RSS

हो, मीच ती… एक सिगारेट पिणारी मुलगी..!

07 डिसेंबर

आधी हि कथा वाचा –

एक सिगारेट पिणारी मुलगी – https://asmiabhi.wordpress.com/2013/12/07/एक-सिगारेट-पिणारी-मुलगी/

—————————————————————————–

हो, मीच ती… एक सिगारेट पिणारी मुलगी..!

आज तो दिसला, तब्बल तीन साडेतीन वर्षांनी ..

ट्रेनमध्ये बसला होता.. एका मुलीबरोबर… मुलगी.?? अंह, गळ्यात लायसन झुलत होते तिच्या. सौभाग्याच्या ईतर ही सतरा खुणा, त्याची ताई किंवा वहिनी तर नसावी.. छे.. मग असे खेटून बसले नसते, ते ही ट्रेन बर्‍यापैकी खाली असताना. पण इतकीही लगट नव्हती दोघांत, त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन झोपायचे तर वेडी खिडकीच्या चौकटीत आधार शोधत होती.. भांडण झाले असावे का दोघांत, की नेहमीच पटत नसावे. छे.. नवरा बायको म्हणजे किशोरवयीन प्रेमी युगुल नाही, ते असेच बसत असावेत.. पण मी का इतका विचार करतेय तिचा..? त्यांचा…? की……. त्याचा.

अजूनही त्याचे लक्ष गेले नाहीये माझ्याकडे, न गेले तरच बरे. काय करावे, कुठे नजर फिरवावी, आज ऑफिस नसल्याने पेपरही बरोबर नाही घेतलाय.. पुन्हा एकदा नकोय मला ती नजरानजर.. जीवघेणी.. न बोलताही बरेच काही सांगून जाणारी.. डोळ्यांतून झिरपत काळजाला घाव देऊन जाणारी.. स्वत:च्या अंतरंगाचा थांगपत्ता लागू न देता समोरच्याच्या मनाचा ठाव घेऊन जाणारी.. ती नजर.. आजही तशीच असेल का.. जशी तीन साडेतीन वर्षांपूर्वी..

कसा बावळटासारखा बघत होता माझ्याकडे, जसे कधी मुलगी बघितलीच नाही. पण वखवखलेली नव्हती ती नजर, आजवर बर्‍याच नजरा अनुभवल्यात तश्या. पण हिच्यात एक निरागसपणा होता.. एक प्रामाणिकपणा होता.. जे आत तेच बाहेर.. की मलाच तसे वाटले.. कँटीनच्या काऊंटरवर उभा होता, पण हातात मेनूकार्ड नुसते नावालाच धरले होते. बहुतेक महाशयांची ऑर्डर देऊन झाली असावी. एकदा आवाज दिला तरी ध्यान कुठे, मग पुन्हा मोठ्याने ओरडावेसे नाही वाटले, घेतले खेचून. ओशाळलाच तो, मी नाही दिले तिथे लक्ष.. खरे तर एक सँडवीचच काय ते ऑर्डर करणार होते मी, तरी का मागावेसे वाटले मला मेनूकार्ड… त्याच्याकडे.

डोळ्याच्या कडांतून मला जाणवत होती त्याची नजर, माझ्याकडेच लागलेली.. वळावे का पटकन.. की इतक्यात नको.. थोडा वेळ द्यावा त्याला.. पण का..? कशासाठी..? दोनेक मिनिटे तशीच गेली, अन पटकन पाहिले रोखून त्याच्याकडे, क्षणभरच.. पण बावरला नाही तो, डोळ्यात एक चमक आली, पण पकडले गेल्याचे भाव नव्हते चेहर्‍यावर, खरे सांगायचे तर हेच आवडले मला त्याचे… त्याच्याबद्दल पहिल्याच नजरेत बांधलेला अंदाज खरा निघाला होता.. बावळट.. अन निरागस.

मला खात्री होती की आता तो मलाच पाठमोरे न्याहाळत असणार, परत पहावे का त्याला पलटून, पकडावे परत त्याला माझ्याकडे बघताना.. पण नकोच, उगाच चुकीचा सिग्नल जायचा. त्यापुढेही कधी पलटले नाही मी, पण ब्रेकफास्ट करताना रोज बघायचे. माझ्या समोरच तर बसायचा, मसाला डोसा खात.. हातानेच.. अन हेच मला आवडायचे त्याचे.

आता हे रोजचेच झाले होते. माझी बसायची जागा मी काही दिवस बदलून पाहिली, मात्र तो त्यानुसार आपले बस्तान मांडायचा. एक दिवस मग मी हा खेळ थांबवला, जेव्हा तो हे माझ्यासाठीच करतोय याची खात्री पटली. त्यानंतर माझी बसायची जागा नेहमी एकच असायची, अन थेट समोरचे टेबल त्याचे. दोघांच्या टेबलमधील अंतर तेच आणि तेवढेच, पण दोघांमधील अंतर झपाट्याने कमी होत होते. जेव्हा माझे सॅंडवीच संपायचे तेव्हा त्याच्या डोश्याचा शेवटचा घास शिल्लक असायचा. माझ्या पाठोपाठच तो उठत असणार हे नक्की. त्याची चाहूल मला जाणवायची, पण एका वळणावर येईपर्यंत. एक मर्यादा आखून घेतली होती त्याने, जिथून आमचे रस्ते वेगळे व्हायचे.. अन हेच मला आवडायचे त्याचे.

पण कधीतरी तो माझ्या शोधात येईल याची खात्री होती मला, की चुकूनच भेट घडायची होती आमची. हो, चुकूनच घडली, ती ही चुकीच्या वेळी.. जे त्याने बघायला नको होते ते त्याने बघितले, जे त्याला कळायला नको होते ते त्याला कळले. पण कधीपर्यंत… तरीही, आजच तो दिवस यावा.

आज सकाळपासूनच डोके भणभणत होते. हल्ली आठवड्यातून एखादीच सिगारेट इतपत नियंत्रण मिळवले होते, पण आज कसलेसे मळभ दाटून आले होते.. आकाशी.. अन मनाशीही. सकाळपासूनची तिसरी सिगारेट होती, तरीही बेचैनी कमी व्हायचे नाव घेत नव्हती. घरचे लग्नासाठी मागे लागले होते, हल्ली रोज फोनवर तो विषय काढल्याशिवाय आईला चैन नसायची. कालच्या तमाश्यानंतर आज तिचा फोन नाही हेच खुपत होते. उलट बोलायला नको होते मी.. कधीतरी अतीच होते माझे.. छे.. सिगारेटचा एक शेवटचा जोरदार झुरका, तोंडातून बाहेर पडणार्‍या धूराचे वलय, त्यातून आरपार लागलेली दूरवर नजर .. अन तो नजरेस पडला.. हातातली सिगारेट गळून पडायची तेवढे शिल्लक राहिले होते. सकाळपासूनच्या वातावरणाचे कोडे उलगडले.. आज ढग नुसते जमून आले होते, त्यांना बरसायचे नव्हते.. पण गरजून मात्र गेले.. त्याने फिरवलेली नजर कायमची असेल हे त्याक्षणी वाटले नव्हते.

मन किती गुंतले आहे याचा अंदाज गुंता सोडवायच्या वेळी येतो. नात्याची एक दोर खेचायची गरज असते, तिथे आपण चुकीच्या खेचून गुंता वाढवत नेतो. त्या दिवसानंतर क्षणाक्षणाला त्याची नजर बदलताना पाहिली. दरवेळी त्याच्या नजरेचा आरसा होऊन त्यात माझ्याच नजरेतील आर्तता दिसत होती. हळूहळू त्या आरश्याचा देखील पारा उडू लागला होता. अन एक दिवस ती नजर दिसायची बंद झाली, कायमची… जी आज पुन्हा माझ्या समोर नियतीने आणली होती .. तब्बल तीन साडेतीन वर्षांनी..

पत्त्यांचा बंगला मोडण्यातील मजा अनुभवता यायला हवी.. तेच खरे प्रेम.. गेले तीन साडेतीन वर्षे मी हेच करत होते. पण आज मात्र जमेनासे झाले, जेव्हा न राहवून मी त्याच्याकडे पाहिले. आजही त्याची नजर काही बोलायला मागत नव्हती, आजही मला त्याची नजर वाचता येत होती. त्याच्या शेजारी बसलेली मुलगी त्याची ताई किंवा वहिनी नाही, हे सांगून जाणारी नजर.. आजही मनाच्या कप्प्यात माझी तीच प्रतिमा तो साठवून बसलाय हे दाखवून देणारी नजर..

इतक्यात माझी नजर त्याच्या शर्टाच्या खिश्यावर पडली. पांढर्‍या झिरमिरीत कापडाच्या पल्याड दिसणारे ते पाकीट, ओळखीचा रंग अन ओळखीचा आकार. शेवटची सिगारेट मी कधी ओढली हे मला आठवत नाही, पण ते पाकिट आजही ओळखता येत होते. तो तेव्हाही सिगारेट पित असावा का..? की हल्लीच ओढायला सुरुवात केली असावी..? आयुष्यातील पहिली सिगारेट ओढताना त्याला माझी आठवण आली असावी का…? तेव्हाही माझ्या मनात बरेच प्रश्न दाटून आले होते, आजही काही वेगळी स्थिती नव्हती. सारेच प्रश्न अनुत्तरीत राहणार, हेच एकमात्र सत्य होते.

कल्पनेचे पंख लाऊन उडताना एकेक पिसे गळून पडत होती. काही मोरपिसांसारख्या आठवणी तश्याच राहाव्यात म्हणून मी विचारांची साखळी तिथेच तोडली. कुठलेसे स्टेशन आले होते, न बघताच मी उठले. त्याच्या विरुद्ध दिशेने, मुद्दामहूनच. त्याची नजर आजही माझा पाठलाग करत असणार याची खात्री होती मला, पण पलटून तिला पकडायची आज इच्छा होत नव्हती. निसटलेले क्षण कधी हातात गवसतात का. प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीत मी हरवून गेले, मुद्दामहूनच..!

– तुमचा अभिषेक

Advertisements
 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: