————————————————– भाग १ ————————————————–
आई.. आई.. आयई ग्ग..!! शमीन’ने एक कचकचून आळस दिला. ट्रींग ट्रींग.. ट्रींग ट्रींग.. ट्रींग ट्रींग.. ठप्प.. वाजणारा अलार्म बंद केला आणि ताडकन उठून दोन्ही हात गर्र्कन फिरवत आळस झटकून दिला.
“अरे आजकाल काय चालू आहे तुझे? रोज वेळेवर उठतोस”, आई कौतुकानेच म्हणाली.
“अग, सांगितले ना, हल्ली नियम खूप कडक झालेत, त्यात नवीन बॉस आलाय, जावे लागते ग मग अश्यावेळी काही दिवस वेळेवर.” सहजपणेच शमीन’ने उत्तर दिले.
पण शेवटी त्याचीच आई ती. त्याला पुरते ओळखून होती. नेहमी अर्धवट झोपेत तयारी करणारा आपला चिरंजीव आजकाल उड्या मारत ऑफिसला जातो, तयारी करायला जरा उशीर झाला की आता पुढची बांद्रा लोकलच पकडेन असे बोलून खुशाल आणखी अर्धा तास लेट करणारा हा दिवटा हल्ली गरम चहा सुद्धा घाईघाईत ढोसतो पण ७.४५ ची ट्रेन काही चुकवत नाही, यामागे काहीना काही भानगड आहे हे समजन्याएवढी नक्कीच हुशार होती. अर्थात शमीन सुद्धा काही कमी चलाख नव्हता. म्हणतात ना, की एक खोटे लपवायला शंभर खोटे बोलावे लागतात, शमीन हजार बोलायचा, पण बेट्याला आजपर्यंत कधी अजीर्ण झाले नव्हते. मारलेली प्रत्येक थाप पचवून जायचा. पण यावेळी मात्र त्याचा चेहरा त्याची साथ देत नव्हता. एखादी थाप मारताना जे निर्ढावलेले भाव चेहर्यावर लागतात, ते ठेवायची कला कुठेतरी हरवून बसला होता. स्वारी प्रेमात जी पडली होती. आता कितव्यांदा हे विचारू नका, पण दरवेळीप्रमाणे यावेळी सुद्धा त्याला खात्री होती की हीच आहे ती अप्सरा, गुलबकावली, बहारों की मलिका. काहीही झाले तरी ही मिळालीच पाहिजे. एकदा हिने होकार दिला की हिच्याशी लग्न करायचे आणि आपला राजाराणीचा संसार थाटायचा. तसेही पोरी पटवने, त्यांना फिरवणे, आणि मग लग्नाचा विषय निघाला की टांग देणे हे त्याच्या स्वभावातच नव्हते. तसे असते तर त्याच्यासारख्या M.E.M.B. मुलाच्या, म्हणजे त्याच्याच भाषेत “Most Eligible Marathi Bachelor” मुलाच्या आजतोवर पाच-सहा गर्लफ्रेन्ड तरी नक्की झाल्या असत्या. पण मुली पटवण्यासाठी छान दिसणे, स्टायलिश वागणे, हुशार, सर्वगुणसंपन्न आणि निर्व्यसनी असणे पुरेसे नसते. इथे गरज असते ते त्यांच्याशी बिनधास्त बोलायची. आणि नेमकी इथेच शमीन’ची बोंब होती. मुलांशी बोलताना तो एकदम बोलीबच्चन अमिताभ बच्चन असायचा पण मुली समोर आल्या की मात्र त्याचा अमोल पालेकर व्हायचा. या बाबतीत तो एकदम लाजरा होता. तोंडातून साधा एक शब्दही फुटायचा नाही. आणि जगात अशी एकही लवस्टोरी नसेल की ज्यात अधेमधे काहीही न बोलता मुलगा मुलीला ‘आय लव्ह य़ु’ म्हणाला आणि तिने त्याला होकार दिला. तरीही आपल्या बाबतीत असेच काहिसे होईल या भाबड्या आशेवर शमीन पुन्हा एकदा एकीत गुंतला होता.
७.४५ ची ट्रेन ७.४७ ला आली. मुंबईमध्ये याला दोन मिनिटे उशीरा आली असे बोलतात. आणखी एखादा मिनिट उशीर झाला असता तर कदाचित त्याची माहीमवरून कनेक्टेड ८.०७ ची बोरीवली चुकली असती आणि त्या दोघांची चुकामुक झाली असती. तसे ती या ट्रेनला असतेच असे नाही पण याबाबत शमीनला कसलाच धोका पत्करायचा नव्हता, कारण एखादा दिवस जरी ती दिसली नाही तरी आयुष्यातील एक दिवस फुकट गेला असे त्याला वाटायचे. हे दिसणे म्हणजे तरी काय.. जेमतेम पंधरा मिनिटांचा खेळ होता, पण तिचे ते दर्शन, ती हलकीशी झलक, दिवसभरासाठी त्याला ताजेतवाणे करून टाकायची. तिचा प्रसन्न चेहरा नजरेस पडला की त्याला असे वाटायचे, की आहा..! आता खरी सकाळ झाली..!
माहीमच्या आधी ती कुठे चढते, कुठे राहते हे शमीनला आजवर माहीत नव्हते. त्याला तिचे दर्शन व्हायचे ते थेट कांदिवली स्टेशनलाच. चुकामुक होऊ नये म्हणून तो लवकरात लवकरची ट्रेन पकडून, वेळेच्या १५-२० मिनिटे आधीच पोहोचून, स्टेशनबाहेर तिची वाट बघत उभा राहायचा. आजही तसाच ताटकळत उभा होता, एका आडोश्याला, कोणी ऑफ़िसमधील बघू नये या भीतीने. खरे तर भिती अशी त्याला कोणाच्या बापाची नव्हती किंवा कोणी पाहिले आणि विचारले, इथे काय करतो आहेस तर उगाच ओशाळल्यासारखे होईल, असेही काही नव्हते. पण तरीही त्याला या विषयाची चर्चा व्हायला नको होती. म्हणून ही काळजी..
इतक्यात ती येताना दिसली… हजारोंमध्ये.. अगदी हजारोंमध्ये नसले तरी लेडीज डब्यातून बाहेर पडणार्या शंभर-एक बायकापोरींच्या थव्यात तरी तो तिला नेमके हुडकायचा.
आजही तेच झाले. जशी ती आली तसा तो लगोलग तिच्या मागे जाऊन बसच्या रांगेत उभा राहिला. असे करणे भाग होते कारण त्या दोघांच्या ऑफिसला जाणार्या दोन कॉमन बस होत्या आणि दोन्हींच्या रांगा वेगळ्या होत्या. जी बस आधी येईल ती बस पकडायची. पण ‘ती’ मात्र बर्याचदा गर्दी बघून एखादी बस सोडून द्यायची. त्यामुळे शमीन नेहमी तिच्या मागेच उभा राहून ती ज्या बस मध्ये चढायची तीच बस पकडायचा. आजही अगदी तिच्या मागेच उभा होता. जवळपास कोणी ऑफिसमधील बघत तर नाही ना म्हणून एक नजर फिरवली तर नेमका सौरभ नजरेस पडला.
सौरभ हा त्याच्याच ऑफिसचा. दोनेक महिन्याभरापूर्वीच जॉईन झाला होता. तो सुद्धा रोज याच मार्गाने प्रवास करायचा. पक्का बी.बी.सी. न्यूज होता. एखादी गोष्ट त्याला समजली की गावभर पसरलीच म्हणून समजा. त्यामुळे त्याला आपले हे प्रकरण समजू नये याची काळजी घेणे शमीनच्या दृष्टीने गरजेचे होते.
इतक्यात सौरभनेच शमीनला हाक मारली, “ए शम्या..” जसे शमीनने त्याच्याकडे पाहिले तसे त्याने नजरेनेच एक इशारा केला, ज्याचा अर्थ होता की काय मस्त आयटम उभी आहे रे तुझ्या पुढे… आणि नेमके शमीनच्या दुर्दैवाने तिने हे पाहिले. तिच्या चेहर्यावरचे भाव पाहून शमीनला समजले की ती काय समजायचे ते समजली आहे. शमीनची आता परत तिच्याकडे बघायची हिम्मत काही झाली नाही. त्यानंतर मग पुढच्या पंधरा मिनिटांच्या बसच्या प्रवासात तिनेही त्याच्याकडे पाहिले नाही. तसेही कुठे रोज बघत होती म्हणा. एकतर्फीच तर होते हे प्रेम. अजूनपर्यंत तिला त्याचे हे असे आपल्या मागे मागे फिरणे समजले आहे की नाही याचीही त्याला खबर नव्हती. त्याचे अस्तित्व तरी तिला जाणवले आहे की नाही याचीही खात्री नव्हती. आणि त्याला तरी कुठे काय माहित होते तिच्याबद्दल, हेच की रोज त्याच्याबरोबर बसने प्रवास करते, त्याच्या ऑफिसच्या पुढच्या स्टॉपला कुठेतरी उतरते. तिथे ती कुठे कामाला आहे, काय काम करते, अजून पावेतो काहीच ठाऊक नव्हते. पण तरीही ती संध्याकाळी सहा-सव्वासहाच्या बसला असते हेच त्याच्यासाठी पुरेसे होते… अरे हो… तिचे नाव… ते राहिलेच… गेले २०-२५ दिवस शमीन तिच्या पाठी होता पण अजून तिचे नाव जाणून घेण्यात देखील त्याला यश मिळाले नव्हते. खरे सांगायचे तर त्याला याची बिलकुल घाई नव्हती. आपल्या नशीबात जी मुलगी असेल ती आपल्याला हातपाय न झाडता मिळणार, कारण जोड्या तर वर स्वर्गातच जुळल्या असतात, उलट झगडून विधीलिखित बदलायला गेलो तर उगाच नको ती मुलगी गळ्यात पडायची, असा काहीसा जगावेगळा फंडा होता त्याचा.
ऑफिसमध्ये पोचल्यावर सौरभ समोर आला तश्या चार शिव्या घालाव्या असे शमीनच्या मनात आले. पण त्याने भावनेला आवर घातला. कारण तिच्याबद्दल काही कोणाला सांगायचे नव्हते वा कोणाचे काही ऐकायचे नव्हते. तसे एखाद्या जवळ मन मोकळे करावे, तिच्याबद्दल तासनतास गप्पा माराव्यात असे त्याला बर्याचदा वाटायचे. बरेच काही यायचे मनात, कुठेतरी ते खाली करणे गरजेचे होते. पण कुणाजवळही मन मोकळे करावे असा हा विषय नव्हता. किंबहुना त्यालाच तो चर्चेचा, थट्टेचा विषय बनवायचा नव्हता. ऐकणार्यालाही त्या भावनांची कदर असने गरजेचे होते. सहज त्याच्या मनात आले की का नाही मग डायरी लिहायची. सारे काही जे हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवले आहे ते कोर्या कागदावर रिते करायचे. स्वताच लिहायचे, स्वताच वाचायचे. आपल्यापेक्षा प्रकर्षाने त्यातील भावना कुणाला उमजणार होत्या. ठरले तर मग. एवढे दिवस ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पडून असलेल्या डायरीवरची धूळ झटकली. त्यावरचे साल पाहिले तर “२०१०”. क्षणभर स्वताशीच हसला. दोन वर्षांपूर्वीची होती. आजवर कधी त्याने कामाच्या निमित्तानेही डायरी लिहिणे हा प्रकार केला नव्हता आणि आज चक्क दैनंदिनी लिहायला घेणार होता. पण ही दैनंदिनी जरा अनोखी असणार होती. यातील प्रत्येक शब्दात, प्रत्येक वाक्यात फक्त ती, ती आणि तीच असणार होती. तिचे दिसणे, तिचे हसणे. तिचे बोलणे, तिचे वागणे, तिचे आपल्या आयुष्यात असणे… अजून एकही शब्द लिहिला नव्हता पण तरीही त्याला मनात आतून कुठेतरी वाटत होते की एक अमरप्रेमकहानी जन्मास येणार आहे.
……………………………………………………………………………………………………
आज सोमवार. मध्ये दोन दिवस शमीनला सुट्टी असल्याने आणि आदल्या शुक्रवारी ती न दिसल्याने आज दिसावी अशी उत्सुकता जरा जास्तच होती. सुदैवाने ती जास्त ताणली गेली नाही. पहिल्याच ट्रेनला तिचे दर्शन झाले. आज ती देखील लवकर आली होती. फिकट बदामी रंगाच्या ड्रेसमध्ये ती काहीतरीच झकास आणि लाजवाब दिसत होती. केस मोकळे सोडले होते, कदाचित धुतले असावेत. बसच्या रांगेला आज फारशी गर्दी देखील नव्हती. शमीन तिच्या मागोमाग जाऊन उभा राहिला.. नेहमीसारखाच.. पण आज मात्र तिच्या केसांचा वास त्याला मोहरून टाकत होता. सकाळचे कोवळे उन आणखी कोवळे वाटू लागले होते. जणू नुकतीच पहाट झालीय आणि तो तिच्या केसांची चादर अंगावर ओढून उबदार बिछान्यात पहुडलाय. बाहेर येण्याची इच्छाच वाटत नाहिये. इतक्यात रांग पुढे सरकली आणि तिने आपल्या मानेला असा काही झटका दिला की तिच्या अर्धवट सुकलेल्या केसांत तो पुरता न्हाऊन निघाला. पण दुसर्याच क्षणी भानावर आला. रांग पुढे निघून गेली होती. अश्यावेळी आपल्या चेहर्यावरचे भाव कोणी पाहिले तर नाही ना म्हणून सहज आजूबाजूला नजर टाकली तर नेमका सौरभ हसताना दिसला. तो शमीनसाठी लकी होता की पनवती होता देवास ठाऊक पण आजच्या डायरी मध्ये त्याचा उल्लेख करणे शमीनला भाग होते. त्याने ठरवलेच होते मुळी. जे काही, जसे काही घडेल, ते जराही काटछाट न करता लिहायचे. त्याक्षणी मनात येणारे सारे विचार भले हास्यास्पद वाटले तरी प्रामाणिकपणे कागदावर उतरवायचे. वर्षभराने परत कधीतरी ते पान वाचताना त्या शब्दांतील उत्कटता आपल्याला तेव्हाही तितकीच जाणवली पाहिजे.
ऑफिसमध्ये पोहोचल्यावर शमीनने नेहमीच्या शिरस्त्यानुसार काल संध्याकाळी तसेच आज सकाळी काय काय घडले ते लिहायला घेतले. एखादा तपशील चुकला किंवा भावना योग्य शब्दात मांडता आल्या नाहीत तर तीच ओळ तो पुन्हा लिहायचा पण आधी लिहिलेले काही खोडायचा नाही. कधी पुढचे मागे व्हायचे, मागचे पुढे जायचे, सारा घटनाक्रम उलटसुलट व्हायचा. वाक्यरचना तर अगदी चौथीतल्या मुलासारखी असायची. पण त्याला याच्याशी घेणेदेणे नव्हते. तो काही नामवंत लेखक नव्हता की ही एखादी कादंबरी नव्हती जी त्याला प्रकाशित करायची होती. ज्या वेगाने विचार डोक्यात यायचे त्याच वेगाने तो ते लिहून काढायचा, अक्षराची पर्वा नव्हती. कधी पाच मिनिटात संपायचे तर कधी वीस-वीस मिनिट लिहीत राहायचा, तर कधी अर्धा तास काय लिहावे हे सुचण्यातच जायचा. पण आज सकाळचा अनुभव मात्र जितके लिहावे तितके कमी असा होता. अगदी गुंग होऊन त्याचे लिखाण चालू होते. कधी सौरभ त्याच्या पाठीशी येऊन उभा राहिला हे त्याला समजलेच नाही. जाणवले तसे दचकून वळला तर पाहिले की सौरभ वाचायचा प्रयत्न करत होता. हो प्रयत्नच.., कारण शमीनचे कोंबडीचे पाय वाचने एवढी साधी सोपी गोष्ट नव्हती. तरीही सौरभला त्यात आपले नाव दिसलेच. त्यामुळे नक्की काय लिहिले आहे हे जाणून घ्यायची त्याची उत्सुकता स्वाभाविकपणे चाळवली गेली. ‘जगात तूच एक सौरभ आहेस का?’ असा नेहमीचा बाळबोध युक्तीवाद करून शमीनने वेळ तर टाळून नेली, पण आता ही डायरी इथे ऑफिसमध्ये ठेवणे सुरक्षित नाही म्हणून त्याने आजच घरी न्यायची ठरविले.
……………………………………………………………………………………………………
शमीनने डायरी लिहायला घेऊन आज १५-१६ दिवस झाले होते. पण अजूनपर्यंत आदल्या दिवशीची डायरी काही त्याने वाचली नव्हती. त्याला वाटायचे की आधीचे वाचले तर पुढच्या लिखाणावर त्या विचारांचा प्रभाव पडेल आणि रोजच्या विचारांशी प्रामाणिक राहणे जमणार नाही. पण अखेर न राहवून आज रविवारचा मुहुर्त साधून त्याने ती वाचायला घेतलीच.
६ जुलै २०१२ – मंगळवार
आज डायरी लिहायचा पहिलाच दिवस… दिसली ती.. आज सकाळीच… गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता… मला जराही आवडत नाही हा रंग… खासकरून स्वताला घालायला… पण तिला किती मस्त दिसत होता… जणू काही एखादे टवटवीत गुलाब… तिच्याकडे पाहून मला स्वताला फ्रेश झाल्यासारखे वाटले… संध्याकाळी मात्र पत्ता नव्हता तिचा कुठे… तिच्या स्टॉपवरून येणार्या प्रत्येक बसमध्ये डोकावून पाहिले… पण ती कुठेच दिसली नाही…
७ जुलै २०१२ – बुधवार
आज जरा लेट आली ती… अजून एखादी ट्रेन लेट आली असती तर फुकट मला लेट मार्क लागला असता तिच्या नादात…. आज तिने निळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर आकाशी रंगाचा शॉर्ट सदरा घातला होता… खास म्हणजे डोळ्यावर.. अंह.. डोक्यावर.. गॉगल देखील चढविला होता… प्रत्येक पेहराव किती सूट होतो ना तिला… रोज सलवार कुर्ता आणि पंजाबी ड्रेस घालून येणारी आज या गेटअप मध्ये खूप मॉडर्न आणि डॅशिंग वाटत होती.. आज नुसता खालपासून वरपर्यंत न्याहाळत होतो मी तिला… संध्याकाळी देखील दिसली आज… सकाळचा तिचा ड्रेस आणि तिचे रुपडे डोळ्यात एकदम फिट्ट बसले असल्याने बसमध्ये डोकावताच ती नजरेस पडली… धावत जाऊन बस पकडली… असे वाटले की कदाचित तिला जाणवले असावे की रोज एक मुलगा बसमध्ये डोकावून बघतो आणि आपण नजरेस पडल्यावर पटकन बस पकडतो.. तिने मागे वळून पाहिलेही की मी कुठे बसलो ते.. निदान मला तरी तसे वाटले की ती मला बघायलाच वळली असावी… काही का असेना… तिने माझ्या अस्तित्वाची नोंद घेतली ही जाणीव खरेच सुखावणारी होती…
९ जुलै २०१२ – शुक्रवार
आज सकाळी कुठेच दिसली नाही.. लवकरच्या ट्रेनला आली असावी का.. की लेट आली असावी.. निदान आली तरी असावी का..?? … नाहीतर मग संध्याकाळीदेखील दिसणार नाही… फुकट लेट मार्क पण झाला… सोनालीला सांगून पंच टाईम अॅडजस्ट करून घ्यावा लागणार आता… आलीच नसावी आज.. हो नव्हतीच आली… संध्याकाळी पण दिसली नाही.. शुक्रवारीच का असे व्हावे…?? … आता परत दोन दिवस सुट्टी आहे…
सोमवारची तर जवळपास दीड-दोन पाने भरली होती. त्यादिवशी दिसतच अशी होती ना की तिच्या वर्णनातच एक पान खर्ची पडले होते. पुन्हा पुन्हा शमीन ते वाचतच होता. तसाच्या तसा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. जणू कालच घडला होता. डायरी लिहायच्या कल्पनेचे चीझ झाल्यासारखे वाटून स्वताच स्वताची पाठ त्याने थोपटवून घेतली.
१४ जुलै २०१२ – बुधवार
आज पुन्हा गुलाबी रंगाच्या ड्रेस मध्ये होती… पण आजचा ड्रेस वेगळा होता… आधीच्यापेक्षा फिकट शेड होती… किती वेगवेगळे ड्रेस होते तिच्याकडे… अजूनपर्यंत एकही रिपीट केलेला आठवत नव्हते… मलाच मग माझी लाज वाटू लागली.. महिनाभर आलटून पालटून दोनच पॅंट… शर्ट काय तो बदलून बदलून वापरतो मी..
१५ जुलै २०१२ – गुरुवार
आज बस मध्ये मागे खूप गर्दी होती… पुढे महिलांच्या जागा मात्र बर्यापैकी खाली होत्या… तरीही काही बायका तिथे बसायच्या सोडून मागे आमच्या जागा का उगाच अडवतात..?? डोक्यात जातो हा प्रकार… उगाच उभे राहायला लागते अश्यावेळी… तिच्या बाजूला देखील जागा खाली होती… पण तिथे बसायचे धारिष्ट्य कोण दाखवणार…?? साधा तसला विचार देखील मनात आणायची हिंमत नव्हती माझ्यात… आणि कोणा महिलेने उठवले असते तर फुकट इज्जतीचा पंचनामा झाला असता… तेवढ्यात अपंगांची सीट खाली झाली… इथे बसायला हरकत नव्हती.. उभे राहण्यापेक्षा हे बरे… कोणी आलाच अपंग तर बघू असे म्हणून बसलो… पण ही सीट एकदम पुढे होती… इथून तिला बघायचे म्हणजे मागे वळावे लागणार होते… जे माझ्याच्याने शक्य नव्हते.. पण तिला मात्र मी पाठमोरा का होईना व्यवस्थित दिसत होतो… जर तिची बघायची इच्छा असेल तर…!! … पूर्ण प्रवास मी आज याच गोड समजात (की गैरसमजात?) पार पाडला, की तिचे डोळे माझ्यावर रोखले आहेत…
१६ जुलै २०१० – शुक्रवार
आज देखील ती दिसली नाही.. मागच्या शुक्रवारी देखील नव्हती… जाते कुठे ही शुक्रवारी…?? … संध्याकाळी दिसायची अपेक्षा नव्हतीच तरी सवयीने बसमध्ये डोकावून बघत होतो.. वेड्या आशेने… वेडीच ठरली..!
१९ जुलै २०१० – सोमवार
आज तर ती परी..अप्सरा..बहारोंकी मलिका वाटत होती.. पांढराशुभ्र वेष परिधान केला होता.. तिचे सगळे ड्रेस एकीकडे आणि आजचा एकीकडे.. तसे तर मला हे रोजच वाटायचे.. रोज ती मला वेगळीच भासायची.. आदल्या दिवशीपेक्षा वेगळी आणि जास्त सुंदर.. माझा स्टॉप आला तरी आज उतरावेसे वाटत नव्हते.. संध्याकाळी परत दिसली नाही तर.. आताच डोळे भरून बघून घ्यावे.. पण दिसली संध्याकाळी.. जेवढी फ्रेश सकाळी दिसत होती तेवढीच आताही.. नेहमीसारखा बसमधून उतरल्यावर तिच्या पाठी-पाठी स्टेशनपर्यंत गेलो.. ठराविक अंतर ठेऊन… बघता बघता ती प्लॅटफॉर्मवरच्या बायकांच्या घोळक्यात हरवून गेली.. त्यानंतर मात्र तिथे त्या दिशेने एकटक बघायची माझी कधी हिम्मत होत नाही… ट्रेन आली आणि तिला घेऊन गेली.. मी सुद्धा तीच ट्रेन पकडली.. पण तिला ट्रेनमध्ये चढताना शेवटपर्यंत बघून मगच धावत जाऊन पुरुषांच्या डब्ब्यात चढलो…
…………………
………….
…..
२० जुलै… २१ जुलै.. २२ जुलै…. ६ जुलैपासून २३ जुलैपर्यंतची सारी डायरी शमीनने वाचून काढली. वरवर पाहता प्रत्येक पानात प्रत्येक दिवसात एक आठवण लपली होती, पण सगळ्याचा एकत्रित विचार करता एकसुरीपणा जाणवू लागला होता. रोज तिचे येणे, न येणे, तिच्या कपड्यांचा रंग, तिची बसमध्ये बसायची जागा, सहज म्हणून तिची आणि त्याची नजरानजर होणे, संध्याकाळी परतताना पुन्हा तिच्याच बसमध्ये चढणे, स्टेशनपर्यंत तिचा पाठलाग करणे आणि शेवटी ती ट्रेनमध्ये चढेपर्यंत नजरेनेच तिला साथ देणे.. सारे काही तेच तेच.. बारीकसारीक तपशील काय तो थोडासा बदलायचा. उद्या आता परत असेच काहीसे घडणार होते आणि शमीन त्या परिस्थितीत पुन्हा तसेच काहीसे वागणार होता. आजवर त्याने याची पर्वा कधी केली नव्हती. म्हणजे आपल्या दोघांत काही घडलेच पाहिजे, ती आपल्याला लवकरात लवकर मिळालीच पाहिजे अशी काही त्याला घाई नव्हती. जे काही चालू होते त्यात तो खुश होता. तिला लांबूनच बघण्यात तो समाधानी होता. तिची एक झलक त्याला दिवसभरासाठी पुरेशी होती. रोज रात्री झोपताना उद्या सकाळी आपल्याला ती दिसणार आहे एवढीच जाणीव त्याला सुखावणारी होती. भले याला कोणी अल्पसंतुष्ट का म्हणेना पण हीच त्याची सुखाची व्याख्या होती.
पण….. मात्र…. आता….
या डायरीने त्याला वेगळा विचार करायला भाग पाडले होते. गेले पंधरा-वीस दिवस तो नियमित डायरी लिहित होता, ती अशी अचानक थांबवने त्याला जमणार नव्हते. आणि तेच तेच लिहिणे, तेच तेच वाचणे त्याला आवडेनासे झाले होते. आता यापुढे ही डायरी पर्यायाने आपली लवस्टोरी ईंटरेस्टींग होईल असे काही तरी झाले पाहिजे, असे काही तरी घडले पाहिजे असे त्याला आता वाटू लागले होते. उद्या असे झाले तर मजा येईल, उद्या तसे झाले तर किती छान, असा नुसता विचार करून तर ते घडणार नव्हते ना. रोज रात्री झोपायच्या आधी तो जे हे स्वप्नरंजन करायचा ते प्रत्यक्षात आता त्यालाच उतरवायचे होते. म्हटले तर अवघड होते पण अशक्य नव्हते. हळूहळू का होईना, आपले ध्येय निश्चित करून आता एकेक पाऊल टाकणे गरजेचे होते. याची सुरुवात आता उद्यापासूनच करायची असे त्याने पक्के ठरवले. उद्याच नव्हे तर येत्या काही दिवसात काय काय करायचे याची मनातल्या मनात उजळणी करतच तो झोपी गेला. पण खरेच शमीनला हे जमणार होते का हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच होता…
.
.
…………………………………………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………………………………………
————————————————– भाग २ ————————————————–
…………………………………………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………………………………………
.
.
आज बसमध्ये मागच्या बाजूला बसायला जागा असून देखील शमीन तिथे बसला नाही. मुद्दाम पुढे लेडिज सीटच्या जवळ जाऊन उभा राहिला. आज त्याला तिला केवळ लांबून बघायचे नव्हते तर तिचा सहवास अनुभवायचा होता. जसे पुढचे काही जण उतरले तसा तो आणखी थोडा पुढे सरकला, जेणे करून तिच्या नजरेच्या अगदी समोरच येईल. पण तिचे त्याच्याकडे जराही लक्ष नव्हते.
“काय त्या खिडकीच्या बाहेर बघतेय देव जाणे. रोज रोज तोच रस्ता तर बघायचा आहे ना, मग आज जरा आत बघ, कोण उभा आहे तुझ्यासमोर ते…” शमीनचे स्वताशीच विचार चालू होते.
रोज मागच्या सीटवरून बघतानाही ती आपल्या जवळच कूठेतरी असल्यासारखे त्याला वाटायचे. पण आज तिच्या समोर उभा राहून देखील दोघांमधील अंतर त्याला जास्त जाणवत होते. क्षणभर वाटले, का इथे असे आपण वेड्यासारखे ताटकळत उभे आहोत, मागे जाऊन गप बसून घ्यावे. पण पाय काही हलत नव्हते. त्याने मनोमन पक्के ठरवले होते की काही घडत नसेल तर घडवायचे. कसेही करून तिचे लक्ष आपल्याकडे वेधायला हवे, नाहीतर काही मिनिटातच आपला स्टॉप येईल आणि…. त्याची विचारचक्रे फिरू लागली… आणि एकाएकी त्याला काहीतरी सुचले.. येस्स.. पटकन त्याने खिशातून मोबाईल काढला आणि रिंगटोन सिलेक्ट करायच्या बहाण्याने एकदोन टोन मोठ्या आवाजात वाजवल्या. सोपीशीच युक्ती, पण कामी आली. तिचे लक्ष गेले. आजची त्यांची ही नजरानजर क्षणभरापेक्षा जास्तच होती. त्यानंतरही तिने त्याच्याकडे २-३ वेळा पाहिले. आज पहिल्यांदा त्याने काहीतरी ठरवून केले होते, आणि ते मनासारखे घडले होते. छोटासाच का असेना हा त्याचा पहिला विजय होता. आज डायरी मध्ये काहीतरी वेगळे लिहायला मिळेल म्हणून स्वारी खुश झाली. संध्याकाळी देखील घरी जाताना आता मागे न बसता तिच्या जवळ उभे राहायचे असे त्याने ठरविले. एवढे दिवस मी तुझ्या मागे आहे, तुला बघण्यासाठी रोज सकाळी लवकर उठतो, तुझ्या वाटेवर डोळे लावून रोज सकाळ संध्याकाळ ताटकळत बसतो याची तिला जाणीव करून देणे हे त्याचे पहिले उद्दीष्ट होते. मग पुढे तिचा प्रतिसाद कसाही असेल, त्याला आता याची फिकिर नव्हती. पण दुर्दैवाने संध्याकाळी ती दिसलीच नाही…
सकाळी रोज दिसते पण मग संध्याकाळी नियमितपणे का दिसत नाही? कधी दिसते कधी नसते… तिची ऑफिस सुटायची वेळ बदलत असावी का सारखी?? की ओवरटाईम करते..?? या प्रश्नांचा छडा आता त्याने लवकरच लावायचे ठरवले.
पुढच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे स्टेशनबाहेर तो तिची वाट बघत उभा होता. समोरून ती येताना दिसली. पण आज ती एकटी नव्हती. तिच्याबरोबर तिची एक मैत्रीण देखील होती. दोघींच्या बोलण्याचालण्यावरून असे वाटत होते की त्या दोघी जुन्या मैत्रीणी असाव्यात. बसच्या रांगेत उभा राहून तो त्यांचे बोलणे ऐकायचा प्रयत्न करू लागला. ती तिची खास मैत्रीण होती. दोघी नेहमी एकत्रच प्रवास करायच्या. एवढे दिवस ती शमीनला कधी दिसली नव्हती कारण बाळंतपणाच्या मोठ्या सुट्टीवरून आजच परत आली होती. दोघींच्या बोलण्यात देखील हाच विषय चालू होता. तेवढ्यात बस आली आणि तिच्या मैत्रीणीने तिला हाक मारायला म्हणून तिचे नाव पुकारले, तसे शमीनचे कान टवकारले गेले. नक्की काय म्हणाली ती, “चल अमू.. बस आली..”. अमू..?? की आणखी काय..?? असे कसे नाव..?? ऐकण्यात तर काही चूक झाली नाही ना.. इतक्यात पुन्हा एक हाक कानावर पडली. अमू… हा अमूच होते. अमू.. अमू.. अमृता.. हेच नाव पहिले डोक्यात आले. तसेही काय फरक पडत होता, अमृता असो वा अस्मिता.. शमीनसाठी ती आजपासून त्याची अमूच होती.
आज बसमध्ये फार गर्दी होती. बसायला जराही जागा नव्हती. तसेही शमीनला बसण्यात ईंटरेस्ट कुठे होता. पुढे जाऊन तो त्यांच्या मागेच उभा राहिला. आज तिलाही बसायला मिळाले नव्हते. दोन मैत्रिणी बर्याच दिवसांनी भेटल्या होत्या. तूफान गप्पा चालू होत्या. आज पहिल्यांदा तिचा आवाज त्याच्या कानावर पडत होता. अमृतासारखाच गोड आवाज, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुस्पष्ट उच्चार. एखाद्याच्या बोलण्याचा पद्धतीवरून तसेच शब्दांच्या उच्चारावरून त्याच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृतपणाचा अंदाज बांधता येतो असे म्हणतात. शमीन मनोमन सुखावला होता, आपली निवड काही चुकली नाही असे त्याला वाटू लागले. असेही त्याने आपल्या या आकर्षणाला प्रेम हे नाव दिलेच होते. तेच प्रेम आता आणखी गहिरे झाले होते.
बोलताना तिने एकदोनदा मागे वळूनही पाहिले. दोनच दिवसाच्या प्रयत्नात शमीनचे अस्तित्व तिला जाणवू लागले होते, ही आजची आणखी एक जमेची गोष्ट होती.
आजच्या डायरीत लिहिण्यासारखे बरेच काही होते. कारण आज त्या दोघींमधील संभाषणामुळे शमीनला बर्याच नवीन गोष्टी समजल्या होत्या. स्मिता, तिची मैत्रीण. दोघी कॉलेजपासूनच्या मैत्रीणी होत्या. शमीनच्या ऑफिस जवळच्या एका औषधांच्या कंपनीमध्ये कामाला होत्या. नक्की काय काम करत होत्या हे त्याला समजले नाही, पण जेवढे शमीनचे थोडेथोडके ज्ञान होते त्यांच्या क्षेत्राबद्दल त्यावरून त्या Quality Assurance डिपार्टमेंटमध्ये असाव्यात असा अंदाज त्याने बांधला. राहायला देखील दोघी जवळपास एकाच एरीयात असाव्यात, म्हणजे आजपासून त्यांचे जाणे-येणे ही एकत्रच होणार होते. थोडक्यात ही स्मिता शमीनच्या प्रेमकहाणीतील एक मुख्य सहाय्यक पात्र आणि साक्षीदार होणार होती. त्यामुळे तिची नोंद तर डायरीत खासच होती. शमीनचे पुढचे टारगेट आता तिची मैत्रीण स्मिताच होती. अमृताच्या आधी हिच्या मनात स्वताची चांगली इमेज तयार करणे गरजेचे होते. कारण या खास मैत्रीणी पत्त्यांच्या डावातील जोकरसारख्या असतात. या डाव बनवू ही शकतात आणि मनात आणले तर बिघडवू ही शकतात.
पुढचे चार-पाच दिवस विशेष असे काही घडले नाही, पण मागच्यापेक्षा रूटीन नक्की बदलले होते. हल्ली शमीन बसमध्ये नेहमी तिच्या जवळ जाऊन उभा राहायचा. भले मग मागे बसायला जागा रिकामी असली तरी पुढेच जायचा. आणि तिला हे जाणवल्याशिवाय राहिले नव्हते. कदाचित तिच्या मैत्रिणीने, स्मिताने देखील हे हेरले होते. पण चेहर्यावरून त्या दोघी तसे काही दाखवत नव्हत्या. बहुतेक रोडसाईड रोमिओंना हाताळायची मुलींची हीच पद्धत असावी. “रोडसाईड रोमिओ”… त्या आपल्याला देखील असेच काही समजतात का..? असा विचार शमीनच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. आणि का नसावे? एखाद्याच्या चेहर्यावर तर लिहिले नसते ना की तो एका चांगल्या घरातील सुशिक्षित मुलगा आहे. आणि कपड्यांचे म्हणाल तर आजकाल सारेच चांगले आणि स्टायलिश घालतात. म्हणून आता शमीनला तिला आपला खराखुरा स्टॅंडर्ड दाखवायची गरज भासू लागली होती.
शमीन हा स्वता मुंबईतील नावाजलेल्या अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवी घेऊन नुकताच बाहेर पडलेला एक सिविल ईंजिनीअर होता. त्यांच्या क्षेत्रातील एका प्रथितयश स्ट्रक्चरल कन्सल्टंसी मध्ये सहा-एक महिन्यापूर्वी जॉबला लागला होता. पण बाहेरून पाहता त्यांची कंपनी कुठल्याही अॅंगलने एक ईजिनिअरींग फर्म वाटत नव्हती. याला कारण होते ते त्यांच्या ऑफिसच्या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर असलेले एक टाईल्स कंपनीचे गोडाऊन, आणि दोघांचे मिळून सामाईक असे भलेमोठे जुनाट लोखंडी प्रवेशद्वार. कधी तिने बसमधून शमीनला त्या प्रवेशद्वाराच्या आत जाताना पाहिले असते तर तिला नक्कीच असे वाटले असते की हा या गोडाऊनमध्येच स्टोअरकीपर म्हणून कामाला असावा. त्यामुळे आता स्वताबद्दलची जुजबी पण महत्वाची अशी माहिती तिच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते जसे त्याला तिच्याबद्दल तिच्या मैत्रीणीशी चालू असलेल्या गप्पांमधून समजले होते. जरी सौरभ त्याच्याबरोबर याच मार्गाने प्रवास करत असला तरी या कामासाठी त्याला विश्वासात घ्यायचे म्हणजे तिच्याबद्दल खरे काय ते सांगायचे जे शमीनला मंजूर नव्हते. आणि पूर्वकल्पना न देता त्याचा वापर करणे तर आणखी धोकादायक होते कारण तो बोलताना कधी काय पचकेल याचा नेम नव्हता. म्हणून शमीनने एक अभिनव शक्कल लढवली. स्वताच खोटा खोटा फोनकॉल करायचा, किंवा आला आहे असे दाखवायचे आणि समोर कोणीतरी मित्र बोलत आहे असे भासवून जे तिच्यापर्यंत पोहोचवायचे आहे ते फोनवर बोलायचे. अर्थात अशी खुफियापंक्ती करण्यात शमीन एक्सपर्ट होता. काहीही तयारी न करता अर्धा-एक तास तरी आरामात फोनवर नॉनस्टॉप नॉनसेन्स फेकाफेकी करेन एवढा स्टॅमिना होता त्याच्यात. पण इथे काहीही निरर्थक बडबड करायची नव्हती तर योग्य तेवढेच मोजक्या शब्दात बोलायचे होते आणि ते ही तिच्याजवळ उभे राहून. इथेच खरी गोची होती. तिच्यापुढे बोलताना आपली नक्कीच फाफलणार हे माहीत असल्याने मग शमीनने प्लॅन थोडासा चेंज करून तिच्या मैत्रीणीबरोबर ही ट्रिक वापरून तिच्यामार्फत हे सारे पोहोचवूया असे ठरवले.
पहिल्यांदा शमीन प्रेमात हे असे काही पाऊल उचलणार होता. त्याच्यासाठी हे एक मिशनच होते म्हणा ना. “ऑपरेशन फोनकॉल.”
काय काय बोलायचे आहे हे मुद्दे ठरवून घेतले. आपले शिक्षण, ईंजीनिअरींगची चांगल्या पगाराची नोकरी, घरची चांगली परिस्थिती, जमल्यास फॅमिली बॅकग्राऊंड, त्यातही एकुलते एक असणे, हे एवढे पुरेसे होते. रात्रभर हे मुद्दे मनातल्या मनात शंभरवेळा घोकून काढले. स्वप्नातही त्याला आपण हीच बडबड करतोय आणि आपले काम बनतेय असे दिसत होते.
सकाळ झाली, कालपासून केलेली सारी रंगीत तालिम प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली… पण कसले काय… सारे मनातल्या मनातच राहिले… तिच्या समोर.. अंह.. तिच्याही नाही, तिच्या मैत्रीणीच्या पाठीमागे उभा राहून तो हे सारे बोलणार होता.. पण हेल्लो हेल्लो रॉंग नंबरच्या पुढे गेलाच नाही. ततपप करणेही दूर, तोंडातून शब्द फुटेल तर शप्पथ.. मिशन फेल गेले होते. शमीनची प्रेमकहाणी होती तिथेच राहिली होती.
आजपर्यंत शमीनला बर्याच मुली आवडल्या होत्या, काही खरेच भावल्या होत्या. काहींना नुसतेच लांबून बघायचा तर काहींचे रात्ररात्रभर विचारही करायचा. पण यावेळी पहिल्यांदा दैवावर अवलंबून न राहता स्वताहून पुढे पाऊल टाकायचा प्रयत्न करत होता तर त्याला जाणवत होते की आपल्या पायात ती शक्तीच नाही. आजपर्यंत तो आपल्या जागी खूष होता, समाधानी होता, पण आज मात्र त्याला पराभूत झाल्यासारखे वाटत होते. घरी जाईपर्यंत ते शल्य बोचत होते. त्याची सर्वात मोठी चिंता होती की आज डायरीमध्ये तो काय लिहिणार होता. त्या दिवशी तिच्या जरासा जवळ काय उभा राहिला, तिच्याबद्दल जरा काही माहिती मिळवली तर मोठी विजयगाथा लिहिल्याच्या अविर्भावात त्याने या सार्याची डायरीत नोंद केली होती. पण आज ती डायरी उघडावीशी देखील वाटत नव्हती. आता शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी होती. इतर वेळी कधी ही सुट्टी संपते, सोमवार उजाडतो आणि ती आपल्याला दिसते असे त्याला नेहमी व्हायचे. पण आज मात्र सोमवारची वाट बघावीशी वाटत नव्हती.
रविवारचा दिवस मावळला. अजून त्याने शुक्रवारचे काही डायरीत लिहिले नव्हते. इच्छाच होत नव्हती. जणू डायरी हे प्रकरण आता संपल्यातच जमा होते. पण झोपदेखील येत नव्हती. उद्या परत प्रयत्न करावा का? छे.. नाहीच जमणार आपल्याला.. जे आजपर्यंत कधी जमले नव्हते ते उद्या कुठून जमणार होते. कुठून उसनी हिम्मत आणनार होता. पण तिला विसरनेही शक्य नव्हते. की पुन्हा पहिल्यासारखे वागायचे, जे काय नशीबात घडतेय ते घडू द्यायचे आणि आपण फक्त निमित्तमात्र व्हायचे. कुठून ही डायरी लिहायची अवदसा आठवली असे त्याला वाटू लागले. कारण आता ठरवलेले जमत नाही तर याचा त्याला त्रास होऊ लागला होता. विकतचे दुखणे म्हणतात ते यालाच. एका क्षणी शमीनला वाटू लागले की उद्या सरळ तिला रस्त्यात गाठावे आणि विचारून टाकावे एकदाचे काय ते.. मग भले तिने खाडकन एक कानाखाली खेचली तरी चालेल. निदान एकदाचे काही केल्याचे समाधान तरी मिळेल… पण मग… परत येऊन डायरीत काय लिहिणार होता. आज तिने माझ्या मुस्काटात मारली आणि अश्या तर्हेने आमच्या प्रेमकहाणीला पुर्णविराम… त्याला खरेच कळत नव्हते की तो तिला मिळवू शकत नव्हता याचे त्याला जास्त दुख होतेय की आता डायरी मध्ये आपल्याला आपला नाकर्तेपणा लिहावा लागणार ही जाणीव छळतेय.
शमीन आता चोवीस तास तिचाच विचार करू लागला होता. तिच्यापासूनच त्याचा दिवस सुरू व्हायचा आणि तिच्या विचारातच संपायचा. त्यापासून पळून जाणे आता त्याला शक्य नव्हते. अखेर त्याने ठरवले… आजवर आपण रोज जे घडेल ते डायरीमध्ये लिहायचो ना… यापुढे जे घडले पाहिजे ते डायरी मध्ये लिहायचे.. आणि एवढ्यावरच न थांबता ते तसेच घडवायचे.. हो, आपण आता आधी डायरी लिहायची आणि मग दुसर्या दिवशी आग लागो वा पूर येवो तेच आणि तसेच करायचे. स्वताच स्वताला एक टारगेट सेट करून द्यायचे आणि कुठल्याही परीस्थितीत ते अचीव करायचेच. जर ऑफिसच्या कामाच्या बाबतीत हे शक्य होते तर प्रेमाच्या बाजीत का नाही. उलट इथे तर त्याचे आयुष्य पणाला लागले होते.
डोक्यातील सकारात्मक विचार निघून जायच्या आधी शमीन उठला आणि तडक डायरी लिहायला लागला. ते लिहायला लागला जे त्याला आदल्या दिवशी जमले नव्हते, तेच जे त्याला उद्या करायचे होते आणि बस… करायचेच होते… गेला शुक्रवार त्याने केव्हाच मागे सोडला होता. त्याचा सोमवार झोपायच्या आधीच उजाडला होता.
डायरीत काहीही वेगळे लिहिले नव्हते, जे शुक्रवारी जमले नव्हते तेच करायचे होते. पण का कोणास ठाऊक आज त्याला वेगळाच उत्साह वाटत होता. लिहिले आहे म्हणजे करायलाच पाहिजे. दुसरा पर्याय नाही. तानाजी स्वताच दोर कापून लढायला उभा राहिला होता. समोर अमृता होती.. नेहमीसारखीच.. बसच्या रांगेत.. त्याच्या अगदी पुढे.. मोबाईलची रिंगटोन त्याने स्वताच एकदा वाजवली आणि मित्राचा फोन आला आहे असे भासवून सुरू झाला. जणू काही त्याचा शाळेतील जुना एखादा मित्र फोनवर त्याची बर्याच दिवसांनी चौकशी करत आहे असे दाखवून आपल्या कॉलेजचे नाव, शिक्षण, कामाचे ठिकाण, तेथील स्वताची पोस्ट, नक्की काय काम करतो, एवढेच नाही तर स्वताचा पगार सुद्धा सांगून झाला. प्रत्येक वाक्य-न-वाक्य, शब्द-न-शब्द ती ऐकत आहे याची त्याने खात्री करून घेतली. जिथे संशय आला की तिने ऐकले नसावे तिथे तिथे त्या त्याचा उल्लेख परत परत केला.
तो हे मुद्दाम ऐकवतोय असा संशय तिला आलाही असावा… की नसावा.. याच्याशी त्याला आता घेणेदेने नव्हते… कारण काण्या डोळ्याने आपण काय बोलतोय याचा अंदाज ती नक्की घेत होती हे त्याला समजले होते. मिशन सक्सेसफुल झाले होते. आज बसमध्ये देखील तिची नजर खिडकीच्या बाहेर कमी आणि आतच जास्त होती. जे ठरवले होते, जे डायरीत लिहिले होते ते शमीनने केले होते आणि त्याचा परिणाम देखील झाला होता. आज घरी जाऊन डायरीमध्ये तेच वाचायचे होते आणि उद्या काय करायचे आहे हे लिहायचे होते.
पुढचे दोनतीन दिवस काही करायच्या आधी तिच्यावर काय फरक पडतो हे बघणे जरूरी होते. मग त्यानंतरच पुढे काय करायचे हे ठरवावे लागणार होते. म्हणून त्याने डायरीत खास असे काही लिहिले नाही. ठरल्याप्रमाणे तिचा जास्तीत जास्त पाठलाग करणे चालू होते. तिची नजर नक्कीच बदलली होती. शमीन जवळपास कुठे आहे का याचा ती अंदाज घेऊ लागली होती. उद्या शुक्रवार होता. आठवड्याचा शेवटचा दिवस. आठवडा संपता संपता परत आणखी एक पाऊल पुढे टाकायचे ठरवून उद्याची डायरी लिहायला घेतली.
आज शमीन तिच्या ऑफिसपर्यंत तिचा पाठलाग करणार होता. डायरीतही त्याने हेच लिहिले होते. सारे काही जणू आधीच ठरल्याप्रमाणे ती देखील वेळेवर आली. तिचा स्टॉप नक्की किती लांब आहे हे माहीत नसल्याने शमीनने सरळ लास्ट स्टॉपपर्यंतचे तिकिट काढले. बसमध्ये तो तिच्या मागेच उभा होता. पण शमीनचा स्टॉप आला तरी तो उतरला नाही, तसे तिनेही सहजगत्या मागे वळून तो कुठे राहिला हे पाहिले. शमीनची नजर तिच्यावरच लागली होती. नाही म्हटले तरी तिला थोडे ओशाळल्यासारखे वाटले. मात्र शमीनच्या चेहर्यावर एक हास्याची लकेर उमटली. दोनच स्टॉपनंतर ती उतरली. मागोमाग शमीन देखील उतरला. जवळच्याच एका कंपनीच्या गेटमध्ये ती शिरली. शमीनला वाटले की शेवटच्या टर्नला तरी ती मागे वळून बघेन. पण तिने तसे काही केले नाही.
आज शमीनचे ऑफिसच्या कामात जराही लक्ष लागत नव्हते. संध्याकाळी त्याने तिच्या स्टॉपला जायचे ठरवले. पण ऐनवेळी जमले नाही, त्याचे पाय आपोआप स्वत:च्या स्टॉपकडे वळले. वाटले की जे डायरीत लिहिलेच नव्हते ते उगाच का घडवा. आधी ठरवूया नक्की काय करायचे आहे ते, मग ते डायरीत उतरवून काढूया. मग ते तसे घडणारच… असा काहीसा विश्वास आता त्याला वाटू लागला होता. जणू काही डायरीत लिहिल्यावर ते सारे काही आपल्याकडून विधीलिखित असल्याप्रमाणेच घडत असावे.
रविवारी गेल्या आठवड्याची डायरी त्याने परत वाचून काढली. प्रत्येक दिवशी त्याने आधीच लिहिल्याप्रमाणे केले होते, आणि सारे काही त्याच्या मनासारखे घडले होते. आता उद्या संधाकाळी तिच्या ऑफिसच्या स्टॉपला जायचे अशी त्याने डायरीत नोंद केली.
सोमवारी सकाळी पुन्हा तिच्या पाठीपाठी तिच्या ऑफिसपर्यंत जायचा विचार त्याने केला पण इतक्यात त्याला आठवले की अरे, आपण डायरीमध्ये तर फक्त संध्याकाळचेच लिहिले आहे. आता जाणे उचित होईल का?? काय करावे समजत नव्ह्ते. डायरीमध्ये लिहिले आहे तितकेच करायचे असा काही नियम तर नव्हता, आणखी काही केले तर चांगलेच आहे, असा विचार करून त्याने तिच्या ऑफिसपर्यंत जायचे ठरवले. आपला स्टॉप येऊनही उतरला नाही. बसने त्यांचा स्टॉप सोडला तसा एक मोटारवाला कट मारून पूढे जायचा प्रयत्न करायला गेला आणि त्याला नेमकी त्यांची बस धडकली. बघता बघता सगळा ट्राफिक जाम झाला आणि बस तिथेच अडकली. आणखी वाट बघण्यात अर्थ नव्हता, आधीच ऑफिसला उशीर झाला होता. मग त्याला नाईलाजाने तिथेच उतरावे लागले. योगायोग म्हणा वा नियतीचा खेळ म्हणा जे डायरीत लिहिले नव्हते ते घडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. यापुढे अशी हुशारी दाखवायची नाही असे त्याने मनोमन ठरवले.
संध्याकाळी मात्र तो ठरल्याप्रमाणे तिच्या ऑफिसच्या स्टॉपला गेला. तिथे गेल्यावर त्याला एक नवीन गोष्ट समजली, ती म्हणजे तिच्या स्टॉपवरून स्टेशनला जाणार्या दोन बस होत्या. त्यापैकी एक शमीनच्या स्टॉपवरून जायची तर एक मागच्या रस्त्याने फिरून जायची. आणि यामुळेच ती त्याला कधी दिसायची, तर कधी नाही. आता यापुढे दररोज तिच्या बसस्टॉपवरूनच बस पकडायचे असे त्याने ठरवले जेणे करून ती रोज भेटेल. या विचारात असतानाच ती समोरून येताना दिसली. शमीनला असे संध्याकाळी तिच्या कंपनीच्या बाहेर बघून ती जरा चमकलीच. बरोबर तिची मैत्रीण स्मितादेखील होती. अर्थात तिनेही शमीनला ओळखले आणि तिला मुद्दाम कोपरखळी मारून हसायला लागली. आपल्या नावाने तिची मैत्रीणही तिला हल्ली चिडवायला लागलीय हे बघून शमीनला बरे वाटले. त्याची लवस्टोरी आता व्यवस्थित ट्रॅकवर होती. त्याच्या आजवरच्या प्रवासाच्या मानाने गेल्या आठवड्याभरात नक्कीच प्रगती होती. आणि ही सारी त्या डायरीची कमाल होती. नाहीतर शमीन आयुष्यभर त्या बसच्या रांगेपलीकडे गेला नसता.
……………………………………………………………………………………………………
मुंबई उपनगरातील बसचालकांनी पगारवाढीसाठी अचानक बेमुदत संप पुकारला होता. स्टेशनवरून ऑफिसला जायला शेअर रिक्षाचाच पर्याय काय तो उपलब्ध होता. याचाच अर्थ उद्यापासून पुढचे काही दिवस ना बसप्रवास होता ना बसची रांग होती आणि नाही त्या रांगेत तिची वाट बघणे होते. उद्या ती रिक्षा पकडून लगेच निघून जाणार, एखादा क्षणच काय ती दिसणार या विचारांनी शमीन उदास झाला होता. तसेच डायरीमध्ये उद्याचे काय लिहायचे हा ही प्रश्न होताच. उद्या नेहमीच्या रूटीनपेक्षा काहीतरी वेगळे घडणार होते. हे झाले तर मी असे करेन, ते झाले तर तसे, अश्या जरतरच्या भरवश्यावर लिहिण्याला काही अर्थ नव्हता. तरीही सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन, असे काही घडणे जवळपास अशक्य आहे हे माहीत असताना देखील शमीनने डायरीत उद्याची तारीख टाकून नोंद केली, “आज मी रिक्षाने प्रवास केला… तिच्याबरोबर… एकाच रिक्षातून… एकाच सीटवर… तिच्या अगदी बाजूला बसून…!!”
हे आता कसे घडणार होते की कसे घडवायचे होते हे खरे तर शमीनलाही ठाऊक नव्हते. डोक्यातही काही प्लॅन तयार नव्हता, आणि ठरवले तरी असे काही करायची आपली हिम्मत होईल की नाही याची त्याला खात्री नव्हती. तरी डायरीवर भरवसा ठेऊन आज सकाळी नेहमीप्रमाणे तिची बसच्या रांगेत वाट न पाहता तो रिक्षास्टॅंडवर जाऊन उभा राहिला. अपेक्षेप्रमाणे ती तिच्या मैत्रीणीबरोबर आली. कदाचित तिलाही त्याचे तिथे असणे अपेक्षित असावे आणि तिच्या मैत्रिणीलादेखील. त्यांचे एकमेकांकडे पाहून सूचक हसणेच बरेच काही सांगून गेले. शमीनच्या चेहर्यावरही हल्ली अश्यावेळी ओशाळलेले भाव न येता त्याची जागा मंदस्मित घेऊ लागले होते. जश्या त्या त्याच्या बाजूने गेल्या तशी त्याची पावले देखील आपोआप त्यांच्या पाठी जाऊ लागली. पण त्यांनी एक रिक्षा पकडली तशी पावले तिथेच थबकली. जणू यापुढे त्याला प्रवेश निषिद्ध होता. थोडावेळ जागेवरच घुटमळला. त्यांची रिक्षा अजून तिथेच थांबली होती. तेवढ्यात आतून रिक्षावाला बाहेर पडला. माझी नजर तिथेच लागली असल्याने जशी आमची नजरानजर झाली तसे त्याने ओरडून विचारले, “कुठे? कॅप्सूल कंपनी का?” शमीन क्षणभर भांबावला, नकळत नकारार्थी मान हलवली आणि उत्तरला, “नाही, चारकोप नाका…”
“चला या लवकर…” शमीनचा अजूनही विश्वास बसत नव्हता. ती खरे तर एक शेअर रिक्षा होती, जी त्यालाही चालू शकत होती. कारण जेमतेम दोन स्टॉपचेच तर अंतर होते त्या दोघांच्या ऑफिसमध्ये. पण आज रिक्षामध्ये तेही मिटले होते. तिच्या अगदी बाजूलाच बसला होता तो. जसे डायरीमध्ये लिहिले होते, अगदी तसेच… साधे बसमध्ये तिच्या बाजूला बसणे त्याच्यासाठी कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. इथे तर रिक्षामध्ये, जेमतेम जागेत, फक्त ती आणि तो. नाही म्हणायला तिची मैत्रीण पलीकडे बसली होती, पण तिलाही हे सारे ठाऊक असल्याने ती गालातल्या गालात हसतच होती. शमीन संकोचून अंग चोरून बसायचा प्रयत्न करत होता तसे रिक्षाच्या हिंदकाळण्याने आणखी तिच्यावर आदळत होता. मग त्याने तो नाद सोडून दिला आणि आरामात बसला. जसा कम्फर्टेबल झाला तसे त्याला वाटू लागले की हा प्रवास असाच चालत राहावा, संपूच नये. पण प्रत्यक्षात थोडीच असे घडणार होते. आणि डायरीत देखील त्याने असे काही लिहिले नव्हते. जसे काही डायरीत लिहिले असते तर त्यांचा प्रवास निरंतरच चालणार होता. आपल्या या विचारांचे त्यालाच हसायला आले..
संध्याकाळी मात्र तिने रिक्षा तिच्या ऑफिसच्या इथूनच पकडली असती, त्यामुळे उगाच तिथे जाण्यात अर्थ नव्हता. पण दुसर्या दिवशी सकाळी मात्र आजचीच अनुभुती परत मिळावी अशी त्याची इच्छा होती. बसचा संप संपेपर्यंतच ही ऑफर होती आणि तिचा पुरेपूर फायदा त्याला उचलायचा होता. आणि एका विश्वासानेच त्याने पुन्हा डायरीत तशी नोंद केली.
आजही थोड्याफार फरकाने तेच झाले. पुन्हा तो तिच्या रिक्षाजवळ घुटमळला, यावेळी मात्र जाणूनबुझून. तसे परत रिक्षावाल्याने तिसरी सीट भरायला त्यालाच हाक मारली. आजही पुन्हा तेच सारे, तसेच काही. अचानक त्याच्या मनात आले की अश्यावेळी मस्त पाऊस पडला तर किती बरे होईल. एकाच रिक्षात किंचितसे भिजलेले असे आम्ही दोघे. गारठल्याने आणखी जवळ येणे. रिक्षाच्या दारातून आत येणार्या पाण्याच्या शिंतोड्यांमुळे आणखी आत सरकने. यापूर्वी त्याने तिच्या बद्दल कधी असा विचार केला नव्हता पण आज ही कल्पनाच मनाला गुदगुल्या करून गेली. आयुष्यात काही चांगले, सकारात्मक घडत होते तशी त्याची हाव देखील वाढत होती. “येह दिल मांगे मोअर” म्हणतात ना तसेच काहीसे झाले होते. पण निसर्गावर कोणाची हुकुमत असते. भले शमीनकडे डायरी होती आणि त्यात लिहू तसे घडते किंवा आपणच तसे घडवतो असा त्याला विश्वास येऊ लागला होता, पण तरीही डायरी त्याच्या स्वताच्या आयुष्याशी निगडीत होती. त्यात लिहिण्याने पाऊस पडेल अशी आशा बाळगणेही वेडेपणाचे होते. पण प्रेम हे आंधळे, बहिरे, वेडे, नादान, आणि बरेच काही असते. याच वेडेपणात शमीनने आपल्या डायरीत पावसाची नोंद केली होती.
सकाळी उठल्याउठल्या त्याने खिडकीच्या बाहेर एक नजर टाकली. आकाश कोरडेच होते. ऑगस्ट चालू असला तरी गेले पंधरा दिवस पाऊस कुठेतरी दडी मारून बसला होता. त्यामुळे असे काही अतर्क्य घडू शकेल अशी आशा नव्हतीच. तरीही त्याला हिरमुसल्या सारखे झाले. त्याच मूडमध्ये तो तयारी करून निघाला. कांदिवली स्टेशन जवळ आले तसा परत उत्साह जाणवू लागला. त्याचे मन स्वतालाच सांगू लागले, पाऊस का नसेना, ती तर भेटणारच ना, नशीबाने साथ दिली तर परत आज देखील एकाच रिक्षाने जाऊ. कशाला यापेक्षा जास्त हाव बाळगायची. पण स्टेशनच्या बाहेर जेव्हा तो पडला त्याला धक्काच बसला. आभाळ भरून आले होते. बारीक बारीक बुंदाबांदी होऊ लागली होती. इतक्यात तिचीही ट्रेन आली आणि अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनपेक्षित पाऊस आल्याने आज कोणाकडे छत्री ही नव्हती. पाऊस थांबण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. ऑफिसलाही उशीर होत होता. पाऊस कधी कमी होतोय याची जास्त वेळ वाट न पाहता त्या दोघी रिक्षास्टॅंडच्या दिशेने भिजत निघाल्या.
शमीनचा अजूनही विश्वास बसत नव्हता. तिच्या ओलेत्या कपड्यांचा स्पर्श अंगावर एक रोमांच उठवत होता. क्षणाला उब मिळत होती तर क्षणाला अंग गारठून जात होते. पावसात रिक्षेचा वेग सुद्धा मंदावला होता. जिथे एखादा क्षण युगासारखा भासत होता तिथे प्रवासदेखील जरा जास्तच लांबला होता. जगात देव नावाचा प्रकार खरेच असतो की नाही माहीत नाही, पण जर अशी एखादी शक्ती अस्तित्वात असेल तर ती नक्कीच आपल्यावर प्रसन्न झाली आहे याची प्रचिती त्याला गेल्या काही दिवसात येत होती. आणि आता शमीनने त्याच शक्तीची जरा आणखी परीक्षा घेण्याचे ठरवले.
बसचा संप आज मध्यरात्री मागे घेतला जाणार असे बातम्यात दाखवत होते. म्हणजे उद्यापासून हा रिक्षातून एकत्र प्रवास करायचा खेळ थांबणार होता. शमीनला ही बातमी ऐकून अस्वस्थ वाटू लागले. भले ते दोघे अजून मनाने जवळ आले नसले तरी गेले काही दिवस त्याला तनाने जवळ आल्यासारखे वाटू लागले होते. हे असेच चालू राहिले तर लवकरच मनानेही जवळ यायला वेळ लागणार नाही असे त्याला वाटत होते. किंवा खरे सांगायचे तर त्याला याची चटक लागली होती असे म्हणनेही वावगे ठरणार नाही. याच विचारात त्याने डायरी लिहायला घेतली तर खरी, पण उद्या सकाळी संप नक्की सुटणार ही बातमी टीवी वर ऐकतच डोळे मिटले.
पण कोणालातरी हे मंजूर नव्हते. दुसर्या दिवशी पुन्हा एकदा अतर्क्य असे घडले होते. कांदिवली स्टेशनबाहेर सार्या बस तश्याच निष्प्रभ पहुडल्या होत्या. रिक्षावाले हाका मारून मारून आपले गिर्हाईक बोलवत होते. भल्या पहाटे पुन्हा एकदा संपाची बोलणी फिस्कटली होती. आजही शमीन पुन्हा एकदा तिच्या जोडीनेच प्रवास करत होता.
योगायोग हा एकदा होऊ शकतो, दोनदा होऊ शकतो पण वारंवार… कसे शक्य होते… आपण जे ठरवतो, जे डायरीत लिहितो, तेच आणि तसेच घडते यावर शमीनचा आता विश्वास बसू लागला होता. बसच्या वाढलेल्या संपामुळे आज पुन्हा पाच रुपयांच्या बसच्या तिकिटाच्या जागी दहा रुपये रिक्षाचे भाडे द्यावे लागणार असा विचार करणारे लोक शमीनला अचानक तुच्छ वाटू लागले होते. कारण आता त्याच्याकडे एक शक्ती आली होती. जगाच्या सुखदुखाशी त्याला पर्वा नव्हती, कारण त्याची प्रेमकहाणी तो आता स्वत:ला त्याला हवी तशी लिहिणार होता.
जे घडत होते ते चांगले की वाईट हे त्याला अजूनही समजत नव्हते पण लिहिणारा तो स्वताच असल्याने यातून काही वाईट घडण्याची शक्यता नाही याची त्याला खात्री होती. आजपर्यंत स्वताच्या मुखदुर्बलतेमुळे आणि आत्मविश्वासाच्या अभावापायी प्रेमात खचून जायचे बरेच प्रसंग त्याच्या आयुष्यात वेळोवेळी आले होते. तरीही त्या विधात्यावर त्याने नेहमी विश्वास ठेवला होता की योग्य त्या वेळी तोच आपली नैय्या पैलतीराला लावेल. आज त्याचा तोच विश्वास सार्थ ठरत होता. तरीही शमीन लगेच हुरळून गेला नाही. आज डायरीमध्ये जरा आणखी डिटेल लिहायचे असे त्याने ठरवले. उद्या तिची येण्याची ट्रेन, तिने घातलेले कपडे, त्यांचा रंग… बसमध्ये तिची बसायची जागा, तिचे त्याच्याकडे बघणे, बघून हसणे… त्यांची संध्याकाळची भेट, पुन्हा परतीचा बसचा प्रवास ते तिचे ट्रेनमध्ये चढणे आणि चढता चढता त्याच्याकडे शेवटचा कटाक्ष टाकणे… सारे.. सारे काही डायरीत बारीक सारीक तपशीलासह लिहिले. उद्याच्या दिवसाची उत्सुकता आता जरा जास्तच होती.
रात्री फार चांगली झोप लागली नाही. सकाळी नेहमीपेक्षा जरासा उशीराच उठला. आणि मग नेहमीची ट्रेन पकडण्यासाठी घाईघाईत तयारी करणे.. डायरीबद्दल पार विसरून गेला तो या नादात.
आज विशेष असे काही घडले नाही. नेहमीसारखाच एक दिवस होता. तरी हा दिवस आपल्या आयुष्यात या आधी देखील आला आहे, असेच काहीसे आपल्या आयुष्यात या आधी देखील घडले आहे असे त्याला उगाच वाटत होते. पण ऑफिसमध्ये कामाच्या नादात हे विचार तसेच विरून गेले.
संध्याकाळी हल्लीच्या रूटीनप्रमाणे त्याने तिच्या स्टॉपला जाऊनच बस पकडली.. तिची ती ओळख दाखवणारी नजर.. हलकेसे हसणे.. मैत्रीणीचे तिला छेडणे.. तिचे मानेला अलगद झटका देणे… आणि मागे वळून पाहणे.. हल्ली तिचा पाठलाग करणे खूप बरे वाटू लागले होते.
घरी पोहोचल्यावर नेहमी सारखे कपडे बदलून, फ्रेश होऊन, शमीन आपल्या रूममध्ये गेला. सहजपणे डायरी वाचायला घेतली.. आणि अचानक डोक्यात लक्ख प्रकाश पडला… दिवसभर जे वाटत होते की हे आपल्याशी आधी पण घडलेय, ते घडले नव्हते तर तसे घडणार आहे हे भाकीत त्याने स्वत:च काल रात्रीच डायरीत करून ठेवले होते. शब्द न शब्द जुळत होता. आकाशी रंगाचा सलवार कुर्ता, ठिपक्या ठिपक्यांची डिजाईन आणि त्यावर पांढर्या रंगाचा जाळीदार दुपट्टा… जाळीदार दुपट्टा… जो आज तिने पहिल्यांदाच घातला होता… जो कधी शमीनने स्वप्नात ही पाहिला नव्हता.. पण डायरीत लिहिला होता.. योगायोगाच्या पलीकडे गेले होते हे सारे यावर त्याचा आता पक्का विश्वास बसला होता. दुसर्या दिवशीचे काय लिहू आणि काय नको असे क्षणभर त्याला झाले. मनात आणले तर आता तो तिला चार दिवसातच मिळवू शकत होतो. त्याही पलीकडे जाऊन काही शृंगारीक लिहावे असेही त्याच्या मनात आले.. पण क्षणभरच.. उत्साहचा हा आवेग ओसरल्यावर तो सावरला. शमीनचा स्वभाव असा नव्हता. त्याच्या भावना थिल्लर नव्हत्या. त्यांच्यात जे काही होणार होते ते दोघांच्या मर्जीने आणि एका मराठमोळ्या मुलीच्या सार्या मर्यादा सांभाळूनच याची त्याने स्वताच्याच मनाला खात्री पटवून दिली.
असे म्हणतात की देव जेव्हा एखादी शक्ती देतो तेव्हा त्याच बरोबर एक जबाबदारी देखील देतो. तसेच ती पेलायची ताकद देखील तोच विधाता देतो. गरज असते ती सारासार विचार करून वागायची. शमीनने निर्णय घेतला होता.. या डायरी मध्ये असे काहीही अतिरंजित लिहायचे नाही. जर आपण तिच्या योग्यतेचे असू, तर ती आपल्याला मिळणारच. अगदीच काही जमले नाही तर डायरी आहेच दिमतीला. पण तो आपला शेवटचा मार्ग असला पाहिजे. तोपर्यंत डायरीत उद्या आपल्याला काय करायचे आहे तेच लिहायचे. त्याचे परीणाम काय होतील, त्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल हे सारे नियतीलाच ठरवून दे. अन्यथा जरी तिला मिळवले तरी तो आपल्या प्रेमाचा विजय नसेल. अश्या मीलनात आपण कधीच समाधान शोधू शकणार नाही. शरीराने शोधले तरी आत्मा नेहमी असंतुष्ट राहील… याच विचारात कधीतरी शमीनचा डोळा लागला.. डायरीत कसलीही नोंद न करताच दिवा मावळला.. आणि या परिस्थितीत जे अपेक्षित होते तेच घडले. दुसर्या दिवशी ती कुठेच दिसली नाही.. कदाचित आलीच नसावी.. पण ना ती दिसली, ना तिची मैत्रीण…
गेले तीनचार दिवस लिहेन लिहेन म्हणत शमीनने मनावर ताबा ठेवला होता. ती काय म्हणेल, कशी रिअॅक्ट करेल याची त्याला भिती वाटत होती. पण हे पाउल उचलने गरजेचे होतेच. “प्यार दोस्ती होती है” कुठल्यातरी सिनेमात ऐकलेला आणि मनात ठसलेला एक संवाद. खरेच असे असते का माहीत नाही पण प्रेमाची सुरुवात मात्र मैत्रीनेच होते एवढे नक्की. आणि मैत्री होण्यासाठी एकमेकांची चांगली ओळख होणे गरजेचे असते. आजपर्यंत नजरेने बरेच संवाद साधले होते, आता शब्दांची पाळी होती. भावना त्याच पोहोचवायच्या होत्या, फक्त माध्यम बदलायचे होते. धडधडत्या अंतकरणानेच शमीनने डायरी लिहायला घेतली.
दिनांक – ७ सप्टेंबर – मंगळवार –
आज संध्याकाळी मी तिच्या कंपनी जवळच्या स्टॉपला बस पकडायला गेलो… कंपनीच्या गेटमधून ती बाहेर आली… एकटीच.. आज तिची मैत्रीण बरोबर नव्हती… बस आली.. आम्ही चढलो… तिच्या पाठोपाठच उतरलो… स्टेशनपर्यंत तिचा एका हाताचे अंतर ठेउन पाठलाग केला.. पण जसे स्टेशन जवळ आले तसा चपळाईने पुढे जाऊन तिच्या समोर उभा ठाकलो… आणि.. अमृता… मला.. तुझ्याशी… तुझ्याशी… शी… श्या..!! पेनातील शाई पण नेमकी आताच संपायची होती..
हा अपशकून तर नाही ना, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्यावाचून राहिली नाही. उद्याचा प्लॅन सरळ ड्रॉप करावा का असा विचारदेखील त्याच्या मनात आला. पण मग वाटले, अर्धे-अधिक का होईना, लिहिले तर आहे ना.. म्हणजे किमान तेवढे तरी केलेच पाहिजे. किंबहुना ते तसे घडणारच होते, ज्याप्रमाणे आजवर लिहिलेले घडत आले होते. आणि तसेही त्याचे भविष्य ती डायरी घडवत होती. पेन काय, एक संपले तर दुसरे घेता येते. मनातील सारे निगेटीव विचार झटकून शमीन उद्यासाठी तयार झाला.
.
.
…………………………………………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………………………………………
————————————————– भाग ३ ————————————————–
…………………………………………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………………………………………
.
.
शमीनचा आजचा सारा दिवस मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करण्यातच गेला. महिन्याभरापूर्वी त्याला तिच्या जवळ उभे राहून खोटे खोटे फोनवर बोलणे देखील अवघड वाटत होते. आणि आज थेट तिच्या समोर उभा राहून, तिच्या नजरेत नजर घालून मैत्रीचा हात पुढे करणार होता तो.. पहिले वाक्य… पहिले वाक्यच खूप महत्वाचे होते.. एकदा का व्यवस्थित सुरुवात झाली की आपली गाडी सुसाट सुटेल यावर त्याचा विश्वास होता. पण नक्की कुठुन सुरुवात करावी हे त्याला समजत नव्हते.. तिचे नाव विचारावे का?? पण सांगेल का?? की आपलेच सांगावे.. की नको.. सरळ तिचे नावच घेऊन सुरुवात करणे ठीक राहील.. अमृता…! अमृता, तुझे नाव तुझ्या चेहर्याला सूट होत नाही.. या अनपेक्षित वाक्यफेकीने तिच्या चेहर्यावर प्रश्नचिन्हच येईल ना.. मग आपले किंचित हसून उत्तर…हो खरेच तुझे नाव तुझ्या चेहर्याला साजेसे नाहिये… कारण तो अमृतापेक्षा गोड आहे… आणि मग यावर तिचे लाजणे… आहा..! हे सारे विचार देखील शमीनच्या मनाला गुदगुल्या करून चेहर्यावर हास्य फुलवीत होते.. पण जमेल का हे आज आपल्याला?? डायरीने देखील काल नेमके मोक्याच्या क्षणीच धोका दिला होता. जर तिथे व्यवस्थित लिहिले गेले असते तर पुढे काय बिशाद होती वेगळे काही घडायची..
संध्याकाळी खरेच तिची मैत्रीण तिच्या बरोबर नव्हती. डायरीत लिहिलेली एक गोष्ट तरी खरी ठरत होती. पण शमीनच्या आता ते डोक्यात नव्हते. आज ती एकटीच असल्याने त्याला बघूनही न बघितल्यासारखे करून ती बसस्टॉपच्या दिशेने चालू लागली. बसमध्येही आज त्यांचे नेहमीप्रमाणे नजरेचे खेळ होत नव्हते. खिडकीच्या बाहेरच कुठेतरी टक लाऊन ती बघत होती. एकंदरीत आज लक्षणे काही ठीक दिसत नव्हती. हा सारा प्रकार शमीनच्या उत्साहावर विरजन टाकत होता पण अवसान गाळून चालणार नव्हते. बोलायचे तर होतेच आणि तेही आजच.. ठरल्याप्रमाणे त्याने बसमधून उतरल्या उतरल्या तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. स्टेशन जवळ आले तरी अजून तिला ओवरटेक करून पुढे जायची त्याची हिंम्मत काही होत नव्हती. रेल्वेचा पूल ओलांडून ती पलीकडच्या प्लॅटफोर्मवर गेली.. तसा शमीनही तिच्या पाठोपाठच होता.. धडधड करत ती जिना उतरली आणि शमीनचीही धडधड वाढली.. आता तिला गाठले नाही आणि एकदा का ती प्लॅटफॉर्मवरच्या बायकांच्या घोळक्यात मिसळली की मग शमीनला पुढच्या संधीची वाट बघत बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तिला त्या आधीच गाठणे गरजेचे होते. आता वेळ गमावून चालणार नव्हते. प्लॅटफॉर्म बर्यापैकी रिकामे होते, तिला इथेच थांबवायला हवे होते.. हीच ती वेळ.. हाच तो क्षण.. त्याने आपल्या मनाला बजावले, चालायचा वेग वाढवून.. खरे तर धावतच.. शमीन तिच्या बरोबरीला आला.. तिलाही अंदाज आला असावा की हा असा लगबगीने आपल्याशीच बोलायला आला आहे… तरीही.. ती तशीच चालत राहिली.. न थांबता.. आणि चालता चालताच शमीनने अलगद तिला ओवरटेक करून… तिच्या अगदी समोर येऊन तिला विचारले, “अमृता… मला जरा तुझ्याशी…….???…
.
.
.
.
ट्रेनच्या पुर्ण प्रवासात शमीनच्या कानात तिचे शब्द घुमत होते. खूपच अनपेक्षित असा धक्का होता हा शमीनसाठी. ती काहीच न बोलता निघून गेली असती तरी चालले असते. तिच्या मौनाचा ही शमीनने आपल्या सोयीने अर्थ काढला असता. पण जे काही बोलली ते शब्द त्याच्या कानात तीक्ष्ण हत्यारासारखे घुसले होते आणि घाव मात्र हृदयाला देऊन गेले होते. “काहीही फालतूगिरी नाही पाहिजे…” … फालतूगिरी..!! म्हणजे आजवर आपण जे काही करत होतो ती निव्वळ फालतूगिरी होती तिच्यासाठी..?? तिचे ते आपल्याकडे बघणे.. बघून हसणे.. भ्रम होता का हा आपला सारा..?? की ही ती नव्हतीच जिला आपण ओळखत होतो, जिच्या पाठीपाठी एवढे दिवस जात होतो, तिच्याही नकळत जिच्यावर आपण प्रेम करत होतो.. आजपर्यंत सर्वांचा लाडका असा मी, माझ्या मस्तीखोरपणाचे पण मित्रांना किती कौतुक आणि आज जिच्यावर आपण खरे प्रेम केले तिला ती एक फालतूगिरी वाटावी.. निराश अवस्थेतच शमीन घरी पोहोचला.. डोक्यामध्ये तिचा आणि तिचाच विचार होता, डायरी त्याला हातातही घ्यावीशी वाटत नव्हती. आज जे घडले होते त्यापुढे उद्याचे काय लिहिणार होता तो.. काहीच सुचत नव्हते.. पेनातील शाईच नाही तर मनातील शब्दही संपले होते..
रात्री जेवल्यावर सवयीनेच शमीनने डायरी उघडली.. आणि शेवटचे पान उघडून वाचू लागला..
दिनांक – ७ सप्टेंबर २०१२,
वार – मंगळवार.
अमृता मला जरा तुझ्याशी…..
खळ्ळ फट्याक.. कोणीतरी झणझणीत कानाखाली खेचावी आणि कळ एकदम मस्तकात जावी तसे झाले. झटक्यात डायरी त्याच्या हातातून गळून पडली. तरी थरथरत्या हाताने उचलली आणि शेवटचे ते पान पुन्हा वाचायला घेतले. नजर झरझर झरझर फिरत परत शेवटच्या ओळीवर येऊन थांबली.. अमृता मला जरा तुझ्याशी…. मला वाक्यदेखील पुर्ण करू न देता ती म्हणाली, “काहीही फालतूगिरी नाही पाहिजे…!!”… “काहीही फालतूगिरी नाही पाहिजे…!!” .. “काहीही फालतूगिरी नाही पाहिजे…!!” परत परत तीच ओळ तेच शब्द तो वाचू लागला. ध्यानात यायला अंमळ वेळच लागला की ते त्याचेच अक्षर होते.. आणि आज जे घडले होते ते त्या डायरीत आधीच लिहिले गेले होते..
शमीनला मात्र आपण काल असे काहीच लिहिल्याचे आठवत नव्हते.. मुळात तो असे काही वेडेवाकडे लिहिण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. पण मग कोण लिहिणार होते हे असे अभद्र.., तेही त्याच्याच अक्षरात.., कोणाला माहीत होते जे आज घडले ते.., कधी समजले.., कसे समजले.., काहीच समजत नव्हते, काहीच सुचत नव्हते.. बराच वेळ असाच विचारशून्य अवस्थेत गेला.. भानावर आला तरी त्याचे सारे विचार त्याच प्रश्नांवर येऊन थांबत होते. तर्काने एकाचेही उत्तर सापडत नव्हते. शेवटी तो या निष्कर्शाप्रत येऊन पोहोचला की काल पेनात थोडीशी शाई बाकी असावी आणि आपणच कोणत्यातरी धुंदकीमध्ये हे लिहिले असावे…
……………तरीही मुळात तो जे डायरीत लिहितो ते तसेच घडते ही देखील एक अतार्किक गोष्ट होती…. पण याचा स्विकार शमीनने आधीच केला होता…
कालपर्यंत ज्या डायरीला शमीन एक दैवी देणगी समजत होता त्याची अचानक त्याला भिती वाटायला लागली होती. सारी रात्र चित्रविचित्र स्वप्नात गेली.. स्वप्न-सत्य-भ्रम… सार्यांमधील रेषा धूसर झाल्या होत्या. दुसर्या दिवशी तो मुद्दामच उशीरा ऑफिसला गेला. हेतू एकच, की ती नजरेस पडू नये.. किंवा खरे तर तो स्वत: तिच्या नजरेस पडू नये.. ऑफिसमध्ये पोहोचला तसा सौरभ हसत हसत त्याच्या टेबलजवळ आला. कालचा शमीनचा पराक्रम त्याने पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरून पाहिला होता. अर्थात शमीन आणि तिच्यात काय बोलणे झाले ते त्याला नक्कीच ऐकू गेले नसणार, पण काय घडले असावे याचा अंदाज येण्यासाठी त्यावेळचे शमीनच्या चेहर्यावरचे भाव आणि तिची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती. आता सौरभपासून काही लपवण्यात अर्थ नव्हता हे शमीन समजून चुकला. तसे केले असते तर त्याने आपल्या मनाच्या कथा रचून ऑफिसभर पसरवल्या असत्या. म्हणून शमीनने आता त्याला विश्वासात घेऊन सारे काही सांगणेच योग्य समजले…
अर्थात… डायरीचा भाग वगळूनच…
शमीनची दर्दभरी दास्तान ऐकून सौरभच्या चेहर्यावर हसू फुलले. पण ते शमीनची टिंगल उडवायला नव्हते तर त्याला धीर द्यायला होते. त्याही परिस्थितीत त्याने शमीनला आशेचा किरण दाखवला. सौरभच्या मते हा शेवट नाही तर ही एक सुरुवात होती. मुली पहिला पहिला अश्याच वागतात. उलट ती अशी वागली नसती तर ही खरी चिंतेची बाब होती. काय लॉजिक होते हे त्या सौरभलाच ठाऊक पण त्याच्याशी हे सारे शेअर केल्याने शमीनचे मन मात्र हलके झाले होते. आणि हो, सौरभबद्दलचे त्याचे मत ही बदलले होते.
संध्याकाळी देखील शमीन तिला चुकवूनच घरी आला. पुन्हा डोक्यात तोच प्रश्न की डायरीत काय लिहायचे. की आता सोडून द्यायचा हा डायरीचा नाद. दुसरा पर्यायच योग्य होता. ज्या शक्तीवर आपले स्वताचे नियंत्रण नाही तिच्यावर अवलंबून राहणे खरेच मुर्खपणाचे होते. त्या रात्री देखील त्याला मनासारखी झोप लागली नाही. आदल्या रात्रीसारखी वेडीवाकडी स्वप्ने काही पडली नाहीत तरी अधूनमधून डायरीची पाने फडफडत असल्याचा भास होत होता. सकाळी उठल्यावर टेबलावरची डायरी तशीच ड्रॉवरमध्ये टाकून तो ऑफिसला निघाला. आजही त्याची तिला सामोरे जायची हिम्मत होत नव्हती, पण त्याचवेळी शुक्रवार असल्याने ती दिसावी असेही वाटत होते. आणि अपेक्षेप्रमाणे ती दिसलीच. पण नेहमीसारखे बसच्या रांगेत तिच्या पाठोपाठ जाऊन उभे राहायची त्याची हिम्मत झाली नाही. दूरवर मागेच उभा राहिला. बसमध्ये चढायच्या आधी तिने आजूबाजूला एक नजर टाकली, आणि जशी शमीनच्या नजरेला मिळाली तशी तिची नजर त्याच्यावरच स्थिरावली. या अनपेक्षित प्रकाराने शमीन गोंधळून गेला. एवढे सारे झाल्यावरदेखील तिला आपले तिच्या मागेमागे येणे अपेक्षित होते तर… सौरभ बरोबरच बोलत होता, एखाद्या मुलीच्या मनात काय आहे याचा अंदाज आपल्याला आला आहे असे कधीही समजायचे नाही. त्या नेमका तुमचा अंदाज चुकवतात..
ऑफिसमध्ये गेल्यावर हे सारे त्याने सौरभशी शेअर केले. आज संध्याकाळी शमीनबरोबर सौरभ देखील तिच्या ऑफिसच्या बसस्टॉपला गेला. तिचे शमीनकडे बघूनही न बघितल्यासारखे करने सौरभच्या मते भाव खाणे होते. काही का असेना, त्याचे हे जे काही फंडे होते त्यांनी शमीनला त्या दिवशीच्या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले होते.
शनिवार रविवार मस्त कटला. डायरीचे विचार त्याच्या डोक्यातून निघून गेले होते, एवढेच नाही तर आपल्याला डायरी वगैरे काही लिहायची सवय होती याचाही शमीनला काही काळासाठी विसर पडला होता…. पण डायरी मात्र त्याला विसरली नव्हती…. त्याच्या आयुष्यातील १३ सप्टेंबर २०१२ चा सोमवार डायरीत आधीच उजाडला होता… फक्त शमीन त्याबाबत अनभिद्न्य होता.
आज ती खूप खूश दिसत होती. कदाचित तिची मैत्रीण चारपाच दिवसाने तिला भेटत होती म्हणून असावे. पण तिचा प्रसन्न चेहरा बघून शमीनचा मूड ही चांगला झाला. त्याच्या सोबतीला सौरभदेखील होता. गेले काही दिवस शमीनला त्याचे प्रेम मिळवून द्यायची जबाबदारी स्वतावर घेतल्यासारखे तो वागत होता. आणि त्याच्याच प्लॅननुसार आज शमीन बसमध्ये पुढे तिच्या जवळ बसायला न जाता मागेच बसणार होता. शमीनला खरे तर हे काही पटले नव्हते. तिच्यापासून असे जाणूनबुझून दूर राहणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. पण सौरभचे मत पडले की आपण तिला जेवढे भाव देउ तेवढे ती जास्त नखरे करणार, म्हणून आज आपण मागूनच बघूया की ती तुला पलटून बघते का ते…
पण सारे अंदाज चुकले. आज अनपेक्षितपणे तीच मागच्या सीटवर जाऊन बसली. पुढे फार गर्दी होती. शमीन आणि सौरभलाही मग आयत्या वेळी काही सुचले नाही. आणि ते देखील मागे जाऊन तिच्याच जवळपास उभे राहिले. तिच्या दूर जायचे ठरवले तरी नियतीने शमीनला तिच्या जवळच आणले होते. याला पुन्हा एकदा त्या विधात्याचीच मर्जी समजून शमीन तिला नकळतपणे न्याहाळू लागला. तिच्या चेहर्याकडे एकटक बघत राहिला आणि स्थळ-काळ विसरून स्वतालाच हरवून बसला. बरोबरचे सारे प्रवासी पुढे बघत होते पण शमीनची मान मात्र मागच्या दिशेने तशीच वळून राहिली होती. कुठे आहे, काय करतोय, कशाचेही भान राहिले नव्हते… पण शेवटी भानावर आणले ते तिच्याच शब्दांनी… अमृतासारख्या गोड आवाजात परत तिचे ते विषारी शब्द… “पुढे बघ…!!” … शमीनवर रोखलेली तिची नजर आणि त्याच्या दिशेने उगारलेले बोट… कावराबावरा होऊन शमीन आजूबाजूला बघायला लागला. सारे सहप्रवासी त्याच्याकडेच रोखून बघत होते. आणखी काही तमाशा होऊ नये म्हणून लगेच त्याने मान वळवली आणि पुढच्या दिशेने तोंड करून उभा राहिला. सौरभ देखील भांबावून त्याच्याकडे बघत होता. त्याच्यासाठीही हा सारा प्रकार अनपेक्षित होता. बसमध्ये तिच्या कंपनीतील काही कर्मचारी असावेत, नक्कीच असावेत.. त्यांची एव्हाना आपापसात कुजबूज सुरू झाली होती. प्रसंगाने आणखी वेगळा रंग पकडायच्या आधीच सौरभने शमीनचा हात धरून अक्षरशा खेचतच त्याला पुढच्याच स्टॉपवर उतरवले. खाली उतरताच तो शमीनवर जवळजवळ खेकसलाच, “अरे काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुला??? असे बघतात का एका पोरीकडे?? स्वतापण मार खाल्ला असतास आणि तुझ्या नादात मला पण पडली असती.. बस्स… यापुढे तुझ्याबरोबर मी येणार नाही परत…”
आता शमीन त्याला काय समजावनार होता… झाल्या प्रकाराने तो स्वतादेखील भांबावला होता. त्याचे स्वताचेच स्वताच्या आयुष्यावरचे नियंत्रण सुटले होते, हे आता तो सौरभला कसे पटवून देणार होता?? कोणी ठेवला असता त्याच्यावर विश्वास??
………पण त्या आधी त्याला स्वताला परत एकदा खात्री करून घेणे गरजेचे होते.
ऑफिसमध्ये जराही मन लागत नव्हते. तब्येत बरी नाही सांगून अर्ध्या दिवसानेच शमीन घरी परतला. आईच्या चौकशीकडे लक्ष न देता तडक आपल्या रूममध्ये गेला, बॅग भिरकावून दिली, सरकन ड्रॉवर खेचून डायरी बाहेर काढली आणि……… “पुढे बघ..” ……. तेच शब्द… तीच घटना… जशीच्या तशी… आजच्या तारखेची नोंद करून डायरीत आधीच लिहिली गेली होती.
आता मात्र खरेच शमीनचा भितीने थरकाप उडाला होता. या आधी तो जे डायरीमध्ये लिहायचा तसेच घडत होते, पण आता मात्र डायरी स्वताच त्याचे आयुष्य घडवत होती. आणि जे घडत होते ते सारे विपरीत घडत होते. जे त्याला नको होते नेमके तेच घडत होते. आणि हे सारे थांबवणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. मुळात हे घडतच कसे होते हेच त्याच्यासाठी एक गूढ होते. अजूनही शमीन डोळे फाडून फाडून डायरीच्या पानांकडे बघत होता. एक खेळ होत होता ज्यात तो पुरता अडकला होता. पण आता सांगतो कोणाला?? कारण खेळ सुरू करणाराही तोच तर होता. ज्यातून बाहेर पडायचा मार्ग आता त्यालाच सापडत नव्हता. यालाच चक्रव्यूह म्हणत असावे का??
………..पण त्याचवेळी
अजूनही शमीनला ती हवी होती.. या ही परिस्थितीत त्याला तिचा चेहरा आठवावासा वाटत होता.. पण आता आपण तिच्या मागे गेलो की परत काही तरी विस्कोट होणार याची त्याला भिती वाटत होती. हा गुंता सोडवायला कोणाच्या तरी मदतीची त्याला गरज होती. आणि अश्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती आली. काही का होईना, उद्या आता हे सारे सौरभला सांगायचे असे त्याने मनोमन ठरवले.
.
—————————————— भाग -४ (अंतिम भाग) ——————————————-
.
.
………………………………………………………………………………………………………..
.
.
शमीन एकेक घटना सांगत होता तसे सौरभच्या चेहर्यावरचे भाव बदलत होते. अविश्वास आणि थट्टेच्या जागी गांभीर्य येत होते. खरे तर हे असे काही घडत असावे यावर सौरभचा म्हणावा तसा विश्वास बसला नव्हता, पण निदान तो शमीनची वेड्यात गिणती करत नव्हता. जे काही घडत होते, घडत असावे त्या मागचे स्पष्टीकरण सौरभलाही सुचत नव्हते. पण तरी त्याच्या डोक्यात सर्वप्रथम आली ती डायरी, जी या सार्या प्रकरणाच्या मुळाशी होती… तिलाच जाळून टाकले तर… शमीनलाही त्याचे म्हणने काही अंशी पटले… जर खरेच डायरीत लिहिलेले घडत असेल तर ती डायरीच का नष्ट करू नये??
सौरभला खरे तर ती डायरी बघायची होती. कारण गेल्या दोन घटनांचा तो देखील साक्षीदार होता. पण शमीनने मात्र आता वेळ न दवडता आजच्या आज ती डायरी जाळून टाकायचे ठरवले.
रात्री जेवण झाल्यावर शमीन स्वयंपाकघरातील काडेपेटी घेऊनच आपल्या रूममध्ये गेला. घरातले सारे झोपी गेल्यावरच डायरी जाळणे योग्य राहिले असते. म्हणून शमीनने उशीरापर्यंत जागायचे ठरवले. तोपर्यंत चाळा म्हणून मग परत त्याने डायरीच वाचायला घेतली. गेले काही दिवस अघटीत घडले असले तरी त्या आधीच्या काही हव्याहव्याश्या वाटणार्या आठवणी होत्या त्या डायरीत. त्या काही दिवसांचे वाचताना शमीनला वाटले की ही पाने फाडून बाजूला काढून डायरी जाळली तर… पण नकोच ते.. का विषाची परीक्षा घ्या.. डायरीची ती पाने पुन्हा पुन्हा वाचताना त्याचा पडल्यापडल्याच डोळा लागला. मध्यरात्री कधीतरी पाने फडफडल्याचा आवाज झाल्याने जाग आली तर ती डायरी तशीच त्याच्या छातीवर होती. घरातील सारे झोपले होते. हीच संधी साधून त्याने मागच्या दाराने बाहेर अंगणात जाऊन त्या डायरीची पाने-पाने सुटी करून, ती जाळून, त्याची सारी राख घरामागून वाहणार्या नाल्यात टाकली आणि परत आपल्या जागेवर येऊन झोपला.
………….तरी त्याला अजून सुटल्यासारखे वाटत नव्हते. एक दडपण, एक अस्वस्थता अजूनही होती. अजूनही डायरीची पाने फडफडल्याचा आवाज ऐकू येत होता. पण यावेळी मात्र तो कुठूनतरी लांबवरून आल्यासारखा वाटत होता.
सकाळी अलार्म वाजल्याच्या आवाजानेच शमीनला जाग आली. पाहतो तर डायरी त्याच्या जवळच पडली होती. म्हणजे काल रात्री त्याने स्वप्नच पाहिले होते. डायरी जाळायची आपली हिंमत नाही, किंवा हा यातून सुटकेचा मार्ग नाहीच आहे हे आता तो समजून चुकला. डायरीने त्याच्या मनाचा, डोक्याचा आणि त्यांतील विचारांचा ताबा घेतला होता. त्याच्या हातून तरी आता ती नष्ट होणार नव्हती.
दुसर्या दिवशी शमीन ती डायरी सौरभला दाखवायला म्हणून आपल्याबरोबर ऑफिसला घेऊन गेला. कदाचित सौरभ यातून काही मार्ग काढू शकेल, कदाचित त्याला ही जाळून टाकणे किंवा हिची विल्हेवाट लावणे शक्य झाले असते. ऑफिसमध्ये पोहोचताच दोघेही ती डायरी घेउन तडक कॅन्टीनमध्ये गेले. सौरभसमोरच शमीनने ती डायरी उघडली आणि एकेक पान उलटत त्याला ती डायरी वाचून दाखवू लागला. गेले महिना-दोन महिने जे काही घडत होते, शब्द न शब्द, एकेक घटना जशीच्या तशी.. त्या दिवशीच्या बसमधील घटनेबद्दलही सौरभने शमीनला जबाबदार धरले होते पण त्याची देखील आधीच डायरीत नोंद होती.. जसे शेवटचे पान संपवून शमीनने सौरभकडेकडे पाहिले तेव्हा सौरभचा चेहर्यावर देखील भितीचे सावट पडले होते. त्याने ती डायरी शमीनच्या हातातून खेचून बंद केली आणि याची कुठे वाच्यता करू नकोस असे बोलून ती आपल्याबरोबरच घेऊन निघून गेला.
.
.
………………………………………………………………………………………………………………………..
………………………………………………………………………………………………………………………..
.
.
डॉ. फडके, एक नावाजलेले मानसोपचारतज्ञ.. किडकिडीत शरीरयष्टीचे पण प्रथमदर्शनीच एक असाधारण व्यक्तीमत्व वाटावे अशी देहबोली, बोलण्यात कमालीचा गोडवा आणि हळूवारपणा.. हवे तर जादूच म्हणा ना.. संमोहनशास्त्रावर यांची खास मास्टरी… आजवर गुंतागुंतीच्या बर्याच केसेस यांनी सहजगत्या सोडवल्या होत्या. अर्थात तशीच गुंतागुंतीची केस असल्याशिवाय ते लक्षही घालत नसत. थोडक्यात सांगायचे तर बाप होते त्यांच्या क्षेत्रातील. मोठ्या मुश्किलीने सौरभने त्यांची अपॉईंटमेंट घेतली होती. खरे तर त्यांच्याशी संपर्क साधणेच अवघड होते, पण जेव्हा सौरभने शमीनबद्दल त्यांना सांगितले तेव्हा ही केस तशीच खास आणि अर्जंट आहे हे जाणून त्यांनी स्वताहूनच संध्याकाळची अपॉईंटमेंट दिली होती.
आपण एक मानसोपाचाराच्या दृष्टीने क्रिटीकल केस आहोत ही भावना शमीनच्या मनावरचे दडपण वाढवत होती. पण त्याच वेळी आणखी उशीर होण्याआधी योग्य जागी पोहोचलो आहोत ही गोष्ट दिलासा देखील देत होती. कदाचित आपण खरेच मनोरुग्ण असू, आपल्याल वेडही लागले असावे, पण हे असले अतार्किक काही घडू शकत नाही यावर शमीनचा अजूनही विश्वास होता, ही एक सकारात्मक बाब होती. त्याच्या दृष्टीनेही आणि डॉ. फडके यांच्या दृष्टीनेही. आता हे का आणि कसे घडत असावे याची कारणमीमांसा करायचे काम शमीनने डॉ. फडक्यांवर सोडायचे ठरवले.
डॉ. फडक्यांचे अंधेरी हायवेवरील क्लिनिक हे इतर दवाखान्यांपेक्षा वेगळेच होते. संपूर्णपणे पांढर्या रंगाचे ईंटीरीयर आणि पार्श्वभूमीला मंदपणे वाजणारी “ओssम.. ओssम….” ची धून त्यांना आल्याआल्या एका वेगळ्याच वातावरणात घेऊन गेली. डॉ. फडक्यांनी शमीनला जास्त वेळ वाट बघायला लावली नाही. थोड्याच वेळात त्याला त्यांच्या केबिनमधून बोलावणे आले. सौरभलाही त्याच्या बरोबर यायला सांगितले. सुरुवात नेहमीसारखी औपचारिक संभाषणाने झाली. शमीनबद्दल त्यांनी बरीचशी माहिती सौरभशी फोनवर बोलून आधीच गोळा केली होती. जुजबी बोलणे करून डॉक्टरांनी सरळ विषयाला हात घातला. पहिल्यांदा त्या मुलीला पाहिल्यापासून, डायरी लिहायचे खूळ शमीनच्या डोक्यात शिरल्यापासून ते कालपर्यंतच्या सार्या घटना शमीन त्यांना सविस्तर वर्णन करून सांगू लागला. आपले तिच्या मागे मागे जाणे, तिने भाव न देणे, म्हणून मग आपले तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी, तिला मिळवण्यासाठी प्रयत्न करने, त्यात काही प्रमाणात यशस्वी होणे, पण मग अचानक सारे काही विपरीत घडणे, आणि याला जबाबदार असणारी ती डायरी… आधी त्या डायरीचे आपल्या तालावर नाचणे, आणि मग आपल्यालाच तिचे घुमवणे.. शमीन एका विश्वासानेच सारे कथन करत होता आणि डॉ. फडके सारे मन लाऊन ऐकत होते.
शमीनचे सारे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या ड्रॉवरमधून एक डायरी काढून ती शमीनच्या हातात दिली. ती डायरी शमीनचीच होती. डॉ. फडक्यांनी ती आधीच सौरभकडून मागून घेतली होती. शमीनला त्यांनी त्यातील गेल्या चार-पाच दिवसांच्या घटना पुन्हा एकदा वाचायला सांगितल्या. शमीन वाचत होता आणि ते दोघे शमीनच्या हालचाली, त्याच्या चेहर्यावरचे भाव न्याहाळत होते. वाचताना मध्येच त्याने डॉ. फडक्यांकडे पाहिले तसे त्यांनी नजरेनेच त्याला पुढे वाचायला सांगितले. आपले बोलणे डॉक्टर सरांना पटतेय हे बघून शमीन परत पुढे वाचू लागला. त्याचे वाचून झाले तसे डॉ. फडक्यांनी आपल्या ड्रॉवरमधून आणखी एक तशीच डायरी बाहेर काढली आणि शमीनच्या हातात दिली. शमीनच्याच कंपनीची डायरी असल्याने अगदी त्याच्या डायरीसारखीच होती ती. सहज कुतुहलाने त्याने काही पाने चाळून पाहिली तर जवळपास कोरीच होती. प्रश्नार्थक नजरेने त्याने डॉक्टर फडक्यांकडे पाहिले. तसे ते म्हणाले, “आता त्या डायरीचे पहिले नावाचे पान बघ…”
शमीनला पाहताच धक्का बसला. पहिल्या पानावर त्याचेच नाव लिहिले होते. खालोखाल घरचा अॅड्रेस, ऑफिसचा एक्स्टेंशन नंबर, त्याचा मेल आयडी, ब्लड ग्रूप ए पॉजिटीव्ह… ही खरी शमीनची डायरी होती. पण मग ती कोरी कशी?? सुरुवातीची दोनचार पानेच काय ती भरली होती.. पुढचे लिहिलेले कुठे गेले?? आणि मगाशी वाचली ती डायरी.. ती कोणाचे होती?? ती जर आपली नव्हती तर त्यात लिहिलेले… ते कुठुन आले? त्यात कोणी लिहिले? आणि यातले कुठे गेले? … थोड्याश्या अविश्वासानेच शमीनने पुन्हा पहिली डायरी उघडली. तर त्यात पहिल्या पानावर सौरभचे नाव होते. म्हणजे एवढा वेळ तो ज्या डायरीत बघून सारे वाचत होता ती सौरभची डायरी होती.. दोघांच्या डायर्या ऑफिसच्याच असल्याने सारख्याच होत्या. आत चाळून पाहिले तर पहिल्या चार-पाच पानांवर सौरभने ऑफिसच्या कामासंदर्भात काही लिहिले होते. पण पुढे मात्र कोरीच होती. आता मात्र शमीनच्या चेहर्यावर हजार प्रश्नचिन्ह उमटली होती.. आणि हे पाहूनच डॉक्टर फडक्यांनी सारी सुत्रे आता आपल्या हातात घेतली आणि बोलायला लागले,
“हे बघ शमीन, सर्वात पहिले म्हणजे आपल्या मनातून काढून टाक की तुला वेड वगैरे काही लागले आहे. आणि आता मी काय सांगतो ते अगदी शांतपणे ऐक. हा एक मानसिक आजार आहे. जसे सर्दी, ताप, खोकला यांसारखे छोटे-मोठे आजार असतात तसाच हा देखील एक, आणि याचा उपचार सुद्धा आपण तसाच करणार आहोत.
तर… यात घाबरण्यासारखे काही नाही.
काय होते ना शमीन, कधी कधी आपण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या घटनेचा एवढा विचार करतो की ती सारखी आपल्या आसपास घडत आहे असा आपल्याला भास होतो. तर कधी एखादी घटना घडून गेल्यावर असे वाटते की आपण हे या आधी पण अनुभवले आहे किंवा आपल्याला हे आधीच ठाऊक होते की हे असेच घडणार..” डॉ. फडके त्याच्याशी एखाद्या मित्राशी गप्पा मारल्यासारखे बोलत होते. कदाचित हीच त्यांची ट्रीटमेंट करायची खासियत असावी.
“तसेच तू दुहेरी व्यक्तीमत्वाबद्दल कुठेतरी वाचले असशील किंवा एखाद्या सिनेमात पाहिले असशीलच..” डॉ. फडक्यांनी उत्तराच्या अपेक्षेने क्षणभर शमीनकडे पाहिले. पण तो मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत नव्हता हे त्यांनी ओळखले आणि स्वताहूनच पुढे सुरू झाले..
“ओके.. दुहेरी व्यक्तीमत्व.. ज्याला आमच्या मेडीकल टर्ममध्ये मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असेही बोलतात. यात काय होते ना, आपल्यातीलच व्यक्तीमत्वाचा एक पैलू आपल्याही नकळत बाहेर पडतो. जो बर्याचदा आपल्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध असतो. आणि मुळात हेच याचे कारण असते. आपल्या एखाद्या विशिष्ट स्वभाव वैशिष्टयाबद्दल आपल्याला कमीपणा वाटू लागतो, आणि कालांतराने तो एवढा वाढतो की एकाक्षणी आपल्याला असे वाटू लागते की आपल्या या स्वभावाने आपण बरेच काही गमावले आहे. आता तरी आपण बदलले पाहिजे. पण स्वभावबदल हा असा अचानक क्रांतीसारखा घडणे शक्य नसते. पण तरीही आपण तो घडवायला जातो. काही अंशी आपण यात यशस्वीही ठरतो, तरीही चोवीस तास तसेच वागता येत नाही परिणामी आपण एकाच वेळी दोन व्यक्तीमत्वे जगायला सुरुवात करतो. सुरुवातीला आपल्यातील ठराविक काळासाठी होणारा हा बदल आपल्याला चांगला वाटू लागतो आणि त्यामुळे आपणच त्याला खतपाणी घालतो. पण हळूहळू आपला त्याच्यावरील कंट्रोल सुटत जातो, जो खरे तर मुळातच फारसा नसतो. आणि मग गुंता वाढत जातो.. तुझ्या बाबतीत पण असेच काहीसे घडत आहे…”
अजूनही शमीन भांबावलेल्या अवस्थेतच होता. डॉक्टर फडक्यांना हे अपेक्षितच होते. त्यांनी आपले बोलने न थांबवता तसेच पुढे चालू ठेवले, “तर.. ही झाली थिअरी, आता याचा तुझ्याशी कसा संदर्भ लागतो हे आपण बघूया, नाही का..”, तसा शमीन आता उत्सुकतेने ऐकू लागला. सौरभही आपली खुर्ची सरसावून बसला.
“तु त्या मुलीमध्ये, काय तिचे नाव.. हा अमृता.. तर तू त्या अमृतामध्ये जरा जास्तच गुंतलास. दिवसरात्र चोवीस तास तिचाच विचार करायचा. त्यात तू तिच्याबद्दल डायरी लिहायला घेतलीस, याचा परिणाम असा झाला की तिच्या विचारांनी तुझ्या मेंदूचा आणखी ताबा घेतला. डायरीत सुरुवातीला जे घडेल ते तू व्यवस्थित लिहायचास, पण जेव्हा त्यात तोचतोचपणा येऊ लागला तेव्हा तुला आपल्या आयुष्यात, या प्रेमकहाणीत काही वेगळे घडावे असे वाटू लागले. पण तुझा बुजरा स्वभाव पाहता ते शक्य नव्हते. आज पर्यंत या स्वभावामुळे कदाचित तू बर्याचदा प्रेमात माघार घेतली असावीस. नेमक्या याच गोष्टाचा तुला कुठेतरी त्रास होत होता. या सर्वाचा परीणाम म्हणून मग तुझ्यातील एक लपलेले व्यक्तीमत्व बाहेर पडले. तू स्वता आयुष्यात काही केले नसले तरी उघड्या डोळ्यांनी स्वप्न मात्र बरीच बघितली असणार, की जरा माझ्यात हिंमत असती तर मी असे केले असते, जर मी असा असतो तर तसे केले असते.. बस्स.. हेच तू आता करायला घेतले होतेस. पण हा तुझा मूळ स्वभाव नव्हता. हे जरी तूच करत असला तरी तुझे स्वताचे मन तुला हे पटवून देऊ शकत नव्हते की हे करणारा तू स्वताच आहे. कारण तुझी विचारशक्ती हे मान्य करायला तयारच नव्हती की तू स्वता हे करू शकतोस. मग आता स्वताच्याच बुद्धीला हे पटवायचे कसे?? आणि म्हणूनच तुझ्या मनाने डायरीचा आधार घेतला. तू डायरी मध्ये काही लिहित नव्हतास, जे घडत होते ते तूच घडवत होतास, आपल्या बदललेल्या व्यक्तीमत्वाच्या जीवावर. तरी तू स्वताची अशी समजूत घातली असल्याने की हे सारे डायरीमुळे घडतेय, घरी आल्यावर जेव्हा तू डायरी बघायचास तेव्हा तुला घडलेली घटना आपण आधीच लिहिलेली आहे असे त्यात दिसायचे. ते शब्द म्हणजे निव्वळ भास होता. तुझ्याच मनातील विचार तुला त्या कोर्या पानांवर शब्दरुपात दिसत होते. डायरी उघडायच्या आधीच ती घटना, ते शब्द तुझ्या अंतर्मनात छापले गेले असल्याने त्या पलीकडे जाऊन तू कधी विचार करूच शकला नाहीस. आता त्या दिवशीचे ताजे उदाहरणच घे ना, तू आधी त्या मुलीकडे चोरून चोरून बघायचास पण त्या दिवशी बसमध्ये मात्र बेधडक बघू लागलास, आणि त्यावर त्या मुलीची प्रतिक्रिया योग्य अशीच होती. तिचे चिडणे साहजिकच होते. पण याला जबाबदार सुद्धा तू डायरीला धरलेस. आणि घरी गेल्यावर तुला ते डायरीत दिसायला लागले. कारण तुला तुझ्या त्या दुहेरी व्यक्तीमत्वाला दोषी ठरवायचे नव्हते. परिणामी जे घडले ते परत तुला डायरीत दिसू लागले किंवा तू ते बघू लागलास..”
डॉ. फडके बोलायचे थांबले आणि शमीनकडे बघू लागले. शमीनला स्वताहून त्याच्या डोक्यातील गुंता सोडवायला त्यांनी थोडा वेळ दिला.. आता ते शमीनकडून प्रश्नांची अपेक्षा धरून होते.
“…………”
“ह्मम.. विचार विचार, डोक्यात काही ठेऊ नकोस.”
“पण मग.. बसचा संप आणि पाऊस… ?? त्याचे काय .. ?? ” बर्याच वेळाने शमीन कसेबसे एवढेच उत्तरला.
“अच्छा.. ते कसे डायरीत लिहिल्याप्रमाणे घडले असावे हेच ना..? पण मुळात तू स्वताच मगाशी पाहिलेस की डायरी तर कोरीच होती. म्हणजे तसे काही घडावे अशी नोंद मुळात तू डायरीत केली नव्हतीसच. पण मग आता नक्की झाले काय… तर जेव्हा तू तिच्याबरोबर एकत्र रिक्षाने प्रवास करायचा अनुभव घेत होतास तेव्हा तुझ्या मनात हा प्रवास असाच लांबावा, रोज रोज घडावा किंवा छानसा पाऊस पडून मस्त रोमॅंटीक वातावरण तयार व्हावे असे येत असणारच.. खरे तर एवढेच नाही तर अश्या बर्याच कल्पना मनात येत असाव्यात. पण त्यातील ज्या एक-दोन कल्पना प्रत्यक्षात उतरल्या त्याचा संबंध तू डायरीशी जोडलास. बसचा संप फिस्कटने ही काही फार मोठी बाब नाही, तसेच ऑगस्ट महिन्यात पाऊस पडणे यातही काही नवल नाही. पाऊस पडावा हे तुला आतून रोजच वाटत असावे, पण पाऊस नेमका ज्या दिवशी पडला त्या दिवशीच तुला ते तसे डायरीत लिहिल्याचे दिसले… किंवा जसे आपण मगाशी पाहिले की तुझ्या मनाने तुला ते दाखवले..
शमीनला हळूहळू सारे पटू लागले होते. तसा मुळातच तो बुद्धीवादी जीव होता. पण तरीही आपल्याशी जे घडत होते तो निव्वळ भास होता, आपल्याच मनाचा खेळ होता हे पचवने त्याला जड जात होते.
सौरभनेच मग शांततेचा भंग केला, “थॅन्क यू सर, आज तुमच्यामुळे माझा मित्र मोठ्या संकटातून वाचला.”
तसे डॉक्टर लगेच उत्तरले, “नाही नाही, इतक्यात नाही. आता हे आपण फक्त रोगाचे निदान केले आहे, उपचार करायचा अजून बाकी आहे.”
“म्हणजे?” शमीन दचकूनच म्हणाला, “आता मला समजले आहे ना सारे, की हा माझा निव्वळ भ्रम होता, मग आता अजून उपचार असा काय बाकी आहे.”
“त्याचीच तर भिती आहे..” डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलू लागले, “आता हे जसे तुला समजले आहे तसेच तुझ्यातील त्या दुहेरी व्यक्तीमत्वाला देखील समजले आहे. आता तो तुझ्यावर हावी व्हायचा प्रयत्न करणार. तुला स्वताला ती आवडत असली तरी तू आपल्या मर्यादेत राहून तिला मिळवायचा प्रयत्न करणार. आणि तुझे ते आभासी व्यक्तीमत्व मात्र कोणत्याही मार्गाचा अवलंब करायला मागेपुढे पाहणार नाही. खरा प्रॉब्लेम तर तेव्हा सुरू होणार जेव्हा या दोन व्यक्तीमत्वांच्या लढाईत तुझी मानसिक ओढाताण होणार. आणि त्यांच्यात कोणीही जिंको.. हार मात्र तुझीच होणार.
“पण मग यावर उपाय काय??”, शमीनच्या आधी सौरभनेच उत्सुकतेने विचारले.
“ह्म्म, उपाय तर आहे, पण त्या साठी शमीनच्या मनाची पुर्ण तयारी हवी..” डॉक्टर शमीनकडे बघत म्हणाले,
“म्हटले तर खूप साधा सोपा उपाय आहे पण जर तुझ्या मनाने विरोध केला तर कधीच शक्य होणार नाही असा…..”
“……. काही समजले नाही”
“तुला त्या मुलीला विसरावे लागणार शमीन… अगदी पूर्णपणे विसरावे लागणार.. विसरणे म्हणजे तिला आपल्या विचारांतूनच काढून टाकणेच नाही… तर…, तिची आठवण, तिचे विचार, तिच्याशी संबंधित सार्या काही गोष्टी तुला तुझ्या मनातून, डोक्यातून कायमचे काढाव्या लागणार. जसे कॉम्प्युटरची एखादी डिस्क फॉर्मेट करतात किंवा त्यातील अनावश्यक भाग तेवढा इरेज करतात. अगदी तसेच अमृता नावाचा चाप्टर तुझ्या डोक्यातून आपल्याला आजच, आताच क्लोज करावा लागणार. जरा जरी काही मनात राहिले तर पुढे मागे परत द्विधा मनस्थितीत अडकशील आणि मग मेंटल डिसऑर्डरची शक्यताही नाकारता येणार नाही…. ज्याचा परीणाम तुला वेड लागण्यापासून ब्रेन हॅमरेजने मृत्यू ओढावणे पर्यंत काहीही होऊ शकतो…”
“……………………”
डॉ. फडके बोलत होते आणि शमीन शून्यात बघितल्याप्रमाणे त्यांच्याकडे नजर लाऊन ते सारे ऐकत होता. हा उपाय होता की शिक्षा हेच त्याला समजत नव्हते. आणि गुन्हा देखील असा काय तर, एखादीवर गरजेपेक्षा जास्त प्रेम करणे..
तिला न विसरता आपल्यातील ते दुसरे व्यक्तीमत्व बाहेर काढून फेकता येणार नव्हते का?? परत आपण पहिल्यासारखेच तिला लांबून बघत राहू. खूश होतो आपण यातच. ती मिळालीच पाहिजे असा काही हट्ट नाहिये माझा. पण तिला विसरायला नका सांगू….
शमीनच्या चेहर्यावर एक प्रकारची उदासी आली होती जी डॉक्टर फडक्यांनी बरोबर हेरली.
“हे बघ शमीन, जर तू इतर कुठे गेला असतास किंवा एखादा मांत्रिक तांत्रिक केला असतास तर त्याने तुला एखादा गंडा-दोरा दिला असता. ती शुद्ध फसवणूक असते असे मी नाही म्हणनार. कारण जर त्याच्यावर तू श्रद्धेने विश्वास ठेवला असता तर नक्कीच काही काळापुरता तू मानसिकदृष्ट्या सक्षम झाला असतास. पण जशी एखादी हलकीशी विपरीत घटना घडली असती तसे लगेच तुझा त्याच्यावरचा विश्वास उडाला असता आणि तू कमजोर पडला असतास. म्हणून जर हा आजार मुळापासून बरा करायचा असेल तर हाच एक मार्ग आहे आणि तो देखील आज आता ताबडतोब अंमलात आणायची गरज आहे. आणखी उशीर करून चालणार नाही. कारण, ती मुलगी अजूनही तुझ्या मनात असल्याने तू कितीही ठरवलेस तरीही स्वताच्याच नकळत त्या आभासी व्यक्तीमत्वाला पुन्हा उसळी घ्यायला तू स्वताच मदत करणार. म्हणून हे सारे इथेच थांबवावे लागणार..” डॉ. फडके यावेळी स्पष्टच आणि निर्णायक म्हणाले.
शमीन अजूनही शांतच बसला होता. डॉक्टर फडके त्याच्या मौनालाच होकार समजून पुढच्या तयारीला लागले. शमीन जरी द्विधा मनस्थितीत असला तरी त्यांना पक्के ठाऊक होते की या परिस्थितीत काय करायचे आहे. शमीनचे चित्त शांत व्हायला त्यांनी त्याला अर्ध्या तासाचा ब्रेक दिला. पण सौरभला मात्र त्याच्याच बाजूलाच बसायला सांगितले. त्याने सवयीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा मारून शमीनला रिलॅक्स करायचा प्रयत्न केला पण त्याचा फारसा काही फायदा झाला नाही.
जवळपास वीस-पंचवीस मिनिटांनी डॉक्टर परत आले. शमीन आता बर्यापैकी संतुलित दिसत होता. त्याला त्यांनी जवळच असलेल्या एका आरामखुर्चीवर बसायला सांगितले. आरामखुर्ची खरेच खूप आरामदायक होती. बसल्याबसल्याच झोपावे असे वाटणारी. मगासपासून शमीनच्या डोक्याला जो ताण आला होता तो बसताक्षणीच जरासा निवळल्यासारखा वाटला. रूममधील दिवे मंद केले गेले. एअर कंडीशनची सेटींग चेंज केली तसे कसलातरी दर्प नाकात शिरला. हळूहळू शमीनला आपले डोके जड झाल्यासारखे वाटू लागले. डॉक्टर फडके त्याच्या समोर येऊन उभे राहिले आणि इशार्यानेच त्याला न घाबरता थोडावेळ तसेच पडून राहण्यास सांगितले. सौरभ रूम मध्ये होता की नाही हे ही शमीनला समजत नव्हते. मान वळवून त्याला बघणेही अंगावर आले होते. पण आता डॉक्टर साहेबांनी शमीनचा ताबा घेतला होता.. प्रश्नोत्तरांचा राऊंड सुरू झाला होता..
“नाव काय आहे तुझे?”
“शमीन”
“पुर्ण नाव?”
“शमीन नाईक”
“कुठे राहतोस?”
“माझगावला..”
“घरी कोण कोण आहेत?”
“आई, बाबा…”
“काम काय करतोस?”
“सिविल ईंजिनीअर आहे…”
“आता जॉबला कुठे आहेस?”
“ऑब्लिक कन्सलटंट प्रायवेट लिमिटेड…”
“कुठे आली ही कंपनी?”
“कांदिवलीला…”
“ऑफिसला कसा जातोस?”
“ट्रेनने…”
“सकाळी घरून किती वाजता निघतोस?”
“साडेसातला…”
“ऑफिसला कधी पोहोचतोस?”
……..
…..
…
डॉक्टर प्रश्न विचारत होते आणि शमीन जेवढ्यास तेवढे निमूटपणे उत्तर देत होता. त्याला आधी वाटले होते की लंबक वगैरे फिरवून आपल्याला संमोहीत केले जाईल. पण अजूनपर्यंत डॉक्टरांनी तसे काही केले नव्हते. किती प्रश्न विचारले गेले, किती अजून विचारले जाणार, त्याला काही समजत नव्हते. अजूनपर्यंत त्यांनी अमृताबद्दल काहीच विचारले नव्हते. थोड्यावेळाने त्याला असे वाटू लागले की आपल्याला आता गाढ झोप येत आहे. आणि हळूहळू आपण चक्क झोपतही आहोत. तरीही प्रश्न तसेच सुरू होते. जणू काही डॉक्टर आपला स्वप्नातही पिच्छा सोडणार नव्हते. पण शमीन मात्र शहाण्या बाळासारखे त्यांच्या सार्या प्रश्नांची उत्तरे देत होतो. हे संपवून त्याला गाढ झोपी जायचे होते…
डॉक्टरांनी अचानक अमृताचा विषय काढला आणि तिचे नाव न घेताच थेट विचारले,
“किती प्रेम करतोस त्या मुलीवर?”
“प्रेमात किती वगैरे असे काही नसते.. जे काही करतो ते तिच्यावरच करतो.. ती सोडून दुसर्या कोणत्या मुलीकडे बघावेसे वाटत नाही.. की इतर कोणाचा साधा विचारही मनात येत नाही.. दिवसरात्र मी तिच्याच विचारात असतो.. तिला वजा केल्यास माझ्या आयुष्यात काही उरणार नाही..”
एवढा वेळ एका शब्दात उत्तर देणारा शमीन अचानक भावनांचा बांध सुटल्याप्रमाणे मनातील सारे रिकामे करू लागला.
“पण तिचे तुझ्यावर प्रेम आहे का?” डॉक्टर सरांनी मध्येच टोकले.
काय फरक पडतो…?? …. शमीनच्या ओठावर आलेले शब्द तसेच विरले..
“नाही.., माहीत नाही”
“मी सांगतो ना, तिचे तुझ्यावर जराही प्रेम नाही. प्रेम तर सोड, राग करते ती तुझा.. तुझा अपमान करायची एकही संधी सोडत नाही ती.” डॉ फडक्यांनी वर्मावरच घाव घातला.
“नाही तुम्ही खोटे बोलत आहात, तसे काही नाहिये.” शमीन कासावीस होत उत्तरला.
“अच्छा, मग त्या दिवशी काय म्हणाली ती तुला सर्वांसमोर… आठवतेय, की मी सांगू… तुला तिच्याबद्दल एवढे वाटते पण ती मात्र तुला जराही भाव देत नाही.. विसर तिला शमीन, मुलींची काय कमी आहे का जगात, एक गेली दुसरी मिळेल.. तसेही ती तुझ्या योग्यतेची नाही आहे.. एवढा हुशार तू, एवढा शिकलेला आहेस, आईवडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा, लग्नाला उभा राहिलास तर मुलींची लाईन लागेल… काय ठेवलेय तिच्यात.. काढून टाक तिचा विचार आपल्या मनातून..” डॉ. फडके अक्षरशा जिव्हारी लागेल अश्या टोनमध्ये शब्दफेक करत होते. पण शमीन मात्र या क्षणी त्यांच्याच संमोहनाच्या प्रभावाखाली होता.
“हो… खरे आहे… पण तरीही… तिच्या सारखी मुलगी मला नाही मिळणार कुठे…” शमीनच्या बोलण्यातील आत्मविश्वास आता डळमळीत होऊ लागला होता. तसेही गेल्या एकदोन घटना पाहता तिच्यापासून शमीन दुखावला गेला होता हे खरेच होते. त्याचे तिच्यावर प्रेम असले, आणि तो तिच्या कितीही योग्यतेचा असला तरी ती आपल्याला मिळण्याची शक्यता कमी आहे हे त्यालाही ठाऊक होते. डॉक्टरांच्या शब्दांवर त्याचा आता विश्वास बसू लागला होता. किंवा खरे तर तेच त्याच्या सोयीचे होते. ती आपल्याला मिळू शकत नाही यापेक्षा ती आपल्या योग्यतेचीच नव्हती अशी मनाची समजूत घालायला शमीनने सुरुवात केली. डॉ. फडकेंना हेच हवे होते. शमीनच्या डोक्यातून तिचे विचार काढून टाकण्यासाठी आधी त्याच्या मनातील तिच्याबद्दल असलेल्या प्रेमभावना कमजोर पाडणे गरजेचे होते. त्याचे मन या काही क्षणांसाठी कमकुवत करणे गरजेचे होते.
“डोळे उघडून बघ शमीन, जवळपास किती सुंदर मुली आहेत. आणि काय कमी आहे तुझ्यात….” डॉक्टर फडकेंचे शमीनचे ब्रेनवॉश करणे सुरूच होते.
मध्येच हळूवार बोलत तर मध्येच कडक भाषा वापरत हळूहळू डॉक्टरांनी शमीनच्या मनाचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती. आता पुढचे काम डॉक्टर सरांसाठी सोपे झाले होते. हीच योग्य वेळ आहे हे जाणून डॉक्टरांनी शमीनच्या डोक्यात त्यांना हवी ती माहिती भरायला सुरूवात केली… ते जसे बोलत होते, तेच आता शमीन बोलत होता…
“अमृता नावाच्या कोणत्याही मुलीला मी ओळखत नाही… माझे नाव शमीन नाईक असून मी एक ईंजिनीअर आहे… मी माझगावला राहतो… मी कांदिवलीला कामाला आहे… रोज सकाळच्या साडेसातच्या ट्रेनने प्रवास करतो… तिथून बस पकडून थेट ऑफिस गाठतो… ऑफिसमधील माझे काम उरकले की संध्याकाळी परत तसाच उलटा प्रवास… आधी बसने स्टेशनला येतो मग तिथून ट्रेनने घरी… या प्रवासात ना मला कोणी भेटते ना मी कोणाला ओळखत… अमृता नावाच्या कोणत्याही मुलीला मी ओळखत नाही… माझे कोणत्याही मुलीवर प्रेम नाहीये… अमृता हे नावही मी कधी ऐकलेले नाहीये… कॉलेजमध्ये असताना शमिता नावाची मुलगी मला आवडायची… तेच माझे शेवटचे प्रेम.. त्यानंतर मी कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडलो नाही… आता माझी झोपायची वेळ झाली आहे… मला झोप येत आहे… मला झोप आली आहे… आता मी झोपलो आहे… अगदी गाढ झोपलो आहे………!!
.
.
…………………………………………………………………………………………………………………….
…………………………………………………………………………………………………………………….
.
.
आज सकाळी शमीनला आपला मूड काहीतरीच फ्रेश वाटत होता. खूप दिवसांचा आळस झटकून उठल्यासारखे वाटत होते. प्रत्येक पहाट एवढी रमणीय असते की आजच काही खास वाटत होते ठाऊक नाही पण मुद्दामच त्याने आज नवीन कपड्यांचा जोड बाहेर काढला. आई देखील म्हणाली, “वाह., क्या बात है.. आज माझे पिल्लू एकदम हिरो बनून चाललेय ऑफिसला..” … पण खरेच, रस्त्याने चालतानाही आज त्याला वेगळाच उत्साह वाटत होता, जसे कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जाताना प्रत्येक मुलाला वाटते. रोजचाच रस्ता असूनही त्याने नवीन कात टाकल्यासारखी वाटत होती. पाय नुसते हवेत उडत होते, मनालाही कसलीशी अनामिक हुरहुर लागली होती. ट्रेन थोडीशी लेट आली पण आज नेहमी सारखी त्याने चिडचिड नाही केली. कुठे एवढी घाई होती. ऑफिसमध्ये सर्वात आधी पोहोचून काय झाडू मारायची आहे का, असा विचार करून तो स्वताशीच हसला…
ट्रेन आपल्या ठरलेल्या वेळेला कांदिवली स्टेशनला पोहोचली. नेहमीप्रमाणे कांदिवली स्टेशनच्या बाहेर बसच्या रांगेत जाऊन तो उभा राहिला. रांगेत कोणी ऑफिसचे ओळखीचे दिसते का म्हणून इथे तिथे नजर फिरवू लागला. कोणी खास ओळखीचे दिसले नाही. सौरभही कुठे दिसला नाही. पाच मिनिटे झाली पण बस काही आली नाही. मागच्या ट्रेनने आलेला लोंढा मागे येऊन रांगेत उभा राहिला. मग सवयीप्रमाणे त्यात एखादा बघण्यासारखा चांगला चेहरा दिसतो का म्हणून त्याने पुन्हा नजर फिरवली…. आणि अचानक…. त्याची नजर एका जागी स्थिरावली…. कोण होत्या त्या दोघीजणी… त्यांना या आधीही कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते.. त्यातील एकीला तरी नक्कीच… निरखून बघत तो आठवायचा प्रयत्न करू लागला, तसे त्या दोघींचेही त्याच्याकडे लक्ष गेले.. त्यांच्यातील एक जण सहज हसली.. गालातल्या गालातच.. तर दुसरीने उगाचच तोंड फिरवल्यासारखे केले.. शमीननेही मग मुद्दाम मानेला झटका दिला… सुंदर मुलींना का उगाच गरज नसताना भाव खायची हुक्की येते असे त्याच्या मनात येऊन गेले..
इतक्यात बस आली आणि रांग सरकली.. शमीनने पुन्हा एकदा वळून पाहिले, तर त्यांचे लक्ष त्याच्यावरच होते. नजरेत एक ओळख दिसली. पण नक्की काही आठवत नव्हते. त्याच्यापाठोपाठ त्या देखील त्याच्याच बसमध्ये चढल्या. त्या पुढे बसायला गेल्या आणि शमीन मात्र मागेच उभा राहिला. पण त्याची नजर मात्र अजूनही त्यांनाच न्याहाळत होती. कुठे पाहिले असावे बरे यांना या आधी… आपल्या कॉलेजच्या असाव्यात का? की आपल्या शाळेत होत्या? की ट्रेनमध्ये वगैरे कुठे….?? छे..!! काहीच संदर्भ लागत नव्हता.. पण त्यांनी एकदोन वेळा आलटून पालटून मागे वळून पाहिले.. आता मात्र शमीनची त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आणखी चाळवली गेली आणि तो जरासा पुढे सरकून उभा राहिला.. आता त्याला त्यांच्या गप्पा थोड्याफार ऐकू येत होत्या. पण अजून त्यातून काही म्हणावे तसे हाती लागले नव्हते.. कंडक्टरने “कॅप्सूल, कॅप्सूल” करत घंटी मारली आणि आज स्टॉप जरा लवकरच आला असे त्याला वाटले.. उतरायला म्हणून पुढे गेला इतक्यात त्यातील एका मुलीने त्या दुसर्या सुंदरश्या मुलीला हाक मारली…….., “अमू……!!”
अमू ????
“……………”
पुढे ती काय बोलतेय म्हणून शमीन क्षणभर तिथेच थांबला, तसे लगेच तिने आपल्या मैत्रीणीला चापटी मारली, “अमू काय ग सारखे… अमृता बोल ना…”
ओहह… अमृता…!!
एवढावेळ शमीनला सारखे वाटत होते की आपण यांना कुठेतरी नक्की पाहिले आहे… आणि आता तिच्या मैत्रीणीने तिला मारलेली हाक… अमू…. अमृता…
छे…!!
या नावाच्या एकाही मुलीला शमीन ओळखत नव्हता… तो आपला निव्वळ भास होता हे त्याला समजून चुकले..
पण मुली दिसायला छान होत्या. खास करून ती अमू.. अमृता.. शमीनला ती आपल्या टाईपची वाटली. कॉलेज सुटल्यावर शमीतानंतर त्याला पहिल्यांदा असे कोणत्या मुलीबद्दल वाटले होते. बस मधून उतरल्यावर मागे वळून पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही.. तर नेमकी तिच्याशीच नजरानजर झाली.. तिची नजर खिडकीतून शमीनवरच लागली होती.. दोघांच्या पापण्या किंचित फडफडल्या.. शमीनला हा इशारा पुरेसा होता..
आई खरेच बोलत होती, आज तिचा शमीन बाळ नक्कीच हिरो दिसत होता. कधी हा किस्सा सौरभशी शेअर करून भाव खातो असा विचार मनात येऊन शमीनची पावले ऑफिसच्या दिशेने जरा जास्तच झपझप पडू लागली…..
.
.
xxxxxxxxxxxxx ……… समाप्त ……… xxxxxxxxxxxxx
.
.
.
एक महत्वाचे – कथा अंशतः काल्पनिक आहे.
दुसरे (त्यापेक्षाही जास्त) महत्वाचे – या कथेवर कोणाला मालिका, नाटक अथवा चित्रपट बनवायचा असेल तर त्याने खालील ई-मेल पत्त्यावर लेखकाशी संपर्क साधावा. जेणे करून शमीनच्या भुमिकेसाठी कलाकार शोधायचा त्रास वाचेल..
अभिषेक नाईक – abhiabhinaik@gmail.com
.
.
धन्यवाद,
…तुमचा अभिषेक