RSS

Category Archives: लेख

पाककृती – रावडाचिवडा (पाककौशल्यात “ढ” असलेल्यांसाठी)

शीर्षकावरून समजले असेलच की हि पाकृ केवळ आणि केवळ जेवण बनवण्याच्या कौशल्यात निपुण नसलेल्यांसाठी आणि काहीही पचवण्याच्या कौशल्यात पारंगत असलेल्यांसाठीच आहे.

एकेकाळी, म्हणजे बारावी नापास होत असताना घरी होतो तेव्हा बरेचदा हा प्रकार करून झाला आहे. मात्र कैक वर्षांनी आज लग्नानंतर, जेव्हा बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला, तेव्हा पुन्हा एकदा किचन ओट्यावर हात साफ करायची संधी मिळाली. तिचा पुरेपूर वापर करत आज हि डिश तुमच्यासमोर पेश करत आहे. ज्यांना जेवण फक्त गरमच काय ते करता येते आणि तरीही बाहेरचे न खाता घरचेच आवडते अश्यांना फायद्याचे ठरू शकेल हि यामागची सद्भावना आणि जाणकारांकडून चार टिपा मलाही मिळतील हा यामागचा सदहेतू.

तर,
एका माणसासाठी रावडाचिवडा बनवायला लागणारे साहित्य आहे,
खालीलप्रमाणे :-

तयार भात – प्रमाण आपल्या पोटाच्या अंदाजाने

कोणत्याही प्रकारची तयार डाळ, आमटी, कालवण वगैरे – प्रमाण भात कोलसवण्याइतपत (गोडे वा आंबट वरणापेक्षा तिखट डाळ वा आमटीला जास्त पसंती.)

तयार भाज्या – घरात, फ्रिजमध्ये, आजच्या, कालच्या, परवाच्या, असतील नसतील तेवढ्या सर्व! शेजार्‍यांकडे फक्त तेवढे मागायला जाऊ नका.

अंडे – ज्यांना चालते त्यांच्यासाठी तर मस्ट’च. (अंड्याला या प्रकारात सोन्याची किंमत. कारण सोन्याचे जसे ठोकून पत्रा करणे, खेचून तार करणे, (ज्याला सायंटिफिक भाषेत तन्यता-वर्धनीयता असेही म्हणतात) तसे काहीही करता येते, त्याचप्रमाणे इथेही अंड्याचे आपल्या आवडी आणि मर्जीनुसार भुर्जी ऑमलेट बॉईल’एग वगैरे काहीही करता येते.)

शेव, फरसाण, चिवडा, बाकरवडी – उपलब्धतेनुसार

मीठ – चवीनुसार

सॉस, ठेचा, लालतिखट चटण्या – आवडीनुसार

लोणचे – हे मात्र हवेच ! प्रकार कुठलाही चालेल.

पापड, रायता, पकोडे ईत्यादी ईत्यादी – मूळ पदार्थाला असल्या कुबड्यांची गरज लागत नाही.

शीतपेय – थंडगार ताक किंवा लिंबू-कोकम सरबत.

———————————————————————————

तर,
आता काय करायचे हे दरवेळी बदलत असल्याने आज मी काय केले हेच सांगतो.

कृती :-

१) सर्वप्रथम एक पसरट भांडे घेतले. (पसरट टोप वा कढई काहीही चालते, फक्त जे काही आई-बायकोने स्वच्छ धुतलेले असेल आणि आपल्याला धुवायची गरज लागणार नाही असे एखादे घ्यावे. कारण असल्या धुण्यापुसण्यातच अर्धी शक्ती खल्लास झाली तर पुढचा पदार्थ बनवायचा उत्साह मावळायची भिती असते.)

२) त्यानंतर एका अंड्याला जेवढे तेल लागते त्याच्या दुप्पट तेल त्या टोपात ओतून घेतले. चमच्याने छानपैकी टोपभर पसरवले. गॅस चालू करून तापायला ठेवले. पहिला तडतड आवाज येताच लागलीच घाबरून गॅस बंद केला. स्वयंपाक करणे आपल्या रोजच्या सवयीचे नसल्यास उकळत्या तेलाशी जास्त खेळू नये.

३) आता फ्रिजमधले थंडगार अंडे एका चमच्याने टकटकवून त्या तेलात सावकाश सोडले आणि टरफले बोटाने साफ पुसून फेकून दिल्यावर गॅस पुन्हा चालू केला. (सेफ गेम, याचे दोन फायदे – एक तर तडतडत्या तेलात अंडे सोडायची रिस्क नाही. दुसरे म्हणजे टरफले पुसून, फेकून, हात धुवुन, होईपर्यंत तेलातले अंडे करपायची भिती नाही.)

४) आता त्याच चमच्याने टोपातले अंडे परतायला घेतले. त्याआधी त्यात मीठ टाकायला मात्र विसरलो नाही. मसाला टाकायचे टाळले कारण त्याने अंड्याची मूळ चव लोप पावते जे या डिशमध्ये मला नको होते.

५) अंड्याचा कच्चेपणा जाऊ लागला तसे ते लालसर व्हायच्या आधीच गॅस पुन्हा एकदा बंद केला. पनीर असो वा अंडे, जास्त तळले गेले की रबरासारखे चिवट होते आणि त्याच्यातील फ्रेशनेसपणा जातो. (वैयक्तिक मत)

६) आता मूळ डिशला थोडावेळ विश्राम देत शीतपेय बनवायला घेतले. ताकाचा बेत होता. आपली नेहमीचीच पद्धत. तांब्यात दही, मीठ, थंड पाणी आणि रवीने घुसळणे. मॅगी नूडल्सनंतर मला परफेक्ट जमणारा हा दुसरा पदार्थ. तसे यात काही कठीण नसते, पण माझ्या रवी घुसळायच्या हाताला गुण आहे असे घरचे म्हणतात. (माझ्या मॅगीबद्दलही असेच म्हणतात, कदाचित मला जे जमतेय ते काम तरी माझ्याकडून काढून घ्यावे या हेतूनेही चढवत असतील.)

७) आता वेळ होती कूकरमधील भात काढून (जो आईने सकाळीच केला होता) त्या टोपातल्या तळलेल्या अंड्याबरोबर मिसळून घ्यायची. मगाशी वर अंड्यास तळताना गरजेपेक्षा जास्त तेल घ्या असे सांगितले होते ते याचसाठी जेणेकरून आताचा भातही त्या तेलात थोडाफार तळला जाईल. सोबतीला आवडीनुसार कोणताही लालतिखट मसाला टाकू शकतो. माझा पावभाजीचा मसालाही वापरून झालाय. पण आज मात्र घरात शोध घेता ‘लाल ठेचा’ गवसला. ज्यात लाल मिरची आणि सुके खोबरे असल्याने एकंदरीत भाताला फ्लेवर छानच येणार होता. छानपैकी अर्धी मूठ भुरभुरला आणि चमच्याने पुन्हा परतायला घेतले.

…………बस्स हाच तो क्षण जेव्हा भाताचे बदलणारे रंग पाहता मला आठवले की या डिशचे फोटो काढून काय कसे बनवले हे व्हॉट्सपवर बायकोशी शेअर करावे. मला मॅगी बनवणे आणि जेवण गरम करणे याव्यतिरीक्त आणखीही बरेच(?) काही करता येते यावर ती दाखवत असलेला अविश्वास मला आज तोडायचा होता.
इथे एक नम्रपणे नमूद करू इच्छितो – फोटो मोबाईलने काढल्याने आणि मोबाईलची सेटींग गंडल्याने फार काही सुरेख आले नाहीत, म्हणून फोटोंची क्वालिटी बघून पदार्थांची चव ठरवू नका. फिशटॅंक मधील मासे कितीही रंगीबेरंगी आणि छानछान दिसत असले तरी ते खायला तितकेच चवदार लागतील असे नसते, तिथे चारचौघांसारखा दिसणारा बांगडाच हवा.
तर हा पहिला फोटो टोपात परतलेल्या भाताचा ज्याला ‘एग फ्राईड राईस विथ महाराष्ट्रीयन तडका’ असेही बोलू शकतो.

 

1
८) टोपातला भात काढून ताटात घेतला आणि त्यावर घरात सापडलेली बारीक तिखट शेव पसरवली. सोबतीला चितळे बंधू बाकरवडी देखील होती, तर ती सुद्धा दाताने कचाकचा कुरतडून त्यावर सोडली. इथे हा भात मी स्वताच आणि एकटाच खात असल्याने बाकरवडी दाताने तोडली कारण मला स्वताच्या उष्ट्याचे चालते.

हा दुसरा फोटो त्या भाताला ताटात घेतल्यावरचा प्लस तिखट शेव आणि बाकरवडीचा.
(जाणकार व्यक्ती फोटो झूम करून चेक करू शकता की खरोखर चितळेंचीच बाकरवडी होती, टीआरपीसाठी त्यांचे नाव घेतलेले नाहीये)

2

 
लगे हात मगाशी घुसळून ठेवलेल्या ताकाचाही एक फोटो काढून घेतला.

4

९) ग्रेवी बनवण्यासाठी आता त्याच रिकाम्या टोपात डाळ घेतली आणि भाजीचा शोध घेता फ्रीजमध्ये कालची शेंगाबटाट्याची एकच काय ती माझ्या आवडीची भाजी सापडली. काही हरकत नाही, भारंभार सतरा पदार्थ असण्यापेक्षा मोजकेच पण आवडीचे पदार्थ या प्रकारासाठी केव्हाही चांगलेच. आता इथे काही विशेष करायचे नव्हते. डाळ आणि भाजी एकत्र करून छानपैकी एक कढ घ्यायचा होता. पण तरीही थोडीफार वेगळी चव म्हणून अर्धा चमचा दही त्यात टाकले. (कधी मूड आला तर टोमेटो सॉसही टाकायचो) अर्थात आमची डाळ आणि भाजी तिखट असल्याने त्यात दही टाकले पण कोणाकडे तिखट डाळ-भाजी नसल्यास प्लीजच हं मग नको त्यात दही.

हा पुढचा फोटो त्या तयार ग्रेवीचा – दोन बटाटे आणि तीन शेंगा एवढे मोजकेच माझ्यापुरतेच घेतले. या प्रकारात पोटाचा अंदाज घेऊन अन्नाची नाशाडी होऊ नये हे बघणे खूप महत्वाचे असते.

3

 

हा फोटो आता पर्यंत तयार झालेल्या एकंदरीत सर्वच जेवणाचा.
यात ताटात अ‍ॅड झालेली लोणच्याची फोड विशेष महत्व राखते. इतरवेळी मला लोणचे हवेच असा आग्रह नसला, अगदी हॉटेलमध्ये मिळणारे फुकटचेही खात नसलो, तरी या डिशबरोबर ते आवर्जून लागतेच.

 

5

 

१०) फोटोग्राफीच्या नादात ग्रेवी थंड झाली असे जाणवल्याने पुन्हा एकदा गॅसवर ठेऊन एक कढ काढून घेतला.

पण फोटो काढायची एव्हाना चटक लागल्याने खायला सुरुवात करायच्या अगदी आधी हा खालचा फोटो काढायचा मोह काही बाई आवरला नाही.

 

6

 
एक सांगावेसे वाटणारे – अंडे फोडण्यापासून, भात परतवायला, डाळ-भाजी घेऊन ती ढवळायला वापरला जाणारा तो एकच एक चमचा जेवायच्या वेळी मात्र ताटातून अल्लद बाहेर काढून बोटांना गरम चटके देत खायची मजा काही औरच !

तळटीप – सारे फोटो मुद्दामहूनच खालच्या फरशीवर काढले आहेत. किचनमधील पसारा एकाही फोटोत दिसून बायकोच्या शिव्या खायला लागू नये यासाठी घेतलेली हि काळजी. तरी यावरून हे मीच कश्यावरून बनवले असा अविश्वास कोणी माझ्यावर दाखवू नये. खुद्द माझ्या बायकोने यावर विश्वास ठेऊन मला ‘मिस्टरशेफ’चे प्रशस्तीपत्रक दिले आहे 🙂

– तुमचा अभिषेक

 

बालक पालक आणि मी

बाप हे दोन प्रकारचे असतात…!!

एक बाप तो असतो जो घरी यायची वेळ होताच मुले त्याच्या धाकाने खेळमस्ती दंगागाणी बंद करून अभ्यासाचे पुस्तक उघडून बसतात.
तर एक बाप तो असतो जो घरात शिरताक्षणीच त्याची मुले आनंदाने नाचत बागडत येऊन त्याला बिलगतात.

शेवटी आपले स्वत:लाच ठरवायचे असते की आपल्याला यातला कोणता बाप बनायचे आहे….!!

………….मी एका तत्ववेत्याचा आव आणत, सहा घरची पोरे सांभाळली आहेत अश्या आविर्भावात बायकोला प्रवचन देत होतो. मात्र तिला माझी ही बकबक नाही तर माझ्या तोंडून माझे लहाणपणीचे किस्से ऐकायचे होते. चूक माझीच होती. सिनेमाचा हॅंगओवर डोक्यात असा काही चढला होता की त्या नादात नको नको ते बोलून गेलो होतो. “बालक पालक” उर्फ “बीपी” या त्याच्या लघुनामालाच साजेश्या विषयावरचा चित्रपट पाहून जेव्हा घरी परतत होतो तेव्हा “कसा वाटला सिनेमा?” या अपेक्षित प्रश्नावर मी नेमके तिला अनपेक्षित उत्तर दिले होते.

“काय सांगू… नॉस्टॅल्जिक की काय म्हणतात तसा झालो ग अगदी…. अगदी म्हणजे सिनेमात दाखवलेले सारे सारे लहाणपणी आम्हीही केले आहे. म्हणजे ते वीसीआर आणून सिनेमा बघण्यापासून खिडकीच्या बाहेर उभे राहून…………………………..” अई ग्ग..! जीभ चावायला किंचित उशीरच झाला, अन आता हे सविस्तर ऐकल्याशिवाय ती माझा पिच्छा सोडणार नव्हती हे मला ठाऊक होते. खरे तर आज ते सारे आठवायचा, कोणाशी तरी शेअर करायचा मूड होताच.. अन संधीही.. पण तरीही.. फक्त मित्र असते तर कट्टा जमवलाही असता आठवणींचा. ऐकण्याची उत्सुकता तिलाही होती, सांगण्याची मलाही होती. पण बरोबरची मुलगी बायको असून ही फक्त एक स्त्री असल्याने बोलायला नेमके शब्द सापडत नव्हते. नुकतेच पाहून आलेल्या चित्रपटात दोन मुले आणि मुली एकत्र बसून प्रौढांसाठीचे सिनेमे पाहताना दाखवले होते. ते देखील त्या काळात. त्या मानाने आज मुले मुली एकमेकांमध्ये मिसळताना तितकासा बुजरेपणा दाखवत नाहीत. तरीही या विषयावर असे उघड उघड बोलणे… आजही… आताही… तेव्हाही…

मुलांशी या विषयावर खुलून बोला असा जो काही विचार या चित्रपटात मांडण्यात आला होता त्यातील फोलपणा म्हणा किंवा त्याच्या मर्यादा म्हणा, तात्काळ जाणवल्या.

हल्ली शाळांमध्ये लैंगिक शिक्षण हवे की नाही याच्या चर्चा झडतात तेव्हा हसायला येते. ते तुम्ही शिकवा किंवा नका शिकवू, मात्र प्रत्येक मुलगा एका ठराविक वयात कुठून ना कुठून तरी हे शिक्षण मिळवतोच आणि यात त्याचे गुरू असतात ते त्याच्याच किंवा त्याच्यापेक्षा किंचित मोठ्या वयाची मुले. मी देखील याच गुरुकुलात हे ज्ञान मिळवले. माझ्या ज्ञानात नक्की कोणत्या वयात कशी कशी भर पडत गेली हे आता नक्की आठवत नाही, मात्र बालपण चाळीतल्या खुल्या वातावरणात गेले असल्याने या विषयात वर्गातल्या इतर मुलांपेक्षा मी नेहमीच एक इयत्ता पुढे होतो. पण सुरुवात माझीही सर्वांसारखीच झाली. कुतूहल अन त्यातून भोळ्याभाबड्या मनाला पडणारे बावळट प्रश्न. प्रत्येकाला पडलाच असावा असा हमखास प्रश्न – या जगात आपण कसे आणि कुठून आलो? सरळ भाषेत सांगायचे झाल्यास मुलाचा जन्म कुठून आणि कसा होतो?

कौन बनेगा करोडपतीमध्ये शेवटचा प्रश्न एक करोडचा असतो पण इथे मात्र पडलेला हा पहिलाच प्रश्न करोडो रुपये किंमतीचा होता. याचे उत्तर काय सापडते यावर पुढच्या प्रश्नांचा प्रवास अन ज्ञानार्जनाची दिशा ठरणार होती. प्रश्नकर्त्याच्या वयोगटानुसार या प्रश्नाची दोन ठरलेली हिट उत्तरे. त्यातील पहिले उत्तर मलाही मिळाले. देवबाप्पा आला अन माझ्या राजाला खिडकीत ठेऊन गेला. काही जणांकडे देवबाप्पाच्या जागी परी येते तर कोणाकडे चंदामामा, कोणाला पाळण्यात तर कोणाला आईच्या कुशीत ठेवले जाते. पण लवकरच मला जाण आली की असे काही चमत्कार घडत नसतात तेव्हा दिले जाणारे दुसरे अन साधे सोपे उत्तर मिळाले…. आईच्या पोटातून…!!

तोपर्यंत माझ्या चार इयत्ता शिकून झाल्या होत्या. मोठ्यांची कोणतीही गोष्ट नुसती ऐकायची नाही तर तर्काच्या कसोटीवर पडताळून पाहायची हे समजले होते. पण आजूबाजूला दिसणार्‍या पोटूशी बायकांना पाहता या उत्तरावर अविश्वास दाखवणे शक्य नव्हते, किंवा त्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नव्हतो म्हणा आणि म्हणूनच एका ठराविक वयापर्यंत मी अन सोबतीला माझे सारे बालमित्रमंडळ याच समजूतीत होतो की आपण सारे नरसिंह पोटातून प्रकट झालोत.

मात्र वाढत्या वयाबरोबर आपल्या कोणाच्याही आईच्या पोटाला टाके का नाहीत हा प्रश्न आम्हाला छळू लागला आणि अजूनही हा प्रश्न अनुत्तरीतच असल्याची जाणीव झाली.

इतरवेळी हा प्रश्न आम्ही मनातच ठेवला असता पण आता आम्ही इतपत मोठे झालो होतो की चाळीतील आमच्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांनी आम्हाला ज्ञान वाटायला सुरुवात केली होती. ही सुरुवात नेहमी अश्लील विनोदांपासून व्हायची. विनोद समजण्यासाठी म्हणून त्यातील काही शब्दांचा आणि संकल्पनांचा अर्थ समजून घेणे गरजेचे असायचे, त्यामुळे विनोद कळण्यासाठी म्हणून ते अर्थ व्यवस्थित समजून घेतलेच जायचे किंवा काही वेळेस त्या नेमक्या अर्थामुळे विनोद घडत असल्याने तो शब्द समजायला सोपा पडायचा आणि त्याचा अर्थ डोक्यात फिट बसायचा. उदाहरण द्यायचे झालेच तर निरोध या शब्दाचा अर्थ देखील मला तो नेमके कशाला विरोध करतो अश्या आशयाचा एका विनोदावरूनच समजला होता. ते देखील त्याचा आकार रंग रूप काहीही माहीत नसताना…

असो, तर आम्हा सार्‍या बाळगोपाळांना स्वताच्या उत्पत्तीबद्दल पडलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला जाणकार मंडळी देखील टाळाटाळ करत होते, जे साहजिकच होते म्हणा. पण याचमुळे आमची उत्सुकता आणखी चाळवली जात होती. प्रत्येकाने आपापल्या परीने उत्तर शोधायला सुरुवात केली होती. अश्यातच एके दिवशी आमच्यातल्या एकाने डिस्कवरी चॅनेलवर (जे तेव्हा नवीनच उघडले होते) कोणा सस्तन प्राण्याचा जन्म कसा होतो याची फिल्म पाहिली आणि………………………. युरेका युरेका..!

तो कितीही पोटतिडकीने आम्हाला पटवून देत असला तरीही आमच्यातील कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. ठेवणार तरी कसे. सारे आकलनापलीकडचे अन अतर्क्य वाटावे असेच होते. पुन्हा मोर्चा मोठ्या दादा लोकांकडे वळवला, पण त्यांनी पुन्हा हसून विषय टाळून नेला. शेवटी मीच वैतागून त्या मुलाला म्हणालो, “तुझाच जन्म झाला असेल तसा, आम्ही मात्र पोटातूनच आलो आहोत…….”
एक, दोन, तीन, दे धबाक………………………….
त्यानंतर त्याने मारलेला गुद्दा अन मी कळवळून धरलेले पोट माझ्या अजूनही लक्षात आहे.

पण दुसर्‍या दिवशी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फिरणारे ही आम्ही दोघेच होतो. कारण अजून आम्हाला बर्‍याच प्रश्नांची उकल एकत्र मिळूनच शोधायची होती. शिकायचे वय होते ते आणि जो लिंबू या शिक्षणात कच्चा राहायचा त्याची हेटाळणी काही “खास” शब्दात व्हायची. त्या वयातही, जेव्हा पुरुषार्थ म्हणजे नक्की काय हे उमजले नव्हते तेव्हा ही आपल्याला असे काही समजले जाणे आम्हाला पुरुषार्थाचा अपमान वाटायचा. स्वताला सिद्ध करण्यासाठीच म्हणून मग एखाद्या मोठ्याला पकडून ज्ञानकोषात भर टाकली जायची. यातूनच मग एके दिवशी मुलगा होण्यासाठी आवश्यक स्त्री-पुरुष संबंधाबद्दल समजले. त्या आधी कधी असा विचारही केला नव्हता. स्त्रीपुरुष लग्नानंतर केवळ सहवासात येणे पुरेसे असते याच समजावर जगत होतो. मात्र नवरा बायकोच का? इतर कोणी आले तर असे का घडत नाही या प्रश्नाला आम्ही पुन्हा निरुत्तर होत होतो. म्हणून यावेळी जे समजले ते पुन्हा कल्पनेपलीकडले वाटत असले तरी अविश्वास दाखवला नाही. पण जे काही ऐकले ते आपल्याला जमेल का याचे टेंशन मात्र आले होते.

दिस गेले, वर्षे सरली. एव्हाना आम्ही धुंद हैदोस सारखी पिवळी पुस्तके वाचायच्या वयात पोहोचलो होतो. ही पुस्तके घरी बाळगण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे शाळेतच एका जागी लपवली जायची आणि पिरीअड चालू असताना बाकांखालून वर्गभर पसरायची. इथून तिथून सारी कथानके एकाच शेवटाला जाणार हे माहीत असूनही प्रत्येक कथेत नावीन्य जाणवायचे आणि उत्सुकता निर्माण व्हायची. उत्सुकता चरणसीमेला पोहोचली असताना आपण वर्गात आहोत, समोर शिक्षक आहेत याचाही विसर पडायचा. याचा परीणाम शेवटी व्हायचा तोच झाला. एक जण पकडला गेला. मात्र पुस्तक बाईंच्या हातात लागू नये म्हणून त्याने पटकन भिरकावून दिले. ते झेलायला चार हात पुढे आले अन या हातातून त्या हातात पास होत हवेत विरल्यासारखे वर्गात कुठेतरी गायब झाले. बाईंना ते काय असावे याची कल्पना आली होती. शिक्षा सार्‍या वर्गाला झाली. तसेही काही सन्माननीय अपवाद वगळता सारेच कमीजास्त प्रमाणात यात सामील होते. यानंतर मात्र पुन्हा वर्गात ती पुस्तके आणली गेली नाहीत.

जे पुस्तकांत वाचले गेले होते ते आता आजूबाजुच्या जगात ही घडते का हे आता नजर शोधू लागली होती. एखाद्या नवदांपत्याकडे पाहिल्यावर आता हे दिवसरात्र असेच काही तरी करत असणार असे चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे. तेव्हा परीक्षेच्या काळात किंवा सुटीच्या दिवसांत रात्री अभ्यासासाठी म्हणून आम्ही चाळीतल्या कॉमन पॅसेजमध्ये जमायचो. पहाटेचे तीन-चार वाजेपर्यंत आमची ही स्टडी नाईट चालायची. सोबतीला गप्पांचे विषय त्या वयाला साजेशेच असायचे आणि आता यात आणखी एका विषयाची भर पडली होती. एखाद्या नवीनच लग्न झालेल्या जोडप्याच्या घरातला दिवा मावळला की आम्ही एकमेकांना इशार्‍याने खुणवायचो, नक्कीच आता यांचे सुरू झाले असणार. आमच्यातीलच एखादा मग धिटाई दाखवून त्या घराच्या दाराखिडकीपाशी रेंगाळून आतल्या आवाजांचा काही अंदाज येतो का या प्रयत्नात असायचा. माझी स्वताची कधी अशी हिंमत झाली नाही, पण कोणी येत तर नाही ना याकडे पाळत ठेवून, पहारेदाराची भुमिका निभावत मी देखील त्यांना सामील व्हायचो. आतमधून अपेक्षित आवाज ऐकू आले की आम्ही फार मोठे स्कॅंडल उघडकीला आणलेय किंवा एखाद्या भानगडीचाच पर्दाफाश केला आहे असा आनंद व्हायचा. दुसर्‍या दिवशी इतरांना आदल्या रात्रीचे धाडस स्वताच्या मनाची भर घालून, आंबटमसाला लाऊन सांगण्याची जी मजा होती त्याखातरच खरे तर हे सारे केले जायचे.

माझी दहावी झाली. मी कॉलेजात प्रवेश केला. पण अजून मी एकही निळी चित्रफीत पाहिली नव्हती. माझ्या वयाची आजूबाजुची मुले पाहता आणि माझ्या आजवरच्या इमेजनुसार खरे तर ही एक शरमेची गोष्ट होती, जी मी लपवत होतो. कधी विषय निघालाच तर सरळ ‘हो कित्येक पाहिलेत’ असे खोटे बोलून मोकळा व्हायचो आणि त्यात नेमके काय असते हे कोणी विचारलेच तर हसून टाळून न्यायचो. चाळीतल्या जवळपास सार्‍याच मुलांचे हे एकदा तरी बघून झाले होते. ज्या मुलाच्या घरात वी.सी.आर. आणून हे विडिओ बघितले जायचे ते माझ्या घराच्या अगदी जवळच असल्याने मला तिथे जायला भिती वाटायची. कारण चाळीत कोणतीही गोष्ट लपून राहायची नाही. सुटीच्या दिवसांत दुपारच्या वेळेला मुले क्रिकेट खेळायचे सोडून तिथे काय करतात हे चाळीतील शहाण्या आणि अनुभवी मंडळींनी केव्हाच ओळखले होते. फरक इतकाच की आजवर कोणी रंगे हाथ पकडले गेले नव्हते. कारण सोबतीला कॉलेजला जाणारी मोठी मुलेही सामील असायची. कॅसेट आणायची कामे तेच करायचे. एक दोन हिंदी-ईंग्लिश सिनेमांच्या कॅसेटही आणल्या जायच्या जेणेकरून कोणी दरवाजा खटखटवलाच तर ती कॅसेट काढून हि कॅसेट लावणे एका मिनिटाचे काम. थोडक्यात पकडले जाण्याचे चान्सेस कमीच होते.

अश्यातच एके दिवशी माझ्या घरचे गावी जाणार होते. मी बारावीचे निमित्त करून टाळले. चाळीच्या ठिकाणी अश्या खाली घरांचा लगेच अड्डा बनतो. मग या अश्या अड्ड्यांवर जुगार, सिगारेट, दारू अशी सारी व्यसने चालतात. मला मात्र यापैकी कशातही रस नसल्याने आणि आमचे शेजारी सतर्क असल्याने तसे काही मी घडू दिले नाही. मात्र रातच्याला एखादी ब्ल्यू फिल्म आणायची का अशी विचारणा झाली तेव्हा नकार देऊ शकलो नाही. दुसरीकडे कुठे बघण्यापेक्षा स्वताच्या घरातच बघणे सोयीस्कर वाटले वा बघण्याची उत्सुकता इतकी होती की पकडले गेलो तर सर्वात पहिला मी मरणार याची भिती देखील झटकून टाकली. काहीही म्हणा, लगेच तयार झालो एवढे मात्र खरे.

त्या दिवसानंतर पुढच्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत किती वेळा हे पाहिले असावे याची गिणती नाही मात्र ती पहिली वेळ आणि तो पहिला सिनेमा कधीही विसरू शकणार नाही. माझ्यासारखे अजून एक दोन नग होते जे असला सिनेमा पहिल्यांदाच बघत होते. त्यानंतर आमच्यात त्या सिनेमाशी संबंधित असलेला ‘टारझन’ हा शब्द असल्या सिनेमांसाठी वापरायचा एक कोडवर्ड झाला होता.

रात्री बाराला हिंदी सिनेमा संपल्यावर तो लावला होता. दिड-दोन तासांत आटपला आणि मी समाधानाने झोपलो. काही जण मात्र त्यानंतर अजून एक सिनेमा लाऊन पहाटेपर्यंत जागे होते. काही जणांना काय एवढी मजा येते तेच तेच बघण्यात असा विचार मी नेहमी करायचो. मात्र संधी मिळताच स्वत:देखील कधी नकार द्यायचो नाही.

माझे नशीब चांगले की कधी हे सारे करताना मी पकडलो गेलो नाही. कदाचित माझ्या वडीलांच्या कानावरही असावे की चाळीतील मुले जमून असले उद्योग करतात आणि त्यात तुमचा ही एक असतो. पण माझ्याकडे हा विषय त्यांनी मुद्दामूनच काढला नसावा, ते कदाचित आईच्या कानावर यातले काही जाऊ नये या हेतूनेच. खरेच, तेव्हा पकडले गेलो असतो आणि आईला हे सारे समजले असते तर………

अगदी आजही हे आईला कळले तर त्याला सामोरे जायची माझी हिंमत नाही.

जे झाले ते झाले. वयाच्या त्या टप्प्यातून देखील बाहेर पडलो. उत्सुकता संपली, नावीन्य गेले, आवड कमी झाली. प्रगल्भता आली, आयुष्यात इतरही नवीन गोष्टी आल्या. कित्येक महिने कित्येक वर्षे यातले काही पाहिले नाही. आज मोबाईल ईंटरनेटच्या जमान्यात जिथे पेनड्राईव्ह, ब्ल्यूटूथने झटपट देवाणघेवाण होते, एखादी छोटीशी क्लिप बसल्याबसल्या मोबाईलमध्ये बघता येते तिथे एखाद्या किशोरवयीन मुलाच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता फारशी टांगणीला नक्कीच लागत नसावी. स्वताचे म्हणाल तर आज कितीही फावला वेळ असला तरी किंवा कितीही सहजगत्या हे सारे उपलब्ध झाले तरी बघायची, काय म्हणतात ती क्रेझ तितकीशी उरली नाहीये.

तरीही मागे एकदा एका मित्राने आमंत्रण दिले होते ज्याला परत एकदा नकार देता आला नव्हता. कारण यावेळी ते आमंत्रण खासच होते. मोठ्या पडद्यावर बघायचे.

कॉलजच्या दिवसांत हॉस्टेलला राहत असतानाची ही गोष्ट. एका मित्राने कुठलेसे थिएटर हुडकून काढले होते जिथे असले सिनेमे दाखवले जातात. घरात टीव्हीवर क्रिकेटचा सामना बघणे वेगळे पण स्टेडीयममध्ये जाऊन बघण्यात एक वेगळीच मजा. हे देखील अगदी तसेच वाटून लगेचच कार्यक्रम सर्वानुमते फायनल झाला. चौघे जण होतो आम्ही. तिकिटही बर्‍यापैकी स्वस्त. सिनेमागृह देखील त्याच योग्यतेचे होते म्हणा. ईंग्लिश भाषेतला सिनेमा होता. भाषेशी आमचे देणेघेणे नव्हतेच. उलट ईंग्लिश सिनेमा असणे ही जमेचीच बाजू होती. थिएटरच्या बाहेर लावलेला सिनेमाचा छोटासा पोस्टर पाहून फारशी उत्सुकता वाटली नाही. मात्र पोस्टर असेच साफसुधरे लावले जातात इति आमच्यातीलच एक मित्र. त्याच्यावर विश्वास ठेऊन आत गेलो, तर आतले प्रेक्षक पाहून कुठे येऊन फसलो असे वाटायला लागले. ईंग्लिश समजणे दूरची गोष्ट, कधी शाळेचे तोंड तरी पाहिले असावे की नाही असा प्रेक्षकवर्ग आणि त्यात आम्ही चार इंजिनीअर. सिनेमाच्या सुरुवातीलाच दोन गोर्‍या हिरोईनी पडद्यावर अवतरल्या ज्यांच्यासमोर हिंदी सिनेमांतील सार्‍या नट्या झक मारतील. (हे बाकी प्रत्येक सिनेमा बघताना असेच वाटायचे आम्हाला.) पण मध्यंतरापर्यंत सिनेमाची ना स्टोरी समजत होती, ना जे बघण्यास आलो होतो त्यातील काही घडत होते. सिनेमात रात्र झाली की वाटायचे आता काही तरी बघणेबल येईल. पडद्यावरील पात्रांचा त्या दिशेने प्रवास व्हायचा खरा, मात्र जेव्हा ‘आता तर नक्कीच’ असे वाटायचे तेव्हा दिवा मावळला जायचा आणि थेट सुर्योदय. मग पुन्हा रात्र कधी होते याची वाट बघा. बरे संवाद काही समजत नव्हते. त्यामुळे त्या हिरो-हिरोईनींच्या मनात काय चालू आहे ते त्यांच्या चेहर्‍यावरील माशीही न हालणार्‍या बथ्थड मुद्राभिनयावरून अंदाजायाची कसरत करावी लागत होती. इतर वेळी मध्यंतराला उठून गेलो असतो पण जे बघायला आलो आहोत नेमके तेच मध्यंतरानंतर राखून ठेवले असेल तर असा विचार करून उठवतही नव्हते. पण तसे काही नशीबी नव्हते. जे एवढ्या रात्रीत झाले नव्हते ते आणखी चार रात्रींमध्ये काय घडणार होते. मध्यंतरानंतर ही पुन्हा तेच चक्र सुरू राहिले. अन याच दिवसरात्रीच्या खेळात “दि एण्ड” ची पाटी देखील लागली. बाहेर पडताना फजिती झाल्यासारखे चेहरे होते आम्हा सार्‍यांचे. मात्र आजूबाजूची सारी पब्लिक तृप्त होऊन बाहेर पडताना दिसत होती. कदाचित त्यांच्या अपेक्षाच त्यापलीकडल्या नसाव्यात. काही का असेना, तो देखील एक आठवणीत राहावा असाच अनुभव होता.

एक तो दिवस आणि एक आजचा दिवस, जेव्हा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बीपी उर्फ बालक-पालक बघून घरी परतत होतो. माझे किस्से आणि आठवणी मी बायकोला मोडके तोडके जमेल तसे सांगितले आणि तदनंतर आम्ही चित्रपटावर चर्चा करायला लागलो. माझ्याशी तो सिनेमा बर्‍यापैकी रीलेट झाल्याने मला फार आवडला होता पण तिच्या चेहर्‍यावर मात्र तसे काही जाणवत नव्हते. विचारले असता म्हणाली की सिनेमा अपुरा वाटला. शेवट अधुरा वाटला. प्रश्नाची योग्य उकल दाखवली नाही. जी दाखवली ती पटली नाही. पण मी मात्र तिच्या या मताशी किंचित असहमती दर्शवली. खरा प्रश्न हा आहे की मुळात हि एक समस्या आहे हेच कोणी कबूल करत नाही. काही लोकांच्या हे गावीही नसते तर काही कळूनही न कळल्यासारखे करतात किंवा सोयीने दुर्लक्ष करतात. अश्यांना निदान आरसा दाखवायचे काम तरी या चित्रपटाने केले. यापुढे काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण याचे सर्वसाधारण उत्तर काढणे शक्य नाही. परिस्थितीनुसार ते बदलत जाणार…..

“तू कसा पालक बनशील रे?”, बायकोने मध्येच माझी गाडी अडवली. ज्या प्रश्नाला टाळत होतो नेमका तोच विचारला.

“ह्म्म, बघू… आपला नारळ किती पाणीवाला निघतोय, त्यानुसार ठरवू.” नेमके उत्तर द्यायचे मी देखील हसूनच टाळले… खरे होते तिचे… हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच होता..!

– तुमचा अभिषेक

 
 

शोले

“तू अजून शोले नाही पाहिलास…???” मी जवळजवळ किंचाळलोच.

जेव्हा कोणी शोले न पाहिलेला भेटतो तेव्हा माझी हीच प्रतिक्रिया असते. माझी कशाला, ज्याने ज्याने शोले पाहिला आहे, या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया अशीच काहीशी असावी. समोरच्याला जेवढ्या केविलवाण्या नजरेने बघता येईल तेवढे नजरेत सहानुभुतीमिश्रित तुच्छतेचे भाव आणायचा मी प्रयत्न करतो. जर ते आणण्यासाठी अभिनयक्षमता कमी पडली तर असाच किंचाळतो. पण आता तर समोर खुद्द माझीच बायको होती. माझ्या बायकोने शोले बघितलेला नसणे हे मला माझेच कमीपण वाटू लागले. असे कसे मी कोणत्याही मुलीशी लग्न केले जिने आजवर शोले पाहिला नाही. छ्या.. माझा प्रेमविवाह नसता आणि अरेंज मॅरेज असते तर मी कांदेपोहे खाताखाता हाच प्रश्न विचारला असता कि, कितने आदमी थे.. म्हणजे.. आपलं.. कितनी बार शोले देखा है..?? आणि याचे उत्तर तीन पेक्षा कमी आले असते तर मुलगी तिथेच नापास.. एकवेळ एकदाही शोले न बघितलेल्या मुलीला मी निदान दया तरी दाखवली असती पण जिने एकदा पाहिला आणि परत बघावासा वाटला नाही तिची आणि माझी पत्रिका बघितली तर एकही गुण जुळणार नाही याची मला खात्रीच होती.

“नाही बघितला शोले, त्यात काय एवढे?” बायकोच्या या उलटहल्ल्याने मी भानावर आलो.

“त्यात काय एवढे? त्यात काय एवढे?? अरे शोले म्हणजे.. तू अजून शोले नाही पाहिला म्हणजे… अगं म्हणजे तू…” छ्या.. आयत्यावेळी शब्दच सुचत नव्हते. तिने शोले पाहिला नाही म्हणजे तिच्या आयुष्यात काहीतरी करायचे राहून गेले आहे असे मला जे वाटत होते त्या भावना तिच्यापर्यंत कश्या पोहोचवाव्यात हेच समजत नव्हते.

बायको मला त्याच अवस्थेतच सोडून निघून गेली आणि मी स्वताशीच विचार करू लागलो… जो मला वीस-बावीस वर्षे मागे भूतकाळात घेऊन गेला..

मी तेव्हा तिसरी की चौथीत असावो. आजसारखे सतराशे साठ चॅनेल किंवा किंवा केबल टी.वी.चा जमाना नव्हता. आमच्या घरात तर ब्लॅक अ‍ॅंड व्हाइट टी.वी. वरच समाधान मानावे लागत होते. मामाकडे मात्र कलर टी.वी. आणि व्ही.सी.आर. देखील होता. त्यामुळे सुट्ट्या पडल्या की माझा मुक्काम मामाकडे ठरलेलाच असायचा. दहा रुपये भाड्याने विडीओ कॅसेट आणायच्या आणि दुसर्‍या दिवशी परत करायच्या. एखादा सिनेमा आवडलाच तर तो त्याच दिवशी दोनदाही बघितला जायचा. काय कसा माहीत नाही मला तेव्हा मिथुन चक्रवर्ती फार आवडायचा. आता तुम्ही लगेच माझ्याकडे अश्या विचित्र नजरेने बघू नका. असते एकेकाची आवड. मधल्या काळात मिथुनने केलेले “बी ग्रेड” सिनेमे पाहिलेल्यांना कदाचित माझी ही आवड पटणार नाही पण तेव्हा मिथुन म्हणजे डिस्कोडान्सर हे समीकरण माझ्या डोक्यात फिट् होते. तर माझ्या मामाकडचे सारे जण, ज्यात माझ्या वयाचा कोणीच नव्हता ते अमिताभ बच्चनचे चाहते होते. ताडमाड अंगकाठी असलेला हिरो ज्याला मिथुनसारखे कंबर मटकवत नाचता येत नाही तो कसा काय लोकांना आवडतो हे मला काही समजायचे नाही. त्यामुळे मला चिडवायला म्हणून मिथुन विरुद्ध अमिताभ हा वाद सारखा चालूच असायचा. आणि अश्यातच, एक दिवस शोलेची कॅसेट आणली गेली.

दरवेळी रात्रीचे जेवण आटोपून साडेनऊ-दहाला लागणारा चित्रपट मध्यांतराला पोहोचेपर्यंत माझी बत्ती गुल झालेली असायची पण अपवाद तीनसाडेतीन तासांच्या शोलेचा.. सुरुवातीचे घोड्यांवरून ट्रेनच्या पाठलागाचे दॄष्य आणि दरोडेखोरांच्या चित्रपटाला साजेशी बॅकग्राऊंड थीम, बघता बघता मला त्यातील वातावरणाशी एकरूप करून गेली. पुढचा सारा वेळ मी सुद्धा रामगड का रहिवासी बनून त्यांच्याच विश्वात हरवून गेलो. खरे सांगायचे तर मी तेव्हा त्यात काय पाहिले आणि मला काय आवडले हे आता मलाही आठवत नाही पण मध्यरात्री एक-दीड वाजता तो चित्रपट संपल्यावर मी पुन्हा एकदा लावा म्हणून असा काही दंगा घातला होता म्हणे, की घरचे अजूनही आठवण काढतात. कोणत्याही कलाकृतीला मी वन्समोअर म्हणून दिलेली माझ्या आयुष्यातील ती पहिलीच दाद असावी. त्या वयातही मला अस्सल कलेची जाण होती हे बघून आजही मला अभिमानाने गहिवरून येते. पुढच्या चार दिवसात मी घरच्याच टीवी व्हीसीआरचा फायदा उचलत आणखी पाच-सहा वेळा शोले पाहिला. आणि माझ्या बरोबरीने इच्छा असो वा नसो, घरच्या सर्वांनाही तो बघावा लागला. त्यानंतर पुढच्या काही वर्षांत तो कितीवेळा आणि कुठेकुठे पाहिला याची गिणती नसावी. अ‍ॅक्शन-कॉमेडी-रोमान्स-संगीत हिंदी चित्रपटाच्या प्रत्येक पैलूवर खरा उतरलेला चित्रपट, प्रत्येक वयोगटाला त्यात काही ना काही आवडीचे सापडेलच असा पण बायकोला नेमके काय सांगू हे मला अजूनही समजत नव्हते.

लहाणपणी मी जेव्हा जेव्हा शोले बघायचो तेव्हा घोड्यावरून डाकू आले की मी उत्स्फुर्तपणे उठून उभा राहायचो, अमिताभ बच्चनचा जय काही तेव्हा माझ्या फारसा आवडीचा नव्हता पण वीरू आणि बसंतीची बोलबच्चनगिरी मात्र करमणून करून जायची. अमजदभाई हे तर माझ्यासाठी हिरो होते त्या चित्रपटाचे. सर्वप्रथम माझे कोणाचे संवाद पाठ झाले असतील तर ते गब्बरसिंगचे. जगदीपचा सुरमा भोपाली, केष्टो मुखर्जीचा हरीराम न्हाई आणि असरानीचा अंग्रेजोके जमानेका जेलर तेव्हाही तेवढेच हसवून जायचे जेवढे आज हसवतात. जसे लहाणपणी आपण घर घर खेळायचो तसे शोले शोले खेळल्याचे आठवतेय. मित्राबरोबर साईड सीट असलेल्या स्कूटरवर बसून स्वताला जय वीरू समजून गाणे गायचे, हातात पट्टा घेऊन गब्बरसिंगचे डायलॉग मारायचे, अगदी हात शर्टाच्या आत लपवून ठाकूर बनण्यातही एक मजा होती.

शोलेमधील माझ्यासाठी सर्वात कंटाळवाणे कॅरेक्टर होते ते जया बच्चनचे. ते तसेच असणे का गरजेचे होते हे समजण्यासाठी मला जरा वयात यावे लागले.. आणि तोपर्यंत मला अमिताभही आवडू लागला होता.. त्यानंतर शोले बघण्यात एक वेगळीच मजा येऊ लागली. अमिताभचे खोचक डायलॉग आता खुसखुशीत वाटू लागले होते. “तुम्हारा नाम क्या है बसंती”ला सारे जण का हसायचे हे समजू लागले. यारी दोस्ती सबकुछ वाटायचे ते वय, “मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार..” असे गात ये दोस्ती हम नही तोडेंगे चे वचन देणारी जयवीरूची जोडी आपली वाटू लागली. शेवटी अमिताभ गेल्यानंतरचे दु:ख ही नकळत धर्मेंद्रच्या जागी स्वताला ठेऊन अनुभवले.

माझे वय वाढत गेले तसे चित्रपटसृष्टीत सुद्धा बदल घडत होते. शोलेची जादू ओसरली नसली तरी आता तो माझ्या हॉल ऑफ फेम मध्ये जाऊन बसला होता. माझी चित्रपटांची आवड बदलली होती. नव्वदीच्या दशकात मीच नव्हे तर माझ्या वयाच्या सार्‍या तरुण पिढीच्या डोक्यावर रोमॅंटीक चित्रपटांचे भूत चढले होते. याला जबाबदार होते ते बॉलीवूडचे तीन खान. सलमानचा “मैने प्यार किया”, आमिरचा “कयामत से कयामत तक” आणि शाहरुखचा “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या तीन चित्रपटांनी केलेले गारुड पाहता त्याच पठडीतले सिनेमे येऊ लागले. “दिल तो पागल है”, “कुछ कुछ होता है” सारख्या सिनेमांनी मला शाहरुखच्या फॅनक्लबमध्ये नेऊन बसवले. चित्रपटसृष्टीचा पसारा वाढला होता. कलाकारांची नवी फळी तयार होत होती. नवे स्टार उदयाला येत होते. वर्षाला शे-दोनशे चित्रपट निघायला लागले. केबल टीवीचा जमाना आला आणि एकाच वेळी चौदा चॅनेलवर चौदा चित्रपट दिसू लागले. चित्रपटांच्या या भाऊगर्दीत “शोले” असो वा “रामगोपाल वर्मा के शोले”, सार्‍यांना एकाच तराजूत तोलले जाऊ लागले. चॅनेल सर्फ करता करता अधूनमधून शोलेची एखादी झलक कुठेतरी दिसायची, पण ती तेवढीच बघून मी देखील पुढच्या चॅनेलवर जाऊ लागलो. संगणक, ईंटरनेट, मोबाईलच्या वाढत्या वापराने मनोरंजनाची इतर साधने उपलब्ध झाली आणि मोजकेच चित्रपट बघितले जाऊ लागले. हे मोजके चित्रपट देखील फारसा दर्जा राखून होते अश्यातला भाग नाही. एखादा तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट एकाच वेळी देशभरात हजारो चित्रपटगृहांमध्ये झळकून अ‍ॅडव्हान्स बूकींगमध्येच करोडोंचा गल्ला जमवू लागला. शोलेचा कमाईचा विक्रम अमुकतमुक चित्रपटाने तोडला अश्या बातम्या अधूनमधून कानावर यायच्या आणि त्यात किती फोलपणा आहे याची चर्चा करायला म्हणून शोलेच्या आठवणी निघायच्या. पण आज पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देताना माझ्या लक्षात आले की गेले काही वर्ष मीच स्वता शोले पाहिला नाही तर बायकोला काय समजवणार त्या बद्दल.

तरीही एवढ्या वर्षानंतरही शोले आज आपल्या आठवणीत का आहे याचे उत्तर शोधताना आठवत होते ते त्यातील अजरामर झालेले एकेक कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरच्या तोंडी असलेले संवाद.. येस्स संवाद.. “ये हाथ मुझे दे दे ठाकूर” आणि “होली कब है, कब है होली?” असे विचारणार्‍या अमजदभाईंचा प्रत्येक संवाद स्वतामध्येच एक डायलॉग होता. पण त्याच जोडीने “मैने आपका नमक खाया है सरदार” असे बोलणारा कालियाही तेवढाच लक्षात राहतो. “भाग धन्नो, आज तेरे बसंती के इज्जत का सवाल है” बोलणार्‍या बसंतीबरोबरच तिच्या घोडी धन्नोलाही आपण विसरू शकत नाही ते याचमुळे. जेमेतेम दोन दृष्यात दिसणारे ए. के. हंगल ही “इतना सन्नाटा क्यू है भाई?” बोलत आपल्या आठवणींचा हिस्सा बनून जातात आणि त्याचमुळे सचिनने साकारलेला अहमद ही या आठवणींमध्ये एक जागा बनवतो. धरमजींनी आजवर किती चित्रपटात “कुत्ते कमीने” हा डायलॉग मारला हे माहीत नाही पण “बसंती ईन कुत्तोंके सामने मत नाचना” याचा नंबर त्यात सर्वात वरचा असावा हे नक्की. पाण्याच्या उंच टाकीवर चढून त्याने “सुसाइड सुसाईड” करत घातलेला गोंधळ तेवढाच अविस्मरणीय झाला आहे आणि “मौसीजी चक्की पिसिंग” मुळे बसंतीची मौसी सुद्धा कायम लक्षात राहते. एवढेच नाही तर “अरे भाई, ये सुसाईड क्या होता है?” विचारणारा गावकरीही अजून माझ्या डोळ्यासमोर येतो. अमिताभने बसंतीच्या मौसीकडे बसंती आणि वीरूच्या लग्नाची बोलणी करताना स्तुती करायच्या आविर्भावात धर्मेंद्रच्या वाईट सवयींचा पाढा वाचणे आणि सरतेशेवटी “अब क्या करू मौसी, मेरा तो दिल ही कुछ ऐसा है” असे बोलणे म्हणजे निव्वळ हास्याचा कडेलोट होता.

या साध्या साध्या वाक्यांमध्ये खरेच एवढा प्रभाव पाडायची ताकद होती का? की ही ताकद दिग्दर्शक रमेश सिप्पी, लेखक सलीम-जावेद आणि त्या दिग्गज अभिनेत्यांची होती? काही योग जुळूनच यावे लागतात असे म्हणतात. शोलेच्या बाबतीत प्रत्येक फ्रेममध्ये हे जुळून आले होते हे एक आश्चर्यच म्हणू शकतो. खरेच काही योग जुळायचेच होते म्हणूनच जयची भुमिका जी आधी शत्रुघ्न सिन्हा करणार होता ती अमिताभ बच्चनच्या पदरी आली. गब्बरसिंगच्या भुमिकेसाठी पहिली पसंती असलेला डॅनी डेंझोपा फिरोजखानच्या धर्मात्मामुळे वेळ देऊ न शकल्याने त्या भुमिकेचे सोने करायला अमजद खान अवतरला. धर्मेंद्र तर स्वत: संजीव कुमारने साकारलेली ठाकूर बलदेव सिंगची भुमिका करण्यास उत्सुक होता. पण असे काही घडणे नव्हतेच. याउलट स्वर्गात ज्या जोड्या जमवल्या गेल्या होत्या त्या इथेच जुळल्या. अमिताभ-जया आणि धर्मेंद्र-हेमा मालिनी. ऑनस्क्रीन रोमान्स जेव्हा ऑफस्क्रीनही घडतो तेव्हा तो परद्यावरही तेवढ्याच उत्कटतेने साकारला जातो याची प्रचिती शोले बघताना आल्याशिवाय राहत नाही. खास करून शोलेची अ‍ॅक्शन चित्रपट आणि धर्मेंद्रची अ‍ॅक्शन हिरो अशी ओळख असूनही धर्मेंद्र, हेमा मालिनीवर चित्रीत झालेली दृष्ये पाहताना त्यांच्यात जुळलेली केमिस्ट्री ही जाणवल्यावाचून राहत नाही.

सुमधुर संगीताशिवाय हिंदी चित्रपट हिट होणे शक्य नाही अश्या त्या काळात शोलेला हिट होण्यास संगीताची फारशी अशी गरज नव्हतीच. याउलट गाण्यांपेक्षाही ज्याचे संवाद जास्त लक्षात राहिले असा शोले हा त्या काळातील पहिलाच चित्रपट असावा. तरी शोलेची ही बाजूही कमकुवत नव्हती. “ये दोस्ती हम नही तोडेंगे” हे मैत्रीवरच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक असावे. “मेहबूबा मेहबूबा” हे गाणे आजही तेवढीच झिंग आणते. विशेष म्हणजे तुम्ही कितव्यांदाही शोले बघत असला तरी ती गाणी टाळून तुम्हाला पुढे जावेसे वाटत नाही हेच त्या गाण्यांचे यश आहे आणि याचे श्रेय जेवढे संगीतकार आर. डी. बर्मन यांचे आहे तेवढेच त्या गाण्यांच्या चित्रिकरणाचेही आहे. पार्श्वसंगीत आणि ध्वनीमुद्रणातल्या तांत्रिक बाबींबद्दल माझे ज्ञान तसे तोकडेच, पण शांततेचा भंग करत सूटलेल्या बंदूकीतील गोळीचा आणि तो घोड्याच्या टापांचा आवाज आजही कानात तसाच गुंजतो. ही सर्व त्या भारावलेल्या वातावरणाची जादूच असावी अन्यथा एवढा समरस मी आजवर कोणत्याही चित्रपटाशी झालो नव्हतो ना पुन्हा होईल असे वाटते.

सरतेशेवटी एवढेच सांगता येईल की शोले हा केवळ एक सिनेमा नव्हता तर भारतीय चित्रपटप्रेमींसाठी बायबल-गीता-कुराण होता. ज्याने तो पाहिला तोच हे समजू शकतो. न पाहिलेल्या माझ्या बायकोला ते काय रसायन होते हे निव्वळ शब्दांत समजवणे अशक्यच होते आणि म्हणूनच महिन्याभरापूर्वी मी खास बेत आखून शोलेची डीवीडी मिळवली आणि एकदाचा तिला लॅपटॉपवर दाखवला. पुर्ण चित्रपट बघून झाल्यावर मी तिला कसा वाटला हे विचारले. त्यावर तिचे औपचारीकता म्हणून आलेले “छान आहे” हे उत्तर थोडीशी चुटपुट लाऊन गेले खरे, पण या लेखाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा मी शोलेचा विषय काढला आणि तिची उत्स्फुर्त प्रतिक्रिया, “बरेच दिवस झाले ना बघून, परत बघूया का?” .. हे बरेच दिवस म्हणजे केवळ एक महिना होता बरे का.. काही लोकांमध्ये विष हळूहळू भिनत असावे.

असो, मला मात्र हा लेख लिहायच्या आधी शोले बघायचा नव्हता. कदाचित या लेखाला डोक्यात ठेऊन त्या दृष्टीकोणातूनच सिनेमा बघितला जायची भिती होती. शोले मध्ये नेमके मला काय आवडले हे शोधायचा उगाच एक निष्फळ प्रयत्न झाला असता, जे आजवर भल्या भल्या समीक्षकांना जमले नाही. काही जण तर तो प्रदर्शित झाल्या झाल्याच पाश्चात्य चित्रपटांची फसलेली नक्कल म्हणून त्याला फ्लॉप घोषित करून बसले होते. पण पुढे जे झाले, तो इतिहास आहे. त्यातील बर्‍याच जणांनी आपली चूक कबूल केली तर काही जण अजूनही हे कोडे उलगडवत बसले असतील. पण काही उत्तरे न शोधण्यातच शहाणपणा असतो नाही का.. तरी तुम्ही बघा प्रयत्न करून.. तुम्हाला जमतेय का..!

 

 

– तुमचा अभिषेक

 
 

सेकंड इनिंग

 

बायको माहेरी जाऊन आज पाचवा दिवस उजाडला होता. गेले चार दिवस तिचे आयुष्यात नसणे फारसे ध्यानात नाही आले कारण कामाच्या व्यापात गुंतलो होतो, किंवा स्वताला गुंतवून ठेवले होते म्हणालात तरी चालेल. सकाळी उठल्याऊठल्या टॉवेल शोधण्यापासून चहा गरम करून देण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवरून बायकोची आठवण यायची पण फारशी कमी जाणवायची नाही. आपले आपण काहीतरी करू शकतो हे माहीत असायचे. दुपारी जेवताना आज डबा नाही बाहेर खावे लागणार म्हणून पुन्हा बायको आठवायची, पण रोज रोज घरचा डबा खाण्यापेक्षा चार दिवस बाहेरचे खाऊन जीभेचे चोचले पुरवुया हा विचार करून बरेही वाटायचे. घरी परतताना बरोबर आज ती नाही आणि आई तर घरी रोजचीच आहे म्हणून ऑफिसला उशीरापर्यंत थांबायचो. तेवढाच ओवरटाईम यावेळी जास्त येणार हे समाधान जोडीला असायचे. घरी आलो की नेहमीसारखा लॅपटॉप उघडून बसायचो पण आज मात्र त्यावरून कोणी कटकट करायला नाही म्हणून रात्री मस्त उशीरापर्यंत टाईमपास ही चालायचा. काल शनिवारी देखील सुट्टी असून घरी काय करणार म्हणून एक्स्ट्रा वर्क करायला ऑफिसमध्ये गेलो, त्यामुळे तो ही दिवस गेल्या चार दिवसांसारखाच मजेत कटला. दुसर्‍या दिवशी रविवारची सुट्टी आणि झोपायची जराही घाई नाही म्हणून रात्रभर जागून काही जुनी गाणी ऐकली, काही ईंटरनेटवरून डाऊनलोड केली. काही नॉस्टॅल्जिक मेमरीज जाग्या झाल्या त्या उगाळतच उत्तररात्री कधीतरी झोपेच्या अधीन झालो.

उशीरा झोपण्याची परीणीती उशीरा उठण्यात झाली. आळस झटकायचे कष्ट न घेता केलेली तयारी होईस्तोवर मध्यान्ह झाली. पेपर चाळून झाला, टीवी वरचे सारे चॅनेल फिरून झाले. काल रात्रभर कुशीत घेऊन बसलेलो लॅपटॉप आता परत उघडायची इच्छा होत नव्हती. जेवण होईपर्यंत कशीबशी वेळ खेचून नेली. जेवल्यावर नाही म्हणायला थोडीफार सुस्ती आली पण सकाळी उशीरा उठल्याने झोप काही लागत नव्हती. आतासे कुठे चार वाजत होते पण मला मात्र कातरवेळ झाल्यासारखे वाटू लागले होते. काहीतरी चाळा म्हणून कॉफी बनवून तो कप हातात घेऊन व्हरांड्यात येऊन उभा राहिलो. पावसाळ्याचे दिवस असल्याने दुपारची वेळ असूनही बर्‍यापैकी अंधारून आले होते. बारीक बारीक बूंदाबांदीही होत होती. उबदार चादर घेऊन बिछान्यात पडून राहावे असे आळसाचे वातावरण तयार झाले होते. पण याची पर्वा न करता खाली मैदानात मात्र कॉलनीतील काही मुले क्रिकेट खेळत होती. पंधरा-सोळा ते वीस-बावीस वयोगटातील होती. म्हणजे माझ्यापेक्षा फार काही लहान होती असे म्हणता आले नसते. काही वर्षापूर्वी मी जेव्हा त्यांच्या जागी क्रिकेट खेळत होतो तेव्हा ती “दादा फोर, दादा सिक्स” बोलून मला चीअर करत असायची. आज त्यांचे खेळायचे दिवस होते, चीअर करणारी लहान मुले बदलली होती, आणि मी मात्र प्रेक्षकांच्या भुमिकेत शिरलो होतो. इतक्यात एका मुलाचे लक्ष गेले आणि त्याने मला सहज हाक मारून खेळायला बोलावले. मी तितक्याच सहजपणे नकार दिला आणि त्याने तितक्याच सहजपणे त्याचा स्विकार केला. जणू काही ही नुसती औपचारीकता होती. मी खेळायला जाणार नाही हे मला ठाऊक होते तसेच दादा काही खेळायला येत नाही हे त्यालाही ठाऊक होते. आणि त्यात त्याची काही चूकही नव्हती म्हणा. चार वर्षे तरी झाली असावीत मला शेवटचे बॅट हातात घेऊन. ते ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला जेव्हा शेवटचे खेळलो असेल तेव्हा स्वतालाही कल्पना नसावी की हे क्रिकेट खेळणे आपल्या आयुष्यातील शेवटचे असू शकते.

महिन्याभरापूर्वीचीच बातमी की राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. किती हळहळ वाटली होती त्या दिवशी. यापुढे कधी राहुल द्रविडला खेळताना बघायला मिळणार नाही म्हणून.. जेव्हा पासून क्रिकेट समजायला लागले तेव्हा पासून सचिन, राहुल आणि सौरव यांनीच माझे क्रिकेटविश्व व्यापले होते. सौरव काही वर्षापूर्वीच निवृत्त झाला, आता राहुलही झाला, आणि सचिनच्या निवृत्तीची चर्चा तर दर दुसर्‍या दिवशी चालूच असते. यांच्यानंतर मी क्रिकेट नक्की कोणासाठी बघणार हा प्रश्न होताच. त्यांचे क्रिकेट खेळणे न खेळणे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता जो त्यांना कधी ना कधी घ्यायचा होताच. त्यावर माझे किंवा कोणत्याही क्रिकेटप्रेमीचे नियंत्रण नव्हते. अन्यथा तसे असते तर त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळावे अशीच प्रार्थना देवाकडे केली असती. कारण त्यांच्या जाण्याने क्रिकेटचे सामने बघण्यातील रस आपसूकच कमी झाला होता. पण नक्कीच काही काळाच्या उदासीनतेनंतर त्या खेळाडूंची जागा नवीन खेळाडू घेऊन मी पुन्हा पहिल्यासारखेच क्रिकेट सामने बघणे एंजॉय करू लागेल याची शक्यताही होतीच. पण माझ्या क्रिकेट खेळण्याचे काय… कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही बातमी न बनवता, स्वताच्याही नकळत मी चार वर्षापूर्वी गल्ली क्रिकेटमधून एक प्रकारची निवृत्तीच नव्हती का स्विकारली… त्याचे काय… पुन्हा आता मी कधी बॅट हातात घेऊन मैदानावर उतरेल की नाही हे मला स्वताला देखील ठाऊक नव्हते. किंवा ती शक्यता शून्यच होती म्हणा ना, कारण आता समोर मुलांना क्रिकेट खेळताना बघूनही मला त्यांच्यात उतरावेसे वाटत नव्हते यातच सारे आले होते.

काही वर्षापूर्वी ज्या मुलासाठी क्रिकेट खेळणे म्हणजे जीव की प्राण होता त्याची ही आजची मनस्थिती होती. लहानपणी क्रिकेट खेळणार्‍या मुलांचा आवाज कानावर पडला तरी पाय थार्‍यावर राहत नसे. शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासाचे तास केवळ या खेळाच्या वेडापायीच बुडवले जायचे. शाळेतून घरी आल्याआल्या बॅग तशीच फेकून खेळायला पळायचो कारण थोड्याच वेळात अंधार पडणार हे माहीत असायचे आणि त्या आधी जास्तीत जास्त खेळून घ्यायचे असायचे. अनवाणी पायाने, उन्हातान्हाची पर्वा न करता, अर्धा-अर्धा तास पायपीट करायलाही तयार असायचो ज्याच्या मुळाशी याच खेळाचे वेड होते. वडापाव खाण्यासाठी मिळालेला पॉकेटमनी वाचवून ते दोन रुपये नवीन बॉल घ्यायचे कॉंट्रीब्यूशन म्हणून वापरायचो कारण हा खेळ मला तहान-भूक विसरायला लावायचा. आणि आज भरल्या पोटीही मला या खेळासाठी वेळ काढावासा वाटत नव्हता. असे नक्की काय बदलले होते… माझी मानसिकता, आयुष्यातील प्राथमिकता, की आजूबाजुचे वातावरण… क्रिकेट खेळायची आवड संपली होती की आजही मी खेळू शकतो हा आत्मविश्वास हरवला होता… की आजही मी तेवढ्याच ताकदीने फटके मारू शकेन का, तेवढ्याच वेगात चेंडू फेकू शकेल का याची भिती वाटत होती… खरे पाहता तेवढे माझे वयही झाले नव्हते ना तेवढा मी शारीरीकदृष्ट्या कमजोर झालो होतो, आणि झालो असलो तरी ते खरेच तेवढे मॅटर करत होते का… कुठे मला स्पर्धात्मक खेळात उतरायचे होते… मग नक्की काय चुकत होते… एकच मुद्दा होता की माझ्याबरोबरचे सारेही आपल्या कामात, संसारात व्यस्त झाले होते. पण तरीही माझे खेळने न खेळने त्यांच्या सहभागाशी बांधील होते का… समोर मुले खेळत होती. माझ्यापेक्षा काहीच वर्षे लहान. मी त्यांच्यात सामील झालो तर होऊ शकते की सुरुवातीला त्यांना वेगळे वाटेल. पण एकदा खेळ सुरू झाला असता आणि मी त्यांच्यातीलच एक बनून गेलो असतो तर नक्की हे अवघडलेपण कुठच्या कुठे पळून गेले असते. कदाचित माझ्या बरोबरीचे जे असेच आज आपल्या बाल्कनीमध्ये बसून आपले दिवस आठवत असतील ते ही पुढच्या रविवारी माझ्या जोडीने खेळायला उतरलेले दिसले असते. गरज होती ती एकाने पुढाकार घ्यायची आणि ती देखील इतर कोणासाठी नाही तर स्वतासाठी.. स्वताचे काहीतरी हरवलेले गवसण्यासाठी..

याच विचारात पेल्यातील कॉफी कधी थंड झाली समजलेच नाही. मगासच्या रिमझिम पावसाने आता मुसळधार तडाखा द्यायला सुरुवात केली होती. क्रिकेट थांबले होते आणि त्याच जागी पावसाळी फूटबॉल सुरू झाला होता. आता मात्र मला खरेच धीर धरवत नव्हता. हा खेळ तसा फारसा आवडीचा नव्हता. एक फूटबॉलचा दर चार वर्षाने येणारा विश्वचषक वगळता कधी टी.वी. समोर बसल्याचे आठवत नव्हते. त्यातही एक ब्राझीलचा संघ आणि त्यांचा रोनाल्डो सोडून दुसर्‍या कोणाला चेहर्‍याने मी ओळखू शकेल याची श्वाश्वती नव्हती. तरीही दर पावसाळ्यात चिखलपाणी, कपड्यांची पर्वा न करता, हातपाय तुटण्याची चिंता न करता हा खेळ बेभान होऊन न चुकता खेळला मात्र जायचा. तसे तर व्यवस्थित कोणालाच खेळता यायचे नाही, ना सारे नियम कोणाला माहीत असायचे. पण अट फक्त एकच असायची की जो पर्यंत आकाशातून कोसळणारा पाऊस थकत नाही तो पर्यंत कोणाचे पाय थकले नाही पाहिजेत. फूटबॉल हे केवळ एक कारण असायचे ज्याच्या तालावर नुसता धिंगाणा घातला जायचा, पावसात भिजायचा आनंद लुटला जायचा.

आज मी देखील तेच करत होतो. बघता बघता मी कधी खाली उतरून त्या मुलांच्यात मिसळलो हे माझे मलाच कळले नव्हते. सकाळपासून, खरे तरे गेले चार दिवसांपासून किंवा चार वर्षांपासून अंगात भरलेली सुस्ती केव्हाच झटकली गेली होती होती. घड्याळाचे काटे चार वर्षे मागे फिरवणे तर शक्य नव्हते पण येणारा प्रत्येक क्षण त्याची भरपाई करण्यासाठीच मी खेळत होतो. किती गोल केले आणि किती खाल्ले याचा हिशोब मी ठेवतच नव्हतो. कारण मला माहीत होते की ही तर फक्त सुरुवात होती. एका नवीन इनिंगची.. एका सेकंड इनिंगची.. जसे कसोटी क्रिकेटमध्ये सेकंड इनिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवणे कठीण असते कारण चार दिवस खेळून शरीर थकले असते, खेळपट्टी ही खराब झाली असते, सारी परिस्थिती प्रतिकूल झाली असते तरीही ती ईनिंग खेळल्याशिवाय सामना काही पुर्ण नाही होत तसेच काहीसे माझे झाले होते. ही इनिंग मला खेळायचीच होती. नाहीतर आयुष्यात काही आठवणी अर्धवटच राहिल्या असत्या, काही जगायचे बाकी राहिले असे सतत वाटत राहिले असते. आज मारलेल्या प्रत्येक फटक्याबरोबर ती खंत मनातून दूरवर फेकली जाताना मला दिसत होती. उद्या माझी बायको माहेरहून आल्यावर कदाचित पुन्हा तेच ते पहिल्याचे रूटीन सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण या सार्‍या जर तर च्या शक्यता नाकारून आज तरी मी माझ्या सेकंड इनिंगला मोठ्या जोमात सुरुवात केली होती…

…तुमचा अभिषेक