RSS

Category Archives: परीकथा

परीकथा भाग ४ – (१.६ ते १.७ वर्षे)

 

३० सप्टेंबर २०१५

पापा !
ते सुद्धा पा पा पा पा नाही तर सुस्पष्ट आणि खणखणीत पापा ..
ते सुद्धा मम्मा बोलायच्याही आधी आधी..
फिलिंग शब्द, इमॉटिकॉन्स आणि स्मायलींच्या पलीकडले 🙂

.
.

२ ऑक्टोबर २०१५

वीज चमकते तेव्हा आधी प्रकाश दिसतो, मग थोड्यावेळाने आवाज ऐकू येतो.
हेच सायन्स वापरून आम्ही ब्रश केल्यावर चूळ भरतो.
आधी शांतपणे ग्लासातले पाणी पिऊन घेतो, मग फुर्रर करून आवाज काढतो. वीज काही आपल्या डोक्यावर कोसळत नाही, आणि आमच्या तोंडातले पाणी काही बेसिनमध्ये पडत नाही 🙂

.
.

५ ऑक्टोबर २०१५

मोठी माणसं विनोद करतात, लहान मुलं विनोद घडवतात.
शनिवारी परीबरोबर तिच्या आजोळी चाललो होतो. गर्मीने हैराण परेशान झालो होतो. सुदैवाने प्लॅटफॉर्मवरचा फॅन चालू होता. परीला घेऊन त्याखाली उभा राहिलो आणि म्हणालो, चल बाबड्या थोडी हवा खाऊया. तसे तिने वर पंख्याकडे पाहिले, तोंडाचा आ वासला आणि हॉप हॉप करत जमेल तितकी हवा खाऊन टाकली 😉
तरी नशीब आम्हाला तसे करताना कोणी पाहिले नाही. नाहीतर हवा खाण्यावर सुद्धा टॅक्स बसायला सुरूवात झाली असती 🙂

.
.

८ ऑक्टोबर २०१५

काल परीशी खेळून दमलो आणि बिछान्यावर पडलो. गर्मीचा सीजन म्हणून उघडाच वावरत होतो, तरी अंगमेहनतीने आपला जलवा दाखवलाच. छातीला घामाच्या धारा लागल्या होत्या. परीने ते पाहिले आणि माझेही लक्ष वेधले. मी तिचा हात झटकला आणि दुर्लक्ष केले, तशी गायबली आणि दोन मिनिटात पुन्हा उगवली. यावेळी मात्र तिच्या हातात लॅपटॉपची स्क्रीन पुसायचा छोटासा नॅपकीन होता. का, तर माझा घाम पुसायला 🙂
‘जो पेट देता है वही रोटी भी देता है’ या उक्तीचा प्रत्यय आला. घाम काढणारीही तीच आणि घाम पुसणारीही तीच 🙂

.
.

१० ऑक्टोबर २०१५

डोळे मिचमिचे करत आम्ही बोटांच्या चिमटीत पकडतो तेव्हा आम्हाला आमचा फोटो काढून घ्यायचा असतो. ही हुक्की रात्रीचे दोन वाजताही येऊ शकते किंवा संध्याकाळी पप्पा दमूनभागून घरी आल्यावरही येते. बरं आम्ही कुठेही फोटो काढत नाही, तर बेडरूम हाच आमचा फोटो स्टुडीओ आहे. तिथेच जावे लागते. दिवस असो वा रात्र, फोटो काढायच्या आधी बेडरूमच्या सर्व लाईट्स लावाव्या लागतात. कारण त्यामुळे फोटो चांगला येतो हे क्षुल्लक ज्ञान आम्हाला प्राप्त झाले आहे. फोटो देखील मोबाईलच्या कॅमेर्‍याने नाही तर डिजिटल कॅमेर्‍यानेच काढावा लागतो. कधी एकामध्येच काम भागते तर कधी सात-आठ काढावे लागतात. प्रत्येक वेळी फोटो काढून झाल्यावर तिला कॅमेरा हातात घेत फोटो कसा आला हे बघायचे असते आणि त्यावेळी कॅमेरा जपणे ही सर्वस्वी पप्पांची जबाबदारी असते.
एकीकडे पप्पांचा असा छळ चालू असताना दुसरीकडे परीची आई मात्र ‘आय अ‍ॅम लविंग ईट’ म्हणत खदखदून हसत असते. कारण एक काळ असा होता जेव्हा मी माझ्या मॉडेलिंगची हौस तिच्या हातात कॅमेरा थोपवून भागवायचो.
तर, या जन्मात केलेल्या कर्माची फळे याच जन्मात मिळतात ती अशी 🙂

.
.

१३ ऑक्टोबर २०१५

काल डोके जरा पित्ताने चढले म्हणून बिछान्यावर झोपलो होतो. बायको उशाशी बसून डोक्याला बाम चोळत होती. परीने ते पाहिले आणि तिला ढकलत माझ्या छाताडावर बसली. नको नको तुझे हात बामने खराब होतील म्हणे म्हणे पर्यंत तिने माझ्या डोक्याला हात घातलाही. थोडे पापण्यांच्या वर, थोडे कानशिलांच्या बाजूला, डोके देखील असे चेपू लागली जसे नेमके मला अपेक्षित होते. जे या आधी बायकोला कित्येकदा समजवल्यानंतर जमले होते, ते परीने पहिल्या निरीक्षणातच जमवले होते. थोडी ताकद तेवढी कमी पडत होती. पण मग त्याची तशी गरजही नव्हतीच, डोके असेच हलके झाले होते 🙂
काही म्हणा! कितीही धिंगाणा घालो! तरी पोरीत एक श्रावण बाळ लपला आहे. फक्त आता तो कुठवर टिकतो हे बघायचे आहे 🙂

.
.

१७ ऑक्टोबर २०१५

आमच्याकडे प्रत्येक गोष्टीची एक सिस्टीम असते. आमचा नाच धिंगाणाडान्स असला तरी त्याचा एक ठराविक सेट अप असतो. गाणे पप्पांच्या मोबाईलवरच लावले जाते. मोबाईल बेडवर एका ठराविक जागीच ठेवावा लागतो. बेड हाच आमचा स्टेजही असतो. सध्या आमच्या घरातील रॉकस्टार परी असल्याने स्टेजवर नाचायचा बहुमान तिलाच मिळतो. पप्पा स्टेजसमोर पब्लिकच्या भुमिकेत असतात. पण तरीही त्यांनाही नाचावे लागतेच. ते देखील चांगले अन व्यवस्थितच नाचावे लागते. कारण परी एक स्टेप कतरीनाची बघून करते, तर दुसर्या स्टेपला पप्पांना फॉलो करते.
बरं यातून सुटकाही सहज होत नसते. एकच गाणे पाच-सहा वेळा लावले जाते, आणि पप्पांनी थकल्यावर बेडवर बसून नाचायची आयडीया केली, तर त्यांना पुन्हा स्टेजच्या खाली ढकलले जाते. जोपर्यंत आमच्या बसंतीचे पाय थकत नाहीत तोपर्यंत पप्पांनाही नाचावे लागते.
या आधी मी एक कमालीचा उत्कृष्ट बाथरूम सिंगर होतो. परीने तितक्याच ताकदीचा बेडरूम डान्सर बनवलेय 🙂

.
.

२० ऑक्टोबर २०१५

पोलिस कंट्रोल रूम १००
फायर ब्रिगेड १०१
परीने डायल केला १११
वाचले आजोबा .. फोन त्यांचा होता 🙂

.
.

२१ ऑक्टोबर २०१५

या जनरेशनला फसवणे ईतके सोपे नाही. माझा स्वत:चा बरेचदा पोपट झाला आहे. एखादी वस्तू भुर्र फेकल्याचे नाटक करावे, आणि तिने त्याला न फसता, इथे तिथे शोधून ती हुडकून काढावी असे कित्येकदा झालेय.
काल जेवणानंतर तिने पाणी प्यावे म्हणून आम्ही तिची मनधरणी करत होतो. पण तिच्या हातात दिलेली पाण्याची बाटली ती आम्हाला पुन्हा पुन्हा रिटर्न करत होती. शेजारच्या दादाने मग आयडीया केली. ‘दिल चाहता है’ स्टाईल आमीर खान जसा खोटा खोटा मासा खातो, तसेच खरेखुरे भासवून खोटे खोटे पाणी प्यायचे नाटक केले. आणि ‘आता तू पी’ म्हणत, पुन्हा तिच्या हातात बाटली सोपवली.
मग काय, तिनेही लगेच ती बाटली घेतली, तोंडापासून दोन सेंटीमीटर अंतरावर धरली, आणि ओठांचा चंबू करत खोटेखोटेच पाणी प्यायला सुरुवात केली 🙂
अश्याप्रकारे पुन्हा एकदा तिच्या निरीक्षण शक्ती आणि लबाडवृत्तीचा अनोखा संगम बघून आज्जीने हसत हसत कपाळावर हात मारून घेतला 🙂

.
.

२२ ऑक्टोबर २०१५

काल डोळ्यात काहीतरी कचरा गेला. बिछान्यावर पडलो आणि बायकोला डोळ्यात फुंकर मारायला सांगितले. परीचे लक्ष गेले. मग काय, एखादा वेगळा प्रकार पाहिला तर तो आम्हाला करायचाच असतो. त्यातही ती पप्पांची सेवा असेल तर तो आमचा हक्कच असतो.
ओठांना अगदी जवळ आणून माझ्या डोळ्यांवर हळूवार फुंकर मारू लागली. तिचे ते प्रेम बघून पडल्यापडल्याच गहिवरून गेलो. टच्चकन डोळ्यात पाणी आले, आणि कचरा त्यातच वाहून गेला 🙂

.
.

२४ ऑक्टोबर २०१५

ऑक्टोबर हिट आणि गर्मीची पण आपलीच एक मजा आहे.
मी आणि परी दोघे उघडबंब होतो. फॅन फुल्ल ऑन करतो. खिडक्या उघडतो पण पडदे लावतो. ती मम्मीची ओढणी कंबरेला बांधते. मी माझी बनियान माझ्या कंबरेला गुंडाळतो. अफगाण जलेबी गाणे लावतो. आणि दोघे मस्त घाम येईपर्यंत नाचतो 🙂

.
.

२६ ऑक्टोबर २०१५

फायनली चांदोमामा आवडायच्या वयात आम्ही पोहोचलो आहोत. गेले दहा-बारा दिवस त्याला कलेकलेने वाढताना बघत आहोत.
कधी बेडरूमच्या खिडकीतून, तर कधी हॉलच्या खिडकीतून. दर दहा मिनिटांनी, पडदा सरकवत, तो आहे ना जागेवर हे चेक करत आहोत.
कधी खिडकीवरच उशी ठेऊन त्यासमोर ठाण मांडून बसत आहोत. तर कधी तो दिसावा म्हणून सायकलवर चढायचा स्टंट करत आहोत.
जरा ढगाआड गेला की आम्ही बेचैन होतो. पण दिसताच क्षणी, चांsदोमामाss करत, ये ये म्हणत त्याला बोलावत राहतो.
आज तर काय कोजागिरी पौर्णिमा, म्हणजे जणू चांदोमामाचा हॅपीबड्डेच 🙂
पण सेलिब्रेट करायला, नेमका आज आमचा बाबड्या घरी नाहीये 😦
काही हरकत नाही, उद्या बीलेटेड साजरा करूया 🙂

– तुमचा अभिषेक

 
 

परीकथा ३ – दिड वर्ष

 

३१ ऑगस्ट २०१५

सध्या आमच्याकडे रोज डंबशेराजचा खेळ चालतो.
जीभ बाहेर काढून ती बोटाने त्यावर टिकटिक करते, तेव्हा तिला जेली नाहीतर चॉकलेट खायचे असते.
हाताने हवेत गोल गोल रेघोट्या मारते, तेव्हा पाटीवर खडू गिरवायचा असतो.
जेव्हा तोच हात वायपरसारखा फिरवते, तेव्हा ते गिरवलेले साफ करायला डस्टर हवा असतो.
फोन हवा असल्यास हात कानाला लावते, तर झोपायचे असल्यास तसाच हात कानाला लावत मान झुकवते. (गधडी झोपत काही नाही ती गोष्ट वेगळी)
सकाळी आंघोळ करायचा मूड होतो, तेव्हा डोक्यावर तेल किंवा शॅंपू चोळल्यासारखे करते.
दूध असो वा पाणी, अभ्यासाचे पुस्तक असो वा खेळण्यातला घोडा.. प्रत्येकाच्या खाणाखुणा ठरलेल्या आहेत.
छोटा बॉल आणि मोठा बॉल यांच्याही खुणा वेगवेगळ्या आहेत.
ईतकेच नाही तर कुठले विडीओ सॉंग लावायचे, हे देखील त्या त्या गाण्यातील सिग्नेचर स्टेप्सवरून ठरवले जाते.
एकदा ‘लहान माझी बाहुली’ गाणे लावावे म्हणून चक्क बाहुली ऊचलून आणलेली..
नाही म्हणायला कधीतरी अचानक एखादा शब्द उच्चारते, पण तो ठरवून रीपीट काही करता येत नाही.
त्या दिवशी तिला फ्रिजमधून काहीतरी हवे होते, काय हवे होते याची आम्हाला कल्पना होती. पण आता ते ईशार्‍यांनी कसे सांगते या कुतुहलापोटी मुद्दामच विचारले, “बाबड्या काय हवेय?”
तर सरळ तोंडातून शब्दच उच्चारले.., “चीज!”
आम्ही पुन्हा पुन्हा विचारले, तर तिने पुन्हा पुन्हा ‘से चीज’ केले.
गेले कित्येक दिवस आम्ही, ‘आधी मम्मी की आधी पप्पा’ याची वाट बघतोय, पण गधडी खाऊची वस्तू बरोबर बोलू लागली. या बाबतीत ही मुलगी कन्फर्म आईवरच गेलीय 🙂

.
.

७ सप्टेंबर २०१५

सोफ्याच्या हातावर, खुर्चीच्या दांड्यावर..
बेडच्या काठावर, पिठाच्या डब्ब्यावर..
अन पुढच्या वर्षी खांद्यावर ..
आमच्या घरातून एक गोविंदा निघायचे फुल्ल चान्सेस आहेत 🙂

.
.

१० सप्टेंबर २०१५

तेच तेच घर आणि तीच तीच माणसं, आम्हाला बोर होतात.
आता आम्ही माणसं तर बदलू शकत नाही, आणि घरही दुसरे शोधू शकत नाही.
म्हणून आम्ही घरातल्या घरातच बदल करतो.
बेडरूममधले कपड्याचे कपाट, खेचत खेचत हॉलमध्ये आणतो.
हॉलमधील टीपॉय, सरकवत सरकवत किचनमध्ये सोडतो.
खेळण्यांचा तर जन्मच इथे तिथे भिरकवायला झाला असतो.
तेच हाल आम्ही खुर्च्यांचेही करतो.
कधी पाटावर धाड पडते, तर कधी झाडूवर.
सकाळी जो घराचा नकाशा असतो, तो रात्र होईस्तोवर बदलला असतो.
मॉरल ऑफ द स्टोरी काय,
तर सिविल ईंजिनीअरच्या घरी ईंटरीअर डिजाईनर जन्माला आलीय. 🙂

.
.

११ सप्टेंबर २०१५

आजकाल संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर, परी हाताला धरून मला हॉलमध्ये नेते आणि पंख्याखाली बसवते.
नाही, हवा खायला नाही. तर ती तिची अभ्यासाची जागा आहे.
हातात खडू सोपवते आणि पाटी समोर धरते. रोज आम्हाला चित्ररुपात, आमचा फॅमिली ट्री काढायचा असतो.
आधी परी, मग मम्मी, मग पप्पा.. मागाहून मावश्या, आज्जी आजोबा.. एकापाठोपाठ एक सारे चेहरे, त्या दहा बाय अठराच्या पाटीवर जमा होतात. मग खेळता खेळता अभ्यास म्हणून मी एकेक अवयव उच्चारून रेखाटतो. आता परीचे डोळे, परीचे कान, परीचे नाक, कपाळावरची टिकली आणि सर्वात शेवटी केसांचे फर्राटे मारून चेहर्‍याला पुर्णाकार देतो. पण तिचे समाधान काही होत नाही. ‘पिक्चर’ अभी बाकी है मेरे दोस्त, म्हणत स्वताच्या गालाला हात लावते अन मला गाल रेखाटायला सांगते.
मग काय! कधी मिश्या काढल्या जातात, तर कधी दाढी काढली जाते. तर कधी चेहर्‍यावरच्या त्या मोकळ्या जागेत गोलमटोल टमाटर काढले जातात. पण देवाss या टू डायमेंशनल चित्रामध्ये गाल कसे काढतात हे मला आजवर समजले नाही.
सरतेशेवटी तिचाच गालगुच्चा घेऊन वेळ मारून नेतो. 🙂

.
.

१३ सप्टेंबर २०१५

देवावर माझा विश्वास तसा कधीच नव्हता..
आजही नाहीयेच!
पण भूतांवर मात्र हळूहळू बसू लागलाय..
रोज सकाळ संध्याकाळ ती आमच्या अंगात येतात 🙂

.
.

१५ सप्टेंबर २०१५

घोड्यावर बसून फिरायचे दिवस गेलेत..
आता घोड्यालाच उचलून फिरवायचे दिवस चालू झालेत.
कधी आम्ही त्याला पाणी पाजतो, तर कधी त्याच पाण्याने आंघोळ घालतो.
कधी प्रेमाने त्याचे तोंड चाटतो, तर कधी थाडथाड थोबाडात मारतो.
त्याची इच्छा असो वा नसो, त्याला काही ना काही अगम्य भाषेत सुनावत राहतो.
आधी तो आम्हाला या घरातून त्या घरात न्यायचा, आता आम्ही त्याची आयाळ पकडत इथून तिथे फरफटत नेतो.
असे वाटते, एका मुक्या प्राण्याने दुसर्‍या मुक्या प्राण्याशी कसे वागावे याचे कायदेकानून बनवायची वेळ आलीय 🙂

.
.

१७ सप्टेंबर २०१५

लहान मुले शक्यतो दाढीवाल्यांना घाबरतात. आमच्याकडे अर्थातच उलटे आहे. कारण दाढीवाला प्रेमळ बाबा घरातच आहे.
तरी परी लहान असताना जेव्हा पहिल्यांदा मी दाढी काढून तिला दर्शन दिले होते. तेव्हा माझे सटासट रूप पाहताच, रडून रडून नुसता धिंगाणा घातलेला. तिची ओळख पटावी की मीच तिचा बाबा आहे म्हणून नेहमीच्या वाकुल्या करून दाखवाव्या लागलेल्या. अर्ध्या तासाने मला नेहमीसारखे घरच्या कपड्यांमध्ये वावरताना बघून जवळ तर आलेली, पण उचलून घेताच कितीतरी वेळ संशयिताच्या नजरेने माझ्या चेहर्‍याकडे बघत होती.
आज पुन्हा एकदा दोनअडीज महिन्यांची वाढलेली दाढी साफ केली. पण आज मात्र मला बघताच आनंदाने बागडू लागली. कदाचित तिला समजले असावे. दाढी असो वा नसो, त्यामागचा माणूस तसा चांगला आहे 🙂

.
.

१९ सप्टेंबर २०१५

आज आमचा ढाई फुटीया देढ वर्षांचा झाला 🙂

आजपासून “नया दौर” सुरू
घोड सवारी बंद, आणि सायकलिंग चालू 🙂

Birth Day Gift – सायकल
courtesy – परीच्या मावश्या

.
.

२५ सप्टेंबर २०१५

सध्या आमच्याकडे “अफगाण जलेबी” गाणे फुल्ल हिट आहे
आणि जिला त्यावर नाचायला आवडते तिला ती उपमा सूटही होते.

एकाचवेळी जिलेबीचा गोडवा आणि तालिबानी आतंकवाद, हे तीच जमवू शकते. 🙂

.
.

२६ सप्टेंबर २०१५

लोकांनाही काय एकेक उपमा सुचतील काही नेम नसतो ..
काल परी बरोबर नरेपार्कच्या गणपतीदर्शनाला गेलो होतो. तिथेच जत्राही भरली होती. तूफान गर्दी होती. पण त्या गर्दीतही मिळेल त्या जागेत ती बागडत होती. साहजिकच तिच्या पाठी पाठी मी देखील होतोच. असेच ती धावत धावत एका बायकांच्या ग्रूपसमोर आली. त्यातल्या एका बाईची नजर पडताच ती ईतरांना म्हणाली, “ए बघा ही कसली बाहुलीसारखी आहे”. दुसरीही तिचीच री ओढत म्हणाली, “हो ग्ग, अगदी बाहुलीच दिसतेय”. तिसरी सुद्धा पटकन बोलून गेली, “अय्या हो खरंच ग.. पांढर्‍या मैद्याची पिशवीच जणू” … खरंच, लोकांना काय उपमा सुचतील काही नेम नसतो. हे कौतुक आहे की टोमणा, त्यावर पलटून स्माईल द्यावी की रागानेच बघावे, मला क्षणभर समजेनासे झालेले 🙂

.
.

२८ सप्टेंबर २०१५

परवा रात्री उशीरा बाहेरून हादडून घरी आलो. परीलाही कधी नव्हे ते थोडेसे चॉकलेट खाऊ घातले होते. कुठून तिला सुचले देवास ठाऊक, पण ब्रश करायचा आहे म्हणत माझ्याकडे हट्ट करू लागली. मी म्हटले, ठीक आहे. तसेही रात्रीचे चॉकलेट खाणे झाले आहे, तर ब्रश करणे फायद्याचेच ठरेल. पण हा हट्ट पुरवताच तिची पुढची फर्माईश, मी सुद्धा तिच्यासोबत ब्रश करावा. काय करणार, नाईलाजाने घेतला ब्रश हातात. तसेही हे आमच्या सुट्टीचे रूटीनच आहे. दोघे सकाळी अकरा बारा वाजता एकत्र उठणार आणि आआ आआ करत सोबत ब्रश करणार. पण म्हणून रात्रीचा ब्रश !! याआधी स्वत:साठी म्हणून रात्रीचा ब्रश कधी केला होता ते आठवत नाही, पण लहानपणी सकाळचाही ब्रश करायचा आळस म्हणून खोटे खोटेच ब्रश ओला करत, आईला झाला माझा ब्रश करून म्हणत फसवल्याचे आठवतेय. त्यामुळे अश्यावेळी कधी कधी बरंच वाटते, की पोरगी सर्वच ‘गुण’ बापाचे घेत नाहीये. 🙂

 

 

परीकथा २ – (सव्वा ते दीड वर्ष)

२० जुलै २०१५

लहान मुले खरंच किती निरागस असतात..
जिथे गल्ली क्रिकेटमध्ये सारे जण बॅटींगसाठी मरत असतात,
फिल्डींग करतानाही आपली बॅटींग कधी येणार याचीच वाट बघत असतात,
अगदी टॉसही जिथे कोणाची बॅटींग पहिली असणार, हे ठरवण्यासाठीच उडवला जातो,
तिथे आमची परी बॅट पप्पांच्या हातात देते आणि स्वत: बॉलिंग टाकायला धावते.
खरंच., लहान मुले किती निरागस असतात 🙂

.
.

२२ जुलै २०१५

कधी तिला शांत करणे अशक्य होते, तेव्हा शेवटचा मार्ग म्हणून आम्ही तिला जेली देण्याची लालुच दाखवतो. फ्रिज उघडून, झाकण सरकवत डबा तिच्यासमोर धरतो. रंगीबेरंगी जेली तिच्यासमोर लखलखत असतात. प्रत्येक रंगाची, प्रत्येकी एक वेचावी असा मोह कित्येकदा खुद्द मला होतो. पण ती मात्र जराही हावरटपणा न दाखवता एक आणि एकच जेली उचलते. किती कौतुक वाटते तिचे..
पण आज मात्र जेलीचा रिकामा होत जाणारा डब्बा पाहून सहज जाणवले, नेमकी एकच जेली उचलणे ही तिची स्ट्रॅटेजी तर नसावी?
कारण तिने पहिल्याच वेळी जर मूठ मारली असती, तर कदाचित जेली जेली हा खेळ आम्ही तिथेच थांबवला असता 🙂

.
.

२ ऑगस्ट २०१५

मॉलच्या गजबजाटात फिरण्याची मला फारशी आवड नाही, पण परीबरोबर मॉलमध्ये फिरणे एक धमाल असते. चावी दिलेले खेळणे जसे चावी सोडताच तुरूतुरू पळते, तसे तिला मोकळीक देताच क्षणार्धात सुसाट सुटते. कानात वारे शिरलेले वासरूच जणू. त्यानंतर जो दंगा घालते त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्यच. त्यासाठी मॉलमधील सीसीटीव्ही फूटेजच बघावे लागेल.

तिच्यापाठी पळताना आपलीही दमछाक होत असली, तरी यातही एक फायदा आहेच. तिला रोज फिरायला घेऊन गेल्यास तिच्या आईला वेगळ्या डाएटींगची गरज भासणार नाही. वजन असेच अर्धे होईल.
माझा तर आज जीव अर्धा झाला… 🙂

.
.

४ ऑगस्ट २०१५

चप्पल म्हणजे खाऊ नसतो,
हे कसे बसे समजावून झालेय..

चप्पल म्हणजे खेळणे नसते,
हे देखील मोठ्या मुश्किलीनेच समजावलेय..

सध्या आपल्या पायात आपलीच चप्पल घालायची,
मम्मी किंवा मावश्यांची नाही, हे समजवायचे प्रयत्न चालू आहेत..

तर टेडीला चप्पल घालायची गरज नसते, हे कसे समजवायचे आम्हालाच समजत नाहीये..

काही का असेना.. एक मात्र समजून चुकलोय,
चप्पल म्हणजे खजिना नसला तरी त्याला कडीकुलुपातच ठेवणे योग्य आहे.. 🙂

.
.

५ ऑगस्ट २०१५

एखादी गोष्ट तिच्या मनात नाही तर ती आपल्या बापाचेही ऐकणार नाही.
एखादी गोष्ट तिला करायचीच असेल तर ‘नाही’ म्हणायचीही सोय नाही.
तरीही कश्याला नाही म्हटलेच,
तर हट्टीपणा दाखवत ते आणखी जास्त करणार.

कधी कधी या हट्टीपणाची परीसीमा आणि आपल्या सहनशक्तीची मर्यादा एकाच वेळी ओलांडली जाते, की तिला धरून बदडून काढावेसे वाटते.

पण काय करणार, गधडी अजून बोलायला लागली नाही,
तर ‘मुक्या प्राण्यांवर दया करा’ तत्वाला अनुसरून काही करताही येत नाही. 🙂

.
.

८ ऑगस्ट २०१५

फादर्स डे आऊट..!
स्थळ आपले तेच, गेल्यावेळचाच मॉल.
पण फरक हा की आज परी फक्त तिच्या पप्पांनाच घेऊन फिरायला गेली होती. नुसते फिरायला घेऊन नाही गेली तर फिरव फिरव फिरवला. परी पुढे पुढे, आणि खांद्यावर सॅक लटकवलेले पप्पा मागे मागे. जिथे कठडा दिसेल तिथे आम्ही चढायचो, जिथे बसकण मारावीशी वाटेल तिथे आम्ही बसायचो. आपल्या सोबत पप्पांनाही बसवायचो. आईसक्रीम म्हणजे आमचा जीव की प्राण! त्याचा पोस्टर दिसताच ते हॉप हॉप करत खाऊन टाकायचो.
सुसभ्य आणि सुसंस्कृत लोकांच्या मॉलमध्ये, एवढे गंडलेले एटीकेट आणि मॅनर्स बघणे दुर्मिळच. पण तक्रार तरी कोण कोणाकडे करणार, कारण आम्हाला बसायला अडवले की आम्ही लोळण घ्यायला तयार..
एक तक्रार कम विनंती मात्र मॉलच्या मॅनेजमेंटला करावीशी वाटली. आम्ही जेव्हा जेव्हा मॉल मध्ये येऊ तेव्हा तेव्हा एसीचे कूलिंग जरा वाढवून ठेवा. तेवढाच आम्हाला घाम कमी येईल 🙂

.
.

११ ऑगस्ट २०१५

ती हसते तेव्हा सेलिब्रेशनला सुरुवात होते, ती रडते तेव्हा सेलिब्रेशन संपते.
सर्वांना आपला बर्थडे केक तिच्या हातूनच कापून घ्यायचा असतो, केकचा पहिला तुकडा तिलाच भरवायचा असतो.
ईतकेच नव्हे तर पहिला घासही तिच्या हातूनच खायचा असतो.
मेणबत्त्यांना फुंकर मारायचे काम ती मोफत करते.
ती, आणि आपले नशीब आपल्यावर खुश असेल, तर सोबत फोटोलाही उभी राहते.
आजकाल आमच्या घरात सारे बर्थडे असेच सेलिब्रेट होतात., आजचा माझाही त्याला अपवाद नव्हताच 🙂

– हॅपी बड्डे परीज फादर 🙂

.
.

१६ ऑगस्ट २०१५

खादाडी करायची झाल्यास, बंदिस्त हॉटेलपेक्षा आम्हाला मोकळाढाकळा मॉलच परवडतो. पण आज तिच्या मावश्यांच्या भरवश्यावर हॉटेलमध्ये नेण्याची चूक नाईलाजाने हातून झाली.
आता मॉलमध्ये बागडणार्‍यांना हॉटेलचे नियम कुठे ठाऊक. आम्ही चढलो नेहमीसारखे टेबलवर, आणि पायातले सॉक्स काढायची संधीही न देता, कोणाला काही समजायच्या आतच, पार्टीशन ओलांडत शेजारच्या टेबलवर पोहोचलो.
झालं, अपेक्षेप्रमाणे पायातल्या सॉक्सने दगा दिला आणि धाडकन सोफ्यावर कोसळलो.

पण पडल्यावर, लागल्यावर, हट्टाने आम्हाला तेच करायचे असते हा आमचा नियम पडला.
आमचे डोके कुठे आपटले, की रडून झाल्यावर आम्ही पुन्हा हळूच त्या जागी डोके आपटून, ते आपटलेच कसे हे चेक करतो.
तर कुठल्या भोकात बोट अडकून, मोठ्या मुश्कीलीने सुटका झाल्यावरही, पुन्हा त्याच बोटाने त्या भोकाचे माप काढतो.

तर आजही आम्हाला कुठल्याही परीस्थितीत त्या टेबलवर स्वारी करायचीच होती. सुदैवाने हॉटेल रिकामेच असल्याने लागून असलेले चारही टेबल आमचेच झाले होते. या टेबलवरून त्या टेबलवर, आमच्यासोबत खेळायला सोबत हॉटेलचे वेटरही आले होते.
तब्बल तास-दिड तास दंगा घातल्यावर कसेबसे आम्ही सूप आणि स्टार्टर संपवून बाहेर पडलो. कारण मेन कोर्स म्हणजे आणखी तास-दिड तासांचा दंगा, आणि तो तिच्या आईबापाच्या स्टॅमिन्यात येत नसल्याने ते पार्सलच करून घेतले.

हॉटेलातून बाहेर पडताना, टिप द्यायला कंजूषी करतोस म्हणत बायकोने मला नेहमीसारखाच टिपचा योग्य आकडा सांगितला.
पण आज मात्र सर्विस टॅक्समध्ये को-ऑपरेशन आणि एंटरटेनमेंट टॅक्स जोडत मी आधीच जास्तीची टिप ठेवली होती 🙂

.
.

१७ ऑगस्ट २०१५

तिने आपल्या हातात मोबाईल द्यावा आणि आपण तिला हवा तो विडिओ लावून द्यावा हा काळ केव्हाच ईतिहासजमा झाला आहे.
हल्ली ती मोबाईल खेचून घेते आणि स्वत:च अनलॉक करते. मेनूमध्ये जाऊन विडिओप्लेअर उघडत, त्यातून योग्य त्या फोल्डरमध्ये शिरून, आपल्याला हवा तो विडिओ लावते. नाही आवडला तर नेक्स्ट विडिओ किंवा बॅकचे बटण दाबत वेगळ्या फोल्डरमध्ये शिरण्याची सोय आहेच. तेच ते विडिओ बघायचा वैताग आला की यू टर्न घेत यू ट्यूबकडे आपला मोर्चा वळवते. आमचा अर्धा डेटा प्लान तीच खर्च करते. नुसता पप्पांचाच मोबाईल नाही तर आईचा, आज्जीचा, आजोबांचा, मावश्यांचा, नाना-नानीचा, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, विडिओ कुठे सापडतात आणि ते कसे बघायचे हे तिला ठाऊक.
आपल्या काळी बाबा या वयात टीव्हीचे चॅनेल कसे चेंज करायचे हे देखील आम्हाला माहीत नव्हते, अश्या तुलना करण्यात काहीच अर्थ नाही. कारण ही नुसती स्मार्ट जनरेशन नाही तर स्मार्टफोन जनरेशन आहे.
…… तरीही लहान मुलांना मोबाईलची सवय फारशी चांगली नाही असे वाटते खरे,
पण पप्पांच्या पोटावर बसून छाताडावर मोबाईला ठेवत जर ती विडिओ बघणार असेल, तर अश्या अनुभवाला नाही तरी कसे म्हणावे 🙂

.
.

१८ ऑगस्ट २०१५

जांभई आली की झोप येते असेच लहानपणी वाटायचे. पुढे कधीतरी समजले की शरीराला ऑक्सिजनची गरज असते तेव्हा जांभया येतात. हल्ली या शास्त्राची अनुभुती घेतोय.

अकरा साडेअकरा वाजता आम्ही जांभया द्यायला सुरुवात करतो. लोकांना वाटते की आता झोपेल ही पोरगी. मग झोपेल ही पोरगी. पण आम्ही मात्र ऑक्सिजनची टाकी फुल्ल करत असतो. एकदा ती झाली की तिच्या जिवावर बारा साडेबारापर्यंत दंगा घालतो. त्यानंतर पुन्हा जांभया द्यायला सुरुवात.. असे करता करता रात्री दोन अडीजच्या आधी काही आम्ही झोपत नाही. पण आमचे डोळे कधी मिटताहेत याकडे जे डोळे लावून बसलेले असतात, त्यांच्या झोपेचे मात्र खोबरे करतो.

कॉलेजात असताना मला निशाचर, रातकिडा, घुबड, वटवाघूळ अशी बरीच नावे पडायची. कारण टाईमपास असो वा अभ्यास, माझ्या आयुष्यात जे काही घडायचे ते रात्रीच!
तर आमची परी रात्रभर जागतच नाही, तर तिच्या बाबांना पडलेल्या नावांनाही जागतेय 🙂

.
.

२४ ऑगस्ट २०१५

पिक्चरमध्ये पहिला व्हिलन हिरोला मारतो, मग हिरो व्हिलनला धोपटून काढतो… आज ट्रेनची पाळी होती.
वाशी ते कुर्ला, ट्रेन आम्हाला हलवत होती. कुर्ला ते डॉकयार्ड, आम्ही ट्रेन हलवून सोडली. 🙂
आमचे नशीबही नेहमी एवढे चांगले असते की प्लेग्राऊंड आम्हाला नेहमी रिकामेच मिळते. त्याचा फायदा उचलत आज आम्ही या सीटवरून त्या सीटवर मून वॉल्क करत होतो.
पायात शूज घातले की आम्हाला सीटवर उभे राहायचे असायचे आणि काढले की ट्रेनमध्ये फेरफटका. शेवटी या मस्तीवर उतारा म्हणून घरी जाऊन आंघोळ करावी लागली. सोबत पप्पांचीही झाली.
पप्पांनी शेवटचे एका दिवसात दोन आंघोळी केव्हा केल्या होत्या हे त्यांनाही आठवत नाही. पण यापुढे बरेचदा होतील असे वाटतेय. 🙂

.
.

२६ ऑगस्ट २०१५

लांबलचक तिखट शेव!.. किंवा जिलेबीचा एखादा तुकडा, पप्पा आपल्या तोंडात ठेवतात आणि दुसरे टोक खात खात, परी जवळ येते..
तिच्या बोटाला काही ईजा झाल्यास, ते चोखायला म्हणून पप्पांच्या तोंडासमोर धरते..
पप्पा ऑफिसमधून घरी आल्यावर, कपाटातील ढिगारा उपसून एक टीशर्ट काढते. पप्पांना मग तेच घालावे लागते..
पप्पांना खोकला आल्यास, खोटा खोटा खोकला तिलाही येतो.. तिला शिंक आल्यास, एक खोटी खोटी शिंक पप्पाही काढतात..
गळ्यात पडणे, लाडात येणे.. गालाला गाल चोळत, पप्पांची दाढी कुरवाळत.. चुंबनांचा वर्षाव करणे.. या सर्वांची तर मोजदादच नाही..
नवरा बायकोच्या नात्यापेक्षाही आगळावेगळा,
बापलेकीच्या नात्यातही, आपलाच असा एक रोमान्स असतो 🙂

.
.

डायरीतील एक नोंद :-
तारीख – विस्मरणात टाकलेली ..

आयुष्य खूप सुंदर आहे..
फक्त मुलगी आजारी नाही पडली पाहिजे.

– तुमचा अभिषेक

 

परीकथेचे सव्वा वर्ष .. (facebook status)

२० मार्च २०१४

आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलीच्या बघताक्षणी प्रेमात पडलो……… एका मुलीचा बाप झालो.
काल शिवजयंतीच्या मुहुर्तावर राणी लक्ष्मीबाई घरात आली.
BLESSED WITH BABY GIRL …नाचो …..

.
.

८ एप्रिल २०१४

परी सारख्या मुलीचे `परी’ हेच नाव ..
My Little Angel is named “Pari” 🙂

.
.

१५ जुलै २०१४

कन्फर्मड्..!!
माझी मुलगी माझ्यावरच गेलीय..
फोटो काढायची अॅक्शन करत, मोबाईल तिच्यासमोर धरायचा अवकाश ..
रडायचे थांबून हसायला सुरुवात 🙂

.
.

१९ जुलै २०१४

चार दिन की झिंदगी, चार महिने गुजर गये, तेरे बिना…. जिया जाये ना ..
हॅपी बड्डे फोर मन्थस बेबी परी ..
कम सून 🙂

.
.

२१ जुलै २०१४

लंगोट आणि कानटोपी ..
दोघांतील फरक कसा ओळखायचा याचाही आता क्लास लावावा लागणार ..
कठीण आहे !

.
.

२ ऑगस्ट २०१४

एक चांगली बातमी ! एक वाईट बातमी !!
आधी चांगली बातमी – उद्या परी येणार घरी 🙂
आता वाईट बातमी – बरोबर बायको सुद्धा येणार 😦
Bachelor Life Over 😦
पण बालपण सुरू 🙂

.
.

३ ऑगस्ट २०१४

पाच वर्षांपूर्वी फ्रेंडशिप डे च्या दिवशीच माझी माझ्या बायकोशी ऑर्कुटवर ओळख झाली होती.
आज “फ्रेंडशिप डे” च्या दिवशीच मुलीला पहिल्यांदा घरी नेतोय.
बापलेकीच्या नात्याची सुरुवात करायला यापेक्षा चांगला मुहुर्त असू शकतो का 🙂
हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ माय फ्रेंडस !!

.
.

४ ऑगस्ट २०१४

पंधरा मिनिटांची खटपट करुन आज लंगोट बांधायला शिकलो…
फक्त दहा मिनिटे टिकला !
मेहनतीवर पाणी पडने म्हणजे काय माहित होते,
आज सुसू पडणे अनुभवले 😉

.
.

८ ऑगस्ट २०१४

हतबल .. हताश .. हात टेकले !
आजवर मी कित्येकांना चिडवून चिडवून छळले,
आज माझी मुलगी मला छळून छळून चिडवतेय .. 😦

.
.

१० ऑगस्ट २०१४

चार वर्षांपूर्वी गणपतीच्या मिरवणूकीत शेवटचे नाचलेलो,
ते आज पोरीबरोबर नाचलो.
स्टॅमिना पार गंडलाय राव,
तिच्या आधी मी दमलो.
माकडाचा माणूस व्हायला उत्क्रांतीची हजारो वर्षे जावी लागली.
लेकीने मात्र एका दिवसात माणसाचा माकड केला..
तो देखील चावीवाला 🙂

.
.

१० ऑगस्ट २०१४

(हे स्टेट्स परीच्या आईचे)

दरवाजे की घंटी ४-५ बार बजाने वाले,
आज कल दबे पाव आने लगे
ऊंची आवाज मे बातें करनेवाले,
अब ईशारोंमे बतियाने लगे
खुदके काम दुसरोंसे करवाने वाले,
अब चुपचाप अपने काम करने लगे
घोडे बेच के सोने वाले,
अब हलकी आंहट पर जागने लगे
घंटो लॅपटॉप मे डूबे,
आजकल उसकी शकल तक देखना भूल गये
तेरी एक हंसी के लिये,
आज ये क्या क्या करने लगे..
माय डीअर परी,
ये तूने क्या किया???
मेरे Lazybone Husband को,
एक Responsible Father बना दिया..
Love U pari 🙂
– अस्मिता नाईक

.
.

२६ नोव्हेंबर २०१४

माझी मुलगी माझ्या सिक्स पॅकच्या प्रेमात पडलीय,
हल्ली रोजच माझ्या अंगावर कार्यक्रम उरकते आणि मला बनियान काढायला लावते. 🙂

.
.

७ डिसेंबर २०१४

असे म्हणतात, देव आपले संकटांपासून रक्षण करतो..
पण हल्ली बिचार्‍या देवांवरच माझ्या पोरीपासून स्वत:चे रक्षण करायची वेळ आलीय..
देव्हारा वरती न्यायची वेळ झालीय 🙂

.
.

३१ जानेवारी २०१५

“जादूची चटई” आजवर केवळ परीकथांमध्येच वाचले होते.
पण हल्ली परीने माझीच जादूची चटई बनवलीय.
तिला उचलून घ्यायचे.. आणि मग ती जिथे बोट करेल, तिथे मुकाट जायचे 🙂

.
.

१८ मे २०१५

चुकून नाव परी ठेवले..
शैतान जास्त सूट झाले असते.. 🙂

.
.

३१ मे २०१५

जगातली सारी खेळणी एकीकडे आणि आईबापाचा ड्रॉवर उपसण्यातील आनंद एकीकडे…
आधी पाकिटाची जागा बदलावी लागली, मग घड्याळ हलवावे लागले, काल पट्टाही तिथे ठेवायची सोय राहिली नाही.. आता ते ड्रॉवर माझे फक्त नावालाच राहिले आहे. अगदी त्यात बसून खेळते..
सव्वा वर्ष पुर्ण व्हायच्या आतच बापाच्या प्रॉपर्टीवर कब्जा करायला सुरुवात.. स्मार्ट जनरेशन 🙂

.
.

६ जून २०१५

परी मागच्या जन्मात बहुतेक चिमणी असावी.
काऊ आणि कब्बू’चे कमालीचे आकर्षण.
राणीच्या बागेत पिंजर्यातील रंगीबेरंगी पक्षी, पंख फडफडवत बिचारे आमच्या एका नजरेसाठी आस लाऊन राहतात, पण आम्ही मात्र खुल्या फांदीवरच्या कावळ्यांनाच भाव देतो.
समुद्राच्या लाटा हिंदकाळत राहतात, वारा बेभान बागडत सुटतो, क्षितिजावरचा सूर्य लाल तांबड्या रंगांची नुसती उधळण करत असतो, अगदी काव्यमय संध्याकाळ असते. पण आम्ही तिथेही आकाशातले कावळेच टिपत असतो.
गेले कित्येक वर्षे डॉकयार्ड रेल्वेस्टेशन वरून प्रवास करतोय. पण आजवर कधी माझ्या नजरेस पडले नव्हते. परीने मात्र आज पहिल्याच फटक्यात छ्तावरच्या लोखंडी सांगाड्याच्या बेचकीत लपलेले काऊकब्बू हुडकून काढले, आणि माझ्याबरोबरच प्लॅटफॉर्मवरच्या ईतरही काही अज्ञानी लोकांच्या ज्ञानात भर टाकली ज्यांची नजर रेल्वे ईंडिकेटरच्या वर कधी गेलीच नव्हती 🙂

.
.

१३ जुन २०१५

मॉडेल, डान्सर, जिम्नॅस्ट, आणि आता मिमिक्री आर्टिस्ट..
परीच्या करीअरची चिंता नाही, काही ना काहीतरी करेलच पोरगी

.
.

२१ जून २०१५

मुलीला खेळवणारे शेजारीपाजारी, दादा मामा, काका आजोबा, मित्र सवंगडी बरेच असतात..
पण तिने सू सू केल्यावर जो लंगोट बदलतो, तो बाप असतो. 🙂
HapPy FatheRs Day 2 all 🙂

.
.

१ जुलै २०१५

आजवर कधी घरी आल्यावर माझ्या बायकोने मला साधे पाणी विचारले नाही, पण परी मात्र आल्या आल्या माझ्या पायातले बूट काढायला धावते. बूटांना हात नको लाऊस म्हटल्यावर शू रॅकचा दरवाजा उघडून मला बूट ठेवायला मदत करते. सेवा ईथेच संपत नाही.
त्यानंतर माझे बोट पकडून माझे कपडे बदलायला मला बेडरूमकडे नेते. तिथून आमचा मोर्चा बाथरूमकडे वळतो. मी बाहेर येईपर्यंत माझी वाट बघत दारातच उभी राहते. मला आत उशीर होतोय असे वाटल्यास बाहेरून दरवाज्यावर थडाथड लाथाबुक्के बसतात. कारण….
कारण त्यानंतर तिला माझ्याबरोबर “चहा बिस्किट” खायचे असते..
तो मॉरल ऑफ द स्टोरी.., पोरगी शेवटी आईवरच गेलीय 🙂

.
.

७ जुलै २०१५

दोघींचा जन्म जणू काही मला छळायलाच झालाय..
पण आयुष्यात जे काही मनोरंजन आहे ते दोघींमुळेच आहे..
मला लुटणे हा दोघी आपला जन्मसिद्ध हक्क समजतात..
पण सोबत आनंदही अनमोल देऊन जातात..
माझ्याकडून आपले लाड करून घेणे, हट्ट पुरवणे..
कारण नसताना उगाचच चिडणे, उगाचच रडणे..
सरते शेवटी मीच हात जोडून त्यांची समजूत काढणे..
कधी कधी वाटते मला दोन बायका आहेत..
तर कधी वाटते, दोन पोरींना सांभाळतोय..

.
.

१२ जुलै २०१५

शनिवार-रविवारची आंघोळ म्हणजे आमच्यासाठी तासाभराची वनडे पिकनिक असते.
बाथटब म्हणजे स्विमिंग पूल.. शॉवर म्हणजे वॉटरफॉल.. आणि बापाच्या अंगाखांद्यावर बागडणे या झाल्या स्लाईडस..
अगदी पिकनिकला काढतात तसे या सर्वांचे फोटोही घेतले जातात,
फक्त ते ईथे प्रदर्शित करू शकत नाही ईतकेच 🙂
बरे, पाण्याची आवड तरी किती..
मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर तो सुद्धा जेवढा तडफडत नसेल तेवढा दंगा आमची जलपरी घालते.
या आधी सुट्टीच्या दिवशी कुठे कामानिमित्त बाहेर जायचे असेल, तर आणि तरच आंघोळ करणारा मी..
अन्यथा आंघोळीलाही सुट्टी देत बिछान्यातच लोळत पडणारा मी..
आणि स्साला त्यातच सुख सुख म्हणजे आणखी काय असते असे म्हणनारा मी..
पण हल्ली माझी देखील सुखाची व्याख्या बदलू लागलीय..
हल्ली मी देखील सुट्टीच्या आंघोळीची वाट बघू लागलोय.

.
.

१४ जुलै २०१५

Quiz Time –
पहिल्याच चेंडूवर विकेट काढणारी भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण?
….
ऊत्तर – परी अ नाईक.
विकेट – आपल्याच बापाची.
अनपेक्षित वेगाने येणार्‍या पहिल्याच चेंडूवर अंदाज पार फसला आणि मी क्लीन बोल्ड!
सारे स्टेडियम तिच्या आईच्या शिट्ट्या आणि टाळ्यांनी दणाणून उठले 🙂

.
.

१५ जुलै २०१५

लोकांची एबीसीडी शिकण्याची सुरुवात ” A for Apple ” पासून होते.
आमची ” i for ice cream ” पासून झाली. 🙂

.
.

१६ जुलै २०१५

आम्ही लहान आहोत म्हणून आमचे सर्वांकडून लाड होतात, की आमचा हावरटपणा आमच्या चेहर्यावर दिसून येतो, काही कल्पना नाही.
पण आम्ही मिठाईवाल्याकडे गेलो की न मागता आम्हाला एक पेढा मिळतो.
आम्ही तो संपवतो आणि आणखी एक मागतो. आम्हाला आणखी एक मिळतो.
मेडीकलवाल्याकडे गेलो की चॉकलेट मिळते, मॅकडोनाल्डवाला आईसक्रीम देतो.
हारवाला देखील काही नाही तर एक फूल हातात चिपकवतो.
आम्ही ते देखील तोंडात घालतो.
परवा नाक्यावर सहजच उभे असताना जवळच्या अंडेवाल्याने उकडलेले अंडे ऑफर केले.. आणि मला हसावे की रडावे समजेनासे झाले .. 🙂

.
.

१७ जुलै २०१५

जंगलचा राजा सिंह असेल, पण आमच्यासाठी मात्र तो वाघ आहे.
कारण आमची लायनपरी फक्त तोंडातल्या तोंडात गुरगुरते,
आणि टायगरपरी मात्र सिंघम स्टाईलमध्ये पंजा दाखवत, तोंडाचा आ करून डरकाळी फोडते.

.
.

१८ जुलै २०१५

डेलीसोप मालिका कितीही रटाळ का असेनात, जोपर्यंत त्यांचे टायटल सॉंग हिट आहेत आणि परी त्यावर नाचतेय तोपर्यंत आमच्याघरी त्यांचे स्वागतच आहे.
सध्याची टॉप 3 लिस्ट आहे –
१. दिल दोस्ती दुनियादारी
२. जय मल्हार
३. होणार सून मी या घरची 🙂

 

सुखाची चाहूल… आगमन … अवर्णनीय !

शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती.

तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे. बायोलॉजीचा ‘ब’ सुद्धा माहीत नसलेलो मी, बाप होत असलो तरी याबद्दल जेमतेमच जाणकारी राखून होतो. बायकोने फोनवर ‘जेवलास का आणि भाजी कशी झाली होती’ असे विचारावे त्या थाटात ही बातमी दिली आणि मी कामाच्या वेळी कमीच बोलतो हे माहीत असल्याच्या सवयीने फोन कटही केला. तिच्या आवाजातून चिंतेचे कारण काय अन किती हे देखील समजले नाही. माझे दिवसभराच्याच नाही तर पुढच्या आठवडाभराच्या कामाची प्लॅनिंग मी एक एप्रिल या तारखेच्या हिशोबाने केली होती. त्यातही आजच्या दिवसाचे काम रात्री नऊ पर्यंत चालणार होते. पण आता काय किती बोंबलले याचा हिशोब करायचा प्रश्नच नव्हता. लागलीच लाईन मॅनेजरला कल्पना दिली. त्यालाही अगोदरच याबाबत माहीत असल्याने फारसा काही गोंधळ न घालता त्याने माझ्या हातात असलेले काम दुसर्‍या कोणाला तरी हॅण्डओवर करून मला निघायला सांगितले. पुन्हा बायकोला फोन लाऊन परिस्थितीची कल्पना घेतली, तर संध्याकाळी सावकाश अ‍ॅडमिट झाले तरी हरकत नाही असे समजले. त्यानंतर उद्या वा परवा, किती लवकर पुन्हा ऑफिसचे तोंड बघायला मिळेल याची कल्पना नसल्याने संध्याकाळपर्यंत वेळ घेऊन निदान माझ्यावाचून अडणारी कामे तरी आटोपून घेऊया असे ठरवले. पण बस्स ठरवलेच.! फोन ठेवताक्षणीच जाणवले की आपली छाती तूफान वेगाने धडधडू लागलीय अन श्वास थंड. इथून पुढे कामात लक्ष लागणे कठीणच होते. कामावरची निष्ठा दाखवायची हिच ती वेळ असे मनाला बजावत संध्याकाळपर्यंत जमेल तसे आटोपले आणि निघालो.

तिथे तिची एव्हाना अजून एक डॉक्टरवारी करून झाली होती ज्यात संध्याकाळ ऐवजी दुसर्‍या दिवशी सकाळी अ‍ॅडमिट व्हायचे ठरले होते. डॉक्टरकडून येताना ती मला परस्पर बाहेरच भेटली तेव्हा तिने मला या बदललेल्या वेळापत्रकाबद्दल सांगितले. मात्र उद्या अ‍ॅडमिट झाल्यावर तिथून पुढे काय करणार आणि फायनल रिझल्ट कधीपर्यंत हाती येणार याची मला तोपर्यंत काहीही कल्पना नव्हती. पण त्या आदल्या संध्याकाळी पाणीपुरी खायचा तिचा शेवटचा डोहाळा पुरवताना मला दुपारपासून मनावर आलेले दडपण तेवढे निवळताना जाणवले.

ती रात्र ती तिच्या घरी होती आणि मी इथे माझ्या. रात्री झोपताना आई म्हणाली, उद्या होवो किंवा परवा, दोन्ही चांगले दिवस आहेत. उद्या शिवजयंती तर परवा संकष्टी…
आणि पुन्हा एक अनामिक हुरहूर मनी दाटून आली. म्हणजे उद्या किंवा परवाच,, होणारही होते तर..

सुखाची चाहूल अनुभवण्यातही एक सुख असते हे त्या रात्री जाणवत होते. धडधडत्या छातीने आणि थंड पडत चाललेल्या श्वासांनी, येणार्‍या सुखाच्या वाटेवर डोळे लाऊन बसणे.. कमिंग सून कमिंग सून असे स्वताच स्वताच्या मनाला बजावणे.. ती रात्र माझी तशीच गेली. शिवजयंती की संकष्टी,, मुलगा की मुलगी.. नॉर्मल की सिझेरीअन,, तिच्यासारखे की माझ्यासारखे.. आपल्या मनात काय आहे.. आपल्या मनासारखे होईल का.. जर मुहुर्तच साधायचा असेल तर शिवजयंतीचाच साधू दे, मुलगा वा मुलगी काहीही माझेच असले तरी माझ्या मनासारखी मुलगीच होऊ दे.. याच विचारांत गेली..

परीणामी सकाळी उशीराच उठलो. पाहतो तर वाजलेला अलार्म चुकून झोपेतच बंद केला होता. अरे देवा, आता पुन्हा शिव्या पडणार तर. गेल्या सोनोग्राफीच्या वेळी तिच्याबरोबर जायला न जमल्याच्या शिव्या ताज्या होत्या आणि आज महत्वाच्या दिवशी सुद्धा … सुदैवाने तिलाही घरून निघायला थोडाफार उशीरच झाला होता. तरीही माझ्याआधीच घरच्यांना बरोबर घेऊन ती अ‍ॅडमिट झाली होती. पण आजचा तिचा मूड वेगळाच होता. माझ्या उशीरा येण्यापेक्षा माझ्या येण्याला तिच्याठायी जास्त महत्व होते. मी पोहोचलो तेव्हाच बाईसाहेब मस्त हाताला सलाईन लाऊन बेडवर पहुडल्या होत्या. आता पुढे चार-पाच तासांतच कळा सुरू होऊन पुढे आणखी तासभरातच… ईति तिच्या बहीणींनी पुरवलेली वैद्यकीय माहिती आणि मी एक नजर घड्याळावर टाकली. याचा अर्थ फार तर फार दुपारी दोन वाजेपर्यंत मी बाप होणार होतो. हि वेळ इतक्या समीप आलीय यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. माझ्या डोक्यातून अजूनही ती एक एप्रिलची तारीख बाहेर पडली नव्हती. गेले नऊ महिने एकेक करत मोजत असलेले दिवस आठवू लागले. महिन्याभरापूर्वी ती माहेरी गेल्यापासून या दिवसाच्या प्रतीक्षेत होणारे आमचे रोजचे फोनवरचे बोलणे आठवू लागले. किंबहुना लग्नानंतरचा तो प्रत्येक एक क्षण आठवू लागला ज्यात दडलेल्या भावना कळतनकळत आजच्याच दिवसाची वाट बघत होत्या. येत्या काही तासांतच आमच्या नात्याला आणखी घट्ट करणारी एक कायमस्वरूपी गाठ बांधली जाणार होती.

मी माझ्या घरी फोन करून दुपारी दोनची वेळ कळवून घरच्यांना त्याआधी यायला सांगितले, तिचे घर जवळच असल्याने तिच्या घरचे सारे हजेरी लाऊन गेलेलेच वा गरज पडेल तसे कधीही हजर होतील अश्या हाकेच्या अंतरावरच होते. जवळपास सर्वांनीच रजा टाकल्या होत्या. आपापले सारे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामागे कारणही तसेच होते. दोन्ही घरांमध्ये कित्येक वर्षांनी, तब्बल एका पिढीनंतर आज पहिल्यांदाच बाळाचा रडण्याचा आवाज घुमणार होता, म्हणून हा दिवस सर्वांसाठीच स्पेशल होता. आणि आता सुरू झाले होते ते काऊंटडाऊन .. टिक टिक वन.. टिक टिक दोन…. दोन वाजताची प्रतीक्षा !
रूमवर टाईमपास करायला टिव्ही होता. पण त्याचा रिमोटही हातात घ्यायला कोणाला सुचत नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकताना बघणे हाच सर्वात मोठा विरंगुळा होता. मात्र तो काटा बाराला पार करून दिवसाच्या दुसर्‍या सत्रात पोहोचला तरी अजून काहीतरी घडतेय अशी चिन्हे दिसायला मागत नव्हती. मी पुन्हा माझ्या घरी फोन करून अजून थोडे उशीरा आलात तरी चालेल असे कळवले पण होणार्‍या बाळाच्या आजीआजोबांचा पाय आता घरी टिकणे शक्य नव्हते. रूमवर फारच गर्दी होत असेल तर तिथेच आजूबाजुला भटकू पण आम्ही येतो असे म्हणत ते घरून निघाले. पण ते पोहोचले तरी अजून कश्याचा काही पत्ता नव्हता. दुपारी दोन वाजता तिला चेकींगसाठी मात्र तेवढे नेले. त्यात फारशी प्रगती न दिसल्याने आता संध्याकाळच उजाडेल एवढेच काय ते समजले. मिनिटे मोजायचा उत्साह अजूनही मावळला नव्हता मात्र मनावर आलेले दडपण कमी व्हावे म्हणून आता होईल तेव्हा होईल म्हणत वेळ बघणे थांबवले. दुपारी बाहेर जाऊन जेवण करून आलो, बसल्याबसल्या जागेवरच तासभर पेंगून घेतले, थोडाश्या इकडतिकडच्या गप्पा यांत संध्याकाळ उजाडली देखील. एव्हाना पोटात दुखायला सुरुवात झाली होती मात्र ते दुखणे केवळ छळण्यापुरतेच होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास केलेल्या चेकींगच्या वेळीही पुढच्या चेकींगची वेळ रात्री आठ-साडेआठ वाजताची एवढाच निष्कर्ष निघाला. एखादा क्रिकेटचा सामना पावसामुळे थांबावा, अधूनमधून पंचांनी खेळपट्टीची पहाणी करावी आणि सामना सुरू कधी होईल हे सांगण्याऐवजी पुढची पहाणी अमुकतमुक वाजता होईल असा क्रिकेटरसिकांना टांगणीवर लावणारा निर्णय द्यावा अश्या धाटणीचा खेळ चालू होता. हाडाचा क्रिकेटप्रेमी असल्याने मी आजवर हे बरेचदा अनुभवलेय पण आजच्या अनुभवाची त्या कशाशीही तुलना नव्हती.

आता कदाचित रात्रीच्या मुक्कामाचीही तयारी ठेवावी लागेल म्हणत दिवसभराची मरगळ झटकून ताजेतवाने होण्यासाठी एकेक करून ब्रेक घेण्याचे ठरवले. संध्याकाळच्या सुमारास चहापाण्याच्या निमित्ताने जवळच असलेल्या सासुरवाडीला माझी देखील एक फेरी झाली. पण चहा आणि पाण्याव्यतिरीक्त आणखी काही घ्यायची इच्छा झाली नाही. धावत गेलो आणि पळत आलो असे केले. मधल्या काळात हिच्या पोटातल्या दुखण्याने बर्‍यापैकी जोर पकडला होता. मी परतलो तेव्हा बाईसाहेब पुन्हा चेकींगसाठी गेल्या होत्या. यावेळची स्थिती तुलनेत आशादायी असली तरी एव्हाना ती पार कंटाळली होती. एकीकडे दुखणे वेगाने वाढत होते मात्र सकाळपासूनची प्रगती पाहता आणखी तास दोन तास थांबून काही चमत्कार घडेल अशी आशा तिला स्वताला तरी वाटत नव्हती. सिझेरीयन झाले तरी चालेल पण यातून मला एकदाचे सोडवा या मनस्थितीला ती पोहोचली होती. पण डॉक्टरच म्हणाले, थांबा, शक्य आहे तोपर्यंत नॉर्मलच करूया, जरा कळ काढा..

जरा कळ काढ, या वाक्यप्रचाराचा उगम मी आज माझ्या डोळ्यासमोर अनुभवत होतो. तिची अवस्था आता मलाही बघवत नव्हती. तिच्यासाठी मी काय करू शकत होतो तर ते फक्त तिचा हात हातात पकडून बसू शकत होतो. जितके असह्य व्हायचे तितक्या जोरात ती माझा हात घट्ट आवळायची, याने मी तिच्या वेदना मापू शकत होतो पण त्यांना कमी करू शकत नव्हतो. त्या कमी व्हायचे इंजेक्शन दिले होते मात्र ते निकामी ठरत होते. विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती. होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता.

आता दर दुसर्‍या मिनिटाला कळ निघत होती. माझ्याही हातावरचा दाब वाढत होता. डॉक्टरने पुढच्या आणि कदाचित शेवटच्या चेकींगची दिलेली वेळ अजून तासाभराने होती, तेव्हाही नक्की काय होणार होते, काय डिसीजन घेतला जाणार होते हे ठाऊक नव्हते. जर तोपर्यंत थांबूनही सिझेरीयनच करावे लागणार होते तर का उगाचच थांबायचे हा प्रश्न छळत होता. पुर्ण दिवस निघाला असला तरी हा तास निघणे फार कठीण होते. होणारा त्रास पाहता फक्त आणखी अर्धा एक तासच सहन करायचे हा खरा खोटा दिलासा तरी तिला कसा द्यावा हा प्रश्न होता. त्यामुळे सारेच शांत होते, ज्या धीराची तिला गरज होती तो शब्दांतून नाही तर फक्त स्पर्शातून दिला जात होता.

आजवर सिनेमांमध्ये बघितलेले बाळंतपणाचे सारे प्रसंग डोळ्यासमोर येत होते. दिवसभर एकच प्रार्थना करत होतो की ते सारे तितकेसे खरे नसून अतिरंजीत असावेत, ती केवळ नाटक सिनेमांमधील ओवरअ‍ॅक्टींग असावी, पण आता मात्र हे सारे हळूहळू नजरेसमोर अनुभवायला सुरुवात झाली होती. आता मी देखील घड्याळाकडे पाठ करून बसलो होतो, मागे काटे वेगाने पळत असतील अशी स्वताच्या मनाची समजूत काढत. खरेच तसे होत होते का याची कल्पना नाही पण वेळ मात्र सरकत होती. साडेदहाची वेळ दिली होती, पावणेअकरा वाजता पुन्हा डॉक्टरांचे आगमन झाले. चेकींगसाठी म्हणून तिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. आम्ही सारे बाहेरच जमलो होतो, कारण याच चेकींग नंतर ऑपरेशन करायचे का नाही याचा निर्णय घेऊन त्याची लागलीच अंमलबजावणी होणार होती.

इतक्यात आतून तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. चेकींग हा प्रकार देखील खूप त्रासदायक आहे असे ती संध्याकाळी म्हणाल्याचे आठवले. थोड्याच वेळात एक मदतनीस आतून वेगाने बाहेर आली शेजारच्या रूममधून काही औजारे घेऊन पुन्हा आतल्या दिशेने गायबली. तिच्यापाठोपाठ आणखी एक जण आत गेली. हा प्रकार एक-दोन वेळा घडला आणि कल्पना येऊ लागली की आत काही तरी घडायला सुरुवात झाली आहे. दोनचार वेळा उघडणार्‍या दरवाज्यामधून मी दबकत आत डोकावून बघायची हिंमत दाखवली खरी पण तिथून काहीच दिसत नव्हते याचा खरे तर दिलासाच वाटला. सुरुवातीलाच आलेला तिचा ओरडायचा आवाज त्यानंतर पुन्हा आला नव्हता. आता हे चांगले की वाईट हे मात्र समजत नव्हते ना कसलेही वेडेवाकडे अर्थ लावायच्या मनस्थितीत मी होतो. जेमतेम सात आठ मिनिटे झाली असावीत, तोच लहानग्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि बाहेरच्या तंग झालेल्या वातावरणात कुजबूज सुरू झाली. काही चेष्टा पण किती क्रूर असतात, हा आवाज अगदी विरुद्ध दिशेला असलेल्या एका रूममधून येत होता मात्र तरीही बेसावध मनाने त्याचा पटकन आपल्या सोयीने अर्थ काढला होता. इतकेच नव्हे तर हट्टाने हा आवाज आपलाच आहे हे पटवून द्यायची चढाओढ लागली होती. तो आवाज विरला आणि पुन्हा मिनिटभराची शांतता. वातावरणातील ताण निवळावा म्हणून काही जणांचे तेच पुराने घीसेपीटे विनोद मारणे सुरू झाले, की काही चांगलेही होते, कोणास ठाऊक, पण त्यावेळी मला हसवण्याचा प्रयत्न करणे हेच मुळात माझ्या दृष्टीने हास्यास्पद होते. पण लोकांच्या भावनांची कदर करत ना कोणाला काही बोलता येत होते ना कोणावर काही चिडता येत होते. अन्यथा मला ताटकळत उभा राहण्याऐवजी बसून घे जरा असा सल्ला देणार्‍यांनाही ओरडून शांत राहा सांगावेसे वाटत होते. बाप होतोयस तर आता बापाची जबाबदारी घ्यायला शिक हे वाक्य गेल्या काही महिन्यात कित्येकदा ऐकले होते आणि हसून टाळले होते, पण आता ऑपरेशन थिएटरच्या आत असलेल्या माझ्या बायकोची आणि होणार्‍या मुलाची त्याच्या जन्माआधीपासूनच लागलेली चिंता, हे दडपण, बापाची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे हे स्वताच स्वताला पटवून देत होते.

ईतक्यात पुन्हा एक बारीकसा रडण्याचा आवाज आला. हा आवाज कदाचित अपेक्षित दिशेने आला होता म्हणून पुन्हा सर्वांनी कान टवकारले. नजरेनेच एकमेकांना शांत राहण्याच्या खाणाखुणा झाल्या. दुसर्‍याच क्षणाला तेच ते रडणे, यावेळी मात्र आधीपेक्षा कैक मोठ्या आवाजात, न थांबता येऊ लागले, आणि बाहेर एकमेकांना अभिनंदन करणे सुरू झाले. काही हात माझ्याही दिशेने सरसावले मात्र माझ्या चेहर्‍यावरची चिंतेची रेष अजूनही काही हलायला मागत नव्हती. रडण्याच्या आवाजाने बाळ कदाचित सुखरूप आहे हे नक्की झाले होते पण त्याच्या आईची खुशाली समजणे बाकी होते. ईतर अनुभवी लोकांना कदाचित ते काळजीचे कारण वाटत नसावेही पण….. मी अजूनही वाट बघत तसाच त्या ऑपरेशन थिएटरच्या दारावर उभा होतो. दार उघडले आणि एक नर्स माझ्या मुलीला घेऊन बाहेर आली. मगासच्या रडण्याच्या खणखणीत आवाजावरून कोणीतरी मुलगा आहे असा अंदाज बांधला होता, तेव्हा होणार्‍या बाळात मुलगा मुलगी असेही असते ही बाब डोक्यातच आली नव्हती. पण आता मुलगी आहे असा गलका होताच आठवले की येस्स, मला मुलगीच तर हवी होती. गर्दीच्या सर्वात पाठीमागे उभा राहून मी माझ्या मुलीला कोणाच्या तरी खांद्यावरून डोकावून पाहिले आणि आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीच्या बघताक्षणीच प्रेमात पडलो असे झाले. आजवर मी पाहिलेली सारीच नवजात पिल्ले मला एकसारखीच वाटायची. पण हे वेगळे होते. हे माझे होते. माय लिटील प्रिन्सेस. अभि’ज लिटील गर्लफ्रेंड. तिला पाहताना मला दडपणाच्या उंच कड्यावरून अलगपदणे तरंगत खाली येत असल्याचा भास होत होता. शिवजयंतीच्या मुहुर्ताला राणी लक्ष्मीबाई आली असे कोणीतरी म्हणताच घड्याळावर नजर गेली तर जेमतेम अकरा वाजून गेले होते. बाळ ज्या मुहुर्ताला सुखरुप येते तोच खरा शुभ मुहुर्त याची जाणीव झाली. मुलीचे केवळ क्षणभर दर्शन करवून, तिचे वजन मोजून, तिला पुन्हा आत घेऊन गेले. माझी नजर अजूनही त्या दरवाज्यावरच होती, माझ्यासाठी तो अजून एकदा उघडायचा होता. उघडला, आणि स्ट्रेचरवर झोपूनच माझी बायको हसतमुखाने बाहेर आली. कोण विश्वास ठेवेल की थोड्यावेळापूर्वी हिच बाई वेदनेने नुसते व्हिवळत होती, पण आता मात्र तिच्या चेहर्‍यावर एक तृप्तीचे समाधान दिसत होते. की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना. ते जे काही होते ते हळूहळू माझ्याही चेहर्‍यावर पसरत असल्याचे मला जाणवत होते. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो …

न्यू बॉर्न फादर
तुमचा अभिषेक