!

३) तासाभराने चहा येतो. तेव्हा बरेच पुरुष मुकाट्याने चहा पिऊन लगेच कामाला सुरुवात करतात तर काही जण सिगारेटचा झुरका मारायला बाहेर पॅंट्रीमध्ये जातात, मात्र सिगारेट-चहा संपताच परत येतात. बायकांच्या गटात मात्र चहा आल्या की खुर्च्याच एकमेकींच्या दिशेने वळतात, डब्यातून चिवडा-फरसाण अन क्रीमची बिस्किटे काढली जातात. एकमेकींशी देवाणघेवाण केली जाते. आणि सावकाश गप्पा मारत ज्याला गॉसिपिंग असेही बोलतात त्याच्या जोडीने हा टी-टाईम साजरा केला जातो.

४) त्यानंतर होते दुपारी जेवायची वेळ. ही वेळही काटेकोरपणे पाळली जाते. कारण कितीही अर्जंट काम असले तरी या फारवेळ उपाशी राहू शकत नाहीत. जेवणही यांचे सावकाश असते. डब्यात रोजच्याच भाज्या असतात तरीही त्याची पाककृती उगाचच्या उगाच जेवणाबरोबर चघळली जाते. तसेच जेवण झाल्यावर देखील या तश्याच गप्पा मारत बसून राहतात, लगेच उठत नाहीत. इतर सारे उठले की उलट यांच्या गप्पा जास्त रंगात येतात आणि चुगलीचा कार्यक्रम जोर शोर से चालतो. जाऊ, भावजय, नणंद हे दुर्मिळ शब्द फक्त इथेच ऐकू येतात.

५) पुरुष बापुडे जेवतात आणि डबा तसाच बॅगेत भरून घरी आणतात. या मात्र तिथेच ऑफिसच्या पाणवठ्यावर डबा घासून, पुसून, सुकवून, लखलखीत करूनच बॅगेत भरतात. डबेही यांचे काही कमी नसतात. खाणार जेमतेम दिड चपात्या मात्र लोणचे, पापड, सॅलाड, भाजी, चपाती असे सतरा डबे असतात. धुणीभांडी स्वताच करायची असल्याने वेळप्रसंगी ताट वाटी चमच्याचेही लाड चालतात.

६) जेऊन जागेवर आल्यावर यांचा फोनचा कार्यक्रम सुरू होतो. सर्वप्रथम नवर्‍याला फोन लागतो ते जेवण कसे झाले होते हे विचारायला. पण अर्थातच, तो एक पुरुष असल्याने आणि त्याच्या ऑफिसला असल्याने बरेवाईट काय ते खरेखोटे न सांगता एका शब्दात चांगलेच होते बोलून फोन ठेऊन देतो. त्यानंतर घरी फोन लावला जातो. कोणाचा सासरी लागतो तर कोणाचा माहेरी, मात्र लागतो जरूर. तिकडचे हालहवाल काय आहेत यावर तो फोन किती चालतो हे ठरते.

७) पुन्हा तास दीड तासाने चहाचा कार्यक्रम सकाळसारखाच पार पडतो. एवढ्या गप्पा या दिवसभरात कश्या मारू शकतात, एवढे विषय कुठून येतात या बद्दल कोणालाही शंका नसावी. विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.

८) संध्याकाळी ऑफिस सुटायच्या तासभर आधी यांना निसर्गनियमानुसार पुन्हा भूक लागते. यावेळी कोणी चहा तर आणून देणार नसतो. मग एकेकीच्या डब्यातून संत्री केळी अन सफरचंद निघतात. अगदी घरच्यासारखे सुरीने कापून वगैरे ही फळे खाल्ली जातात. इथे ही गप्पा मारणे हे ओघाने आलेच. निव्वळ खाण्यासाठी म्हणून या तोंड कधीच उघडत नाहीत.

९) ऑफिस सुटायच्या दहा ते पंधरा मिनिटे आधीच यांचा कॉम्प्युटर बंद होतो. कारण पुन्हा दिवसभराचा शीण घालवायचा तर तेवढा तगडा मेक अप हा हवाच. याच दरम्यान ऑफिसमधील सार्‍या बायका रंगरंगोटी करायला रेस्टरूमवर गर्दी करत असल्याने आणि प्रत्येकीला किमान सात-आठ मिनिटे लागत असल्याने यात वेटींगचा एक्स्ट्रा टाईम देखील हिशोबात धरल्यास उत्तम.

१०) उशीरा ऑफिसमध्ये थांबणे हा प्रकार यांच्या बाबतीत अभावानेच आढळतो आणि आढळला तरी रोज रोज नसतो. यांना वरचेवर थांबवायची त्यांच्या बॉसलाही भिती वाटते, न जाणो दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्येच भाज्या निवडायला घेऊन आल्या तर……

तर मित्रांनो…….. हे असे असते. यावरून असे म्हणता येईल की मुळातच या भारतीय बायका भारतीय पुरुषांच्या मानाने संथ असून त्यांना दिवसभरात तेच काम करायला ७२ मिनिटे जास्त लागत असण्याची शक्यता असल्याने हा सर्व्हे सर्वस्वी चुकीचा आहे असे नाही म्हणता येणार.

या अहवालाशी सहमत असाल नसाल तरी इथे याच खाली मोठ्या संख्येने स्वाक्षरी करा. येत्या अमावस्येच्या आधी आपल्याला याची एक प्रत दैनिक फेकानंदच्या कार्यालयात सादर करायची आहे. पुढील कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज..!!

धन्यवाद,
अहवाल सादरकर्ता – तुमचा 
पुरुषमित्र अभिषेक

 

तळटीप – सदर लेख कल्पनेवर आधारीत असून आपल्या जवळपास असेच काहीसे द्रुष्य दिसल्यास तो निव्वळ योगायोग समजावा…….. आणि हो, हलकेच घ्या हं.

 

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्‍यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो. ज्या शाळा कॉलेजच्या मित्रांना फ्रेंडलिस्टमध्ये जमा केले होते ते औपचारिकता म्हणून एखाद दुसरा स्क्रॅप करून पुढे बोलायचे नावच घेत नव्हते. ऑर्कुट समूह नावाचा प्रकारही माहीत नव्हता. दोनचार फोटो अपलोड केले, चारचौघांचे अपडेट्स चेक केले, पण आता पुढे या ऑर्कुटवर करायचे काय हा एक यक्षप्रश्न..! आणि ऑर्कुट नाही वापरायचे तर नेटचे बिल कसे वसूल करायचे हा होता दुसरा प्रश्न..!! या दोघांवर तोडगा म्हणून मग नेट फ्रेंडस जमवायला सुरुवात केली आणि अंदाजापेक्षा भरभर जमतही गेले. काय कसे जमवायचे याचीही काही खास स्ट्रॅटेजी नव्हती, मात्र या आभासी जगात ज्यांच्याशी माझी मोडकीतोडकी का होईना ओळख व्हायची त्यांच्याशी चॅटवर माझ्या खर्‍या मित्रांपेक्षाही जास्त बोलणे व्हायचे. काही दिवसांतच मी एक गोष्ट समजून चुकलो की भिन्नलिंगी आकर्षणाचा फंडा इथेही आपले काम करतो. मुलामुलांची किंवा मुलीमुलींची मैत्री होण्यापेक्षा मुलांची मुलींशी अन मुलींची मुलांशी इथे जास्त जमते. तसेही प्रत्यक्ष आयुष्यात पोरींशी खुलून बोलायला मी लाजायचोच, म्हणून मग इथे येऊन ऑर्कुट मैत्रीणी जमवायला सुरुवात केली. अनोळखी मुलींना त्यांचे प्रोफाइल्स (अर्थात फोटोच) बघून रॅंडम फ्रेंड रीक्वेस्ट पाठवायचो. खोर्‍याने पाठवलेल्या रीक्वेस्टपैकी बर्‍याचश्या रीजेक्टच व्हायच्या पण कधीतरी एखादी अ‍ॅक्सेप्ट झाली की आनंदाला पारावार नाही उरायचा. त्या मुलीला लगेच वेलकम केले जायचे आणि तिचा रीप्लाय येऊन ती आपल्या मैत्रीखात्यात जमा झाली की त्या महिन्याचे नेटचे बिल वसूल झाल्यासारखे वाटायचे.

झाले…. वैतागलात हे पारायण वाचून… चला थेट मुद्द्यालाच येतो…!

अश्यातच एका महिन्यात बोनस लॉटरी लागल्यासारखेच वाटले जेव्हा हेतल शाहने (मुलीचे नाव बदलले आहे, पण होती ती गुज्जूच) माझी रीक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली. माझ्या स्क्रॅप्सनाही तुरंत रीप्लाय आले, एवढेच नव्हे तर दुसर्‍याच दिवशी प्रॉपर चॅट ही सुरू झाली. ओळख-पाळख, आवडीनिवडी सारख्या फॉर्मॆलिटी भराभर उरकत आमची गाडी कधी मुक्त फ्लर्टींगवर घसरली माझे मलाच समजले नाही. कारण समोरून देखील पावले दणादण पडत होती. आठवड्याभरातच फोन नंबर एक्सचेंज झाले. तसे त्या आधीही मी ऑर्कुटवरून चार-पाच मुलींचे फोन नंबर मिळवले होते, (कधी फोनवर बोलायची हिंमत झाली नव्हती ती गोष्ट वेगळी) पण त्यामुळे या गोष्टीचे एवढे अप्रूप वाटले नाही. तरीही आठवड्याभरातच ही कामगिरी बजावल्याने या “केस”बाबत आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. (खरे तर आधी मी “केस” च्या जागी “शिकार” हा शब्द वापरायचो पण पुढे दोन-तीन ठिकाणी माझीच शिकार झाली असल्याने तेव्हापासून मी हा शब्द वापरणे सोडून दिले. असो, त्याबद्दल पुन्हा कधीतरी..)

तर, आमची ओळख झाल्यापासून दहा-बारा दिवसांनंतरचीच गोष्ट. एके दिवशी चॅटवर बोलताना तिने दुसर्‍या दिवशी मी बहीणींबरोबर सिनेमाला जातेय असे सांगितले. मी तिला सिनेमाचे नाव विचारले आणि सहजच म्हणालो, “क्या बात है, मलाही बघायचा आहे हा सिनेमा. मलाही ने की मग बरोबर….” खरे तर तो कोणता सिनेमा होता हे आता आठवतही नाही. कारण तो कुठे खरेच माझ्या आवडीचा होता, पण चॅट ही अशीच केली जाते. आपल्या आवडीनिवडी जुळतात हे सांगायचा एकही मौका इथे सोडला जात नाही.

(इथे आणखी एक गोष्ट वेळीच नमूद करतो – मुलगी गुजराती असूनही अगदी अस्सखलित नसली तरी एकदम फाकडू मराठी बोलायची. आमची सारी चॅट मराठीतच चालायची. त्यामुळे मी सुद्धा मातृभाषेत चॅट करत असल्याने बेफाम सुटायचो आणि मुलींना ईंम्प्रेस करायचे माझे सारे पैतरे आजमावू शकायचो.)

असो,
तर ती म्हणाली, “अरे बरोबर सिस्टर आहेत ना, त्यांच्याबरोबर नाही नेऊ शकत रे. समजा करो यार. त्यापेक्षा आपण रविवारी भेटूया ना. बोल, क्या बोलता है.” ………अन मी खल्लास.

मला ती सिनेमाला नाही बोलणार याची खात्री होतीच, नव्हे या व्यतीरीक्त तिने काही बोलावे अशी अपेक्षाही नव्हती… पण चक्क रविवारी भेटूया असे म्हणेल हे कल्पनेच्या बाहेर काय अगदी आरपार पल्याड होते. गोड धक्का होता तो एक. धक्क्याच्या पलीकडेही एक शॉक होता तो ज्यातून पुढची पंधरा मिनिटे मी स्टेप बाय स्टेप सावरतच होतो. कारण हे ती केवळ मला टाळण्यासाठी किंवा औपचारीकता म्हणून म्हणाली नव्हती. पुढच्या पंधरा-वीस मिनिटांच्या चॅटींगमध्ये आमचा येत्या रविवार भेटीचा प्रोग्राम नुसता फिक्सच नव्हता झाला, तर काय कुठे अन कसे याची सारी रुपरेषाही ठरली होती.

तर मित्रांनो,
येत्या रविवारी ती…, माझी गुज्जू ऑर्कुट फ्रेंड…, मिस हेतल शाह…, मला ठीक संध्याकाळी साडेपाच वाजता…, वडाळा-माटुंगा जवळच्या…, फाईव्ह गार्डनला…, भेटणार्रच होती..!

फाईव्ह गार्डन म्हणजे माझी डिप्लोमाची चार अन डीग्रीची तीन वर्षे ज्या वी.जे.टी.आय. मध्ये गेली त्याच कॉलेजला लागून असलेला परीसर. कॉलेज बंक करून किंवा सुटल्यावर संध्याकाळी किंवा स्टडीनाईट मारायला म्हणून हॉस्टेलला जायचो तेव्हा अभ्यास करून वैताग आला की आमची जी काही फिरण्याची ठिकाणे वा अड्डे होते त्यातील सर्वात वरच्या नंबरवर हे फाईव्ह गार्डन. रात्रीचे जेवण जिरवण्यासाठी म्हणून याला दोन चकरा मारणे हा आमचा नेहमीचा शिरस्ता कारण याचवेळी आजूबाजुच्या काही अप्सराही इथे याच कारणासाठी अवतारायच्या. त्यामुळे या परिसराचा चप्पा चप्पा मला ठाऊक होता. याचा फायदा असा की निदान जागा तरी माझ्या सवयीची असणार होती.

तिथून पहिला आम्ही एका हॉटेलमध्ये जाणार होतो, जे जवळच होते, पण कॉलेजच्या दिवसांत महागडे वाटत असल्याने फारसे जाणे व्हायचे नाही. तिथे अर्थातच खाणेपिणे होणार होते आणि ते उरकल्यानंतर पुढे आपण काय करणार असे मी भोळेपणाचा आव आणत चॅटवर विचारताच ती म्हणाली, “अरे फाईव्ह गार्डन पडा है ना इतना.. वही घूमेंगे, फिरेंगे… बाकडे पे बैठेंगे… बाते करेंगे… और क्या…!”

बस्स…..! ती, मी अन फाइव्ह गार्डन परीसरातील सुनसान अंधेर्‍या गल्ल्या क्षणभरासाठी डोळ्यासमोर तरळून गेल्या..! अन त्या “और क्या” च्या जागी “और बहुत कुछ” दिसायला लागले..!!

माझ्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या होत्या. ऑफिसमध्ये मित्रांना सांगून झाले होते.. काय काय मी करू शकतो आणि त्यातले काय काय खरेच मला करता येईल याच्या रोजच्या रोज चर्चा झडत होत्या.. तिला भेटल्यावर काय गिफ्ट देता येईल याच्या याद्या बनत होत्या.. भेटीच्या दिवशी घालायचे कपडे वेळीच धुवायला टाकले होते.. दर दीड दिवसांनी उगाचच्या उगाच दाढी करून क्लीन शेव राहण्याची सवय करत होतो.. तिचा एक फोटोही तिच्या ऑर्कुट अल्बममधून डाऊनलोड करून मोबाईलवर घेतला होता. जो अधूनमधून बघत राहायचो जेणे करून तिला भेटल्यावर एका जुन्या ओळखीच्याच व्यक्तीला भेटत आहे असे वाटून कम्फर्टेबल फील करेन….. अजूनही काय काय केले त्या धुंदकीत आठवत नाही पण जवळपास हवेतच तरंगत होतो काही दिवस.. पहिल्यांदाच जे मी अश्या ऑर्कुटच्या माध्यमातून एका मुलीला भेटायला जाणार होतो..!

भेटीचा रविवार उजाडला. भेट संध्याकाळची असली तरी सकाळीच बिछान्यात उठून बसलो. इतक्यात आठवले की पुरेशी झोप नाही झाली तर चेहरा फ्रेश नाही दिसणार म्हणून पुन्हा चादरीत घुसलो. मग मात्र सुर्य डोक्यावर आल्यावरच उठलो. आंघोळपाणी नाश्ता जेवण एकेक करत सारे उरकून घेतले. अधूनमधून टेबलवर उघडूनच ठेवलेल्या कॉम्प्युटरवर नजर टाकत होतो.. पण ती ऑनलाईन दिसत नव्हती.. भेटायचा टाईम संध्याकाळी सहाचा होता.. घरच्या घड्याळात पाच वाजत आले पण तरीही ती ना ऑनलाईन येत होती ना तिचा फोन येत होता….

……….आणि अचानक सव्वा-पाचच्या ठोक्याला रींगच वाजली आणि मोबाईलच्या स्क्रीनवर तिचे नावच बघून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला..!!

फोन उचलता समोरून तिचा चिडलेला स्वर, “सो गये थे क्या? फोन क्यू नही लग रहा था?? कबसे ट्राय कर रही हू…”
मला समजले नाही, खरेच तिचा फोन लागत नव्हता की आणखी काही… म्हणजे… विचार वगैरे तर बदलला नव्हता तिचा…
पण नाही मित्रांनो… तसे काही नव्हते…
“चल ये आता लवकर ठरलेल्या ठिकाणी….” असे ती म्हणाली आणि मी फोन उराशी कवटाळून थेट कपाटातच शिरलो..!

तेव्हाची माझी फेवरेट कडक ब्लॅक जीन्स आणि नवीनच घेतलेले ब्ल्यू रंगाचे डेनिमचे शर्ट, त्याला शोभेलसे सिल्वर डायलचे घड्याळ एका हातात अन चांदीचा कडा दुसर्‍यात, बारीकशी सोनसाखळी गळ्यात अन वूडलॅडचे शूज पायात. उन्हे उतरली असल्याने आता उगाच शायनिंग मारायला घेतल्यासारखे वाटू नये म्हणून गॉगल तेवढा अनिच्छेने घेतला नाही, मात्र अंगभर परफ्यूम फुसफुसवायला विसरलो नाही.
एकंदरीत, पेहराव एका मुलीला प्रथमच भेटायला जातोय, जिला आता इम्प्रेस होण्यावाचून पर्याय नाही अगदी अस्साच..!!

वडाळा स्टेशनवर ट्रेनने उतरण्याची ही माझी पहिलीच वेळ नव्हती. कॉलेजची कित्येक वर्षे तीच ट्रेन, तेच प्लॅटफॉर्म आणि तोच येण्याजाण्याचा रस्ता. पण आज मात्र त्याच्या दोन्ही बाजूंनी फुलांचे ताटवे उगवल्यासारखे वाटत होते आणि मी भर फूटपाथवरून आमीरखान सारखे पहला नशा करत चाललोय असे स्वतालाच वाटत होते. मध्येच आठवण झाली, अरे चॉकलेट घ्यायचे राहिलेच की…

रविवारचा दिवस, एखादे चॉकलेटचे दुकान उघडे सापडेल तर शप्पथ. नशीबाने एका छोट्याश्या पानाच्या गादीवर नजर पडली जिथे छोट्यामोठ्या कॅडबर्‍या लटकवलेल्या दिसल्या. मोठ्या दिमाखात त्या पानवाल्यासमोर उभा राहून ठाकलो आणि चुटकी वाजवतच त्याला ऑर्डर केली, “जो भी सबसे मेहंगावाला चॉकलेट होगा, एक दे देना…”

त्याने कुठून आत हात घालून एक चॉकलेटचा सजवलेला रंगीबेरंगी पुडका काढला देव जाणे. स्वताला बिडीकाडीचा शौक नसल्याने त्या पानवाल्याची पोहोच कुठवर आहे याची मला कल्पना नव्हती, मात्र आता स्वताच्या शब्दाची किंमत राखायला मला तो रंगीबेरंगी पुडा तब्बल २३५ रुपये खर्चून स्विकारावा लागला. आयुष्यात कधी गर्लफ्रेंड असतीच तर तिला वॅलेंटाईन डे’ला गिफ्ट द्यायलाही मी एवढा खर्चा केला नसता जो मी आंतरजालावर सापडलेल्या मैत्रीणीच्या पहिल्या भेटीवर करत होतो. पण हौसेला मोल नसते आणि मलाच हौस होती असे एखाद्या ऑर्कुट फ्रेंडला भेटायची. अर्थात, ही तर फक्त सुरुवात होती, अजून खिश्याला बरीच फोडणी बसायची बाकी होती.

चालता चालता तिला फोन लाऊन बोलता बोलता मी इच्छित स्थळी पोहोचलो. ती तिथे आधीच माझी वाट पाहत उभी होती. अत्यंत साधीसुधी वेशभुषा. जीन्स अन शॉर्ट टॉप घातलेली मात्र जराही नट्टापट्टा नाही किंवा नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसावे यासाठी विशेष मेहनत घेतल्यासारखे जाणवत नव्हते. माझ्या अगदी उलट. तरीही तिचा वावर सराईत अन माझा मात्र किंचित गळपटलेला. तिनेच हात पुढे करून माझ्याशी हस्तालोंदन केले तसे मी काहीतरी बोलायचे म्हणून ठरवूनच आलेले वाक्य पुटपुटलो, “खूप छान दिसत आहेस..”

“ए बस, अभी यहा पे भी मराठी नही हा.” तिची पहिलीच प्रतिक्रिया अनपेक्षित.

तिला हिंदी अपेक्षित असावी, मात्र मराठी नाही हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर पहिला इंग्लिश आली आणि आता सारी भेटच बोंबलणार असे वाटू लागले.

“क्या हुआ? गुजराती मे बात करनेको नही बोल रही हू, हिंदी नही आती क्या?”

हिंदीचे नाव काढताच जरासे हायसे वाटले खरे, मात्र लहानपणापासून कितीही रोमॅंटीक हिंदी सिनेमे बघितले असले तरीही जेव्हा एका मुलीशी हिंदीत बोलायची वेळ येते तेव्हा एका मराठी मुलाची कशी तंतरते याचा अनुभव मला पुढच्या काही क्षणातच आला. सुदैवाने माझ्या हालत पे तरस खाऊन तिनेच स्वत: पुन्हा अधूनमधून मराठी सुरू केले अन्यथा आज यापुढे लिहिण्यासारखे माझ्याकडे काहीच नसते. अगदीच एकतर्फी सामना झाला असता.

………………………….पण तसाही तो होणारच होता म्हणा.

कधी तिच्या पुढेपुढे, तर कधी तिच्या मागेमागे, तिच्यासाठी हॉटेलचा दरवाजा ढकलणे, तर लेडीज फर्स्ट करत खुर्चीवर तिला पहिले बसू देणे. याप्रकारचे सारे शिष्टाचार कसेबसे काटेकोरपणे पाळत मी तिच्या जोडीने हॉटेलच्या एका कमी गजबजलेल्या कोपर्‍यात स्थिरावलो. वेटरेने मेनूकार्ड आणून दिले तेव्हा मी त्याच्या हातून घेऊन ते तिलाच देणार होतो (अर्थात हा ही एक शिष्टाचार मी रटूनच आलो होतो) मात्र तिनेच थेट झडप घातल्यासारखे ते खेचून घेतले अन तिची नजर झरझर करत मेनूवर फिरू लागली. कधी डावीकडचे जिन्नस तर कधी उजवीकडच्या किंमती चाळू लागली. ते पाहून मी सुखावलो. या विचाराने की एखादी लग्नाची बायकोच अशी नवर्‍याच्या खिशाची काळजी घेऊ शकते. पण हा माझा भ्रम होता हे मला लवकरच समजणार होते. तिच्या डोक्यात नेमका उलटा हिशोब चालू होता की आता याला जास्तीत जास्त कसे कापायचे. मध्येच तिने मेनूकार्डमध्ये खुपसलेले डोके वर काढले, माझ्याकडे बघून एकदा गोडूस हसली आणि पुन्हा आत खुपसले.

“स्पेशल चीज पनीर पावभाजी हंड्रेड रुपीज, स्पेशल कॉर्न-चिल्ली-मशरूम पिझ्झा वन फोर्टी रुपीज, अ‍ॅंड वन वर्जिन पिनाकोलाडा मॉकटेल हंड्रेड एंड टेन रुपीज… टोटल थ्री हंड्रेड अ‍ॅण्ड फिफ्टी ओनली… इतने पैसे है ना, वैसे कार्ड भी चलता है यहा पे.” आत खुपसलेल्या तोंडातून आवाज आला.

तिच्या या व्यावहारीकपणाचे कौतुकच वाटले मला. चार दिवसांपूर्वी झालेली आमची चॅट आठवली ज्यात तिने माझा पगार किती हे विचारला होता आणि मी माझे अ‍ॅन्युअल पॅकेज (वार्षिक उत्पन्न) सांगताच दर महिन्याला ईंकम टॅक्स आणि प्रॉविडंट फंड कापून हातात किती पडत असतील याचा तिने चटदिशी हिशोब लावला होता. मात्र तो पगार तिने का विचारला होता ते मला आता समजत होते.

“कार्ड तो है ही, लेकीन पार्सल नही लेके जाओगी तो उतनी कॅश भी है मेरे पास..” काहीतरी पाणचट विनोद मारायचे म्हणून मी बोललो खरे, पण नंतर असे बोलायला नको होते असे वाटून पटकन जीभ चाऊन घेतली. तिला चिडवतोय असे वाटल्याने नाही तर उगाच पार्सलची आयडीया तिच्या डोक्यात भरायची चूक केली म्हणून..

तिला मात्र याचे काहीच पडले नव्हते. तिचे यापेक्षा अजून काही महागडे कॉम्बिनेशन बनवता येईल का याचेच गणित चालू होते. ते सुचण्याआधी मी पटकन वेटरला बोलाऊन तिच्या लिस्टमध्ये माझ्यासाठी एक टोस्ट सॅंडवीच अ‍ॅड करून ऑर्डर दिली. तसे तिनेही मोठ्या जड अंतकरणाने ते मेनूकार्ड बाजूला ठेवले.

“सर, मिनरल वॉटर चाहिये या साधा वॉटर?” वेटरच्या या प्रश्नाने मी चपापलोच.

हल्ली मिनरल वॉटर पिण्याची फॅशन वगैरे आली आहे हे सारे ठिक, पण म्हणून ज्या पाण्यावर आपण आजवर वाढलो त्याला लगेच साधा वॉटर बोलायची काय गरज. मुंबईसारख्या शहरात एवढ्या मोठ्या हॉटेलमध्येही शुद्ध पाणी मिळत नसेल तर हा बृहनमुंबई महानगरपालिकेचा अपमान नाही का झाला. पण तुर्तास हा अपमान गिळण्याव्यतिरीक्त माझ्याकडे पर्याय नव्हता. आता तिच्यासमोर कसे त्या वेटरला ‘हमको साधा वॉटरहीच मंगता है’ बोलणार. लाज राखायला म्हणून मग मी,
“हा हा बिनधास्त.. मिनरल क्या डबली मिनरल वॉटर ला..” पुन्हा असेच काहीतरी बरळलो. ज्याचा फटका मला ३० रुपयाला पडला जेव्हा तो दोन बाटल्या पाणी घेऊन आला.

आता ऑर्डर येईपर्यंत वेळ होता. एकदा आली की ही त्यावर अशी तुटून पडणार की माझ्याकडे जराही लक्ष देणार नाही हे मी तिच्या तोंडाला सुटलेल्या पाण्याकडे बघून समजून चुकलो होतो. ती मेकअप न करता, लिपस्टीक न लावता का आली होती या एकेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होत होता. तरी मी घातलेले नवीन कोरे शर्ट तिच्या नजरेस पडावे म्हणून मुद्दाम तिच्या समोर हात नाचवत त्याचे बटण उगाचच्या उगाच काढून लावल्यासारखे केले.

“नया शर्ट?” लक्ष गेलेच तिचे.

“हा.. नही… म्हणजे हा.. तसा नवीन पण तसा जुना पण नाही .. ” मी नक्की काय उत्तर द्यावे या गोंधळात. नवीन बोलावे तर आपल्याला भेटायला खास नवीन शर्ट घालून आला असे मला तिला वाटू द्यायचे नव्हते आणि मुद्दाम जुने बोलावे तर मला भेटायला जुनेच शर्ट घालून आला असेही तिला जाणवू द्यायचे नव्हते.

“ओके ओके, जो भी है, अच्छा है. जच रहा है तुमको. पर पता नही सब लडके डेट पे ब्लू शर्ट ही पहन के क्यू आते है…”

डेट पे… अईई ग्ग… पुनश्च काळजात धस्स… म्हणजे मी हिच्याबरोबर, म्हणजे आता आम्ही जे हॉटेलात खायला बसलो होतो ते, म्हणजे ही डेट होती तर…. मन पुन्हा एकदा फाईव्ह गार्डनच्या अंधेर्‍या गल्ल्यांमध्ये फिरून आले.. त्यातील “सब लडके” हा शब्द सोयीस्कररीत्या दुर्लक्षून.

इतक्यात ऑर्डर आली आणि ती खाण्यामध्ये तर मी खयालोमे गुंग झालो.

“मुझे बच्चे बहोत पसंद है.. आय लव किडस..” बाजुच्या टेबलवर गोंधळ घालणार्‍या लहानग्यांकडे बघत तिला ईम्प्रेस करायच्या हेतूने काहीतरी विषय काढायचा म्हणून मी बोललो.

“दुसरोके है ना इस लिये.. खुद के होंगे ना, तो पता चलेगा..” तिने मला उडवूनच लावले. हि बाई माझी सारी गणिते चुकवत होती. चॅटवरून मी हिच्याबद्दल जो अंदाज बांधला होता त्यापेक्षा सारे वेगळेच घडत होते.

“तो तुम को क्या पसंद है?” मी विषय पुढे रेटला.

“डार्क चॉकलेट चिप्स विथ वॅनिला आईसक्रीम…. एटी रुपीज प्लस टेन रुपीज वॅफल कोन..” पुन्हा एकदा माझे गणित चुकले होते. उगाच नको तो विषय काढून फसलो होतो.

मिनिटभराची शांतता……….

“मंगाऊ” …. “मंगाओ” … आमच्या दोघांच्याही तोंडून एकत्रच बाहेर पडलेले समानार्थी विरुद्द शब्द.

ती याचसाठी आली होती आणि माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आतापावेतो एक गोष्ट समजून चुकलो होतो ती म्हणजे मराठी मुलाला गुजराती मुलीबरोबर “डेट” वर जायचे असल्यास आपली मध्यमवर्गीय वृत्ती घरीच ठेऊन यायला हवी.

तिचे खाणेपिणे एकदाचे आटोपले तसे मला अर्धवट पोटी असूनही जरा तरतरी आली. अजून काही ऑर्डर व्हायच्या आधी मी बडीशेप तिच्या तोंडी कोंबून तिला हॉटेलच्या बाहेर काढले. एव्हाना बाहेर छानसा अंधार पडला होता. जमेची बाजू ही की चांदणे देखील नव्हते. फाईव्ह गार्डनच्या दिशेने जाणार्‍या त्या अंधार्‍या गल्ल्या आणखी काळ्याकुट्ट भासत होत्या. यापेक्षा रोमॅंटीक वातावरण ते काय.. मी माझी पावले नकळत अशी जाणूनबुझून त्या दिशेने वळवली. आमचे चॅटवर ठरल्याप्रमाणे ती देखील पाठोपाठ येणारच होती…. मात्र तेवढ्यातच माशी शिंकली.. आय मीन कुत्री भुंकली… आणि आमचा अबाऊट टर्न..!

पण मी इतक्यात हार मानणारा नव्हतो. एकदा मूड तयार झाल्यावर आता पीछे मूड.. छ्या शक्यच नाही. माझ्याच कॉलेजचा परीसर होता तो. तेथील कुत्रे भले मला विसरले असतील, पण रस्ते माझ्या ओळखीचे होते. दुसर्‍या रस्त्याने आम्ही फाईव्ह गार्डन गाठले. पंचउद्यानाच्या मध्यभागी आम्ही दोघे. पांच ही उद्याने आम्हाला हाका मारून मारून बोलवत आहेत असा भास मला होऊ लागला. कोठे अंधार जास्त आहे तर कोठे माणसे कमी आहेत, तर एकीकडचा बाकच जेमेतम दोघे बसतील एवढा छोटा आहे. मी कुठे जावे आणि कुठे नको या गोंधळात असताना तीच म्हणाली, “यहा पे नही, मामा उठा लेंगे”
“मामा? किसके मामा?”
“तेरे मामा, मेरे मामा, हम सबके मामा.. मुझे नही चाहिये ये सब ड्रामा..”
मी काय ते समजलो. पोरगी फारच पोहोचलेली होती. मी आता या परिस्थितीत नक्की उतावीळ व्हावे की घाबरावे हे न समजल्याने गोंधळून कसेबसे उसने अवसान आणून तिला विचारले, “फिर….., अब कहा?”
“वहा……” मानेला हलकासा झटका देत, पापण्यांची अलगद फडफड करत तिने मला दिशा दाखवली. त्याच वेळी तिने खालचा ओठ ही दातांमध्ये चावल्याचा मला भास झाला खरे, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत तिने दाखवलेल्या दिशेला नजर टाकली तर पुन्हा एक अंधेरी गल्ली.. आणि मन पुन्हा एकदा.. पुन्हा एकदा..

प्रकाशातून काळोखाकडे प्रवास करताना फक्त एकच अपेक्षा मनात होती ते आता परत इथे ही कुत्रे निघू नयेत. आली तर एखादी घूसच यावी जिला घाबरून हिने टुनकून उडी मारावी आणि…… पण घूस काही यायची नव्हती. आम्हीच हळूहळू गल्लीत घुसत होतो. काहीही न बोलता. माझी घूसमट वाढू लागली तसे मीच तिला म्हणालो, “और कितना अंदर घसीटोगी? वो भी इतने अंधेरेमे, मेरा पैर घसर गया तो?” काही तरी “घ” ला “स” जोडून बोलायचे म्हणून बोललो. तसे ती म्हणाली, “अरे रस्ते पे पाणी थोडी ना है, नही घसरेगा पाव.” …. माझे तिच्याबद्दलचे मत पुन्हा बदलले. मुलगी तेवढीही पोहोचलेली नव्हती.

अखेर एका टुमदार घराशी थांबलो. दारात मिणमिणता दिवा. अंगणाचे बंद फाटक ज्याला रेलून ती उभी राहिली. माझ्या डोक्यात आम्ही कुठेतरी बाकड्यावर बसून बोलणार असे होते, या पोजिशनचा मी विचारच करून आलो नव्हतो. आता कसे उभे राहायचे याच विचारात मी दोनचार वेडेवाकडे अंगविक्षेप दिले. तसे ती म्हणाली, “अरे ऐसे मत करो, वरना मम्मी देख लेगी.”

“मम्मी?” मी किंचाळलोच, “इकडे कुठे मम्मी? अग डेटला आलोय ना आपण”

“अरे ऐसे मत चिल्लाओ, बंटी जाग जायेगा”

“आता हा बंटी कोण? जागतोय तर जागू दे”, हा बंटी नक्कीच तिचा भाऊ असणार, कारण ज्या घरासमोर आम्ही उभे राहिलो होतो ते तिचेच होते हे एव्हाना मला उमजले होते.

बंटी मात्र त्याचे नाव ऐकताच जागा झाला. त्याच्या गुरगुरण्याचा आवाज त्या भयाण शांततेचा भंग करत माझ्या कानात शिरला तेव्हा या अंधार्‍या गल्लीत शिरताना या मुलीला कुत्र्यांची भिती का नाही वाटली याचा उलगडा मला झाला. कारण हा तिच्या बंटीचा इलाका होता.

गुजराती कुत्र्याला कसे चुचकारतात याची मला काहीच कल्पना नव्हती. ‘केम छे’ अन ‘सारू छे’ हे माझ्या शब्दकोषातील दोन शब्द तरी नक्कीच पुरेसे नव्हते. उलट “छे” च्या जागी त्याने “छू” ऐकले तर आणखीनच मागे पडण्याची शक्यता होती. हळूहळू गुरगुर-ए-बंटी वाढू लागली तशी डोक्यात धोक्याची घंटी वाजू लागली. गुर्रगुर्र गुर्रगुर्र ठणठण ठणठण…….. ठणठण ठणठण गुर्रगुर्र गुर्रगुर्र….. धूम ठोकण्याआधी मी शेवटची नजर मागे टाकली ते फाटकाला ओलांडून बाहेर यायच्या प्रयत्नात असलेल्या बंटीचे दोन भलेमोठे पाय नजरेस पडले. त्यानंतर अध्येमध्ये थांबण्याचा प्रश्नच नव्हता.

ज्या पानवाल्याकडून चॉकलेटचे पुडके घेतले होते त्याच्यासमोरच मी धापा टाकत उभा होतो. या नादात खिशात ते पुडके तसेच राहिले होते. निम्म्या किंमतीत तो ते परत घेतो का म्हणून विचारायचे होते. पण धावण्याच्या नादात त्याचा पार चेंदामेंदा झाला असल्याने आता तो प्रश्नच उदभवत नव्हता. मी निराश हताश असा आता यापुढे या प्रकारचा गेम कधीच खेळायचा नाही असा कानाला खडा लाऊन तिथून निघालो. पाठीमागून पानवाल्याने रेडीओवर लावलेल्या गाण्याचे सूर कानावर पडत होते…. जिस गली मे तेरा घर जो हो बालमा… उस गली से मुझे तो गुजरना नही…

– तुमचा अभिषेक

 

जेव्हा मुलगी जवळ येते….!!

 

गेले सात-आठ दिवस पावसाने मुंबईला झोडपले होते. आजचा दिवसही त्याला काही अपवाद नव्हता. सकाळी उठलो आणि बाहेर नजर टाकली तर तेच ढगाळलेले वातावरण आणि कोसळणारा पाऊस. परत चादरीत शिरावे असे कितीही वाटत असले तरी तसा पर्याय नसल्याने पेंगुळलेल्या अवस्थेतच तयारीला लागलो. सोबतीला पावसाची संततधार चालूच होती. वेळेवर तयारी करायची जराही घाई नव्हती. कारण असे ना तसे, ट्रेन लेट होणार हे माहीतच होते. नसती झाली ट्रेन लेट आणि मलाच उशीर झाला असता तरी ऑफिसमध्ये ट्रेन लेटचे कारण आज चालण्यासारखे होते. तरीही ट्रेन्सची नेमकी काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून सकाळच्या ताज्या बातम्या लावल्या. असे भल्या पहाटे टी.वी मी फक्त दोनच वेळा लावतो जेव्हा ऑस्ट्रेलिया-भारत क्रिकेटचा सामना कांगारूंच्याच भूमीवर असेल तेव्हा किंवा पावसाची खबरबात काढायची असता.. बातम्यांचे सतराशे साठ चॅनेल अठराशे आठ सेकंदात पलटून झाले पण अपेक्षित बातमी काही दिसत नव्हती. म्हणून मग आईनेच बातमी पुरवली की रात्रभर असाच कोसळतोय पाऊस.. जाऊच नकोस आज ऑफिसला.. हे आई लोकांचे काळीज असेच असते.. मी त्या कडे दुर्लक्ष आणि बायकोला टाटा गूडबाय करून बाहेर पडलो.

लिफ्टचे बटण दाबले, आणि ती पंधराव्या मजल्यावरून खाली यायला सुरूवात झाली. आमच्या दहाव्या मजल्यावर पोहोचेपर्यंत आठदहा सेकंद लागणार तोपर्यंत माझे सवयीप्रमाणे नेहमीसारखे शर्टाची इन नीटनेटकी करणे, केसांवरून एक हात फिरवणे, त्यातूनही वेळ उरलाच तर खिशातून मोबाईल काढून त्यात काहीतरी उगाचच चेक करणे हे प्रकार सुरू होते. लिफ्ट बाराव्या मजल्यावर थांबून आली. कोणालातरी तिने आत घेतले असावे. नवीनच बिल्डिंग आमची. कुठल्या माळ्यावर कोण राहते आणि कुठे कोण कोणत्या वेळी चढेल याचा काही अंदाजा नसायचा. मगासपासून मला निघायची घाई नव्हती पण एकदा घराबाहेर पडलोय तर मग मात्र आता ऑफिसला अजून उशीर नको असे वाटत होते. त्यामुळे लिफ्ट आल्या आल्याच आत शिरुया म्हणून एक नजर इंडिकेटरवर ठेऊन अगदी तिच्या समोरच उभा होतो. लिफ्ट दहाव्या मजल्यावर आली, ऑटोमेटीक दरवाजा उघडला आणि बंद झाला. मी मात्र बाहेरच राहिलो. पटकन आत शिरायचे सुचलेच नाही. जेव्हा सुचले तोपर्यंत लिफ्ट नवव्या माळ्याच्या अर्थात खालच्या दिशेने निघाली होती. स्वताच्या बावळटपणाला दोष देत पुन्हा बटण दाबले आणि विचार करू लागलो ती नक्की होती कोण…!

सकाळच्या वेळी बिल्डिंगमधून बाहेर पडत होती याचा अर्थ बाहेरची नसावी..!
आज पहिल्यांदाच पाहिले होते, म्हणजे नवीनच रहिवासी असावी..!
बाराव्या मजल्यावर लिफ्ट थांबली म्हणजे तिथलीच असावी..!
हे सारे ठीक होते, पण सकाळी सकाळी एवढे नट्टापट्टा करून बाहेर पडायची गरजच काय होती म्हणतो मी..!!!

लिफ्टचा दरवाजा उघडला आणि समोर अनपेक्षितपणे तिला पाहिले, ते ही आत इतर कोणी नसताना. असे वाटले की चुकून दुसर्‍याच्याच घराची बेल वाजवली अन बायकोच्या जागी भलत्याच बाईने दरवाजा उघडला. ते ही बाई भलतीच देखणी आणि घरात एकटीच. आत कसे शिरायचे म्हणून राहिलो बाहेरच उभा. लिफ्ट खाली जाऊन पुन्हा वर येईपर्यंत जेवढा वेळ लागत होता तेवढेच स्वतावरचे चरफडणे वाढत होते. मी खाली पोहोचलो तेव्हा ती मुलगी नक्कीच दूरवर निघून गेली असावी. तसेही तेच माझ्या हिताचे होते. परत तिच्याशी नजरानजर होणे म्हणजे ओशाळल्यागत झाले असते. तरीही, आधी चोहीकडे नजर फिरवून ती जवळपास नाही ना याची खात्री केली आणि मगच बिल्डिंगच्या गेटबाहेर पडलो. काही का असेना पण आज एक गोष्ट मात्र मी समजलो होतो, की अचानक एखादी सुंदर मुलगी समोर आली की पुरुषाचा मेंदू काही काळापुरता काम करायचा बंद करतो..!!!

बिल्डींगच्या बाहेर पाऊल टाकले तसेच वीजेचा झटका बसल्यासारखे परत फिरलो… नाही नाही.. परत ती नाही दिसली.. तर पाऊस.. जो अक्षरश: धबधब्यासारखा कोसळत होता. आत जाऊन बॅगेतून छत्री काढली. या मुसळधार पावसात कितपत साथ देईल ही शंकाच होतीच पण आता जे काही होते ते तीच होती. तिच्या सोबतीनेच लढायचे होते. एका हातात छत्री धरून कपडे, बूटं अन ऑफिसची बॅग सांभाळायची कसरत करत झपझप पावले कापू लागलो. जेवढे लवकर स्टेशनला पोहोचेन तेवढेच पावसात भिजणे कमी होईल हा त्यामागचा विचार. नाक्यावरून स्टेशनला जायला एक शॉर्टकट लागतो पण आज त्याने जाऊन फायदा नव्हता कारण त्या मार्गात लागणार्‍या एका गल्लीत पाणी भरलेले असायची शक्यता जास्त, आणि तिथे गेल्यावर ते समजले तर पुन्हा फिरून मागे त्याच नाक्यापर्यंत येण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अश्यावेळी मी आधीच सावधगिरी म्हणून लांबचा रस्ता पकडतो. आज ही तसेच केले असते, जर ती दिसली नसती…!

लांबसडक कंबरेपर्यंत येणारे केस आजकाल दुर्मिळच. त्यामुळे कधी दिसले तर लक्ष वेधले जातेच.. आणि एकदा का लक्ष वेधले गेले.. की मग एखादी स्त्री पाठमोरी पाहिली असता ती पुढून कशी दिसत असेल याची उत्सुकता न लागलेला पुरुष विरळाच. मी देखील याला अपवाद कसा असेल. पण हे सहज शक्य नव्हते. आमच्यात जवळपास पन्नास पावलांचे अंतर होते. धो धो कोसळणार्‍या पावसाला तुडवत हे अंतर लवकरात लवकर गाठणे एक दिव्य होते. त्यातही तिचा आणि आपला रस्ता कुठवर सामाईक आहे याचीही कल्पना नव्हती. पावसामुळे माझा चालायचा वेग आधीच मंदावला होता. त्यातच तिच्या पायांकडे पाहिले तर त्यात नेहमी सारख्या मुलींच्या हाय हिल्स नसून फ्लोटर्स होत्या ज्या सपसप पाणी कापत चालल्या होत्या. त्यांच्या चार बोटे वर असलेल्या चांदीच्या पैजणांवर नजर ठेऊनच मी देखील माझा चालायचा वेग किंचित वाढवला तो या उद्देशानेच की हिला कोणत्याही परीस्थितीत गाठून हिचा चेहरा बघायचाच..!!

एका अनोळखी बोळात शिरून ती मला एकटेच मागे सोडून गेली जेव्हा आमच्यातील अंतर पन्नास पावलांवरून पंधरावर आले होते. त्या बोळाच्या तोंडावरून चार पावले चालताना मान काटकोनात वळवून तिला शेवटचे पाठमोरे पाहून घेतले आणि छत्री सांभाळत स्टेशनच्या दिशेने कूच केले.. पण हाय रे दैवा.. व्हायची ती गफलत झाली होतीच.. समोरच्या गल्लीत पाण्यावर तरंगणार्‍या कागदाच्या होड्या कोणीतरी माझ्याच खोड्या काढण्यासाठी सोडल्या होत्या असे वाटले. आता पुन्हा फिरून परत त्याच नाक्यावर.. ते ही भर पावसात.. परतताना एक मांजर रस्ता आडवा कापून गेली. अजून काही दिवसभरात घडायचे बाकी आहे याचेच ते शुभसंकेत होते.. कदाचित ती मगासची युवती देखील मार्जारजातीची असावी, जी माझा मार्ग कापून तर नाही पण चुकवून मात्र जरून गेली होती. दहा मिनिटांच्या अंतराळातच मी अजून एक धडा शिकलो होतो आणि तो म्हणजे, जेव्हा एखादी मुलगी जवळ येते तेव्हा पुरुषाची दूरदृष्टी काम करायची बंद होते..!!!

किती उशीर झाला, किती भिजलोय याचा हिशोब करणे मी आता सोडून दिले होते. जमेल तितक्या लवकर स्टेशनला पोहोचायचे आणि जी पहिली बेलापूर ट्रेन येईल तिची खिडकी पकडून नेहमीसारखी ताणून द्यायची याच विचारांत मी डॉकयार्ड स्टेशनला पोहोचलो. फर्स्टक्लासचा डबा म्हणजे जोडूनच महिलांचा डबा.. आता या ललनांना आणखी संधी द्यायची नाही असे ठरवून मी प्लॅटफॉर्मवरही त्यांच्याकडे पाठ करूनच उभा राहिलो. सुदैवाने एक अंधेरी गेली आणि पाठोपाठ बेलापूर आली. पावसाने ट्रेन किंचित लेट होत्या, चढणार्‍यांची गर्दी होती पण ट्रेन मात्र मुंबई छत्रपती टर्मिनसहून रिकामीच आली असल्याने मी उडी मारून माझी आवडीची आणि सोयीची जागा पटकावली. विजयीविराच्या आवेशात आजूबाजूला इतरांना मिळेल त्या जागेवर बसताना पाहिले आणि समोरच्या सीटवर नजर गेली तसा एक सौम्यसा झटका बसला..!

आता हा झटका वरवर जरी गोड वाटला तरी झोप उडवून टाकणारा असतो हा माझा आजवरचा अनुभव. माझ्या समोरच्याच सीटवर, अगदी समोरच एक षोडशवर्ष उलटून फार वर्षे झाली नसावीत या वयाची एक मुलगी. अर्थात सुंदरच. काही सुंदर मुली महिलांच्या डब्यातून प्रवास न करता पुरुषांच्या, भले आता तुम्ही त्याला जनरल डब्बा म्हणा, पण आमच्या डब्यातून का प्रवास करतात हे मला आजवर न उलगडलेले कोडे. कदाचित तिचा जोडीदार जवळच कुठेतरी असावा किंवा पुढच्या स्टेशनवर चढणार असावा असे मनात येऊन गेले. पण तिच्या आसपासच्या भरलेल्या जागा पाहता त्याचीही शक्यता कमीच होती. तसेही ती मुलगी एकटी होती की दुकटी होती याने काही फरक पडत नव्हता. माझ्या झोपेचे जे काही खोबरे व्हायचे आहे ते होणारच हे निश्चित होते..!

सकाळचा डॉकयार्ड ते बेलापूर हा ट्रेनचा तासाभराचा प्रवास म्हणजे तासाभराची झोप. बरे, ही झोपही फार महत्वाची असते कारण आदल्या रात्री झोपायचा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी उठायचा टाईम ठरवताना त्या हिशोबात ही तासाभराची झोपही मोजली गेलेली असते. सकाळी ट्रेन खालीच मिळत असल्याने खिडकीची मोक्याची जागाही रोज हमखास मिळतेच. ऑफिसची बॅग वरच्या रॅकवर टाकून खिडकीला रेलताक्षणीच पुढचे स्टेशन यायच्या आधीच माझी गाडी स्वप्ननगरीत पोहोचलेली असते. घरून निघताना मी चहा देखील एखादा घोटच पिऊन येतो, जेणेकरून झोपेचा अंमल तसाच राहावा. कधी बाजूच्या एखाद्या प्रवाशाची गाणी त्याच्या मोबाईल मधून बाहेर येत असतील तर त्यालाही लगेच कानात हेडफोन घालून ऐकायची विनंती करतो. अश्या या माझ्या प्राणप्रिय निद्रादेवीची आराधना करण्यापासून मला रोखायला आता ही मेनकादेवी माझ्या समोर येऊन बसली होती..!!

आजच्या यंगिस्तानला साजेसाच असा जीन्स-टॉप पेहराव. कानात गाणी ऐकण्यासाठी लावलेली हेडफोनची वायर गळ्यातून जात मांडीवरच्या पर्समध्ये लुप्त झालेली. त्या पर्सवरच उघडे करून ठेवलेले ईंग्लिश नॉवेल. थोड्या थोड्या वेळाने पाण्याची एक छोटीशी बॉटल काढून घोट घोट संपवणे. दर पाच-सात मिनिटांनी पर्समधून मोबाईल बाहेर काढून गाणे बदलणे. मध्येच गालावर रुळणार्‍या केसांच्या बटा कानामागे अश्या काही खोचणे की दुसर्‍याच मिनिटाला त्या खात्रीने पुन्हा घसरत खाली येणार. हे सारे करताना नजर मात्र पुस्तकातच खिळलेली. फार तर फार प्रत्येक स्टेशन आल्यावर खिडकीच्या बाहेर नजर टाकून कुठले स्टेशन आले हे बघणे पण ट्रेनमधील प्रवासी अस्तित्वातच नाही या आविर्भावात बसणे. आणि तरीही ट्रेनमधील अर्ध्या अधिक नजरा तिच्याच दिशेने खिळलेल्या असणे… ज्यात तिच्या अगदी समोरच बसलो असल्याने.. नाईलाजानेच.. माझीही एक..!!

पुर्ण प्रवास माझा पापण्या मिटून झोपी जायचा प्रयत्न चालूच होता. पण समोर एक सुंदर मुलगी बसली आहे हा विचार डोक्यातून जो पर्यंत जात नाही तोपर्यंत झोप येणे कठीणच होते. थोड्याथोड्या वेळाने डोळे किलकिले करून ती अजून तिथेच आहे याची खात्री करून घ्यायचो. अनायासे तिला बघणेही व्हायचे. त्यातही कधी तरी ती सुद्धा आपल्याकडे बघेल आणि नजरानजर होईल हा आशावाद असायचा. पण समोरासमोर बसूनही हा योग काही जुळून येत नव्हता. त्यामुळे मी देखील हट्टाला पेटलो होतो. एकदा का किमान तेवढे तरी झाले की मग झोपून जाऊ असा विचार करून माझे वारंवार तिच्याकडे बघणे चालूच होते. कुर्ल्याला मात्र गोगांट करत प्रवाश्यांचा एक लोंढा चढला आणि तिने इथे तिथे नजर फिरवतानाचा एक कटाक्ष माझ्यावरही टाकला. अगदी धन्य झाल्यासारखे वाटले. झोप तर उडालीच, पण मी देखील माझे पेंगुळलेले डोळे ताणून चेहरा फ्रेश कसा दिसेल हे बघू लागलो. झोप काय आता आपल्याला येत नाही हे मी समजून चुकलो त्यामुळे तो प्रयत्नही सोडला. उलट माझी झोप पुर्ण झाली या आविर्भावातच एक आळस दिला आणि कधी खिडकीच्या बाहेर तर कधी तिच्याकडे बघू लागलो. पुढे कधीतरी बेलापूरच्या दोन स्टेशन आधी ती माझ्याकडे न बघताच उतरली आणि तिच्या नादात मी माझी झोप गमावून बसलो या विचाराने पुन्हा माझी झोप उडाली..!!

आता दोन स्टेशनसाठी काय झोप घेणार, उगाच गाढ झोपलो तर परत उलटे मुंबईच्या दिशेने जायचो म्हणून मग गर्दीतून रस्ता काढत दारावर जाऊन उभा राहिलो. थंड हवा तोंडावर फेकली गेली तसे डोळे उघडले अन डोकेही. एक वैश्विक नियम आज मला पुन्हा नव्याने समजला आणि तो म्हणजे जेव्हा एखादी सुंदर मुलगी समोर येते तेव्हा ती पुरुषाची झोप उडवून टाकते..!!!

ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत जगातील समस्त स्त्रीवर्गावर चिडलेले माझे ध्यान रिसेप्शन काऊंटरवरच्या बिनिता चॅटर्जीला पाहताचक्षणी नरम पडले. मस्टरमध्ये नाव शोधायचे नाटक करून तिच्या सहवासातले दोन क्षण वाढवले आणि माझ्या प्रेमाने म्हटलेल्या गूडमॉर्निंगला तिचे तेवढ्याच लाडिकपणे परत आलेले अभिवादन (त्यामागील औपचारिकतेकडे दुर्लक्ष करत) स्विकारून मी माझ्या डेस्ककडे निघालो. तिथे दोन मुली माझी अगोदरच वाट बघत होत्या. अर्थात कामासाठी. दोन्ही माझ्या टीम मेंबर होत्या. गेले वर्षभर आम्ही एकत्रच काम करत होतो. आम्हा तिघांची बसण्याची जागा देखील इतरांपेक्षा वेगळी आणि एकत्र होती. टीममधील इतर सारे मला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे चिडवून मी किती लकी आहे हे सांगतानाच ते माझ्यावर जळतात हे ही नकळतपणे सिद्ध करून जायचे. पण मला मात्र त्या दोघी कितीही सुंदर असल्या तरी त्यांच्याबद्दल फारसे आकर्षण वाटत नाही हे त्यांना कसे पटवून द्यावे हे समजायचे नाही. कारण मुळात ते का नाही हे मलाच आजवर समजले नव्हते..!

थोड्याच वेळात कामात गुंतून गेलो. पण सकाळचे सारे प्रसंग अजूनही डोक्यात घोळत होते. अर्थात, धडे तेवढे विसरून गेलो होतो. लंच टाईम झाला. यावेळी दुसर्‍या टीममधील आणखी दोन मुली जेवायला बरोबर येतात. यांच्याबद्दल मात्र मला कमालीचे आकर्षण आहे पण या फक्त जेवणापुरत्याच काय ते सोबत असतात. त्यातल्या एकीने आणलेल्या पचपचीत चवीच्या पनीर पालकची तारीफ करून झाली. केलेली स्तुती मनापासून आहे हे सिद्ध करण्यासाठी ते पनीर नामक रबराचे तुकडे चावावेही लागले. वर आमच्या बायकोला नाही हा असले काही जमत हे ही बोलून झाले. भले चार दिवसांपूर्वीच आमच्या हिने केलेल्या मटर-पनीर वर तिनेही ताव मारून का झाला असेना तरीही माझे हे वाक्य खरे मानून त्यावर तिचे लाडीक हसणे. बस या हसण्यासाठीच हे सारे. या सार्‍यातही एक धडा लपला होता. पण हे रोजचेच असल्याने आणि मी यातच खुश असल्याने मला तो धडा शिकण्यात जराही रस नव्हता.

लंचब्रेक वरून परत आलो तशी एक न्यूज समजली. दुपारनंतर एक मीटींग होती. आमच्या कंपनीकडे आलेले जास्तीचे काम आम्ही काही छोट्यामोठ्या कन्सल्टंसींना सोपवतो. त्याचा त्यांना पुरेसा मोबदलाही देतो. अपेक्षा असते की त्यांनी ते काम वेळेत, तसेच आम्हाला जो दर्जा अपेक्षित आहे त्यानुसार करणे. पण अशीच एक छोटी कंपनी दिलेले काम पुर्ण करायला उशीरही करत होती आणि त्यांच्या चुकाही बर्‍याच निघत होत्या, ज्या मग ऐनवेळी इथे आम्हालाच दुरुस्त कराव्या लागायच्या. ही मीटींग त्या संदर्भातच होती. मी आणि माझा बॉस, त्यांना झापायचे ठरवूनच मीटींगला निघालो. अर्थात, झापायचे काम माझा बॉस करणार असला तरी त्यांच्या सर्व चुकांचे बहिखाते मांडायचे काम माझे होते.. पण……! पुन्हा एकदा …….!!

खरे तर तिला पाहताक्षणीच मला सावध व्हायला हवे होते. तसे मी झालो ही होतो. मनाला बजावलेही होते, की तिने कितीही लाडिकपणा दाखवला तरी भुलायचे नाही, कर्तव्यात कसूर करायची नाही. आतापर्यंत त्यांनी सबमिट केलेल्या सर्व ड्रॉईंग शीटस आणि कॅलक्युलेशन रीपोर्ट माझ्याजवळ होते, त्यातील चुकाही मार्क करून झाल्या होत्या पण ऐनवेळी मी माझ्याही नकळत माझ्या बॉसपासून त्या झाकल्या. दोनचार चुका ज्यांचा परीणाम फारसा गंभीर नव्हता अश्याच सादर केल्या.. हो, मी फसलो, कारण मी तिच्या ज्या अदांचा सामना करायची मनाची तयारी करून गेलो होतो त्या तिने दाखवल्याच नाहीत.. तर, एक वेगळेच रूप दाखवले जे फार निरागस होते. तिच्याबरोबर तिचाही बॉस आलेला. मी तिच्या कामातील चुका काढल्यानंतर तो तिची काही गय करणार नव्हता हे मला तिच्या भेदरलेल्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.. चंद्रासारखा चेहरा आणि त्याला लागलेले भितीचे ग्रहण.. मग काय, या परिस्थितीत जगातल्या कोणत्याही पुरुषाने जे केले असते… मी तेच केले..!

आपल्यात याला माणुसकी म्हणतात.. तर, जेव्हा समोरचा माणूस ही एक स्त्री असते तेव्हा स्त्री-दाक्षिण्य म्हणतात.. पण ती समोरची स्त्री जेव्हा एक सुंदर तरुणी असते तेव्हा मात्र या मदतीला का वेगळ्या नजरेने बघितले जाते हे मला आजवर न उलगडलेले कोडे. माझ्या बॉसची तशीच नजर झेलत मी माझ्या डेस्कवर परत आलो आणि दुसर्‍याच मिनिटाला माझ्या टेबलवर फाईलींचा एक गठ्ठा येऊन आदळला. सकाळपासून केवळ धडेच मिळत होते, पण त्यातून काहीच धडा न घेतल्याने आता ही शिक्षा मिळाली होती..!!

त्या फाईलींमध्ये तोंड खुपसून पडल्यापडल्याच साडेपाच वाजले पण आज एवढ्यात सुटका नव्हती. बायकोला तू हो पुढे म्हणून फोन लावला आणि पुन्हा स्वताला त्या फाईलींच्या ढिगार्‍यात गाडून घेतले ते साडेआठलाच बाहेर पडलो. ट्रेनला गर्दी कमी मिळते हाच काय तो जास्त उशीरापर्यंत थांबण्याचा फायदा. पण त्याचबरोबर महिला सहप्रवाश्यांचे प्रमाण कमालीचे घटते हे नुकसानही बोलू शकतो. स्टेशनला पोहोचेपर्यंत नऊ वाजले. फर्स्टक्लासचा डब्बा अपेक्षेप्रमाणे बर्‍यापैकी खाली. कोपर्‍यातली जागा बघून बूट काढले आणि समोरच्या सीटवर पाय पसरून बसणार इतक्यात नजर बाजूच्या सीटवर गेली… तिथे दोन-तीन पांढरपेशा बायका बसल्या होत्या. आता बायकांची जमात बहुतांशी पांढरपेशा प्रकारातच मध्येच मोडते किंवा त्या कश्याही असल्या तरी आपल्याला मात्र त्यांच्यासमोर आपली वर्तणूक नीटनेटकीच ठेवावी लागते. पाय पुन्हा बुटात घुसवले आणि त्यांच्या तिथून उठायची वाट बघू लागलो. पण त्यांनाही मला डॉकयार्डपर्यंतच सोबत करायची होती..!

रिकाम्या लिफ्टमध्ये शिरलो आणि थोड्यावेळासाठी का होईना स्त्री विरहीत जगात आलो या कल्पनेने एक आचकट विचकट अंगविक्षेप करत आळस देऊन दिवसभराचा थकवा झटकायला गेलो तेवढ्यातच लिफ्ट दुसर्‍या मजल्यावर थांबली….. त्या दोघींना जागा देत, मी लिफ्टच्या एका कोपर्‍यात सरकत दहावा मजला येईपर्यंत गपगुमान हाताची घडी घालून उभा राहिलो..!

दिवसभराचे चांगलेवाईट अनुभव जमा करत मी अखेर माझ्या घरट्यात परतलो होतो. आज सकाळची ट्रेनमधील अधुरी झोप आणि उद्या परत पुन्हा तसेच होण्याची भिती म्हणून मी पटकन जेवण उरकून लगोलग बेडरूममध्ये झोपायला गेलो. पण झोप काही येत नव्हती. छताकडे डोळे लाऊन, दिवसभरात पाहिलेले चेहरे आठवत तसाच जागा होतो. पाऊण एक तासाभराने माझी बायको आपले काम उरकून आत आली आणि दिवा मालवून माझ्या जवळ लवंडली. दुसर्‍याच क्षणी मी डोळे मिटले ते अलार्म वाजल्यावरच उघडायला… हा आजच्या दिवसाचा माझा अखेरचा धडा होता… जेव्हा आपली हक्काची बायको जवळ येते तेव्हा…………!!!

…तुमचा अभिषेक

 

माय ईंग्लिश वॉल्कींग..!

मी एक पसरट भांड्यातील राजकुमार आहे ज्याचे विचार क्षितिजापलीकडे जाऊन अंधुक होतात..

पण या जगात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे भविष्यापलीकडे जाऊन बघण्याची शक्ती असते..

माझे आईवडील अश्यांपैकीच एक..

काय, कसे, नेमके कश्यामुळे, माहीत नाही पण माझ्या आईवडीलांनी मी पाळण्यात असतानाच ओळखले की माझे ईंग्रजी भाषेचे ज्ञान इतर मध्यमवर्गीय मराठी मुलांच्या मानाने फार कच्चे आहे… आणि… तिथेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला… माझे सारे शिक्षण शुद्ध मराठी माध्यमाच्या शाळेतूनच होण्याचा..

येत्या एक-दोन वर्षात मी “d फॉर बॉल” आणि “b फॉर डॉल” बोलून त्या निर्णयावर शिक्कामोर्तबही केले आणि माझी रवानगी अखिल भारतीय मराठी एज्युकेशनच्या आचार्य धोंडू केशव पाटकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात झाली.

तसे पाहता आजही मी b आणि d ही दोन ईंग्रजी मुळाक्षरे सुटी सुटी लिहिली की गोंधळ हा हमखास घालतोच ही गोष्ट वेगळी, परंतु माझ्या सारख्या “द ग्रेट ब्रिटीश ऑफ ईंडीया”ला त्यांनी मराठी माध्यमात टाकून माझी ईंग्रजी भाषेपासून सुटका केली की मला आणखी त्या भाषेचा गुलाम बनवून ठेवले याचे उत्तर मी आजतागायत शोधतोच आहे. कारण आमच्या शाळेचे माध्यम मराठी असले तरी ईंग्रजी हा विषय एक भाषा म्हणून नेहमी ईंग्लिश मधूनच शिकवला जायचा.

बस्स, माझ्या याच “ई-लर्निंग वाटचालीचा वृत्तांत” म्हणूनच हा माझा लेख… माय ईंग्लिश वॉल्कींग..!

त्या काळी… आता इथे माझे वय कोणाला समजू नये म्हणून नेमके वर्ष सांगत नाही… पण तेव्हा आमच्या शाळेत पहिली ते चौथी ईंग्रजी असा वेगळा विषय नव्हता. म्हणजे त्याची परीक्षा घेतली जायची नाही की त्याचे गुण अंतिम निकालात धरले जायचे नाहीत, तरी पाचवीत गेल्यावर मुलांना ईंग्रजी हा विषय अचानक अवघड पडू नये म्हणून केवळ अक्षरओळख दिली जायची. आता ही अक्षरओळख म्हणजे ईंग्रजीची २६ मुळाक्षरे एवढेच एखाद्याला वाटेल पण ती मुळाक्षरे मुळात सव्वीस नसून तब्बल बावन्न होती. त्यातील २६ जणांना ईस्मॉल बोलले जायचे तर २६ कॅपिटॉल होती. उच्चार तसाच करायला लावायचे पण गिरवण्याचे कष्ट मात्र उगाचच्या उगाच डबल झाले होते. व्यवहारज्ञान आणि कुतूहलशास्त्रात तल्लख असलेल्या माझ्या मेंदूला तेव्हाही हा प्रश्न छळायचा की असे का बरे केले असावे. पण बाई मात्र याचे उत्तर पाचवीत गेल्यावरच समजेल असे बोलून मला गप्प करायच्या. कदाचित अभ्यासक्रमाच्या बाहेरचे शिकवण्याची त्यांना परवानगी नसावी. मी मात्र माझ्या तर्कबुद्धीचा वापर करून बावन्न पत्त्यांच्या कॅटशी याचा काहीतरी संबंध असावा असे ठरवून मोकळा झालो होतो. पण पाचवीत गेल्यावर जेव्हा मला समजले की फक्त वाक्याची किंवा एखाद्याच्या नावाची सुरुवात करण्यासाठी… आणि तेवढ्या आणि तेवढ्यासाठीच म्हणून… त्यातील केवळ एक आणि एकच अक्षर वापरले जाते… त्याच क्षणी मला आजवर शिकलेले-शिकवलेले अर्धे ईंग्लिश अक्षरश: फुकट गेल्यासारखे वाटले. जे शिकणे फारसे worth नव्हते त्यासाठी मी उगाच माझा वेळ व्यर्थ घालवल्यासारखे वाटले. आपली फार मोठी फसवणूक झाल्यासारखे वाटू लागले.

बालमनावर झालेल्या त्या आघातातून शेवटपर्यंत ना मी सावरलो ना माझे ईंग्लिश. ईंग्रजी माझ्या पाचवीलाच पूजली आहे असे मला पाचवीला असतानाच वाटू लागले. परंतु मला कल्पना नव्हती की पाचवीच नव्हे तर सहावी, सातवी, आठवी, आणि आता यापुढची सारी शैक्षणिक वर्षे या विषयामुळे माझी आरती ओवाळली जाणार होती.

पाचवीत हुशार मुलांच्या “अ” तुकडीत असलेलो मी ईंग्रजीमध्ये काठावर उत्तीर्ण झाल्यामुळे सहावीला “ब” तुकडीत गेलो. पण ईंग्रजी तिथेही माझी वाट बघत होती. असे म्हणतात की देव कोणत्याही रुपात येतो. असुराचेही तसेच असावे. यावेळी हा ईंग्रजी नावाचा राक्षस मला करमरकर बाईंच्या रुपात भेटला होता. करमरकर बाई म्हणजे अस्सखलित ईंग्रजीचा बदाबदा वाहणारा झराच जणू. फाड फाड ईंग्रजी बोलून त्या आम्हा कच्याबच्यांना अक्षरश: फाडून खायच्या. या चुकून मराठी माध्यमाच्या शाळेत नोकरीला लागल्या असाव्यात. यांना ऑक्सफर्ड-केंब्रिज अश्या एखाद्या परदेशी विद्यापीठात नाहीतर गेला बाजार सेंट पीटर, सेंट लुईस अन्यथा डॉन बॉस्को, वॉस्को द गामा तत्सम नावाच्या कॉंन्वेंट शाळेतच असायला हवे होते. यांच्या तोंडून चुकून.. चुक्कून एक मराठी शब्द बाहेर पडेल तर आईशप्पथ.. आई वरून आठवले, यांना कधी लागले, काही झाले, तरी “आई ग्ग..”च्या जागी देखील यांच्या तोंडून “ओह जीझस” बाहेर पडायचे. यांचे हेच कलागुण ओळखून आम्ही त्यांचे नामकरण करमरकरबाईंच्या जागी “डू-डाय-डू-मॅडम” केले होते.. नाही समजले.. तर मग जरा कर-मर-कर यांचे ईंग्रजी भाषांतर करून बघा…

ईंग्रजी भाषा ही ईंग्रजी बोलूनच शिकवली पाहिजे अश्या ठाम मताच्या असलेल्या करमरकरबाईंना हे कधी समजलेच नाही की त्या ज्यांना ईंग्रजी शिकवत होत्या त्यांचे ईंग्लिश टॉल्किंग आईला मम्मी बोलण्याच्या पलीकडे कधी गेलेच नव्हते.

वर्ष अखेरीपर्यंत मी करमरकर बाईंच्या कृपेने “हाय, हेल्लो, हाऊ आर यू” आणि सकाळ संध्याकाळ “गुडमॉर्निंग, गुडनाईट” बोलायला शिकलो होतो, पण त्याचा गुणतालिकेशी काही संबंध नसल्याने अंतिम परीणाम मात्र व्हायचा तोच झाला. सिक्स्थ स्टॅंडर्डच्या त्या वर्षाला त्यांनी मारलेले सारे सिक्सर माझ्या डोक्यावरून गेले आणि मी मोठ्या दिमाखात “सहावी ब” मधून “सातवी क” मध्ये प्रवेश केला.

सातवीला मात्र पहिल्याच दिवशी बर्वे बाईंना शुद्ध मराठी मध्ये ईंग्रजी शिकवताना पाहून हे वर्ष माझ्यासारख्या सार्‍या मराठी भाषिकांना शांतीचे, सुखसमाधानाचे आणि गुणांच्या भरभराटीचे जाणार यात मला कोणतीही शंका वाटली नाही. पण ती माझी शंका लघुशंकाच ठरली आणि चारच दिवसात माझा भ्रमनिरास झाला. तर या बर्वे बाईंनी केले काय, वर्गातील सार्‍या मुलांचे बसण्याच्या जागेवरून चार गट पाडले आणि ईंग्रजी-ईंग्रजीचा खेळ सुरू केला. प्रश्नमंजूषेसारखे त्या प्रत्येक गटातील कोणत्याही मुलाला उठवून प्रश्न विचारायच्या आणि त्याचे बरोबर उत्तर दिल्यास त्या ग्रूपला गुण मिळायचे. सरतेशेवटी जिंकेल त्या ग्रूपला बक्षीस म्हणून टाळ्यांचा कडकडाट आणि हरेल त्या ग्रूपला गृहपाठाचा प्रसाद मिळायचा. जेमतेम पाचसहा दिवस काय ते त्यांनी व्यवस्थित शिकवले आणि त्यानंतर मात्र प्रत्येक तासाला त्यांचा हा खेळ चालू झाला.. नव्हे हीच त्यांची शिकवण्याची पद्धत होती..

हसतखेळत शिक्षा अभियानाच्या पुरस्कर्त्या बर्वे बाईंना हे समजत नव्हते की त्यांचा खेळ होत होता मात्र माझ्यासारख्यांचा.. नव्हे माझाच.. जीव जात होता..

त्याचे व्हायचे काय, त्या प्रत्येक ग्रूपमधील कोणत्याही मुलाला उठवायच्या आणि ज्याला उत्तर देता यायचे नाही त्याचा चेहरा लक्षात ठेवायच्या. अश्यांना पुढच्या वेळी बरोबर हुडकून पुन्हा पुन्हा न चुकता उठवायच्या. अश्यातच माझे ईंग्रजीचे दिव्य ज्ञान फार काळ काही त्यांच्यापासून लपून राहिले नाही. मी स्वताही त्यांच्या नजरेस पडू नये म्हणून याच्या त्याच्या आडोश्याला किंवा पेन-पेन्सिल पडली म्हणून बाकाखाली लपायचे जे प्रयत्न केले ते ही व्यर्थ ठरले. परिणामी दहापैकी पाच प्रश्न मलाच विचारले जाऊ लागले ज्यांचे गुण प्रश्न विचारायच्या आधीच “शून्य” हे ठरलेलेच असायचे. बरे त्यांचा आणखी एक दुष्टपणा म्हणजे मला मुद्दाम सोपे प्रश्न विचारले जायचे जेणे करून माझी आणखी फजिती व्हायची. मी सोडून माझ्या ग्रूपमधील सार्‍यांना त्याचे उत्तर येत असल्याने ते माझ्यावर आणखी चिडायचे. त्यातूनही नाही चिडले तर दर दोन प्रश्नांनतर बर्वे बाईंचा एक डायलॉग ठरलेलाच असायचा, “या नाईकमुळे तुमचा ग्रूप हरणार असे दिसतेय..” .. आणि सरतेशेवटी तेच होणे असायचे.

दिवसभर वर्गात हिरोसारखा वावरणारा मी त्या तासाला मात्र व्हिलन बनून जायचो. प्रत्येक जण मी त्यांच्या रांगेत बसून त्यांच्या ग्रूपमध्ये येऊ नये म्हणून मला वाळीत टाकल्यासारखा वागायचा. पण पुढच्या वर्षी नवीन बाई येतील आणि नवीन चित्रपट सुरू होईल याची वाट बघण्यापलीकडे माझ्याकडे काही पर्याय नव्हता. कारण ही मानहानी टाळण्यासाठी ईंग्लिश सुधारणे हा पर्याय मला ईंग्रजांविरुद्ध लढलेल्या स्वातंत्र्यसंग्रामापेक्षा खडतर वाटत होता. पण अखेरीस.. कसे बसे.. रडतखडत.. सात समुद्र पार केल्यासारखे.. हे सातवीचे वर्ष ही सरले.. आणि मी आठवीत गेलो………. अर्थात…. “आठवी ड” मध्येच.

यावेळी माझा सामना होता तो चौधरी बाईंशी. या आधी चौधरी हे नाव मी केवळ चाचा चौधरी या कॉमिक्समध्येच वाचले असल्याने चौधरी म्हणजे एक दिलखुलास व्यक्तीमत्व याच गैरसमजात होतो… फार काळ टिकला नाही माझा हा समज.. नवीन वर्षाच्या पहिल्याच तासाच्या सतराव्याच मिनिटाला त्यांनी मला त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता शेजारच्या मुलाशी गप्पा मारत असताना म्हणून पकडले आणि उठवले. माझी पुरेशी कानउघाडणी करून झाल्यावर त्यांना त्यांच्या ईंग्रजी शिकवणीचा शुभारंभ माझ्यापासूनच करण्याचा मोह झाला आणि सातवीत काय काय शिकलात याची उजळणी म्हणून आपल्या प्रश्नांची तोफ माझ्यावर डागली. मी त्या तोफेच्या भडीमारापुढे फार काळ टिकू शकत नाही हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सौम्य गोळीबाराला सुरुवात केली. त्यापुढेही माझा निभाव लागला नाही तसा त्यांनी सुरसुर्‍या आणि फुसकुल्या सोडायला सुरुवात केली. पण त्यातही मी धारातीर्थी पडलो. हे बघून त्या जाम उसळल्या. ज्या मुलाला ईंग्लिशची स्पेलिंग ” I ” वरून सुरू होते की ” E ” वरून हे देखील माहीत नाही तो त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता खुशाल गप्पा मारत होता यामुळे त्यांचा रागाचा पारा आणखी चढला. हे म्हणजे असे झाले की रेल्वे टी.सी. ने एखाद्याला रेल्वेचे रूळ ओलांडताना पकडावे आणि तो वर विदाऊट तिकीट ही निघावा. अश्यावेळी तो टी.सी. अश्यांचे काय करतो हे त्याचे त्यालाच ठाऊक पण मला मात्र उरलेला पुर्ण तास शेवटच्या बाकावर उभा राहून काढावा लागला.

आता ही फक्त सुरुवात होती हे तुम्हाला नव्याने सांगायला नकोच.

पुढे जाऊन त्या बाकाची ओळख “नाईकचा बाक” अशी झाली. एका टारगट मुलाने त्या बाकाच्या मागच्या भिंतीवर वरच्या बाजुला “नाईक” नाव लिहून त्याखाली एक बाण खेचला जो मी त्या बाकावर उभा राहिलो की बरोबर माझ्या डोक्यावर यायचा. आजूबाजुच्या दोनचार वर्गातील मुलांनाही एव्हाना हे समजले होते. येताजाता ईंग्लिशच्या तासाला आमच्या वर्गात डोकावणार्‍यांची संख्याही हळूहळू वाढू लागली होती. पण बघता बघता हे ही एक मानहानीकारक वर्ष अखेर सरले आणि माझी इतर विषयांतील हुशारी पाहता मला नेहमीसारखे ईंग्लिशमध्ये अतिरिक्त गुण देऊन माझी बढती “नववी ई” च्या वर्गात झाली.

आता मी पुरता कोडगा झालो होतो. जोपर्यंत आपण शिकणार तोपर्यंत हेच आपले प्राक्तन आहे हे मी समजून चुकलो होतो. काही जण माझ्या जखमेवर मीठ चोळायला म्हणून मला “अ‍ॅबी”, “नॅक्सी” अश्या ईंग्लिश नावांनी चिडवू लागले होते. पण हे ही मी हल्ली न चिडता एंजॉय करू लागलो होतो. मी आता वाट बघत होतो ती नवीन वर्षात येणार्‍या… आणि मला वर्षभर घेणार्‍या… नवीन ईंग्लिशच्या बाईंची… पण हाय रे माझे दुर्दैव.. पुन्हा माझ्या नशिबी आल्या त्या चौधरी बाईच..!

नवीन वर्षात काही नवीन शिक्षा प्रकार शिकायला मिळतील असे वाटले होते. पण आता तेच ते मागच्या बाकावर उभे राहणे. त्यांना पाहताच मी स्वताहूनच वर्गाच्या शेवटी एखादा बाक रिकामा आहे का म्हणून शोधू लागलो. पण त्यांनी मात्र मला गोड धक्का दिला. मला चक्क पहिल्या बाकावर बसवले. तास संपेपर्यंत मला एकही प्रश्न विचारला नाही. हे ही काय कमी म्हणून शिकवता शिकवता अधून मधून माझ्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. त्यांची ही आपुलकी माया ममता ललिता मला सहन होत नव्हती. त्यांच्या प्रत्येक स्पर्शागणिक गहिवरून यायला लागले. बसून बसून माझी पाठ दुखायला लागली होती, माझ्या मांड्या अखडल्या होत्या. वाटले की स्वताच हात वर करून प्रश्न विचारण्यासाठी म्हणून उभे राहावे. पण सरतेशेवटी तास संपायच्या आधी त्यांनीच मला उठवले आणि आतापर्यंतच्या गोंजारण्या-चुचकारण्याचा अर्थ मला स्पष्ट झाला. पुर्ण तासभर आपण काय काय शिकलो याचा सारांश त्यांनी मला थोडक्यात सांगायला लावला.

पहिल्या बाकावर बसलो असलो तरी माझी नजर खिडकीच्या पलीकडे आणि मन त्याही पलीकडल्या मैदानात असल्याने माझे त्यांच्या शिकवण्याकडे जराही लक्ष नव्हते. तसे लक्ष देऊनही कधी समजले होते म्हणा, पण निदान कानावर पडलेले चार शब्द पोपटपंची केल्यासारखे बोललो तरी असतो.. छ्या.. पण आता मात्र शुंभासारखा उभा होतो. त्यातल्यात्यात एकच समाधान की तास संपत आला होता. मात्र पुढच्या तासाला सुरुवातीपासूनच मागच्या बाकावर उभे राहावे लागणार याची मनाची तयारी करून ठेवली होती. पण चौधरी बाईंच्या मनात काहीतरी वेगळेच होते. पुढचा तास पी.टी. चा म्हणजेच शारीरीक शिक्षणाचा होता. त्या सरांकडून त्यांनी स्पेशल परवानगी घेतली होती की याचे शारीरीक शिक्षण आता मी घेते म्हणून.. त्यानंतर आमच्या तासानंतर ज्या वर्गावर त्यांचा तास असायचा तिथे त्या मला घेऊन जायच्या आणि त्या परक्या वर्गात अनोळखी मुलांसमोर मला कान धरून उभ्या करायच्या. जर तो दहावीचा वर्ग असेल तर ती सिनिअर मुले चिडवून माझे रॅगिंग घ्यायचे तर याउलट ज्युनिअर मुले अश्या काही नजरेने माझ्याकडे बघायची की मी शरमेने पाणी पाणी व्हावे. माझ्या कोडगेपणाची देव जणू परीक्षाच घेत होता. मी देखील त्या मुलांना उलटून चिडवायला लागलो हे लक्षात येताच बाईंनी मला भिंतीकडे तोंड करून उभे करायला सुरुवात केली.

शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी माझे खरोखरच शारीरीक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. कधी ओणवे उभे करायच्या तर कधी कधी अंगठे पकडायला लावायच्या. कधी कोंबडा बनवायच्या तर कधी वेगवेगळी कष्टप्रद आसने करायला लावायच्या. कैची हा त्यांचा आवडता प्रकार. यासाठी त्या नवीन वर्गातील एखाद्या मुलालाही शिक्षा म्हणून माझ्या जोडीला उभ्या करायच्या. कैची म्हणजे एकमेकांचे कान किंवा अंगठे पकडून उभे राहणे. त्यातही कोंबडा बनून एकमेकांचे कान पकडणे हा काय अवघड प्रकार असायचा याची एकदा स्वताच कल्पना करून बघा. या कैची प्रकारासाठी सातवीतल्या एका अभिजीत नावाच्या मुलाशी माझी जोडी जरा जास्तच जमायची. सुदैवाने तेव्हा दोस्ताना वगैरे चित्रपट नव्हते.. नाहीतर… असो..

थोडक्यात काय, तर आता माझी कीर्ती अक्ख्या शाळेत पसरली होती. मला खात्री होती की जेवढ्या आतुरतेने आता मी नवीन वर्षाची आणि नवीन बाईंची वाट बघत होतो त्यापेक्षाही जास्त उत्सुकतेने त्या माझी वाट बघत असणार. फरक फक्त इतकाच की या वाटाघाटीत वाट मात्र फक्त माझीच लागणार होती…

“चल, ABCD बोलून दाखव…”

“काय…???” मी जवळपास उडालोच.

‘दहावी फ’ चा वर्ग आणि फर्स्ट डे फर्स्ट शो…

एखादी कविता, सुभाषित, श्लोक नाहीतर एखादे गाणेच बोलून दाखव असे म्हणाल्या असत्या.. पण नाही.. नवीन बाईंनी आल्याआल्याच माझ्याकडे ही अजबच फर्माईश केली होती.

या नवीन बाईंचे नाव सहस्त्रबुद्धे बाई… नावावरून एखाद्या संस्कृतच्या शिक्षिकाच वाटाव्यात.. आणि तसेच होते.. ईंग्रजी शिकवण्याचे हे त्यांचे पहिलेच वर्ष.. या आधी गेले बारा वर्षे त्या संस्कृतच शिकवत होत्या. जसे संस्कृतमध्ये रामा रामौ राम: अशी रुपे पाठ करून घेतात तसेच या देखील माझ्याकडून ईंग्लिश बाराखडी पाठ करून घेण्याच्या इराद्यानेच आल्या होत्या.

तसे पाहता “पाचवी अ” ते “दहावी फ” च्या आजवरच्या प्रवासात माझी “ए” पासून “एफ” पर्यंतची ABCD आयुष्यभराची तोंडपाठ झाली होती. पण त्यापुढची येते की नाही हे चाचपण्याचा योग कधी आला नव्हता. तरीही जे चौथी-पाचवीलाच केले आहे ते काय चुकणार असा एक आत्मविश्वास होताच. आणि त्याच जोडीला गाठ ईंग्लिश भाषेशी असल्याने हा अतिआत्मविश्वास ठरण्याची भिती देखील होती. A B C D ला झोकात घेऊन निघालेली माझी गाडी E F पर्यंत सुसाट वेगात होती. त्यानंतर G H I ला हळूवारपणे स्पर्शून J K L मोठ्या दिमाखात म्हणालो. पण पुढे मात्र M आधी की N या प्रश्नाने खिंडीत गाठलेच.. काही क्षण तिथेच थांबलो.. जरासा रेंगाळलो.. पण ABCD बोलताना एवढी टंगळमंगळ करायची परवानगी नसते हा एक अलिखित नियमच आहे. त्यामुळे मी जरी शांत झालो असलो तरी वर्गातल्या इतर मुलांची चुळबूळ सुरू झाली. एकदा वाटले की परत पहिल्यापासून सुरू करावे, बोलण्याच्या ओघात जे काही पहिला येते ते सवयीनुसार उत्स्फुर्तपणे तोंडातून बाहेर निघेल. पण मग विचार केला की त्यातही आपलीच शोभा होईल की दहावीतल्या मुलाला एका दमात साधे ABCD बोलता येत नाही..

प्रसंग बाका होता. सार्‍या वर्गाचे लक्ष माझ्याकडे लागले होते. आणि मी मात्र “कोंबडी आधी की अंडे आधी” यासारखे “एम” आधी की “एन” आधी या प्रश्नात अडकलो होतो.. अश्यावेळी पुन्हा एकदा माझे तर्कशास्त्र माझ्या मदतीला धाऊन आले. मी मनातल्या मनात आकडेमोड करायला घेतली. N या अक्षरात आडव्याउभ्या तीन दांड्या येतात. आणि त्याचपुढे अजून एक दांडी जोडली की M तयार झाला. छोट्या लिपीत देखील असेच घडते आणि आणखी एक दांडी जोडली की n चा m होतो. म्हणजे ज्याने सर्वप्रथम ईंग्लिश लिपी बनवायला घेतली असणार त्याला पहिल्यांदा तीन दांड्यांचा N सुचला असणार, आणि त्यानंतरच M… या हिशोबाने आधी N आणि नंतर M हे मला स्पष्ट दिसत असले तरी तर्कशास्त्राचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आणखी काही उदाहरणे चाचपल्याशिवाय लगेच कोणत्या निष्कर्शावर येऊ नये. यालाच अनुसरून मी हातोहात O – P चे देखील कसे आणखी एखादी दांडी जोडून Q – R आणि V चा कसा W होतो हे ही पडताळून पाहिले. आता तर माझी पक्की खात्री पटली की आधी N आणि त्यानंतरच M…

हे मला लिहायला जेवढा वेळ लागला असेल त्याच्या निम्म्या वेळेत तुम्ही हे सारे वाचले असेल आणि त्याच्याही निमिषार्धात मी मनोमन हा सारा हिशोब मांडला होता. या सर्व उदाहरणांनी माझ्या तर्काला पुष्टी दिल्यावरच मी माझ्या गाडीला पुन्हा ग्रीन सिग्नल दिला…. पण हाय रे दैवा… या ईंग्लिश भाषेने माझ्या तर्कशास्त्राचीही ऐशीतैशी केली.. N M बोलून मी पुढे “ओ” बोलणार त्याच्या आधीच सार्‍या वर्गातून “ओह” चा स्वर निघाला.. आणि तिथेच माझ्या गाडीला ब्रेक लागला.

पुढची तिमाही ABCD शिकण्यातच गेली आणि मग एके दिवशी एका हिंदी चित्रपटात माधुरीच्या १ २ ३ सारखे A B C D E F G H I….. J K L M… असे काहीसे गाणे आले जे थेट “वाय झेड” ला जाऊन संपत होते. ते कसे काय ठाऊक दोनचारदा गुणगुणताच पाठ झाले… आणि अचानक… मला एक साक्षात्कार झाला… तो म्हणजे चूक सर्वस्वी माझी नव्हती तर आपली शिक्षणपद्धतीच सदोष होती. चूक ही शिकवण्याच्या पद्धतीत होती.. पण आता मी एकटा ही शिक्षणपद्धती बदलू शकत नाही याची जाणीव झाल्याने आमीरखान सारखी इडीयटगिरी न करता रट्टा मारून पास होण्यातच शहाणपणा समजला.

पण नुसते ABCD पाठ करणे पुरेसे नव्हते. वर्ष दहावीचे होते. आजपर्यंत शाळेने प्रत्येक इयत्तेत चढवून इथवर आणले होते पण आता गाठ बोर्डाशी होती. सोळावे वरीस धोक्याचे ते याचसाठी म्हणत असावेत. शाळेचा शंभर टक्के निकालाचा आजवरचा रेकॉर्ड होता जो त्यांना तोडायचा नव्हता. कोणताही खाजगी क्लास मला शिकवणी द्यायला तयार नव्हता ते याच कारणासाठी की त्यांच्या क्लासचे नाव खराब होऊ नये. जे गेल्या पाच वर्षात शिकू शकलो नव्हतो ते मला या एका वर्षात शिकायचे होते. आणि नेमके हेच आव्हान सहस्त्रबुद्धे बाईंनी घेतले होते. ते ही केवळ एकाच अटीवर की मी उत्तीर्ण झालो की त्याचे सारे श्रेय त्यांचे आणि नापास झालो तर मात्र त्याची जबाबदारी माझी स्वताची.

निबंधच्या निबंध माझ्याकडून पाठ करवून घेतले जात होते.. पत्रलेखनाचेही तसेच.. एक तृतीयांश सारांश मात्र आयत्यावेळी लिहायचा असल्याने त्या साठी आम्ही एक वेगळी क्लृप्ती योजली होती. सरळ दोन वाक्य सोडून तिसरे वाक्य जसेच्या तसे लिहायचे.. एक तृतीयांश गुण मिळाले तरी पुरेसे होते.. चेंज द वॉईस हा प्रकार माझ्या डोक्यावरून जात होता.. रामाने आंबा खाल्ला चे आंब्याने राम खाल्ला असे काहीसे मी करत होतो.. माझे पास्ट प्रेजेंट फ्युचर सारे टेन्स झाले होते.. फिल इन द ब्लॅंक्स मला परीक्षेला माझ्या पुढे बसणार्‍या मुलाने प्रश्नपत्रिकेवर लिहून द्यायचे कबूल केले होते.. बदल्यात मी त्याला वर्षभरासाठी माझ्या जेवणाच्या डब्यातील काही हिस्सा द्यायचे कबूल केले होते.. पर्यायापैकी एक निवडा हे मात्र सर्वस्वी त्या दिवशीच्या माझ्या मटका लक वर अवलंबून होते. इतर छोट्यामोठ्या प्रश्नांसाठी सहस्त्रबुद्धे बाई माझी तयारी करून घेतच होत्या.. माझ्यासाठी त्या ईंग्लिशचा एक्स्ट्रा क्लास घेत होत्या.. शारीरीक शिक्षण, हस्तकला, चित्रकला या तासांच्या वेळेतही मला ईंग्लिश आणि ईंग्लिशच शिकवले जात होते.. एवढेच नाही तर माझा मधल्या सुट्टीचा वेळही कमी करून त्या जागी मला ईंग्लिशचा वर्गपाठ करायला लावायचे.. थोडक्यात काय तर मला जबरदस्तीची तहानभूक विसरायला लाऊन माझ्याकडून अभ्यास करवून घेतला जात होता.

अखेर परीक्षा जवळ आली तसे मात्र माझ्या हातापायांना कंप फुटू लागला. आदल्या रात्री वाचलेले सकाळी विसरू लागलो. म्हणून मग पेपरच्या आदल्या रात्री झोपलोच नाही. डोक्याखाली जाडजूड आणि डोळ्यासमोर बारीक अशी दोन ईंग्लिशची पुस्तके घेऊन बिछान्यावर रात्रभर नुसता पडून होतो. परीणाम व्हायचा तोच झाला. परीक्षागृहात पेपर लिहिता लिहिताच झोपी गेलो. झोपल्या झोपल्याही पेपर लिहित होतो.. बाहेर आल्यावर काय लिहिले आणि काय नाही काही आठवत नव्हते. पण जर खरे सांगितले तर आताच ऑक्टोबरची तयारी म्हणून पुन्हा पुस्तक हातात धरायला लावतील या भितीने सार्‍यांना चांगलाच गेला असे म्हणालो. निकालाची जराही उत्सुकता नव्हती पण जेव्हा लागला तेव्हा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ईंग्रजी भाषेत मी तब्बल पंचेचाळीस गुण मिळवून पास झालो होतो. कदाचित वर्षभर जे रटले होते ते झोपेत असल्याने कोणताही ताण किंवा भिती न बाळगता लिहिले असल्याने हे आक्रीत घडले असावे. शाळेत मात्र माझ्या इतिहासाने पुर्ण हंगामा झाला होता. कारण मला इतर विषयांमध्ये खूप चांगले गुण मिळाले असल्याने शाळेच्या इतिहासात पहिल्यांदा “दहावी फ” मधील मुलगा “दहावी अ” च्या मुलांना मागे टाकून पहिल्या पाचात आला होता.

यथावकाश चांगल्या गुणांच्या जोरावर मुंबई विद्यापीठाच्या प्रथितयश कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन देखील झाले. कॉलेज सुरू झाले तरी दहावीच्या यशाची धुंदी अजून उतरली नव्हती. यातही भर म्हणून कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जेव्हा आजूबाजुला मुलामुलींना एकत्र फिरताना पाहिले तेव्हा आणखी हरखून गेलो. कॉलेजमध्ये लेक्चर बसणेही सक्तीचे नसते हे समजल्यावर तर पहिला दिवस कॉलेजच्या कॅंम्पसमध्ये बागडण्यातच गेला. शाळेच्या शिक्षेपासून आता मला स्वातंत्र्य मिळाले आहे असे वरवर जरी वाटत असले तरी इथेही इंग्रजी भाषेचा गुलाम बनून राहणे माझ्या नशीबी येणार आहे याची कल्पना मला लवकरच आली. आजूबाजुची ती फुलपाखरे नक्की कोणत्या माध्यमात शिकून आली होती ठाऊक नाही पण बोलायला तोंड उघडताच ईंग्लिशच झाडत होती. करमरकरबाईंच्या कृपेने “हाय, हेल्लो, हाऊ आर यू” बोलून तो दिवस तर कसाबसा निभावून नेला, पण दुसर्‍या दिवशी लेक्चरला बसल्यावर मात्र सगळीकडे, आय कॅन वॉक ईंग्लिश, आय कॅन टॉक ईंग्लिश अन आय कॅन लाफ ईंग्लिशचेच गुणगाण चालू होते. चांगले गुण मिळवून मोठ्या कॉलेजला आलो ही माझी घोर चूक झाली असे आता वाटू लागले.

या आधी ईंग्लिश हा एक विषय मला समजत नव्हता पण आता मात्र सारेच विषय ईंग्लिशमध्ये शिकवले जात होते. प्राध्यापकही ईंग्लिशमध्येच बोलायचे आणि विद्यार्थीही ईंग्लिशमध्येच शंका विचारायचे. वर्गात काही गुणी बाळासारखी शांत बसणारी मुले देखील होती जी मराठी माध्यमाची होती हे समजायला मला फारसा वेळ लागला नाही. मात्र दुर्दैवाने अश्यांची संख्या अत्यल्प होती, ज्यात एक मी देखील होतो.

दिवसाचे कितीही घंटे अभ्यास केला तरी हा विषय आपल्याला घंटा काय समजणार नाही हे लक्षात येताच माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली आणि शेवटचा मार्ग म्हणून मी देवळातली घंटा वाजवून देवाकडे न्याय मागण्यासाठी निघालो असताना मध्येच मला चर्चच्या घंटानादाने भुरळ घातली. माझ्या आयुष्याने एक वेगळेच वळण घेतली आणि त्या वळणावर मला मोनालिसा भेटली.

मोनालिसा फर्नांडीस ही नावानेच नाही तर धर्मानेही ईंग्लिश होती. मुळातच ख्रिश्चन असल्याने ईंग्लिश अशी काही फाडफाड बोलायची की प्राध्यापकांनाही लाजवायची. माझी आणि तिची पहिली भेट कशी, कधी, कुठे, केव्हा झाली हे आता नीटसे आठवत नाही पण तिचे ईंग्लिश हे असे आणि माझे ते तसे, त्यामुळे “ऑपोजिट अ‍ॅट्रॅक्ट्स” या न्यूटन की आईनस्टाईनच्या नियमानुसार आम्ही एकमेकांकडे आकर्षिले गेलो.

त्यानंतर मात्र चमत्कार झाल्यासारखे माझे ईंग्लिश तिच्या सहवासात सुधारू लागले. ईंग्रजी ही केवळ अभ्यासाचीच भाषा नसते तर ती प्रेमाचीही भाषा असू शकते हे मला उमगले आणि अचानक ती भाषा आवडूही लागली. “माझे तुझ्यावर प्रेम आहे” या चार शब्दांपेक्षा “आय लव्ह यू” या तीन शब्दांतील गोडवा मला जास्त भावू लागला. प्रेमाचा संदेश देणारे संत वॅलेंटाईनसारखे महात्मे याच भाषेत निपजले असल्याने जगभर प्रेमाचा प्रसार होण्यासाठी ही भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे याचा साक्षात्कार झाला. एवढेच नाही तर आजच्या या युगात सबंध Earth वर कुठेही अर्थार्जनासाठी देखील या भाषेचा अर्थ समजणे खूप गरजेचे आहे हा व्यावहारीक दृष्टीकोनही पटू लागला.

…………आणि या सार्‍याचा परीणाम म्हणजे आज मी स्वता जीभेला एकही वेलांटी न देता, ती दात व जबडा यांमध्ये न अडकवता, न अडखळता, टीटीपीपी न करता, पाण्यासारखी ईंग्लिश बोलू शकतो. पण मोनालिसाला मराठी शिकवायच्या भानगडीत मात्र मी कधी पडलो नाही. कारण त्यावाचून तिचे काही अडणार नव्हते. पण ईंग्रजी न आल्याने ज्यांचे अडते अश्यांसाठी मात्र मी मोनालिसाच्या मदतीने क्लासेस सुरू केले आहेत. क्लासमधील बर्‍यापैकी हुशार मुलांना ईंग्लिशमध्ये फाडफाड कोकलायला मोनालिसा शिकवते, आणि मी मात्र ज्यांची माझ्यासारखीच ईंग्लिशची बोंब आहे अश्यांना स्वत: जातीने लक्ष घालून शिकवतो.. हो, अगदी a b c d पासून…

आता ही A B C D देखील किती मानसिक त्रास देते हे मला ठाऊक असल्याने ती देखील मी त्यांना सोपी करून शिकवतो.. कशी ते उदाहरणादाखल तुम्हाला खाली देतो.. जेणेकरून तुम्ही बाहेर जाऊन माझ्या क्लासची जाहीरात कराल हीच अपेक्षा…

a
bi
see
Di
e
eph
jee
ech
aay
je
ke
el
em
en
o
pee
kyu
aar
es
tee
yu
vi
dabalyu
eks
vaay
jhed

No Thanks.! No Sorry.!
…Tumcha ABHISHEK