RSS

Category Archives: ललितलेख

मुंबई गर्ल !

परवाचीच गोष्ट.
तब्येत बरी नसल्याने ऑफिसला अर्ध्या दिवसाने जात होतो. दुपारची वेळ, प्लॅटफॉर्म क्रमांक ‘१’ वर बेलापूर ट्रेनची वाट बघत उभा होतो. इतक्यात पलीकडल्या रुळावर बोरीबंदरला (आताच्या सीएसटीला) जाणारी ट्रेन लागली. आपल्याला जायचे नाही त्या दिशेची ट्रेन आधी येणे हे नेहमीचेच. मलाही तशी काही घाई नव्हती पण उकाड्याने जीव हैराण झाल्याने फलाटावर फार वेळ ताटकळत उभे राहण्यात रस नव्हता. पण या तप्त वातावरणातही समोरच्या ट्रेनला काही वीर दाराला लटकलेले दिसत होते. रोजचेच असल्याप्रमाणे त्यांच्या आपापसात कुचाळक्या चालू होत्या. आत बसायला जागा असूनही उन्हे झेलत बाहेर दाराला लटकण्याचे ते एक कारण असावे. मी सवयीनेच तिथे दुर्लक्ष केले. ट्रेनने भोंगा दिला आणि त्यांची ट्रेन सुटली. तसे अचानक त्या पोरांचा गलका वाढला. पाहिले तर आमच्या फलाटावर उभ्या काही महिला प्रवाश्यांना शुक शुक करत आणि त्याउपरही बरेच काही ओरडत, हातवारे करत चिडवणे चालू होते. त्यांचे ते तसे चित्कारणे संतापजनक होते खरे, पण फलाटावर उभ्या महिला देखील त्याला सवयीचाच एक भाग म्हणून स्विकारल्यागत, विशेष काही घडत नाहीये अश्याच आविर्भावात उभ्या होत्या. जवळपास उभे असलेले पुरुष, हो ज्यात एका कोपर्‍यात मी देखील उभा, यावर दुर्लक्ष करण्याव्यतिरीक्त फारसे काही करू शकत नव्हतो. फक्त चार ते पाच सेकंद आणि समोरची ट्रेन नजरेआड. या चार सेकंदात त्यांना प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करणे म्हणजे उलट आणखीन गलिच्छ प्रकारांना आमंत्रण देणे. किंबहुना म्हणूनच अश्यांना ऊत येतो. जेव्हा ट्रेनने वेग पकडलेला असतो वा जेव्हा ट्रेन समोरच्या ट्रॅकवर असल्याने जमावापासून सुरक्षित अंतरावर असते, तसेच दुपारची कमी गर्दीची वेळ असते तेव्हाच अश्यांची हिंमत वाढते.

असो,
ट्रेन गेल्यावर मात्र महिलांचे आपापसात यावर बोलणे सुरू झाले. अर्थात शक्य तितके सभ्य भाषेत अपशब्द वापरून मनातली भडास काढून हलके होणे हाच या मागचा हेतू असावा. कितीही सवयीचाच भाग म्हटले तरी अश्या प्रकारांचा त्रास होणे हे साहजिकच होते. यावेळी त्या जवळपास उपस्थित पुरुषांना देखील तुम्ही सुद्धा त्यातलेच एक आहात, पुरुष आहात, याच भावनेने बघत होत्या हे जाणवत होते. पण बोचत नव्हते. कारण ती भावना क्षणिकच आहे याची कल्पना होती. तरीही त्या क्षणिक विखाराला नजर देण्याची हिंमत नसल्याने मी खिशातून मोबाईल काढून त्यात डोके खुपसले. हा मगाशीच हातात असता तर कदाचित एखादा फोटोच टिपता आला असता असा विचार क्षणभर मनात आला. येऊन विरला आणि किस्सा इथेच संपला !

आता कालची गोष्ट.
शनिवारची सुट्टी असूनही ऑफिसला कामानिमित्त जायचे असल्याने आरामात झोप वगैरे पुर्ण करून सकाळी थोडे उशीराच उठून सावकाश घराबाहेर पडलो. साधारण साडेअकराची वेळ. आदल्या दिवशीचा किस्सा ताजा असूनही त्याला विस्मरणात टाकले होते. थोड्याफार फरकाने कालच्याच जागी मध्येच एखादी थंड झळ सोडणार्‍या पंख्याखाली हवा खात उभा होतो. माझी बेलापूर ट्रेन यायला अवकाश होता, त्या आधी अंधेरी ट्रेन होती. अर्थात ही आमच्याच फलाटाला लागते. ट्रेनला तुरळक गर्दी आणि दारांवर उभे प्रवासी. मात्र कालच्यासारखे घडण्याची शक्यता कमीच कारण तशीच आदर्श स्थिती नव्हती. ट्रेनने भोंगा दिला आणि सुटली, तसे अचानक एक लहानगी, वय वर्षे फार तर फार दहा-बारा, कळकट मळकट पेहराव, खांद्यावर येऊन विस्कटलेले आणि कित्येक दिवस पाणी न लागल्याने कुरळे वाटणारे केस, अश्या रस्त्याकडेच्या झोपडपट्ट्यांमध्ये आढळणारी टिपिकल अवतारातील मुलगी कुठूनशी आली आणि त्या नुकत्याच सुटलेल्या ट्रेनच्या अगदी जवळून तिच्या गतीच्या विरुद्ध दिशेने चालू लागली.

मुंबईत शक्यतो असे करणे सारे टाळतातच, कारण पुन्हा कधी कोण आपल्याला चालत्या ट्रेनमधून टपली मारून जाईल सांगता येत नाही. त्यामुळे साहजिक माझी नजर तिच्यावरच खिळली. पण या चिमुरडीचा हेतू काहीतरी वेगळाच दिसत होता. तिने स्वत:च ट्रेनच्या दारावर उभे असलेल्या प्रवाश्यांना हूल द्यायला सुरुवात केली. बरे हूलही अगदी ट्रेनच्या दिशेने झुकून, कंबरेत किंचितसे वाकून, मारण्याच्या आविर्भावात हात अगदी डोक्याच्या वर उगारून, असे की समोरची व्यक्ती दचकून मागे सरकायलाच हवी. माझ्यापासून ती दूर पाठमोरी जात असल्याने तिचा चेहरा वा चेहर्‍यावरचे भाव मला टिपता येत नव्हते, पण नक्कीच वेडगळ असावेत हा पहिला अंदाज. पहिल्या दरवाज्याला तिने हे केले तेव्हा तिथले प्रवासी या अनपेक्षित प्रकाराने भांबावून गेले, अन भानावर आले तसे मागे वळून तिला चार शिव्या हासडाव्यात असा विचार करेस्तोवर ती आपल्याच नादात पुढच्या डब्यापर्यंत पोहोचली देखील होती. तिथेही तिने हाच प्रकार केला आणि मी समजलो हे प्रकरण काहीतरी वेगळे दिसतेय.

पुन्हा एकदा दारावरची मुले बेसावध असल्याने त्यांचीही तशीच तारांबळ उडाली. मात्र झालेल्या फजितीचे उत्तर द्यायला म्हणून आपण त्या मुलीचे काहीच करू शकत नाही हे भाव त्यांच्याही चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. आता मी हे सारे एखादा फनी विडिओ बघावे तसे एंजॉय करू लागलो. कारण सुरुवातीला मला वेडसर, आणि मग आचरट वाटणारी मुलगी अचानक धाडसी आणि निडर वाटू लागली होती. काल जो प्रकार अनुभवला त्याच्याशी मी हे सारे नकळत रिलेट करू लागलो आणि जणू काही त्याचीच फिट्टंफाट करायला म्हणून नियतीने हिला धाडले असे वाटू लागले. भले आताचे हे दारावर उभे असलेले प्रवासी कालच्यांसारखे मवाली गटात मोडणारे नसावेतही, तरीही ती मुलगी एका अर्थी प्रस्थापितांना काटशहच देत होती. हळूहळू ट्रेन वेग पकडत होती. आणि मागाहून येणार्‍या डब्यातील प्रवाश्यांना एव्हाना या मुलीच्या पराक्रमाचा अंदाज आला होता. आता त्यातील एखादा हिच्यावर पलटवार करणार का या विचाराने माझेही श्वास रोखले गेले. आणि ईतक्यात पुढचा डब्बा आला तसे दारावरचे सारेच प्रवासी स्वताला सावरून आत सरकले. उलटून प्रतिकार करणे तर दूरची गोष्ट उलट बचावात्मक पवित्रा घेऊन त्यांनी तिचे उपद्रवमूल्य मान्य केले. त्या मुलीचे वर्तन भले चुकीचे का असेना, त्या मागे सरकलेल्या माणसांनाही ती तशीच हूल देऊन पुढे सरकली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर कदाचित विजयश्री मिळवल्याचे भाव नसतीलही, पण माझ्या चेहर्‍यावर मात्र हास्याची लकेर उमटली. या जगात प्रत्येकाला बाप मिळतोच तसे एखादी तुमची आई ही निघू शकते हे त्या मुंबई गर्लने दाखवून दिले होते.

– तुमचा अभिषेक

 

 

मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले. वाटेत सव्वाचार मिनिटांनी भमरसिंग मिठाई अन फरसाणवाला लागतो, येताना त्याच्याकडे खादाडी करून घरच्यांसाठी पण गरमागरम सामोसे घ्यायचा प्लान होता. मात्र प्लॅन थोडा चेंज करत पोटात किलबिलणार्‍या कावळ्यांना शांत करायला मी आधीच खादाडी करायचा निर्णय घेतला. तसेही कुठे मला डोंगरावर सूर्य नमस्कार मारायचे होते. जी काही भटकंती वा निसर्गाशी प्रणयाराधना करायची होती ती भरल्यापोटी करणे केव्हाही चांगलेच..

काल अवचितपणे पडलेल्या पावसामुळे वातावरण भन्नाटच होते. किंबहुना सकाळी उठल्यावर खिडकीतून पुर्ण मुंबईवर एक नजर फिरवून हे वातावरण बघूनच मी हा मॉर्निंग वॉल्कचा निर्णय घेतला. जेवढे उल्हासित खिडकीतून बाहेर नजर फिरवताना वाटले होते त्यापेक्षा जास्त बाहेर पडल्यावर वाटू लागले. वाटेत विचार आला की च्यायला सकाळी साडेसहा-पावणेसातला भमरसिंगकडे काय खायला मिळणार आहे. मात्र माझा अंदाज साफ चुकलाय हे मी समजून चुकलो जेव्हा तिथे जमलेली गर्दी मला लांबूनच दिसली. एवढ्या सकाळी खाण्याचे प्रकार मात्र मोजकेच होते, पण आवडीचे असेच होते. मी एक गरमागरम सिंगल समोसा आणि एक प्लेट फाफडा-जिलेबी मिक्स घेतली. याआधी कधी हे खाल्ले नव्हते असे नाही पण असे भल्या पहाटे खाण्यातील मजा काही औरच. ईसके उपर चाय तो बनती हि है म्हणून लागलीच भटाच्या टपरीकडे मोर्चा वळवला. हा खाण्यापिण्याचा प्रोग्राम उरकून मी डोंगराच्या मेनगेट पाशी येऊन मोबाईल चेक केला तर सात वाजून बारा मिनिटे झाली होती.

सव्वासात वाजले तरी वातावरण असे होते की सव्वाआठपर्यंत तरी सुर्याची कोवळी किरणे भूतलावर पोहोचणार नव्हती. मी कानातली गाणी चालू करून डोंगर चढायला घेतला. संगीताच्या तालावर श्रम फारसे जाणवत नाही हा स्वानुभव. तसेही डोंगर चढणे म्हणजे काही फार गड सर करणे नव्हते. मुळात जिथून चढायला सुरूवात करतो तो डोंगराचा पायथाच समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर असल्याने पुढे पाचेक मिनिटेच रमतगमत चालायचे असते. टेकडीच्या एका टोकावर असलेल्या देवीच्या मंदिराकडे न जाता मी जोसेफ बापटिस्टा गार्डनच्या दिशेने पावले वळवली. रस्त्यात अध्येमध्ये दिसत होती ती कुठल्या झाडाखाली, कुठल्या बेंचवर, कुठल्या कठड्यावर, तर कुठे पायरीवरच पेपर अंथरून.. अंह, प्रेमी युगुले नाही, तर शाळाकॉलेजातील मुले अभ्यास करत बसली होती. त्यांना पाहून माझे दहावी-बारावीचे दिवस आठवले. अश्या अभ्यासूंसाठी डोंगराच्या एका शांत भागात पण निसर्गाच्याच सानिध्यात सिमेंट कॉंक्रीटचे तंबू टाईप स्टडीकॅंप उभारले आहेत, मात्र त्या ठराविक जागेतच अभ्यास करण्यापेक्षा एवढ्या भल्यामोठ्या डोंगरावर वेगवेगळ्या जागा शोधत अभ्यास करण्यातच आम्हीही धन्यता मानायचो. वाटेतल्या झाडांवर कावळ्यांची कावकाव सुरू झाली होती, मात्र वर गार्डनमध्ये विविध पक्षी आजही गलका करत असतील अशी आशा होती. चला बघूया पुढे ते खरेच मला भेटले का ते..

तर, माझगाव परिसराला पाण्याचा पुरवठा करणार्‍या, डोंगरमाथ्यावर वसलेल्या टाकीच्या तळाशी, उजव्या हाताच्या गेटने मी गार्डनमध्ये प्रवेश केला. नेहमीची संध्याकाळची गर्दी नसल्याने पार दूरवर नजर जात होती. एक गार्डन, त्या पलीकडे दुसरे, त्या पलीकडे तिसरे … प्रत्येकाचा आपलाच एक आकार आणि आपलेच एक वैशिष्ट्य. कमीअधिक प्रमाणात कापले जाणारे गवत तर कुठे त्या गवताच्या रंगाची भिन्नता. प्रत्येक गार्डनची सीमारेषा आखणार्‍या फूलझाडांचेही सतरा प्रकार. प्रत्येकात असलेली बसायची सोय देखील वेगवेगळ्या आकार उकाराची. या सर्वांना सामाऊन घेणार्‍या परीघावरून फिरणारा जॉगिंग ट्रॅक, ज्यावर आपण काय किती धावलो हे कडेने लिहिलेल्या मार्किंग्सवर मोजत काही फिटनेस कॉशिअस स्त्री-पुरुषांचे धावणे सुरू होते. मी मात्र त्यांच्या वेगाला डिस्टर्ब न करता त्याच परीघावरून चालतच एक राऊंड मारून पुर्ण डोंगराला एकदा नजरेखालून घालायचे ठरवले. आरामात रमतगमत चालायचे ठरवले तरी सकाळचा फ्रेश मूड, आजूबाजुला धावणार्‍यांमुळे तयार झालेले उत्साही वातावरण आणि पायात असलेले स्पोर्ट्स शूज यांमुळे माझीही पावले झपाझप पडत होती.

अर्धी फेरी मारून झाल्यावर एक पाणवठा लागला, तिथेच नळाला तोंड लाऊन थंडगार पाणी आत टाकले. थोडे सवयीनेच तोंडावर शिंपडले आणि तोच ओला हात केंसांतून आरपार फिरवला तसे थंडी जाणवून गारठून निघालो. मात्र गालाला सुया टोचल्यासारखे वाटू लागल्याने मूड डबल फ्रेश झाला. पुढे दोन पर्याय होते, एक पुढे त्याच जॉगिंग ट्रॅकवर जावे किंवा चार पायर्‍या उतरून गार्डनच्या खालच्या अंगाला यावे. डोंगराचा एक कडाच तो ज्याला पुर्णपणे सुरक्षिततेचे कुंपण घातले आहे. त्या आत बसण्यासाठी म्हणून तसाच पुर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत कठडा फिरवला आहे. अर्थात मी तिथेच गेलो हे वेगळे सांगायची गरज नाही. तिथून खाली डॉकयार्ड स्टेशन दिसते तर समोर पसरलेला अथांग समुद्र, एक बंदर, जे भाऊचा धक्का म्हणून ओळखले जाते. रेल्वेच्या पुलावर, पर्यायाने उंचावर असणारे डॉकयार्ड स्टेशन देखील तिथून खूप खाली आहे असे भासते. खाली स्टेशनला लागणारी ट्रेन भातुकलीच्या खेळातली वा एखाद्या प्रोजेक्टच्या मॉडेलमधली आहे असे वाटावे. भाऊच्या धक्क्याच्या आसपास कुठलीही गगनचुंबी इमारत नसल्याने समुद्र अगदी काठापासून क्षितिजापर्यंत एकाच नजरेत बघता येतो. बंदराला लागलेल्या बोटी अन डॉकमधील मोठाली यंत्रे आणि क्रेन्स हा समुद्र इतर समुद्रांपेक्षा वेगळा आहे हे दर्शवत होते. जवळपास पाऊण एक तास मी तिथेच गाणी ऐकत बसून होतो, हळूहळू दक्षिण मुंबई शहराला जागे होताना बघत.

कोलाहल वाढू लागला, पक्ष्यांच्या किलबिलीची जागा फलाटावरच्या वाढत्या गर्दीचा गोंधळ घेऊ लागला, तसे मी उठायचे ठरवले. दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे अजूनही सुर्याची किरणे माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती. पण जसे पुन्हा मोकळ्या बगीच्यांमध्ये आलो तसे कोवळे उन जाणवू लागले. तो उबदारपणा हवाहवासा वाटू लागला. म्हणून आता तो उपभोगायसाठी डोंगरावरचा मुक्काम आणखी थोडा वाढवायचे ठरवले. एक बाकडा पकडून, अंह, त्यावर बसलो नाही तर त्याच्या कडेला माझे शूज काढून ठेवले आणि माझ्या आवडत्या प्रकारासाठी सज्ज झालो. दव पडलेल्या गवतावरून अनवाणी पायांनी चालणे. खाली तळपावलांना जाणवणारा थंडगार ओलावा, सोबत गुदगुल्या करत टोचणारी गवताची पाती आणि वर अंगाखांद्यावर खेळणारी सोनेरी किरणे. अंगावरची सारी वस्त्रे भिरकाऊन तिथेच लोळत पडावे असा मोह पाडणारा अनुभव घेत मी पुढची पंधरा-वीस मिनिटे फेर्‍या घालत होतो. या प्रकाराची संध्याकाळीही आपलीच एक मजा असते, खास करून डोंगराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कारंज्याच्या जवळचे एखादे गार्डन पकडावे, ते ही वार्‍याची दिशा अशी बघावी की कारंज्याचे तुषार त्या सुसाट वार्‍याबरोबर उडत येऊन आपल्याला पार न्हाऊन टाकतील. आयुष्यातल्या सार्‍या चिंता या प्रकारात विसरायला होतात. माझे अभ्यासाचे टेंशन तरी वेळोवेळी विसरायला मी हाच फंडा वापरायचो.

असो, तर त्याचवेळी घड्याळात वेळ चेक करून आता माहेरी गेलेली बायको उठली असेल या हिशोबाने तिला फोन लाऊन त्या गवतावर चालता चालताच तिच्याशीही दहा-पंधरा मिनिटे बोलून घेतले. आज आपला नवरा चक्क स्वताहून फोन करून चक्क दहा ते पंधरा मिनिटे बोलतोय आणि ते ही चक्क हळूवार आणि रोमॅंटीक.. एकंदरीत चक्क्राऊनच गेली ती बिच्चारी.

बस मग पुढे काय परतीचा रस्ता. उतरणीचा असल्याने तरंगतच उतरलो. तसेही दमण्यासारखे श्रमदान झाले नव्हतेच, किंबहुना दिवसभर, अंह आठवडाभर पुरणारा उत्साह घेऊन परतत होतो. वाटेत घरच्यांसाठी सामोसे पार्सल घ्यायला विसरलो नाही, आणि एकदाची स्वारी नऊच्या सुमारास घरी परतली !

——————————

सदर अनुभव आमच्या माझगावच्या डोंगराची जाहीरात करण्यासाठी लिहिला आहे. तर कधी आलात त्या भागात जरूर भेट द्याल. अन मलाही आवाज द्यायला विसरू नका. मी तिथून हाकेच्या अंतरावर राहत असलो तरी हाक न मारता फोन वा मेसेज करू शकता 🙂

– तुमचा अभिषेक

 

सेकंड इनिंग

बायको माहेरी जाऊन आज पाचवा दिवस उजाडला होता. गेले चार दिवस तिचे आयुष्यात नसणे फारसे जाणवले नाही, कारण कामाच्या व्यापात गुंतलो होतो, किंवा स्वताला गुंतवून ठेवले होते म्हणालात तरी चालेल. सकाळी उठल्याऊठल्या टॉवेल शोधण्यापासून चहा गरम करून देण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तिची आठवण यायची पण फारशी कमी जाणवायची नाही. आपले आपणच काहीतरी करू शकतो हे माहीत असायचे. दुपारी जेवताना आज डबा नाही तर बाहेर खावे लागणार म्हणून पुन्हा ती आठवायची, पण रोज रोज घरचा डबा खाण्यापेक्षा चार दिवस बाहेरचे खाऊन जीभेचे चोचले पुरवुया हा विचार करून बरेही वाटायचे. घरी परतताना आज बरोबर ती नाही आणि आई घरी मालिका बघण्यात व्यस्त म्हणून ऑफिसला उशीरापर्यंत थांबायचो, पण तेवढाच ओवरटाईम यावेळी जास्त येणार हे समाधान जोडीला असायचे. घरी आलो की नेहमीसारखा लॅपटॉप उघडून बसायचो पण आज मात्र त्यावरून कोणी कटकट करायला नाही म्हणून रात्री मस्त उशीरापर्यंत टाईमपास ही चालायचा. काल शनिवारी देखील सुट्टी असून घरी काय करणार म्हणून एक्स्ट्रा वर्क करायला ऑफिसमध्ये गेलो, त्यामुळे तो ही दिवस गेल्या चार दिवसांसारखाच मजेत कटला. दुसर्‍या दिवशी रविवारची सुट्टी आणि झोपायची जराही घाई नाही म्हणून रात्रभर जागून काही जुनी गाणी ऐकली, काही ईंटरनेटवरून डाऊनलोड केली. काही नॉस्टॅल्जिक मेमरीज जाग्या झाल्या त्या उगाळतच उत्तररात्री कधीतरी झोपेच्या अधीन झालो.

उशीरा झोपण्याची परीणीती उशीरा उठण्यात झाली. आळस झटकायचे कष्ट न घेता केलेली तयारी होईस्तोवर मध्यान्ह झाली. पेपर चाळून झाला, टीवी वरचे सारे चॅनेल फिरून झाले. काल रात्रभर कुशीत घेतलेला लॅपटॉप आता परत उघडायची इच्छा होत नव्हती. जेवण होईपर्यंत कशीबशी वेळ खेचून नेली. जेवल्यावर नाही म्हणायला थोडीफार सुस्ती आली पण सकाळी उशीरा उठल्याने झोप काही लागत नव्हती. आतासे कुठे चार वाजत होते पण मला मात्र कातरवेळ झाल्यासारखे वाटू लागले. काहीतरी चाळा म्हणून कॉफी बनवून तो कप हातात घेऊन व्हरांड्यात येऊन उभा राहिलो. पावसाळ्याचे दिवस असल्याने दुपारची वेळ असूनही बर्‍यापैकी अंधारून आले होते. बारीक बारीक बूंदाबांदीही होत होती. उबदार चादर घेऊन बिछान्यात पडून राहावे असे आळसाचे वातावरण तयार झाले होते. पण खाली मैदानात मात्र याची पर्वा न करता कॉलनीतील काही मुले क्रिकेट खेळत होती. पंधरा-सोळा ते वीस-बावीस वयोगटातील, म्हणजे माझ्यापेक्षा फार काही लहान होती असे म्हणता आले नसते. काही वर्षापूर्वी मी जेव्हा त्यांच्या जागी क्रिकेट खेळत होतो तेव्हा ती मला “दादा फोर, दादा सिक्स” बोलून चीअर करत असायची. आज त्यांचे खेळायचे दिवस होते, चीअर करणारी लहान मुले बदलली होती, आणि मी मात्र प्रेक्षकांच्या भुमिकेत शिरलो होतो. इतक्यात एका मुलाचे लक्ष गेले आणि त्याने मला सहज हाक मारून खेळायला बोलावले. मी तितक्याच सहजपणे नकार दिला आणि त्याने तितक्याच सहजपणे त्याचा स्विकार केला. जणू काही ही नुसती औपचारीकता होती. मी खेळायला जाणार नाही हे मला ठाऊक होते तसेच ‘दादा’ काही खेळायला येत नाही हे त्यालाही ठाऊक होते. आणि त्यात त्याची काही चूकही नव्हती. चार वर्षे झाली असावीत मला शेवटचे बॅट हातात घेऊन. ते ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला जेव्हा शेवटचे खेळलो असेल तेव्हा स्वतालाही कल्पना नसावी की हे क्रिकेट खेळणे आपल्या आयुष्यातील शेवटचे असू शकते.

महिन्याभरापूर्वीचीच बातमी की राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. किती हळहळ वाटली होती त्या दिवशी. यापुढे कधी राहुल द्रविडला खेळताना बघायला मिळणार नव्हते म्हणून. जेव्हा पासून क्रिकेट समजायला लागले तेव्हा पासून सचिन, राहुल आणि सौरव यांनीच माझे क्रिकेटविश्व व्यापले होते. सौरव काही वर्षापूर्वीच निवृत्त झाला, आता राहुलही झाला, आणि सचिनच्या निवृत्तीची चर्चा तर दर दुसर्‍या दिवशी चालूच असते. यांच्यानंतर मी क्रिकेट नक्की कोणासाठी बघणार हा प्रश्न होताच. त्यांचे क्रिकेट खेळणे न खेळणे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता जो त्यांना कधी ना कधी घ्यायचा होताच. त्यावर माझे किंवा कोणत्याही क्रिकेटप्रेमीचे नियंत्रण नव्हते. अन्यथा तसे असते तर त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळावे अशीच प्रार्थना देवाकडे केली असती. कारण त्यांच्या जाण्याने क्रिकेटचे सामने बघण्यातील रस आपसूकच कमी झाला होता. पण नक्कीच काही काळाच्या उदासीनतेनंतर त्या खेळाडूंची जागा नवीन खेळाडू घेऊन मी पुन्हा पहिल्यासारखेच क्रिकेट सामने बघणे एंजॉय करू लागेल याची शक्यताही होतीच. पण माझ्या क्रिकेट खेळण्याचे काय..? कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही बातमी न बनवता, स्वताच्याही नकळत मी चार वर्षांपूर्वी गल्ली क्रिकेटमधून एक प्रकारची निवृत्तीच नव्हती का स्विकारली? त्याचे काय? पुन्हा कधी मी आता बॅट हातात घेऊन मैदानावर उतरेल की नाही हे मला स्वताला देखील ठाऊक नव्हते. किंवा ती शक्यता शून्यच होती म्हणा ना, कारण आता समोर मुलांना क्रिकेट खेळताना बघूनही मला त्यांच्यात उतरावेसे वाटत नव्हते यातच सारे आले होते.

काही वर्षापूर्वी ज्या मुलासाठी क्रिकेट खेळणे म्हणजे जीव की प्राण होता त्याची ही आजची मनस्थिती होती. लहानपणी क्रिकेट खेळणार्‍या मुलांचा आवाज कानावर पडला तरी पाय थार्‍यावर राहत नसे. शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासाचे तास केवळ या खेळाच्या वेडापायीच बुडवले जायचे. शाळेतून घरी आल्याआल्या बॅग तशीच फेकून खेळायला पळायचो कारण थोड्याच वेळात अंधार पडणार हे माहीत असायचे आणि त्या आधी जास्तीत जास्त खेळून घ्यायचे असायचे. अनवाणी पायाने, उन्हातान्हाची पर्वा न करता, अर्धा-अर्धा तास पायपीट करायलाही तयार असायचो ज्याच्या मुळाशी याच खेळाचे वेड होते. वडापाव खाण्यासाठी मिळालेला पॉकेटमनी वाचवून ते दोन रुपये नवीन बॉल घेण्यासाठीचे कॉंट्रीब्यूशन म्हणून वापरायचो कारण हा खेळ मला तहान-भूक विसरायला लावायचा. आणि आज भरल्या पोटीही मला या खेळासाठी वेळ काढावासा वाटत नव्हता. असे नक्की काय बदलले होते.. माझी मानसिकता, आयुष्यातील प्राथमिकता, की आजूबाजुचे वातावरण.. क्रिकेट खेळायची आवड संपली होती की आजही मी खेळू शकतो हा आत्मविश्वास हरवला होता.. की आजही मी तेवढ्याच ताकदीने फटके मारू शकेन का, तेवढ्याच वेगात चेंडू फेकू शकेल का याची भिती वाटत होती.. खरे पाहता तेवढे माझे वयही झाले नव्हते ना तेवढा मी शारीरीकदृष्ट्या कमजोर झालो होतो, आणि झालो असलो तरी ते खरेच तेवढे मॅटर करत होते का? कुठे मला स्पर्धात्मक खेळात उतरायचे होते? मग नक्की काय चुकत होते. एकच मुद्दा होता की माझ्या वयाचे सारे मित्र आपल्या कामात, आपल्या संसारात व्यस्त झाले होते. पण तरीही माझे खेळने न खेळने त्यांच्या सहभागाशी बांधील होते का? समोर मुले खेळत होती. माझ्यापेक्षा काहीच वर्षे लहान. मी त्यांच्यात सामील झालो तर शक्य आहे सुरुवातीला त्यांना वेगळे वाटेल, मला अवघडल्यासारखे वाटेल. पण एकदा का खेळ सुरू झाला आणि मी त्यांच्यातीलच एक बनून गेलो तर नक्की हे अवघडलेपण कुठच्या कुठे पळून जाईल. कदाचित माझ्या बरोबरीचे जे असेच आज आपल्या बाल्कनीमध्ये बसून आपले दिवस आठवत असतील ते ही पुढच्या रविवारी माझ्या जोडीने खेळायला उतरलेले दिसतील. गरज होती ती एकाने पुढाकार घ्यायची आणि ती देखील इतर कोणासाठी नाही तर स्वतासाठी.. स्वताचे काहीतरी हरवलेले गवसण्यासाठी..

याच विचारात पेल्यातील कॉफी कधी थंड झाली समजलेच नाही. मगासच्या रिमझिम पावसाने आता मुसळधार तडाखा द्यायला सुरुवात केली होती. क्रिकेट थांबले होते आणि त्याच जागी पावसाळी फूटबॉल सुरू झाला होता. आता मात्र मला खरेच धीर धरवत नव्हता. हा खेळ तसा फारसा आवडीचा नव्हता. एक फूटबॉलचा दर चार वर्षाने येणारा विश्वचषक वगळता कधी टी.वी. समोर बसल्याचे आठवत नव्हते. त्यातही एक ब्राझीलचा संघ आणि त्यांचा रोनाल्डो सोडून दुसर्‍या कोणाला चेहर्‍याने मी ओळखू शकेल याची श्वाश्वती नव्हती. तरीही दर पावसाळ्यात चिखलपाणी, कपड्यांची पर्वा न करता, हातपाय तुटण्याची चिंता न करता हा खेळ बेभान होऊन न चुकता खेळला मात्र जायचा. तसे तर व्यवस्थित कोणालाच खेळता यायचे नाही, ना सारे नियम कोणाला माहीत असायचे. पण अट फक्त एकच असायची की जो पर्यंत आकाशातून कोसळणारा पाऊस थकत नाही तो पर्यंत कोणाचे पाय थकले नाही पाहिजेत. फूटबॉल हे केवळ एक कारण असायचे ज्याच्या तालावर नुसता धिंगाणा घातला जायचा, पावसात भिजायचा आनंद लुटला जायचा.

आज मी देखील तेच करत होतो. बघता बघता मी कधी खाली उतरून त्या मुलांच्यात मिसळलो हे माझे मलाच कळले नव्हते. सकाळपासून, खरे तरे गेले चार दिवसांपासून किंवा चार वर्षांपासून अंगात भरलेली सुस्ती केव्हाच झटकली गेली होती. घड्याळाचे काटे चार वर्षे मागे फिरवणे तर शक्य नव्हते पण येणारा प्रत्येक क्षण त्याची भरपाई करण्यासाठीच मी खेळत होतो. किती गोल केले आणि किती खाल्ले याचा हिशोब मी ठेवतच नव्हतो. कारण मला माहीत होते की ही तर फक्त सुरुवात होती. एका नवीन इनिंगची.. एका सेकंड इनिंगची.. जसे कसोटी क्रिकेटमध्ये सेकंड इनिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवणे कठीण असते कारण चार दिवस खेळून शरीर थकले असते, खेळपट्टी ही खराब झाली असते, सारी परिस्थिती प्रतिकूल झाली असते तरीही ती ईनिंग खेळल्याशिवाय सामना काही पुर्ण नाही होत तसेच काहीसे माझे झाले होते. ही इनिंग मला खेळायचीच होती. नाहीतर आयुष्यात काही आठवणी अर्धवटच राहिल्या असत्या, काही जगायचे बाकी राहिले असे सतत वाटत राहिले असते. आज मारलेल्या प्रत्येक फटक्याबरोबर ती खंत मनातून दूरवर भिरकावली जात होती. कदाचित उद्या माझी बायको माहेरहून आल्यावर पुन्हा तेच ते पहिल्याचे रूटीन सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण या सार्‍या जर तर च्या शक्यता नाकारून आज तरी मी माझ्या सेकंड इनिंगला मोठ्या जोमात सुरुवात केली होती…

– तुमचा अभिषेक

 

वाफाळलेला कटींग चहा .. !!

शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन रिकामी, की ट्रेन रिकामी असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्‍याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते. खरे तर एखादी शाल ओढून आपले स्टेशन येईपर्यंत मस्तपैकी ताणून द्यावी अशी ती थंडी, पण तीच शाल नसली की झोपही लागू नये अशी ती थंडी. एका शालेची कमतरता गुलाबी आणि बोचरी थंडीतील फरक उघड करून जात होती. पण तसाही माझ्याकडे झोपण्याचा पर्याय नव्हताच. मध्ये काही कामासाठी पाचच मिनिटांसाठी का होईना वाशी स्टेशनला उतरायचे होते.

वाशी स्टेशन ! शनिवार असो वा रविवार, गरमी असो वा थंडी, एक गजबजलेला परीसर ! पण स्टेशनबाहेरचा भलामोठा पटांगणासारखा आवार त्याच वेळी तितकाच मोकळा वाटणारा. स्टेशनबाहेर पडल्यावर समोरच्या रिक्षा वा बस स्टॅंड पर्यंत जाईस्तोवर याच मोकळ्या पटांगणातून थंडीशी लढत जायचे होते. पण जायचेच होते. माझे काम तिथेच होते. पाचच मिनिटांचे काम, पाचच मिनिटांत उरकले. आता पुन्हा त्या पटांगणातूनच परतायचे होते. पण त्याआधी शरीराला काहीतरी रसद पुरवणे गरजेचे समजले.

हि तेथील आणखी एक तुफान गर्दीची जागा. रिक्षास्टॅडला लागूनच. कित्येक चहा वडा सामोश्याच्या टपर्‍या. झालेच तर ऑमलेट अन भुर्जीपाव. चायनीज वा मसाला डोसे खायचे असल्यास त्याचीही सोय. उभे राहणे जीवावर आले असल्यास बसण्याजोगे ओपन रेस्टॉरंटस. जे सभोवतालच्या मॉल्सच्या फूडकोर्टमध्ये मिळते ते थोड्याफार फरकाने इथेही उपलब्ध. एक गर्दीची टपरी मी देखील पकडली. भूक अशी नव्हतीच, किंबहुना काहीतरी गरमागरम तोंडात पडावे एवढीच इच्छा. इथे चहाला पर्याय नसतो. वाफाळलेला गरमागरम कटींग चहा. सोबत वडापाव नुसता तोंडी लावण्यापुरता. पण मला त्याचीही गरज नव्हती. तरीही सवयीने सर्वांच्या किंमतीवर नजर टाकली. अन अखेर बोर्डाच्या तळाशी ठळक खडूने लिहिलेल्या चहापाशी येऊन स्थिरावली. ठळक खडू, म्हणजे किंमत नुकतीच वाढवलेली दिसत होती.. कटींग चहा – ६ रुपये.. फुल्ल चहा – १० रुपये..

आजूबाजुला दिसणार्‍या चहाच्या गिलासांवर नजर टाकली तर कटींग चहाला छोटा ग्लास तर फुल्ल चहाला मोठा. छोट्या ग्लासाचा आकार दोन बोटांच्या चिमटीत लपून जावा इतपत. कधी दोन घोटांत संपून जावी समजू नये. घरी असताना बरेचदा यापेक्षा जास्त चहा मी आज मूड नाही, जात नाही, म्हणत मोरीत ओततो. तेवढा चहा आज बाहेर सहा रुपये झालीय हे समजले. नाहीतर मी अजूनही कॉलेजला मिळणार्‍या दोन रुपये कटींगच्याच विश्वात होतो.

फुल्ल चहा घ्यायचे ठरवून पाकीटातले दहा रुपये काढायला हात बाहेर काढले, जे एवढावेळ जीन्सच्या पुढच्या खिशात खोचले होते. अन पुन्हा त्यांना गार वारा झोंबला तसे कधी एकदा पटकन पैसे ढिले करून चहा घेतोय असे झाले. पण चहा होता खरा दहा रुपये वसूल करणारा, हे त्याला हातांत घेताच समजले. दोन्ही हातांना एक छानसा चटका बसला. काठोकाठ भरलेला तो गरम काचेचा ग्लास माझ्या थंड हातांना जास्त वेळ धरवणे कठीण व्हायच्या आत खिशातून रुमाल काढून त्यात तो धरला. त्याच्या बाहेरच्या बाजूने काही चहाचे ओघळलेले डाग तर नाहीत ना याचा विचार न करता. त्या वाफाळणार्‍या चहाचा आस्वाद घ्यायला आता मी तयार होतो. ओठाला लावायच्या आधी मी तोंडाजवळ आणून त्यातून निघणारी वाफ नाकांत भरून घेतली. एवढावेळ प्रत्येक श्वासागणिक थंड वाराच आत शिरत होता. श्वास घेणे गरजेचेच असल्याने त्याला रोखायचीही सोय नव्हती. पण आता मात्र श्वासांमार्फत त्या चहावर दरवळणारी वाफ जितकी प्राशन करता येईल तितकी करून घेतली. पण पिण्यास एकदा सुरुवात करताच झरझर संपू लागला. शेवटचा घोट किंचित कोमटच भासला, अन अजून एक चहा प्यायची इच्छा झाली. चहापेक्षाही त्या वातावरणात अजून थोडावेळ वावरायची इच्छा होती. तेथील सिगारेटचा धूरही आज फारसा त्रासदायक न वाटता वातावरण गरमच करत होता. मूड बदलला तसे भोवतालचे जग अनुभवायची नजर बदलली. नेहमीच्या तरुणाईच्या हिरवळीला आज मफलरीचा साज चढल्याने ती वेगळ्याच रुपात खुलून आली होती. आता मी स्वताही तिचाच एक हिस्सा झालो होतो. पुनश्च लागलेल्या चहाच्या हुक्कीला न्याय द्यायला दहा रुपये जड नव्हतेच.

दुसरी चहा संपताच मात्र मी तडक तिथून निघालो. चहाने अंगात आलेल्या उबेचा इफेक्ट ओसरायच्या आधी पाऊले झपाझप उचलत. दोन्ही हात खिशांत टाकून, अंगाचे मुटकुळे करून. अन आजूबाजुला माझ्यासारख्याच अवस्थेत दिसणार्‍या जीवांना न्याहाळत. ईतक्यात एक नजर एका वृद्ध जोडप्यावर पडली. सदरा लेंगा अन लुगडे असा मराठमोळा पोशाख म्हणून साहजिकच वाटणारा एक आपलेपणा. एका मळलेल्या गाठोड्यात संसार बांधून एक आडोसा पकडून बसले होते. मात्र दुसर्‍या बाजूने येणारी वार्‍याची लाट थोपवायला उपाय नव्हता. याआधी कधी असे कोणाला रस्त्याच्या कडेला पाहिले नव्हते असे नाही, पण या वातावरणात.. अन या वयात.. कसे सहन करत असतील हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. लांबून पाहता कुडकुडताना दिसले नाहीत, कदाचित त्यांच्या वेदना मेल्या असाव्यात वा माझी नजर. माझा स्टेशनवर जायचा रस्ता थोडाफार त्या कडेनेच जात होता. त्यांच्यावर पडलेली नजर आता त्यांना पार केल्याशिवाय फिरवणे शक्य नव्हते. आणि म्हणूनच मी माझी पावले जरा जास्तच झपझप उचलू लागलो. त्यांना मदत न करता पुढे जातोय हि टोचणी जास्त वेळा सहन करावी लागू नये हा एकच हेतू. मदत करायची म्हटली तरी त्यांना द्यायला एखादी शाल वा चादर बरोबर नाही असे स्वताच्या सोयीने अर्थ काढत मी माझी वाट धरली. पण अखेरच्या क्षणाला, मनात काही आले आणि थोडीशी वाट वाकडी करून त्यांच्यासमोर दहा रुपयांची नोट सरकवून पुढे गेलो..

ते तिथे भीक मागायला बसले होते की नाही हे माहीत नव्हते. त्यांना मदतीची गरज होती की नव्हती हे ही माहीत नव्हते. अन असली तरी काय येणार होते त्या दहा रुपयांत.. दोघांत एक फुल्ल चहा.. की वाफाळलेली एकेक कटींग. पोटाची आग त्यापेक्षा जास्त असल्यास कदाचित त्या दहा रुपयांत एखादा वडापावच घेतला गेला असता. अन तो ही कदाचित थंडगार.. पण मला मात्र एवढा विचार करायची गरज नव्हती. माझे काम झाले होते, मला समाधान मिळाले होते. आता मनाला कोणतीही टाचणी लागणार नव्हती. पण जर तेच दहा रुपये सरकवले नसले तर कदाचित रात्री झोपताना मला चादरीतून ऊब मिळाली नसती. स्साला कुणाला मदत करतानाही आपण आपलाच स्वार्थ बघतो. स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदत करतो. स्वताला थंडी वाजली तरच दुसर्‍याच्या थंडीची जाणीव होते, स्वताला भूक लागली तरच दुसर्‍याच्या पोटाची आग कळते. ती सरकवलेली दहा रुपयांची नोट म्हणजे माझी स्वतासाठीच एक वाफाळलेला गरमागरम कटींग चहा होता, जी मला स्वतालाच उब मिळावी म्हणून खर्च केली होती. बाकी मुंबई म्हटले की बस्स चार दिवसांची थंडी.. त्यानंतर ना मला थंडी वाजणार होती ना कोणाला वाजतेय याची मी पर्वा करणार होतो..

– तुमचा अभिषेक

 

चायवाला -!_/~

काल आमच्या ऑफिसच्या चायवाल्याने गोंधळ घातला. घाबरला बावरला, डोळ्यात पाणीही आले बिचार्‍याच्या. २२-२४ वर्षांचा मुलगा म्हणजे अगदीच काही लहान नाही, आपला तर खास फंटर ! कधी आपण जागेवर नसलो तरी आठवणीने चहा ठेवतो.. बघावे तर तसे हे एकच कारण, खास असण्याचे. पण ज्या आपुलकीने चहा पाजतो त्याने स्वताला खास झाल्यासारखे वाटते. म्हटलं तर कुठलीही देवाणघेवाण हा एक धंदाच, पण त्यात थोडा भावनांचा ओलावा आला की त्याचे आपलेच एक नाते बनते. काल कदाचित त्याच नात्याने त्याला तारले.

वॉशरूममधून जागेवर आलो तेव्हा त्याचे एकेकाच्या जागेवर जात चहा वाटपाचे काम चालू होते. पुढच्या दोनेक मिनिटात माझ्या जागेवर येईल त्या आधी पाण्याचे दोन घोट घेऊया म्हणून मागच्या टेबलवर ठेवलेली माझी पाण्याची बाटली घ्यायला म्हणून खुर्चीवर न बसता तिथेच गेलो. मात्र पाण्याचा एक’च घोट घ्यायचा नशीबात होते. पाठीमागून चारचौघांचा गोंगाट कानावर पडला तसे वळून पाहिले तर माझ्या टेबलाचा रंग पार पालटला होता. आधी पांढरा असायचा म्हणे, पण आता पुरता रंगला होता. माझ्या वाटणीची चहा कॉम्प्युटरचा किबोर्ड पित होते, तर मॉनिटरच्या स्क्रीनवर नवीन वॉलपेपर छापला गेला होता. डायरीने वर्ष सरायला दहा दिवस शिल्लक असतानाच माझा निरोप घेतला होता. काही शिंतोडे खुर्चीवर उडाले होते तर कसलाही आवाज न करता चहाचा एक ओघोळ टेबलावरून खाली येत फ्लोरींगवर आपले साम्राज्य स्थापत होता.

माझाच टेबल का??? हा मनात आलेला पहिला विचार. पाठोपाठ किबोर्ड आणि कॉम्प्युटर हि ऑफिसची मालमत्ता असते हे त्यातल्या त्यात चांगलेय हा दुसरा विचार. इतक्यात नजर अचानक एका ओळखीच्या वस्तूवर पडली. माझा कॅल्क्युलेटर होता तो.. हो, माझा स्वताचाच. त्याची पुर्ण आंघोळच झाली असल्याने एवढा वेळ त्याचे अस्तित्व जाणवले नव्हते. घाईघाईत त्याला उचलून हाताच्या चिमटीत उभा धरला. समोर पाहिले तर चहावाला देखील तसाच उभा भासला. माझ्या कॅल्क्युलेटरसारखा. जी अवस्था याची चहाने केली होती तीच त्याची भितीने. जेवढी चहा झटकता येईल तेवढी झटकून मी आजूबाजुचे रफ पेपर घेऊन त्याला पुसायला घेतला. इतर मालमत्तेशी माझे काही घेणेदेणे नसल्यासारखे. आणि हो, त्याचबरोबर त्या चहावाल्याच्या बडबडीकडेही दुर्लक्ष करत. काय झाले, कसे झाले, याची तोडकीमोडकी कारणे तो देत होता, मात्र माझा कॅल्क्युलेटर बिघडलाच तर तो काही भरून देऊ शकत नाही हि मनाची समजूत काढून मी त्याला ठिक करायच्या मागे लागलो होतो.

पुढची दहा-पंधरा मिनिटे मी बोटांनी बटणे दाबून दाबून आत गेलेली चहा बाहेर काढायच्या प्रयत्नात होतो. थोडावेळ एसीसमोर धरला तर मध्ये त्या चहावाल्यानेच आणून दिलेले टिश्यू पेपर घेऊन आत गेलेली चहा शोषायचा प्रयत्न केला. एवढ्या काळात त्या चहावाल्याने पाणी आणि फडक्याने माझी जागा आणि इतर औजारे पुसुन पुर्ण साफ केली होती. इतरांनीही हलक्याफुलक्या कॉमेंटस मारत त्याच्यावरचा ताण थोडाफार हलका केला. हातात बंद पडलेला कॅल्सी होता तरीही साफसुधरी जागा आणि निवळलेले वातावरण पाहून माझेही वैतागलेले मन पुरेसे स्थिर झाले. मात्र अजूनही त्याचे कारणे द्या चालूच होते ज्याचे मी काहीच करू शकत नव्हतो. चल छोड यार, जो हुआ सो हुआ असे मनात आले तरी पटकन बोलून दाखवणे माझा स्वभाव नाही कि मला ते जमत नाही. पण खरेच जे झाले ते झालेच. कदाचित त्याची तितकीशी चुकही नसावी, कारण नुकतीच माझ्या जागेवर एक छोटीशी कामकाजाची मिटींग कम गप्पांची मेहफिल आटोपल्याने खुर्च्या तश्याच आपली मूळ जागा सोडून वेड्यावाकड्या पसरल्या होत्या. त्यांनाच तो अडखळला असावा या संशयाचा फायदा त्याला देण्यास हरकत नव्हती.

तर, माझ्या हातात एक फ्रेश अन गरमागरम चहाचा प्याला ठेऊन अखेर तो निघून गेला. पण नुकत्याच त्या चहाने घडवलेला उत्पात जवळून आणि स्वतावर अनुभवलेला असताना कसाबसा अनिच्छेनेच तो घश्याखाली ढकलला. याहीपेक्षा काय वाईट घडले असते याचा विचार करता आठवले कि आज आपण कधी नव्हे ते पांढरेशुभ्र शर्ट घालून आलो होतो. जर आपण जागेवर बसलेलो असतो तर… काही शिंतोडेदेखील पुरेसे होते त्याची चमक घालवायला.. तसेच आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे चहाच्या एका प्याल्याने केलेल्या नासधुशीनंतर ऑफिसवाले केवढीशी ती चहा पाजतात हि उगाचची कुरबुर यापुढे मी तरी कधी करणार नव्हतो.

कॅलक्युलेटर मिटून बॅगेत टाकला, चिकट झालेला कीबोर्ड बदलला, खुर्चीवर बसायच्या आधी ती पुन्हा एकदा साफ पुसली गेलीय याची खात्री केली आणि नेहमीच्या कामाला लागलो. ते थेट रात्री बायकोला दिवसभराच्या घडामोडी सांगतानाच पुन्हा याची आठवण झाली. मात्र पुन्हा कॅल्क्युलेटर चालू झालाय कि बंद पडलाय हे बघायची तसदी नाही घेतली.

किस्सा बायकोला सांगून झाला तरी मनात मात्र घोळत राहिला. आजच्या प्रकाराचा त्रागा न करता तो हलकाच घेतला हे एकंदरीत दिवसाच्या शेवटाला स्वतालाच बरे वाटले. पण या चहावाल्यावरून आणखी एक चहावाला, खरे तर चहा कम पोहेवाला आठवला. ईंजिनीअरींगच्या पहिल्या वर्षाला सांगलीच्या वालचंद कॉलेजला असताना भेटलेला. दोन वेळच्या जेवणाची मेस लावली असली तरी सकाळचा चहानाश्ता रोजच्या भुक आणि इच्छेनुसार बाहेरच करावा लागायचा. आम्हा सार्‍यांचाच पॉकेटमनी जेमतेम, त्यामुळे ठरवून आणि पुरवूनच व्हायचा. कुठे ४ रुपयांच्या जागी ३ रुपयांना पोहे मिळतात असे समजले तर थोड्या तंगड्या तुडवत तिथली चव चाखून यायची. जमली नाही तर पुन्हा नेहमीच्याच जागी. अश्यातच एके दिवशी विश्रामबागेत एके ठिकाणी खूप चांगले पोहे मिळतात असे समजले. फारसे लांबही नव्हते, थोडी वाट वाकडी करावी लागणार होती इतकेच. पण खरेच, खबर पक्की होती, खाल्ले ते पोहे लक्षात राहण्यासारखेच होते. इथे आल्यापासून गेले तीन महिने एवढे चांगले पोहे इतर कुठे खाल्ले नव्हते. पहिला चमचा तोंडात घेताच मी आणि माझ्या मित्राने ठरवले की आता रोज इथेच. पण तेच तोंड पैसे देताना मात्र थोडेसे हिरमुसल्यासारखे झाले, जेव्हा समजले की इथे पोहे ४ च्या जागी ५ रुपयांना आहेत. माझ्या मित्राने पटकन तसे बोलूनही दाखवले. तर समोरून उत्तर आले की भाऊ पोहे खाऊन तर बघा, इतर कुठे असे मिळणार नाहीत. काय चुकीचे बोलत होता तो, खरे तर होते. पटतही होते. पण रोजचा एक रुपया जास्त म्हणजे आमचा महिन्याचा हिशोब ३० रुपयांनी बोंबलला होता !

दुसर्‍या दिवशी काय करावे या द्विधा मनस्थितीत, आपसूकच वळणावर आम्हा दोघांचीही पावले त्याच्याच दिशेने वळली. कालच्या पोह्याची चव जीभेवर रेंगाळत होतीच, अन महत्वाचे म्हणजे आता यापुढे आमच्या नेहमीच्या गाडीवरचे पोहे फिके लागले असते. पोहे खाऊन आम्ही दोघांनी आपापले पाच पाच रुपये त्याच्यासमोर धरले तसे त्याने नेमके चार चार रुपयेच उचलले आणि म्हणाला, स्टुडंट कन्सेशन.. तुमच्यासाठी चार रुपये फक्त !

अर्थात, हे कन्सेशन आजपासूनच त्याने सुरू केले होते, तसेच ते इतरांनाही लागू होते की नाही माहित नव्हते. पण त्यानंतर मग आमचे रोजचे नाश्त्याचे ठिकाण तेच झाले. काही इतर मित्रांनाही आम्ही वाट वाकडी करायला लावली. आम्हा सर्वांसाठी पोहे चार रुपये पर प्लेटच होते. पुढे जाऊन त्याचेही उधारखाते सुरू झाले. तसा वयाने आमच्यापेक्षा तो सात-आठ वर्षे मोठाच, पण आमच्या गप्पांच्या ग्रूपमध्ये तो देखील सामील होऊ लागला. इतर स्थानिक गिर्हाईकांच्या तुलनेत आमचा कटींगचा ग्लास किंचित जास्त भरला जाऊ लागला. एके दिवशी संध्याकाळी भूक लागलेली असताना तिथे गेलो तेव्हा पोह्याच्या जागी मिसळ कट्टा रंगलेला दिसला. पोह्याची चव तोंडावर बनवून आल्याने परत फिरणार इतक्यात तोच म्हणाला, एकदा मिसळ खाऊन तर बघा भाऊ… नकार द्यायचा प्रश्नच नव्हता !

ती मिसळ एवढी आवडली की पुन्हा आता या मिसळीसाठी रोज संध्याकाळी इथे यायची चटक तर लागणार नाही ना अशी भिती वाटली, कारण ती चटक खिश्याला नक्कीच परवडणारी नव्हती. मुळात थोड्याच वेळात मेसचा टाईम होत असल्याने तेवढी भूकेची कळ सोसल्यास संध्याकाळच्या भरपेट नाश्त्याची खास गरजही नव्हती. त्याचबरोबर ती मिसळ अशी काही तिखट झणझणीत होती की रोज रोज ती खाणे तब्येतीलाही झेपणारे नव्हते. अन तरीही शेवटाचा शेव-दाणा पुसून वाटी चकाचक साफ करून त्याला पैसे द्यायला गेलो तेव्हा त्याने ते घेण्यास नकार दिला, असे बोलत की आवडली आणि पुन्हा आलात तरच पैसे घेईन. आजच्या तारखेला खिश्यात चार दमड्या खुळखुळत असताना बळेच एखाद्याच्या हातात पैसे कोंबले असते, पण तेव्हा कोण आनंद झाला. स्वाभिमानाची व्याख्या त्या दिवसांत वेगळीच असते नाही..

पुढच्या मिसळकट्ट्याची संध्याकाळ दोन-चार दिवसांतच आली अन अधनामधना येतच राहिली. मात्र त्याने पहिल्या मिसळीचे पैसे काही शेवटपर्यंत घेतले नाही. बस्स आठवणीतच राहिले.

आज पुन्हा नेहमीसारखेच ऑफिस होते. नेहमीच्याच वेळी तो चायवाला आला. चहा देतेवेळी आज त्याच्या हसण्यात आपलेपणा किंचित जास्त भासला. चहाचा चटकाही जिभेला किंचित जास्त लागला. कोणालातरी कालच्या प्रसंगाची आणि माझ्या कॅलक्युलेटरची आठवण झाली. मी अजूनही तो चालू झालाय का बंदच पडला हे चेक केले नव्हते. विषय हसूनच टाळून नेला. आपसात काही संबंध नसताना मला त्या कधीकाळच्या चहापोहे मिसळीचे कर्ज थोडेफार फिटल्यासारखे वाटले. चहा पिता पिता पुन्हा एकदा ते जुने दिवस आठवू लागले. मला त्या आठवणींबरोबर सोडून चायवाला मात्र केव्हाच पुढे निघून गेला होता.

– तुमचा अभिषेक

 

ड्रिमगर्ल !

गेले तीन दिवस ती ऑफिसला आली नाही. अन आज चौथ्या दिवशी जाणवू लागले की काहीतरी चुकतेयं. पाणवठ्यावर बाटली भरायला जाताना वाटेतले एक प्रेक्षणीय स्थळ नाहिसे झालेय. त्यामुळे बाटली पाण्याने पुर्ण भरली तरी तहान भागेनाशी झालीय. आज मला समजले की तिला तिथे बसलेले बघण्याची मला सवयच लागली होती. वाढलेली तहान आणि बाटलीचा छोटा होत जाणारा आकार याला तीच जबाबदार होती. जरी तिने ती घेतली नाही तरी तीच होती. तिने मात्र कधीही मान वर करून समोरून कोण जातेय ते पाहिले नसावे. मग आमच्याकडे बघण्याचा योग तरी कुठून यावा. कदाचित येणारा जाणारा प्रत्येक जण आपल्याकडेच नजर टाकत जातो याची तिला जाणीव असावी. त्यावर तसेच दुर्लक्ष करण्याची तिची सवय असावी. पण यामुळेच माझ्यासारख्यांचा एक फायदा मात्र व्हायचा. तिला बिनधास्तपणे बघता यायचे. अन्यथा तिच्या पहिल्या कटाक्षानंतरच कधी मान वाकडी करायची हिंमत झाली नसती.

तिच्याशी पहिली नजरानजर होण्याचा योग आला तो अपघातानेच. मी ट्रेनने प्रवास करायचो तर ती ऑफिसच्या बसने. ती वेळेवरच निघायची तर मी बरेचदा उशीरा. त्या संध्याकाळी मात्र तिलाही उशीर झाला असावा. ऑफिसची बस सुटल्याने ती देखील ट्रेनसाठी स्टेशनला आली होती. तिथेच प्लॅटफॉर्मवर मोजून पंधरा फूटांच्या अंतरावर गाठ पडली. नजर पडताच तिने त्वरीत फिरवली. मात्र नजर फिरवतानाही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीपासूनच फिरवतोय असेच भाव त्यात होते. इथेच मला आकाश ठेंगणे झाले. गेले तीन महिन्यांची आमची ओळख, एकतर्फी बघण्याचीच आहे की काय असे जे वाटत होते, ते तसे नव्हते तर. तिच्या ठायी माझे काहीतरी अस्तित्व होते. भले एका य:कश्चित सहकर्मचार्‍याचे का असेना… अस्तित्व होते तर !

हातातली भेळ खाऊ की नको, की कुठे लपवू असे झाले होते. मात्र ते वाटणे उगाचच होते. तिने काही शेवटपर्यंत पलटून पाहिले नाही. पाचच मिनिटांत ट्रेन आली आणि ती निघून गेली. समोरच्या प्लॅटफॉर्मवरून ऑफिसमधल्या एकाने हात दाखवला तेव्हाही उगाचच, अगदी उगाचच मनात आलेली पकडले गेल्याची भावना लपवताना तारांबळ उडाली होती. पुढे त्या तश्याच संध्याकाळची वाट पाहण्यात आणिक पुढचे तीन महिने गेले पण ती काही आली नाही…

…………..पण त्या वाट पाहण्यातही ती संध्याकाळ छान कटायची. ती होतीच तशी. वर्णन तरी काय करू तिचे, शब्दांत तिचे सौंदर्य बांधायचा प्रयत्न करणे म्हणजे माझ्यासाठीचे तिचे अस्तित्व भूतलावर आणने. कोणी तिला ऑफिसची हिरोईन म्हणायचे तर कोणी माधुरी दिक्षित. प्रत्येकाचे आपापले कोडवर्ड होते. कित्येकांचे तेच पासवर्ड होते. काही नावे चारचौघांत सांगण्यासारखीही नव्हती. पण प्रत्येकाला ती आपल्या टाईपची वाटायची, आणि हेच तिचे वैशिष्ट्य होते. माझ्यासाठी मात्र ती ऑफिसातली स्वप्नसुंदरी होती. हो, ऑफिसातलीच. ऑफिसला पोहोचताच, ती नजरेला पडताच, तिचा विषय निघताच, तिच्याबद्दलचे स्वप्नरंजन सुरू व्हायचे. मात्र ऑफिस सुटल्यावर तिचे आणि आपले विश्व दोन असमांतर दिशांना. भले ती माझे ऑफिसला जाण्याचे कारण नव्हती, मात्र ऑफिसच्या कामातून मिळणारा फार मोठा विरंगुळा होती. किंबहुना त्यापेक्षाही जास्त, जे आज ती नसताना जाणवत होते.

आमच्या नजरांची दुसरी भेट घडायला अजून एक मोठा कालखंड जावा लागला. पण यावेळची भेट मात्र ठसठशीत घडली. ऑफिसतर्फे छोटीशी पार्टी होती. दुपारच्या जेवणाची, ऑफिसच्याच वेळेत आणि ऑफिसच्याच आवारात. पुन्हा एकदा उशीरच मदतीला धाऊन आला. एकावेळेस चाळीस लोकांची बसायची सोय, मात्र मोजून आम्ही चार जणं तिथे होतो. दोन तिच्याच मैत्रिणी. आणि मी इथे एकटाच. यापेक्षा आदर्श स्थिती दुसरी नसावी.. तिला संकोच वाटू नये अशी.. मला लाज वाटू नये अशी..

ताट घ्यायला मुद्दामच विलंब केला जेणे करून सोयीची जागा पकडता येईल. अन तशीच पकडली. अगदी तिच्या सामोरी. आज जी नजरांची शाळा भरणार होती त्यातला अभ्यास मला पुर्ण सेमीस्टर पुरणार होता.

घास अगदीच नाकात जाणार नाही इतकेच लक्ष माझे जेवणावर होते. तिच्या नैसर्गिक हालचाली इतक्या जवळून अन निरखून टिपण्याची हि पहिलीच संधी होती. खास दिवसाचा खास पोशाख, प्रत्येक घासागणिक होणारा अलंकारांचा किलकिलाट, त्यात मिसळलेले तिचे मंजूळ शब्द, अधूनमधून टिश्यू पेपरने सावरले जाणारे ओठ, डोळ्यांवर आलेली केसांची बट सावरायचे मात्र नसलेले भान.. पुढची पंधरावीस मिनिटे एखाद्या चित्रफितीप्रमाणे मनावर कोरूनच मी उठलो.

या भेटीने मला स्वत:ला तिच्या आणखी जवळ नेऊन ठेवले. यापुढे स्टेशनवर कधी भेटल्यास ती पलटून बघेल याची खात्री नव्हतीच. पण तरीही, पुन्हा कोणी समोरच्या प्लॅटफॉर्मवरून हात दाखवल्यास मी बावरून जाणार नव्हतो. तिलाच बघत होतो हे कबूल करायचा आत्मविश्वास आता माझ्या ठायी नक्कीच जमा झाला होता.

आमच्या तिसर्‍या भेटीचा क्षण मात्र कोणताही अपघात नव्हता. ना अचानक घडले होते. त्या भेटीची कल्पना मला आदल्या दिवशीच आली होती. पहिल्यांदा तिला कामानिमित्त थेट भेटायचे होते. तिच्या डिपार्टमेंटमध्ये तिच्या हाती एक कागद सुपुर्त करून एका प्रतीवर तिचे हस्ताक्षर मिळवायचे होते. खास दिवसाचा खास पोशाख, करायची पाळी आता माझी होती. ते देखील कोणाच्या नजरेत न भरेल असेच.

प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मात्र छातीतील धडधड असह्य होऊ लागली. एक बरे होते जे हस्ताक्षर करायचे काम तिचे होते. थंड पडलेल्या माझ्या हातांनी पेन तेवढेही चालले नसते. कागद परतवताना ती मला थॅंक्यू म्हणाली. प्रत्युत्तरादाखल मी देखील थॅंक्यू’ च म्हणालो. तसे ती हसली.

औपचारीकपणेच हसली, मात्र आपण औपचारीकपणेच हसतोय हे समोरच्याला समजण्याची पुरेपूर काळजी घेणारा तिचा स्वभाव आवडून गेला. कुठलेही गैरसमज न सोडणारा..

नाही म्हणायला आमच्या भेटी अजूनही कैक घडल्या. संवाद अजूनही कैक रंगले. काहीच प्रत्यक्षात उतरलेले तर कित्येक कल्पनाविलास. सारेच लिहायचे म्हटल्यास सुरेखशी कादंबरी चितारली जाईल, अन तरीही काहीतरी शिल्लक आहे हिच भावना राहील.

पण आज चार ओळी खरडवाव्याश्या वाटल्या. तिच्या आठवणी जागवाव्याश्या वाटल्या. तिचे म्हणे लग्न झाले होते, गळ्यात मंगळसूत्र घालायची. कसे कळणार, कधी नजर तिथे गेलीच नाही. कश्याला जावी, इथे तरी कोण तिच्याशी लग्न व्हावे या अपेक्षा ठेऊन होते, इथे तरी कोण स्वत: अविवाहीत होते. आज तीन महिने झालेत तिला शेवटचे बघून. अमेरिका खंडातल्या कुठल्याश्या शहरात स्थायिक झालीय असे कानावर आहे. तिथेही तिचे इतकेच चाहते असतील? माहीत नाही.. पण इथे मात्र तिची जागा अजूनही खालीच आहे.. ऑफिसातली आणि आमच्या हृदयातलीही…

– तुमचा अभिषेक

 

साधीशीच माणसं ..

सकाळी नेहमीपेक्षा वीसेक मिनिटे उशीराच घराबाहेर पडलो. ऑफिसला जायचे नसून ऑफिसच्याच कामासाठी इतरत्र जायचे होते. पुढची ट्रेन पकडायला हरकत नव्हती म्हणून बिछान्यातच पंधरा-वीस मिनिटे जास्तीचा मुक्काम ठोकला. तयारी मात्र नेहमीच्याच वेगाने झरझर आटोपून, मोबाईलमध्ये ट्रेनचा टाईम आणि आता झालेली वेळ, दोन्ही चेक करून रमतगमत चाललो तरी वेळेच्या आधी स्टेशनवर पोहोचेन अश्या हिशोबाने निघालो. पावले मात्र सवयीनेच झपझप पडू लागली, नव्हे किंचित जास्तच उत्साहाने. याचे एक कारण म्हणजे नेहमीच्याच त्याच त्या रूटीनमधल्या ऑफिसला जायचे नव्हते, आणि दुसरे म्हणजे पंधरा मिनिटांची एक्स्ट्रा झोप घेता आली या समाधानानेच एक छानशी तरतरी आली होती. भमरसिंग मिठाईवाल्याच्या गरमागरम समोश्यांचा वास छान पैकी नाकात भरून घेत, पुढील टपरीवरून सुटणार्‍या चहाच्या वाफा अंगावर झेलत पुढे पास झालो इतक्यात मागून सहजच एक आवाज आला, “अरे आपल्याइथे कुरीअरवाला कुठेय माहीतीये का रे?”

आपल्याच नादात रस्त्याने जात असताना अचानक समोरून कोण्या अनोळखी माणसाने पत्ता विचारला की माझा नेहमीच गोंधळ उडतो. मला शाळाकॉलेजमध्ये तोंडी परीक्षांची कधी भिती वाटली नव्हती एवढी या चौकश्यांची वाटते. त्या शाळेतल्या तोंडी परीक्षेला निदान मी घरून अभ्यास तरी करून गेलेलो असायचो, पण इथे मात्र कोणीतरी अचानक आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न विचारला आहे असे वाटते. तसे पाहता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे, किंबहुना ते आलेच पाहिजे अशी काही गरज नसते, तरीही “माहीत नाही” किंवा समोरून प्रश्न इंग्रजीत आला असेल तर “आय हॅव नो आयडीया” म्हणतानाही एक अपराधीपणाची भावना उगाचच माझ्या मनात दाटून येते. एवढेच नाही तर ती मला चेहर्‍यावर केविलवाणे भाव आणून मुद्राभिनयाद्वारे दाखवावीशीही वाटते. अश्यावेळी जेव्हा मी माझ्या एरीयात नसतो तेव्हा पटकन, “अ‍ॅक्च्युअली, मै यहा का नही हू” असे बोलून वेळ मारून नेतो. पण आपल्याच विभागात ते देखील करता येत नाही. आज मी माझ्या घरापासून पाचच मिनिटांवर असताना हा प्रश्न बेसावधपणे मागून आला होता. सुदैव एवढेच की बायको बरोबर नव्हती. अन्यथा समोरच्याने प्रश्न विचारताच तिने आम्हा दोघांकडे अश्या काही नजरेने बघितले असते की याने पण कोणत्या गाढवाला विचारलेय. आणि मग ती नजर बघून माझी आणखी धांदल उडाली असती.

असो…
कुरीअरवाला नक्की कुठे आहे आपल्या इथे याचा विचार मी ‘अं अं’ करत चालतच करू लागलो आणि प्रश्नकर्ता देखील माझ्या जोडीनेच चालू लागला. ईतक्या वेळात मी त्याला थोडेसे निरखून घेतले. वयाने माझ्यापेक्षा लहान आणि पोरसवदाच दिसत होता. माझ्याप्रमाणेच दोन्ही खांद्यावर सॅक टाकून तो देखील नोकरीधंद्यासाठी म्हणून स्टेशनच्या दिशेनेच जात होता. साधासाच पेहराव, चालणे बोलणे अन वागण्यातही पहिल्या नजरेत साधेपणाच भरला. त्याने मला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मला पुर्ण वेळ देऊन, माझ्या चालण्याच्या वेगाशी आपला वेग जुळवून चालू लागला. काही लोकांना हे सहज कसे जमते याचे मला नेहमीच कौतुक वाटते. माझे बोलायचे झाल्यास, एखाद्या अनोळखी माणसाकडे चौकशी करायची असल्यास, मी आधी शब्दांची मनातल्या मनात जुळवाजुळव करून त्याची मनातल्या मनातच एक रंगीत तालीम करतो. त्यानंतर प्रश्न सोडवायला कोणती व्यक्ती पकडावी हे शोधायला घेतो. प्रश्न विचारायच्या आधीच त्याचे उत्तर याला माहीत तर असेल ना, माहित असल्यास नम्रपणे देईल का, माहीत नसल्यास उगाचच चिडचीड करत कुठून येतात हि असली लोकं अश्या नजरेने आपल्याकडे बघणार तर नाही ना, एखादी मॉडर्न पेहरावातली व्यक्ती दिसली की तिला ईंग्लिशमध्येच प्रश्न विचारावा लागेल का, असे एक ना सत्तर, सतराशेसाठ फाटे फोडतो. त्याहूनही मग एखाद्याला हेरून जेव्हा फायनल करतो तेव्हा त्याला दादा, मामा, काका, भाईसाब, एs बॉssस नक्की काय हाक मारायची याचा परत मनातल्या मनात गोंधळ, अन या गोंधळात मगाशी रटलेले चौकशीचे वाक्य एव्हाना बोंबललेले असते की झालीच म्हणून समजा आयत्या वेळेला ततपप..

असो…
साधीशीच चौकशी हा बरोबरचा साधासुधा मुलगा अगदी सहजपणे करून गेला. त्याने मला ना दादा म्हटले ना मित्रा म्हटले. एक्सक्यूजमी तर दूरच राहिले. तसेच आता माझ्या बरोबर देखील असा चालत होता की जणू फार आधीपासूनचीच ओळख आमची. आता याला “माहीत नाही रे” असे तोडके मोडके उत्तर देऊन कटवता येणार नाही हे लक्षात आल्यावर मी उगाचच, आपल्याकडे कुरीअरवाला एक इथे, एक तिथे, पण तो आता तिथे असतो की नाही माहीत नाही रे, असे काहीतरी असंबद्ध पुटपुटायला लागलो. मी थोडासा बावचलोय हे त्याला समजले की काय कोणास ठाऊक पण त्याने स्वताच पुढे बोलायला सुरुवात केली, “ब्ल्यूडार्ट आणि डिएचएल दोघेही नाही बोलले रे, आणखी कोणी माहीत आहे का?”

घ्या…
उत्तर द्यायला उशीर केल्याने त्याने स्वताच नेमकी अशी नावे घेतली की मी उडालेल्या धांदलीतून सावरून सावचितपणे आठवायला घेतले असते तर कदाचित हिच दोन नावे पहिला आठवली असती. आता तिसरे कुठून आठवू.. पण इतक्यात मला पळवाट म्हणून एक छानसे उत्तर सुचले, “नाही रे, खरे म्हणजे मला कुरीअर करायचे झाल्यास ऑफिसमधूनच करतो ना, त्यामुळे काही कल्पना नाही इथली.”

“ऑफिसवाले कोणती कुरीयर सर्विस वापरतात?” त्याचा पुढचा प्रश्न.

‘अरे देवा असेही असते का?’ मी मनातल्या मनात.
पण लगेच सावरून म्हणालो, “ते बदलत राहतात रे, आणि माझे ऑफिस बेलापूरला आहे..”

“पण तुला ब्ल्यूडार्ट आणि डिएचएलवाले का नाही म्हणाले?” माझा हा प्रश्न विषय बदलायला होता की त्यात अजून अडकायला हे विचारताना मलाच समजत नव्हते.

“कॅमेरा पाठवायचा होता बहिणीला. ती बेंगलोरला असते. डिएचएलवाले नाही म्हणाले, आणि मगाशी ब्ल्यूडार्टवाल्यांचा देखील फोन आला, परत पाठवतोय म्हणून.”

“ओह्ह, कॅमेरा तुटायफुटायची भिती वाटत असेल. दिवाळी फराळाच्या लाडू चकल्या कुस्करल्याचे बरेच जणांने अनुभव ऐकलेत” मी माझ्या जेमतेम ज्ञानाच्या भरवश्यावर तारे तोडले.

“तसे नाही रे, चांगली पॅकींग केली आहे, दहा हजारांचा कॅमेरा आहे. बहिणीला तिच्या लग्नाच्या पहिल्या अ‍ॅनिवर्सरीला भेट द्यायची आहे. आम्ही तिघा भावांनी मिळून घेतलाय. ताईने बरेच केलेय रे आमच्यासाठी. आता आमचे पण कर्तव्य बनते ना. तिला कॅमेर्‍याची आवड आहे म्हणून देतोय, पण हे कुरीअरवाले उगाच वेळ काढत आहेत….”

“हम्म..” गडी बोलताना थोडासा भावूक झाल्याने मला पुढे काही बोलायचे सुचले नाही. दहा हजारांचा कॅमेरा तिघांमध्ये मिळून म्हणजे काही फार मोठे गिफ्ट वाटत नसले तरी त्याच्या हातातला दिड-दोन हजारांचा मोबाईल पाहता त्याच्यासाठी त्या कॅमेर्‍याची पैश्यातली किंमत तितकीही कमी नसावी.

“ऑनलाईन शॉपिंगने घेतला असतास तर तिथलाच अ‍ॅड्रेस देता आला असता, त्यात काही फसायला होत नाही, कॅमेर्‍यांचे तर ठरलेलेच मॉडेल असतात ना..” मी स्वता फारसा ऑनलाईन शॉपिंगचा चाहता नसलो तरी दुसर्‍याला सल्ले द्यायला आपले काय जाते.

“बरोबर आहे रे तुझे, पण स्वताहून घेऊन देण्यात एक मजा असते ना..”

ह्म्म.. गडी पुन्हा भावूक झाला आणि मी देखील तो मुद्दा तिथेच सोडला. पण त्याच्या या भावनात्मक उत्तराने माझे समाधान झाले नाही हे माझ्या चेहर्‍यावर दिसले की काय कोणास ठाऊक, पुढे तो स्वताहूनच त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी, त्याच्या भावांसाठी, त्यांचे शिक्षण आणि नोकरीसाठी काय काय केले हे सांगू लागला. मी स्वता चाळीत वाढल्याने सर्व प्रकारची आणि सर्व परिस्थितीतील माणसे पाहिली आहेत. याची कथा काहीशी अशी होती, डोक्यावरचा वडिलांचा आधार कोवळ्या वयातच गेला, तर त्यांची जागा मोठ्या भावंडाने पर्यायाने इथे त्याच्या बहिणीने घेतली. नोकरीव्यतिरीक्त ट्यूशन घेऊन घरखर्चाचा भार उचलला. आता तिच्या लग्नाचा हा पहिलाच वाढदिवस म्हणजे या सर्वांची घडी बसवूनच तिने स्वताचा विचार केला असावा. काही त्याने सांगितले काही अंदाज मी बांधले. इतर काही खरे असो वा खोटे, पण झालेले संस्कार तरी नक्कीच दिसत होते. आपल्या बहिणीने आपल्यासाठी खस्ता खाल्याचे कौतुक एखाद्या अनोळखी माणसाला कौतुकाने सांगणे हि माझ्यामते तरी फार कौतुकास्पद बाब आहे. सार्‍याच गोष्टींची परतफेड करता येत नाही, पण जाण ठेवणे जमल्यास कर्तव्य आपसूक निभावले जाते. छे, मलाही भावूक केले गड्याने..

इतक्यात त्याला कोणाचातरी फोन आला, बहुतेक एखाद्या भावाचाच असावा. अजून एका कुरीअरवाल्यांनी कॅमेरा पाठवायला नकार दिला या विषयावरच त्यांचे बोलणे चालू झाले. बोलताना त्याचा चेहरा असा चिंतातूर झाला होता जसे ऐन परीक्षेच्या दिवशी एखाद्याला हॉल तिकीट सापडू नये. त्या भावाच्या बोलण्यावरूनच तो जवळच्या एका पानटपरीवर चौकशी करायला शिरला तसे मला माझ्या ट्रेनचा टाईम होत आल्याची आठवण झाली. थांबणे शक्य नव्हते, कारण हि ट्रेन चुकवणे मला परवडणारे नव्हते, माझीही कुठेतरी वाट बघितली जात होती. तसे मी त्याच्याजवळ जात त्याला, “आता मी निघतो” असे म्हणालो.

“अरे हो, सॉरी.. तू हो पुढे.. तुझी ट्रेन असेल.. थॅंक्यू..” माझे दोन पैश्याचेही नुकसान केले नसताना तो मला सॉरी म्हणाला आणि मी न केलेल्या मदतीसाठी थॅंक्यू..

निघतानाही तो मला ‘मित्रा’ नाही म्हणाला की फॉर्मेलिटी म्हणून हस्तालोंदन नाही केले. मोजून सहा ते आठ मिनिटांचे आमचे एकत्र चालणे अन एकमेकांशी बोलणे झाले, पण तेवढ्या वेळेतही तो मला बराच उलगडला.. पुन्हा कधी तो मला भेटेल ना भेटेल, दोनचार दिवस त्याला कुरीअरवाला भेटला की नाही हि रुखरुख मनात राहील, चार-आठ दिवसांत कदाचित विस्मरणातही जाईल, पण अशी साधीशीच माणसे अधनामधना भेटत राहणे खूप गरजेचे असते.. खरंच, मदत होते अश्यांची, आपला स्वताचा चांगुलपणा टिकून राहण्यासाठी ..

– तुमचा अभिषेक

 
2 प्रतिक्रिया

Posted by on डिसेंबर 7, 2013 in ललितलेख

 

समुद्र समुद्र !!!!

बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्‍या मतलई सुरमई वार्‍यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो. कधी मूड बदलायचा झालाच, तर गेटवे ऑफ ईंडियापासून मरीनलाईन्स, तर वरळी सीफेस पासून बॅंडस्टॅंड तर कधी दादर, गिरगाव अन जुहू चौपाट्या, सार्‍या जणू आपल्याच बापाच्या. रोजच्या प्रवासात वाशीच्या खाडीवरील एक पुर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या पूलावरून सकाळ-संध्याकाळ जाणे म्हणजे निसर्गासोबत केलेली एक राइडच असते. जेमतेम दोन ट्रॅकचा ब्रिज आणि त्या भोवताली दोन्ही बाजूने गोलाकार पसरलेला अथांग समुद्र अन थैमान वारा. भरीस भर म्हणून माझ्या वेळी ट्रेनही अशी रिकामी असते की दारात उभे राहून बाह्या फडफडवून त्या निसर्गाच्या रौद्र पण तितकेच आपलेसे वाटणार्‍या रुपात मिसळून जावे आणि त्यालाही आपल्यात सामाऊन घ्यावे, म्हटलं तर स्सालं सुख सुख म्हणजे आणखी काय असते !

पण समुद्र म्हटले की पहिला आठवते ते लहानपणी आईबरोबर दादर चौपाटीला खाल्लेली ओली भेळ. देवाचे हार विसर्जित करायला म्हणून दोनतीन महिन्यातून एकदा जाणे व्हायचे. पुढची भेळ पुन्हा दोनतीन महिन्यांनीच नशिबी आहे हे माहीत असल्याने कागदाला चिकटलेले शेव कुरमुरेही नाही सुटायचे. पुढे भाऊच्या धक्क्यालाच हार विसर्जित करायला सुरुवात केली आणि सुटली ती भेळ. पण विस्मरणात नाही गेली. तीच भेळ पुढे एकदा त्याच चौपाटीवर अन त्याच समुद्राच्या साक्षीने प्रेयसीबरोबर खाउन पाहिली. पण लहानपणीची मजा नाही आली. कदाचित ठरवून केल्याने तसे झाले असावे, वा त्याक्षणी माझ्या मजेची परिमाणे वेगळी असावीत. आता त्या प्रेयसीची बायको झाली आहे, पण त्या भेळेची मजा अजूनही येत नाहीच. आता वाट पाहतोय ती मला मुले झाल्यावर त्यांना कधीतरी घेऊन जावे आणि बापाच्या भुमिकेतून ती मजा अनुभवून बघावी.

समुद्र आला की किनारा आला आणि किनारा आला की वाळू आलीच. पण मला त्या वाळूचे किल्ले करणे कधीच आवडायचे नाही, कदाचित काही बांधणे वगैरे मला जमत नाही, हे देखील कारण असावे. पण मी त्या वाळूत खड्डा करायचो. करताना नखांच्या फटी वाळूने बुजायच्या मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करून अगदी चार वीत खोल आणि दोन पाय जवळ घेऊन उभा राहू शकेन किमान इतक्या क्षेत्रफळाची वाळू उकरून काढायचो. किनार्‍याच्या शक्य तितक्या जवळच. अन मग एका मोठ्या लाटेची वाट बघत बसायचो. ती आपल्या मर्जीने यायची आणि परत जायची. मात्र माझा खड्डा पाण्याने भरून जायची. त्या खड्ड्यावर फेस जमा व्हायचा, जो विरायच्या आधी मी धावत जाऊन त्यात उभा राहायचो. विठ्ठलासारखा कंबरेवर हात ठेऊन, एका छोटेखानी समुद्राचा मालक असल्याच्या थाटात. पुढे आणखी दोनचार लाटा आल्या की त्या आपल्याबरोबर वाळू घेऊन यायच्या आणि खड्डा भरून टाकायच्या. मग पुन्हा ती वाळू उपसण्याचा खेळ सुरू व्हायचा, पुढची लाट यायच्या आधी वाळू जास्तीत जास्त उपसायची असायची. काही काळाने लाटा तिथवर येऊन भिडण्याची वारंवारता वाढायची आणि बघताबघता माझ्या खड्ड्याला समुद्र आपल्या पोटात सामावून घ्यायचा.

अकरावी-बारावीला किर्ती कॉलेजला होतो, दोन वर्षे. खरे तर एक फुकट गेल्याने दोनाची तीन वर्षे झाली. फुकट जाणारे वर्ष शैक्षणिक कारकिर्दीतले असावे, आयुष्यातले गेले असे कधीच वाटले नाही. किर्ती कॉलेज म्हणजे दादर चौपाटीला अगदी लागूनच. दिवसभर समुद्राचा वारा कानात घोंघावत असला तरीही रोज संध्याकाळी तो मला भुरळ घालायाचा. घरी पाय लवकर उचलला जायचा नाही. माझेच नाही तर असे कित्येकांचे व्हायचे. लहर आली की कंपांऊंडवरून मारलेली उडी थेट वाळूत पडायची. पण मला मात्र बाहेरून वळसा घालून जायला आवडायचे. समुद्राला शॉर्टकटने जाऊन भेटण्यापेक्षा दुरहून त्याच्या जवळ जाताना त्याचे हळूहळू वाढणारे विशाल रूप पाहण्यात मजा वाटायची. समुद्राकडे जाणार्‍या रस्त्यावर पसरलेले वाळूचे कण हळूहळू आपली घनता वाढवत रस्ता कसे व्यापत जातात, वार्‍याचा वाढता वेग आणि तो आपल्या सोबतीला घेऊन येणारा खारा गंध कसा दाट होत जातो, हे अनुभवणे म्हणजे समुद्राला जाऊन भेटणे. मग पाण्यात उतरले नाही तरी चालायचे. लाटांशी नजरेनेच खेळून झालेले असायचे. वाळूने माखलेले सुके पाय घरी घेऊन जातानाही मन चिंब भिजल्यासारखे वाटायचे. पण हे नेहमीच व्हायचे असे नाही. कधीतरी तो बोलवायचा, साद घालायचा. तेव्हा कपडे काढण्याची वेळही जीवावर यायची. हे असे व्हायचे जेव्हा आम्ही मित्र सहलीला जायचो..

कधी अलिबाग तर कधी केळवा. मुद्दाम आठवड्याचा असा वार पकडून जायचो जेव्हा गर्दी कमी असेल, त्यातही असाच एखादा किनारा पकडायचो जिथे कोणीच नसेल. सुरुवात क्रिकेट वा फूटबॉलने व्हायची. अगदी शिस्तीत. जोपर्यंत एखादा चेंडू लाटांवर तटवला जात नाही तोपर्यंत. पण एकदा का तसे झाले आणि पाण्याचा स्पर्श पायाला झाला की लागलीच सारे तूफान वेगाने समुद्राच्या ओढीने पळत सुटायचे. गल्ली क्रिकेटमध्ये ज्याची बॅटींग चालू असते त्याची अश्यावेळेस दिसणारी ओरड इथे कधीच नसायची, कारण त्यालाही समुद्राचे वेध लागलेले असायचे. बरेचदा मग पाण्यातच खेळ चालायचे, पण त्यात खेळाचे स्थान दुय्यमच असायचे.

पावसावर कित्येक कविता बनतात, कारण पावसाकडे पाहून त्या सुचतात. पण समुद्र हा बरेचदा तत्वज्ञान शिकवून जातो. एक असेच कायमचे मनावर कोरले गेलेले तत्वज्ञान म्हणजे निसर्ग हा आपला मित्र असतो, पण जोपर्यंत आपण त्याचा मान ठेऊ तोपर्यंतच. पट्टीचे पोहणारेच कित्येकदा बुडतात, कारण ते पोहायला एखादया तलावात शिकतात आणि नाद समुद्राशी करायला जातात. एक जवळचा मित्र असाच गेला. जेवढे मी त्याच्या पोहण्याबद्दल जाणून होतो, माझा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. एका सहलीचेच निमित्त झाले, पण तो समुद्र आमच्या ओळखीचा नव्हता. मागाहून कळले चूक त्याचीच होती, तेव्हा समुद्रावर धरलेला राग सोडला. मी त्यावेळी तिथे नसणे हे चांगले झाले कि वाईट आजवर समजू शकलो नाही. तिथे असूनही त्याला वाचवता आले नसते तर ती खंत मनावर जास्त आघात करून गेली असती. पण आजही खवळलेला समुद्र पाहताना कित्येकदा त्याची आठवण दाटून येते. अश्यावेळी दूर किनार्‍यावरच उभे राहणे पसंद करतो. आपला किनारा काय असावा हे देखील त्या समुद्रालाच ठरवू देतो. यातच जास्त सुरक्षित वाटते. पण म्हणून कायम तिथेच उभा राहत नाही. जेव्हा तो समुद्र शांत होऊन मला साद घालतो तेव्हा मात्र त्याच्याकडे जातो. त्याच्या हाकेला ओ द्यायला.. त्याच्या अस्तित्वाला मान द्यायला.. !

– तुमचा अभिषेक