RSS

Category Archives: लघुकथा

“ती” दोघं

महाबळेश्वर प्राईड हॉटेलच्या काऊंटरपाशी घुटमळताना ती मला पहिल्यांदा दिसली. तेव्हा तिचा “तो” तिच्या बरोबर नव्हता. जर हि आमची पहिलीच भेट नसती तर मला नक्कीच आश्चर्य वाटले असते की तिला एकटीला सोडून तो गेलाच कसा. पण त्या क्षणी तरी ती एकटीच तिथे चुळबुळ करत उभी होती.

हो, शब्दश: चुळबूळ. खाद्यांवरून आलेल्या ओढणीशी चुळबूळ. पाठीमागून कंबरेपर्यंत आलेल्या केसांशी चुळबूळ. कधी कानाला लटकलेल्या झुंबराशी चाळा, तर कधी हातामधल्या पर्सची उघडझाप. तिथे काहीच न करता उभे राहताना येणारा बावरलेपणा सावरण्याच्या नादात तिची ही धांदल उडत होती. पर्स हाताळण्याची पद्धतही अशी की जणू पहिल्यांदाच पर्स वापरत असावी. किमान ती नवीन खरेदी वा तिच्या नेहमीच्या वापरापेक्षा महागडी तरी असावी. कोणाच्या नजरेत आपले असे एकटे उभे राहणे भरू नये कदाचित यासाठी हा सारा खटाटोप होता. जेणेकरून कोणाची क्षणभर नजर पडल्यास, काहीतरी करतेय बापुडी म्हणत पुढे निघून जाईल. खरे तर एखाद्या नजरेला आकर्षक भासावे असे फारसे काही तिच्यात नसताना तिला हे करण्याची गरज नव्हती. पण मी मात्र एकटक तिथेच बघत असल्याने तिचे हे प्रयत्न पकडले गेले होते. पण मी का एवढे तिचे निरीक्षण करत होतो असा प्रश्न कोणी मला विचारला असता तर मात्र मी देखील पकडलो गेलो असतो. सुदैवाने हा प्रश्न विचारायचा हक्क राखणारी त्यावेळी माझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत झोप घेत होती.

बावळट.., तिच्यावर मी पहिल्याच नजरेत मारलेला पहिला शिक्का !

सुट्ट्यांचा आनंद लुटायला म्हणून महाबळेश्वरला आलेल्या उच्चभ्रू लोकांच्या गर्दीत तिचे वेगळेपण जाणवत होते. आणि कदाचित हेच एकमात्र कारण असावे जे माझी नजर तिच्यावर खिळली होती. काही लफडे तर नसावे ना, एक क्षण मनात विचार आला आणि एकवार तिच्या गळ्यातील काळ्या मण्यांची माळ पाहात खात्री करून घेतली. नाजूक आणि साधीशी. तिच्या अंगकाठीला शोभेल अशीच. नक्कीच मधुचंद्राच्या सफरीला आमच्या जोडीने आणखी एक सवारी या हॉटेलमध्ये दाखल झाली होती. अजूनही तिचा तो कुठे मला दिसत नव्हता. पण इतक्यात आमच्या नावाचा पुकारा झाला आणि मी दोन चुटक्या वाजवत हातातल्या सिगारेटची राख आणि डोक्यातले तिचे विचार झटकून सामान घ्यायला उठलो.

पण तेवढ्यापुरतेच..

लिफ्टचा पारदर्शी पिंजरा वर सरकतानाही माझ्या डोळ्य़ासमोर तीच होती. राहून राहून आठवत होती ती शाळेतली नम्रता साळसकर. त्या काळी मला कोण्या एका मुलीकडून राखी बांधून घ्यायची शिक्षा झाली असती तर जिच्यासमोर मी खुशाल हात धरला असता, ती नम्रता साळसकर … दिसायला अगदीच सुमार नव्हती. नाकीडोळी नीटस म्हणावी अशी. पण वयात येतानाच्या त्या वयातही, तिच्यात आकर्षक वाटावे असे माझ्या नजरेला कधीच काही आढळले नव्हते. इतरांसारखाच शाळेचा गणवेष, पण तो पेहराव म्हणून परिधान करण्यातील उदासीनता तिच्या देहबोलीत उठून दिसायची. स्वताच्या उचापतींना स्मार्टनेस समजायचे ते वय, साधेपणाला बावळटपणा समजायचे ते वय. अश्या मुलीबरोबर पुढे जाऊन कोण लग्न करेल, असाही प्रश्न तेव्हा पडायचा.

….. पण “ती”, हि नक्कीच नव्हती. पण अशीच होती. शाळेतील नम्रताच्या दोन वेण्या होत्या तर हिची एकच कंबरेपर्यंत पोहोचणारी शेपटी. अगदी आजही माझे विचार फारसे काही बदलले नव्हते. याचमुळे कदाचित तिचा “तो” कसा आहे हे बघण्याची उत्सुकता तिचा विचार पुन्हा पुन्हा डोक्यात खेळवत होती.

जेमतेम दिड-दोन तासांची झोप आणि प्रवासाचा थकवा जातो न जातो तोच दरवाज्याची बेल खणखणली. टूरमध्ये ठरल्याप्रमाणे आमचा मार्गदर्शक कम ड्रायव्हर आम्हाला नेण्यास हजर होता. त्याने दिलेल्या पंधरा मिनिटाच्या वेळेत सारे आवरून आम्ही हॉटेलच्या गेटपाशी हजर झालो. तिथे आम्हाला फिरवण्यासाठी एक कार अगोदरच उभी होती, मात्र ठरल्याप्रमाणे ती आम्हाला आणखी एका जोडप्याबरोबर शेअर करायची होती. याची आधीच कल्पना असली तरी यामुळे आता बायकोचा रोमॅंटीक मूड खराब होऊ नये म्हणत तो सावरण्यासाठी मी हॉटेलच्या आवारातच तिचे फोटोसेशन सुरू केले. या हनीमून ट्रॅव्हलचा एकेक क्षण अविस्मरणीय करायची धडपड कॅमेरा सरसावत सुरू झाली. तसेही आमच्या बरोबरचे जोडपे यायचे अजून बाकी होते. काही फोटो झाले, अन इतक्यात पुन्हा माझा फोकस शिफ्ट होत तिच्यावर स्थिरावला. फार काही मोठा योगायोग नव्हता, पण असेही घडू शकते याची कल्पना केली नसल्याने तसे वाटले खरे. आमच्याबरोबर जोडीदार म्हणून समोरून येणारे जोडपे तिचेच होते. कपड्यांचा निव्वळ रंग बदलला होता. मात्र स्टाईल तीच तशीच, सलवार कुर्ता वगैरे. सोबत तिचा “तो” देखील होता … एकत्र चालतानाही दोघांमधील एका हाताचे अपेक्षित अंतर त्यांच्यातील नाते आणि त्या नात्याचा स्वभाव उलगडण्यास पुरेसे होते.

तिच्यासारखाच सडपातळ बांधा, मात्र उंचीला तिच्या दिडपट. राखाडी रंगाची विजार आणि त्यावर बाहेरच सोडलेले पांढरे शर्ट. जे लांबून पाहता एखादा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता सदरा चढवून आल्यासारखे वाटावे. मात्र त्याला साजेसा रुबाब कुठेही दिसत नव्हता. दोन अनाकर्षक व्यक्तीमत्वे मिळून कधीही एक आकर्षक जोडी बनवू शकत नाही, मग त्यांची बेरीज करा वा गुणाकार .. त्यांची जोडी पाहता मनात आलेला हा पहिलाच विचार ..

दोघांत एकच गाडी शेअर करायची असल्याने आम्हा चौघातील एकाला पुढे बसावे लागणार होते. कोणी काही बोला ठरवायच्या आधीच तो त्या दोघांमधील एका हाताचे अंतर कायम ठेवत स्वताहून पुढच्या सीटवर जाऊन बसला. त्यानेच पुढाकार घेत एकमेकांची जुजबी ओळख करून घेतली आणि मग ड्रायव्हरकडे मोर्चा वळवला. त्याचा बोलका स्वभाव पाहता, ड्रायव्हरशी काय कसा संवाद साधायचा हा मला नेहमी पडणारा प्रश्न माझ्यापुरता तरी सुटला होता.

गाडी महाबळेश्वरच्या रस्त्यांवरून धावायला लागली तसे खिडकीतून थंड वारे आत झेपावू लागले. आणि अचानक तिने गायला सुरुवात केली..
मैने कहा फूलों से, हसो तो वो खिलखिलाके हंस दिये … आवाज छानच होता, पण गोडव्यापेक्षा त्यातील प्रामाणिकपणा जास्त भावला. तरीही सवयीप्रमाणे बायकोला कोपरखळी मारत म्हणालो, आता काय बाबा आपल्याला गाडीत म्युजिक सिस्टीम नसला तरी चालेल. पुटपुटल्यासारखेच ते शब्द, कसे तिच्या कानावर पडले देव जाणे. पण तिला मात्र हि मस्करी भावली नसावी. गाणे थांबवत ती वरवर हसली. ते ओशाळल्याचे हसू होते की संकोचातून आलेले, काही समजले नाही. पण पुढचा प्रवासभर तिचे न गाणे मनाला थोडीशी चुटपुट लाऊन गेले.

प्रतापगडावर स्वारी करायची म्हणजे सोबतीला तिथल्याच मातीतील माहितगार हवा, म्हणून आम्ही उभयतांनी दोघांत मिळून एकच गाईड पकडला. ते दोघे त्या गाईडने दिलेली माहिती इमानईतबारे ऐकत होते, तर मी मात्र तो माहितीपर कार्यक्रम संपताच त्या गाईडच्याच हातात कॅमेरा थोपवत आम्हा दोघांचे फोटो टिपायला लावत होतो. असे काही वेळा घडल्यावर लक्षात आले की त्या दोघांनी अजून एकही फोटो काढला नव्हता. ना स्वताचा, ना महाबळेश्वरचा. मगाशी गाडीत मी त्याला फोनवर बोलताना पाहिले होते. मोबाईलच्या त्या साध्याश्या मॉडेलमध्ये चांगला कॅमेरा असण्याची शक्यता कमीच होती. म्हणून मग मीच त्यांना एखादा फोटो माझ्या कॅमेर्‍याने काढतो म्हणून आग्रह केला. आधी त्यांनी नम्रपणे आढेवेढे घेतले. पण त्यांचे ईतिहासप्रेम पाहता, महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने फोटो काढून घेण्याच्या प्रस्तावाला ते नकार देऊ शकणार नाही, हा माझा अंदाज बरोबर निघाला.

परतताना मी त्यांच्याकडे फोटो पाठवायसाठी म्हणून मेल आयडीची विचारणा केली. तर तो त्या दोघांकडेही नव्हता. २०१० साल होते ते. मेल आयडी नाही म्हणजे अर्थातच फेसबूक-ऑर्कुट सारख्या कोणत्या सोशल साईटसवरही नसावेत. तरीच त्यांना छायाचित्रणाचा फारसा उत्साह नसावा, असाही एक विचार मनात आला. फोटो काढून ते शेअर तरी कोणाशी आणि कसे करणार होते.

गडाच्या पायथ्याशी गाईडला निरोप देण्याआधी मला बाजूला घेत तो म्हणाला, आपल्याला त्यांनी एवढी छान माहिती दिली, एवढे चांगले वागले, शंभर-शंभर रुपये जास्तीचे देऊया का ..
साधासाच, पण योग्य विचार. आमचेही कैक फोटो त्यांनी मोठ्या आवडीने काढले होते. पण हॉटेलात कशीही सर्विस मिळाली तरी वेटरसाठी न चुकता पाच-दहा रुपये टिप ठेवणार्‍या मला हे असे स्वताहून तरी कधीच सुचले नसते.

रात्री जेवण झाल्यावर हॉटेलच्याच जिमवर आम्ही एकत्र कॅरम खेळायचा बेत आखला. त्यांची जोडी विरुद्ध आमची जोडी. त्या दोघांचा एकंदरीत खेळ पाहता मी डाव्या हाताने खेळलो तरी आम्हीच जिंकू हे मी पहिल्याच डावाला समजून चुकलो. आणि तसेच होत होते. सलग तीन डाव हरल्यावरही तो शांत होता मात्र तिची चलबिचल सुरू झाली. तिला स्वताला या खेळातील हारजीतीने फरक पडत नसावा, पण कदाचित त्याला हरताना बघणे तिला मंजूर नव्हते. आणि ईथेही माझा अंदाज खरा ठरला. जेव्हा मी पुढचा डाव कोणालाही संशय येऊ नये अश्या बेमालूमपणे हरलो, तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचा आनंद अवर्णनीय होता. थोडा दुसर्‍याच्या मनाचा विचार करायला आता मी देखील शिकलो होतो.

महाबळेश्वरमधील आमचा दुसरा दिवस उजाडला.
आदली रात्र, त्यांच्या मीलनाची पहिली रात्र. काय कशी गेली हे त्यांनाच ठाऊक. मात्र जे काही घडले, त्यात त्याने तिला नक्कीच सावरून घेतले असावे, हे दोघांमध्ये उरलेल्या वीतभर अंतरावरून जाणवत होते. आज माझी पाळी म्हणत मी स्वताहून पुढे होत ड्रायव्हरबरोबर बसलो. ते पाहताच आज आपण सोबत प्रवास करणार या कल्पनेनेच तिचा चेहरा खुलून आला. काल अडकलेली गाण्यांची रेकॉर्ड पुन्हा सुरू झाली. साध्या मुलींची स्वप्नेही किती साधी असतात, आणि ती पुर्ण झाल्यावर त्यांना किती कमालीचा आनंद होतो याचा प्रत्यय मला येत होता.

उनसे मिली नजर के मेरे, होश उड गये .. ती नुसते आवाज गोड होता म्हणून गात नव्हती, तर व्यक्त व्हायला गात होती.

त्यादिवशी महाबळेश्वरचे सौंदर्य आम्ही त्यांच्या पद्धतीने पाहिले. कॅमेरा शक्यतो दूरच ठेवला. जे काही विलोभनीय दिसत होते ते केवळ नजरेनेच टिपत होतो. जवळ येणे हे केवळ फोटोनिमित्त पोज देण्यासाठी नसल्याने स्पर्शातील गोडी जाणवत होती.

मध्ये एका ठिकाणी आम्ही चहापाण्याचा, अंह स्ट्रॉबेरी क्रीम आईसक्रीमचा ब्रेक घेतला. एकमेकांची प्रायव्हसी जपत वेगवेगळ्या टेबलवर बसलो. मात्र निघताना जेव्हा पैसे चुकते करायला म्हणून उठलो तेव्हा त्यांनी आमचे बिल स्वत:बरोबरच चुकवल्याचे समजले. हि त्याची दानशूरता, औपचारीकता कि आम्ही काढलेल्या दोनचार फोटोंची परतफेड, याचा आता मी फक्त अंदाजच लावू शकत होतो.

एखादी गोष्ट योग्य की अयोग्य असा विचार करायची बहुधा त्याला सवय नसावी. आपण लोकांशी चांगलेपणाने वागलो की लोकंही चांगले वागतात हा एवढा साधा हिशोब असावा. तिचे म्हणाल तर, आपल्या नजीकच्या लोकांचे नेहमीच चांगले व्हावे हेच मागणे असायचे. दोघांनाही फक्त भावनांचे व्यवहार करता येत होते.

हॉटेलच्या परतीच्या प्रवासात गाडीमध्ये आम्ही सारेच दमूनभागून निपचित पडलो होतो. अन अचानक कानावर पुन्हा तेच मंजूळ सूर येऊ लागले. ये राते, ये मौसम, नदी का किनारा.. ये चंचल हवा.. वळून पाहिले तर ती गुणगुणत होती आणि त्याची पार समाधी लागली होती. दोघांच्या त्या स्थितीला भंग न करता मी मान पुढे वळवून घेतली. आता ड्रायव्हरसमोरील आरश्यातून मला फक्त त्याचा चेहरा दिसत होता आणि कानांना तिचा आवाज ऐकू येत होता. गाण्याचा कान माझ्याकडे फारसा नाहीये पण दिवसभराच्या थकावटीनंतर थकल्या भागल्या मिटलेल्या त्याच्या चेहर्‍यावरची तृप्ती तिच्या आवाजातील गोडवा पोहोचवत होती. पण लगेचच मी सावध झालो. तिचे ते गाणे खास त्याच्यासाठीच होते. ते ऐकण्याचा प्रयत्नही करणे एक व्यभिचार झाला असता याची जाणीव होताच मी लागलीच माझे कान मिटून घेतले. पुढे हॉटेल कधी आले समजलेच नाही.

त्या रात्री मी पहिल्यापासूनच हरायचे असा विचार करत त्यांना पुन्हा कॅरमचे आव्हान दिले. मात्र यावेळी त्यांनी हसूनच नकार दिला. दुसर्‍या दिवशी आम्हाला निघायचे आहे असे सांगत धक्काच दिला. त्यांचे पॅकेज फक्त दोन दिवस दोन रात्रींचे होते. याउलट आम्ही तीन दिवसांच्या पॅकेजवर आणखी एक दिवस वाढवून घेतला होता. आम्हाला आमच्या उर्वरीत हनीमूनसाठी शुभेच्छा देताना त्यांच्या चेहर्‍यावर ना इर्ष्या दिसत होती ना खंत. त्यांना जे अनुभवायचे होते ते या दोन दिवसात ते भरभरून जगले होते.

मला अखेरचे शुभरात्री बोलताना त्याने हलकेच एक रंगीत पुडके माझ्या हातात सरकावले. मी काही बोलायचा प्रयत्न करणार, ईतक्यात तोच म्हणाला, “राहू द्या, काल कॅरममध्ये जिंकल्याचे बक्षीस समजा.”
पण शेवटचा डाव तर तुम्ही जिंकलात, असे मी म्हणताच त्याने माझा हात हलकेच दाबत असा काही खळखळून हसला की मी समजून गेलो, ते बक्षीस जिंकलेल्या नाही तर त्या शेवटच्या हरलेल्या डावाचे होते. एक शेवटचे मी तिच्याकडे पाहिले. ते पुडके आम्हा दोघांतर्फे आहे असेच भाव त्या चेहर्‍यावर होते.

रूमवर गेल्यावर आठवले, मी ना त्यांचा पत्ता घेतला होता ना फोन नंबर. मेल आयडी तर त्यांच्याकडे नव्हताच. आमच्या कॅमेर्‍यात टिपलेला त्यांचा फोटो घेउन मुंबईभर फिरूनही ते सापडणार नव्हते. त्यांचे नाव जे आज लक्षात होते ते चार दिवसांनी कदाचित विसरले जाणार होते. अगदी आताही त्यांचा पत्ता घ्यायचे ठरवल्यास ते हॉटेलमध्ये नेमक्या कुठल्या रूमवर उतरले आहेत, याचाही आम्हाला पत्ता नव्हता. उद्या आम्ही गाढ झोपेत असताना ते मुंबईच्या दिशेने निघणार होते, आणि त्यानंतर कदाचित आयुष्यात पुन्हा कधी भेट होणार नव्हती. एक क्षण वाटले आताच रिसेप्शन काऊंटरवरून त्यांचा रूम नंबर घेऊन त्यांना गाठावे. पण याची खरेच गरज आहे का हे आधी स्वताच्या मनाला पटवून द्यायचे ठरवले आणि ते नाही जमले. काही ओळखी, काही आठवणी, तेवढ्यापुरताच ठेवल्यास त्यांचा गोडवा कायम राहतो असा विचार केला आणि मनाला हा युक्तीवाद चक्क पटलाही.

बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल खूप सारी माहीती राखून असतो. त्या जीवावर आपण तिला चांगलेच ओळखत असल्याचा दावा करतो. तर कधी काही काळाच्या सहवासानंतर आपल्याला एखाद्याचा स्वभाव आणि सवयी समजून जातात. अश्यावेळी ते कुठल्या प्रसंगात कसे वागणार याचाही आपण बरोबर अंदाज लावतो. पण जोपर्यंत ती व्यक्ती ‘तशी का वागते’ यामागचे कारण आपल्याला नाही ओळखता येत, तो पर्यंत ती व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचलेलीच नसते. प्रत्येक व्यक्तीला आपण आपलेच निकष लाऊन जोखत असतो. पण गरज असते तिच्या विचारांशी एकरूप होण्याची. आणि एकदा का असे झाले तर त्यानंतर ती आपसूकच उलगडायला सुरुवात होते. मग यासाठी दोन दिवसही पुरतात.

आजही मी आमच्या मधुचंद्राचा अल्बम उघडून बसतो तेव्हा त्या चार-दोनशे फोटोंमध्ये त्यांच्या एखाददुसर्‍या फोटोवर माझी नजर अडकते. नजरेत एकच प्रश्न येतो. कुठे असतील ते आज. पण त्या आधीच मनाने उत्तर दिलेले असते. जिथेही असतील नक्कीच सुखाने संसार करत असतील. जर ईथे आपला संसार सुखाचा चालू आहे तर त्यांच्यामध्ये काही बेबनाव येणे शक्यच नाही. एखादे नाते टिकवण्यासाठी प्रेमापेक्षाही वरचढ असतो तो चांगुलपणा, साधेपणा, आणि जमल्यास समजूतदारपणा. जो एकामध्ये असेल तरी नाते सहज टिकते. ईथे तर त्या दोघांमध्ये तो ठासून भरला होता.

त्या जोडीत आकर्षक असे काहीही नव्हते या माझ्या मतावर मी आजही ठाम आहे. फरक इतकाच, हल्ली मी साधेपणाला बावळटपणा समजत नाही. तर बरेचदा बावळटपणालाही साधेपणा म्हणत जपायचा प्रयत्न करतो.

अरे हो, आणि एक सांगायचे राहिलेच, आमच्या शाळेतल्या नम्रताचे पुढे काय झाले असेल असा प्रश्नही हल्ली मला पडत नाही ..

– तुमचा अभिषेक

 
 

दोन गिलास पाणी !

हताश, निराश आणि भकास नजरेने मी माठाच्या नळाकडे बघत होतो. त्या वयात या शब्दांचा आणि त्यामागच्या भावनांचा अर्थही मला समजत नसावा. समजत होती ती फक्त तहान. तिच गळ्यातून उचकटून त्या माठावर मारावी आणि फोडून टाकावा माठ असा विचार मनात तरळून गेला. पण तसे केले असते तर आईने खूप मारले असते..

दोन दिवसापासून अख्या मोहल्ल्यात पाणी आले नव्हते. काल सुरुवातीला चांगले वाटले होते. सकाळी सकाळी भांड्यांच्या आवाजाने झोपमोड झाली नव्हती. आईने आंघोळ चार तांब्यातच उरकायला लावली होती. तोंड धुताना दोनच चूळा मारल्या तरी बाबा रागावला नव्हता. उलट त्याने सुद्धा माझेच उरलेले अर्धे गिलास पाणी वापरले होते. पण संध्याकाळी मात्र आईने नाक्याच्या बावडीवर पाणी आणायला धाडले. आठ हंडे आठ फेर्‍या. हात अजूनही ठणकत होता. आज आंघोळ नाही आणि शाळा पण नाही. गगनबावड्याला पाईपलाईनचे काम चालू होते. संध्याकाळपर्यंत पाणी येईल असे शेजारच्या मौसी बोलत होत्या. दोन दिवस थोडे गढूळ येईल पण येईल. पण तोपर्यंत काय!

सकाळी माठाने पाऊण गिलास पाणी दिले तेवढेच. आता त्याच्या नळातून एक टिप्पूस सुद्धा बाहेर निघत नव्हता. पिंपाच्या तळाला पाणी होते, पण आई ते भांडी घासायला वापरायची. तळाशी राख जमलेली दिसत होती. सोबंत गंज चढलेला पत्रा चमकत होता. ते पाणी प्यायलो असतो आणि काही झाले असते तर आईने नक्कीच खूप मारले असते.

आई तत्वांची खूप पक्की होती. कोणाकडे हात पसरलेले तिला आवडायचे नाही. कोणाकडे साधे प्रसादीचे जेवायला जाऊ द्यायची नाही. मौसीकडे पाणी मागितले असते, पण तिने हे आईला सांगितले असते तर… त्यापेक्षा नकोच ते!

पाण्याच्या शोधात घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. उन्हं अजूनही कडक होते. तहान वाढवत होते. गल्लीबोळ दुकानलाईन, नक्की कुठे जायचे काही कल्पना नव्हती. अख्या मोहल्ल्यामध्ये पाणी आले नव्हते. बस्स एका बाजूचा फूटपाथ पकडून सावलीच्या हिशोबाने चालत होतो. ईतक्यात एका कडेला सुलभ शौचालय नजरेस पडले. बाहेरच्या बाजूने तेथील बेसिन आणि पाण्याचा ओलसरपणा दिसत होता. बेसिनच्या नळाचे पाणी प्यायला काय हरकत आहे अशी मनाची समजूत काढली. ते हात धुवायचे पाणी असते, भांडी घासायचे नसते म्हणत आत शिरलो. चिंध्या बांधलेल्या नळातून पाण्याची पिचकारी उडत होती. ते बघूनच मन तयार होत नव्हते. इतक्यात तिथून एक पाखरू फडफडत उडाले. झुरळच ते! थू थू थू! आईला जर का समजले मी इथे पाणी प्यायला आलेलो तर.. बस्स हा विचार मनात येताच मी आवंढा गिळत तिथून पळत सुटलो.

पळत पळत रेल्वे स्टेशनजवळ पोहोचलो. एका स्टॉलवर प्लास्टीकच्या पाण्याच्या बाटल्या सजवून ठेवल्या होत्या. पण त्याला पैसे पडतात हे माहीत होते. हिंमत करून विचारले तर दहाच्या खाली कुठलीच बाटली मिळत नव्हती. पॉकेटमनीचा दिड रुपया होता माझ्या खिश्यात. दिड दोन घोट पाणीही चालले असते. पण ते सुट्टे पाणी विकायला तयार नव्हते. इतक्यात काहीसे आठवले. मोठ्या हॉटेलात गेलो की पहिल्यांदा पाण्याचे दोन ग्लास आणून ठेवतात. मागे एकदा आईबरोबर गेलेलो तेव्हाचे आठवले. काचेच्या ग्लासात कितीतरी वेळ स्वत:चेच प्रतिबिंब न्याहाळत बसलेलो. आज मात्र ग्लास समोर आले की पहिल्यांदा त्यातील पाणी पिऊन टाकायचे म्हणत एका हॉटेलात शिरलो. पाणी पिऊन मग काहीही ऑर्डर न करता निघून जायचे असा प्लॅन होता. दोन ग्लास पाण्यासाठी कोणी माझा जीव घेणार नव्हता!

पण घेतला तर …

नाही आत शिरलो तर तहानेनेच जायचा होता..!

“अकेला है क्या?” वेटरने दरडावतच विचारले.
अर्धी चड्डी बघून कोणी सलाम ठोकेल अशी अपेक्षाही नव्हती. तिथूनच आल्यापावली परत फिरावेसे वाटले. पण एव्हाना टेबलांवरून नजर भिरभिरू लागली होती. वडासांबार, पुरीभाजी, मसालाडोसा.. पावभाजी, मोसंबी ज्यूस, मॅंगोला.. पण माझी तहान पाण्याची होती. जाड काचेच्या त्या ग्लासांवर नजर पडताच पावलेही थबकली. “हा अकेला है” सुकलेल्या ओठातून कसेबसे शब्दही उमटले. त्याच दरडावणार्‍या नजरांनी मग एका कोपर्‍यातील शिडीखालची जागा दाखवली. माझ्यासाठीही तिच योग्य होती. ना कोणाच्या अध्यात, ना कोणाच्या मध्यात. त्या अडचणीच्या कोपर्‍यातही मी आणखी अंग चोरून विसावलो. लगोलग एक जाडजूड मेनूकार्ड येऊन माझ्या समोर आदळले. मी उजवा अंगठा तोंडाजवळ नेत पाण्याची खूण केली. जवळून जाणारा एक पाण्याचा ग्लास उचलून माझ्या टेबलावर टेकवत तो निघून गेला. मी घटाघट घटाघट एकाच श्वासात पुर्ण ग्लास रिता केला. तहान अजून बाकी होती, पण मगासचा पाणीवाला एव्हाना दूर निघून गेला होता. इतक्यात त्या वेटरकडे माझी नजर गेली. तो फिरून मागे येऊ नये म्हणून मी उगाचच डोके मेनूकार्डमध्ये खुपसले.

त्यात वाचायचे असे काहीच नव्हते. हलकेच टेबलाचे निरीक्षण करू लागलो. स्वच्छ आणि सुंदर. एवढा छान आमचा देव्हारा सुद्धा नव्हता. मी अजून काही मागवले नव्हते तरी त्यावर आधीच बडीशेप आणि चटण्यांच्या छोट्या छोट्या बाटल्या रचून ठेवल्या होत्या. टिपकागदांचा एक स्टॅंड सुद्धा होता. त्याला पाहून आठवले, घाईघाईत पाणी पिताना बरेचसे पाणी ओघळून माझी मान आणि शर्ट ओले करून गेले होते. सावचितपणे प्यायलो असतो तर ते फुकट गेले नसते असे उगाचच वाटून गेले. माझ्या वरच्या खिशात एक रुमाल सवयीनेच असायचा. त्याने तोंड पुसून घेतले आणि तो तसाच टेबलावर ठेवून दुसर्‍या पाण्याच्या ग्लासासाठी पोर्‍याला आवाज दिला. एक गिल्लास पाणी आपली जादू करून गेला होता. मला बरेपैकी कंठ फुटला होता!

पाण्याचा दुसरा ग्लास मात्र आरामात चवीने रिचवला. शेवटचा घोट गरज नसूनही आत ढकलला. पुन्हा कधी पाणी मिळेल न मिळेल याची शाश्वती नव्हती. आता तिथून सुमडीत सटकायचे होते. ईतक्यात जवळच उभ्या त्या पाणीवाल्या पोर्‍याने वेटरला आवाज दिला. माझी ऑर्डर घ्यायची आठवण करून द्यायला..

अचानकच घडल्याने मला काही सुचेनासे झाले. अख्खे मेनूकार्ड नजरेसमोर भिरभिरून गेले. खिश्यातल्या दिड रुपयात तिथला वडाही मिळणार नव्हता. समोरचा गेट रिकामा दिसत होता. वेटर जवळ यायच्या आधीच संधी साधायला हवी म्हणत मी पटकन टेबलावरचा रुमाल उचलला आणि शर्टाच्या खिशात कोंबून गेटच्या दिशेने धाव घेतली. त्या नादात हात टेबलावरच्या बरण्यांवर आदळून आवाज झाला आणि तिथेच घात झाला.

चोर चोर चोर .. गेटबाहेर पडून डावीकडच्या फूटपाथवर वळलो तरी पाठीमागून ओरडा ऐकू येत होता.. दोन ग्लास पाण्याची चोरी.. घरी समजले असते मी चोरी केली तर आईने खरेच खूप मारले असते.

मी अक्षरशा वाट मिळेल तिथे पळत होतो. लिंबूवाल्या म्हातारीच्या गोणपाटावर पाय पडला तश्या तिने शिव्या घालायला सुरुवात केली. मी त्या कानाआड करत पुढे उडी मारली. पुढे रचलेल्या कपड्यांवर पाय पडला असता तर खूप मार पडणार होता. तो चुकवायला म्हणून मी तिरकी उडी मारली. पण पाय न पडताही तिथून सट्टाक् करत एक काठी पायावर पडली. आईग्गं, पोटरीपासून खालचा पाय सुन्न झाला. पुढची चार पावले मी एकाच पायावर धावलो की काय असे क्षणभर वाटले, आणि मग अचानक दुखर्‍या पायातून कळा येऊ लागल्या. तरी मागाहून कोणीतरी आहे म्हणून नेटाने धावायचेच होते. पण वेग मंदावला होता. घश्यापर्यंत प्यालेले पाणी डुचमळून उलटी काढावीशी वाटत होती, पण त्याच पाण्यासाठी सारे केले असल्याने आतच थांबावी असे वाटत होते. पुढे कुठे जायचे या विचारात सिग्नलजवळ पोहोचलो. इतक्यात कोणाचातरी पाठीवर जोरकस फटका पडला. मी लंगडणार्‍या पायासह कोलमडलो. डोके रस्त्याकडेच्या एका लाल खांबावर आदळले आणि त्या खांबाला आणखी लाल करत, शुद्ध हरपत मी जमिनीवर पालथा झालो. छातीतून एक जीवघेणी कळ गेली. काहीतरी छातीला चिरडत जात होते..

बहुधा मगाशी घाईघाईत रुमालासोबत बडीशेपचा डब्बाही खिशात कोंबला गेला होता!

“……. चांगल्या घरचा मुलगा दिसतोय रे”, कोणीतरी शेवटचे म्हटल्याचे कानावर पडले. शुद्धीवर आलो तेव्हा आई उशाशी बसलेली. डोक्यावरून हात फिरवत होती. म्हणत होती, माठ आडवा केला असतास, तर दोन गिलास पाणी आरामात आले असते. मला बहुतेक ते सुचले होते. पण का माहीत नाही भिती वाटलेली. माठ फुटला असता पटकन तर आईने खूप मारले असते.

– तुमचा अभिषेक

 

रन राहुल रन…!!

धापा टाकतच राहुल उठला. त्याच्या सर्वांगाला पाणी सुटले होते. छातीतील धडधड थांबायचे नाव घेत नव्हती. एका हाताने ती धडधड रोखायचा प्रयत्न करत दुसर्‍या हाताने बिछान्याचा आधार घेत तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. आपण आपल्या घरातच, स्वत:च्याच बेडवर आहोत याची खात्री पटू लागली तसे हळूहळू नॉर्मल होऊ लागला. पण मन अजूनही साशंक होते. छतावर फिरणार्‍या पंख्याचा वेग दर दुसर्‍या क्षणाला कमीजास्त होत असल्याचे जाणवत होते. पंख्याच्या वाढत्या वेगाबरोबर छातीतील धडधड वाढताना भासत होती, तर कमी होणार्‍या वेगाबरोबर कमी होत कायमची थांबतेय की काय असे वाटत होते. नजर स्थिरावू लागली तसे खोलीभर पसरलेला अंधार मावळू लागला. पण उजाडायला अजून अवकाश आहे हे खिडकीबाहेर दाटलेला मिट्ट काळोख सांगत होता. उशाजवळ ठेवलेला आपला मोबाईल उचलून त्याने वेळ चेक केली. तीन वाजून सत्तावीस मिनिटे. इतरदिवशी हि वेळ बघत अजून उजाडायला अवकाश आहे म्हणत मोठ्या आनंदाने तो पुन्हा पांघरूणात शिरला असता. पण आता मात्र त्याला लवकर उजाडावेसे वाटत होते. कसल्याश्या घाणेरडया स्वप्नातून दचकून उठला होता. आठवायचा प्रयत्न केल्या आठवत नव्हते. आठवायचेही नव्हतेच. पण ते स्वप्नच होते हि मनाला खात्री पटवून दिल्याशिवाय पुन्हा झोप येणे शक्य नव्हतेच. थोडावेळ तो तसाच छतावर गरगरणार्‍या पंख्याकडे बघत बेडवर पडून राहिला. आणि अचानक काहीसे सुचले तसा ताडकन उडी मारत उठला आणि ड्रेसिंग टेबलकडे झेपावत ड्रॉवर उघडून आतील लिफाफा बाहेर काढला. उतावीळपणेच आतील कागद बाहेर काढून सारे काहे जागच्या जागी आहे याची खात्री केली आणि परत जागेवर येऊन लवंडला. स्वप्न अजूनही आठवले नव्हतेच, पण भरलेली धडकी आता शांत झाली होती. सारे काही आलबेल होते, याच विश्वासात पहाटे कधीतरी डोळा लागला असावा.

……….. पण फार काळासाठी नाही !

थड थड, थड थड थड … थड थड, थड थड थड …
दरवाजा ठोठावण्याच्या आवाजाने पुन्हा झोपमोड झाली.

राहुलने बेडवरूनच आवाज दिला, “कोण आहे?”

“अरे सोनू, बाहेर ये लवकर.. पोलिस आलेत आपल्याकडे..” आईचा किंचित घाबरा आवाज राहुलची झोप उडवून गेला. प्रतिक्षिप्त क्रिया घडल्याप्रमाणे तो ताडकन बिछान्यातच उठून उभा राहिला. पंख्याची गरगर आता डोक्याच्या अगदी वर चार बोटांवर जाणवत होती. छातीतील धडधड पुन्हा एकदा त्या आवाजाशी स्पर्धा करू लागली. त्याच्या डोक्यातील विचारचक्रे जोरात फिरू लागली. स्वप्नातली भिती प्रत्यक्षात उतरली होती. पण अजूनही स्वप्नातच तर नाही ना म्हणत त्याने स्वताला एक चिमटा काढून बघितला. ते ही कमी म्हणून स्वताच्या दोन थोबाडीत मारून झाल्या. पण काही फायदा नाही. स्वप्न नव्हतेच ते!

पुन्हा एकदा दारावर थडथड आणि पाठोपाठ आईचा आवाज, “सोनू बेटा, उठ लवकर, इथे काय प्रॉब्लेम झालाय बघ… हे बघ पोलिस काय म्हणत आहेत..”

आता मात्र पुढचा मागचा विचार न करता सोनू बेटाने बेडवरून उडी मारली. ड्रॉवरमधील लिफाफा बाहेर काढला. आतला दस्तावेज पुनश्च चेक करण्याचा मोह झाला पण हाताशी तेवढा वेळ नव्हता. दारावरची थडथड वाढतच होती. सैरभैर होऊन तो आसपास लिफाफा लपवण्यासाठी जागा शोधू लागला. खरे तर त्याला स्वत:लाच कुठेतरी दडी मारून लपावेसे वाटत होते. पण ते शक्य नव्हते. दहा बाय बाराची जेमतेम खोली. स्टडी कम बेडरूम म्हणून राहुलने वापरायला घेतली होती. एक बेड आणि टेबल सोडला तर फर्निचर म्हणून काही नव्हते. इथे कुठेही लिफाफा लपवला तरी पोलिसांना तो शोधणे फार काही कठीण जाणार नाही हे तो थोड्याच वेळात समजून चुकला. खिडकीतून बाहेर फेकून द्यावा असा विचार केला खरे, पण कितीही लांब फेकला तरी खालच्या गार्डन पलीकडे जाणार नव्हता. आता सुटकेचा एकच मार्ग त्याला दिसू लागला. तो म्हणजे लिफाफ्यासकट पळ काढायचा. खरे तर असे केल्याने त्याच्यावर असलेला संशय आणखीन बळकट होण्याची शक्यता होती. पण तरीही, कोणताही आरोप सिद्ध करायला पुरावा लागतोच. किमान तो तरी त्याला नष्ट करणे शक्य होते. अर्थात हा सारासार विचार करायच्या मनस्थितीत तो होता कुठे. विचार मनात आल्याक्षणीच अंमलबजावणीला सुरूवातही झाली होती. आता ना त्याला आईची हाक ऐकू येत होती ना दारावरची थाप. बस्स कानावर एक आवाज पडत होता.. रन राहुल रन.. रन राहुल रन.. कदाचित हा आवाज त्याच्याच अंतर्मनातून असावा. आणि अश्यावेळी नेहमी तोच ऐकला जातो.

खिडकीला लागून असलेल्या पाईपाच्या आधारे चढण्या-उतरण्याचा प्रकार या आधीही राहुलने ३-४ वेळा केला होता. त्यामुळे उतरताना आधारासाठी नेमके कुठे पकडायचे याचा जास्त विचार त्याला करावा लागला नाही. हा मुलगा पहिल्या माळ्यावरून असा खिडकीमार्गे पळून जाऊ शकतो हे दाराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या डोक्यात येईपर्यंत तो कुठेतरी लांब पोहोचणार होता. पण नक्की कुठे..? कुठवर..?? त्याचे त्यालाही ठाऊक नव्हते.

गार्डनच्या कंपाऊंडवॉल वरून उडी मारून राहुल मागच्या रस्त्याला तर आला होता, पण पुढे कुठे जायचे याचा काहीच विचार डोक्यात नव्हता. नुकतेच उजाडले होते. नक्की किती वाजले होते याची कल्पना नव्हती. पण पानाची टपरी उघडलेली दिसत होती. रात्रभर गस्त घालणारे दोन हवालदार सवयीने तिथे उभे असलेले दिसले आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कश्यावरून हे देखील आपल्याच पाठीमागे नसावेत..? असा विचार डोक्यात येण्याचा अवकाश तसे राहुल त्यांची नजर चुकवून पुन्हा पळत सुटला.

हायवे ओलांडून समोरच्या नेहरूनगर वस्तीत शिरेस्तोवर त्याला बरीच धाप लागली होती. एवढा वेळ आपल्याच धुंदकीत मारेकरी पाठीमागे लागल्यासारखा जिवाच्या आकांताने तो पळत होता. एखादा आडोसा मिळाला तसा जरासा विसावला. श्वास समेवर आले आणि पुढचे विचार चालू झाले. शक्य तितक्या लवकर कोणालातरी फोन करणे गरजेचे होते. ज्याच्यामुळे या सर्व प्रकरणात अडकला होता निदान त्याला तरी. पण हाय रे कर्मा, सारे खिसे तिसर्‍यांदा चाचपून झाल्यावर त्याच्या लक्षात आले की घाईघाईत आपण ना मोबाईल बरोबर घेतला आहे ना पैश्याचे पाकीट. वरच्या खिशात ठेवलेली पंधरा-वीस रुपयांची चिल्लर ती काय एवढ्या शोधाशोधीतून त्याच्या हाती लागली. पब्लिक बूथवरून एक रुपया खर्च करत फोन करणे शक्य होते, पण नंबर कोणाचाही पाठ नव्हता. कसेही करून गण्याशी संपर्क साधणे गरजेचे होते आणि आता तो कॉलेजलाच भेटला असता. साहजिकच पुढचे लक्ष्य कॉलेज गाठणे होते. रिक्षा करून कॉलेजला जावे. तर सारे पैसे त्यातच खल्लास झाले असते. येणारा दिवस काय दाखवणार होता याची कल्पना नव्हती. पैश्याची पुढे कितपत गरज पडेल याची शाश्वती नव्हती. पण हा विचार याक्षणी क्षुद्र होता. जर पोलिस घरापर्यंत पोहोचले होते तर कॉलेजमध्येही कोणत्याही क्षणी पोहोचू शकत होते. गण्याला कदाचित याची काहीच कल्पना नसावी आणि पोलिस त्याच्याही मागावर असणारच. जर पोलिस एव्हाना कॉलेजला पोहोचले असतील तर तो पकडला गेला असेल का? की फरार झाला असेल? मग माझे कॉलेजला जाणे कितपत सेफ आहे? पण या सार्‍या प्रश्नांची उत्तरेही आता कॉलेजमध्ये गेल्यावरच मिळणार होती. फारसा विचार न करता पुढच्याच क्षणी राहुलने रिक्षाला हात दाखवला.

मुख्य प्रवेशद्वारापाशी रिक्षा नेणे मुर्खपणाचे होते. तसेही त्यांचा अड्डा कॉलेजच्या मागेच जमायचा. गण्या नाहीतर निदान त्याची बातमी तरी तिथेच मिळणार होती. पण सुदैवाने फारशी शोधाशोध करायची गरज न पडता गण्याच नजरेस पडला. बरोबर ग्रूपचे आणखी दोघे जण होते. त्यांच्या चेहर्‍यावरचे टेंशन बघून राहुल काय ते समजून गेला. त्याही परिस्थितीत त्या सर्वांच्या भकाभक सिगारेटी ओढणे चालूच होते. किंबहुना नेहमीपेक्षा किंचित जास्तच. राहुलला मात्र या सिगारेटचा वास कधीच जमला नव्हता. पण तरीही मैत्रीखात्यात कधीकधी तो स्वत: देखील या पोरांना सिगारेट प्यायला पैसे द्यायचा. ईंजिनीअरींगच्या पहिल्याच वर्षापासूनचे सारे मित्र. काही त्याच्याच वर्गातील, तर काही दुसर्‍या डिपार्टमेंटमधील. तर काही गेले तीन-तीन, चार-चार वर्षे ड्रॉप लागलेली मुले. सगळ्यांचे एकत्र येण्याचे सारखे दुवे म्हणजे सिगारेट ओढणे आणि कॉलेजच्या मागे भरघाव बाईक फिरवणे. पण एवढ्या वर्षात पोरगी मात्र एकाच्याही पाठीमागे बसलेली कधी दिसली नव्हती. कशी दिसणार, कॉलेजमधील नावाजलेल्या टारगट मुलांचा म्हणून ओळखला जाणारा ग्रूप. पण तरीही, राहुल यांच्यात असूनही या सार्‍यांपेक्षा वेगळा. अपघातानेच यांच्यापैकी एकाशी ओळख झाली आणि ट्यूनिंग जमली म्हणून हळूहळू या सार्‍यांमध्ये सामील झाला. कसेही असले तरी ही मुले मैत्रीखातर जिवाला जीव देणारी आहेत या एकाच विश्वासावर त्याचे नाते या सर्वांशी घट्ट बांधले गेले होते. तो स्वत: अभ्यासात प्रचंड हुशार. पण ईंजिनीअरींगमध्ये हुशार विद्यार्थी तोच, जो आदल्या रात्री अभ्यास करूनही पास होतो, या चुकीच्या समजुतीत अडकलेला. तरीही एक चांगली गोष्ट म्हणजे यांच्यात चोवीस तास राहूनही तो कधी त्यांच्यासारखा बनला नव्हता. पण ना कधी त्यांना आपल्यासारखे बनवायचा प्रयत्न केला होता. ते जसे होते, तसे होते, पण राहुलचे मित्र होते आणि त्याला त्यांच्या ग्रूपमधील एक हुशार मुलगा म्हणून योग्य तो मान होताच. आणि का नसावा, कारण ते सारे पास व्हावे म्हणून त्यांचा कोणी अभ्यास घ्यायचा, त्यांना शिकवायचा तर तो राहुलच होता. खास करून गण्याभाईला…

इतरांसाठी गणेशभाई, जवळच्यांसाठी गण्याभाई, पण राहुलसाठी मात्र बघताबघता गणेशभाईचा गण्याभाई, आणि गण्याभाईचा गण्या झाला होता. तसे मारामारी किंवा भाईगिरी करणे हा राहुलचा पिंड नव्हता, पण गण्याभाईचा हात डोक्यावर आहे म्हटल्यावर चार पोरे राहुललाही वचकून राहायची. आणि राहुलला देखील हे आवडायचे. गण्या गेली चार वर्षे या कॉलेजमध्ये होता पण अजूनही दुसर्‍या ईयत्तेला पार करू शकला नव्हता. आणि त्यात काही नवल नव्हते म्हणा, कारण पास होण्यासाठी मुळात अभ्यासाची आवड तरी असावी लागते वा तशी गरज तरी. ज्याचा दिवस चहाच्या टपरीवर सुरू होऊन कॉलेजच्या जिममध्ये संपायचा अश्या गण्यासाठी ईंजिनीअरींगचा अभ्यासक्रम बनलेलाच नव्हता. पण या गण्याला डीग्रीसह कॉलेजच्या बाहेर काढायची जबाबदारी राहुलने आपल्या खांद्यावर घेतली होती आणि त्यासाठी तो जे काही करत होता ते चुकीचे आहे हे माहीत असूनही तो याला मित्रकर्तव्याचे नाव देत होता.

राहुलने जेव्हा गण्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचलेल्या पोलिसांबद्दल सांगितले तेव्हा गण्याच्या चेहर्‍यावरच्या आठ्या आणखी पसरल्या. कुठल्याही संकटातून जर कोणी मार्ग काढू शकत असेल तर तो एक गण्याच हा राहुलचा विश्वास होता. पण आज गण्यालाही चिंताग्रस्त बघून राहुलचेही टेंशन आणखी वाढले. गण्याच्या माहितीनुसार एक्झाम डीपार्टमेंटमध्ये असलेल्या C.C.T.V. कॅमेर्‍यांमुळे त्यांची चोरी पकडली गेली होती. थोडाबहुत ऑफिस स्टाफ गण्याचा खास होता ज्यांच्याकडून त्याला ही खबर मिळाली होती. हे कॅमेरे हल्लीच बसवले असल्याने सारे अनभिज्ञ होते. पण कॉलेज एवढ्या लवकर पोलिसांपर्यंत जायची अ‍ॅक्शन घेईल असे गण्यालाही वाटले नव्हते. कोणालातरी पटवून, कोणाचे तरी पाय धरून, वेळ पडल्यास आपले आतापर्यंत कमावलेले वजन वापरून यातून बाहेर पडू अश्याच समजुतीत तो होता. फार तर फार एखाद दोन वर्षाचे निलंबन, ईतपत मानसिक तयारी त्याने करून ठेवली होती. पण पोलिस केस म्हणजे थेट जेल आणि सारी शैक्षणिक करीअर उध्वस्त, नव्हे सार्‍या आयुष्याचे मातेरं.

जर गण्यासारख्या मुलाची ही हालत होती तर राहुलची कल्पनाही न केलेली बरे. अजूनही त्यांच्याकडे शेवटचा मार्ग हाच होता की जाऊन प्रिन्सिपल सरांचे पाय पकडणे. परीक्षा विद्यापीठाची नसून कॉलेजची अंतर्गत असल्याने अंतिम निर्णय काय घ्यायचा हे ठरवणे कॉलेज प्रशासनाच्याच अखत्यारीत येत होते. पोलिस तक्रार मागे घेतली गेली तर कदाचित यातूनही सुटकेची संधी होती. निघण्यापूर्वी गण्याने बॅगेतून एक धारदार चाकू काढून खिशात ठेवला. “कशासाठी? कोणासाठी?”, राहुलच्या नजरेतील प्रश्नांना गण्याने आपल्या नजरेनेच गप्प केले. तसेही त्याच्याशी वाद घालण्यात आता अर्थ नाही हे तो समजून होता. गण्या नेहमी आपल्याच मनाचे ऐकायचा. त्याच्यामते, जर आयुष्य एकदाच मिळते तर विचार दोनदा का करायचा, निर्णय हा नेहमी पहिल्याच फटक्यात घ्यायचा असतो.. आणि आताही गण्याने तो घेतला होता.. दोघांसाठीही!

……. अजुनही राहुलचा गण्यावर विश्वास होता.

प्रिन्सिपल सरांच्या केबिनकडे जाताना रस्त्यात त्यांना बर्‍याच जणांनी पाहिले. पण कोणाच्याही नजरेत काही वेगळे जाणवले नाही. म्हणजे अजून या प्रकरणाचा बोभाटा झाला नव्हता. जर प्रिन्सिपल सरांनी त्यांची बाजू समजून घेतली तर अजूनही सुटकेची आशा होती. पण कोणती बाजू ते मांडणार होते हा प्रश्नच होता. परवा होणार्‍या प्रश्नपत्रिकेची चोरी केली होती त्यांनी. काय सांगणार होते ते सरांना? सर, आमचा अभ्यास झाला नव्हता, नापास होऊ, वर्ष फुकट जाईल या भितीने असे केले हे सांगणार होते? की पैश्यांची गरज होती, प्रश्नपत्रिका विकून चार पैसे मिळतील या लालसेपोटी केले हे कारण देणार होते? पण जेव्हा प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचा संतप्त अवतार बघून त्यांच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. राहुलने त्यांचे हे रूप आजवर कधी पाहिले नव्हते. राहुल अगदीच त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यांपैकी एक नसला तरी या मुलात एक चुणूक आहे हे ते जाणून होते. वेळोवेळी हे त्यांनी दर्शवलेही होते. त्यामुळे त्यांच्या मनात राहुलबद्दल नक्कीच एक सॉफ्ट कॉर्नर होता. पण कालच्या कृत्याने त्याने तो ही गमावला होता. आज त्याची जागा रागाने घेतली होती. सरांचा शाब्दिक मार सुरू होता आणि राहुल जागीच थिजल्यासारखा उभा होता. आजपर्यंत बर्‍याचदा ब्लॅकलिस्ट मध्ये नाव लागले म्हणून असे प्राध्यापकांच्या केबिनमध्ये जाण्याचे प्रसंग त्याने अनुभवले होते. पण प्रत्येकवेळी एक प्रकारची बेफिकीरी असायची की काही झाले तरी हे आपले कॉलेज आहे, समोर ओरडणारे आपलेच सर आहेत. हे काही आपल्याला जीवे मारायची शिक्षा देणार नाहीत. जे काही बोलतील ते खाली मान घालून निमुटपणे ऐकायचे की झाले, सुटलो. पण आज तशी परिस्थिती नव्हती. आज त्याला निर्लज्जासारखे उभे राहणे जमत नव्हते. आणि रडायलाही येत नव्हते. मन एवढेही कोडगे झाले नव्हते, पण रडून आपली चूक धुतली जाणार नाही याची त्याला जाणीव होती. अजूनही सर यातून काहीतरी मार्ग काढतील, आपल्या आयुष्याची, आपल्या शैक्षणिक करीअरची अशी वाट लागू देणार नाहीत हा विश्वास अजूनही कुठेतरी त्याच्या मनात होताच. आणि त्याचा हा विश्वास अगदीच काही चुकीचा नव्हता. आपण मुलांचे भविष्य घडवण्यासाठी या जागी आहोत, ना की त्यांची स्वप्ने उध्वस्त करण्यासाठी याची थोडीबहुत जाण सरांनाही होती. संतापाचा जोर ओसरला तसा त्यांचा बोलायचा रोख बदलू लागला. राहुलकडे त्यांनी आतापर्यंत केलेल्या त्याच्या सार्‍या चुकांचा कबुलीजबाब मागितला.

दोन वर्षांपूर्वी राहुलने पहिल्यांदा गैरमार्गाचा वापर करून गण्याची मदत केली होती. परीक्षेच्या आदल्या रात्री स्वत:चा अभ्यास बाजूला ठेऊन गण्याला शिकवायचा निष्फळ प्रयत्न करून झाल्यावर तो समजून चुकला की उद्याच्या पेपरात गण्याची दांडी पुन्हा एकदा गुल होणार आहे. म्हणून गण्याच्याच सांगण्यानुसार राहुलने त्याच्या जागी डमी बसायचा निर्णय घेतला. पकडला गेला असता तर दोघांवरही एकदोन वर्षांची बंदी आली असती. पण पकडले जाण्याची शक्यता कमी होती. परीक्षागृहात हजर असणारे सारे निरीक्षक बाहेरचे असायचे. कॉलेजचे काही वॉचमन आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा वावर तिथे असायचा पण त्यांच्यावर मुलांकडे लक्ष द्यायची विशेष अशी जबाबदारी नव्हती. आणि लक्ष गेले तरी ते काणाडोळा करणार होते, कारण ते सारे गण्याच्या ओळखीचे होते. पहिला पेपर निर्विघ्नपणे पार पडला तसा राहुलचा हुरूप वाढला. अजून तीन-चार अवघड विषय त्याने गण्याला डमी बसून सोडवून दिले.

त्याच्या पुढचे वर्षही असेच सुटले. पण या वर्षी मात्र प्रत्येक वर्गात एक तरी निरीक्षक कॉलेजचा हवा असा विद्यापीठाने नियम केल्याने त्यांची बोंब झाली. अभ्यास करून पास होणे हा प्रकार आता गण्या विसरून गेला होता. आणि राहुलच्या मतेही गण्याचा अभ्यास घेण्यात काही अर्थ नव्हता. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. फसवणूकीचा एक नवीन मार्ग शोधला गेला. गण्याने एका वॉचमनला हाताशी धरून कोर्‍या उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा चोरला होता. परीक्षेच्या दिवशी पेपर चालू झाल्यावर दहा ते पंधरा मिनिटांतच गण्या बाथरूमचे कारण देऊन बाहेर पडायचा. बरोबर एक प्रश्नपत्रिका असायची जी तो पर्यवेक्षकांच्या नकळत एक्स्ट्रा घ्यायचा. बाथरूममध्ये आधीच त्याची वाट बघत असलेल्या साथीदाराला ती सुपुर्त केली जायची. मग तो साथीदार ती प्रश्नपत्रिका घेऊन तडक हॉस्टेलच्या रूमवर यायचा. तिथे त्या चोरलेल्या उत्तरपत्रिकांवर पेपर सोडवायचे काम राहुल करायचा. अर्थात, पहिले पर्यवेक्षकांच्या हस्ताक्षराचे पान रिकामे सोडले जायचे. सोबतीला आणखी दोनचार साथीदार पुस्तके घेऊन बसलेली असायची जी फटाफट उत्तरे शोधून द्यायचे काम करायची. अश्या तर्हेने वेळेच्या पंधरा-वीस मिनिटे आधीच जमेल तितके लिहून ती उत्तरपत्रिका पुन्हा बाथरूमच्या मार्गेच गण्याच्या हवाली केली जायची. त्यानंतर गण्या त्याच्याजवळच्या उत्तरपत्रिकेचे पहिले पान ज्यावर परीक्षागृहात हजर पर्यवेक्षकांनी हस्ताक्षर केलेले असायचे ते काढून या उत्तरपत्रिकेला जोडायचा की झाली नवी उत्तरपत्रिका तयार.

बर्‍यापैकी फूलप्रूफ प्लॅन होता. दररोज पर्यवेक्षक बदलत असल्याने या मुलाला रोजच का बाथरूमला जावे लागते असा संशय येण्यासही फारसा वाव नव्हता. सारे काही सुरळीत चालू होते. पण मागच्या पेपराला गण्याच्या एका मित्रानेही यांच्या नकळत हीच पद्धत वापरायचा प्रयत्न केला जो योग्य नियोजनाअभावी फसला आणि तो पकडला गेला. परीणामी उर्वरीत सत्रासाठी पेपरची वेळ सुरू झाल्यावर कोणालाही परीक्षागृहाच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली.

आता गण्याची खरी पंचाईत झाली होती. विद्यापीठाच्या नियमानुसार अंतिम वर्षात प्रवेश करण्यासाठी आदल्या वर्षीचे जास्तीत जास्त दोन विषय राहिले तरच हे शक्य होते. आणि अजून तीन पेपर बाकी होते. गण्याने स्वताच्या हिंमतीवर तोडकामोडका अभ्यास करून दोन पेपर देऊन पाहिले. पण केवळ औपचारिकता म्हणून तीन तास वर्गात बसून आला होता. शेवटचा पेपर, स्ट्रक्चरल अ‍ॅनालिसिस, ज्यात भल्याभल्यांची भंबेरी उडते. खुद्द राहुल गेल्या वर्षी त्यात कसाबसा पास झाला होता. तिथे गण्यासारख्याचा टिकाव लागणे अशक्यच. गण्या यातही नापास झाल्यास त्याचे अख्खे वर्ष फुकट जाणार होते. गण्याचा मते आता एकच मार्ग उरला होता. त्याचा निर्णय घेऊन झाला होता. राहुल असाही काही त्याच्या शब्दाबाहेर नव्हता. गण्याचे हे वर्ष सुटावे म्हणून त्याने स्वत:ही आतापावेतो इतका आटापिटा केला होता की तो व्यर्थ जाऊ नये म्हणून तो ही या कृत्यात त्याला साथ द्यायला तयार झाला. आधी डमी बसलो, मग एक वेगळीच क्लृप्ती लढवून सार्‍या परीक्षामंडळाला फसवून कॉपी केली आणि आता थेट प्रश्नपत्रिकेचीच चोरी! राहुलला हे सारे थ्रिलिंग वाटले होते. पण आता मात्र मागे वळून पाहताना आपण यात कसे अडकत गेलो हेच त्याला जाणवत होते. बोलताबोलता त्याचा बांध फुटला आणि तो अक्षरश: शाळकरी मुलासारखा रडू लागला. त्याला स्वत:चे हे रूप काही नवीन नव्हते. लहाणपणापासून मस्तीखोर स्वभावामुळे ही वेळ त्याच्यावर बर्‍याचदा आली होती. त्याचे ते वागणे निरागस असायचे. ते रडणे प्रामाणिक असायचे. अगदी आजही तसेच होते.

प्रिन्सिपल सरांचा राग आता बरेपैकी निवळला होता. आवाजाची धार सौम्य झाली होती. मगासपासून जे ताशेरे ओढले जात होते त्याची जागा आता उपदेशपर आणि समजुतीच्या शब्दांनी घेतली होती. पण हा बदललेला नूर फक्त राहुलपुरताच होता. सर गण्यालाही चांगलेच ओळखून होते. हा नासका आंबा पेटीतूनच काय बागेतूनही काढायच्या निर्णयाप्रत ते आले होते. राहुल आता माफीचा साक्षीदार झाला होता आणि आरोपीच्या पिंजर्‍यात गण्या फक्त एकटाच उरला होता.

सरांचे बोलून झाल्यावर राहुलने गण्याकडे किंचित अपराधीपणाच्या नजरेने पाहिले. पण क्षणभरच. दुसर्‍याच क्षणी गण्याचा हातातील लखलखते पाते पाहून त्याचे डोळे विस्फारले. काय घडतेय हे कोणाला समजण्याआधीच गण्या सरांवर झेपावून सपासप वार करू लागला. राहुलने काही हालचाल करेपर्यंत फार उशीर झाला होता. सर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. राहुलला सरांच्या अंगावर ढकलून गण्याने पळ काढला. पण जाता जाता त्याने काढलेले उद्गार राहुलच्या कानात बराच वेळ घुमत राहिले.. “जर मी लटकलो राहुल्या, तर मी तुला पण बरोबर घेऊन लटकणार… तुला पण बरोबर घेऊन लटकणार..”

राहुल आता खरोखरच लटकला होता. सर्वांनी गण्या आणि राहुलला सरांच्या केबिनमध्ये एकत्र जाताना पाहिले होते. ज्या कारणासाठी जात होते त्या प्रकरणात दोघेही गुंतले होते. जर सरांवर हल्ला करायची कल्पना एकट्या गण्याचीच होती हे कोणाला माहित होते तर ते फक्त प्रिन्सिपल सरांना, जे राहुलच्या समोर जमिनीवर निपचित पडून होते. जिवंत होते की मृत हे कळायला मार्ग नव्हता. त्यांना आता असेच सोडून आपणही पळ काढावा की बाहेर जाऊन कोणाकडे तरी मदत मागावी, राहुलला काहीच सुचेनासे झाले. पुन्हा एकदा त्याने स्वत:च्या दोन थोबाडीत मारून पाहिल्या, कदाचित आपण या दु:स्वप्नातून बाहेर पडू या आशेने.. पण असे काही होणार नव्हते हे त्यालाही माहीत होते. जे घडतेय ते सत्य आहे आणि हि आपल्या कर्माचीच फळे आहेत, जी कधी ना कधी आपल्याला भोगावीच लागणार होती हे तो समजून चुकला होता. बाहेरील लोकांचा आवाज कानावर पडत होता. वर्दळ वाढत होती. दुसर्‍याच क्षणी कोणीही इथे येण्याची शक्यता होती. बंद दरवाज्याच्या पलीकडून एक आवाज आणखी आणखी जवळ येतोय असे जाणवले तसे राहुलच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. पाठोपाठ तोच आवाज.. रन राहुल रन… रन राहुल रन… पण यावेळी मात्र हा आवाज आपल्या अंतर्मनातून न येता कोणीतरी परकीच व्यक्ती आपल्या कानात पुकारतेय असे वाटत होते. हा आवाज, हा सल्ला आपल्या भल्यासाठी आहे की आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे हे त्याला समजेनासे झाले. पण आता त्याचा विचार करायची वेळ टळून गेली होती. पर्याय एकच होता.. रन राहुल रन..

जसे दरवाजा लोटून कोणीतरी आत आले तसे राहुलने सरळ त्याला धडक देत बाहेरच्या बाजूला धाव घेतली. पाठीमागून येणारा धडपडल्याचा आवाज.. शिवीगाळ.. गोंधळ.. सारे आवाज आता चोहीकडून येत आहेत असे त्याला वाटू लागले. धावता धावता राहुल कॉलेजच्या गेटबाहेर पडला. कदाचित कायमचाच! मागे वळून एकदा कॉलेजला बघून घ्यावे अशी इच्छा तर होत होती पण हिंमत होत नव्हती. कॉलेजशी असलेले सारे बंध केव्हाच तुटले होते.

तो मॅकेनिकल ईंजिनीअरींगचा क्लासरूम, शेवटचा बाक, बाकावर बसून म्हटलेली गाणी. कधी याची खेच, तर कधी त्याला उकसव. कधी अचानक एखाद्या कठीण प्रश्नाचे उत्तर देऊन सरांना चकीत करणे आणि दाखवून देणे की बॅकबेंचर्सही काही कमी नसतात. अगदीच बोअर लेक्चर असेल तर मागच्या मागेच पळ काढणे. एखाद्या मित्राला आपली हजेरी लावायला सांगणे आणि स्वत: मात्र जिममध्ये जाऊन कॅरम खेळणे. यात कधी पकडले जाणे आणि मग शिक्षा म्हणून एखादी असाईनमेंट लिहिणे. ती लिहिण्यासाठी होस्टेलवर मित्रांसोबत नाईट मारणे. तिथेच पत्त्यांचा डाव रंगणे आणि रात्रभर जागूनही पुर्ण झाली नाही म्हणून तीच असाईनमेंट दुसर्‍या दिवशी सकाळी कॅंटीनमध्ये लिहित बसणे. लिहितानाही अर्धीअधिक नजर जवळपासच्या मुलींवर असणे आणि तरीही त्यांच्यावर ईंप्रेशन मारण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष न देता अभ्यास करतोय असे दाखवणे. सरते शेवटी असाईनमेंट पुर्ण केल्याचा आनंद आणि तो साजरा करण्यासाठी मागवलेली कटींग चहा… सार्‍या सार्‍या आठवणी कडवट झाल्यासारख्या वाटत होत्या.

बसस्टॉपवर बसून राहुल स्वताशीच विचार करत होता. या सार्‍याच्या पार्श्वभूमीवर त्याला गण्याचे शेवटचे शब्द आठवत होते. आजपर्यंत राहुलने जे केले होते ते केवळ गण्याच्या मैत्रीखातर, गण्याच्या भल्यासाठी. पण काम निघून गेल्यावर तो मात्र पलटला होता. आणि यात काही नवल नव्हते. तो गण्याचा स्वभावच होता. जो राहुलला माहित असूनही तो त्याच्याबरोबर राहायचा कारण यात त्याचा स्वत:चाही स्वार्थ लपला होता. कॉलेजमधील चार मुले त्याला गण्याचा खास माणूस म्हणून जी इज्जत द्यायची ती त्याला गमवायची नव्हती. पण आज जे घडले होते त्याने मैत्री आणि संगत यातील फरक त्याला स्पष्ट झाला होता!

अजूनही त्याच्या कानावर कुठून तरी तेच शब्द ऐकू येत होते, रन राहुल रन.. रन राहुल रन.. सकाळपासून तो धावतच तर होता. थकला होता तो आता. पळून पळून कुठे जाणार होता. एका मुलाच्या हक्काच्या अश्या दोनच जागा असतात. एक घर आणि दुसरे कॉलेज. त्यातील दुसरी तर त्याने गमावली होती. आता जे काही होईल त्याला सामोरे जायचे असे ठरवून राहुलने घरी परतायचा निर्णय घेतला.

घरासमोर थांबलेली पोलिस वॅन बघून तो काय ते समजला. अश्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही. असेही त्याचे नाव संशयितांच्या यादीत सर्वात वरचे होते. सरांवर झालेल्या हल्ल्यात त्याचा हात नव्हता हे केवळ त्यालाच ठाऊक होते. तरी काही ना काही करून आपण ते पोलिसांना पटवून देऊ अशी पुसटशी आशा होती. पण घरच्यांचा गमावलेला विश्वास तो कसा परत मिळवणार होता. वडीलांची भेदक नजर आज त्याला लाचार वाटत होती. काही झाले तरी त्यांचा मुलगा आजवर त्यांचा अभिमान होता. ‘पापा कहते है बडा नाम करेगा..’ कसले नाम आणि कसले काय! आज त्यांच्या मुलाने त्यांना बदनाम केले होते. दादा देखील वडीलांप्रमाणेच मान खाली घालून उभा होता. मोठ्या भावाच्या नात्याने राहुलच्या प्रती असलेली आपली जबाबदारी घेण्यात आपणही कुठेतरी कमी पडलो ही अपराधीपणाची भावना त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकत होती. आजी आजोबांची आपलीच काहीतरी बडबड चालू होती. आपला नातू चुकीचे काम करूच शकत नाही हा त्यांचा विश्वासच नाही तर श्रद्धा होती. या सर्वात आई मात्र कुठेच नव्हती!

राहुलची नजर घरभर आईला शोधू लागली. आज त्याला सर्वात जास्त गरज तिच्या कुशीची होती. पण तीच कुठेतरी हरवली होती. सकाळपासून त्याची पाठ सोडत नसलेला तो चितपरीचित आवाज, “रन राहुल रन..” तो तेवढा आता पुर्णपणे थांबला होता. कितीही पळालो तरी परत फिरून आपल्याला आपल्या माणसांतच यायचे असते हे कदाचित त्याच्या अंतर्मनाला उमगले होते. इतक्यात एक दणकट बांध्याचा पोलिसवाला त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आणि राहुलला अचानक परिस्थितीचे भान आले. आता त्याला फक्त खरे आणि खरेच बोलायचे होते. पण आता त्याच्या खरेपणावरही कोणाला विश्वास बसत नव्हता. जिथे जन्मदात्या आईवडीलांचा विश्वास गमावला होता तिथे परके त्याच्या शब्दांवर कसे विश्वास ठेवणार होते. ते ही पोलिसवाले, ज्यांना फक्त पुराव्याचीच भाषा समजते. राहुल परत परत तेच सांगत होता जे खरे होते, पण पोलिस काहीएक ऐकून घ्यायला तयार नव्हते. राहुल अगदी रडकुंडीला आला, पण त्यांना राहुलच्या तोंडून तेच ऐकायचे होते जे त्यांना स्वत:ला अपेक्षित होते. राहुलकडे सांगण्यासारखे आणखी वेगळे असे काहीच नव्हते, ना गण्या या वेळी कुठे आहे हे त्याला माहीत होते. सरते शेवटी त्या पोलिसमामांचा संयम तुटला आणि त्यांनी राहुलच्या एक खाडकन कानाखाली वाजवली.

…… तसा राहुल ताडकन उठून बसला. पुढचे काही वेळ तो तसाच गालावर हात ठेऊन बिछान्यात बसला होता. त्याचा विश्वास बसायला किंचित वेळच लागला की हे सारे स्वप्न होते.

डोक्यावर गरगर फिरणारा पंखा आता बरेपैकी निवळला होता. तसा तो ऊठला आणि पुन्हा एकदा ड्रॉवर उघडला. पुन्हा एकदा त्यातील लिफाफा बाहेर काढून आतील पेपर चेक केले. सारे काही जागच्या जागी होते. खिडकीतून सुर्याच्या कोवळ्या किरणांनी आत प्रवेश केला होता. त्या प्रकाशात घर बर्‍यापैकी उजळून निघाले होते. केलेल्या चुकीचे प्रायश्चित कबुलीजबाब देऊन करायची हिंमत आपल्यात नाही हे त्याने स्वत:शी कबूल केले होते. पण आपल्याला या लिफाफ्याची विल्हेवाट लावायची आहे एवढे त्याने नक्की केले. गण्याला कदाचित हे कधीच मान्य होणार नव्हते. कदाचित त्यांच्या मैत्रीचाही हा शेवट असणार होता. पण राहुलला मात्र आज मैत्रीची खरी परिभाषा समजली होती. त्याचा हा निर्णय गण्याचेही हितच बघणार होते. भले आज गण्याला हे पटले नाही तरी एक दिवस आपल्यासारखी त्यालाही जाग येईल हा विश्वास होता. एक शेवटचा द्रुढनिश्यय केल्याच्या आविर्भावात राहुलने दीर्घ श्वास घेतला. तो लिफाफा बॅगेत भरला आणि ती खांद्यावर लटकवून घराबाहेर पडला…!

–x— समाप्त –x–

दोन शब्द – आयुष्य म्हटले की त्यात एखादे दु:स्वप्न हे आलेच. आपलेच आपण स्वत:ला कितीही चापट्या मारल्यासारखे केले तरी जाग मात्र तेव्हाच येते जेव्हा समोरून कोणीतरी येऊन आपल्या कानाखाली जाळ काढतो. पण ती वेळ का येऊ द्यावी? कथेतल्या राहुलला तर जाग आली. आता आपली वेळ आहे. तुमच्या घरातही असा एखादा राहुल असेल. तुम्ही स्वत: असाल, तुमचा भाऊ असेल किंवा तुमचा मुलगा असेल. तर त्याला वेळीच जागे करा. नाहीतर एक दिवस त्याच्यावरही अशीच वेळ येईल…. रन राहुल रन… रन राहुल रन…!!

– तुमचा अभिषेक

 

उकिरडा (एक लघुकथा)

प्लास्टीक चेंडू – ३.५० रुपये,
रबरी चेंडू – ८ रुपये,
टेनिस चेंडू – २० रुपये …..
एक अद्रुष्य बोर्ड, माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवत तरळत होता. खिशात चाचपून पाहिले एक फुटी कौडी नव्हती. कंपासपेटीत नाही म्हणायला दोन-अडीज रुपयांची चिल्लर असावी. ती ज्या कामासाठी राखून ठेवली होती ते तर आता राहिलेच, त्यात वरतून दिड-दोन रुपये टाकून कसेबसे साडेतीन बनवले तरी प्लास्टीक चेंडूसाठी पोरे ऐकणार नव्हती. टेनिसचा चेंडू फोडला होता, तर किमान रबराचा तरी भरून द्यावा लागणार होता. तसेही आधीच मला कोणी खेळायला घ्यायचे नाही. टेनिसचा चेंडू म्हटले तर नाहीच नाही. सर्वांनी आपापल्या खिश्याला एक-दोन रुपयांची चाट मारून पैसे उभारले होते, दिवाळीच्या सुट्टीचे सात-आठ दिवस मैदानात नुसता कल्ला करायला… आणि मी पैल्याच दिवशी चेंडू फोडला होता!

आमच्या गल्ली क्रिकेटचे नियम देखील चक्रम होते. ज्या फटक्यावर चेंडू फुटायचा तो डेड बॉल न ठरवता फटका मारणार्‍याला बाद ठरवले जायचे. बहुतेक याला कारण मीच होतो. बारीक असलो तरी काटक होतो. मनगटी ताकदीच्या जिवावर असले काही खणखणीत फटके मारायचो की बस्स रे बस! १० तील ८ चेंडू माझ्याच फटक्यांवर फुटायचे. आणि उरलेले २ खिळखिळे करण्यातही ९० टक्के वाटा माझाच असायचा. सगळे मला थंड घेत जा म्हणून नेहमीच समजवायचे. मी देखील स्वत:ला बरेचदा समजवून पाहिले होते. पण एकदा का चेंडूवर नजर खिळली आणि फटके व्यवस्थित बसू लागले की नकळत माझ्या अंगात संचारू लागायचे.. मग बस्स रे बस! चेंडू फुटण्यापेक्षा स्वता फुटू नये म्हणून पोरं मला घाबरायची. म्हणून माझा राग राग करायची. माझ्या बॅटींगला फिल्डींग सोडून लांब लांब पळायची. माझे फटकेही असेच लांब लांब जायचे. समोरच्या छपर्‍यावर चेंडू आदळला की ६ धावा मिळायच्या. त्या पलीकडे या खेळात धावा मिळत नाहीत. आणि तरीही मी चेंडू छपराच्या पार पलीकडे भिरकाऊन द्यायचो. छपरापलीकडे एक अर्धवट बंद पडलेली कंपनी होती. चेंडू घरंगळत तिच्या गटारात जाऊन पडायचा. गटार म्हणजे दोन चौकोनी खोल्यांच्या आकाराचा पसरट नालाच. तिथे बॉल गेला कि मग तो गेलाच! म्हणून ज्या छपर्‍याला चेंडू लागल्यावर षटकार मिळायचा, त्यापेक्षा जास्त जोराने फटका मारून छपरा पार केला तरी फलंदाज बाद ठरवला जायचा… अन हे सहज जमवू शकणारा सर्व पोरांमध्ये मी एकलाच होतो!

एखाद्या चांगल्या फटक्यावरही बाद व्हावे लागल्याने बरेचदा विचार मनात यायचा, आम्हा गरीबांच्या पोरांसाठी सरकारने दहावीस रुपयांच्या बजेट मध्ये न फुटणारे चेंडू बनवायला हवेत. किंवा जे आहेत तेच दोन-पाच रुपयांना विकायला हवेत. खरे तर मैदानाची सोय झाल्यास बरेच प्रश्न सुटतील. ना बॉल छपर्‍याचा पल्याड जाणार, ना दोन्ही बाजूने पसरलेल्या चाळीच्या भिंतीना आपटत लवकर फुटणार. पण नवीन काहीतरी घडायला हे आधीचे सरकार बदलायला हवे. म्हणूनच कित्येकदा “हा आवाज कोणाचा ..” ओरडत उन्हातान्हात फिरलोय. पण ते लोक सुद्धा गरजू विद्यार्थ्यांनाच वही वाटप करायचे. माझी गरज चेंडू होती.. जणू गरीबांसाठी खेळ म्हटले की मूलभूत गरजांच्या तक्यात पार तळाचा रकाना!

ते राहिलं, पण आता काय. पोरांची समजूत कशी काढू. त्यांना कसं पटवू. आता चिडले अन मला बॉयकॉट केला तर…… पुन्हा खेळणे मुश्किल! स्साली आपली क्रिकेटची कारकिर्द इथेच संपायची. ते काय नाय, आता एकच उपाय. विशल्या म्हणतो तसे नाल्यात उतरायला हवे. कालचा रबरी बॉल अडकलाय तिथे. काढला तर आजच. उद्याला कंपनी सुरु झाली की त्यांचा सफाई कामगार येऊन हडपणार. पण नाल्यात उतरणे सोपे नव्हते. या बाजूने छपर्‍यावर चढून त्या बाजुने पाईपाला लोंबकळत उतरावे लागणार. पोरांची मदत घेत इथून चढलोही असतो. पण तिथून, त्या गंजलेल्या घाणीच्या पाईपाला लटकायचे म्हणजे………… पण माझी खरी भिती वेगळीच होती!

घरी कळता कामा नये. आज्जीला आधीच माझे शेजारच्या वस्तीमधल्या पोरांबरोबर खेळणे आवडायचे नाही. कधी पडलो तिच्या नजरेला तर वरतून करट्या फेकून मारायची. नेहमी तिचा नेम मलाच लागेल असे नाही… हे एक आणखी कारण होते, त्या पोरांना मी खेळायला नको असायचे!

…….

मोठ्या नाराजीनेच पोरे राजी झाली, त्या गटारातील चेंडूवर मांडवली करायला. पण त्यांना माहीत होते, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पैश्याचे सोंग घेता येत नाही हे वयाच्या बाराव्या वर्षी समजलेली पोरे. त्यांच्याकडेही दुसरा पर्याय नव्हता. विशल्यानेच मग घोडा आणून दिला. त्यानेच खालच्या बाजूने पकडला. मी वर चढलो तिथे त्याचे काम संपले. पलीकडल्या बाजूने मलाच पाईपावरून उतरायचे होते. जवळून तो आणखी घाण दिसत होता. आणखी खडबडीत. पण त्या आधी छपर्‍यावर अडकलेल्या दोन पतंगी काढून दिल्या. त्या नादात थोडासा तळहात चिरला. पाईपाचा खरखरीतपणा त्याला आणखी चिरत जाणार याची भिती वाटली. पण सुदैवाने तसे झाले नाही. झाले ते उलटेच. त्या बुळबुळीत झालेल्या पाईपावरून मी घसरतच खाली उतरलो. शर्टाचा वास आता जाणार नव्हता. पण आधी अधाश्यासारखा चेंडू शोधायला लागलो. चारही दिशांना सभोवताल एक नजर फिरवून झाली. एक ओकारी काढून हलके व्हावेसे वाटले. पण ज्या कामासाठी उतरलो होतो त्याला बाजूला सारून काही करायचे नव्हते. एकदा चेंडू मिळाल्यावर बिनदिक्कत चार ओकार्‍या काढल्या असत्या.. पण आधी चेंडू! मूळचा लाल रंग बाटल्याने शोधायला वेळच लागला. पण जेव्हा सापडला तेव्हा मोठ्याने आरोळी ठोकत त्याचा मुका घ्यावासा वाटला!

परतीचा रस्ता बिकट होता. जेमतेम दहा-बारा फुटांचा खडा पाईप. पण जो बुळबुळीतपणा उतरायला मदत करून गेला तोच चढायला त्रास देत होता. पाठीमागे वळून पाहायच्या विचारानेही शिसारी येत होती. सभोवताली बघता चारही भिंती अंगावर आल्यासारख्या वाटत होत्या. मुळातच अंधारी जागा हळूहळू आणखी मावळत होती. इतक्यात चकाक चक् चकाक, आवाज करत एक घूस मला घाबरवत पळाली, तसा उभ्या अंगावर एक काटा सर्रसरला.. खरचटेल, शर्ट मळेल, फाटेल, आज्जीला समजेल, मार पडेल.. विचारांचा गुंता सुटायच्या आधीच मी पाईपाला घसपटत अर्ध्यावर पोहोचलो होतो. चेंडू अगोदरच पलीकडे भिरकावला होता, पाठोपाठ अंगही भिरकावत बाहेर पडलो. विशल्याने पुन्हा छपराला घोडा लावला. उतरताना अंगाचे दुखरेपण जाणवत होते. पण त्यापेक्षा जास्त किळसवाणा होता तो हातापायांचा वास!

शर्टाला शरीरापासून दूर धरत नळाकडे धाव घेतली. पाठीमागे पोरांचा गलका चालूच होता.. भंग्याचे पोर भंग्याचे पोर.. जे आपण नाहीच आहोत त्याची लाज कसली. अंगाची साफसफाई झाल्याशिवाय ते चिडवायचे थांबणारही नव्हतेच.. पण इतक्यात ज्याची भिती होती तेच झाले.. ताड ताड तडाक्.. आकाशातून करट्यांचा वर्षाव होऊ लागला. आज्जीला खबर लागली होती. बघता बघता सारी पोरे पांगली. करट्यांचा नेम चुकवत मी देखील नळाचा आडोसा धरला.

स्वच्छ झालो तसे प्रसन्न वाटू लागले. आता मी आज्जीचा मार खायला सज्ज होतो. आज आज्जी जरा जास्तच भरात होती. बदड बदड बदडला. हातापायांवर नुसते लाललाल वळ. पण मगाशी ज्या अनुभवातून गेलो होतो त्यापुढे हे काहीच नव्हते. आई मात्र उगाचचं आसवे गाळत बसली होती. तिच्याकडे तेवढे बघवत नव्हते. आज्जीला तिची पण दया आली नाही. झोपण्यापूर्वी तिला आईवर डाफरताना पाहिले .. वांझ मेली, कुठला उकिरडा घरात आणलाय देव जाणे.. हे परमेश्वरा.. … … पुढे काय पुटपुटली ऐकू आले नाही. आईने बस्स एक हुंदका देत दिवा मालवला.. मी गटारीत उतरलो म्हणून आज्जी रागाने मला उकिरडा म्हणाली हे समजले.. पण वांझचा अर्थ काय हे आता उद्या आईलाच विचारायला हवे म्हणत मी सुद्धा झोपी गेलो!

– तुमचा अभिषेक

 

किस्सा – ए – गुलबकावली

तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे.

तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच. तरीही ते समोरच्या पार्टीला देताना लागणार्‍या गटसमध्ये मात्र जमीन-अस्मानाचा फरक असल्याने पिवळ्या फुलांचा खप नेहमीच जास्त व्हायचा.

पण यावर्षी मात्र चक्रं पलटली होती. लाल गुलाबांना किंचित जास्त डिमांड आला होता. कारणीभूत होता आमचाच टारगट मुलांचा ग्रूप. एका कमालीच्या सुंदर पण (साहजिकच) तितक्याच घमेंडखोर मुलीला यावर्षी टारगेट करायचे होते. आमच्यातले काळे-सावळे, जाडे-भरडे, लुक्के-सुक्खे, कधी मुलींशी स्वप्नातही गप्पा न मारलेले, एक्कूण एक जण तिला गुलाब भेट करणार होते. ते देखील मैत्रीचे पिवळट नाही, तर देठाला “आय लव्ह यू” ची चिठ्ठी डकवलेले लाल टपोरे काटेदार गुलाब. हेतू एकच, “कोणीही यावे आणि मला प्रपोज करून जावे” असे तिला वाटून तिच्यातल्या अहंकाराची जागा न्यूनगंडाने वा गेला बाजार भयगंडाने तरी घ्यावी.

तर, असे काय झाले होते?
तर, काही खास नाही. आमच्यातल्या एका लोक-अ-प्रिय विद्यार्थ्याला तिने पहिल्याच फटक्यात नकार दिला होता. बरे नकार देताना एखादे मिळमिळीतच कारण दिले असते. “माझ्या घरी असे चालत नाही” पासून “मला माझी करीअर करायची आहे” पर्यंत काहीही खपवून घेतले गेले असते. किमान “आपण चांगले मित्र बनू शकतो” म्हणत मांडवलीच केली असती. पण नाही, “आरश्यात कधी आपले तोंड बघितले आहेस का?” म्हणत पठ्ठ्याचा पार तोंडावरच कचरा केला होता. या उपर तिच्याबद्दल माझे स्वताचेही मत फारसे अनूकूल नव्हते. जेव्हा ती आमच्या वर्गासमोरून जायची तेव्हा व्हरांड्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हातातले सबमिशन बाजूला ठेउन मी नजरेनेच तिला सोबत करायचो. पण त्या मोबदल्यात ती एकदा ढुंकून बघेल तर शप्पथ. आम्ही आसपास घुटमळताना कधी तिच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नव्हती. बस्स आज ती माशी हलताना बघायची होती.

तब्बल १७ स्वयंसेवकांनी या उपक्रमात आपली नावे नोंदवल्यानंतर आता या भाऊगर्दीत हरवून जाता येईल म्हणत अठरावे नाव मी सुद्धा नोंदवले. आम्हा अठरा प्रेमवीरांची नावे ती प्रत्येक चिठ्ठी वाचत पाठ करणार नाही याची खात्री असल्याने या ऐतिहासिक किडेगिरीचा एक भाग होण्याची संधी मी सोडली नाही. आणि तसेही हे फूल स्वताहून नेऊन द्यायचे नव्हतेच. आमच्या कॉलेजमधील हौशी विद्यार्थ्यांची संघटना, जे हे डे’ज वगैरे प्रकार साजरे करतात, तेच याबाबत पुढाकार घेऊन लोकांचे प्रेमसंदेश गुलाबासह इच्छित स्थळी पोहोचवायचे काम करतात, ज्यामागे मुखदुर्बळ आणि लाजर्‍याबुजर्‍या व्यक्तीमत्वांनाही त्यांचे प्रेम मिळावे हा सदहेतू. त्यामुळे या मिशन गुलबकावलीमध्ये आपले नाव नोंदवून आता फक्त गंमत बघायची होती.

सकाळचे लेक्चर आटोपल्यानंतर दुपारची जेवणे उरकून सारे प्रयोगशाळेच्या आवारात जमले. आज त्यांचे कुठले प्रॅक्टीकल आहे आणि योग्य संधी आणि पुरेसा वेळ केव्हा मिळणार याचा अभ्यास आम्ही अगोदरच केला होता. ठिक दिड वाजता त्या गुलबकावलीला पहिले फूल मिळाले. तिने पाहिले, नाव वाचले, प्रमोद आत्माराम माटे ! सोबतीला आम्ही आमच्या पजामा छाप क्लासरूमचे नावही टाकले होते. अर्थातच हा कालपर्यंत अज्ञात असलेला प्रेमवीर आज कोण कुठून उगवला ते तिला समजले नसणारच. मात्र आत्माराम माट्यांची सून होण्यात तिला जराही रस नसल्याने तितक्याच सहजपणे तिने ते फूल बाजूला सारून ठेवले. दोनच मिनिटात दुसरे फूल हजर. तर चौथ्या मिनिटाला तिसरे. पुन्हा तीच तशीच प्रतिक्रिया. फक्त चेहर्‍यावर एखादी आठी जास्त उमटल्याचा भास तेवढा झाला. पुढच्या दहाबारा मिनिटांत एकेक करून सहा-सात फुले तिच्याकडे जमली. आता हळूहळू तिच्या वर्गातल्या आणि आजूबाजुच्या इतर मुलामुलींचे लक्ष या प्रकाराकडे वेधू लागले. सुरुवातीला काही जणांना वाटणार्‍या कौतुकाची जागा, नंतर हेव्याने घेत, आता चेष्टा मस्करीने घेतली होती. आठ-दहा फुलांनतर तर अशी वेळ आली की तिला येणार्‍या प्रत्येक फुलागणिक तिच्याच वर्गमित्रांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. सोबतीला चार शिट्ट्या आम्हा गावगुंडांकडूनही येऊ लागल्या. बघता बघता चिडवाचिडवीचा असा काही माहौल बनला की एका चुकीच्या पद्धतीने आपण सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनलो आहोत याचा संताप तिच्या चेहर्‍यावर झळकू लागला.

आमचा कोटा अठरा फुलांचा होता, मात्र चार-पाच फुले शिल्लक असतानाच तिचा संयम सुटला आणि ती आतापावेतो मिळालेली सर्व फुले एकत्र गोळा करत ती मोकळ्या जागेत आली. इथून दोन बाजूंना इमारती होत्या, तर एका बाजूला उपहारगृह. आधी जी गोष्ट चार-चौदा लोकांसमोर घडत होती ती आता चारशे डोळ्यांना दिसणार होती. प्रकरण आतल्या बाजूला जात दडपायच्या ऐवजी ती चव्हाट्यावर घेऊन आली होती, याचा अर्थ आता काहीतरी गोंधळ घालायचा विचार तिच्याही मनात होता. अरे देवा, प्रिन्सिपॉल वगैरे कडे तक्रार गेली तर मेलो असा विचार पहिल्यांदाच मनात आला. पण सुदैवाने माझे नाव असलेले गुलाब अजून तिच्यापर्यंत पोहोचले नव्हते, रांगेतच होते. पण तिचा असा काही विचार नव्हता. तिने ती सारी फुले खाली मातीत टाकली आणि आम्हा सर्वांकडे बघून तशीच सॅंडल घातलेल्या पायाने कुस्करू लागली. जणू या सॅंडलने तुमचे गालच रंगवतेय बघा असा आवेश तिच्या चेहर्‍यावर होता. सोबतीला म्हणून लगोलग तिच्या दोन जिवलग मैत्रीणी आल्या आणि कश्यात काय नाय तरीही आपला पाय, त्या फुलांवर साफ करून गेल्या.

तिच्या या अघोरी कृत्याने आता पुन्हा एकदा वातावरण पलटले होते. जणू वादळानंतरची शांतता !
पण इथेच अजून एक ट्विस्ट बाकी होता..

एवढा वेळ गर्दीच्या पार मागे गंमत बघत उभा असलेलो मी सावकाशपणे पुढे आलो. त्या कुस्करलेल्या फुलांना हळूवारपणे उचलले आणि त्यावरची माती झटकत त्यांना साफ करू लागलो. डोळ्याच्या कडेने एक तिरपी नजर तिच्या हालचालींवर होतीच. हा त्यांच्यातलाच एक म्हणत माझे नावगावही माहीत नसताना ती माझ्याशी तावातावाने भांडायला आली आणि आईशप्पथ … त्या दिवशी मी राजेंदरकुमारची अ‍ॅक्टींग तोडली! तिचा आवेश पाहता ती माझ्या कानाखाली गणपती नाचवणार इतक्यात मी उत्तरलो, “माफच कर मैत्रीणी, मी तुला ओळखतही नाही मग तुला प्रेमाचे फूल देणे तर दूरची गोष्ट. मी एक वृक्षप्रेमी आहे. तुम्हा लोकांच्या भांडणात हि फुले बिचारी धारातीर्थी पडली ते मला बघवले नाही म्हणून उचलायला आलो.” एवढे बोलून मी ती फुले छातीशी कवटाळली. खरे तर माझे बोलणे तिला बकवास वाटले तर होणारे दुष्परीणाम टाळण्यासाठी घेतलेला तो बचावात्मक पवित्रा होता. पण उलट तिचा मवाळ झालेला चेहरा पाहता मी ऐनवेळी सुचलेला आणखी एक डायलॉग चिपकवला जो ऐकून तिचा चेहरा पार पोपटासारखा पडला. म्हणालो, “मैत्रीणी, माझ्यासाठी प्रेम हा शब्द उच्चारताना बाह्य सौंदर्य काऽही मायने ठेवत नाही. पण जी मुलगी रागाच्या भरात का होईना एखादी निष्पाप कळी निर्दयीपणे पायाखाली कुस्करते, त्या मुलीला मी तरी कधी चुकूनही गुलाबाचे फूल दिले नसते…”

अन या संवादफेकीनंतर पुनश्च जोरदार टाळ्यांचा कडकडाट होईल असे मला वाटलेले खरे. पण कसले काय, सारेच ढिम्म. पहिल्यांदा साहित्याची जाण नसलेले मित्र पाळल्याचा पश्चाताप मला झाला. ईतकेच नाही तर मला हिरो बनायचा मौका आला अन काय है दुर्दैव. अचानक पांगापांग सुरू झाली. त्यांचे प्रॅक्टीकल सुरू झाल्याने त्यांची गर्दी ओसरली, लगोलग झाले तेवढे पुरे म्हणत तिनेही काढता पाय घेतला, तर माझे अगोदरच गळपटलेले मित्र एव्हाना दृष्टीच्या पार पलीकडे पोहोचले होते. गुलाबही गेले होते, गुलबकावलीही गेली होती, तर हाती राहिलेल्या पाकळ्यांचे गुलकंदही बनणार नव्हते. इति किस्सा-ए-गुलबकावली संपुर्ण असफल !

– तुमचा अभिषेक

 

 

ए टी एम मशीन !

माणसाची किंमत जिथे पैश्यात मोजली जाते तो हा जमाना. तिथे एटीएम मशीन म्हणजे वजन काटा. त्यातून खडखड आवाज करत बाहेर पडणार्‍या कोर्‍या करकरीत नोटा तुमचे आजचे वजन. पाठोपाठ तुमची समाजातील पत लिहून येणारी बॅंकबॅलन्स स्लीप. आठ हजार रुपये मी काढले होते आणि शिल्लक जमा तिच्यावर दाखवत होती तब्बल चार लाख, चौसष्ट हजार, आठशे सतरा रुपये. आजची तारीख तेवीस. पगाराला आठवडा बाकी. तो झाला की हा आकडा सव्वापाचच्या घरात. महिन्याभरात मोठा खर्च न आल्यास पुढच्या महिन्याअखेरीस मी पाच लाखाच्या क्लबमध्ये हक्काने विराजमान होणार होतो. हा हिशोब लावतच मी बाहेर पडलो तर समोर तोच तो मगासचा रखवालदार.

“क्या टाईम हुआ साहबजी?” …… मी एटीएममध्ये प्रवेश करत असतानाचा त्याने घोगर्‍या आवाजात विचारलेला प्रश्न!
स्साला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता हा आवाज. बहुतेक कॉलेजच्या वॉचमनचा. पण त्याचा बांधा याच्यापेक्षा दणकट होता. हा त्यामानाने किरकोळ दिसतोय. रंगही तुलनेत उजळ. छ्या, काय करायचे आहे अंदाज लाऊन. तसेही रात्रपाळीचे सारे वॉचमन सारखेच. थंडीपासून बचाव करायला तोंडाला मफलर गुंडाळला की त्या आडून सार्‍यांचाच आवाज तोच तसाच घोगरा. मफरलचा रंगही काळानिळा नाहीतर करडा. छ्या नको बोलूनही डोक्यात वॉचमनचाच विचार. यावेळी दुसरा विचार तरी कोणाचा येणार होता डोक्यात…

रात्री साडेअकराची वेळ. ऑफिसच्या कामानिमित्त चेंबूरला पहिल्यांदाच जाणे झाले होते. कुठल्याश्या गल्लीबोळातून रिक्षावाल्याने स्टेशनला आणून आदळले आणि त्याच्या डुर्र डुर्र करत पुन्हा स्टार्ट केलेल्या रिक्षाचा आवाज पार होईपर्यंत ध्यानात आले की आजूबाजूला एखाद दुसरी पानपट्टी, त्यावर लागलेले उत्तर भारतीय लोकसंगीत आणि त्या तालाला काटशह देत रस्त्यापलीकडे भुंकणारी कुत्री. एवढाच काय तो आवाज. बाकी भयाण शांतता. माणसाला माणसाचीच जाग लागते. नाहीतर ती स्मशानशांतता.

समोर स्टेशनचा ब्रिज होता, पायथ्याशी तिकीटघर. माझा मध्य रेल्वेचा पास या हार्बर लाईनला कामाचा नव्हता. किमान कुर्ल्यापर्यंत तरी तिकीट काढावे लागणार होते. सुटे पैसे आहेत की नाही हे चेक करताना आठवले पाकिटात पैसे जेमतेमच उरले आहेत. शंभराच्या दोन नोटा आणि काही चिल्लर. आपल्या इकडचे एकमेव एटीएम मशीन सकाळी नादुरुस्त होते. आतापर्यंत कोणी हालचाल केली नसल्यास आताही जैसे थे च असणार होते. खरे तर याचीच संभावना जास्त होती. पण मग इथे रात्रीच्या वेळी एटीएम शोधणे तसे धोक्याचेच. पानपट्टीवर एटीएमची चौकशी म्हणजे दरोड्याला आमंत्रण. पण काय ते नशीब. पानपट्टीकडे नजर टाकतानाच त्याच रस्त्याला पुढे बॅंक ऑफ बरोदाचा प्रकाशफलक झगमगताना दिसला. यावेळेस लाईट म्हणजे नक्कीच एटीएम असणार.

पानपट्टीवरून पुढे पास होताना आता गुलझारसाहेबांची गझल ऐकू आली. वाह! क्षणात पानवाल्याची आवड बदलली होती. काय तो अंदाज. होठो से छू लो तुम.. हे गुलझार की जावेद. काय फरक पडतो. पुढे या बाजूला जरा जाग दिसत होती. स्टेशनबाहेर पडणारा एक रस्ता पुढच्या अंगाला होता, जो लोकांच्या सवयीचा असावा. पूलावरून येण्यापेक्षा फाटकाचा वापर सोयीचा असावा. इथे थोडीफार वर्दळ होती. एटीएमच्या आत देखील होती. मी रिकामेच समजून आत शिरायला दरवाजा ढकलणार तोच तो आतूनच उघडला गेला. लडखडतच एक स्वारी बाहेर पडली. आत शिरल्यावर त्या लडखडण्याचे कारण सांगणारा उग्र दर्प नाकात थोडावेळ दम करून गेला. बाहेर वॉचमनशी थोडीफार हुज्जत घातल्याचा आवाज. कदाचित उगाचच. तो आवाज शांत झाला तसे मी कार्ड काढून मशीनमध्ये सरकावले. बटणे दाबत असतानाच किती पैसे काढायचे याचा हिशोब डोक्यात. सहा हजारांची गरज आणि वर दोनेक हजार खर्चाला. म्हणजे टोटल आठ हजार!

पैसे पडतानाच मोजत होतो.. एक दोन तीन चार, पाच सहा सात आठ .. सवयीनेच ! मान्य एटीएम कधी चुकत नसावे. पण जिथे पैश्याचा संबंध येतो तिथे बापावर विश्वास ठेऊ नये. हे तरीही एक मशीनच .. दहा अकरा बारा तेरा, चौदा पंधरा आणि सोळा ! पाचशेच्या सोळा कडक नोटा, मात्र शंभरचे सुट्टे न आल्याने चरफडलोच जरा.

पैसे व्यवस्थितपणे पाकिटात कोंबत वेळ न दवडता बाहेर पडलो तर तिथे नेक्स्ट कस्टमर लाईनीत हजर होताच. मुंबई शहर, लाखो करोडोंची उलाढाल. पैसा इथून तिथे नुसता खेळत राहतो तिथे या पैश्याच्या यंत्राला कशी उसंत मिळणार. त्याची घरघर सदैव चालूच. बाहेरचा वॉचमन मात्र आता खुर्चीत बसल्याबसल्या थोडा पेंगू लागला होता. मगाशी वेळ त्याने यासाठीच विचारली असावी. त्याची डुलकी काढायची वेळ झाली असावी. हातात घड्याळ न घालता, घडोघडी वेळ चेक न करता, रात्र कशी निघत असेल त्याची. त्याचे तोच जाणे. आजूबाजुची सारी दुकाने एकदा बंद झाली की रात्रीचे बारा काय आणि दोन काय. शेवटची ट्रेन तेवढी जाताना टाईम सांगून जात असेल, आणि त्यानंतर सकाळी मॉर्निंग अलार्म द्याला तीच पुन्हा येत असेल. पण सुरक्षिततेच्या कारणास्तव ठेवलेला वॉचमन, त्याच्याकडे साधा मोबाईल नसावा. त्यात असते की घड्याळ. कि उगाचच विचारायची म्हणून विचारली वेळ, रात्रीचे कोणी बोलायला मिळत नाही म्हणून, काहीतरी विषय काढायचा म्हणून… ” ओये भाईसाब ….” ईतक्यात पाठीमागून एक चौकडीचा शर्ट घातलेला, दाढीवाला माणूस हाका मारत, कदाचित मलाच पुकारत, माझ्या अंगावर धाऊन येताना दिसला आणि मी एक हात पॅंटच्या मागच्या खिशात ठेवलेल्या पाकिटावर घट्ट ठेऊन सावध पावित्रा घेतला.

तो काय बोलत होता हे त्याच्या गावंढळ हिंदीच्या उच्चारांवरून समजत नव्हते. पण तो मला एटीएम जवळ पुन्हा यायला सांगत होता. काहीतरी गोंधळ झाला असावा तिथे. वोह पैसा आपका है क्या? हा एवढा एकच प्रश्न माझ्या डोक्यात शिरला. प्रश्न पैश्याचा असेल तर ते कसेही डोक्यात शिरतेच.

गडबड होऊ शकत होती. यामागे डावही असू शकत होता. रात्री बाराचा सुमार, अनोळखी जागा, एटीएम मशीनच्या जवळ, फक्त ’तो’ ‘मी’ आणि तिसरा तो रखवालदार. त्यातही त्या दोघांच्या आपापसातील संबंधाबद्दल मी अनभिज्ञ. दूर नजर टाकली तर मगाशी दिसणारी वर्दळ पार मावळली होती. कदाचित ट्रेनच्या येण्यानेच त्या भागाला थोडीफार जाग येत असावी. ट्रेन गेली आणि पुन्हा सामसूम. पण स्टॅडला लागलेल्या रिक्षांमध्ये अंधार असला तरी बहुतेक त्यात चालक झोपून असावेत. हाकेच्या अंतरावरच होते, जर तशीच गरज लागली तर…

मला बोलावणारा माणूस एव्हाना एटीएम जवळ परतला होता. तिथे त्याचे वॉचमनशी बोलणे चालू होते. वॉचमनच्या हातात होती एक कोरी करकरीत पाचशेची नोट. एक बेवारस नोट जिच्यावर कदाचित माझा मालकीहक्क असावा अशी त्यांना शंका होती. आणि इथे मलाही त्यांच्या हेतू वर शंका घेण्यास पुरेसा वाव होता.

ईतक्यात स्टेशनमधून ट्रेनच्या भोंग्याचा आवाज ऐकू आला म्हणजे पुढचा काही वेळ तरी या परिसराला पुन्हा जाग येणार होती. काय प्रकरण आहे हे आता बघायला हरकत नव्हती. पाचशेची नोट अशी स्वस्थ बसू देणार नव्हती. जवळ पोहोचलो तर अजूनही त्याचे वॉचमनशी हुज्जत घालणे चालूच होते. म्हणजे कदाचित ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते. निदान तसे दाखवत तरी होते. खरे खोटे देवास ठाऊक, पण अजूनपर्यंत सारे काही ठिक होते. सारे काही सुरक्षित होते. आलबेल !

त्या दाढीवाल्याने वॉचमनच्या हातातून पाचशेची नोट खेचून माझ्यापुढे सरकावली जी त्याला एटीएम जवळ सापडली होती. त्याच्या आधी पैसे काढणारा मीच होतो, तर ती नोट माझीच असावी या सरळ हिशोबाने तो ती नोट माझ्या हवाली करत होता. मात्र वॉचमनची याला आडकाठी होती. कारण हा काही नोट माझीच असल्याचा सबळ पुरावा नव्हता. सारा प्रकार माझ्या लक्षात आला होता. तरीही यामागे काहीतरी वेगळाच डाव असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आजच्या तारखेला एवढा प्रामाणिकपणा. पचायला जरा जडच. पण विचार करायला वेळ कोणाला होता. त्या नोटेने एक भुरळशी घातली होती. मगाशी खडखडत एटीएममधून बाहेर पडणार्‍या नोटा माझ्या स्वताच्या होत्या. निघणार्‍या प्रत्येक नोटेगणिक माझे बॅंकबॅल्न्स घटत होते. पण हि मात्र फुकट होती. विनासायास मिळणारा पैसा. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मिळणारा फ्री हिट. कसाही उडवा कसाही टोलवा. कोणाला नको असणार होता असा पैसा.

मगाशी आलेल्या ट्रेनमधील लोकांचा एक गुच्छा एव्हाना स्टेशनाबाहेर पडला होता. तर तितकेही भितीचे कारण नव्हते. आतापर्यंत सारे काही ठिक होते. सारे काही सुरळीत होते. आलबेल !

………. पण आता ती नोट मिळवायची कशी याबाबत माझे विचारचक्र सुरू झाले. ती नोट माझी नव्हती हे मला ठाऊक होते. समोरचा माणूस कसलीही चौकशी न करता मला देण्यास तयार होता. मात्र वॉचमनने घेतलेल्या आक्षेपानंतर त्याने मला माझ्याजवळचे पैसे मोजून खात्री करून घेण्यास सांगितले. मी पाकिटातून पैसे काढून त्यांच्यासमोर मोजणार, मग ते आठ हजार भरणार, मी चुरगाळून फेकलेली पावती त्या एटीएमच्या जवळच पडली असणार आणि ती पडताळून बघायची बुद्धी दोघांपैकी कोणाला झाल्यास मी आठच हजार काढले होते हे त्यांना कळणार. बस्स, इथे काहीतरी चकमा देणे गरजेचे होते.

पाकिटातून पैसे मोजायला म्हणून बाहेर काढताना मोठ्या चलाखीने मी त्या बंडलातील एक नोट खाली सरकवून ते उचलले. आता माझ्या हातात पंधरा नोटा होत्या. आठ हजार मी एटीएममधून काढले हे मी स्वताहून डिक्लेअर करून झाले होते. कोणी त्यावर आक्षेप घेतला असता मगाशी चुरगाळलेली पावती मी स्वता शोधून त्यातला आठ हजारांचा आकडा दाखवू शकलो असतो. आता फक्त पंधरा नोटा मोजून दाखवायची औपचारीकता पुर्ण करायची होती.

एक दोन तीन चार .. पाच सहा सात आठ … नोटा मोजताना हात थंड पडल्याचे जाणवत होते. कसली ती हुरहुर. कसला तो आनंद. पाच सहा सात आठ .. नऊ दहा अकरा बारा… कोणी हातातून खेचून सहज पळून गेले असते एवढ्या अलगद आणि बेसावधपणे मी त्या नोटा मोजत होतो. नऊ दहा अकरा बारा .. तेरा चौदा… चौदावी नोट मोजताच माझा चेहरा खर्रकन उतरला. त्या खाली नोटच नव्हती. पाकिटात होती ती पंधरावी नोट आणि सोळावी समोरच्याच्या हातात. ती बेवारस नोट माझी स्वताचीच आहे हे समजले तसे पाचशे रुपयांचे नुकसान झाल्याची भावना मनात दाटून आली. एवढे वाईट तर कदाचित माझे पाचशे रुपये हरवल्यावर देखील वाटले नसते जेवढे ते परत मिळताना वाटत होते. खिन्नपणेच मी ती नोट माझी आहे म्हणत त्याच्याकडून स्विकारली.

पाठीमागे मात्र वॉचमनची अखंड बडबड अजूनही चालूच होती. किती बोलतो हा माणूस. त्याने कदाचित माझ्या बरोबरीनेच नोटा मोजल्या होत्या. त्याला काय कसला हिशोब अजून लागला नव्हता देव जाणे. माझ्याकडे ग्यारंटी म्हणून माझा फोन नंबर मागत होता. मागाहून कोणी या नोटेवर आपला मालकी हक्क सांगायला आला तर कसलाही लफडा व्हायला नको हा यामागचा हेतू. मी ना हुज्जत घालण्याच्या मनस्थितीत होतो ना संवाद वाढवण्याच्या. त्याने माझा नंबर टिपायला मोबाईला काढला तसे मी माझा रटलेला नंबर बोलायला सुरूवात केली.. एट टू फोर फाईव्ह .. डबल एट .. सेव्हन एट .. स्साला कोण हा ? .. याला का देऊ मी माझा नंबर.. ? शेवटचे दोन आकडे मी मुद्दामच चुकीचे दिले.

पलटून पाहिले तर एव्हाना तो दाढीवाला माणूस निघून गेला होता. त्याने त्याचे पैसे काढले होते, त्याचे काम झाले होते आणि माझे कवडीमोलाचे धन्यवाद स्विकारण्याचीही तसदी न घेता तो आपल्या मार्गाला पसार झाला होता. आता मला स्वताचीच लाज वाटू लागली होती. त्याचा प्रामाणिकपणा डोळ्यात खुपू लागला होता. जगाला प्रामाणिक माणसे का नको असतात याचे कारण समजत होते.

एकच काय ते चांगले होते, अजूनपर्यंत सारे काही ठिक होते. सारे काही सुरक्षित होते. आलबेल !

फक्त मला माझी किंमत समजली होती … जास्तीत जास्त पाचशे रुपये !!

……………………………………………………………………
………………………………………..
……………………..

दुसर्‍या दिवशी जाग आली तोच मावशीच्या हाकेचा आवाज. सोन्या काल रात्री तू चेंबूरवरूनच आलास ना?

का? काय झाले?

हि बातमी बघ ….

न्यूज चॅनेलवर खालच्या बाजूला एक पट्टी सरकत होती ..
क्षुल्लक कारणासाठी डोक्यात दांडा घालून बळी — फक्त पाचशे रुपयांसाठी रखवालदाराने गमावला जीव — एटीएम मशीनच्या बाहेरच आढळला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह — आरोपीच्या शोधासाठी पोलिस तपासणार एटीएम मशीनचे रेकॉर्ड …….. एटीएम मशीनचे रेकॉर्ड …… पोलिस तपासणार …

बस्स पुढचे काही वाचवले नाही…

मी धावतपळतच बेडरूममध्ये आलो. दार लाऊन घेतले. कडी घट्ट लागलीय याची खात्री केली आणि थरथरत्या हातांनीच पाकीट काढून सार्‍या नोटा पुन्हा एकदा मोजायला घेतल्या. एक दोन तीन चार .. पाच सहा सात आठ… मनात विचारांचे नुसते काहूर माजले होते. हात कालच्यापेक्षा जास्त थंड पडले होते. नऊ दहा अकरा बारा .. तेरा चौदा पंधरा सोळा… आता फक्त हात गळून पडायचे बाकी होते. कारण अजूनही एक नोट हातात शिल्लक होती. ती सतरावी होती.. सतरा म्हणजे खतरा.. तब्बल साडेआठ हजार रुपये. म्हणजे काल हिशोबात मी कुठेतरी चुकलो होतो. म्हणजे ती नोट माझी नव्हतीच. याचा अर्थ………..

आता काहीच ठिक नव्हते. काहीच आलबेल नव्हते. आता माझी किंमत …. काहीच उरली नव्हती !

– तुमचा अभिषेक

 

 
१ प्रतिक्रिया

Posted by on एप्रिल 24, 2014 in लघुकथा

 

ए फ्यांड्री SSSS ईई ..

अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली..

“ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या..” तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली.

यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.

फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा.

दुसर्‍याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, “काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?”

तर म्हणला कसा, “अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे ….. ”

थोडावेळ मला काय बोलावे आणि कोणत्या टोनमध्ये बोलावे समजेणासे झाले..
तरी उत्तरलो,
“म्हणजे तू सुद्धा एखाद्या जातीला आपल्यापेक्षा खालची मानतोस तर….. मग काय फरक राहिला??

आता निरुत्तर व्हायची पाळी त्याची होती.

– o0Oअण्ड्या

 

बदला

दूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्‍या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती. पण तसा कसलाही नकारात्मक विचार करण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. पाठी वळून बघायची जराही हिंमत होत नव्हती. त्या नादात धावायचा वेग कमी होणे देखील मला परवडणारे नव्हते. मात्र हळूहळू तो आवाज अजून जवळ येतोय हे जाणवत होते. धुळीचे उठलेले लोट आणि त्या जनावरांचा वास आता सभोवतालच्या वातावरणात जाणवू लागला होता. मी आणखी मरणाच्या आकांताने धावू लागलो. पाय तुटून मरणे मला पसंद होते, धावता धावताच छातीतून एक कळ येणे मंजूर होते, पण त्यांच्या तावडीत मला पडायचे नव्हते. फार कमी लोकांना मृत्युला अगदी जवळून बघायची संधी मिळते पण मला ती साधायची नव्हती. पण नाही, आता कुठल्याही क्षणी पाठीमागून आपल्यावर कोणीतरी झडप घालणार असे मला वाटले तेव्हा मी माझ्याच मृत्युचे एक शेवटचे दर्शन घ्यायला मागे वळलो आणि……………….

ती सारी जनावरे माझ्या ओळखीचीच होती. सर्वात पुढे होता तो एक बोकड. धष्टपुष्ट निगरगट्ट सोकावलेला अन माणसाच्या रक्ताला चटावलेला बोकड, अन पाठोपाठ त्याच्याच जातभाई बोकडांचा भला मोठा कळप. तोंड असे कोणाचे नजरेस पडतच नव्हते कारण प्रत्येकाने आपली मान खाली घातली होती. मला काही दिसत होते तर ती भाल्यासारखी रोखली गेलेली त्यांची धारदार शिंगे जी सुसाट वेगाने माझ्याच दिशेने येत होती, बस्स काही क्षणांतच माझ्या देहाच्या चिंधड्या उडवत आरपार जाणार होती. पण त्याही पेक्षा जास्त भयानक दिसत होती ती रानडुकरांची टोळी. बेफामपणे आपले सुळे मिचकावत चौफेर उधळली होती. त्यांच्या धावण्यात जराही लयबद्धता नव्हती अन याचीच मला जास्त भिती वाटत होती कारण तश्याच बेशिस्त प्रकारे मी त्यांच्या पायदळी तुडवला जाणार होतो. अचानक एक जनावर त्यामध्ये उठून दिसू लागले ज्याचा आकार पाहता माझे पाय लटपटायचेच बाकी होते. पीळदार बांध्याचा, गोलाकार आणि टोकेरी शिंगांचा एक मस्तवाल बैल, ज्या वेगाने आक्रमण करून येत होता, त्याचा एक हलकासा धक्का देखील मला यमसदनाला धाडण्यास पुरेसा होता. त्याच्या पायाशी घुटमळणार्‍या रानसश्यांच्या लालबुंद निखार्‍यांसारख्या डोळ्यात देखील रक्त उतरलेले दिसत होते. जणू आज मला कुरतडून खायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवावे अशीच इच्छा त्या नजरेत दिसत होती.

या सर्व जनावरांच्या फौजेबरोबर काही कोंबड्या देखील आपले जळके पंख फडफडवत उडत येत होत्या. जणू गिधाडांप्रमाणे माझ्या मृत देहाचे लचके तोडायचे काम या करणार होत्या. काही क्षणासांठी माझा स्वताचच छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह माझ्या द्रुष्टीपटलावर तरळून गेला आणि मी पुन्हा मान पुढे वळवून, ते द्रुष्य नजरेसमोरून हटवून, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने पळत सुटलो. तरीही पाठीमागून ऐकू येणारा कोलाहल काही कमी व्हायचे नाव घेत नव्हता. मानवी शरीर म्हणजे काही मशीन नव्हते, कधी ना कधी पाय साथ सोडणारच होते. आणि मला त्या आधी पोहोचायचे होते, एका सुरक्षित स्थळी.

इतक्यात अचानक डोळ्यासमोर पाण्यासारखे काहीतरी तरळले. भास निश्चितच नव्हता तो. नजरेच्या टप्प्यात असलेले नक्कीच ते एक जलाशय होते. मला चांगलेच पोहता येत होते, अन कदाचित या प्राण्यांना येत नसेल तर सुटकेची ती एक आशा होती. याच आशेने नवीन बळ दिले. आता माझ्यासमोर एक निश्चित लक्ष्य होते. मला त्या जलाशयापर्यंत पोहोचायच्या आधी कोसळायचे नव्हते. पुढचे काही क्षण, काही मिनिटे, अन युगे मी कसलीही गणिते न मांडता धावत होतो. जलाशय आता अगदी शंभर पावलांवर आले होते. मात्र मागच्या जनावरांचा वेग अजूनही मंदावल्याचे जाणवत नव्हते. याचा अर्थ असा तर नाही की ते सुद्धा माझ्यापाठोपाठ पाण्यात शिरणार होते. पण हा विचार करायला आता वेळ नव्हता, मागे पलटायचा मार्ग तसाही नव्हताच. फार फार तर जलसमाधी झाली असती, एखादे जलाशय माझ्या रक्ताने रंगल्यास निसर्गाला काही फरक पडणार नव्हता. काठ जवळ आला तसे बुळबुळीत शेवाळांत माझा पाय सरकून मी जलाशयाच्या दिशेने वेगाने घसरू लागलो. जेवढी घाई मला त्या जलाशयापर्यंत पोहोचायची झाली होती त्यापेक्षा जास्त आतुरता बहुधा जलाशयाला माझी लागली होती. कुणास ठाऊक, कदाचित तिथेच माझा शेवट लिहिला असावा.

स्वतावर ताबा नसलेल्या अवस्थेत मी वेगानेच सरपटत त्या थंडगार पाण्यात प्रवेश करताच एवढा वेळ पाठीमागून चाललेला कल्ला अचानक थांबला आणि एका वेगळ्याच शांत जगात शिरल्यासारखे मला वाटू लागले. पाय सुन्न पडले होते ते एवढी घोडदौड केल्यामुळे कि त्या थंडगार पाण्याचा हा करीष्मा होता माहीत नाही, पण पाण्याच्या पृष्ठभागावर स्वताचे शरीर मी पलंगावर अंथरलेल्या चादरीसारखे भिरकाऊन दिले होते. एका निवांत अवस्थेत लागलेली समाधी होती ती. पण काही काळच, अचानक कुठुनशी सुळसुळत चंदेरी माश्यांची फौज माझ्या अंगावर तुटून पडली आणि माझ्या शरीराला लक्ष्य लक्ष्य सुयांसारखी टोचू लागली. बांगडा, सुरमई, हलवा, पापलेट, माश्यामाश्यांमधील फरक मी कधीच ओळखू शकलो नव्हतो, आणि आताही ते जमत नव्हते. सारेच एकसमान वाटत होते, सारे तेवढेच हिंस्त्र भासत होते. त्यांच्या वेड्यावाकड्या तीक्ष्ण दातांनी माझ्या चामडीची केलेली चाळण, आता मी देखील त्यांच्यासारखाच एक खवल्याखवल्यांचा प्राणी बनत चाललो होतो. वेदनेचा कळस होता तो. मी त्यांना जितके भिरकाऊन द्यायचा प्रयत्न करत होतो तेवढी पाठाहून नवी कुमक त्यांना मिळत होती. आता मला जमिनीचे वेध लागले होते. दूरवर किनारा दिसत होता मात्र तिथवर पोहायची शक्ती कुठून आणनार होतो. इथवर जे झुंजलो ते आता हार मानायची नव्हती. पुन्हा उरलेसुरले बळ एकवटून मी किनार्‍याच्या दिशेने हातपाय मारू लागलो. अंगाशी जलचरांची झोंबाझोंबी चालूच होती. जलाशयाने अखेर माझे रक्त खरोखरच चाखले होते. किनारा जवळ आला तसे एकेक करत अंगावरचे मासे गळू लागले, अन पुन्हा हलके हलके वाटू लागले. पण एव्हाना हातापायातली शक्तीने उत्तर दिले होते. शेवटी एका जोरदार लाटेबरोबरच मी बाहेर फेकलो गेलो.

खरखरीत रेती माझ्या खुरदडलेल्या अंगाचे आणखी सालटे काढत होती मात्र तिला मागे सारून मी आता काठावरच्या खडकांतून वाट काढत मार्ग आक्रमू लागलो. इथून पुढे कुठच्या दिशेला जायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती. कदाचित पुढे मार्ग नव्हताच. माझा शेवट इथेच होता. सुर्य भर डोक्यावर तळपत होता आणि अंगावरून ओघळणारे रक्तमिश्रित पाणी पायाखालच्या सावलीत मिसळत होते. शेवटी अंगातले त्राण संपल्यावर एका खडकाचा आधार शोधत मी तिथेच विसावलो, तसे त्याच खडकाच्या फटीतून सरसर करत काही खेकडे माझ्यावर धाऊन आले. मोजून चारपाचच असावेत मात्र आता एखाद्या छोट्याश्या कोलंबीशीही झुंजण्याची ताकद माझ्यात शिल्लक नव्हती. मी तिथून उठणार तोच त्यांनी माझे पाय पकडून पायाच्या दोन्ही अंगठ्यांचे करकचून चावे घेतले. पायातना निघालेली कळ भणभणत थेट मस्तकात गेली आणि अखेर मानवी सहनशक्तीचा अंत झाला तशी मला जाग आली !

.
.
.
.

उगवला वाटते सुर्य, चल ब्रश कर पटकन आणि आंघोळ आटोपून घे, आज जेवणात तुझ्या आवडीची सुरमई फ्राय आणि कोलंबीचे सार आहे, सोबत आत्येने पाठवलेली मटण बिर्याणी पण आहे. गरमागरम खायचे असेल तर आवर लवकर….. आईची हाक कानावर पडली !

खरेच भयंकर होते ते सारे .. !

ब्रश नुसता दातात धरून किती तरी वेळ तसाच बेसिनच्या कठड्याचा आधार घेत उभा होतो. ईतक्यात आईने कूकर उघडला आणि बिर्याणीच्या वासाने भूक चाळवली. तसे लागलीच दांडीवरचा टॉवेल खेचून मी बाथरूमच्या दिशेने कूच केले .. बदला घ्यायची पाळी आता माझी होती !!

……………..
एक हाडाचा मांसाहारी,
तुमचा अभिषेक

 

फिर मिलेंगे भाईजान..

 

गेले वर्षभरात बदललेला हा चौथा डॉक्टर. आजाराने पुन्हा उचल खाल्ली होती. बारावीला चांगले मार्क काढले असतेस तर डॉक्टरच बनवला असता तुला, असे आई कित्येकदा बोलायची, अन माझ्याजागी एखाद्या नर्सशीच लग्न का केले नाहीस असे बायको वरचेवर सुनवायची. म्हणूनच का माहीत नाही एखाद्या डॉक्टरकडे गेल्यास माझी पहिली नजर नर्सेसवरच भिरभिरते. अगदी आजही भिरभिरत होतीच, हॉस्पिटलच्या आवारात शिरल्यापासूनच. इतरवेळी रोगट वाटणार्‍या वातावरणात बघण्यासारखे एक तेच तर असते. बस्स भिरभिरतच होती नजर, अन अचानक अडकली. दुरूनच येताना तिला पाहिले ते अगदी दहापावलांवर येऊन समोरच्याच रिसेप्शनिस्टच्या खुर्चीत बसेपर्यंत माझा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कि हि तीच ती होती. किती वर्षे झाली असावीत, चार, सहा, सात.. कि माझा भास होता तो.. पण तिची नजर माझ्यावर जाताच चमकली, क्षणभरासाठी.. अंह अगदी चार सहा क्षणांसाठी अडकली. तेव्हा थोडीफार खात्री पटली. ती तीच होती.

ह्म्म, तीच तर होती ती.. कॉलेजला होतो मी तेव्हा. अपेंडिक्सचे ऑपरेशन निघाले होते. सरकारी हॉस्पिटल अन त्याचे मोठमोठाले जनरल वॉर्ड, चांगली गोष्ट एवढीच की स्वच्छता पुरेशी होती, अन पुरेसे अंतर राखून दूरदूर पसरलेल्या खाटा. त्या खाटांमधून वाटा काढत फिरणारे शिकाऊ डॉक्टर, मागोमाग शिकाऊ नर्सेस.. रंगरुपाने सरकारी इस्पितळाला साजेश्याच.. अर्थात, तोवर तिला नव्हते ना पाहिले मी..!

छोटेसेच तर ऑपरेशन होते, अपेंडीक्सचे.. सुरळीत पार पडले तरी दोनचार दिवस तिथलाच पाहुणचार घ्यायचा होता. मात्र शेजारचे वर्षानुवर्षे तिथेच पडून असल्यासारखे पेशंट पाहता हे दोनचार दिवस कधी एकदा संपतात असे झाले होते.. पण हे वाटणे त्या दिवसापुरतेच होते.

संध्याकाळच्या राऊंडला पहिल्यांदा मी तिला पाहिले. माझी अ‍ॅनेस्थेशियाची गुंगी बर्‍यापैकी उतरली होती, सुस्ती तेवढी होती, अन अशक्तपणा.. तरीही झोपल्या झोपल्या मान वळवून, नजर इथे तिथे भिरभिरत होतीच. काही गोष्टी लांबूनही छान दिसतात अन जवळूनही तितक्याच आकर्षक. ती यापैकीच एक होती. अगदी वॉर्डाच्या त्या टोकापासून या टोकाला माझ्याच दिशेने येत होती, तिथूनच नजर हटायला मागत नव्हती. एका रेषेत अन लयबद्ध चालीत, टिपिकलच असा नर्सचा पेहराव, पांढरट रंगाचा, पण तिला खरेच शोभत होता. तिच्या गोर्‍यापान पायांच्या सौंदर्याला, स्कर्टचा तोकडेपणा, जरा जास्तच खुलवत होता. अन या सर्वांवर हटकून जाणारे, काजळात कोरलेले डोळे, बघताच क्षणी थेट काळजात शिरत होते. पायाला कंप फुटायचा बाकी होता जेव्हा ती अगदी माझ्याच खाटेजवळ येऊ लागली. खाटेजवळ काय, ती माझ्याजवळच आली. अन हातातली काचेची नळी माझ्या आ वासलेल्या तोंडात खुपसली. थर्मामीटर होते ते बहुतेक, आज नक्कीच चुकीची रीडींग देणार होते..

मोजून तीन-साडेतीन मिनिटे ती तिथे होती, मोजून तीन-साडेतीन वेळा माझी पापणी फडकली असावी. पण ती मात्र जशी आली तशी निघून गेली, कदाचित हे असे घडण्याची तिला सवयच असावी.

बस्स तेवढेच तिचे दर्शन. तेव्हढीच तिची ड्यूटी असावी. रात्री कुठे दिसली नाही. रात्र तिच्या आठवणीत तळमळण्यातच जायची होती पण थकलेले शरीर कि औषधांचा असर, मेल्यागत झोप लागली ते सकाळी दहालाच डोळे उघडले. इथपासून पुन्हा संध्याकाळची वाट बघायची होती.

संध्याकाळी मात्र पुन्हा ती आली. त्याच वेळी, त्याच दिशेहून. पेहराव देखील तोच तसाच. जणू कालचाच अ‍ॅक्शन रिप्ले घडल्यासारखे. पण आज काही वेगळे घडवायला हवे होते. काय ते समजत नव्हते. हसलो फक्त.. मी एकटाच.. अन ती रीडींग घेऊन निघून गेली. तिला पाठमोरे जाताना मी नुसते बघत होतो. दूरवर दरवाज्यापर्यंत जाईपर्यंत तिला सोबत करत होतो. अगदी शेवटाला ती पलटली अन थेट माझ्याच दिशेने पाहिले. माझी नजर पकडली गेली होती. ती पुन्हा वळली, अन माझ्याच रोखाने येऊ लागली. जसजशी जवळ येत होती, तसतशी छातीतली धडधड वेगाने वाढत होती. नक्की काय म्हणून परत फिरली आहे याचा विचार करेकरेपर्यंत ती पोहोचली देखील. अन माझ्या खाटेजवळच विसरून गेलेले तिचे रीडींगबूक उचलले. यावेळी मात्र ती हसली. तिच्या हसण्याचे कारण कदाचित वेगळे असावे.. मी मात्र तिचा हसरा चेहरा, तिचे आणखी एक रूप, तिची आणखी एक अदा डोळ्यात साठवून घेतली.

रात्र पुन्हा गाढ झोपेत गेली मात्र सकाळी लवकरच जाग आली. चालाफिरायची ताकद अंगात आली होती. ती जमेल तितकी वापरत होतो. दोन दिवस आंघोळ नव्हती, पण आज हातपाय आणि तोंड स्वच्छ धुवायचे होते. त्याआधी आरसा पाहिला आणि स्वतालाच स्वताची किळस आल्यासारखे झाले. दाढीची वेडीवाकडी वाढलेली खुंटे आणि विस्कटलेले राट केस, भरीस भर म्हणून आत गेलेली गालफडे अन निस्तेज चेहरा, धुतल्यावर मात्र जरा फ्रेश वाटू लागले. दोन दिवसांच्या अशक्तपणाची भरपाई व्हावी इतपत जेवण दुपारी हादडले. आता मी संध्याकाळची वाट बघत होतो. आज तिला माझे गेल्या दोन दिवसांसारखे ओंगळवाणे रूप दिसणार नव्हते, या विचाराने चेहरा जरा जास्तच खुलला होता. पण रात्र येईपर्यंत तो कोमेजला जेव्हा मी तिची वाट बघतच राहिलो आणि आलीच नाही.. नाही म्हणायला संध्याकाळी एक दुसरी नर्स आली होती, जी माझी रिडींग घेऊन निघून गेली, पर उसमे वो बात कहा..

त्या रात्री झोप ठिकठाकच लागली, पण स्वप्नात मात्र ती पुन्हा पुन्हा येत होती अन माझ्या तोंडात थर्मामीटर देऊन जात होती. पहाटेपर्यंत हेच चालू होते, कदाचित म्हणूनच स्वप्न खरे झाले असावे.. कारण आज सकाळीच ती दिसली, अन कालच्या तिच्या न येण्याचा उलगडा झाला. तिच्या ड्यूटीची शिफ्ट बदलली होती. हे देखील चांगलेच झाले म्हणा, आज तिचा सकाळचा टवटवीत चेहरा बघायला मिळाला. तसा माझ्याही चेहर्‍यात आता बराच तजेलदारपणा आला होता. कदाचित याचाच परीणाम असावा, वा तिला माझे तिच्याकडे सतत बघणे समजले असावे, अन ते आवडलेही असावे, कारण तिने इतर पेशंटची चौकशी करत असताना बरेचदा माझ्याकडे वळून वळून पाहिले होते. नजरेचे संकेत आता दोन्हीकडून येऊ लागले होते. तो तिचा चेहरा अन ती तिची नजर, माझ्यासाठी हॉस्पिटलमधील मृगजळच होते ते..

अन ती रात्र आली..! आयुष्यातील अविस्मरणीय अशी एक रात्र..! रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही असे म्हणतात ते कशाला हे त्या रात्री समजले. आज तर पापण्यांनाही फडफडायची बंदी होती. कारण आज तिची नाईट शिफ्ट होती. आज रात्रभर ती माझ्यासमोरच बसणार होती. अगदी हाकेच्या अंतरावर, दोन वार्डांच्या कॉमन पॅसेजमध्ये, जिथून दोन्हीकडच्या पेशंटवर नजर ठेवता यायची.. पण बघत मात्र ती माझ्याकडेच होती. आज रात्रभर जागे राहून तिची हिच ड्यूटी होती. मग मला तरी कशी झोप लागणार होती.

हॉस्पिटलच ते, रात्री दहा-साडेदहालाच सर्वांची निजानीज झाली. अकरा-साडेअकरापर्यंत सारे ठार. फक्त तीन व्यक्ती जाग्या होत्या. अर्थातच एक मी, एक ती आणि एक तिच्या जोडीने सिनिअर नर्स असावी जी माझ्या पाठमोरी बसली होती, वा तिने मुद्दामहून ती तशी बसेल याची काळजी घेतली असावी. माझे तिच्याकडे बघणे वा तिचे माझ्याकडे बघणे हे बघायला म्हणून आता तिथे तिसरा कोणीही नव्हता. हातात घड्याळ नव्हते, ना भिंतीवरचे रात्रीच्या अंधारात दिसत होते, मात्र वेळ सरकताना जाणवत होती, जशी रात्रीची नीरव शांतता आणखी आणखी गडद होत होती. तास, दोन तास किती वेळ उलटत होता याचे भान नव्हते, पण मी तिच्या दिशेने कूस वळवून तिलाच बघत झोपलो होतो अन ती अधूनमधून माझ्याकडेच नजर टाकत बसली होती. मध्येच पाचेक मिनिटांसाठी उठून ती इथेतिथे जायची तो तेवढा वेळ जीवावर यायचा, या वेळेत झोप तर नाही ना लागणार चुकून हि भिती वाटायची. हे नजरेनजरेतील मूक संभाषण आज मला पुर्ण रात्रभर चालवायचे होते.

मध्यरात्री कधीतरी तिच्या बरोबरची नर्स उठून कुठेतरी निघून गेली. किती वेळासाठी माहित नाही पण हिच ती वेळ काहीतरी करण्याची, धाडस करून आणखी एक पाऊल टाकण्याची. काय करावे, उठून जावे का सरळ तिच्याजवळ.. पण ते धोकादायक होते.. ती जिथे बसली होती तिथली लाईट चालू असल्याने त्या भागात तेवढा उजेड होता, मध्येच कोणाही पेशंटला जाग आली असती, तर माझे तिथे असणे लगेच दिसण्यात आले असते. याउलट आत वॉर्डमध्ये तुलनेत अंधारच होता. तिलाच बोलवावे का इथे ??

जास्त विचार करायला वेळ नव्हता, तिच्या बरोबरची नर्स कधीही परतण्याची शक्यता होती. एक पेशंट म्हणून मी काही कामासाठी एका नर्सला नक्कीच बोलावू शकत होतो. तिचीही नजर माझ्यावरच लागलेली, आता आपण दोघेच इथे आहोत या जाणिवेने तिचीही चुळबुळ चालू होती. आणि अश्यातच मी तिला हात दाखवला..

किंचितसे अनपेक्षितच होते ते मला, पण ती तडक उठली आणि माझ्या दिशेने येऊ लागली. हुरहुर, भिती, थरार, छातीतली धडधड, रोखलेला श्वास, गारठलेले हात आणि पायाच्या तळव्यापासून गुडघ्यापर्यंत जाणारी थंड शिरशिरी.. असह्य होऊन तिला परत जायला सांगावे तर ते देखील जमेनासे झाले होते. इतक्यात मागाहून कसलीशी चाहूल लागली. तिच्याबरोबरची सहकारीण परत जागेवर आली होती. तिच्याही ते लक्षात आले होते. अन मी तिला उगाचच हाक मारलेली, हे देखील समजले होते. माझ्याकडे न बघताच जवळच्या ड्रॉवरमध्येच काहीतरी खुडबुड करायचे नाटक ती वठवू लागली. थोडेसे सुरक्षित वाटू लागताच मगाशी अचानक भरलेली हुडहुडी आता निवळू लागली होती. त्या अंधार्‍या वार्डात, रात्रीच्या समयी, तिचे माझ्या जवळपास असणे मी हळूहळू अनुभवायला लागलो होतो. तिचे माझ्यापासून तीन साडेतीन फूटांवर असणेही नकळत मला उब देऊन जात होते.

दोनचार मिनिटांचा वेळ घालवून ती परतली, बरोबरच्या नर्सला काय कारण सांगितले ठाऊक नाही, पण तिला कसलाही संशय आला नसावा, तिने मागे पलटून तरी पाहिले नाही.. पण हि मात्र माझ्याकडे तशीच बघत होती.. किंबहुना नजरेतली आर्तता यावेळी वाढल्यासारखी वाटली.. अन अश्यातच पहाट झाली.

उजाडताच ती तिच्या इतर कामांना निघून गेली. कदाचित आता घरीच गेली असावी असे समजून मी झोपायचा प्रयत्न केला, मात्र जी रात्रभर आली नव्हती ती आता सकाळच्या कोलाहलात काय येणार होती. झोपलो नाही हे बरेच झाले कारण साधारण नऊ-दहाच्या सुमारास ती परत आली. ड्यूटी संपवून घरी परतायच्या आधी एखादा राऊंड मारायचा म्हणून सहजच… की माझ्यासाठी.. बहुधा माझ्यासाठीच.. माझ्या खाटेजवळ येऊन हलकेच बोलून गेली.. “काल एका मुलाला रात्रभर झोप लागली नाही असे दिसतेय…” असे म्हणत खट्याळपणे हसत निघून गेली.. अन मी मात्र दिवसभर तिच्या या वागण्याबोलण्याचा अर्थ लावत बसलो होतो.

काल रात्री झोप नव्हती, आज दिवसभरात नव्हती, आजही रात्री तिची ड्यूटी असल्यास आज रात्रीचेही काही खरे नव्हते. जागायचे ठरवले तरी तब्येत साथ देईल याची खात्री नव्हती, अन झोपायचे ठरवले तर उद्या सकाळीच मला डिसचार्ज मिळणार असल्याने तिच्या सहवासातली हि शेवटची रात्र ठरणार होती.

तिची रात्रपाळी होती की नाही माहित नाही मात्र ती संध्याकाळी तुलनेने लवकरच आली होती. माझ्या जवळपासच वावरत होती मात्र माझ्याशी नजर चोरत वागतेय की काय असे जाणवत होते. एकदोनदा नजरानजर झाली तशी पटकन इथे तिथे नजर वळवली. मध्ये मी एकदा माझ्या रूटीनप्रमाणे फेर्‍या मारत असताना अचानक आम्ही एकमेकांना सामोरे आलो तशी कावरीबावरी झाली, अन हसत, अंह थोडीफार लाजतच निसटली. काल रात्रीनंतर आजचा दिवस तिनेही माझ्याच विचारांत घालवला असावा हे तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

जेवण झाले तसे मला झोप येऊ लागली, मात्र शक्य तितके वेळ जागायचे होते. म्हणून मी पुन्हा पाय मोकळे करायला इथेतिथे भटकू लागलो. नजर अर्थातच, तिलाच शोधत होती. हॉस्पिटलाला साजेशीच रात्रीची शांतता सर्वत्र पसरली होती. उजवीकडचे वॉर्ड फिरून झाल्यावर मी डावीकडे मोर्चा वळवला. तेथील पहिल्याच वार्डाला लागून असलेल्या राखीव जागेतल्या टेबलाजवळ खुर्ची सारून ती एकटीच बसली होती. तिची सिनिअर हेड, मेट्रन की काय म्हणतात ते, कोणी नव्हते जवळपास. बस्स हिलाच तर संधी म्हणतात, जी साधायची होती. तिच्याशी संवाद साधायची संधी. एका नवीन नात्याची सुरुवात करायची संधी. पण संवादाची सुरुवात नेमक्या कोणत्या शब्दात करायची. अजूनही मन द्विधा अवस्थेतच होते, पण पावले मात्र ठाम होती. ती केव्हाचीच वळली होती.. काय बोलावे, काहीतरी विचारावे, पण नेमके काय.. पाणी मिळेल का, टॉयलेट कुठे आहे, औषधपाणी, डॉक्टरांची चौकशी.. क्रिकेट मॅचचा स्कोअर तर नक्कीच विचारणार नव्हतो, बस एवढेच ठाऊक होते.. जे सुचेल ते विचारू, नाहीच जमले तर हसूनच परत येऊ, ती देखील नक्की हसेल. दोन दिवसांची ओळख आहे, नजरेनजरेतील.. अन कालची रात्र.. काही न बोलता हसलो तरी रागवायची नाही, हसूनच प्रतिसाद मिळेल, खात्री होती. यांच विचारात तिच्या जवळ पोहोचलो अन इतक्यात तिनेच माझे नाव पुकारले, न हसता, सहजच.. कालपासून डोक्यात घोळत होते, जेव्हा तिच्याशी बोलायला जाईन, अगदी पहिल्यांदा, तेव्हा तिला काय हाक मारायची, ती मला काय हाक मारेन, अन अचानक समोरूनच हा धक्का. किती गोड वाटले असे, तिच्या तोंडून स्वताचेच नाव ऐकायला..

समोर रजिस्टर घेऊनच बसली होती, माझे नाव पत्ता अन व्यवसाय.. अंह व्यवसाय कसला त्या वयात, शिक्षणाची नोंद होती त्यात. मी सध्या ईंजिनीअरींग करतोय हे तिनेच मला सांगितले. सांगताना कोण कौतुक होते चेहर्‍यावर, जणू मॅट्रीमोनी साईटवरच कोणालातरी हुडकलेय. नाही म्हणायला एका नर्सच्या मानाने जास्तच असावे माझे शिक्षण. पुढे आणखी काही बोलणार इतक्यात…

…..इतक्यात कोणीतरी तिचे नाव घेऊन तिला पुकारले.
सकीना.. हसीना.. रुबीना की झरीन…. की फातिमा !

काय होते ते नाव.. एकदाच ऐकले.. पुन्हा ऐकायची इच्छाच झाली नव्हती.. ना ती संधी साधायची होती.. पावले तिथेच थबकली होती.. अन कानाचे पडदे बंद झाले होते.. आपसूकच..!
एक मात्र मनात राहीलं.. मराठी छानच बोलायची.. तेव्हाही आणि आजही..!

“शशीकांत सातारकर… ह्म्म, पुढचा नंबर तुमचाय काका…” नर्सचे प्रमोशन होऊन रिसेप्शनिस्ट झाली होती का.. की आजचा दिवस तात्पुरती जागा घेतली होती.. काय फरक पडत होता..

श्या, किती वेळ झाला, बायको ताटकळून वैतागून चिडचिड करायला लागली होती. मला तेवढे वेळेचे भान नव्हते, पण घड्याळाचा काटा तर सरकतच होता. त्याकडे बघून ध्यानात आले, सव्वा तास उलटून गेला होता. मागाहून आलेले दोनचार जण नाहीशे झाले होते, पण आम्ही मात्र तिथेच होतो.. अन ती समोर..!

कदाचित मला जास्त वेळ बघण्यासाठी म्हणून तर नाही ना ती मुद्दामच माझा नंबर लांबवत होती… की.. की.. तेव्हाचा राग काढत होती.

शेवटी पुकारला गेला नंबर.. तिने माझे नाव पुकारायची हि दुसरी वेळ होती. फक्त यावेळी सोबतीला आडनावही होते. अन कदाचित म्हणूनच, त्यावेळसारख्या गुदगुल्या यावेळी झाल्या नाहीत, की हि बदललेली परिस्थिती होती.

ज्या कामासाठी एवढा वेळ बाहेर वाट बघत होतो ते अवघ्या तीन-चार मिनिटांत उरकले. डॉक्टरची फीज देण्यासाठी म्हणून मी पुन्हा काऊंटरवर आलो. सुट्टे पैसे परत घेताना नजरानजर झालीच.

हसूनच म्हणाली.., फिर मिलेंगे भाईजान..!

मी गोंधळून तिच्याकडे बघतच राहिलो, अन ती मात्र हसली. ते हसणे सूचक होते की नाही हे आता येणारा काळच सांगणार होता. आजारानिमित्त वरचेवर या डॉक्टरकडे येणे होणार होते. बायकोला काहीतरी वाटले म्हणून सहजच विचारले, ओळखीची होती का रे.. मी हो म्हणालो, जुनी तोंडओळख होती.. गाढवा, आधीच ओळख दाखवली असतीस तर नंबर लवकर नसता का लागला.. नेहमीसारखे माझ्या मुखदुर्बळ असण्यावर तोंडसुख घेऊन ती शांत झाली. पण माझ्या मनात मात्र वेगळेच चालू होते.. कदाचित…………

इतक्यात मोबाईल किणकिणला.. पाहताक्षणीच ट्यूब पेटली, मी माझा नंबर हॉस्पिटलच्या रेकॉर्डला म्हणून देऊन आलो होतो.

चेक केले तर मोबाईलवर मेसेज आला होता… फिर मिलेंगे (भाई) जान..!

.
.

– तुमचा अभिषेक

 

एक हरवलेली मैत्री..

वैताग वैताग आहे हा पाऊस, नेमके घरातून बाहेर पडायच्या वेळी दारात हजर. जा रे जा रे पावसा तुला देतो पैसा, पण ऐकतोय कसला. जरा कमी झाला तर निदान रिक्षास्टॅंड पर्यंत तरी जाता येईल. उगाच तेवढ्यासाठी म्हणून छत्री रेनकोट सांभाळायची झंजट नकोय. बाकी एकवेळ ते परवडेल, पण एकदा का हिची कधीपासून सांगतेय गाडी घ्या ची कॅसेट सुरू झाली की गाडी घसरलीच म्हणून समजा. उगाच मूडचा कचरा नकोय. किती दिवसांनी आज मस्त आऊटींग प्लॅन केलीय. मप्टीप्लेक्समध्ये सिनेमा, त्यानंतर मॉलमध्येच थोडीफार विंडो शॉपिंग, डोळे आणि मन भरून पावले की उदरभरणाची सोय जवळच्याच ओपन रेस्टॉरंटमध्ये. नेहमीचे आपले कोपर्‍यातले टेबल आणि इकडच्या तिकडच्या गप्पा.. आज तर सिनेमावरच रंगतील.. शेवटी शाहरुखचा आहे, माझा आवडता तर हिचा नावडता. कशी तयार झाली देव जाणे. बरेच दिवसांनी त्याचा सिनेमा येतोय म्हणून असावे. बाकी या शाहरूखला सुद्धा हल्ली आमीरचेच वारे लागले वाटते. बहुधा आय.पी.एल मध्येच जास्त व्यस्त झाला असावा. पण ही कुठे एवढा वेळ बिझी आहे, “ए चल ग लवकर, किती मेकअप-शेकअप करशील, समोर प्रियांका चोप्रा असताना तुला कोणी बघणार नाहीये तिथे.” .. आह..!! प्रियांका चोप्रा..! तिचे सिनेमात असणे म्हणजे माझ्यासारख्या शाहरूख फॅनला पण बोनसच होता. ट्रेलर मध्ये काय चिकणी दिसत होती बया. सिनेमा बंडल निघाला तरी अर्धे पैसे वसूल याची फुल्ल ग्यारंटी.!

यार, या रिक्षावाल्यांचा पण संप आहे का आज. नको तेव्हा मार्केट मार्केट गणेशनगर गांधीचौक करत अंगावर येतात, पण आज एक दिसेल तर शप्पथ. शाहरूखच्या पिक्चरची स्टार्ट म्हणजे भारताची बॅटींग सुरु असताना सचिन सेहवाग खेळत असलेल्या पॉवरप्लेची पहिली पंधरा षटके. कसेही करून वेळेवर पोहचा पण त्याची एंट्री चुकता कामा नये. तरी नशीब, सहाच डोक्यात ठेऊन निघालेलो पण शोचा खरा टाईम सव्वासहा होता. पाचेक मिनिटे आधीच पोहोचलो. अजून पूर्ण अंधार केला नव्हता म्हणून बरे, जागा शोधायला जास्त त्रास झाला नाही. तसेही बाल्कनीमध्ये प्रिमियर गोल्डच्या फक्त चार रांगा होत्या. आपला कॉलेजच्या जमान्यापासूनचा एक उसूल होता, जर सिनेमा थिएटरातच बघायचा तर मग फुल्ल शानसे नाहीतर केबलवाला झिंदाबाद. हे स्टॉल-बिल मध्ये बसून बघणे आपल्याला कधी जमलेच नव्हते.

अजून जाहीरातीच चालू होत्या. एवढा वेळ हिला सिनेमाची सुरुवात चुकते की नाही याचे जराही टेंशन नव्हते पण आता जाहिराती देखील अश्या आवडीने बघत होती, जणू काही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावरची चलचित्रे बघत होती. माझी नजर मात्र भिरभिरत होती.. नेहमीप्रमाणेच.. सवयीप्रमाणेच.. पुढे कोण बसलेय, मागे कोण बसलेय, कोणाचे डोके तर मध्ये येत नाहिये ना. आपण फॅमिली बरोबर आलो आहोत, बाजूला एखादा टवाळखोर ग्रुप तर नाहिये ना. सिनेमात मन नाही रमले, वा एखादे गाणे नाहीच बघावेसे वाटले, तर सहज नजर टाकायला म्हणून आजूबाजुला एखादे प्रेक्षणीय स्थळ……… अन ईतक्यातच, माझी नजर एका २८-३० वर्षाच्या मुलावर.. अंह.. सद्ग्रुहस्थावर पडली. चेहरा साईड अ‍ॅंगलने ओळखीचा वाटत होता पण प्रकाश पुरेसा नसल्याने खात्रीने सांगता येत नव्हते. शाळा सोडून आज १४ वर्षे झाली होती. त्या नंतरही ३-४ वर्षे प्रसन्ना माझ्या संपर्कात होता. कधीतरी भेटणे व्हायचे, वर्ष सहा महिन्यातून एखादा फोन. पण गेल्या ६-७ वर्षात काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. ते थेट आज दिसत होता. चेहरा बराच बदलला होता त्याचा. कित्येक जण मला बोलायचे, आजही तू सोळा वर्षांचा बछडा वाटतोस यार, पण हा मात्र अकाली प्रौढ झाल्यासारखा वाटत होता. बरोबर एक मुलगी होती. बायकोच असावी. दुसरे काही असण्याची शक्यता नव्हती, आजही तसाच बावळट असणार तो. त्या वयातही एखाद्या मुलीकडे पाहून त्याला कधी काही वाटले नव्हते, तर आता कसल्या मुली फिरवतोय. एक-दोन वर्षापूर्वी त्याच्या लग्नाची बातमी कानावर आली होती. तसा सिद्धूला मेल ही आला होता. लग्न झाल्यावर दहा-एक दिवसाने त्याने चेक केलेला. माझ्याकडे तर त्याचा मेल आय-डी देखील नव्हता. मोबाईलचा तेव्हा जमाना नव्हता. माझ्याकडे तरी बर्‍याच उशीरा आला. मध्यंतरी तो उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलेला, हे ही इथून तिथून कानावर आलेले, त्याचे विमान उडाल्यानंतरच समजलेले. शाळेतील आमच्या ग्रुपमधील माझा सर्वात खास मित्र, पण आज त्याच्याबद्दल मला दुसर्‍यांकडून माहीती मिळत होती. अरे तुझा तो शाळेतला लंबू मित्र, काय नाव त्याचे.. हां.. प्रसन्ना.. आहे कुठे तो सध्या.. असे कोणी विचारले की माझ्याकडे उत्तर नसायचे. मग समोरचाच मला त्याच्याबद्दल काही सांगायचा जे मला माहीत नाही हे कबूल करायला लाज वाटावी.. चलता है, तसे मी तरी आजवर कुठे त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला. या फेसबूक-ट्विटरच्या जमान्यात खरे तर ते सहज शक्य होते. पण नाही जमलं.. दुरावलेल्या नात्यांमध्ये नेहमी समोरून पाऊल उचलले जायची वाट आपण का बघतो.. त्यालाही माझ्याबद्दल इथून तिथूनच समजत असणार आणि तो ही आज माझ्याबद्दल असाच विचार करत असणार, जसे आज मी त्याच्याबद्दल करत होतो..

पण आज… आज मात्र अगदी जवळ बसला होता. पटकन हाक मारावीशी वाटत होती. ते देखील प्रसन्ना न बोलता ‘ए पश्याss फुसक्याs लंबूटांग’ करत ओरडावेसे वाटत होते. भले इतक्या वर्षांनी माझा आवाज ओळखणे शक्य नसले तरी हे शब्द त्याच्या कानी पडताच समजावे की कोणीतरी आपलाच शाळामित्र पुकारतोय. पण ही इच्छा तशीच दाबून ठेवली. समोर सिनेमा सुरू झाला होता. त्याच्याबरोबर त्याची बायको होती. मी सुद्धा एकटा नव्हतो. सिनेमा सुरू झाल्याने एक प्रकारची शांतता जाणवत होती, जिचा भंग करायची हिम्मत माझ्या नव्यानेच बनत चाललेल्या पांढरपेश्या व्यक्तीमत्वात नव्हती. ईतक्यात ही म्हणाली, “बघ रे, आता तुझ्या शारुकची एन्ट्री होईल”. इतरवेळी मी हिला म्हणालो असतो, “चल हट, मी तर प्रियांकाच्या एन्ट्रीची वाट बघतोय.” पण आज नुसतेच ‘ह्म्म’ केले. थोड्याच वेळात थिएटर शिट्ट्यांच्या आवाजाने दणानून उठले. कदाचित झाली असावी एन्ट्री. पण मी मात्र फ्लॅशबॅकमध्ये गेलो होतो.

सहावी ‘ब’ मधून मी सातवी ’अ’ मध्ये प्रवेश केला. वर्ग बदलला तसे वर्गमित्र बदलले. एकाच वर्गातील म्हणून वर्गमित्र नाहीतर मैत्री तशी अजून कोणाशी झाली नव्हती. पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिका देशमुख बाईंनी सर्वांना आपापल्या मित्रांबरोबर हवे त्या जागी बसायची परवानगी दिली. नवीन मुलांमध्ये चटकन मिसळायची सवय नसल्याने मी मात्र एकटाच मागे राहिलो. पश्या त्या दिवशी आला नव्हता. त्यामुळे उरलेसुरले आपापसात या हिशोबाने दुसर्‍या दिवशी बाईंनीच आमची जोडी लावून टाकली. पण हीच जोडी पुढे जाऊन आपल्या डोक्याला ताप होणार आहे याची त्यांनी कल्पना केली नसावी. महिन्याभरातच जैसे को तैसा मिला म्हणत आमचे छान जमले. बंडखोरी ही आम्हा दोघांची वृत्ती नसून स्वभावाचाच एक पैलू होता. शाळेत आपण फक्त शिकायलाच येत नाही यावर आम्हा दोघांचाही ठाम विश्वास होता. शाळा म्हटले की शिस्त आली आणि शिस्त म्हणाले की नियम हे आलेच, पण प्रत्येक नियम हा एकदा ना एकदा तरी तोडलाच गेला पाहिजे हा नियम आम्ही दोघे काटेकोरपणे पाळायचो. आमच्या पुढच्या बाकावर सिद्धेश आणि सुयश बसायचे. जशी आमची एक जोडी तशी त्या दोघांची दुसरी जोडी, अन या दोन जोड्या मिळून आम्हा चौघांची एक चौकडी तयार झाली होती, जी पुढच्या काही महिन्यांतच ‘राजा शिवाजीची चांडाळ चौकडी’ म्हणून सार्‍या स्टाफ मध्ये ओळखली जाउ लागली.

कोणतीही पालकसभा असो, त्यात निघणारी ब्लॅकलिस्ट वा डिफॉल्टर लिस्ट असो, त्यात आमचे नाव नाही असे कधी झाले नव्हते. सातवी ते दहावी या चार वर्षात किमान चाळीस वेळा तरी आम्हा दोघांना एकमेकांचे कान पकडून कॉरिडॉरमध्ये उभे राहायची शिक्षा झाली असावी. आमचा सगळा कारभारच एकत्र चालायचा. रोज सकाळी मी मुद्दाम एक स्टॉप आधी उतरून त्याच्याबरोबर चालत यायचो, तर संध्याकाळी तो माझी बस येईपर्यंत माझ्या स्टॉपवर बसून मला कंपनी द्यायचा. दुपारचे जेवण एकमेकांच्या डब्यात व्हायचे. जगात उष्टे खाणे असा काही प्रकार असतो हे कधी मनालाही शिवले नव्हते. डब्यात एखादा खास पदार्थ असेल तर इतरांपासून लपवून ते आधी एकमेकांना द्यायचो. अश्यावेळी डबा शिक्षकांची नजर चुकवून मधल्या सुट्टीच्या पंधरा मिनिटे आधीच निघायचा. एखादी गोष्ट तुझी माझी असा उल्लेख आमच्यात कधी झालेला आठवत नाही. मग ते पेन-पेन्सिल, वही-पुस्तक वा पाण्याची बाटली का असेना. जेवण झाल्यावर पाणी प्यायलाही एकत्रच जायचो. डबा धुवायला मात्र मैदानाजवळच्या पाणवठ्यावर, जिथून शेजारील मुलींच्या शाळेच्या बिल्डींगवर सहजच नजर टाकता यायची. इथे मात्र तेवढे दोघांचे तोंड दोन दिशेला असायचे. कधी चोरट्या नजरेनेही त्याने तिथे पाहिल्याचे आठवत नाही.

वर्ग चालू असताना एकालाच टॉयलेटला झाली असली तरी दोघेही करंगळी वर करायचो. दादरच्या पूलावर ४-५ रुपयाला भेटणारी पिवळी पुस्तके मागच्या बेंचवर बसून मोठ्या आवडीने वाचायचो. एकदा चौगुले बाईंनी पकडले होते तेव्हा दोघेही ते पुस्तक आपलेच आहे असे बोलत होतो. शेवटी शिक्षा म्हणून दोघांनाही शंभर सुभाषिते लिहावी लागली होती. एखाद्या तासाला दोघांपैकी कोणालाही कंटाळा आला की आमचे वहीचे शेवटचे पान उघडायचे. तिथे फुलीगोळ्या पासून कार्टून काढण्यापर्यंत सारे खेळ चालायचे. ऑफ पिरीअडला वर्गात छापा-काटा करत हळूहळू जुगाराचा अड्डा सुरू करायचे श्रेय सुद्धा आम्हालाच जाते. शिक्षकांसाठी असलेल्या टेबलवर टेबलटेनिस खेळणे हा आम्हा दोघांच्या सामाईक आवडीचा खेळ, अन त्यासाठी कित्येकदा शाळा सुटल्यावर थांबून राहायचो ते शेवटी मामांनी येऊन हाकलवेपर्यंत.

आठवीच्या वर्गशिक्षिका फडणीसबाईंनी, तुमचा मुलगा दुसर्‍याच्या नादाने फुकट जात आहे असे सांगत, दोघांच्या पालकांचे वेगवेगळे कान भरल्याचे आठवतेय. आमच्यात फूट पाडायचा प्रयत्नच होता तो. पण त्या सहामाहीला आम्ही एकत्र अभ्यास करून त्याचे उत्तर वार्षिक निकालात दिले होते. कितीही मस्ती करत असलो तरी अभ्यासात आम्ही बर्‍यापैकी हुशार होतो ही आमची जमेची बाजू होती. मी त्याचा गणिताचा शिक्षक होतो आणि तो माझा इंग्लिश टीचर.

दहावीला असताना माझे पहिलेवहिले प्रेम. आमच्याच शाळेच्या गर्ल्सस्कूलमध्ये शिकणारी ती. जिच्या मागे वर्गातील अर्धी मुले लागली होती. अन म्हणून मी हे कोणालाही सांगितले नव्हते. जे फक्त आणि फक्त या कलंदरालाच माहीत होते. रोज सकाळी तिच्या शाळेत यायच्या वाटेवर ताटकळत थांबणे, संध्याकाळी दोघे मिळून स्टेशनपर्यंत तिचा पाठलाग करने, तिला पटवण्यासाठी म्हणून आमच्याच शाळेत असलेल्या तिच्या भावाची खुशामत करने, आणि सरते शेवटी तिला दादर स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर केलेला प्रपोज. सगळ्या सगळ्यात हा सामील होता. पण शेवटपर्यंत कोणाला थांगपत्ता लागू दिला नव्हता गड्याने. आज याच्या दिसण्याने माझ्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या होत्या.

ईतक्यात थिएटरमध्ये अचानक लाईटस लागल्या. मध्यंतर झाले म्हणून मी हिला म्हणालो, “तू थांब, मी काहीतरी खायला घेऊन येतो”. तसे हिने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि एकाएकी खोखो हसत सुटली. जेव्हा हि अशी बावळटासारखी हसते तेव्हा समजायचे की आपणच कोणतातरी मुर्खपणा केला आहे. आजूबाजूला एक नजर टाकली आणि एकदम ओशाळल्यासारखे झाले. सिनेमा संपला होता. थिएटर खाली होत होते. मध्यंतर केव्हा झाले, सिनेमा केव्हा संपला, नक्की कोणत्या दुनियेत हरवून गेलो होतो मी.. पण लवकरच भानावर आलो, म्हणालो चल पटकन, आपल्यालाही निघायला हवे. बाहेर येऊन चौफेर नजर टाकली, आसपास कुठे दिसला नाही तो. एवढ्या गर्दीत आता शोधू तरी कुठे याला, कुठच्या दिशेने बाहेर पडला असेल. इतक्या जवळ येऊनही भेट नाही झाली तर… मी कावराबावरा होऊन सवयीने नखे चावायला लागलो, आणि अचानक काहीतरी सुचावे तसे झाले.

हिला तिथेच थांबायला सांगून कारपार्किंगच्या दिशेने धावत सुटलो. अपेक्षेप्रमाणे तो दिसलाच. बरोबर वहिनी नव्हत्या. कदाचित त्यांचीच वाट बघत तो उभा होता. का कुणास ठाऊक, पण हेच सोयीचे वाटले. कदाचित त्यांच्यासमोर याला कडकडून भेटायला संकोचच वाटला असता. लांबूनच त्याला हाक मारली, अधीरतेनेच.. एक आरोळी ठोकल्यासारखा आवाज.. ओये पश्याss… त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. माझा हलणारा हात, त्याच्या सहज नजरेस पडावा असा. किंचित रोखून पाहिले त्याने माझ्याकडे, तसे हळूहळू नजरेत ओळखीचे भाव दिसू लागले. तरीही थोडाफार साशंक चेहरा. की मलाच तसे वाटले. क्षणाक्षणाला त्याच्या चेहर्‍यावरचे पलटणारे भाव आणि बदलणारी नजर, की माझाच तो भास होता. त्या क्षणाला असे वाटत होते की जवळ जाऊन आनंदाने चित्कारून त्याला एक कडकडून मिठी मारावी जेणेकरून आजूबाजूच्या सर्व लोकांना समजावे, दोन जिगरी दोस्त आज कित्येक वर्षांनी असे अचानक भेटत आहेत. पण मी जसा त्याच्या जवळ जात होतो तसे आमच्यातील अंतर वाढत आहे असे वाटत होते. त्याच्या चेहर्‍यावर ना आनंद दिसत होता ना आश्चर्य. आलिंगन देण्यासाठी हवेत उठलेले माझे हात माझ्याच नकळत खाली झाले आणि सहज एखादी टाळी देण्यासाठी म्हणून हात पुढे केला. पण समोरच्याला तेही अपेक्षित नव्हते. केवळ औपचारिकता म्हणून आमचे हस्तालोंदन झाले. बोलणे ही जुजबी. त्यातही वहिनी येण्याच्या आधीच मला कटवण्याची घाई दिसून येत होती. वाटले की आपणच विचारावे, वहिनी कुठे आहेत. पण हा लोचटपणा जमला नाही मला. एकेकाळी आमची मुले देखील आमच्यासारखेच एकमेकांचे जिगरी दोस्त झाले पाहिजेत अशी स्वप्ने बघितली होती आम्ही, पण आज एकमेकांच्या परिवाराची साधी चौकशी करण्यात रस नव्हता. अजूनही काहीतरी शोधत होतो मी त्याच्या चेहर्‍यावर, पण ते दिसत नसल्याने स्वत:च्याच चेहर्‍यावरचे भाव लपवायची कसरत करावी लागत होती. चेहर्‍यावर कोरडे भाव ठेवण्यासारखा दुसरा कठीण अभिनय नसावा या जगात. मलाच आता आमचे संभाषण ताणून धरण्यात अस्वस्थता वाटू लागली. जसे तो चल निघतो आता असे म्हणाला, तसेच मी सुद्धा भेटत राहा बोलून तिथून निघालो. ना आम्ही फोननंबर एक्चेंज केले ना अ‍ॅड्रेस शेअर केले. साधा मेल आय-डी सुद्धा नव्हता एकमेकांचा. तरीही माझ्या भेटत राहा वर नक्की बोलून कसेबसे हसला तो..

परत आलो तर बायको माझी वाट बघत होती. कुठे गेलो होतो, या तिच्या प्रश्नाला देण्यास उत्तर नव्हते माझ्याकडे. आणि तिनेही जास्त ताणून धरले नाही. त्या रात्री माझी अस्वस्थता तिला जाणवल्याशिवाय राहिली नाही. कदाचित तिच्याशी हे शेअर केल्याने हलके वाटेल म्हणून सांगायचे ठरवले तिला, आज प्रसन्ना भेटला होता. ओळख पटावी म्हणून याआधी सांगितलेला आमचा एक किस्सा आठवून दिला. पुढे काय घडले हे माझा चेहराच सांगत होता. तिनेही हलकेच माझ्या केसातून हात फिरवत माझी समजूत काढली, “ठीक आहे रे, भेटलाच नाही असे समज.” .. खरे तर भेटलाच नसता तर किती बरे झाले असते नाही. त्याच्या या अश्या भेटीने आजवरच्या सार्‍या आठवणी तुरट झाल्यासारख्या वाटू लागले होते. आजवर कित्येक वेळा मी माझ्या शाळेतले किस्से माझ्या आताच्या मित्रांना सांगितले असतील, बायकोशी शेअर केले असतील. पुढे जाउन मुलांना, नातवंडांनाही सांगितले असते. यानंतर मात्र कदाचित ते आठवायची इच्छाही होणार नव्हती. माझी ही मनस्थिती ओळखून बायको गपचूप कुशीत शिरून म्हणाली, “विसर हे आता, काढून टाक मनातून, एक मित्र हरवला असे समज आणि झोप गपचूप.” .. मी मनातच खिन्नपणे हसलो आणि स्वताशीच विचार करू लागलो, नाही यार, मित्र कधीच हरवत नाहीत.. हरवते ती मैत्री.. जी आमची कधीच हरवली होती.. फक्त जाणीव आज झाली होती..

… तुमचा अभिषेक